16 Nov 2017

बापा ज्ञानेश्वरा तुम्हां ठावे हित

आज कार्तिक कृष्ण त्रयोदशी !!
जशी आम्हांला श्रावण कृष्ण अष्टमी सर्वात महत्त्वाची तिथी वाटते, तशीच कार्तिक कृष्ण त्रयोदशी देखील आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्रावणात अष्टमीला पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंची, तसेच त्यांचे अभिन्न स्वरूप सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींची जयंती असते. म्हणून तो आमच्यासाठी दसरा-दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे. तर इ.स.१२९६ मधील कार्तिक कृष्णपक्षात त्रयोदशीला श्री माउलींनी आळंदीतील आपल्या पुरातन स्थानीच पुन्हा संजीवन समाधी घेतली. म्हणून ही त्रयोदशी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी आहे.
श्रीसंत गुलाबराव महाराज आळंदीला ' नित्यतीर्थ ' असे म्हणतात. कारण हेच माउलींचे समाधीचे युगानुयुगांचे जुनाट स्थान आहे. येथूनच ते पुन्हा पुन्हा अवतार धारण करून येतात व अवतार समाप्तीनंतर पुन्हा तेथेच परत जातात. त्यामुळेच श्रीसंत नामदेवराय देखील समाधीच्या अभंगात म्हणतात, " अष्टोत्तरशे वेळा समाधि निश्चळ । "  आळंदीप्रमाणेच भगवान सद्गुरु श्री माउली देखील ' नित्यतीर्थ ' आहेत, तेच सगुण साकार झालेले साक्षात् परिपूर्ण परब्रह्म आहेत !
परमकरुणार्णव श्री माउलींच्या कृपासाम्राज्यात अनेक संतरत्ने निर्माण झालेली आहेत. त्यांतील स्वतेजाने तळपणा-या काही थोर विभूतिमत्वांमध्ये, फलटणचे महान संत प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज व पुण्याचे योगिराज प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज; यांचे नाव अग्रक्रमावर आहे. या दोन्ही निस्सीम माउलीभक्तांचे चरित्र व कार्य श्री माउलींनाही समाधान देईल, इतके वैशिष्ट्यपूर्ण आहे. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे उत्तराधिकारी, प्राचार्य प.पू.श्री.शिरीषदादा कवडे हेही फार विलक्षण माउलीभक्त आहेत.
दरवेळी आपण ज्यांचा उत्सव असेल त्या सत्पुरुषांचे जीवन व कार्याचे सेवा म्हणून मनन करतो. पण यावेळी नेहमीच्या पद्धतीऐवजी आपण प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी रचलेल्या माउलींवरील नितांतसुंदर अभंगांच्या आधारे, संजीवन समाधिदिनी श्रीमाउलीचरणीं दंडवतपूर्वक ही शब्द-पुष्पांजली समर्पूया !
आजवरचे सर्व संत श्री माउलींचे गुणगान गाण्यात, त्यांची सेवा-चाकरी करण्यात धन्यता मानत आलेले आहेत. तीच परंपरा पाळत प.पू.श्री.शिरीषदादा देखील भगवान माउलींच्या अलौकिक व अद्वितीय माहात्म्याचे सुरेख वर्णन करताना म्हणतात,
सागराची गाज शोभे तयापासी ।
थेंबुटे आवेशी कोण काजा ॥१॥
बापा ज्ञानेश्वरा तुम्हापुढे केवी ।
वाचाळी करावी लेकुराने ॥२॥
बोबड्या उत्तरी रिझें जरी तात ।
अज्ञानाची मात कवणासी ॥३॥
मी तो अज्ञ पोर अंध पंगु मुके ।
उच्छिष्ट भातुके द्यावे माते ॥४॥
अमृतेसी काही ठावे नाही आन ।
मर्यादेचे मौन भले मानी ॥५॥

महासागराच्या किना-यावर उभे राहिलो असता, त्याची जी रौद्र-मोहक व विलक्षण गाज जाणवते, तिचा मन भरून आस्वादच घ्यायचा असतो. बारक्याशा थेंबुट्याने कितीही आवेश आणला, तरी त्याला काही त्या गाजेचा आव आणता येणार नाही. अहो माउलीराया, तुम्ही तर प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात, तुमच्यासमोर आम्ही सर्व त्या थेंबुट्यासारखेच आहोत. म्हणूनच, मायबापा ज्ञानेश्वरा ! तुमच्यापुढे आम्ही वाचाळी करावी तरी कोणत्या तोंडाने? आम्ही लेकुरवाचेने बोबडे बोलावे, हेच उत्तम. त्या बोबड्या बोलाने मायबाप रिझतात, कौतुकाने बाळाला कडेवर घेऊन लाड करतात; हे जरी खरे असले, तरी शेवटी त्या अज्ञानी लेकराची गती मती त्या मायबापांशिवाय आणखी ती काय असणार?
देवा, मी तर आपल्या घरचे अज्ञानी, अंध, पंगू व मुके पोर आहे. मला योग्य काय अयोग्य काय? याचे ज्ञान नाही; माझ्या चर्मनेत्रांना माझे हित कधी दिसतच नाही, म्हणून ते एका अर्थाने अंधच आहेत. मला माझ्या प्रारब्धानुसार कर्मांचीच गती आहे, म्हणून एकप्रकारे मी पाय असूनही पांगळाच आहे, मला स्वतंत्र चालताही येत नाही. जे बोलायला हवे ते, श्रीभगवंतांचे नाम, गुण, लीला मी कधीच बोलत नाही, पण बाकीचे सर्व निरर्थकच अकारण बडबडत बसतो, म्हणून मी खरेतर तोंड असूनही मुकाच आहे. पण अहो दयावंता, मी कसाही असलो तरी तुम्हांला माझी दया येऊ द्यावी. ती आली तर आपल्या कृपेच्या उच्छिष्ट प्रसादावर मी पोसला जाऊन, ख-या अर्थाने संपन्न होईन, धष्टपुष्ट होईन.
प्रेमसागरा माउली भगवंता, मला बाकी काहीही कळत नाही, पण मर्यादेचे मौन मात्र मी आपल्या कृपेने जाणतो व तेच सुयोग्य असे मौन धारण करून आता आपल्या समोर हात जोडून उभा आहे. आता जे काही माझे बरे-वाईट व्हायचे असेल ते तुमच्याच इच्छेने होऊदेत.
खरोखरीच भगवान श्री ज्ञानराज माउलींच्या समोर उभे राहताना, तुम्हां आम्हां साधकांची काय भावभूमिका असावी, याचे अप्रतिम वर्णन प.पू.श्री.दादांनी या अभंगात सुंदर रितीने केलेले आहे.  ही भावभूमिका आपण स्वत:मध्ये खोलवर रुजवली पाहिजे.
भगवान श्री माउलींची प्रार्थना करताना आणखी एका अभंगात प.पू.श्री.दादा म्हणतात,
आपुल्या दयेचा मज भरवसा ।
जीव जाला पिसा ज्ञानदेवा ॥१॥
अज्ञ मी म्हणोनी करावा अव्हेर ।
व्हावे ना कठोर ऐसे ताता ॥२॥
मूर्ख मतिमंद दोषांचे आगर ।
खुळे जरी पोर आपुले ना ॥३॥
बापा ज्ञानेश्वरा तुम्हां ठावे हित ।
जाणता उचित लेकुराचे ॥४॥
रसरंगी मिठी घातलीसे पायी ।
दुजी आस नाही अमृतेसी ॥५॥

सद्गुरु श्री ज्ञानदेवा भगवंता, आपल्या निरंतर दयेचाच मला एकमात्र भरवसा आहे. आपल्यासाठी माझा जीव वेडापिसा झालेला आहे. अहो कृपावंता ताता, आपण कठोर होऊन अज्ञानी म्हणून माझा अव्हेर करू नका. मी जरी मूर्ख, मतिमंद, अनेक दोषांचे आगर असलो, वेडा खुळा असलो तरी आपलेच पोर आहे ना !
मायबापा ज्ञानेश्वरा, आपणच माझे खरे हित कशात आहे ते जाणता, तेव्हा माझ्यासाठी जे काही उचित असेल तेच आपण कृपावंत होऊन मला प्रदान करावे. आपल्या श्रीचरणीं मी मिठी घालून, काहीही न मागता, न बोलता निश्चल बसलेलो आहे, आता मला आपल्या स्मरणाशिवाय, आपल्या कृपेशिवाय दुसरी कसलीही आस उरलेली नाही. आपल्या या अजाण लेकरावर मायमाउली भगवंता, आपण कृपावर्षाव करणार ना ?
भगवान श्री माउली नुसते समाधिस्थ नाहीत, ते ' संजीवन समाधिस्थ ' आहेत. त्यामुळे ते कुठेही गेलेले नाहीत. ते आजही आळंदीत तर आहेतच, पण त्याचवेळी विश्वरूपही आहेत. त्यांच्या भक्तांच्या हृदयातील कोवळ्या प्रेमाचा सप्रेम आस्वाद घेत आहेत. ते त्यांच्या नामामध्ये आहेत, त्यांच्या चरित्रात आहेत. जो प्रेमादराने व कळवळून त्यांना हाक मारेल, त्याच्यासाठी ते सदैव त्या अनन्यभक्ताच्या समोरच आहेत ! फक्त तेवढा दृढ विश्वास मात्र त्या भक्तापाशी हवा. मग ते साक्षात् आहेतच समोर !!
आज भगवान सद्गुरु श्री ज्ञानराज माउली महाराजांच्या संजीवन समाधी दिनी, त्यांच्या सर्वार्थदायक श्रीचरणारविंदी वारंवार दंडवतपूर्वक नमन करून, जन्मजन्मांतरी आपले स्मरण व सेवा द्यावी अशी पुनश्च कृपायाचना करूया आणि ' महाराज ज्ञानेश्वर माउली ' या पुण्यपावन नामगजरात त्यांच्याच श्रीचरणी विसावूया !!!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(http://rohanupalekar.blogspot.in )