28 Jan 2019

नमस्कार योगिराज श्री वामनाला

आज पौष कृष्ण अष्टमी, प.पू.सद्गुरु योगिराज श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांची ४५ वी पुण्यतिथी ! श्रीसद्गुरुचरणीं सादर साष्टांग दंडवत !
योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराज म्हणजे अत्यंत अलौकिक असे साक्षात् श्रीदत्तावतारी विभूतिमत्त्वच.
अवतारी विभूतिमत्त्व हे असंख्य अनोख्या सद्गुणरत्नांनी मंडित असते. प्रकर्षाने प्रकटलेली ती दैवी सद्गुणसंपत्तीच सामान्य माणूस आणि अवतारी महात्मा यातला खरा फरक स्पष्ट करीत असते. सद्गुरु श्री.गुळवणी महाराज हे अशा अगणित दैवी सद्गुणांचे आगरच होते. अद्भुत गुरुभक्ती, विलक्षण शास्त्रनिष्ठा, अपूर्व दयाळूपणा, परमश्रेष्ठ हरिप्रीती, बिनचूक शास्त्राचरण व वेदाज्ञेचे काटेकोर पालन, तीव्र ऋतंभरा प्रज्ञा आणि या सर्वांमध्ये उठून दिसणारे जगावेगळे अमानित्व ; अशा हजारो देदीप्यमान दैवी सद्गुणरत्नांचा शांतशीतल प्रकाश श्रीमहाराजांच्या जीवनचरित्रात भरभरून प्रकटलेला दिसून येतो. म्हणूनच त्यांचे चरित्र हा तुम्हां आम्हां साधकांनी सतत अनुसरावा, अभ्यासावा असाच महत्त्वपूर्ण भाग आहे. संतचरित्रांच्या नियमित व सप्रेम अनुसंधानाने व त्या संतांच्या कृपेनेच ते अद्भुत सद्गुण आपल्याही जीवनात हळूहळू उतरतातच. यासाठीच साधकीय जीवनात संतचरित्रांचे विशेष महत्त्वाचे स्थान मानलेले आहे.
सद्गुरु श्री.गुळवणी महाराज हे विलक्षण गुरुभक्त होते. त्यांच्या रूपाने साक्षात् गुरुभक्तीच मूर्तिमान झालेली होती, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यांच्या श्रीगुरुभक्ती विषयीचे दोन बोधप्रद प्रसंग खालील लिंकवरील लेखात मांडलेले आहेत. आजच्या पुण्यतिथी दिनी या लेखनसेवेद्वारे आपण श्रीमहाराजांच्या श्रीचरणीं दंडवतपूर्वक प्रार्थना पुष्पांजली समर्पूया !
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481
गुरु हा प्राणविसावा माझा

https://rohanupalekar.blogspot.com/2017/01/blog-post_20.html?m=1

25 Jan 2019

परमगुरुभक्त श्रीसंत बागोबा महाराज कुकडे पुण्यतिथी

आज पौष कृष्ण पंचमी, राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील अधिकारी विभूतिमत्त्व व अनन्यगुरुभक्त श्रीसंत बागोबा महाराज कुकडे यांची ५९ वी पुण्यतिथी आहे. सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे शिष्योत्तम असलेले प.पू.श्री.बागोबा म्हणजे साक्षात् गुरुभक्तीची घनीभूत मूर्तीच होते. त्यांच्या पावन स्मृतीस सादर साष्टांग दंडवत.
खडतर परीक्षांमधून तावून सुलाखून 'तयार' झालेले विभूतिमत्त्व म्हणजे प.पू.बागोबा महाराज. नियतीच्याही असंख्य परीक्षांना ते सहज सामोरे गेले. प्रचंड श्रीमंतीपासून ते दैन्यावस्थेपर्यंत सर्वकाही त्यांनी एकाच जन्मात अनुभवले. परंतु आपल्या अलौकिक गुरुभक्तीच्या बळावर ते या सर्व गोष्टींना सहजतेने पार करून स्वानंदसाम्राज्याच्या सिंहासनावर विराजमान झाले. म्हणूनच त्यांचे चरित्र तुम्हां आम्हां साधकांसाठी सदैव प्रेरणादायी आहे.
आज प.पू.श्री.बागोबा महाराज कुकडे यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत घालून, गुरुभक्तीरूपी पसायाची याचना करू या. प.पू.श्री.बागोबांच्या चरित्रातील काही प्रसंगांवरील अल्पसे चिंतन खालील लिंकवरील लेखात वाचता येईल. त्या सोबतच्या फोटोमध्ये प.पू.श्री.उपळेकर महाराजांनी त्यांना शेवटच्या क्षणी केलेल्या तारेचाही फोटो पाहता येईल. त्या प्रसंगातूनही त्यांची जगावेगळी गुरुभक्तीच दृग्गोचर होते व आपण पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
नवल गुरुभक्ताचा महिमा

https://rohanupalekar.blogspot.com/2017/01/blog-post_17.html?m=1

15 Jan 2019

मकर संक्रांतीची हृद्य आठवण

आज मकर संक्रांती. भरपेट तीळगूळ खाऊन तोंडभर गोड बोलण्याच्या या उत्सवाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा !
संक्रांत म्हटली की माझी एक फार हृद्य आठवण पुन्हा ताजी होते. मी कॉलेजसाठी १९९९ साली पुण्यात आल्यावर मायबाप सद्गुरु श्री माउलींच्या दर्शनासाठी माझे आळंदीला वारंवार जाणे होऊ लागले. आळंदीला गेले की माहेराला आल्यासारखेच वाटायचे. त्यामुळे आळंदीची ओढ स्वस्थ बसू देत नसे. गुरुवार रात्रीच्या पालखीला ब-याचवेळा जाणे होई. एरवी पण कोणताही सणवार असला की निघालोच आळंदीला आम्ही. काहीही कारणच तर मिळायचा अवकाश असायचा फक्त.
असेच एकेवर्षी संक्रांतीला संध्याकाळी मी व सचिन प्रभुणे आळंदीला गेलो होतो दर्शनाला. आळंदीला सद्गुरु श्री माउलींना वोवसायला माताभगिनींची प्रचंड गर्दी असते. संपूर्ण देऊळवाडा कुंकवाने लालभडक झालेला असतो व वाणवशाच्या सामानाने भरलेला असतो. संध्याकाळी गर्दी ओसरल्यावर संस्थानचे कर्मचारी सर्व परिसर झाडून काढतात, जास्त चिकट झालेला भाग धुवून काढतात. आम्ही दोघे गेलो तेव्हा हेच काम चालू होते. सद्गुरु माउलींच्या समाधीवर मस्तक टेकवून मनसोक्त दर्शन झाले व प्रदक्षिणा घालून नित्याच्या शिरस्त्याप्रमाणे अजानाच्या बनात जपाला बसायला गेलो. तिथे तर सगळा राडाच झालेला होता. तिथेही लोक स्वच्छता करीत होते.
मी हळूच जवळ जाऊन त्यातल्या एका माणसाला विचारले, "मी पण काही सेवा करू का ?" त्याने लगेच होकार दिला. मी व सचिनने झाडू घेऊन झाडायला सुरुवात केली. तासभर ही सेवा मिळाली. मला कोण आनंद झाला होता. लहानपणी फलटणला मी प.पू.श्री.काकांच्या मंदिरात कोणाकडून ऐकले असावे, पण ते माझ्या मनात घट्ट बसलेले होते की, आपण प्रेमाने देऊळ झाडले तर, त्याच्याबदल्यात देव आपल्या मनातले दोष, विकार, आपले पाप झाडून टाकतात. हे पक्के ठसलेले असल्याने मी कायम झाडलोट करण्याची सेवा मनापासून करीत असे. तशात आयुष्यात पहिल्यांदाच, तेही संक्रांतीच्या पर्वावर, हृदयसिंहासनाधीश्वर सद्गुरु भगवान श्री माउलींच्या मंदिरात झाडलोट करायला मिळाली, याचाच मला प्रचंड आनंद झाला होता. 'आता माउली स्वत: माझ्या मनातली जळमटे झाडणार' , हाच त्यामागचा सर्वात मोठा फायदा मला खुणावत होता. माझ्या दृष्टीने तेच खरे 'मकर संक्रमण' होते !
पुढे सद्गुरु श्री ज्ञानोबारायांच्या परमकृपेने आळंदीच्या समाधीस्थानाची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करण्याचे बरेच योग आले. संस्थान कमिटीच्या ग्रंथालयाच्या समितीवर दोन वर्षे सेवा करता आली. वारीतला दवाखाना तर होताच. माउलींनी माझे हे लळे भरपूर पुरवले आणि आजही तितक्याच प्रेमाने पुरवीत आहेत. पण ती संक्रांत विसरू नाही शकत. कारण तो तशा प्रकारच्या समाधी मंदिरातल्या सेवेचा अगदी पहिलाच प्रसंग होता.
आज संक्रांतीवर काही लिहायची दिवसभरात इच्छाच झाली नाही. पण ही आठवण आली आणि वाटले की हीच का सर्वांसोबत शेयर करू नये ? म्हणून मग तीच लिहून काढली. वैयक्तिक असली तरी त्याचा आनंद तुम्ही देखील अनुभवू शकाल, असे वाटले म्हणूनच लिहिले.
मकर संक्रमण हे खरेतर श्रीभगवंतांच्या दिशेने, त्यांच्याकडे आपले पाऊल पडणेच आहे. आपण स्वत:हूनच धरून ठेवलेल्या दु:खदायक प्रपंचाचे उगीचच बाळगलेले बंधन आपणच प्रयत्नपूर्वक ढिले करून, श्रीभगवंतांच्या दिशेने, काही ना काही निमित्ताने, कोणत्यातरी माध्यमातून पुन्हा पुन्हा अग्रेसर होणे, हाच साधक म्हणून आपल्यासाठी संक्रमणाचा मथितार्थ आहे.
सद्गुरु श्री माउलींनी आपल्या अपार करुणेने ह्या अल्पशा सेवेच्या रूपाने आमचे संक्रमणच घडवले व तेही आपल्याच महाद्वारात. स्वर्गीय देवदेवतांच्या भाग्यानेही सौभाग्य मानावे, अशी ती सेवा त्यांच्याच करुणाकृपेने आम्हां अज्ञ लेकरांना सहजगत्या मिळाली. सद्गुरु श्री माउलींना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज अतीव प्रेमादराने "करुणाब्रह्म" म्हणत असत. ते किती सार्थ आहे, हे अशाच प्रसंगांनी वारंवार मनापासून पटते. म्हणून आजच्या या मकर संक्रांतीच्या पुण्यपर्वावर, त्रिलोकात अतुलनीय असे अतीव गोड बोलणा-या आमच्या करुणाब्रह्म भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांच्या श्रीचरणीं मनोभावे दंडवत घालून, तुम्हां सर्व सुहृदांना पुनश्च एकवार तोंडभर हार्दिक शुभेच्छा देतो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
मकर संक्रमणावरील पूर्वीचे अल्पसे चिंतन खालील लिंकवरील लेखात मांडलेले आहे, तेही आवर्जून वाचावे ही विनंती !
साधला हा पर्वकाळ
https://rohanupalekar.blogspot.com/2017/01/blog-post_14.html?m=1

12 Jan 2019

स्वामी विवेकानंद जयंती

आज १२ जानेवारी, तारखेने स्वामी विवेकानंदांची जयंती. त्यानिमित्त आज राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो.
भारतमातेचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद हे फार अलौकिक विभूतिमत्त्व होते. त्यांचे वाङ्मय व कार्य खरोखरीच आदर्शवत् आहे. आज जगभरात भारतमातेची ज्या ज्या गोष्टींमुळे ओळख आहे, त्यांत स्वामीजींचे नाव अग्रक्रमावर आहे.
स्वामीजींच्या १५१ व्या जयंतीला मी दै.तरुण भारतच्या अक्षरयात्रा पुरवणीत, "उत्तिष्ठत ! जाग्रत !" या नावाचा एक मोठा लेख लिहिला होता. तो लेख गेल्यावर्षी ब्लॉगस्पॉटवरही टाकला होता. श्रीसद्गुरुकृपेने वर्षभरात हा लेख साडेचार हजार वाचकांनी वाचलेला आहे. माझ्या ब्लॉगवरचा सर्वात जास्त वाचला गेलेला लेख आहे हा.
आजच्या जयंती निमित्त श्री स्वामी विवेकानंदांच्या चरणीं त्याच लेखाद्वारे पुनश्च एकदा अभिवादन करतो आहे. आपण हा लेख वाचलेला नसेल तर आवर्जून वाचावा. पूर्वी वाचलेला असेल तरीही आजच्या दिनाचे औचित्य म्हणून पुन्हा वाचायला हरकत नाहीच. संतचरित्रे उत्फुल्ल कमळासारखीच असतात ; कितीही वेळा त्यांचा आस्वाद घेतला तरी त्यातले नाविन्य आणि आनंद कधीच कमी होत नसतो, ती भरभरून दान प्रत्येकवेळी आपल्या पदरात टाकतातच !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
उत्तिष्ठत ! जाग्रत !

https://rohanupalekar.blogspot.com/2018/01/blog-post_11.html?m=1

10 Jan 2019

मूठभर पोह्यांमागचे अमर्याद प्रेम



पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे अत्यंत विलक्षण अवतार आहेत. त्यांची प्रत्येक गोष्टच विशेष आहे. त्यांचे रूप अद्भुत, त्यांचे नामही अलौकिक, त्यांची लीला बोलाबुद्धीच्या पलीकडची तर त्यांचा पराक्रम, त्यांचे राजकारणही विशेषच. भगवान श्रीकृष्णप्रभूंचे प्रेम अवर्णनीय तसेच त्यांचे भक्तवात्सल्यही मनोहर. खरोखरीच त्यांच्या प्रत्येक गोष्टीत एक सतत हवीहवीशी वाटणारी जगावेगळी अलौकिकताच आहे !
श्रवण-कीर्तनादी नवविधा भक्ती हे श्रीभगवंतांच्या पर्यंत जाण्याचे राजमार्गच आहेत. आजवर असंख्य पुण्यवान भक्तांनी या नऊ मार्गांचा अवलंब करून श्रीभगवंतांशी एकरूपत्व साधलेले आहे. श्रीभगवंतांचेही ब्रीद आहे, "ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।(भ.गी.४.११)" जो जसा मला भजतो मीही तसाच त्याला भजतो, असे ते स्वमुखानेच सांगतात. म्हणूनच, श्रीभगवंतांनाच खरे भक्तराज म्हटले जाते. आपल्या भक्तांची सर्वात जास्त प्रेमाने व अनन्यतेने तेच भक्ती करीत असतात. श्री नाथ महाराजांच्या घरची श्रीखंड्याची लीला हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. सर्वच महात्म्यांच्या चरित्रात श्रीभगवंतांच्या अशा लीला दिसतातच.
भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंच्या लीलावतारात बालपणापासून पाहिले तर त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे, प्रेमाचे तीन सखे होते. बालपणी गुरुगृही असताना सुदामा नावाचा एक ब्राह्मण, पुढे वृष्णिकुलातलाच बंधू उद्धव आणि नंतर आत्याचा मुलगा असणारा धनुर्धर अर्जुन ; हे तीन त्यांचे जीवाभावाचे मित्र होते. उद्धव व अर्जुन हे त्यांचे अनुगृहीत, कृपांकित शिष्यही होते. या तिन्ही सख्यांच्या प्रेमाविषयी श्रीमद् भागवत, एकनाथी भागवत व श्री ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर रितीने वर्णन आले आहे. वाचताना आपणही भावविभोर होतो इतके ते सुरेख आहे.
यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने, महाराष्ट्र टाईम्सच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीच्या दीपावली अंकात श्रीभगवंत आणि त्यांच्या या तीन जिवलगांवर अल्पसे लेखन झाले. तोच लेख आपणां सर्वांना आज सादर करीत आहे. प्रेमब्रह्म श्रीभगवंतांच्या कोणत्याही प्रेमलीलेचे थोडेसे आस्वादन देखील आपल्याला अंतर्बाह्य प्रेममयच करणारे असते, याचा प्रत्यय हे वाचून नक्की येईलच याची खात्री आहे. म्हणूनच, 'मूठभर पोह्यांमागचे अमर्याद प्रेम'चाखण्यासाठी आपणां सर्वांना हार्दिक आमंत्रण !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

7 Jan 2019

भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जयंती

आज पौष शुद्ध द्वितीया, द्वितीय श्रीदत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती !
साक्षात् भगवान श्रीनृसिंहांचेच तेज धारण करणारे तदभिन्न भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अत्यंत ऋजू अंत:करणाचे परिपूर्ण दत्तावतारच आहेत. अत्युग्र श्रीनृसिंह रूपातील मूळचा कनवाळूपणा तेही अंगी मिरवतात. धर्मविरुद्ध प्रसंगी कोपाविष्ट होणारे श्रीस्वामी महाराज एरवी मात्र मायेहूनही मवाळ असतात.
हिरण्यकश्यपूचे पोट फाडून क्रोधाने त्रैलोक्य दणाणून सोडणारे श्रीनृसिंह भगवंत, समोर उभ्या ठाकलेल्या प्रल्हादबाळाला पाहताच मातृप्रेमाने उचंबळून आले. क्रोधावर प्रेमाने न बोलताच जय मिळवला व वात्सल्याने 'भक्त घेई अंकावरी । प्रेमे चाटितो श्रीहरी ॥' अशी अवस्था झाली. हेच अलौकिक, अद्वितीय परमप्रेम मूर्तिमान होऊन प्रकटलेले भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजही भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत, यात शंकाच नाही. त्यांच्या मायेहूनही मवाळ अशा त्या भक्तवात्सल्याला आजच्या जयंतीदिनी कोट्यवधी दंडवत !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

सद्गुरु भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रचिंतनाची खालील लिंकवरील लेखरूप शब्दपूजा आजच्या पावन दिनी सप्रेम श्रीस्मरणात त्यांच्या अम्लान श्रीचरणीं सादर समर्पण !
त्रैलोक्याचा राजा नरहरी तो माझा
https://rohanupalekar.blogspot.com/2017/12/blog-post_20.html

3 Jan 2019

योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराज

आज मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी, श्रीज्ञानेश्वरबंधू सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांचा समाधिदिन, श्रीसंत संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी आणि सद्गुरु योगिराज श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांची जयंती ! या तिन्ही संतश्रेष्ठांच्या श्रीचरणीं सादर दंडवत !!
मनापासून व प्रेमाने केलेले संतांचे स्मरण हे पूर्वीच्या पापाचा तर नाश करतेच ; पण त्याचबरोबर आपल्या अंत:करणात त्या महात्म्यांच्या कृपेची एक लहानशी ज्योतही लावते.  सद्बुद्धीची ही लहानगी ज्योत देखील उभे आयुष्य उजळून काढण्यास पुरेशी असते ; म्हणूनच तिला कधीच कमी लेखू नये, असे सद्गुरु भगवान श्री माउलींनी म्हटलेले आहे. याच उदात्त भूमिकेने आपणही वारंवार संतांच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या अलौकिक चरित्र व कार्याचा यथाशक्य आस्वाद घेऊन त्याद्वारे मनोभावे त्यांचे स्मरणही करीत असतो.
संतांवर श्रीभगवंतांचे अमर्याद प्रेम असल्याने त्यांचे स्मरण, पूजन, वंदन, सेवन आणि त्यांच्या बोधाचे व चरित्रलीलांचे मनन-चिंतन करणा-या, त्यानुसार वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणा-या भक्तावर आपोआपच श्रीभगवंतांची असीम दयाकृपा होत असते. हा या स्मरणाचा महालाभच म्हणायला हवा. एरवी कोणाही जोगा नसलेला, कशालाही बांधील नसलेला परमात्मा, संतांच्या सेवेने मात्र त्वरित आपलासा होतो, हे वैश्विक सत्य विसरता कामा नये.
याच मनोभूमिकेने आजच्या पावन दिनाचे औचित्य असणा-या या तिन्ही महात्म्यांच्या चरित्र व कार्यावर प्रकाश टाकणारा लेख खालील लिंकवर जाऊन आवर्जून वाचावा व आपल्या सख्या-सुहृदांनाही वाचायला द्यावा ही विनंती.
योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराज हे साक्षात् भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच होते. त्यांच्या अतीव भावपूर्ण अशा दोन छोट्याच पण हृद्य लीला खालील लेखात कथन केलेल्या आहेत. आजच्या पुण्यदिनी त्यांचे वाचन करून श्रीचरणीं प्रेमपुष्पांजली समर्पावी ही प्रार्थना !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
गुरुवरा ओवाळू आरती

https://rohanupalekar.blogspot.com/2017/12/blog-post_15.html

2 Jan 2019

स्वामी श्री स्वरूपानंद महाराज



सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपा परंपरेतील थोर सत्पुरुष, पावस येथील स्वामी श्री स्वरूपानंद महाराज यांची आज ११५ वी जयंती !
सद्गुरु श्री माउलींच्या कृपेने बहरलेले सारस्वत वैभव म्हणजे स्वामी स्वरूपानंद महाराज होत. म्हणूनच त्यांची वाङ्मयसंपदा ही अतिशय अलौकिक व सुरेख आहे. त्यावरील श्री माउलींचा वरदहस्त ठायी ठायी जाणवतोच.
श्रीसद्गुरुकृपेने लाभलेल्या आत्मानंदात, अद्वितीय सोऽहं बोधात नित्य निमग्न असणारा हा 'स्वरूपहंस' खरोखरीच आत्मतृप्त होता. त्याच बोधवृत्तीचे पावन अनुकार म्हणजे त्यांचे सुरेख वाङ्मय होय. साधकांसाठी त्या वाङ्मयाचे महत्त्व आणि माहात्म्य म्हणूनच अनन्यसाधारण आहे !!
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज, प.पू.सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराज व प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज या आमच्या तिन्ही परमादर्शांचे स्वामी श्री स्वरूपानंद महाराजांशी अतिशय हृद्य संबंध होते. परस्परांवर यांचे निरतिशय प्रेम होते. म्हणूनच आजच्या पावन दिनी स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या चरणीं सादर साष्टांग दंडवत करतो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
स्वामी श्री स्वरूपानंद महाराजांचे चरित्र व कार्य, तसेच या महात्म्यांच्याशी असलेल्या हृद्य संबंधांवरील अल्पसे चिंतन, खालील लिंकवरील लेख उघडून आवर्जून वाचावे ही विनंती.
स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन
https://rohanupalekar.blogspot.com/2016/12/blog-post_25.html