4 Jul 2020

वै.ह.भ.प.पू.सोनोपंत तथा पू.मामासाहेब दांडेकर - पुण्यस्मरण



वारकरी संप्रदायातील अत्यंत आदरणीय व थोर विभूतिमत्व प्राचार्य श्री.शंकर वामन तथा सोनोपंत दांडेकर हे वारकरी मंडळींमध्ये सोनुमामा म्हणूनच जास्त प्रसिद्ध होते. अत्यंत नेटका वेष, तेवढीच मार्मिक व नेटकी भाषा आणि शुद्ध सात्त्विकतेने प्रफुल्लित झालेला चेहेरा ही पू.मामासाहेबांची वैशिष्ट्ये होत. ते कीर्तनाला उभे राहिले की साक्षात् श्री तुकोबारायच कीर्तन करीत अाहेत असा भास होत असे. 
पू.सोनुमामांचा जन्म २० एप्रिल १८९६ चा. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या नू.म.वि. मधून झाले. ते १९१७ साली बी.ए. व १९१९ साली तत्त्वज्ञान विषय घेऊन एम.ए. झाले. त्यांचे श्रीगुरु पू.विष्णुबुवा जोग महाराजांनी १९१७ साली आळंदीत वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. पू.सोनुमामा तेथील विद्यार्थ्यांना शिकवू लागले. तसेच न्यू पूना कॉलेज अर्थात् सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ते प्रोफेसर म्हणून रुजू झाले. स.प.चे प्राचार्य म्हणून १९५१ साली ते निवृत्त झाले.
वै.जोग महाराजांनी देहत्यागापूर्वी आपल्या शिष्यांना विचारले की, "माझ्या गळ्यातील नैष्ठिक ब्रह्मचाऱ्याची तुळशीमाळ कोण पुढे चालवणार ?" क्षणाचाही विलंब न लावता अवघ्या बावीस-तेवीस वर्षांच्या सोनोपंतांनी आदरपूर्वक आपले मस्तक समोर झुकवले व ती पावन माळ धारण केली. आणि आपल्या गुरूंना दिलेल्या शब्दाला जागून आजन्म नैष्ठिक ब्रह्मचर्याचे पालन केले.
वै.पू.मामासाहेब दांडेकर हे पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते. ते एक रुपयाही बिदागी न घेता सर्वत्र कीर्तन-प्रवचनसेवा करीत असत. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांची सार्थ ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीची सुदीर्घ प्रस्तावना आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास हे खूप मान्यता पावलेले ग्रंथ आहेत. स.के.नेऊरगावकर यांनी लिहिलेले पू.मामासाहेबांचे चरित्र अतिशय सुंदर आहे. आजच्याच तिथीला ; आषाढ कृष्ण चतुर्दशीला ; दि.९ जुलै १९६८ रोजी पू.मामासाहेब दांडेकरांनी पुण्यात देहत्याग केला. असे म्हणतात ; त्यांची अंत्ययात्रा एवढी मोठी होती की, त्यांचे पार्थिव आळंदीत पोचले तेव्हा त्या यात्रेतले शेवटचे लोक अजून पुण्यातच होते. यावरून त्यांना लाभलेला जनमानसाचा प्रचंड आदर व आधार स्पष्ट दिसून येतो.
वै.पू.मामासाहेब दांडेकरांच्या देहत्यागाचा प्रसंग त्यांच्या चरित्रात नोंदवलेला आहे. पुण्यातील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.यशवंतराव फाटक यांच्या दवाखान्यात त्यांचे देहावसान झाले. त्या प्रसंगाच्या एक साक्षीदार होत्या विश्वविख्यात संत प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या उत्तराधिकारी प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे. पू.सौ.ताईंच्याच श्रीमुखातून वै.मामासाहेब दांडेकरांच्या देहत्यागाचा विलक्षण प्रसंग आम्हांला ऐकायला मिळाला होता, तो आजच्या त्यांच्या पुण्यतिथीच्या मुहूर्तावर आपल्याला कथन करीत आहे.
प.पू.सौ.ताई सांगत असत तो प्रसंग वै.मामांच्या चरित्रात नोंदलेला नाही. कारण प्रत्यक्षात तो प्रसंग सूक्ष्म प्रतलावर, अलौकिक स्तरावर घडलेला होता. त्यामुळे तो आपल्यासारख्या सामान्यांच्या चर्मचक्षूंना दिसण्याचा प्रश्नच येत नाही.
( https://rohanupalekar.blogsopt.com )
तेव्हा पू.वै.मामासाहेब डॉ.फाटकांच्या दवाखान्यात अॅडमिट होते. पू.सौ.शकाताईंचा लहानपणापासूनच डॉ.फाटकांशी खूप घरोबा होता. ते त्यांचे फॅमिली डॉक्टर होतेच. पुढे त्यांचे नातेही निर्माण झाले, कारण डॉ.फाटकांची धाकटी कन्या पू.सौ.ताईंच्या धाकट्या भावाची पत्नी झाली. वै.मामासाहेब अॅडमिट असताना ९ जुलैच्या सकाळी डॉ.फाटक तथा दादा पू.सौ.ताईंना म्हणाले की, "मी जरा हॉस्पिटलमध्ये राऊंडला जाऊन येतो, तोवर तू या खोलीच्या बाहेर थांब. कोणाला आत जाऊ देऊ नकोस. पू.मामासाहेब आत विश्रांती घेत आहेत !" पू.सौ.ताई 'ठीक आहे दादा' म्हणून तिथेच एका स्टुलावर बसून राहिल्या. 
थोड्याच वेळात एक खेडवळ दिसणारे पण अत्यंत तेजस्वी असे गृहस्थ जिना चढून आले व सरळ त्या खोलीत जाऊ लागले. पू.सौ.ताईंनी त्यांना अडविले व सांगितले की, आत कोणालाही सोडायचे नाही अशी डॉक्टरांची ताकीद आहे. त्यावर ते गृहस्थ म्हणाले, "आम्हांला कधीपासून कोणाच्या परवानगीची गरज पडू लागली ?" त्यांच्या या उत्तराने चमकून पू.सौ.ताईंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि त्या एकदम आश्चर्यचकितच झाल्या. कारण ते प्रत्यक्ष भगवान श्रीपांडुरंग होते. पू.सौ.ताईंवर श्रीभगवंतांची जन्मापासूनच पूर्णकृपा असल्याने, त्यांना श्रीभगवंतांचे सतत प्रत्यक्ष दर्शन व संवाद होत असे. 
एवढे होईपर्यंत श्रीभगवंत खोलीचे दार उघडून आत गेले व त्यांनी दार लावून घेतले. पू.सौ.ताईंना आत काय घडतंय याची फारच उत्सुकता लागून राहिली होती. त्यांच्या मनाची ती घालमेल जाणून श्रीभगवंत त्यांना हळूच म्हणाले, "तुम्ही खिडकीतून पाहा हवे तर !" पू.सौ.ताईंना खूप आनंद झाला. 
श्रीभगवंत आत गेले आणि पू.मामांच्या कॉटपाशी जाऊन उभे राहिले. समोर शांतपणे डोळे मिटून झोपलेल्या वै.पू.मामासाहेबांकडे त्यांनी वात्सल्यपूर्ण नजरेने पाहिले व त्यांच्या गालांवरून प्रेमाने दोन्ही हात फिरवीत म्हणाले, "सोन्या, ऊठ, मी आलोय !" त्या स्पर्शाने आणि मधुर हाकेने पू.मामासाहेब एकदम जागे झाले आणि समोर प्रत्यक्ष आनंदकंद भगवान श्रीपांडुरंगांना पाहून त्यांना अनावर प्रेम दाटून आले. कसेबसे हात जोडून ते म्हणाले, "पांडुरंगा, देवा ! आलास. मी वाटच पाहात होतो तुझी." यावर गोड हसत देव म्हणाले, "होय, आलो बघ. चल आता, आपल्याला जायचंय !" त्यावर भारलेल्या मनाने पू.मामासाहेबांनी होकार दिला ; आणि त्याक्षणी त्यांच्या कुडीतून प्राण बाहेर पडले व श्रीभगवंतांमध्ये विलीन झाले. प्रत्यक्ष भगवान श्रीपंढरीनाथ आपल्या लाडक्या भक्ताला न्यायला आले होते. केवढे परमभाग्य हे !! जन्मभर केलेल्या निरलस सेवेचा हा अत्यंत अलौकिक महाप्रसादच साक्षात् श्रीभगवंतांनी स्वत: येऊन वै.पू.मामासाहेब दांडेकरांना दिला होता. अक्षरश: सार्थक झाले त्यांच्या आयुष्याचे !
प.पू.सौ.शकाताई हा प्रसंग फार प्रेमाने सांगत असत. त्यांनी वै.पू.मामांची कीर्तने देखील ऐकलेली होती. त्या म्हणत की, "वै.सोनुमामा कीर्तनाला उभे राहिले की प्रत्यक्ष श्री नामदेवराय किंवा श्री तुकोबारायच कीर्तन करीत आहेत, असेच वाटत राहायचे." 
ज्यांना शेवटी न्यायला प्रत्यक्ष श्रीपंढरीनाथ भगवान आले, त्या वारकरी संप्रदायातील या अत्यंत थोर विभूतीच्या, वै.पू.मामासाहेब दांडेकर महाराजांच्या श्रीचरणीं ५२ व्या पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग दंडवत !
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

0 comments:

Post a Comment