8 Sept 2022

*प.पू.ताई दामले पुण्यतिथी*



आपल्या साधनेवर अत्यंत दृढ निष्ठा, सर्व प्रसंगी श्रीगुरुचरणीं अनन्य शरणागतिपूर्वक पक्का निर्धार आणि पराक्रम या गुणांच्या साहाय्यानेच परमार्थ करावा लागतो. लेच्यापेच्या माणसांचे ते कामच नव्हे. प्रपंचाची आसक्ती सोडून देणे व परमार्थाचे प्रेम हृदयात दृढ धारण करणे हे वाटते तितके सोपे काम नाही, त्यासाठी खरोखर धैर्य आणि पराक्रमच अंगी असावा लागतो. आधी आपले मन व मग प्रपंच, म्हणजे आपल्या भोवतीचा माणसांचा गोतावळा व आपली कर्मे, यांमध्ये न गुंतण्याची पराकाष्ठा केल्याशिवाय परमार्थ अंगात मुरतच नाही. संतांच्या चरित्रांमधले हेच महत्त्वाचे भाग तर आपण नीट समजून घ्यायचे असतात. ते सोडून आपण फक्त त्यातले चमत्कार पाहतो; आणि साधनेचे, तपश्चर्येचे कोणतेही कष्ट न करता ते चमत्कारच आपल्याबाबतीत कसे घडतील याचाच विचार करीत वेळ वाया घालवतो. आणि म्हणूनच आपण जिथे असतो तिथेच जन्मभर राहतो, परमार्थात पुढे जातच नाही !

सर्वच संतांची चरित्रे अत्यंत अलौकिक व बोधप्रद असतात. तरीही प्रत्येक संतचरित्राचा काही ना काही विशेष असतोच. *प्रपंचातील सर्व कर्तव्ये पार पाडत असतानाही परमार्थ कसा साधावा ? प्रारब्धाने कोणतीही कर्मे समोर आली तरी ती भगवद् इच्छा मानून शांतपणे भोगून कशी संपवावीत ? आणि कोणत्याही परिस्थितीत आपले भगवद् अनुसंधान कसे टिकवावे ? या परमार्थातील मूलभूत प्रश्नांची अतिशय नेमकी उकल करून घ्यायची असेल तर; श्रीस्वामीतनया प.पू.पार्वतीदेवी देशपांडे, प.पू.कलावती आई व प.पू.ताई दामले या तीन अधिकारी विभूतींची चरित्रे आपण जन्मभर कायमच वाचन-मननात ठेवायला हवीत.*

या स्वनामधन्य संतत्रिमूर्तींपैकी, आज भाद्रपद शुद्ध त्रयोदशी दिनी, श्रीसंत प.पू.ताई दामले यांची ३९ वी पुण्यतिथी आहे. आजच्या तिथीला, दि.२० सप्टेंबर १९८३ रोजी पहाटे ३.५५ मिनिटांनी त्यांनी नश्वर देहाची खोळ सांडली होती. त्यांच्या देहाला इंद्रायणीच्या काठी अग्नी देण्यात आला. तिथेच आता त्यांची समाधी बांधलेली आहे. प.पू.ताई दामले यांच्या पावन श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!

प.पू.ताई दामले यांचे चरित्र अतिशय मार्मिक व बोधप्रद आहे. तुम्हां-आम्हां सर्वसामान्य माणसांना त्यातून परमार्थाची फार मोठी ऊर्जा व प्रेरणा मिळते. याच उद्देशाने योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांनी स्वत: आज्ञा करून सौ.नीलाताई जोशी यांना पू.ताईंचे चरित्र लिहायला सांगितले होते. *"कृष्णा काठ ते इंद्रायणी घाट"* या नावाचे ते चरित्र आजमितीस उपलब्ध नाही, पण काही जुन्या ग्रंथालयांमध्ये नक्कीच ते वाचायला मिळू शकेल. त्या चरित्रातील काही महत्त्वपूर्ण व मार्गदर्शक भाग खालील लिंक वरील लेखात घेतलेला आहे. तो लेख आवर्जून वाचावा ही विनंती.

*श्रीसंत प.पू.ताई दामले*

https://rohanupalekar.blogspot.com/2019/09/blog-post_11.html?m=1

योगिराज प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज प.पू.ताईंना आपली बहीण मानीत असत. दोघांनाही एकमेकांबद्दल अतीव प्रेमादर होता. प.पू.ताई दामले यांना प.पू.श्री.मामांच्या ठायी त्यांच्या मूळ रूपाचे अर्थात् प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांचे साक्षात् दर्शन लाभलेले होते. माझ्या *"सद्गुणरत्नाकर; प.पू.श्री.मामा"* या ग्रंथातील 'तुझा महिमा अलौकिक' या लेखात सविस्तर वर्णिलेला तो प्रसंग, आजच्या पावन दिनी आपण थोडक्यात पाहून प.पू.ताईंच्या श्रीचरणीं नतमस्तक होऊ या.

प.पू.ताई दामले यांना बालपणापासून डोळ्यांची व्याधी होती. त्यासाठी उपाय म्हणून त्यांना श्रीदत्तप्रभूंनी दृष्टांत देऊन चरणतीर्थ घालायला सांगितले होते. त्यांनी श्रीनृसिंहवाडी मुक्कामात प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्याच चरणांचे तीर्थ डोळ्यांत घातल्याने ती व्याधी पुढे फार वाढली नाही. कृष्णेच्या घाटावर उमटलेल्या प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्या ओल्या पावलांचे पाणी पदराने टिपून घेऊन, त्यांच्या नकळत त्यांनी ते तीर्थ म्हणून उपयोगात आणलेले होते. म्हणून श्रीस्वामी महाराजांना ते लौकिक अर्थाने माहीत असायचा प्रश्नच नव्हता. पण श्रीस्वामी महाराज तर सर्वज्ञच होते.

पुढे पुण्यात प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांची व प.पू.ताईंची भेट झाली. त्यावेळी प.पू.ताईंनी दारात प.पू.श्री.मामांच्या चरणांवर दूध-पाणी घालून त्यांचे स्वागत केले. प.पू.श्री.मामा घरात आले व एकदम मागे वळून प.पू.ताईंना म्हणाले, "आता ते पाणी पदराने टिपून घ्यायची आपल्याला गरज नाही बरे. आपले काम झाले आहे !" या वाक्याचा संदर्भ केवळ प.पू.ताईंनाच समजला, बाकी उपस्थित कोणालाही समजला नाही. त्याचवेळी प.पू.ताईंना प.पू.श्री.मामांच्या जागी साक्षात् प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे दिव्य दर्शनही झाले होते. महात्म्यांच्या अशा लीला खरोखर अद्भुत व अनाकलनीयच असतात.

सामान्यजनांना स्वत:च्या उदाहरणाने उत्तम बोध करणाऱ्या व आजन्म भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांची आणि श्री ज्ञानेश्वरीची सेवा करणाऱ्या श्रीसंत प.पू.ताई दामले यांच्या श्रीचरणीं ३९ व्या पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग दंडवत !!

21 Jul 2022

जाणिवेचा मुद्दा


भेटणारा प्रत्येकजण आपल्याला काहीतरी शिकवूनच जातो.


नुसते डोळे उघडे ठेवल्यानेही कितीतरी लाभ होतो !!!

1 Feb 2022

हा महासिद्ध ज्ञानी, वेद वदवी महिषमुखातुनी


आज पौष अमावास्या. ह्याच तिथीला, सातशे एकतीस वर्षांपूर्वी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली होती. ही घटना आपल्या सर्वांना माहीत आहे, पण याची तिथी मात्र आपण विसरून गेलो आहोत. आजच्याच तिथीला पावन करीत, पैठणच्या पुण्यतोया गोदागंगेच्या तीरी, भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांनी 'ज्ञान्या' नावाच्या एका रेड्याच्या मुखातून प्रत्यक्ष वेद वदविले होते. 
शके १२१२ अर्थात् इ.स.१२९१ साली (पौष, माघ व फाल्गुन या तीन महिन्यांसाठी शालिवाहन शकात ७९ मिळवावे लागतात, बाकीच्या महिन्यांसाठी ७८ मिळवले की इसवी सन येते.) पौष अमावास्येला अर्धोदय पर्वणी होती. त्यानिमित्ताने गोदातीरी पर्वस्नानासाठी जमलेल्या ब्रह्मवृंदासमोर श्री.विठ्ठलपंत यांनी मुलांच्या मुंजीसंदर्भातले आपले गाऱ्हाणे मांडले. ब्रह्मवृंदाने त्यांची यथेच्छ चेष्टा केली. तेवढ्यात एका ब्राह्मणाने समोरून येणाऱ्या ज्ञान्या नावाच्या पखालीच्या रेड्याची व ज्ञानदेवांची तुलना केली. "तुम्हां दोघांचे नाव 'ज्ञानी'च आहे, म्हणजे तुम्ही सारखेच झालात की !" असा उपहास करून ब्रह्मवृंद हसू लागले. त्यावर शांतपणे श्री ज्ञानदेव उद्गारले, 
चल अचल पदार्थांत । एकचि ब्रह्म ओतप्रोत ।
या महिषाच्या देहात । माझ्यातहि एक असे ॥श्रीज्ञा.वि.७.२९॥
या सत्यवचनावर क्रोधित होऊन तो ब्राह्मण म्हणाला, "तुम्ही दोघे एकच आहात ना, मग मी या रेड्याला चाबकाचे फटके मारतो, त्याचे दु:ख तुला झाले पाहिजे !" श्री माउलींनी मान डोलावल्यावर त्याने रेड्याला चाबकाचे तीन फटके मारले. त्या रेड्याला काहीच वेदना झाल्या नाहीत, पण त्याचे रक्ताळलेले वळ श्री माउलींच्या कुसुमकोमल पाठीवर मात्र तत्काळ उमटले.
तरीही शंकेखोर मंडळींचे समाधान झाले नाहीच. ते म्हणाले, "हा नजरबंदीचा खेळ कशावरून नाही ? हे दोघे एक आहेत तर यांचे ज्ञानही एकच असायला हवे. वेदान्त सांगणाऱ्या ज्ञानदेवांप्रमाणे या रेड्यानेही वेदपठण केले पाहिजे. तरच आम्ही मान्य करू !"
परमकरुणामय श्री ज्ञानदेव माउलींनी सद्गुरु श्री निवृत्तिनाथांची आज्ञा घेऊन विप्रांचे म्हणणे मान्य केले व त्या रेड्याला प्रेमाने जवळ बोलाविले. त्याच्या मस्तकी हात ठेवून त्याला वेदपठण करण्याची आज्ञा केली. त्यासरशी त्या महिषाच्या सर्वांगांतून अलौकिक वेदध्वनी प्रकट झाला. सद्गुरु श्री निवृत्तिनाथांनी श्री माउलींना सांगितले, "ज्ञानेशा ! श्रुतिमातेचा उच्चार मुखानेच व्हायला हवा. शरीराच्या इतर रंध्रांतून झाल्यास तो अधर्म ठरेल !" म्हणून मग श्री माउलींच्या आज्ञेने त्या रेड्याने मुखानेच सस्वर वेदऋचा म्हणायला सुरुवात केली. 
(https://rohanupalekar.blogspot.com)
प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी आपल्या "श्रीज्ञानदेव विजय" या अप्रतिम महाकाव्याच्या सातव्या अध्यायात ही रोमहर्षक कथा सविस्तर वर्णिलेली आहे. त्यात ते म्हणतात, 
शके बाराशे बारा साली । पौषी अमावास्येच्या सकाळी ।
वेदपठणास सुरुवात झाली । महिषाच्या मुखातुनी ॥५९॥
ऋग्वेदादि वेद चारी । महिष सस्वर उच्चारी ।
विप्रमंडळी झडकरी । पोथ्या सुधारिती आपुल्या ॥६०॥
पाच दिन रात्रंदिवस । वेदपठण करी महिष ।
माघ शुद्ध पंचमीस । वेदपठण संपले ॥६१॥
पौष अमावास्येच्या सकाळी महिषाच्या मुखातून सुरू झालेले वेदपठण पाच दिवसांनी वसंतपंचमीस थांबले. असा 'न भूतो न भविष्यति' चमत्कार घडल्याने सद्गुरु भगवान श्री माउलींचे अवतारित्व पैठणच्या ब्रह्मवृंदाने सहर्ष मान्य केले आणि ते म्हणू लागले, 
हा आहे महासिद्ध ज्ञानी । जो वेद वदवी महिषमुखातुनी ।
अघटित याची दिव्य-करणी । परमेश्वरी अवतार हा ॥६४॥
या जगावेगळ्या व अद्भुत चमत्काराने भारावून जाऊन, सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे सर्वश्रेष्ठत्व पैठणच्या विप्रांनी एकमुखाने मान्य केले आणि त्यांना सन्मानपूर्वक शुद्धिपत्र प्रदान केले !
पुढे सद्गुरु भगवान श्री माउली आणि भावंडे मजल दरमजल करीत नेवाश्याला आली. तिथे मृत सच्चिदानंद थावरे यांना श्री माउलींनी जिवंत केले आणि प्रवरेच्या काठी परमपावन श्री ज्ञानेश्वरी सांगितली. हे दिव्य प्रसंग इ.स.१२९१ सालच्या माघ-फाल्गुन या दोन महिन्यांत घडलेले आहेत. त्या पुण्यवान रेड्याने सद्गुरु श्री माउलींच्या समक्षच १२९१ सालच्या चैत्र कृष्ण एकादशीला आळे या गावी देह त्यागला. त्या रेड्याचे समाधिमंदिर आळे गावी आपल्याला आजही पाहायला मिळते.
रेड्याच्या मुखातून वेद वदविण्याचा सद्गुरु भगवान श्री माउलींनी लीलया घडविलेला हा आजवरच्या इतिहासातला एकमेवाद्वितीय चमत्कार आहे. प्रस्तुत दिव्य प्रसंग आजच्याच तिथीला घडला होता. म्हणून या पावन पर्वावर आपण त्या प्रसंगाचे प्रेमादरपूर्वक स्मरण करीत एकमेवाद्वितीय अवतार अशा करुणाब्रह्म भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांच्या अम्लान श्रीचरणारविंदीं कोटिकोटी दंडवत घालून त्यांचा जयजयकार करू या !
सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय । 
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481
(या लेखासोबत दिलेला फोटो, श्रीक्षेत्र आळंदी येथील श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयातील सभागृहात लावलेल्या या प्रसंगाचे दर्शन घडविणाऱ्या सुरेख थ्रीडी म्यूरलचा आहे.)