20 Dec 2017

त्रैलोक्याचा राजा नरहरि तो माझा

आज पौष शुद्ध द्वितीया, कलियुगातील द्वितीय श्रीदत्तावतार, भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती !!
भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराजांनी, कुरवपूरच्या कृष्णानदीत जीव द्यायला आलेल्या एका दुर्भागी स्त्रीला, पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले होते. तीच पुढच्या जन्मी अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली. पुढे त्याच गावातील माधव विप्राशी या अंबा नामक स्त्रीचा विवाह झाला. पूर्वावतारात दिलेल्या आशीर्वादानुसार, भगवान श्रीदत्तप्रभूंनी श्री नरहरी रूपाने तिच्या पोटी, शके १३०० अर्थात् इ.स. १३७८ मध्ये पौष शुद्ध द्वितीयेला मध्यान्ही कलियुगातील आपला दुसरा अवतार घेतला.
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लीलांपैकी काही अद्भुत लीला श्रीगुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून, श्रीदत्तसंप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून याची उपासना केली जाते.
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली ८-१० वर्षे कारंज्याला राहिले. तेथे त्यांनी अलौकिक बाललीला केल्या. मौंजीबंधन होईपर्यंत ते फक्त ॐ एवढाच उच्चार करीत असत. त्यांच्या आई-वडिलांना वाटले की, बालक मुके आहे की काय? पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत चारही वेदांचे पठण करून मौन सोडले. त्यानंतर ते एक वर्ष ज्ञानी लोकांना वेदादी शास्त्रे शिकवत होते.  नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमत् कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली व पुढील तीस वर्षे उत्तरेत व उर्वरित भारतात जगदोद्धारार्थ भ्रमण करून पुन्हा कारंज्याला आले. तेथून मग गोदावरीच्या तीराने भ्रमण करीत करीत ते वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. तेथून कृष्णामाईच्या तीराने भ्रमण करीत औदुंबर क्षेत्री आले. तेथे एक चातुर्मास्य राहिले. तेथे त्यांच्या स्मरणार्थ पुढे 'विमल पादुका' स्थापन करण्यात आलेल्या आहेत. औदुंबरहून पुढे ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आले. तेथे त्यांचे बारा वर्षे वास्तव्य झाले. तेथे श्रींनी आपल्या 'मनोहर पादुका' व अन्नपूर्णामातेची स्थापन केली व मग ते गाणगापूर क्षेत्री आले. तेथे त्यांचे चोवीस वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतर अंदाजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी, गाणगापुरात  'निर्गुण पादुका' स्थापून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृश्य झाले. त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही. श्रींचा जो अपार्थिव, दिव्य-पावन श्रीविग्रह अशाप्रकारे स्थूलरूप धारण करून कार्यरत होता, तोच आजही गुप्तरूपाने व पादुका रूपाने अखंडपणे भक्तांचे सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करीत आहे व पुढेही करीत राहीलच.
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्याकाळात लोप पावत चाललेल्या वेदविहित धर्माची पुनर्स्थापना केली. लोकांमध्ये भक्तिमार्गाचा प्रसार केला. ते स्वत: अत्यंत कडक आचरण करीत असले तरी, त्यांनी कृपा करण्यात भक्तांचा जात-धर्म कधीच पाहिला नाही. जसे चारही वेदांचे ज्ञानी ब्राह्मण, श्रेष्ठ संन्यासी त्यांचे शिष्य होते, तसेच भक्तराज तंतुक, पर्वतेश्वर शूद्र व बिदरचा मुसलमान बादशहा असे अन्य जाती-धर्मातील हजारो भक्तही त्यांच्या कृपेने धन्य झालेले होते. ते अकारणकृपाळू व परमदयाळूच आहेत. जगाच्या कल्याणासाठी आलेल्या अवतारांना, संतांना जात-धर्म यांच्या चौकटीत बसवणे हा वेडगळपणाच नव्हे काय?
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे स्मर्तृगामी व स्मरणमात्रे संतुष्ट होणारे परमदयाळू व भक्तवत्सल आहेत. प्रेमभराने व निर्मळ अंत:करणाने त्यांना घातलेली साद त्यांच्यापर्यंत पोचतेच पोचते, असा लाखो भक्तांचा आजवरचा रोकडा अनुभव आहे. श्रीदत्तसंप्रदायातील थोर विभूतिमत्व  प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्याकडून ऐकलेले आहे की, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे अत्यंत ऋजू अंत:करणाचे परमशांत असे अवतार आहेत. त्यांच्या दयाकृपेला ना अंत ना सीमा. त्यांच्या भक्तवात्सल्य ब्रीदाचे यथार्थ वर्णन करताना श्री गुरुभक्तही हेच म्हणतात,
अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारु मोठा रे ।
संकटिं भक्ता रक्षी नानापरी ।
रुतूं देईना पायी कांटा रे ॥
शरणांगता जना पाठिसी घालुनी ।
कळिकाळासी मारी सोटा रे ॥
अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारु मोठा रे ।

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी ही श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी आहे. तेथे ते निरंतर राहून भक्तकल्याण करीत असतात. त्यांचेच प्रत्यक्ष अधिष्ठान आमच्या श्रीक्षेत्र दत्तधाम येथेही आहे. " वाडी-गाणगापूर प्रमाणे आम्ही दत्तधाम येथेही निरंतर वास्तव्य करू ", असा प्रेमळ आशीर्वाद त्यांनी स्वत: प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना दिला होता. त्यांच्या त्या अमृतशब्दांची आजही सतत प्रचिती येत असते.
प.प.श्री.नारायणस्वामी महाराजांचे शिष्योत्तम, वाडीतील ढोबळे पुजारी उपनावाचे व श्री गुरुभक्त ही नाममुद्रा धारण करणारे थोर भक्तवर, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांविषयीचा आपला दृढ प्रेमभाव व्यक्त करताना म्हणतात,
त्रैलोक्याचा राजा ।
नरहरि तो माझा तो माझा ॥ध्रु॥
नांदे अमरापूर ग्रामीं ।
कृष्णातीरीं यतिवरस्वामी ॥१॥
नृसिंहसरस्वती करुणामूर्ति ।
त्रिभुवनिं गाती ज्याची कीर्ति ॥२॥
श्रीधरविभु निजकैवारी ।
भावें भजतां भवभय वारी ॥३॥

या अखिल ब्रह्मांडांचे नायक असणा-या, भक्तांचे भवभय वारण करणा-या, कृष्णातीरी नित्य नांदणा-या, त्रिभुवनात ज्यांच्या कीर्तीचा डंका सदैव वाजत असतो, त्या परमदयाळू परमकनवाळू महाराजाधिराज श्रीमत् नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं, आज जयंतीदिनी प्रेमभराने साष्टांग दंडवत घालून आपण त्यांचेच परमपावन नाम घेत त्यांना कृपाप्रसादाची प्रार्थना करूया !!
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481

अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.


17 Dec 2017

15 Dec 2017

गुरुवरा ओवाळू आरती

आज मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे कनिष्ठ बंधू व शिष्योत्तम, साक्षात् ब्रह्मदेवांचे अवतार सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांची समाधी तिथी. श्रीसंत तुकोबारायांच्या चौदा टाळक-यांपैकी त्यांचे एक शिष्य श्री संताजी महाराज जगनाडे-तेली यांचीही आज पुण्यतिथी. श्रीदत्त संप्रदायातील थोर विभूतिमत्व महान शक्तिपाताचार्य योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांची आज जयंती. खरोखरीच, आजची तिथी मोठी पुण्यपावनच आहे !
सद्गुरु श्री सोपानदेव महाराज हे श्री माउलींचे धाकटे बंधू व शिष्य. त्यांचा जन्म इ.स.१२७७ मध्ये कार्तिक पौर्णिमेला आळंदीत झाला. त्यांनी देखील गीतेवर 'सोपानदेवी' या नावाची टीका रचलेली आहे. त्यांचे काही अभंगही उपलब्ध आहेत. सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांचे स्वभाववैशिष्ट्य श्री नामदेवराय सांगतात, "न ये पां एकांत सोपानाचा ॥" सगळ्यांमध्ये राहूनही आंतरिक एकांत साधणे व त्या स्थितीत सदैव राहणे हे श्री सोपानदेवांचे वैशिष्ट्य होते. श्रीसंत विसोबा खेचरांवर श्री माउलींच्या आज्ञेने सद्गुरु श्री सोपानदेवांनीच अनुहग्रहकृपा केली होती.
आजच्याच तिथीला त्यांनी सासवड येथे क-हामाईच्या काठी सोमेश्वरांच्या मंदिरालगत समाधी घेतली. त्यांच्या समाधिवर्णनाच्या अभंगांमध्ये श्री नामदेवराय म्हणतात, " निशिदिनी कीर्तन केले द्वादशी । वद्य त्रयोदशी मार्गशीर्ष ॥३॥ भोगावती केले अवघ्यांनी स्नान । चालिले सोपान समाधीसी ॥ना.गा.११३२.४॥" श्री सोपानदेवांच्या स्नानासाठी प्रत्यक्ष श्रीपांडुरंगांनी सर्व तीर्थांना आवाहन केले. त्यावेळी त्रैलोक्यातील यच्चयावत् सर्व तीर्थे क-हेच्या काठावरील एका कुंडात प्रकटली व त्या पावन जलाने सोपानदेवांना स्वत: भगवंतांनी स्नान घातले. ते कुंड आजही सासवड येथे मंदिरासमोरच पाहायला मिळते. सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांच्या श्रीचरणीं साष्टांग दंडवत.
श्रीसंत तुकाराम महाराजांच्या थोर शिष्यांपैकी एक, देहूनजीकच्या सुदुंब्रे येथील तेली समाजातील श्री संताजी महाराज जगनाडे यांचीही आज पुण्यतिथी असते. संताजी महाराजांनी स्वहस्ते लिहिलेला श्री तुकोबारायांचा गाथा आजही पाहायला मिळतो. श्री तुकाराम महाराजांच्या चौदा निष्ठावंत टाळकरी मंडळींमध्ये संताजी महाराजही होते. श्री संताजी महाराजांची पालखी श्री माउलींच्या पालखी मागोमागच आषाढी वारीसाठी पंढरीला जाते. त्यांच्याही श्रीचरणीं सादर दंडवत.
श्रीदत्त संप्रदायातील महान विभूतिमत्व, प्रत्यक्ष भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचेच अपरस्वरूप, योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांची आज १३१ वी जयंती. आजच्याच तिथीला, २३ डिसेंबर १८८६ रोजी, कोल्हापूर संस्थानातील राधानगरी तालुक्यातील कुडुत्री या छोट्याशा खेड्यात रात्री ८.१९ मिनिटांनी वे.शा.सं.दत्तंभट व सौ.उमाबाई या सात्त्विक दांपत्याच्या पोटी श्रीमहाराजांचा जन्म झाला. गुळवणी घराणे हे श्रीनृसिंहवाडीच्या प.प.श्री.नारायणस्वामींचे कृपांकित होते व त्यांच्याच कृपेने हा वंश चालला होता. शालेय शिक्षण कोल्हापूरला झाल्यानंतर श्रीमहाराजांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये प्रवेश घेऊन चित्रकलेत प्राविण्य मिळविले. आधी बार्शीला व त्यानंतर पुण्याच्या नू.म.वि. मध्ये त्यांनी चित्रकला शिक्षकाची नोकरी केली.
पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी, १९०९ साली पवनी मुक्कामी, अनंत चतुर्दशीच्या मंगल मुहूर्तावर श्रीगुळवणी महाराजांवर शक्तिपातपूर्वक मंत्रानुग्रह करून परंपरेचे उत्तराधिकारही प्रदान केले. श्रीमहाराजांनी आपले दैवी सद्गुण व विनम्र सेवा यांमुळे प.प.श्री.टेंब्येस्वामींची पूर्णकृपा संपादन केली. श्रीस्वामींनी त्यांना आपल्या स्वत:च्या हृदयात भगवान श्रीदत्तप्रभूंचे दर्शन करविले होते. श्रीमहाराज हे श्री. टेंब्येस्वामींचे पट्टशिष्यच होते. पुढे त्यांच्यावर बंगालमधील प.प.श्री. लोकनाथतीर्थ स्वामींचीही कृपा झाली.
श्रीमहाराज योगासनांमध्ये अत्यंत निष्णात होते. योगासनांचे व क्रेपची फुले बनविण्याचे ते वर्ग घेत असत. त्यांना क्रेप फुलांच्या स्पर्धा-प्रदर्शनांमध्ये भारतात व परदेशांतूनही अनेकवेळा प्रथम पुरस्कार, गोल्ड मेडल मिळालेले होते.
श्रीमहाराजांची राहणी अतिशय साधी होती. स्वच्छता, टापटीप व वक्तशीरपणा हे त्यांचे अंगभूत सद्गुण होते. त्यांनी आजन्म शास्त्र मर्यादेचे काटेकोरपणे पालन केले. अपरंपार करुणा, ऋजुता, विनम्रता, प्रेमळपणा, प्रसिध्दिपराङ्मुखता, कमालीचे अमानित्व, शास्त्रपूत आचरण, कोणत्याही प्रसंगी न ढळणारी अद्भुत शांती, नैष्ठिक ब्रह्मचर्य, निस्पृहता, श्रीगुरुचरणी अात्यंतिक निष्ठा, विलक्षण योगसामर्थ्य, महायोग-शक्तिपात शास्त्रातील अलौकिक अधिकार इत्यादी शेकडो दैवी सद्गुणांचे ते साक्षात् भांडारच होते ! श्रीमहाराजांनी कधी प्रवचने केली नाहीत की पुस्तके लिहिली नाहीत. पण त्यांनी जगभरातील हजारो साधकांना आपल्या विलक्षण कृपेने परमार्थ मार्गावर अग्रेसर केले.
योगिराज श्री.गुळवणी महाराजांनी आपल्या प्रदीर्घ आयुष्यात अनेक अलौकिक कार्ये संपन्न केली. त्यांपैकी दोन फार महत्त्वपूर्ण कार्ये म्हणजे, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्रींच्या मंदिरासभोवतालचा गोलाकार देखणा सभामंडप बांधण्याचे व प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे समग्र वाङ्मय मोठ्या कष्टाने जमवून अचूक व शुद्ध स्वरूपात प्रकाशित करण्याचे महान कार्य होय. त्यांनी त्याकाळात प्रचंड भ्रमंती करून, जिथे जिथे थोरल्या महाराजांचे वास्तव्य झाले होते, तिथे समक्ष जाऊन त्यांचे वाङ्मय मिळवले व ते बारा खंडांमधून श्री. टेंब्येस्वामींच्या जन्मशताब्दीचे निमित्त साधून १९५१ ते १९५४ सालांदरम्यान प्रकाशित केले. हे त्यांचे श्रीदत्त सांप्रदायिकांवरचे कधीही न फिटणारे ऋण आहे.
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज व योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांचे अपार स्नेहाचे अंतरंग संबंध होते. दोघेही एकमेकांचा अतीव प्रेमादर करीत असत. प.पू.काका श्रीमहाराजांना साक्षात् श्रीदत्तप्रभूच म्हणून वंदन करीत असत तर श्री.गुळवणी महाराज प.पू.काकांना ' एक थोर ब्रह्मनिष्ठ ' म्हणत असत. श्रीमहाराज फलटण येथे एकदा पू. काकांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी प.पू.काकांच्या घरासमोर, गळ्यात भरगच्च हार घातलेल्या व अत्यंत प्रसन्न भावमुद्रा असलेल्या या दोन संतश्रेष्ठांचा फोटो मुद्दाम काढण्यात आला होता. ९ जून १९७१ रोजी प.पू.काका पुण्यातील 'श्रीवासुदेव निवास ' या श्रीमहाराजांच्या आश्रमातही भेटीसाठी गेले होते. एरवी देखील भक्तगणांच्या मार्फत दोघांची नेहमीच निरोपा-निरोपी होत असे.
प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच असणा-या योगिराज सद्गुरु श्री गुळवणी महाराजांनी हजारो शिष्यांना शक्तिपात दीक्षा देऊन कृतार्थ केले. त्यांचे समग्र चरित्र अलौकिक गुरुभक्ती व शास्त्रनिष्ठेचा आदर्श असून परमार्थ साधकांसाठी निरंतर मार्गदर्शक आहे. सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांच्या चरित्रलीला वाचताना, त्यात जाणवणारे त्यांचे सर्वच दैवी सद्गुण आपल्याला आश्चर्यचकित करतात. पण त्यांची करुणा व ऋजुता हे विशेषत्वाने जाणवतात. श्री महाराज म्हणजे अमानित्वाचे व अदंभित्वाचे मूर्तिमंत स्वरूप होते. साक्षात् श्रीदत्तप्रभूच असूनही त्यांनी कधीही चुकूनसुद्धा कोणाला त्याची कल्पना येऊ दिली नाही. कायम आपले माहात्म्य झाकूनच ठेवले. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज त्यांना प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू म्हणूनच वंदन करीत असत.
श्री महाराज भक्तवत्सल होते. आपल्या भक्तांचा अपार कळवळा होता त्यांना. २६ डिसेंबर १९६९ ते २६ एप्रिल १९७० या चार महिन्यांच्या काळात त्यांनी एक पुरश्चरण केले होते. त्याकाळात ते कोणालाही भेटणार नाहीत, अशी सूचना लावलेली होती आश्रमात. त्यांच्या एका भक्ताने त्यांना प्रेमळपणे विनवले की, " या काळात तुम्हांला कोणीच भेटणार नाही का?" त्यावर महाराज म्हणाले, " दोन जण भेटतील, जेवणाचे ताट सरकवायला येतील तेव्हा." त्यावर ते भक्त म्हणाले, " मग आम्हीच काय पाप केले आहे? तुम्हांला बघायला काय हरकत आहे? तुम्ही ठरावीक वेळी तुमच्या सवडीने खाली येऊन देवघरात बसत जा. ग्रीलच्या बाहेरून आम्ही दर्शन घेऊन जात जाऊ." श्री महाराजांनी त्यांचे म्हणणे लगेच मान्य केले. त्याकाळात ते रोज सकाळी साडेनऊ ते दहा या वेळात खाली येऊन बसत व भक्त त्यांचे दर्शन घेऊन जात. " ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभावीण प्रीती ॥" हे श्री गुळवणी महाराजांचे यथार्थ स्वरूपवर्णनच आहे.
पू.श्री.महाराज म्हणजे करुणेची मूर्तीच होते. त्यांना कधीच कोणाहीबद्दल आपला-परका असा भेद जाणवला नाही, सर्वांवर त्यांचे समान प्रेम होते. महाराजांचे एक श्री.श्रीनिवास आचार्य नावाचे शिष्य होते. त्यांचे एक मित्र श्री.रायकर म्हणून होते. त्यांना एकदा सरकारी नोटीस आली, त्यात १ एप्रिल पूर्वी रु.७६८/- भरा असे म्हटले होते. त्यांच्यापाशी एवढी रक्कम नव्हती, शिवाय घरी पाच मुले, बायको, वृद्ध वडील. ते आचार्यांना म्हणाले की, " आता काय करणार? चल, तुमच्या महाराजांना विचारूया. तेच काहीतरी मार्ग सांगतील. " ते दोघे महाराजांकडे आले व सर्व हकीकत सांगितली. श्री महाराज म्हणाले, पैसे आहेत की नाहीत? रायकर म्हणाले, नाहीत. महाराजांनी लगेच श्री.नारायण भालेरावांना हाक मारली व कपाटातील टिनाच्या डब्यातील पैसे रायकरांना द्यायला सांगितले. गंमत म्हणजे त्या डब्यात नेमके ७६८ रुपयेच निघाले. महाराज रायकरांना म्हणाले, " बायको-पोरांना नीट सांभाळा, काळजी करू नका." यच्चयावत् सर्व जीवांविषयीचा असा आप-पररहित कळवळा, अशी निखळ आत्मीयता, प्रेमभावना श्रीमहाराजांच्या अंतरात ठासून भरलेली होती. म्हणूनच ओळखीच्याही नसलेल्या रायकरांना एवढी मोठी रक्कम द्यायला त्यांनी किंचितही वेळ घालवला नाही की विचार केला नाही. जणू ते त्यांचे आत्मीयच आहेत, या भावनेने त्यांनी तत्काळ त्यांचे हित केले. सद्गुरु श्री माउली म्हणतात, वाहणारे पाणी जसा वाटेत आलेला खड्डा भरून मगच पुढे जाते, तसे हरप्रयत्नाने समोरच्याचे दु:ख दूर करूनच महात्मे पुढे जातात. अशी अलौकिक करुणा श्री.गुळवणी महाराजांच्या ठायी विलसत होती. याच प्रकारचे शेकडो अद्भुत कथा-प्रसंग श्री महाराजांच्या चरित्रात पाहायला मिळतात.
आजच्या या पावन दिनी योगिराज सद्गुरु श्री वामनरावजी गुळवणी महाराजांच्या श्रीचरणी अनंतानंत दंडवत प्रणाम !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

12 Dec 2017

हाचि सुबोध गुरूंचा

आज मार्गशीर्ष कृष्ण दशमी, साक्षात् श्रीमारुतीरायांचे अवतार, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची १०४ वी पुण्यतिथी  !!
जयाचा जनी जन्म नामार्थ झाला ।
जयाने सदा वास नामात केला ।
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ।।
असे ज्यांचे सार्थ वर्णन केले जाते, त्या प्रत्यक्ष नामावतार सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे अवघे चरित्र अलौकिक आणि बोधप्रद आहे.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपापरंपरेतील येहेळगांवच्या सद्गुरु श्री तुकामाई यांनी श्री गोंदवलेकर महाराजांना कृपानुग्रह करून सनाथ केले. श्रीमहाराजांच्या ठायी सद्गुुरु श्री माउलींचा नाथसंप्रदाय व सद्गुरु श्री समर्थांचा रामदासी संप्रदाय यांचा सुरेख समन्वय झालेला होता.
पूर्वी महाराजांनी बालवयातच गुरुशोधार्थ संपूर्ण भारत देश पालथा घातला होता. त्या भ्रमंतीमध्ये त्यांना राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचे दर्शन व सान्निध्य लाभले. श्री स्वामींनी देखील या लहानग्या गणूला अतीव ममतेने स्वत:च्या मांडीवर बसवून त्याचे लाड केले. दोन दिवस स्वत:बरोबर ठेवून घेतले व नंतर आशीर्वाद देऊन रवानगी केली. त्यानंतर महाराजांना त्याकाळातील, श्री रामकृष्ण परमहंस, श्री त्रैलंगस्वामी, श्री माणिकप्रभू, श्री देव मामलेदार इत्यादी अनेक थोर संतांची दर्शने झाली. नंतर सद्गुरु श्री तुकामाईंची भेट होऊन, अत्यंत खडतर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना पूर्णकृपा लाभली. लहानग्या गणुबुवांचे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज झाले.
महाराजांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथेच असे. पण रामनामाच्या प्रसारासाठी त्यांचा संचार सर्व भारतभर होई. त्यांनी आपल्या हयातीत हजारो लोकांना नाम देऊन सन्मार्गाला लावले. समाधी पश्चात् आजही त्यांच्या कृपेचे अनुभव अक्षरश: लाखो लोक घेत आहेत.
त्यांचे चरित्र परमार्थ साधकांसाठी विशेष बोधप्रद आहे. " भक्ताची श्रीरामरायाच्या चरणीं अनन्य निष्ठा कशी असायला हवी? " याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे श्री महाराज ! 'रामच कर्ता' या भावनेच्या बळावर अचाट कार्य करून दाखवण्यातली अलौकिक निस्पृहता म्हणजे श्री महाराज ! गुरुचरणीं अनन्य शरणागती म्हणजे श्री महाराज ! नि:शंक निर्भय निरहंकार आणि समर्थ साधुजीवन म्हणजे श्री महाराज ! जनांचा अपरंपार कळवळा म्हणजे श्री महाराज ! त्यांच्या दिव्य चरित्रलीला वाचताना, प्रेमाचे भरते येऊन कधी आपले नेत्र पाझरू लागतात हे आपल्याला समजत देखील नाही. खरोखरीच फार विलक्षण विभूतिमत्व होते ते  !!
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे परमगुरु, पलूसचे श्री धोंडीबुवा महाराज यांचा व श्री गोंदवलेकर महाराजांचा स्नेह होता. प.पू.काकांनाही श्री महाराजांविषयी अतीव प्रेमादर होता. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नसरापूरच्या घरी श्री महाराज येत असत. पू.मामांचे आई-वडील, पू.दत्तोपंत व पू.पार्वतीदेवी यांना श्री महाराजांबद्दल अतीव प्रेमादर होता. महाराजही त्यांना फार मानत असत. पू.दत्तोपंत व श्री महाराज समोर आल्यावर परस्परांना दंडवत घालून दृढ प्रेमालिंगन देत आणि मगच त्याची चर्चा सुरू होई. श्री महाराज एकदा त्यांना म्हणाले होते, " कृपायोगाचे साधनच सर्वश्रेष्ठ आहे. ज्यांना ते देणारे सामर्थ्यवान सद्गुरु लाभले ते धन्य होत. मलाही श्री तुकामाईंकडून हेच साधन मिळाले. पण हे सर्वांनाच देता येत नाही, म्हणून मी त्यांच्याच आदेशानुसार सर्वांना नाम घ्यायला सांगतो ! "
श्रीमहाराजांची प्रवचनेही अत्यंत सोपी व काळजाला हात घालणारी आहेत. रामनामाची व हरिभक्तीची महती त्यांनी फारच सोप्या आणि चटकन् हृदयाला भिडेल अशा समर्पक भाषेत, अधिकारवाणीने सांगितलेली आहे. त्या प्रवचनांचे दररोज नियमितपणे वाचन करून आपला परमार्थ सुकर करणारे लक्षावधी भक्त जगभर आहेत.
आज त्यांच्या १०४ व्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या चरणीं सादर वंदन करूया; व त्यांनी सर्वात शेवटी केलेला बोध, त्यांचा शेवटचा अभंग वाचून, त्यावर चिंतन-मनन करून, त्यांच्या कृपासावलीत आपणही आपला परमार्थमार्ग आनंदाने आक्रमूया !
भजनाचा शेवट आला ।
एक वेळ राम बोला ॥१॥ 
आज पुण्य पर्वकाळ ।
पुन्हा नाही ऐसी वेळ ॥२॥
राम नाम वाचे बोला ।
आत्मसुखा माजी डोला ॥३॥
दीन दास सांगे निका ।
रामनाम स्वामी शिक्का ॥४॥
" श्रीसद्गुरु मुखातून आलेले व परंपरेने लाभलेले 'दिव्यनाम' हेच जणू 'स्वामी शिक्का' आहे. हा शिक्का ज्याच्या चित्तावर श्रीगुरु उमटवतील, त्याचाच परमार्थात सहज प्रवेश होतो. ही नामरूपी निकी म्हणजेच श्रेष्ठ, शुद्ध कृपा-मोहोर लाभल्यावर मगच साधक ख-या अर्थाने पुनीत होतो. त्या कृपाप्रसादामुळे व आपल्या श्रीगुरूंचा 'दीनदास' बनून  झालेल्या त्या दास्ययुक्त साधनेने मग त्याला आत्मसुखात अखंड डोलण्याचे सौभाग्य लाभते ! त्याचे अवघे जीवनच मग एक अद्भुत पुण्य पर्वकाळ बनून जाते. त्याच्या पावन संगतीने मग जगाचाही उद्धार होतो. " श्री महाराजांच्या या अंतिम बोधामृतातून जणू त्यांचे आत्मचरित्रच थोडक्यात प्रकट झालेले आहे !
या लेखासोबत आज श्री महाराजांच्या प्रतिमेऐवजी त्यांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश देत आहे. आपली साधना लवकर पूर्णत्वाला जावी, असे ज्याला मनापासून वाटते, त्या प्रत्येक साधकाने श्री महाराजांचा हा बोध मनाच्या गाभा-या सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा व वारंवार आठवावा इतका महत्त्वपूर्ण आहे. साधकाचे अवघे विश्वच अमृतमय करणारे हे बोधवचन, अनन्यगुरुभक्त असणा-या सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराजांचे हृद्गतच आहे जणू !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in)



3 Dec 2017

वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम्

भगवान श्रीदत्तप्रभू हे साक्षात् परिपूर्ण परब्रह्म आहेत. जगन्नियंत्या श्रीभगवंतांचे अभिन्न गुरुस्वरूप म्हणजे श्रीदत्तप्रभू. म्हणूनच त्यांना ' जगद्गुरु ' म्हणतात. आज मार्गशीर्ष पौर्णिमा हे भगवान श्रीदत्तात्रेय जयंतीचे पावन पर्व आहे.
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या अवताराचे रहस्य सांगताना प.पू.योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " श्रीदत्तात्रेय अवतार ' हा चिरंजीव का आहे? तर, ' अज्ञान ' नावाचा राक्षस मारल्याशिवाय श्रीदत्तगुरूंना जाता येणार नाही; व अज्ञान हे अनंत काळापर्यंत राहणार. म्हणून हा अवतार चिरंजीव आहे. "
अज्ञान नष्ट करणे हेच श्रीगुरुतत्त्वाचे प्रधान कार्य आहे. या अज्ञानामुळेच जीव आपले मूळचे ब्रह्मस्वरूप विसरून मायेच्या कचाट्यात सापडून दु:ख भोगत असतो. दु:खी कष्टी जीवांचा कळवळा येऊन श्रीभगवंतच श्रीदत्तप्रभूंच्या रूपाने प्रकट होतात व योग्य वेळ आलेल्या जीवांवर कृपा करून त्याना आत्मबोध करतात. या कार्यासाठी श्रीदत्तप्रभूंचेच अंश विविध गुरुपरंपरांच्या माध्यमातून श्रीगुरु म्हणून पुन्हा पुन्हा अवतरित होतात. ही परंपरा आजही अक्षुण्ण चालूच आहे.
श्रीभगवंतांचे अवतार ज्या कार्यासाठी होतात, ते कार्य पूर्ण झाल्यावर पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात विलीन होऊन जातात. पण श्रीदत्तप्रभूंच्या अवताराचे तसे नाही. जोवर माया आहे तोवर अज्ञान आहेच व तोपर्यंत श्रीदत्तप्रभूंचे कार्य पूर्ण झालेले नसल्याने ते कार्यरत राहणारच. म्हणूनच प.पू.श्री.मामा श्रीदत्तप्रभूंना ' चिरंजीव अवतार ' म्हणतात. आज याच चिरंजीव अवताराचा प्रकटदिन होय !
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या अलौकिक स्वरूपाची काही विलक्षण वैशिष्ट्ये आहेत. श्रीदत्तप्रभू हे भगवान ब्रह्मा, विष्णू व महेशांचे एकत्रित स्वरूप आहेत. त्यांच्या सहा हातांमध्ये तिघांची प्रत्येकी दोन आयुधे मिळून सहा आयुधे आहेत. त्यांच्या हातांचे व त्यातील शस्त्रांचे मार्मिक रहस्य सांगताना प.पू.श्री.मामा म्हणतात, " भगवान श्रीदत्तात्रेयांचे सहा हात हे सहा शास्त्रांचे निदर्शक आहेत. हातातील माळ - जपासाठी, डमरू - व्याकरण आदी शास्त्रे शिकवण्यासाठी, शंख - ज्ञान देण्यासाठी. "
श्रीदत्तप्रभूंचे तीन हात भक्तांसाठी आहेत तर तीन हात अभक्तांसाठी, शत्रूंसाठी आहेत. भक्तांसाठी असलेल्या उजवीकडील तीन हातांपैकी, सर्वात खालच्या हातात त्यांनी ब्रह्मदेवांचे आयुध असणारी जपाची 'माळ' धारण केलेली आहे. आपल्या भक्तांना सतत नामस्मरण करण्याचा त्याद्वारे श्रीदत्तप्रभू बोध करतात.
मधल्या हातात 'डमरू' हे शिवांचे आयुध आहे. त्याचा वापर व्याकरणादी शास्त्रे शिकवण्यासाठी होतो. व्याकरण शास्त्राची मूळ सूत्रे भगवान शिवांनी डमरूच्या नादातूनच निर्माण केलेली आहेत.
सर्वात वरच्या हातात भगवान विष्णूंचे 'शंख' हे आयुध आहे. या शंखाच्या स्पर्शाने भगवंत शिष्यांना ज्ञानदान करतात. ध्रुवबाळाच्या गालाला आपल्या हातातील शंखाचा स्पर्श करून श्रीभगवंतांनी ज्ञान दिल्याचा उल्लेख भागवतात व श्री ज्ञानेश्वरीत आहे.
या तिन्ही हातांचा व त्यातील आयुधांचा, जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभू आपल्या शरणागत शिष्यांवर कृपाप्रसाद करण्यासाठीच उपयोग करतात. 
जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभूंचे सहा हात हे सहा शास्त्रांचे, षड्दर्शनांचे प्रतीक आहेत. कपिलमुनींचे सांख्य, कणादांचे वैशेषिक, पतंजलींचे योग, न्याय, मीमांसा व वेदान्त ही सहा दर्शने अथवा शास्त्रे आहेत. साक्षात् परब्रह्म भगवान श्रीदत्तप्रभू हे जगद्गुरु असल्याने ही सर्व शास्त्रे जणू त्यांच्या पावन देहाचे अवयवच आहेत.
या सहा हातांपैकी, उजवीकडील तीन हात हे भक्तांसाठी अाहेत. उजवी बाजू आपल्याकडे पवित्र मानली जाते. तसे भक्तांना देवांकडे प्रथम मान आहे, म्हणून त्यांना उजवी बाजू दिलेली आहे. तर डावीकडील तीन हात हे अभक्तांसाठी, दुष्टांसााठी आहेत. या तिन्ही हातांतील शस्त्रे ही दुष्टांना शासन करण्यासाठी आहेत. यांचे रहस्य सांगताना प.पू.श्री.मामा म्हणतात, " भगवान श्रीदत्तात्रेयांचे डावीकडील तीन हात अभक्तांसाठी, दुष्टांसाठी आहेत. कमंडलू - पाणी मारून वैरी नाशासाठी, त्रिशूळ - दूर असलेल्‍या शत्रूला मारण्यासाठी, चक्र - फारच दूरच्या दुष्ट शक्तींना मारण्यासाठी."
श्रीदत्तप्रभूंनी डावीकडील सर्वात खालच्या हातात ब्रह्मदेवांचे 'कमंडलू' हे आयुध धारण केलेले आहे. यातील पाणी मारून ते धर्माचे व सज्जनांचे तसेच भक्तांचे  वैर करणारे, त्यांना अकारण त्रास देणारे शत्रू मारून टाकतात. मधल्या हातात त्यांनी भगवान शिवांचे 'त्रिशूल' हे आयुध धारण केलेले आहे. हे त्रिशूल फेकून दूरचे शत्रू ते नष्ट करतात. सर्वात वरच्या हातात त्यांनी भगवान श्रीविष्णूंचे 'चक्र' हे आयुध धारण केलेले आहे. फारच दूरच्या दुष्ट शक्तींचा नि:पात करण्यासाठी त्या चक्राचा ते उपयोग करतात.
भगवान श्रीदत्तप्रभू हे भक्तवत्सल भक्ताभिमानी व दुष्टनिर्दालन करणारे आहेत.
श्रीदत्तप्रभूंच्या ब्रीदांचे द्योतक असणा-या त्यांच्या या सहा हातांचा व त्यांतील आयुधांचा हा विलक्षण गूढार्थ, आजवर पहिल्यांदाच, प.पू.श्री.मामांनीच सर्वांना समजेल असा शब्दांमध्ये प्रकट केलेला आहे. हे त्यांचे आपल्यावरील फार मोठे ऋण आहे. या रहस्याचा अभ्यास करण्याने आपल्याला श्रीदत्तप्रभूंच्या अवतारामधील अज्ञात असणारा विलक्षण भाग नीट समजून येईल. आजच्या श्रीदत्तात्रेय जयंतीच्या पावन पर्वावर या प.पू.श्री.मामांच्या या मार्मिक बोधाचे चिंतन करून आपणही भगवान श्रीदत्तप्रभूंच्या श्रीचरणी ही स्मरणांजली सादर समर्पूया व धन्य होऊया !!
( छायाचित्र : योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांनी स्वत: रेखाटलेले भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंचे मनोहारी षड्भुज रूप ! )
( https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )