28 Sept 2019

सद्गुरु श्रीसंत ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर पुण्यतिथी

आज भाद्रपद अमावास्या, सर्वपित्री अमावास्या, सद्गुरु श्रीसंत ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे शिष्योत्तम आणि साक्षात् श्रीगुरुभक्तीचेच मूर्तिमान स्वरूप असणाऱ्या सद्गुरु श्रीसंत ब्रह्मानंद महाराज गाडगोळी, बेलधडीकर यांची आज १०१ वी पुण्यतिथी. सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराजांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!
"श्रीगुरुसेवेचा परममंगल व अद्भुत आविष्कार म्हणजे श्री ब्रह्मानंद महाराज होत. श्रीगुरु गोंदवलेकर महाराज हेच आपले सर्वस्व, श्रीमहाराजांनी दिलेले कृपायुक्त नाम हेच एकमात्र साधन आणि श्रीमहाराजांची सादर परिचर्या-सेवा हेच एकमेव कर्तव्य ; असे मनापासून जाणून त्यानुसार वागणारे श्री ब्रह्मानंदबुवा म्हणजे साक्षात् मूर्तिमंत श्रीगुरुभक्तीच ! शुकासारिखे पूर्ण वैराग्य अंगी मिरवणारा हा महात्मा, आपल्या अपूर्व-मंगल निष्ठेने श्रीगुरु ब्रह्मचैतन्यांचेही चैतन्यच होऊन ठाकला होता, यात नवल ते काय?......"
पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे.
ब्रह्मानंद स्थिती काय वर्णू
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_1.html?m=1

27 Sept 2019

परमवैराग्यशिरोमणी सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज पुण्यतिथी

आज भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील अलौकिक अवधूत विभूतिमत्व आणि सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे प्राणप्रिय सद्गुरु, प.पू.सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांची ९६ वी पुण्यतिथी !
अनिर्वचनीय अशा अवधूती स्थितीचे साक्षात् दर्शन म्हणजे सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज. वैराग्याची परमसीमा, अद्वयानंदाची संपन्न अनुभूती आणि दैवी सद्गुणांची खाण म्हणजे सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज ! अशा विभूतींचे दर्शन आणि त्यांना मनोभावे केलेले वंदनही जन्मजन्मांतरीच्या पुण्याचेच फळ म्हणायला हवे. एवढेच नाही तर, अशा महान संतांचे प्रेमाने केलेले स्मरणही इहपर साधनेची प्रगती साधणारे असते, त्या संतांचीच योग्यता प्रदान करणारे असते, असे भगवान सद्गुरु श्री माउलींनी सांगून ठेवलेले आहे.
हीच प्रेमजाणीव हृदयी जागती ठेवून, सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांच्या चरित्राचे चिंतन मांडणारा खालील लिंकवरील लेख आवर्जून वाचावा ही प्रार्थना !
तो देवांचाही देव जाणिजे
https://rohanupalekar.blogspot.com/2018/10/blog-post_7.html?m=1

22 Sept 2019

सद्गुरु श्री गोविंदकाका उपळेकर महाराज पुण्यतिथी

आज भाद्रपद कृष्ण अष्टमी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज यांची ४५ वी पुण्यतिथी !
राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील महान विभूतिमत्व आणि भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे पूर्णकृपांकित सत्पुरुष, सद्गुरु श्री.गोविंदकाका महाराज उपळेकर हे फार विलक्षण महात्मे होते. सदैव आपल्याच अवधूती अवस्थेत रममाण असणारे प.पू.श्री.काका श्री माउलींच्या श्री ज्ञानेश्वरीची ओवीन् ओवी अक्षरश: जगत होते.
गेल्या वर्षी आजच्याच तिथीला, प.पू.श्री.काकांच्या पावन स्मृतिकथा व चरित्रावर आधारित स्वानंदचक्रवर्ती हे सुंदर पुस्तक प्रकाशित झाले. त्याबरोबर तरुणांसाठी संतांनी केलेल्या मौलिक उपदेशांवर आधारित जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा हेही पुस्तक प.पू.काकांच्या समाधी समोर प्रकाशित झाले. वर्षभरात या दोन्ही ग्रंथांची आवृत्ती जवळपास संपत आलेली आहे. वाचकांनी या दोन्ही ग्रंथांचे मनापासून स्वागत व कौतुक केले, ही माझ्यावर बरसलेली श्रीसद्गुरुकृपाच आहे !
स्वानंदचक्रवर्ती ग्रंथाच्या प्रस्तावनेत प.पू.सद्गुरु श्री.काकांचे माहात्म्य यथार्थ शब्दांत सांगताना, श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू प.पू.श्री.शिरीषदादा कवडे लिहितात, "विसाव्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या अग्रगण्य भगवद् विभूतींमध्ये पू.उपळेकर काकांची गणना होते. पू.काका संतत्वाचा उत्तुंग आदर्श होते. लौकिकातल्या कुठल्याही प्रसंगांत त्यांच्या अंत:करणाची ब्रह्मबैसका सुटलेली दिसत नसे. ते स्वानंदसाम्राज्याचे चक्रवर्ती सम्राटच होते. प्राप्त पुरुषाची ती समग्र दैवी सुलक्षणे त्यांच्या ठायी सुखाने, आपलेपणाने तिन्ही त्रिकाळ नांदत होती. सहज, अखंड समाधीचे शांभवी वैभव त्यांच्या सर्व लीलाव्यवहारांमधून सदैव ओसंडत असे. हे पुस्तक चित्ताकर्षक झालेले असून वाचकाला भावविभोर व अंतर्मुख करणारे आहे. एकंदरीत स्वानंदचक्रवर्ती हे समग्र पुस्तकच अत्यंत वेल्हाळ, वाचनीय आणि मननीय झालेले आहे !"
[ प.पू.सद्गुरु श्री.काकांचे दिव्य चरित्र आणि कार्य यावरील लेख खालील लिंकवर जाऊन आपण वाचवा. त्याद्वारे आजच्या पावन तिथीला प.पू.काकांच्या चरणीं आपण सप्रेम आदरांजली वाहू या !
तो होय ब्रह्मतेच्या मुकुटीं चूडारत्न
https://rohanupalekar.blogspot.com/2016/04/blog-post.html ]
प.पू.श्री.काकांनी मंगळवार दि.८ ऑक्टोबर १९७४ रोजी आजच्याच तिथीला सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. त्यापूर्वी साधारणपणे दीड-दोन महिने आधी फलटणला एक प्रसंग घडला. पू.काकांच्या दर्शनाला कै.श्री.ज्ञाननाथजी रानडे व काही मंडळी फलटणला आली होती. प.पू.काका आपल्याच अवस्थेत असले तरी फार सूचक वाक्ये बोलून जात. तसेच त्यावेळी क्रिकेट खेळाचा संदर्भ घेऊन प.पू.काका अचानक उद्गारले, "कशी झाली मॅच ? खेळाडू धावपट्टीवर येतो, खेळतो. जेवढा दम असेल तेवढी फटकेबाजी करून धावा काढतो. त्यातही प्रेक्षकांना आपली कलाकुसर दाखवतो. बॉल टाकल्यावर त्याचा झेल देऊन आऊट होणे चांगले. स्टंप मारून किंवा उडून आऊट (क्लीन बोल्ड) होण्यात काय मजा आहे ? हा चेंडू-फळीचा खेळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापासून तो श्रीकृष्णदेवांपर्यंत (प.पू.काकांचे सद्गुरु) आम्ही खेळत आलेलो आहोत. खेळ खेळ म्हणून खेळायचा, त्याला भ्यायचे नाही. हाच खेळ सर्व संत मंडळींसमवेत खेळत राहावयाचा आहे ! खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई हो ।"
वरकरणी अतिशय गूढ वाटणारे हे पू.श्री.काकांचे बोल अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. यातून त्यांनी आपल्या दैवी जन्मकर्माचे व अलौकिक देहत्यागाचे रहस्यच सांगून टाकलेले आहे. या संदर्भात मी प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्याशी बोललो होतो. त्यांनी प.पू.काकांच्या या वाक्यांचा अद्भुत अर्थ सांगितला होता. तो असा की, "प.पू.श्री.काका हे श्रीभगवंतांच्या आज्ञेने लोकांच्या उद्धारासाठीच जन्माला आलेले होते. "आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी ।" ह्या श्री तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे पू.काकाही पृथ्वीतलावर कार्यासाठीच आलेले होते. त्याअर्थाने ते भगवान श्रीकृष्णांचे खेळ-सवंगडीच होते. क्लीन बोल्ड होणे म्हणजे काळाने टाकलेल्या बॉलवर आऊट होणे, यमाच्या इच्छेने मृत्यू येणे. पण काळाच्या बॉलवर झेल (कॅच) देणे म्हणजे त्या काळाला फाट्यावर मारून स्वत:च्या इच्छेने देहत्याग करणे. ह्या प्रक्रियेत संत निष्णातच असतात. ते कधीच काळाच्या अधीन नसतात. एरवी दुर्लंघ्य असा काळ त्यांच्यासमोर मात्र कायमच हतबल असतो. आम्ही म्हणू तेव्हा आम्ही जाऊ, काळ आला म्हणून आम्ही आमची विकेट टाकणार नाही, असेच संत म्हणतात. ते यमाची बॉलिंग तर चोपूनच काढत असतात. त्यांची विकेट काढायची कोणाची ताकद आहे ?"
प.पू.श्री.काकांनी देखील असा आपल्या इच्छेने ठरवूनच देहत्याग केला होता. त्यामागचे कारणही खूप विशेष आहे. ८ ऑक्टोबर ही त्यांच्या सद्गुरूंची, प.पू.श्रीकृष्णदेव महाराजांची देहत्यागाची तारीख होती. ८ ऑक्टोबर १९२३ रोजी सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांनी देहत्याग केला होता. म्हणूनच परम गुरुभक्त असणाऱ्या प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी देखील आधी ठरवून ८ ऑक्टोबर याच तारखेला, आपल्याच इच्छेने नश्वर देहाची खोळ सांडली. आपल्या इच्छामरणाचाच सूचक संकेत प.पू.श्री.काकांनी क्रिकेटच्या संदर्भाने आलेल्या वरील वाक्यांत दिलेला नाही का ?
सद्गुरु श्री गोविंदकाका महाराज की जय !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( स्वानंदचक्रवर्ती व जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा या ग्रंथांसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा हा विनंती.)

20 Sept 2019

श्रीज्ञानेश्वरी जयंती

आज भाद्रपद कृष्ण षष्ठी, आजच्या तिथीला 'श्रीज्ञानेश्वरी जयंती' म्हणतात. अर्थात् ही श्रीज्ञानेश्वरीच्या निर्मितीची तिथी नाही, श्रीसंत एकनाथ महाराजांनी केलेल्या श्रीज्ञानेश्वरीच्या प्रतिशुद्धीची ही तिथी आहे. जवळपास तीनशे वर्षांमधील पाठांतरांमुळे मूळ श्रीज्ञानेश्वरीच्या पाठात ज्या अशुद्धी निर्माण झाल्या, चुकीचे पाठ रूढ होत गेले, ते श्रीसंत एकनाथ महाराजांनी काढून टाकून श्रीज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत पुन्हा तयार केली. ती त्यांची लेखनकामाठी आजच्या तिथीला पूर्ण झाली होती.
सद्गुरु श्री माउलींचेच स्वरूप असणाऱ्या श्रीज्ञानेश्वरीचे माहात्म्य सांगताना श्रीसंत जनाबाई म्हणतात,
वाचावी ज्ञानेश्वरी, डोळां पहावी पंढरी ॥१॥
ज्ञान होये अज्ञान्यांसी, ऐसा वर त्या टीकेसी ॥२॥
ज्ञान होये सकळा मूढां, अतिमूर्ख त्या दगडां ॥३॥
वाचेल जो कोणी, जनी त्यासी लोटांगणी ॥४॥

श्रीसंत जनाबाई सांगतात, "श्रीमद् भगवद् गीतेची रहस्योद्घाटक  टीका असणारी श्रीज्ञानेश्वरी अावर्जून वाचावी अाणि पंढरीची वारी करावी, डोळ्यांनी पंढरीनगरी पाहावी. कारण या टीकेला एक विशेष आशीर्वाद आहे की, जे अज्ञानी आहेत त्यांना त्यामुळे ज्ञान होईल. अतिमूर्ख असणारा, दगड असणाराही कोणी जर ही मनापासून वाचेल, तरी त्यालाही ज्ञान होईल. अशा प्रेमाने व श्रद्धेने जो कोणी ही श्रीज्ञानेश्वरी वाचेल, तिला शरण जाईल, त्याला मीच लोटांगण घालते !"
श्रीसंत जनाबाईंचा हा अभंग वरवर अगदी सोपा वाटत असला, तरी त्याचा गूढार्थ अतिशय विलक्षण आहे. जिज्ञासूंनी त्यासाठी प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी या अभंगावर केलेली दोन प्रवचने मुद्दाम वाचावीत. "वाचावी ज्ञानेश्वरी" याच नावाने प्रस्तुत ग्रंथ श्रीवामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे.
आजच्या पावन तिथीला सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचेच अपर स्वरूप असणाऱ्या माय माहेश्वरी श्री ज्ञानदेवीला आपण सर्वभावे शरण जाऊन दंडवत घालू या आणि आजन्म तिची सेवा करून या दुर्लभ अशा मानवी आयुष्यात धन्य धन्य होऊ या !
सद्गुरु श्री माउलींच्या 'भावार्थदीपिका' तथा 'श्रीज्ञानेश्वरी'चे संतांनी वर्णिलेले माहात्म्य सांगणारा, ती कधी निर्माण झाली, कशी निर्माण झाली ते सांगणारा आणि तिच्या सेवेचे व सेवनाचे सुफल कथन करीत श्रीज्ञानेश्वरीची शब्दपूजा मांडणारा लेख खालील लिंकवर जाऊन आजच्या पावन तिथीला आवर्जून वाचावा ही प्रेमळ प्रार्थना !
दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी
https://rohanupalekar.blogspot.com/2018/09/blog-post_30.html

11 Sept 2019

श्रीसंत प.पू.ताई दामले

आज भाद्रपद शुद्ध त्रयोदशी, सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपांकित अशा अधिकारी सत्पुरुष प.पू.श्रीसंत पार्वती शंकर तथा प.पू.ताई दामले यांची पुण्यतिथी.  आज त्यांची ३६ वी पुण्यतिथी आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष येथे वसंत पंचमीदिनी, ५ फेब्रुवारी १८८९ रोजी पू.ताई दामले यांचा जन्म झाला. सौ.लक्ष्मी व श्री.नारायणराव पटवर्धन यांच्या पोटी त्या जन्मला. त्यांचे नाव द्वारका असे ठेवले गेले. १८९८ सालच्या प्लेगच्या साथीत त्यांचे जवळपास पूर्ण घरच मृत्युमुखी पडले. मातृछत्रही हरपले. त्यांच्या काकू पार्वतीबाई पटवर्धन यांनी त्यांना सांभाळले. या काकूंमुळेच पू.ताईंवर बालपणापासून परमार्थाचे संस्कार झाले. पार्वतीकाकूंचे पाठांतर दांडगे होते. उत्तमोत्तम श्लोक, स्तोत्रे, कवने, अभंगादी वाङ्मय या काकूंमुळेच पू.ताईंचेही पाठ झाले. ब्रह्मनाळ येथील एका स्वामींनी त्यांना बालपणीच नामस्मरण व मानसपूजा करण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार त्या भगवान श्रीदत्तप्रभूंची मानसपूजा व नामजप निष्ठेने करू लागल्या. त्या स्वामींनीच पुढे बारा वर्षांनी श्रीज्ञानेश्वरी वाचनाचीही त्यांना आज्ञा केली. तेव्हापासून श्रीज्ञानेश्वर माउली हे त्यांचे आराध्य दैवत बनले.
लहान वयात पू.ताई दामले यांच्या डोळ्यांना इजा होऊन ते लाल होत, दिसायला कमी आले. पुढे पुढे त्यांच्या डोळ्यांमध्ये केस उगवू लागले. त्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला सेवेसाठी राहिलेल्या असताना एकदा स्वप्नात "डोळ्यांत चरणतीर्थ घाल" अशी आज्ञा झाली. दुसऱ्याच दिवशी त्यांना पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे दर्शन लाभले. ते कृष्णामाईवरून स्नान करून येत होते. त्यांचे ओले चरणकमल घाटावर उमटत होते. पू.ताई त्यांच्या दर्शनासाठी गेल्या. त्यांना स्वप्नाची आठवण झाली व त्यासरशी जाणवले की श्रीदत्तप्रभूंनी हेच चरणतीर्थ घालायला सांगितले होते. प.प.श्री.टेंब्ये स्वामींच्या चरणांचे ओले ठसे त्यांनी पदराने टिपून घेतले व ते पाणी तांब्यात पिळून तीर्थ म्हणून वापरले. त्या तीर्थामुळेच पुढे कधी त्यांच्या डोळ्यांचा तो त्रास फारसा वाढला नाही.
पुढे १९०२-०३ मध्ये त्यांचा विवाह वाई येथील सुखवस्तू सावकार दामले यांच्या घराण्यातील श्री.शंकरराव यांच्याशी झाला. संसाराची सर्व कर्तव्ये पार पाडीत, हाताने काम व मुखाने नाम अशा प्रकारे त्यांची अध्यात्मसाधना गुप्तपणे चालूच होती. त्याचे फळ म्हणून त्यांना भगवान श्रीविष्णूंचे दर्शन लाभले. पुढे सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांचेही दर्शन लाभले व त्यांच्या कृपाप्रसादाने प.पू.ताई धन्य धन्य झाल्या. सतत नामस्मरण व श्री ज्ञानेश्वरी वाचन हीच त्यांची साधना होती. त्याबरोबर विविध संतवाङ्मयाचेही वाचन-मनन त्या करीत. प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेचा, गोष्टीचा अध्यात्मपर अर्थ लावण्याची त्यांनी सवयच लावून घेतलेली होती. त्यामुळे दैनंदिन व्यवहारातही त्यांचे अनुसंधान टिकत असे. कधी कधी नामाच्या अथवा अशा आत्मविचाराच्या अनुसंधानाच्या योगाने त्या जणू भावसमाधीतच जात. काम करता करताच भान हरपून त्या स्थिर होऊन जात असत. श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपेने आणि श्री ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने त्यांना असा अनुभव येत असे.
१९४५ साली श्री ज्ञानेश्वर माउलींनी त्यांच्या स्वप्नात येऊन इतरांना अनुग्रह देण्याची त्यांना आज्ञा केली. तेव्हापासून प.पू.ताई दामले अध्यात्मजिज्ञासूंना, विशेषत: गृहिणींना मार्गदर्शन करू लागल्या. त्या ज्ञानेश्वरीवर प्रवचनेही करीत असत. दररोजच्या व्यवहारातील उदाहरणे घेऊन त्याद्वारे त्या परमार्थ शिकवीत असत. म्हणूनच त्यांचे सांगणे पटकन् समजत व पटत देखील असे. "आदळआपट, भांडणतंटा, धुसफूस, एक राग दुसऱ्या गोष्टीवर काढणे, असमाधान, चिडचिड व माझे माझे अशी हाव टाळून जर आपण वाट्याला आलेली रोजची कामे उत्तमरित्या करीत राहिलो व त्याचवेळी नामाची सवय लावली आणि ईश्वरार्पण बुद्धीने संसार केला तर तेच देवाला आवडते", असे त्या आवर्जून सांगत. त्यांनी स्वत: सुद्धा हेच तत्त्व आयुष्यभर कसोशीने पाळले होते.
पू.ताई दामले यांचे जीवनचरित्र हे सांसारिक भक्तांसाठी आदर्शवत् आहे. संसारात राहून, सर्व कर्तव्ये अचूक पाळूनही उत्तम परमार्थ कसा साधता येतो, हे पाहायचे असेल तर पू.ताई दामले यांचे चरित्र अभ्यासावे. त्यांचे चरित्र किती महत्त्वपूर्ण आहे हे समजण्यासाठी एक उदाहरण सांगतो. सुरुवातीच्या काळात त्या अखंड नामस्मरणाचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करीत होत्या. त्यात स्वयंपाक करताना नाम घ्यायची सवय लागण्यासाठी, फळीवरचे भांडे काढताना नाम घ्यायचे विसरले तर त्या पुन्हा ते भांडे फळीवर ठेवत, आठवणीने नाम घेऊन मग ते परत काढून घेत व स्वयंपाक करीत. इतक्या निष्ठेने आपल्या मनाला, शरीराला परमार्थाची सवय लावावी लागते, तरच तो परमार्थ अंगी मुरतो आणि मग वेगळे कष्ट न करताही आपोआपच होऊ लागतो. पू.ताईंचे हे वागणे आपल्यासाठी किती मार्गदर्शक आहे पाहा. अशा असंख्य बोधप्रद घटना त्यांच्या चरित्रात वाचायला मिळतात.
प.पू.ताई दामले यांच्याबद्दल प.पू.सद्गुरु योगिराज श्री.गुळवणी महाराजांना खूप प्रेमादर होता. प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज तर त्यांना आपली बहीणच म्हणत असत. पू.ताई दामले यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात वाई येथे प.पू.श्री.मामा स्वत: हजर होते व त्यांचीच प्रवचनसेवाही झाली होती.
पू.ताई दामले यांना नीटनेटकेपणाची खूप सवय होती. त्या वाणसामान वगैरे बांधून आलेल्या कागदांच्या नीट घड्या करून ठेवीत, त्याचे दोरेही नीट गुंडाळून ठेवीत असत. एकदा अशाच कागदाची घडी करताना त्यांचे लक्ष गेले. त्यावर काहीतरी लिहिलेले होते. कुतूहलाने पाहू गेल्यावर लक्षात आले की ते श्री ज्ञानेश्वर माउलींचे अष्टक आहे. त्यांना तो श्री माउलींचाच कृपाप्रसाद वाटला. त्यांनी ते अष्टक पाठ केले व आपल्या परिवारातील सर्व भगिनांनाही शिकवले. ते अष्टक नियमाने म्हणायची पद्धत घालून दिली. गंमत म्हणजे ते 'श्रीज्ञानदेवाष्टक' हे आपल्या प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी रचलेले असून अतिशय सुंदर आहे. सद्गुरु श्री माउलींचे पूर्ण चरित्रच त्या अष्टकामधून मांडले गेले आहे.
वयाच्या ९४ व्या वर्षी, भाद्रपद शुद्ध त्रयोदशी, दि.२० सप्टेंबर १९८३ च्या पहाटे ३ वाजून ५५ मिनिटांनी मुलुंड येथे प.पू.ताई दामले यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. त्यांच्या देहाला आळंदी येथे इंद्रायणी काठी अग्नी देण्यात आला. कृष्णेकाठी जन्मलेली ही सद्गुरु श्री माउलींची कृपांकित साध्वी इंद्रायणी काठी कायमची विसावली. त्यांची समाधी इंद्रायणी काठी बांधलेली आहे.
योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांच्या आज्ञेने प.पू.ताई दामले यांचे "कृष्णाकाठ ते इंद्रायणी घाट"नावाचे छोटेखानी चरित्र नीलाताई जोशी यांनी लिहिलेले आहे. त्या चरित्रातून अतिशय बोधप्रद मार्गदर्शन लाभते. म्हणून परमार्थ अभ्यासकांनी ते आवर्जून वाचावे. महाराष्ट्राच्या संपन्न संतपरंपरेतील एक अलौकिक स्त्रीसंत म्हणून पू.ताई दामले यांची गणना होते. त्या अतिशय प्रसिद्धिपराङ्मुख असल्याने त्यांचे नावही फारसे कोणाला माहीत नाही. सर्वसामान्य प्रापंचिक भक्तांसाठी त्यांचे जीवन खरोखर आदर्शच आहे.
प.पू.श्रीसंत ताई दामले यांच्या चरणीं पुण्यतिथी निमित्त सादर प्रणिपात !
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481


10 Sept 2019

श्रीवामनद्वादशी

आज भाद्रपद शुद्ध द्वादशी, भगवान श्रीमहाविष्णूंच्या पाचव्या श्रीवामन अवताराची जयंती आणि श्रीज्ञानेश्वरकन्या प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज यांची पुण्यतिथी !
भगवंत अत्यंत भक्तवत्सल आहेत, त्यांचे आपल्या भक्तांवर स्वत:पेक्षाही जास्त प्रेम असते आणि विविध प्रसंगांनी ते प्रेम श्रीभगवंत व्यक्त करतातच. अशीच एक निरतिशय प्रेमाची सुखद लीला म्हणजेच श्रीभगवंतांचा श्रीवामन अवतार होय !
प्रात:स्मरणीय भक्तराज श्रीबलिराजा याच्या उद्धारासाठी आणि देवतांचे राज्य त्यांना पुन्हा प्रदान करण्यासाठी हा अवतार झाला. पण भक्तिशास्त्रात प्रकट झालेले भक्तांचे माहात्म्यच खरेतर या लीलेतून अधिक उजळून निघताना दिसते. भक्त कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही थराला जाऊन आपल्या लाडक्या श्रीभगवंतांना धरूनच ठेवतात, त्यांची प्राप्ती करूनच घेतात, हेच या सुमधुर लीलेतून दृग्गोचर होते.
श्रीभगवंतांच्या या प्रसन्न लीलेचा आस्वाद खालील लिंकवरील लेखातून आपण सविस्तर घ्यावा ही विनंती.
आज ज्यांची पुण्यतिथी आहे, ते सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे स्वनामधन्य शिष्योत्तम श्रीसंत गुलाबराव महाराज हेही तुम्हां आम्हां सगळ्यांसाठी प्रात:स्मरणीयच आहेत. त्यांच्या हृदयी वसत असलेल्या आपल्या श्रीज्ञानेश्वर माये विषयीच्या अपरंपार जिव्हाळ्याचे, आपल्या शाश्वत माहेराच्या भेटीच्या लालसेचे तलम भावचित्र त्यांच्या ऐक तू येवढे चंदनपाखरा या अप्रतिम अभंगातून व्यक्त झालेले आहे. श्री गुलाबराव महाराजांनी आपल्या अभंगामधून मांडलेल्या या गर्भरेशमी भाव-पैठणीचे विवरण खालील लिंकवरील लेखात आपण पुरेपूर अास्वादावे ही प्रेमळ विनंती.
ऐक तू येवढे चंदनपाखरा
https://rohanupalekar.blogspot.com/2018/09/blog-post_21.html

8 Sept 2019

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची

( समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेल्या सुप्रसिद्ध श्रीगणेश आरतीचे विवेचन. )

रोहन विजय उपळेकर
8888904481

आरती म्हणजे भक्तहृदयाचा प्रसन्न आविष्कार. आपल्या आराध्याची अतीव प्रेमादराने गायलेली स्तुती म्हणजे आरती. 'रती' म्हणजे तीव्र अनुराग, प्रेम. म्हणून, अतीव प्रेमादराने केलेली क्रिया ही 'आरती' होय. भक्ताच्या हृदयातील सघन प्रेम ज्या प्रक्रियेने तो आपल्या आराध्यदेवतेला अर्पण करतो त्याला आरती म्हणतात ! आपल्याकडील भक्तिउपचारांमध्ये म्हणूनच आरतीला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे.
भगवान श्रीगणपती ही सर्वादिपूज्य देवता. त्यामुळे आरतीही त्यांचीच प्रथम म्हटली जाते. मराठी संतकवींपैकी समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्याच सर्वात जास्त प्रचलित आहेत. आपल्या अंगभूत रसाळता, अर्थघनता, मार्मिकता आणि गेयता आदी गुणांमुळेच श्री समर्थांच्या आरत्या सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी रचलेली सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । ही सर्वच मराठी जनांच्या नित्यपठणात असणारी गणपतीची आरती अतीव सुंदर आहे. आपण रोजच म्हणत असलेल्या आरतीचा अर्थ नीट समजला तर म्हणताना अधिक आनंद लाभतो; म्हणूनच हा लेखनप्रपंच.
बुद्धी व ज्ञानाची अधिष्ठात्री देवता असणाऱ्या भगवान श्रीगणेशांच्या देखण्या स्वरूपाचे अत्यंत सुरेख वर्णन करताना श्री समर्थ म्हणतात,
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची ।
नुरवी पुरवी प्रेमकृपा जयाची ।
सर्वांगीं सुंदर उटी शेंदूराची ।
कंठीं झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रें मनःकामना पुरती ॥ध्रु.॥

भगवान श्रीगणेश सुखकर्ते आणि दुःखहर्ते आहेत. आपल्या भक्तांची सर्व प्रकारची दुःखे, ते केवळ आपल्या एका कृपाकटाक्षाने दूर करतात आणि शाश्वत सुख त्याच्या आयुष्यात निर्माण करतात. ज्यांची प्रेमकृपा दुःखांची वार्ताही नि:शेष नष्ट करते; त्या भगवान श्रीगणपतींनी सर्वांगी भक्तवात्सल्याच्या शेंदराची उटी चर्चिलेली असून, भक्तप्रेमरूपी मोत्यांची तेजस्वी माळ गळ्यात घातलेली आहे. अशा अखिल विश्वाचे मंगल करणाऱ्या मंगलमूर्ती देवाधिदेव विघ्नहर श्रीगणपतींचा जयजयकार असो ! त्यांच्या नुसत्या दर्शनानेही भक्तांच्या अखिल मनोकामना पूर्ण होतात.
श्री समर्थांनी इथे भगवान श्रीगणेशांचे 'मंगलमूर्ती' हे विशेष नाम वापरलेले आहे. त्याचा विचार करायला हवा. पूजनीय सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज आपल्या 'देवा तूंचि गणेश' या ग्रंथात म्हणतात, "वेदांतील प्रत्येक अक्षर म्हणजे श्रीभगवंतांची मूर्ती आहे. अक्षरेच मंगल करणारी आहेत म्हणून तीच मंगलमूर्ती आहे. भगवंतांचा जन्म होतो तो अक्षरातूनच होतो. भगवंतांचे मूळ स्वरूप हे शब्दब्रह्मानेच नटलेले आहे. म्हणून मंदिरातल्या मूर्तीपेक्षाही भगवंतांच्या या शब्दमूर्तीला, नामाने तयार होणा-या त्यांच्या 'अक्षरमूर्ती'लाच जास्त महत्त्व असते." या कारणानेच श्री माउलींनी देखील श्री ज्ञानेश्वरी ग्रंथारंभी भगवान श्रीकृष्णांच्या अक्षरमय ज्ञानरूप श्रीगणेशांना वंदन केले आहे.
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजही याच संदर्भाने मनाच्या श्लोकांच्या सुरुवातीला भगवान गणेशांचे वर्णन "मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।" असे करतात. निर्गुण निराकार परब्रह्म मूळ स्वरूपात प्रथमत: अक्षरांतूनच प्रकट होत असते. म्हणूनच समर्थ गणेशांना निर्गुणाचा मूळारंभ आरंभ म्हणतात. श्रीभगवंतांचे हे अक्षरमय सगुण रूप सर्वांसाठी मंगलकारक असल्याने त्यालाच 'मंगलमूर्ती' असे संबोधले जाते. श्री समर्थांनी या आरतीच्या ध्रुवपदात त्यामुळे मंगलमूर्ती हेच विशेषण वापरलेले दिसून येते. भगवान श्रीगणेश सर्वांचे मंगल करणारेच आहेत.
सर्व प्रकारची संकटे नष्ट झाल्याशिवाय खरे सुखही अनुभवाला येणार नाही. मुळात संकटांनी घेरलेल्या व्यक्तीला सुख उपभोगताच येत नाही. चित्ताला शांतपणा तर हवा ना ते सुख भोगायला ? म्हणूनच, भगवान श्रीगणेश आधी आपल्या भक्ताची संकटे नष्ट करतात. मगच त्याला सुख लाभते. यासाठीच श्री समर्थांनी श्रीगणेशांच्या सुखकर्ता व दु:खहर्ता ह्या दोन्ही विशेषणांचाही एकत्रित वापर या पहिल्या चरणात केलेला आहे.
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरें चरणीं घागरिया ॥२॥

अनर्घ्य रत्नांनी जडवलेले सुंदर पदक गौरीकुमरा आपल्याला शोभा देत आहे. तुम्ही सर्वांगी ल्यालेली केशरयुक्त लालसर सुगंधी चंदनउटी मोहक दिसत आहे. तुमच्या मस्तकावरचा हिरेजडित मुकुट तेजाने तळपत असून पायातील घागऱ्या, पैंजण मधुर ध्वनी करीत भक्तांच्या हृदयात आल्हाद निर्माण करीत आहेत. तुमचे हे मनोहर रूप तुमच्या भक्तांच्या चित्तवृत्तींना अंतर्बाह्य वेध लावून, भुंग्याप्रमाणे त्यांना तुमच्या चरणकमलीच खिळवून ठेवत आहे.
या चरणात भगवान श्रीगणेशांच्या सगुण रूपाचे फारच मनमोहक वर्णन केलेले आहे.
आपण ज्यांची आरती करीत आहोत ते श्रीगणराय दिसतात कसे ? त्यांची रूपमाधुरी आहे तरी कशी ? याचे बहारदार वर्णन करताना श्री समर्थ आरतीच्या शेवटच्या चरणात म्हणतात,
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकष्टीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना ॥३॥

हे पीतांबर नेसलेल्या लंबोदरा, कंबरेला नागाचे बंधन धारण करणाऱ्या, सरळ सोंडेच्या व वाकड्या मुखाच्या गणराया, तीन नेत्र असलेल्या श्रीगजानना, हा रामाचा दास तुमची आपल्या घरी आतुरतेने वाट पाहात आहे. तुम्ही माझ्या या प्रेमप्रार्थनेचा स्वीकार करून माझ्या अंत:करणरूपी घरी लवकर प्रकट व्हावे आणि माझे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करून माझा आणि माझ्या श्रीरामभक्तीचा शेवटपर्यंत सांभाळ करावा. श्रेष्ठ देव-देवताही ज्यांना वंदन करतात अशा श्रीगणेशा, या रामदासाची प्रेमार्ती स्वीकारून तुम्ही आता भरभरून कृपा करावी !
भगवान श्रीगणेशांचे 'वक्रतुंड' हे नाम श्री समर्थांनी या चरणात योजलेले आहे. ह्या नामाचा उत्तम विचार सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. श्री ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायाच्या नमनात माउली एका सुंदर ओवीत भगवान श्रीगणेशांचे मार्मिक गुणवर्णन करताना म्हणतात,
जो तुजविखी मूढ । तयालागी तूं वक्रतुंड ।
ज्ञानियांसी तरी अखंड । उजूची आहासी ॥ ज्ञाने.१७.०.४॥

श्रीगणेशांची सोंड हे काही त्यांचे तोंड नाही, ते तर नाक आहे, पण सोंड हेच जणू त्याचे तोंड वाटते. म्हणून त्यांना 'वक्रतुंड' म्हणतात. माउली म्हणतात, हे सदगुरुरूप गणराया, जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत, त्यांना तू वक्रतुंड दिसतोस, म्हणजे तू त्यांना रागावलेला, तिरस्कार करणारा वाटतोस ; पण जे तुझ्याविषयी प्रेम बाळगून आहेत, तुझ्या स्वरूपाचे ज्ञान ज्यांना झालेले आहे, त्यांच्यासाठी तू उजू म्हणजे सरळ सोंडेचाच आहेस. त्यांना तू कायम कृपामय, करुणाकरच वाटतोस.
सद्गुरु श्री माउलींनी गणेशांची सरळ सोंड ही सुविमल विवेकाचे प्रतीक मानलेली आहे. विवेक म्हणजे सारासार जाणण्याची क्षमता. आपल्या परमार्थासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार म्हणजे 'विवेक'. ज्यांना श्रीगणेशांविषयी प्रेम आहे व ज्यांच्यावर गणेशांनी अनुग्रह केलेला आहे, त्यांना कायमच या सुविमल अर्थात् शुद्ध विवेकाची प्राप्ती होते. असा हा विवेक निःसंशय सदगुरुकृपेनेच लाभतो. खरेतर हा विवेकच गुरुकृपा लाभल्याचे प्रथम द्योतक मानतात. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या एका अभंगात म्हणूनच म्हणतात की, "विवेक तो मुख्य कृपेचे लक्षण । गर्भासी भूषण बुद्धीचिया ॥"
या विवेकाला इतके का बरे महत्त्व दिलेले आहे ? कारण; जेथे असा सुविमल विवेक असतो तिथेच साधनेने पुढे ज्ञान प्रकट होऊन परमानंदाची, महासुखाची प्राप्ती होत असते. श्रीगुरूंनी दाखवलेल्या मार्गानेच अत्यंत प्रेमाने व निष्ठेने साधना केल्यावर आपण विवेकरूपी तीर्थाच्या काठावर येऊन पोहोचतो. तिथे जन्मजन्मांतरी बुद्धीने साठवलेला कर्मांचा संस्काररूप मल स्वच्छ धुतला जाऊन बुद्धी शुद्ध होते. आणि त्यानंतरच खरेतर आपल्याला आत्मसुखाची प्राप्ती होते. म्हणून हा विवेक परमार्थात फार महत्त्वाचा मानला जातो.
सद्गुरु श्री समर्थांनी या आरतीच्या शेवटच्या चरणात योजलेल्या वक्रतुंड व सरळ सोंड ह्या दोन्ही शब्दांचा वरील श्री माउलींच्या विवेचनाच्या आधारे विचार केल्यावर आपल्याला आणखी सुंदर अर्थ लागतात. सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज अतिशय नेमकी शब्दयोजना करणारे तयारीचे कविश्रेष्ठ आणि विचक्षण शब्दप्रभू होते हे आपल्याला मनोमन पटते.
श्री समर्थ संप्रदायात यातील पहिले आणि तिसरे अशी दोनच कडवी म्हटली जातात. ‘रत्नखचित फरा..’ हे कडवे म्हणत नाहीत. ते प्रक्षिप्त मानले जाते. परंतु सर्वत्र ते प्रचलित असल्यामुळे मी या लेखात त्याचाही विचार केलेला आहे.
( http://rohanupalekar.blogspot.in )
गेली काही वर्षे गणेशोत्सव जवळ आला की, "समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेली गणपतीची मूळ सात चरणांची आरती" म्हणून एक आरती व्हॉटस्अॅप व फेसबुक सारख्या समाज माध्यमांमधून फिरू लागते. वस्तुत: अशी कोणतीही सात चरणांची आरती सद्गुरु श्री समर्थांनी रचलेली नाही. त्यांनी केवळ दोन चरणे व एक ध्रुवपदाची आरतीच रचलेली आहे. उर्वरित पाच चरणे नंतरच्या कोणा कवींनी रचलेली असावीत, पण ती नक्कीच समर्थांची रचना नाही. आजवर मिळालेल्या श्री समर्थांच्या कोणत्याही हस्तलिखितात ही पाच चरणे आलेली नाहीत. तेव्हा व्हॉटसअॅपवर फिरणाऱ्या या सात चरणांच्या मूळ आरतीकडे काणाडोळा करणेच उत्तम ठरेल.
काही अभ्यासकांचा, शेवटच्या चरणात ‘संकष्टी का संकटी’ यावर मतभेद आहे. या दोन्ही पाठभेदांचा अर्थ एकच होतो. संकष्टी पावावें म्हणजे संकटांमध्ये पावावे. संकष्टी चतुर्थीचा याच्याशी काहीही संबंध नाही. जुन्या काळातील मराठी भाषेत संकष्ट असाही शब्दप्रयोग होता ; त्यामुळे संकटी पावावे आणि संकष्टी पावावे हे दोन्ही पाठ अर्थदृष्ट्या बरोबरच आहेत. संकष्ट म्हणजे तीव्र कष्ट, मोठी दु:खे. आणि अशा संकटांच्या वेळी तर विघ्नहर्ताच स्वाभाविकपणे आठवणार ना !
काही ठिकाणी ‘दर्शनमात्रे मन स्मरणेमात्रे मन:कामना पुरती’ आणि ...जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती असे म्हणतात. ते मात्र पूर्ण चूक आहे. कोणाच्याही मूळ रचनेत आपले पदरचे शब्द घालणे, हे साधुसंतांनी चुकीचे वर्तन म्हणूनच सांगितलेले आहे. त्यामुळे मूळची आरती जशी आहे तशीच, शुद्ध शब्दोच्चार करीत म्हणायला हवी ; स्वतःचे कोणतेही शब्द त्यात न घालता. संतांच्या शब्दांना जसे अंगभूत सामर्थ्य असते तसे आपल्या शब्दांना नक्कीच नसते ; आणि म्हणूनच संतांच्या वाङ्मयात जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने होणारी ही पदरची भर आपण सर्वांनी कायमच टाळली पाहिजे. समर्थांनी तर अशा प्रकारे पदरचे शब्द घालणाऱ्याला मूर्खच म्हटलेले आहे.
मनोभावे आणि प्रेमाने केलेली आरती, स्तुतिप्रिय अशा श्रीभगवंतांच्या मनात आपल्याविषयी करुणा उत्पन्न होण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणूनच, कसलीही घाईगडबड न करता प्रेमाने आणि मनापासून, आरतीतील शब्दांचा सुयोग्य अर्थ जाणून, त्यातील भावना आपल्या अंतःकरणात रुजवून आरती म्हटली पाहिजे. जर आपण या श्रीगणेशोत्सवातच नाही तर रोजच्या पूजेतही अशाच प्रकारे समजून-उमजून आरती म्हटली, तर त्यातून अधिक आनंद तर लाभेलच ; शिवाय भक्तांवर निरतिशय प्रेम करणारे श्रीभगवंत देखील प्रसन्न होऊन आपल्या सर्व दुःखांचा समूळ नाश करून आपले आयुष्य सुखसमाधानाने भरून टाकतील यात तिळमात्रही शंका नाही !
मंगलमूर्ती मोरया ।
 रोहन विजय उपळेकर.




4 Sept 2019

श्रीबलराम जयंती

भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंचे ज्येष्ठ बंधू, भगवान शेषांचे अवतार महाबलवान योद्धे भगवान श्रीबलराम यांची भाद्रपद शुद्ध षष्ठी ही जयंती. प्रत्यक्ष श्रीकृष्णस्वरूप आणि श्रीकृष्णलीलेतील प्रधान सहचर भगवान श्रीबलरामांच्या चरणीं सादर दंडवत !
भगवान श्रीबलरामांबद्दल श्रीमद् भागवतामध्ये तसेच आपल्या मराठी संतांनीही खूप चांगले सांगून ठेवलेले आहे. श्रीरामावतारात धाकटे बंधू लक्ष्मण झालेले भगवान शेष श्रीकृष्णावतारात ज्येष्ठ बंधू श्रीबलराम म्हणून जन्माला आले. मोठ्या मिश्कीलपणे या लीलेचे रहस्य सांगताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे श्रीनामदेवांचे अभंग उद्धृत करतात. देवदेवतांनी व असुरभाराने श्रमलेल्या पृथ्वीने विनवणी केल्यामुळे श्रीभगवंतांनी कृष्णावतार घेण्याचे ठरविले. आता अवतार घ्यायचा म्हणजे सगे-सोबती पण हवेतच ना ! म्हणून श्रीभगवंतांनी आपल्या सख्याला, भगवान शेषांना सांगितले की,
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊं आता ॥१॥
पृथ्वीवरी दैत्य माजले ते फार । गाऱ्हाणे सुरवर सांगू आले ॥२॥
पूर्व अवतारातील वाईट अनुभव गाठीशी असल्याने शेषांनी तत्काळ नकार दिला व म्हणाले,
शेष म्हणे मज श्रम झाले फार । यालागी अवतार मी नघेचि ॥३॥
राम अवतारीं झालो मी अनुज । सेविलें अरण्य तुम्हांसवें ॥४॥
चौदा वर्षावरी केलें उपोषण । जाणतां आपण प्रत्यक्ष हें ॥ना.गा.२४.५॥

शेष म्हणतात, "देवा ! मी नाही बाबा येणार आता तुमच्याबरोबर. मागच्या वेळी तुमचा धाकटा भाऊ झालो नि काय काय सहन केले. तुमच्यासह अरण्यवास पत्करला, तिथे चौदा वर्षे उपास पण काढले. फार कष्ट झाले तेव्हा. तुम्ही हे सर्व जाणत असूनही अवतार घ्या म्हणताय ? आता मी चुकूनही नाही येणार !"
शेषांचेही बारसे जेवलेले हे श्रीभगवंत, ते काय बधणार आहेत थोडीच ? ते समजावणीच्या सुरात म्हणाले,
पूर्वी तूं अनुज झालासी कनिष्ठ । सोसियेले कष्ट मजसवें ॥१॥
आतां तूं वडील होईगा सर्वज्ञा । पाळीन मी आज्ञा तुझी बारे  ॥ना.गा.२५.२॥

देव म्हणाले, "अरे शेषा, तू गेल्यावेळी धाकटा झालास ना म्हणून तुला फार कष्ट झाले. आता यावेळी तू थोरला हो आणि मी धाकटा होऊन तुझ्या सर्व आज्ञा पाळीन, मग तर झाले ना ?"
नटनागर श्रीभगवंतांची गुगली बरोबर स्टंपवर लागून शेषांची विकेट पडली. ते लगेच तयार झाले अवतार घ्यायला आणि भगवान श्रीबलरामांच्या रूपाने प्रकटले !
भगवान श्रीकृष्णांचे मुख्य लीलासहचर भगवान श्रीसंकर्षणांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !
श्रीबलरामांचा जन्म, त्यांची विविध नामे व त्यामागील गूढार्थ आणि श्रीबलरामांच्या काही चरित्रलीलांबद्दलची आणखी माहिती खालील लिंकवरील लेखात आपण वाचू शकता.
नमो अनन्ताय संकर्षणाय
https://rohanupalekar.blogspot.com/2018/09/blog-post_15.html?m=1

2 Sept 2019

भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती

भाद्रपद शुद्ध चतुर्थी, श्रीगणेश चतुर्थी ही कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची जन्मतिथी आहे. आमच्याकडे सूर्यसिद्धांताचे पंचांग वापरले जाते. आजच्या सूर्योदयाला त्यात तृतीया असल्याने आमच्याकडे उद्याच्या सूर्योदयाला भगवान श्री श्रीपादप्रभूंचा जन्मोत्सव साजरा होणार आहे. परंतु दृक् सिद्धांताचे पंचांग वापरणाऱ्यांकडे आजच्याच सूर्योदयाला श्रींचा जन्मोत्सव साजरा झाला. खरेतर जन्मोत्सवानिमित्त भगवान श्री श्रीपादप्रभूंचे प्रेमादरपूर्वक स्मरण होणे जास्त महत्त्वाचे आहे. आज का उद्या हा भाग गौण आहे. आपण दोन्ही दिवस श्रींचे स्मरण करू या.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज हे सर्वदेवमय आहेत. तेच सृष्टी-स्थिती-लय करणारे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. तेच अज्ञान घालवून ज्ञान देणारे भगवान श्रीगणेश आहेत. तेच आपला मातृवत् सांभाळ करणारी आई जगदंबा आहेत ; आणि शरण आलेल्या जीवावर अनुग्रहकृपा करून त्याच्याकडून परमार्थ करवून घेणारे करुणासागर जगद्गुरूही आहेत ! अशा या अलौकिक व अद्वितीय भगवत्स्वरूपाच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या जयंती निमित्त पूर्वी लिहिले गेलेले अल्पसे चिंतन खालील लिंकवरील लेखात आपण वाचू शकता.
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये
https://rohanupalekar.blogspot.com/2018/09/blog-post_13.html?m=1