29 May 2019

मुक्ताई जैसी सणकांडी

नमस्कार !
आज वैशाख कृष्ण दशमी, श्रीज्ञानेश्वरभगिनी ब्रह्मचित्कला श्रीसंत मुक्ताबाई महाराजांचा ब्रह्मलीन दिन !
साक्षात् आदिशक्ती जगत्रयजननी भगवती श्रीजगदंबाच सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण व शिष्या म्हणून अवतरली होती. सद्गुरु माउलींची कूस धन्य करणारी ही भगवती आदिशक्ती मुक्ताबाई, अध्यात्म-आकाशात अद्भुत तेजाने तळपणारी परमोज्ज्वल विद्युल्लताच आहे. म्हणूनच की काय, ही ब्रह्मचित्कला आजच्या तिथीला पावन करीत त्या विद्युल्लतेतच सामावून स्वरूपाकार झाली. हा काही निव्वळ योगायोग नव्हे, ही तर साक्षात् त्या आदिजगदंबेची अलौकिक परब्रह्मप्रचितीच आहे !
सद्गुरु श्री माउलींनाही अभिमान वाटावा अशा त्यांच्या स्वनामधन्य शिष्या भगवती श्री मुक्ताई महाराजांच्या श्रीचरणी खालील लेखाच्या माध्यमातून शब्द-पुष्पांजलीच्या सादर समर्पितो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती

19 May 2019

नारद जयंती

भगवद् भक्तश्रेष्ठांच्या मांदियाळीतील थोर विभूतिमत्त्व म्हणजे भक्तराज देवर्षि नारद ! आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना सादर वंदन !
देवर्षि नारद हे लोकांना 'कळीचा नारद' म्हणून माहीत आहेत. देवर्षि नारदांसारख्या अत्यंत अलौकिक विभूतीचे महत्त्व आणि माहात्म्य आपण जाणतच नाही. केवळ विनोदासाठी आपण नारदांचा उल्लेख करतो, हे खरोखर आपले अभाग्यच आहे.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणत की, देवर्षि नारद म्हणजे विशुद्ध चित्त." त्यांनी कधीच कुठेही अयोग्य वर्तन केलेले नाही किंवा कुठेही भांडणे लावलेली नाहीत. नारदजी हे फार महान आणि विलक्षण विभूतिमत्त्वच आहेत. श्रीमद् भागवतातील श्रीविष्णूंच्या चोवीस अवतारांमध्ये देवर्षि नारदांचाही समावेश होतो. ते साक्षात् भगवान श्रीविष्णूंचेच कलावतार आहेत. देवर्षी नारदजींच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!
देवर्षींच्या विषयी पूर्वी लिहिलेला एक लेख खालील लिंकवर आहे, तोही आवर्जून वाचावा ही विनंती !
देवर्षि नारदा वंदन मनोभावे
https://rohanupalekar.blogspot.com/2016/05/blog-post_23.html

18 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - ९

भगवान श्रीनरहरीरायांच्या अनन्यभक्तांचे प्रेमभावे स्मरण करताना भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य महाराज म्हणतात,
प्रल्हाद-नारद-पराशर-पुण्डरीक-
व्यासादि-भागवत-पुङ्गवहृन्निवास ।
भक्तानुरक्त-परिपालन-पारिजात
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१६॥

"हे प्रभो नरहरीराया ! प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक(पुंडलीक), व्यास आदी आपल्या श्रेष्ठ भागवतांच्या, अनन्यभक्तांच्या हदयातच आपण सदैव वास करता, आपल्यावर अनुरक्त झालेल्या आपल्या भक्तांचे आपण अत्यंत प्रेमाने, मातृवात्सल्याने पालन करता. त्यांच्यासाठी आपण प्रत्यक्ष पारिजात म्हणजे कल्पतरूच आहात, त्यांच्या सर्व इच्छा आपणच पूर्ण करता. तेव्हा हे करुणामय देवाधिदेवा, आता आपण माझीही इच्छा पूर्ण करा, मला आपल्या हातांचा आधार देऊन या भवसागरातून पार करा !"
प्रस्तुत करावलम्बन स्तोत्राची अलौकिक फलश्रुती सांगताना भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज स्तोत्राच्या शेवटच्या श्लोकात म्हणतात,
लक्ष्मीनृसिंहचरणाब्जमधुव्रतेन
स्तोत्रं कृतं शुभकरं भुवि शंकरेण ।
ये तत्पठन्ति मनुजा हरिभक्तियुक्ता-
स्ते यान्ति तत्पद-सरोजमखण्डरूपम् ॥१७॥

"भगवान श्रीलक्ष्मीनृसिंहांच्या श्रीचरणकमलातील मकरंद सतत सेवन करण्याचे व्रत घेतलेल्या, अर्थात् श्रीनृसिंहचरणीं सदैव रत असलेल्या मी शंकराने हे स्तोत्र जगाच्या कल्याणासाठीच रचलेले आहे. या स्तोत्राचे जे भक्त मनोभावे पठण करतील त्यांच्या हृदयात अतिशय दुर्लभ अशी हरिभक्ती प्रकट होईल अाणि शेवटी सच्चिदानंदघन श्रीभगवंतांच्या श्रीचरणांची त्यांना प्राप्ती होईल !"
भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या स्तोत्र रचनांमधील अतीव सुंदर, माधुर्यपूर्ण व गेय अशी ही रचना आहे. हे स्तोत्र प्रत्यक्ष श्री आचार्यांनाही आवडत असे व भगवान श्रीलक्ष्मीनृसिंहांचेही या स्तोत्रावर अतिशय प्रेम आहे. म्हणूनच या स्तोत्राच्या माध्यमातून श्रीभगवंतांनी या नवरात्रकालात आपल्याकडून ही जी आराधना करवून घेतली, ती सर्व त्याच्याच श्रीचरणीं सादर समर्पित असो. आपणही सर्वांनी नियमितपणे या स्तोत्राचे पठण करून श्रीनृसिंह भगवंतांची कृपा संपादन करावी ही प्रेमळ विनंती.
काल श्रीनृसिंह जयंतीच्या दिवशी भगवान श्रीनृसिंहराज महाराजांची सहस्र बिल्व, तुलसी व श्वेतपुष्पांची अर्चना व जन्मकाल महापूजा संपन्न झाली. त्याचेही फोटो या पोस्ट सोबत देत आहे.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंह अवतारकथेचा संदर्भ असणारे दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना.
नरहरी तो माझा - ९
(श्रीनृसिंह नवरात्र लेखमालेच्या सांगतेचा लेख.)
विदारूनि महास्तंभ.... - ९
(श्रीनृसिंह नवरात्र लेखमालेच्या सांगतेचा लेख.)
https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post_15.html?m=1

17 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - ८

आज भगवान श्रीनरहरीरायांचा परमपावन प्रकटदिन. आजच्या सायंकाळी ते परब्रह्म पुन्हा अवतरणार आहे, भक्तकरुणाकर हे आपले ब्रीद परत एकदा सार्थ करण्यासाठी !
गेले आठ दिवस आपण श्रीकृपेनेच श्रीनृसिंह भगवंतांच्या गुणानुवादनात रमलेलो आहोत. आजच्या सायंकाळच्या, शेवटच्या लेखाबरोबर ही सेवा संपन्न होणार आहे. आजचा दिवस आपण परमकरुणामूर्ती भगवान श्रीनृसिंहराज महाराजांचा भरभरून जयजयकार करू या, त्यांचे यथामती व जास्तीत जास्त स्मरण करू या !
भगवान श्रीलक्ष्मीनृसिंह प्रभूंच्या अतीव देखण्या, प्रसन्न षड्भुज श्रीमूर्तीचे मनोहर ध्यान तितक्याच गोड शब्दांमध्ये वर्णन करताना भगवत्पूज्यपाद श्रीमद् शंकराचार्य महाराज म्हणतात,
एकेन चक्रमपरेण करेण शङ्ख-
मन्येन सिन्धुतनयामवलम्ब्य तिष्ठन् ।
वामेतरेण वरदाभय-पद्म-चिन्हं
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१४॥

"प्रभो लक्ष्मीनृसिंहा ! आपण आपल्या डाव्या बाजूच्या वरच्या हातात दुष्टांचा शिरच्छेद करणारे आपले सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र धारण केलेले आहे. मधल्या हातात ज्ञानस्वरूप शंख धारण केला आहे. तिस-या हाताने आपण आपल्या शक्तीला आधार देऊन आपल्या राजसिंहासनावर विराजमान झालेला आहात. आपला उजवीकडील सर्वात वरचा हात वरमुद्रेत असून, त्याद्वारे आपण आपल्या भक्तांना इच्छित वर प्रदान करता. मधल्या हाताने आपण अभयमुद्रा धारण केलेली आहे, ज्याद्वारे आपण शरण आलेल्या जीवांना सर्वप्रकारच्या संकटांमधून अभय प्रदान करता. आपले रूप अत्युग्र असले तरी स्वभाव (हृदय) मात्र अतिशय कोमल आहे, हे सांगण्यासाठी तिस-या हातात आपण शुभदायक असे कमल धारण केलेले आहे. या कमलाद्वारे आपण आपल्या भक्तांची पूजा करता. आपले हे अतीव मनोहर रूप सर्व पापांचा नाश करणारे, भक्तांच्या हृदयात मधुर अशी भावभक्ती निर्माण करणारेच आहे. मी आपल्या या भक्तवात्सल्यमय रूपाला मनोभावे वंदन करून, मला आपल्या हातांचा आधार देऊन या भवसागरातून पार करावे अशी विनम्र प्रार्थना करतो !"
स्तोत्राच्या शेवटाला भगवान श्रीलक्ष्मीनृसिंहांची सप्रेम प्रार्थना करताना नृसिंहभक्त जीव कळवळून म्हणतो,
अन्धस्य मे हृत-विवेक-महाधनस्य
चोरैर्महाबलिभिरिन्द्रिय-नामधेयैः ।
मोहान्धकार-कुहरे विनिपातितस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१५॥

"करुणावरुणालय भगवंता ! मी मुळातच अंधळा आहे, कारण मला कर्तव्य व अकर्तव्याचा विचारही कधीच नीट सुचत नाही. त्यात माझे विवेकरूपी धन इंद्रिये (पाच कर्मेंद्रिये व पाच ज्ञानेंद्रिये) नामक महाबलवान चोरांनी पूर्ण लुटून नेले आहे. तेवढ्यावरच ते थांबलेले नाहीत, तर अतिशय अंधा-या अशा मोहरूप भयावह दरीत त्यांनी मला ढकलून दिले आहे. आता मी यातून बाहेर कसा येऊ ? आपणच आता दया दाखवून मला यातून बाहेर काढले नाहीत, तर मी कायमचा नष्टच होऊन जाईन. मला आता देवा आपणच वाचवावे, माझा उद्धार करावा !"
(आजच्या पोस्ट सोबत दिलेले चित्र हे प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या नित्यपूजेतील एका अतिशय दुर्मिळ व जुन्या फोटोचे छायाचित्र आहे.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंह अवतारकथेचा संदर्भ असणारे दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना.
नरहरी तो माझा - ८
( श्रीनृसिंह स्मरणाचे महत्त्व सांगणारा लेख.)
विदारूनि महास्तंभ.... - ८
वैशाख कृष्ण त्रयोदशी, श्रीवेदव्यास जयंती निमित्त त्यांचे माहात्म्य कथन करणारा व श्रीनृसिंहपुराणातील भक्तराज प्रल्हादांच्या एका अप्रसिद्ध कथेचे विवरण करणारा लेख.)
https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post_81.html?m=1

16 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - ७


विविध तापांनी, संसारदु:खांनी कळवळणारा जीव भगवान श्रीनृसिंहांच्या नामांचा जयजयकार करून म्हणतो,
लक्ष्मीपते कमलनाभ सुरेश विष्णो
यज्ञेश यज्ञ मधुसूदन विश्वरूप ।
ब्रह्मण्य केशव जनार्दन वासुदेव
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१३॥

"हे 'लक्ष्मीपती', कमळासारखी नाभी असणा-या 'कमलनाभा', देवांच्याही मुख्यदेवा, 'सुरेशा', आपणच यज्ञांचेही अधिपती, 'यज्ञेश' आहात. भगवान मनूंची कन्या आकूती व रुचि प्रजापती यांच्या पोटी 'यज्ञ' नावाने अवतार धारण करणा-या, मधुदैत्याचा वध करणा-या 'मधुसूदना', आपणच विश्व व्यापून राहिलेला आहात, 'विश्वरूप' आहात. ब्रह्माचे प्रतिपादन करणारे वेद व वैदिक जनांचे, ब्राह्मणांचे सदैव संरक्षक अशा 'ब्रह्मण्य'रूप भगवंता, केशी दैत्याचा नाश करणा-या 'केशवा', आपणच 'जनार्दन'स्वरूप आहात. वसुदेवांच्या पोटी पूर्णावतार धारण करणा-या श्रीकृष्णस्वरूप 'वासुदेवा', आपणच भक्तकल्याणार्थ हा लक्ष्मीनृसिंह अवतार धारण केलेला आहे. आता माझ्या सारख्या दीन व अनाथ दासाचा आपण अव्हेर करू नका, मला हात देऊन या दु:खमूळ प्रपंचातून कायमचे सोडवा !"
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंह अवतारकथेचा संदर्भ असणारे दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना.
नरहरी तो माझा - ७
(भगवान श्रीनृसिंहांच्या पूजेचे, श्रीनृसिंहमंदिराची स्वच्छता करण्याच्या सेवेचे विशेष फल कथन करणारा लेख.)
विदारूनि महास्तंभ.... - ७
भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या चरित्रातील श्रीनृसिंहकृपेची एक अलौकिक कथा सांगणारा लेख.)

https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post_27.html?m=1


15 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - ६



जंगलामध्ये संरक्षण करणारी देवता म्हणून भगवान श्रीनृसिंह सुप्रसिद्ध आहेत. त्यामुळे संसाररूप अरण्यात हरवलेला, घाबरलेला जीव त्यांची कळवळून प्रार्थना करताना म्हणतो,
संसार-घोर-गहने चरतो मुरारे
मारोग्र-भीकर-मृग-प्रचुरार्दितस्य ।
आर्तस्य मत्सर-निदाघ-सु-दुःखितस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥११॥
"हे (मुरारे) मुर दैत्याचा नाश करणा-या भगवंता ! या संसाररूप निबिड आणि घोर अरण्यात निरर्थक भटकणा-या माझ्या मागे, कामरूपी उग्र ढाण्या वाघ लागलेला आहे. त्याच्या भीतीने, त्रासाने मी पार घायकुतीला आलेलो आहे, मला काहीच सुचेनासे झाले आहे. त्यातच या अरण्यातल्या द्वेष व मत्सररूप उन्हाच्या तापाने मी पूर्ण त्रासून गेलो आहे, अस्वस्थ झालेलो आहे. अशा या घोर अरण्यात आपल्याशिवाय माझे रक्षण दुसरे कोण बरे करणार ? म्हणून हे दीनदयाळा, आता आपणच माझे संरक्षण करा, मला या भयंकर संसार अरण्यातून बाहेर काढा, माझा उद्धार करा !"
प्रत्येक जीव अाठ पाशांनी बांधलेला असतो, म्हणूनच त्याला 'पशू' म्हटले जाते ; आणि त्यातून बाहेर काढणारे भगवंत 'पशुपती' म्हटले जातात. पशुपती हे खरेतर भगवान श्रीशिवांचे नाव आहे. पण इथे ते भगवान श्रीनृसिंहांनाही लागू होते, कारण मुळातच ते मृगेंद्र म्हणजे सर्व पशूंचे राजेच तर आहेत. अशा पशुपती भगवान श्रीनृसिंहांना संसाराच्या शेकडो पाशांनी बांधला गेलेला जीवरूप पशू व्याकूळ होऊन विनवितो की,
बद्ध्वा गले यमभटा बहु तर्जयन्त:
कर्षन्ति यत्र भवपाशशतैर्युतं माम् ।
एकाकिनं परवशं चकितं दयालो
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१२॥
"आधीच आशा, ममता, इच्छा, द्वेष इत्यादी शेकडो भवपाशांनी बांधल्या गेलेल्या मला, आता हे दुष्ट यमदूतही गळ्यात गच्च पाश अडकवून, गळफास लावून प्रचंड ओढत आहेत. मी पूर्णपणे एकाकी पडलेलो असून परवशही झालेलो आहे. सर्वस्वी या यमदूतांच्या मर्जीवरच माझे सगळे अवलंबून आहे. मला एकट्याला तुमच्याशिवाय आता कसलाही आधार राहिलेला नाही. म्हणूनच, हे अहेतुकदयानिधी नरहरीराया ! आता आपणच माझा कृपाळूपणे सांभाळ करा, माझा उद्धार करा !"
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंह अवतारकथेचा संदर्भ असणारे दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना. 
नरहरी तो माझा - ६ 
(पूर्णब्रह्म भगवान श्रीनृसिंहांचे पूर्णावतार स्वरूप स्पष्ट करणारा लेख.)
विदारूनि महास्तंभ.... - ६
(भगवान श्रीनृसिंह आणि श्रीदत्तसंप्रदायाचा विलक्षण ऋणानुबंध स्पष्ट करणारा महत्त्वाचा व नाविन्यपूर्ण लेख.)
https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post_26.html?m=1
)


14 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - ५

अत्यंत भयानक अशा संसाररूपी महासागराच्या भीतीने व्यथित झालेला जीव, दयानिधी भगवान श्रीनृसिंहराज महाराजांची प्रार्थना करताना म्हणतो,
संसार-सागर-विशाल-कराल-काल
नक्र-ग्रह-ग्रसित-निग्रह-विग्रहस्य ।
व्यग्रस्य राग-निचयोर्मि-निपीडितस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥९॥

"हा अत्यंत विशाल असा संसारसागर आणि त्यात राहणा-या कराल सुसरी-मगरी व अन्य हिंस्र प्राण्यांनी माझा निग्रह (मनाचा संयम, निश्चय) आणि देह (विग्रह) जणू गिळूनच टाकलेला आहे. मी या संसाराच्या भानगडीत एकदम व्यग्र होऊन गेलोय, पूर्णपणे गुंतलोय, गोंधळलोय. मला काहीच सुचेनासे झालेले आहे. या संसारसागरात (चित्तात) निर्माण होणा-या विविध विषयांच्या ऊर्मी व वासनारूप भयंकर लाटांच्या थपडांनी (निचयोर्मि-निपीडितस्य) मी बेजार झालो आहे. देवा नरहरीराया ! आता आपणच हात देऊन माझी या संसारसागरातून सुटका करा, माझा सांभाळ करा !"
संसार-सागर-निमज्जन-मुह्यमानं
दीनं विलोकय विभो करुणानिधे माम् ।
प्रल्हाद-खेद-परिहार-कृतावतार
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१०॥
"हे करुणानिधान भगवंता ! या गहन संसारसागरात मी सतत गटांगळ्या खातो आहे. जणू काही गटांगळ्या खाण्याचे ते एकमेव कामच मी पत्करले आहे, अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे मी अतिशय दीन अवस्थेला येऊन ठेपलेलो आहे.
हे दयासागरा ! आपण पूर्वी भक्तवर प्रल्हादांच्या अशाच भयावह दु:खांचा परिहार करण्यासाठी अवतार धारण केला होतात. तेव्हा आता माझ्याही या तीव्र संसारदु:खांचा आपणच नाश करावा. मला तरी आपल्याशिवाय अन्य कोणाचा आधार आहे ? आपण आता माझ्याकडेही तशाच दयादृष्टीने पाहून मला सौख्य प्रदान करावे, माझे संरक्षण करावे."
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंह अवतारकथेचा संदर्भ असणारे दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना.
नरहरी तो माझा - ५
(श्रीनृसिंह पुराणातील मार्कंडेय महामुनींच्या कथेचा पुढील संदर्भ व नृसिंहनामाचे माहात्म्य सांगणा-या यमगीतेचा भावार्थ.)
विदारूनि महास्तंभ.... - ५
(हिरण्यकश्यपूची पूर्वकथा व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी कथन केलेले श्रीनृसिंह अवताराचे गूढगहन आणि अभिनव योगार्थ-विवरण.)

https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post_25.html?m=1 )


13 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - ४

संसाररूपी महान विषारी नागाच्या चाव्याने व्याकूळ झालेला जीव भगवान श्रीनृसिंहांना कळवळून प्रार्थना करीत म्हणतो,
संसार-सर्प-विष-दिग्ध-महोग्र-तीव्र
दंष्ट्राग्र-कोटि-परिदष्ट-विनष्ट-मूर्ते: ।
नागारि-वाहन सुधाब्धिनिवास शौरे
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥७॥

"प्रभो नरहरीराया ! ह्या संसाररूपी महाभयंकर नागाने (महोग्र) मला दंश केला आहे. या नागाच्या विषाने भरलेल्या तीक्ष्ण व अणकुचीदार दाढा माझ्या शरीरात रोवल्या गेल्याने, मी अगदी गलितगात्र झालो आहे, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. माझ्या शरीरात आता कसलेही त्राणच उरलेले नाहीत. तेव्हा हे गरुडवाहना, अमृतोपम क्षीरसागरात निवास करणा-या देवाधिदेवा ! आपणच आता मला हात देऊन यातून बाहेर काढावे, माझे संरक्षण करावे."
श्रीमद् शंकराचार्य स्वामी महाराजांनी येथे फार महत्त्वाची व नेमकी अशी तीन विशेषणे वापरलेली आहेत. नागारि म्हणजे गरुड, ते ज्यांचे वाहन आहे, ते 'नागारिवाहन'. संसाररूपी नागाच्या विष-पीडेतून सोडवण्यासाठी त्या नागांचा शत्रू असणा-या गरुडाचाच ते येथे मुद्दाम उल्लेख करतात.
नागाच्या विषाने मरायला टेकलेल्या माणसावर अमृताचा शिडकावा झाला, तरच तो त्यातून नक्की वाचू शकेल. म्हणून ते येथे 'सुधाब्धिनिवास' हेच विशेषण वापरतात. अर्थात् अमृतमय क्षीरसागरात निवास करणा-या प्रभूंनाच अमृताची वृष्टी करण्याची ते प्रेमाने विनवणी करतात.
तसेच त्यांनी 'शौरी' हेही विशेषण वापरले आहे. शौरी म्हणजे शूर कुलात जन्मलेले, स्वभावाने शूर असणारे. शूर व्यक्ती शरण आलेल्याचा कधीच अव्हेर करीत नाही, हे जाणून माझाही तुम्ही अव्हेर करू शकत नाही, करू नये ; अशी विनवणी श्रीमद् आचार्य येथे करीत आहेत. अतिशय अचूक व यथार्थ शब्दयोजना करणे ही तर श्रीमद् शंकचार्यचरणांची खासियतच आहे !
संसाररूपी भयानक वृक्षाच्या भयाने कासावीस झालेला जीव भगवंतांची प्रार्थना करताना आठव्या श्लोकात म्हणतो,
संसारवृक्षमघबीजमनन्तकर्म-
शाखायुतं करण-पत्रमनङ्गपुष्पम् ।
आरुह्य दुःखफलिनं पततो दयालो
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥८॥

"हे दयालू नरहरीराया ! ह्या अतिशय जटिल व अडचणीच्या अशा संसारवृक्षावर मी अज्ञानाने चढलेलो आहे. नकळत फार वरपर्यंत गेलो आहे. यावरून मी आता पडू पाहात आहे, त्यामुळे आपणच कृपा करून मला हात देऊन सांभाळावे, माझे रक्षण करावे !"
श्रीमद् आचार्यांची शैली अत्यंत सुंदर आहे. ते कठीण तत्त्वज्ञानाचा विषय मनोहर रूपकांमधून अगदी सोपा करून आपल्या समोर मांडतात. त्यांच्या शैलीचे प्रसन्न दर्शन या श्लोकात आपल्याला होते.
हा संसारवृक्ष कसा आहे ? तर, अघबीज म्हणजे पाप हेच त्याचे बी आहे. पूर्वीच्या जन्मांमध्ये जी पाप-पुण्यकर्मे आम्ही केली, तीच या जन्माला (या जन्मांतील भोगांना ) कारणीभूत झालेली आहेत. म्हणून पाप हे याचे बीज आहे. या संसारवृक्षाला अनंत प्रकारच्या कर्मरूप शाखा आहेत. आपली इंद्रिये हीच त्याची पाने आहेत. कारण इंद्रियांच्याच माध्यमातून जीव कर्मांना प्रवृत्त होत असतो. काम हाच या संसारवृक्षाचा फुलोरा आहे. काम म्हणजे यच्चयावत् सर्व प्रकारच्या कामना. या कामना दिसायला फुलांसारख्या छान असल्या तरी शेवटी त्या दु:खदायकच ठरतात. त्यामुळे विविध प्रकारची दु:खे हीच या कामनारूप फुलांपासून बनलेली संसारवृक्षाची फळे आहेत. अशा या अत्यंत जटिल व भयंकर संसारवृक्षावर मी स्वत:च्या कर्मांनी चढून तर बसलोय, पण दयाळा नरहरीराया ! आता या संकटातून केवळ आपणच माझा उद्धार करू शकता. आपण जर हात दिला नाहीत, तर मी या संसारवृक्षावरून खाली पडून माझा कपाळमोक्ष ठरलेलाच आहे. तेव्हा दयेचे सागर असणा-या हे नरहरीराया, आता आपणच माझे संरक्षण करा !
अशा रचना पाहिल्या की जाणवते, भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज आणि भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हे फार फार विलक्षण असे शब्दप्रभूच आहेत. या दोन्ही महान अवतारांना केवळ मौनभावाने साष्टांग दंडवत घालणेच आपल्याला शक्य आहे आणि तेच आपले परमभाग्यही ठरावे !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंह अवतारकथेचा संदर्भ असणारे दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना.
नरहरी तो माझा - ४
(श्रीनृसिंह पुराणातील मार्कंडेय महामुनींची कथा.)
विदारूनि महास्तंभ.... - ४
(भगवद्भक्तीचे श्रेष्ठत्व व भक्तराज प्रल्हादांचे माहात्म्य.)

https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post_24.html?m=1


12 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - ३

संसार दु:खमूळच असल्याने, त्यात जन्माला आलोय म्हणजे आपल्या सर्वांना ते अटळ दु:ख सहन करावे लागणारच. त्या दु:खाने व्याकूळ झालेल्या जीवाची जीवघेणी व्यथा श्रीनरहरीरायांना सांगताना, श्रीमद् शंकराचार्य स्वामी महाराज स्तोत्राच्या पाचव्या चरणात म्हणतात,
संसारकूमपतिघोरमगाधमूलं
सम्प्राप्य दुःख-शत-सर्प-समाकुलस्य ।
दीनस्य देव कृपया पदमागतस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥५॥

"प्रभो नरहरीराया ! हा संसार एक भयंकर असा खोल कूप (लहान तोंडाची अतिशय खोल विहीर) आहे. याच्या तळाचा थांगच लागत नाही. दुर्दैवाने मी या कूपात पडलोय. चोहोबाजूंनी शेकडो विषारी सापांनी घेरावे, त्याप्रमाणे मला अनंत दु:खांनी वेढलेले आहे. या दु:खांमुळे अतिशय व्याकूळ होऊन आता हे दीनदयाळा, तुमच्याच चरणीं मी शरण आलेलो आहे. दीनांचे आपणच कैवारी आहात, तेव्हा आता मला हात देऊन माझी या संसारकूपातून सुटका करा, माझा उद्धार करा !"
संसार हा जणू मागे लागलेला पिसाळलेला हत्तीच आहे, अशा भावनेने प्रार्थना करणारा जीव म्हणतो,
संसार-भीकर-करीन्द्र-कराभिघात-
निष्पीड्यमान-वपुषः सकलार्तिनाश ।
प्राण-प्रयाण-भव-भीति-समाकुलस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥६॥

"हे भगवंता, श्रीनरहरीराया ! अतिशय खवळलेला, पिसाळलेला असा हा संसाररूपी मोठा हत्ती (करीन्द्र) माझ्यामागे लागलेला आहे. तो आपल्या सोंडेने पकडून मला सारखा आपटत आहे. त्याच्या आघातांनी माझे शरीर जर्जर झाले आहे, पिळवटून निघत आहे (निष्पीड्यमान-वपुष). त्यामुळे आता माझे प्राणही वाचतील की नाही हे सांगता येत नाही. देवाधिदेवा, आपण तर 'सकलार्तिनाश' आहात, म्हणजेच सर्वांच्या दु:खांचा समूळ नाश करणारे म्हणूनच प्रसिद्ध आहात. तेव्हा संसाररूपी हत्तीमुळे आर्त झालेल्या माझाही या भयानक दु:खातून आता आपणच उद्धार करा, मला आता हात देऊन आपणच सुखरूप बाहेर काढा."
कळवळून केलेली प्रत्येक प्रार्थना श्रीभगवंतांपर्यंत नक्कीच पोचते, म्हणूनच श्रीमद् शंकराचार्य स्वामी महाराज येथे भगवान श्रीनरहरीरायांची मनोभावे प्रार्थना करीत आहेत.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंह अवतारकथेचा संदर्भ असणारे दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना.
नरहरी तो माझा - ३
विदारूनि महास्तंभ.... - ३

https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post_23.html?m=1 )




11 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - २

राजराजेश्वर भगवान श्रीनृसिंहप्रभू हे सर्व देवांनाही पूज्य असून साक्षात् परब्रह्मच आहेत, हे सांगताना श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज करावलम्बन स्तोत्राच्या दुस-या श्लोकात म्हणतात,
ब्रह्मेन्द्र-रुद्र-मरुदर्क-किरीट-कोटि-
संघट्टिताङ्घ्रिकमलामल-कान्ति-कान्त ।
लक्ष्मीलसत्कुच-सरोरुह-राजहंस
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥२॥

"हे देवाधिदेवा ! जगत्पिता ब्रह्मदेव, महाकाल रुद्र, इंद्रादी देवता, मरुद्गण आणि सूर्यासारखे कोट्यवधी देवही सदैव आपल्या श्रीचरणीं मस्तक ठेवून आपल्याला प्रणाम करीत असतात. त्यावेळी त्यांच्या मस्तकांवरील मुकुटांची टोके आपल्या पदकमलांना घासली जातात. अर्थात् या प्रभावशाली देवताही आपल्यासमोर नतमस्तक होत असतात. आपल्या दिव्य देहाची कांती, म्हणजेच तेज हे अतिशय स्वच्छ व निर्दोष (अमल) आहे, ज्यामुळे आपण फारच मनोहर दिसत आहात. आपली अभिन्न शक्ती असलेल्या श्रीलक्ष्मीमातेच्या कमलाप्रमाणे शोभून दिसणा-या वक्ष:स्थलरूप सरोवरात आपण जणू ऐटदार राजहंसाप्रमाणे दिसत आहात.(अर्थात् आपण सदैव भगवती लक्ष्मीमातेच्या हृदयातच विराजमान असता.) अशा सर्वसामर्थ्यसंपन्न राजाधिराज श्रीलक्ष्मीनृसिंह प्रभो, आपण मला आपल्या हातांचा आधार द्यावा, माझे संरक्षण करावे !"
स्तोत्राच्या तिस-या श्लोकात, सभोवतीच्या भयंकर संसारतापाने पोळलेल्या व श्रीनृसिंहांना शरण आलेल्या जीवांचे प्रतिनिधी म्हणून श्री आचार्य श्रीनृसिंहप्रभूंना कळवळून प्रार्थना करताना म्हणतात,
संसारदावदहनाकुल-भीकरोरु-
ज्वालावलीभिरतिदग्धतनूरुहस्य ।
त्वत्पादपद्मसरसीं शरणागतस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥३॥

प्रभो नरहरीराया ! माझ्या अवतीभवती भडकलेला हा संसाररूप वणवा (संसारदाव) आणि चोहोबाजूंनी उठणा-या त्याच्या ज्वाला फार भयंकर आहेत. त्यांच्यामुळे माझ्या अंगावरील केसही जळून गेलेले आहेत. मी यात पुरता होरपळून निघत आहे. म्हणूनच आता या असह्य तापातून शांती व शीतलता मिळवण्यासाठी, मी आपल्याच श्रीचरणकमल रूपी सरोवराचा (पादपद्मसरसी) आश्रय आता घेतला आहे. मी आपल्याला सर्वभावे शरण आलेलो आहे, आता आपणच दयावंत होऊन मला आपल्या करकमलांचा आधार द्यावा, माझे या संसारतापातून रक्षण करावे."
गळाला लागलेल्या माशाप्रमाणे अपार वेदनांनी तडफडणा-या, संसाररूप गळाला लागलेल्या जीवरूप माशाचे करुण मनोगत व्यक्त करताना श्री आचार्य स्तोत्राच्या चौथ्या श्लोकात म्हणतात,
संसारजालपतितस्य जगन्निवास
सर्वेन्द्रियार्थबडिशाग्रझषोपमस्य ।
प्रोत्कम्पित-प्रचुर-तालुक-मस्तकस्य
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥४॥

"हे जगन्निवासा नरहरीराया ! आमिषाच्या लालसेने गळाला लागलेल्या माशाला, जसे त्या गळाच्या अणकुचीदार टोकाने (बडिश-अग्र) टाळू फाटल्यामुळे तीव्र वेदना होत असतात, तशाच या संसाररूप गळाला लागून टाळू फाटलेल्या माझ्यासारख्या जीवरूप माशाला (झषोपमस्य) अपार वेदनांचाच सतत अनुभव येत असतो. या संसाररूप जाळ्यात सापडलेल्या व त्यातील गळाच्या वेदनेने तडफडणा-या (प्रोत्कंपित) माझ्यासारख्या शरणागत जीवावर आपण आता दया करावी, त्याला आपल्या शुभद करकमलांचा आधार देऊन सुखी करावे, हीच कळकळीची प्रार्थना !"
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंह अवतारकथेचा संदर्भ असणारे दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना.
नरहरी तो माझा - २
विदारूनि महास्तंभ.... - २

https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post_28.html?m=1 )


10 May 2019

लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् - १

आज वैशाख शुद्ध षष्ठी, भक्तवत्सल भक्ताभिमानी परमकरुणामूर्ती भगवान श्रीनरहरीरायांच्या परमपावन नवरात्राचा प्रथम दिन. भगवान श्रीनृसिंहराज महाराजांच्या प्रतिवार्षिक गुणगायन सेवेचा आज शुभारंभ.
काल ज्यांची जयंती आपण साजरी केली ते अद्वैतज्ञानभास्कर भगवत्पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्रीनरहरीरायांचे निस्सीम भक्तराज होते. त्यांनी अतीव भावपूर्ण शब्दांमध्ये आपल्या या आराध्य दैवताचे विविध स्तोत्रे रचून गुणवर्णन केलेले आहे. यावर्षी नवरात्राच्या पर्वकालात आपण श्रीमदाचार्यांच्या 'श्रीलक्ष्मीनृसिंह करावलम्बन' स्तोत्राच्या माध्यमातून श्रीचरणीं सप्रेम तुलसी-पुष्पांजली समर्पू या !
कर्दळीवनातील दुष्ट कापालिकाने श्री आचार्यांचा बळी देऊन आपल्या दैवताची प्रसन्नता मिळवण्याचा हीन प्रयत्न केला. पण भक्ताभिमानी श्रीनृसिंह भगवंतांनी श्रीमद् पद्मपादाचार्यांच्या देहाचा आश्रय घेऊन त्या कापालिकाचाच वध केला. तेव्हापासून श्रीमद् शंकराचार्य स्वामी महाराजांना भगवान श्रीनृसिंहांबद्दल अत्यंत प्रेम वाटू लागले. देवांनी सदैव त्यांचा पितृवत् सांभाळ केला व श्रीमदाचार्यही त्यांच्याविषयी पुत्रवत् प्रेमानेच कायम कृतज्ञता बाळगून होते. त्यांच्या त्या स्वाभाविक प्रेमावेगाचे सुमधुर दृश्य रूप म्हणजेच श्री आचार्य रचित ही सर्व नृसिंह स्तोत्रे होय. श्रीलक्ष्मीनृसिंह करावलम्बन स्तोत्र हे त्या सर्व नृसिंहस्तोत्रांमधील अात्यंतिक अर्थगर्भ, भावमय, सुगेय व लालित्यपूर्ण असे स्तोत्र आहे. स्वत: श्रीमद् आचार्यांनाही हे स्तोत्र अतिशय आवडत असे व श्रीनृसिंहदेवांनाही त्यामुळेच हे स्तोत्र विशेष प्रिय आहे. या स्तोत्राच्या प्रेमभावे केलेल्या पठणाने भगवान श्रीनृसिंहाचा कृपाप्रसाद लाभतो व अतिशय दुर्मिळ अशी त्यांची प्रेमभक्ती देखील प्राप्त होते. तसा श्रीभगवंतांनी स्वत:च या स्तोत्राला प्रेमाशीर्वाद दिलेला आहे. म्हणूनच, यावर्षी श्रीनृसिंह जयंती नवरात्रात आपण या मधुरातिमधुर स्तोत्रातील श्लोकांचा यथामती विचार करू या व त्याद्वारे इवलासा का होईना पण आपलाही मोडका तोडका श्रद्धा-प्रेमभाव श्रीचरणीं समर्पून धन्य होऊ या ! स्तुतिप्रिय श्रीभगवंत आमच्या या लेकुरवाचेने होणा-या सेवापुष्पांना स्वीकारोत, हीच त्यांच्या अम्लान श्रीचरणीं कळकळीची प्रार्थना !
भगवत्पूज्यपाद श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या श्रीलक्ष्मीनृसिंह करावलम्बन स्तोत्राच्या पहिल्या चरणात म्हणतात,
श्रीमत्पयोनिधिनिकेतन चक्रपाणे
भोगीन्द्रभोगमणिराजित पुण्यमूर्ते ।
योगीश शाश्वत शरण्य भवाब्धिपोत
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१ ॥

"सर्व रत्नांच्या संपत्तीने, ऐश्वर्याने युक्त असा क्षीरसागर (पयोनिधी) ज्यांचे निवासस्थान (निकेतन) आहे, ज्यांनी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी हातात सुदर्शन चक्र धारण केलेले आहे, ज्यांची पुण्यकारक परम मंगलमय श्रीमूर्ती सर्व सर्पांचा राजा (भोगींद्र) अशा शेषनागाच्या उत्तम देहावर (भोगमणि) शोभून दिसते आहे, जे सर्व योग्यांचे ईश आहेत, या मर्त्य जगात केवळ जे एकच शाश्वत, अविनाशी असून, शरण आलेल्या भक्तांचा सर्व बाजूंनी सांभाळ करण्यात सदैव रत आहेत ; आणि जे भयंकर अशा भवसागरातून सहज पार जाण्यासाठी जणू जहाजच (भवाब्धिपोत) आहेत, अशा हे श्रीलक्ष्मीनृसिंह प्रभो ! आपण मला आपल्या हातांचा आधार द्या, माझा उद्धार करा !"
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(भगवान श्रीनरहरीरायांच्या नवरात्र महोत्सवात पूर्वी लिहिलेले श्रीनृसिंहचरित्र विषयक दोन लेख खालील लिंकवर आहेत. जिज्ञासूंनी तेही लेख आवर्जून वाचावेत ही प्रार्थना.
नरहरी तो माझा - १
विदारूनि महास्तंभ.... - १

https://rohanupalekar.blogspot.com/2018/04/blog-post.html?m=1 )

9 May 2019

भाष्यकाराते वाट पुसतू

प्रबोधदिनकरू प्रकटला
नमस्कार !
आज वैशाख शुद्ध पंचमी, श्रीमत् गोविन्दभगवत्पूज्यपादशिष्य भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांची आज जयंती !!
हिमालय कसा आहे हो ? उत्तुंग, अपरंपार, अमर्याद, अद्भुत, अलौकिक, भव्य-दिव्य, मनोहर, सुंदर, अप्रतिम, अवर्णनीय आणि बरेच काही आहे. थोडक्यात सांगायचे तर, हिमालय हिमालयासारखाच आहे ! आपल्या भारतभूमीचे महान भाग्य की, भगवद्इच्छेने असे असंख्य हिमालय या भूमीवर उत्पन्न झाले आणि पुढेही होत राहतील. या सर्वांच्या शीर्षस्थानी आहेत भगवान भाष्यकार श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराज !! म्हणूनच उत्तुंगतेलाही वर मान करून पाहावे लागेल अशा या महान ज्ञान-हिमालयाला जयंतीदिनी भावभरला साष्टांग दंडवत  !!
श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांचे नाव जरी घेतले तरी आपला ऊर अभिमानाने व प्रेमाने भरून येतो, यातच त्यांचे सर्वश्रेष्ठत्व सामावलेले आहे.
श्रीमद् आचार्यांची उपलब्ध ग्रंथसूची प्रचंड मोठी आहे. त्यात काही नंतरच्या आचार्यांचेही ग्रंथ नामसाधर्म्यामुळे गणले गेलेले आहेत. तरीही सर्व वाङ्मयाची संशोधित सूची करायची म्हटली तर एकूण १८८ रचना त्यात येतात. (अशी सूची चित्तडोहावरील आनंदलहरी या प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्या श्री आचार्य तत्त्वज्ञानावरील अप्रतिम ग्रंथाच्या परिशिष्टात दिलेली आहे.) एवढे प्रचंड वाङ्मय त्यांनी कृपापूर्वक रचलेले आहे. एक आयुष्य पुरणार नाही नुसते वाचायला आपल्याला, ते अभ्यासणे तर दूरच राहिले.
भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांना जगद्गुरु असे संबोधले जाते. कारण जगाचे गुरुपद भूषविण्यासाठीच श्रीभगवंत त्यांच्या रूपाने अवतीर्ण झाले. आचार्य अवताराचे हे रहस्य जाणूनच प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज आपल्या श्री शंकराचार्यांच्या आरतीत स्पष्ट म्हणतात, "...तं वासुदेवदंड्यहमत्रिजमिव वंदे ॥" "भगवान श्री आचार्यांना मी प्रत्यक्ष अत्रिज भगवान श्रीदत्तप्रभूंप्रमाणेच जगद्गुरु मानून वंदन करतो !"
श्री आचार्य हे जगद्गुरूच आहेत. म्हणून तर साक्षात् भगवंत देखील श्री माउलींच्या अवतारात प्रकटल्यावर भगवान भाष्यकारांना सप्रेम वंदन करतात, त्यांच्याच अद्वैत तत्त्वप्रणालीचे अनुसरण करतात. यातच त्यांचे जगद्गुरुत्व दिसून येते.
श्री आचार्यांचे तत्त्वज्ञान कठीण आहे  किंवा आमची बुद्धी तेवढी नाही म्हणून समजायला कठीण वाटते, हे एकवेळ मान्य. पण नित्यनियमाने श्री आचार्यांचे एखादे स्तोत्र तरी आपण नक्कीच म्हणू शकतो की. हेही नसे थोडके ! आजच्या पावन जयंतीदिनापासून आपण सर्वांनी त्यांचे एखादे स्तोत्र तरी नित्यनियमाने म्हणण्याचा निश्चय करून तो प्रेमाने निभावू या.
श्रीसंत एकनाथ महाराज भगवान श्री आचार्यांचे गुणगान गाताना म्हणतात,
वंदूं आचार्य शंकरू ।
जो कां ग्रंथार्थ विवेकचतुरू ।
सारूनि कर्मठतेचा विचारू।
प्रबोधदिनकरू प्रकाशिला ॥( ए.भा.१.११८)

"ज्यांच्या अलौकिक ज्ञानसंपन्न ग्रंथांनी जगात चातुर्य व विवेकाची प्रतिष्ठा केली आणि धर्माला कर्मठतेच्या शापातून मुक्त करून सर्वसामान्य जनांपर्यंत नेऊन सर्वत्र प्रबोधदिनकराचा, सुखमय ज्ञानसूर्याचा उदय करविला, त्या भगवान आचार्य श्री शंकरांना अनंतकोटी दंडवत प्रणाम असोत !"
प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या 'चित्तडोहावरील आनंदलहरी' ग्रंथात म्हणतात, "भगवत् पूज्यपाद श्रीमदाचार्य हे केवळ त्यांची 'जयंती' साजरी करण्याइतपतच मोठे होते असे नसून, ज्यांची स्मृती पिढ्यान् पिढ्यांनी अंत:करणात अखंडपणे सादर, सविनय जागती ठेवावी, एवढे ते स्थल-काल-मर्यादातीत श्रेष्ठ होते."
आजच्या पुण्यदिनी प्रकटलेल्या या अपरिमितप्रकाशमान, चिद्गगनभुवनदीप अद्वैतज्ञानभास्कराच्या श्रीचरणीं सादर दंडवत !!
श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं सप्रेम समर्पिलेली एक शब्द-पुष्पांजली खालील लिंकवर वाचता येईल.
भाष्यकाराते वाट पुसतू

7 May 2019

भगवान श्री परशुराम

भगवान श्री परशुराम
वैशाख शुद्ध तृतीयेला, म्हणजेच अक्षय्य तृतीयेला भगवान श्रीमहाविष्णूंच्या दशावतारातील सहावे अवतार, शिवावतार श्री जमदग्नी ऋषी व साक्षात् जगदंबा श्री रेणुकामातेचे सुपुत्र भगवान श्रीपरशुराम यांची जयंती असते. आपल्या राजधर्मापासून भ्रष्ट होऊन मनाला वाटेल तसे वागणा-या, प्रजेचे पुत्रवत् पालन न करणा-या उद्दाम क्षत्रियांचा वध करण्यासाठीच भगवंतांनी हा आवेश अवतार धारण केलेला होता. हा त्यांचा चिरंजीव अवतार आहे. त्यामुळे आजही भगवान श्रीपरशुराम तपस्येमध्ये मग्न आहेत.
आपल्या प्राचीन वाङ्मयाचा व धर्मशास्त्राचा अभ्यास नसलेले व उगीचच धर्माला नावे ठेवणारे दुष्ट लोक नेहमीच श्रीपरशुरामांवर विचित्र आक्षेप घेत असतात. पण हे लक्षात ठेवावे की, ते साक्षात् श्रीभगवंतांचेच अवतार आहेत व श्रीभगवंत कधीच कसलीही चूक करीत नसतात. त्यांची प्रत्येक लीला ही अत्यंत शुद्ध, निर्दोष व सदैव लोककल्याणकारीच असते. त्यामुळे आपण या भामट्यांच्या मूर्ख टीकेकडे साफ दुर्लक्ष करावे व मनापासून आपल्या ऋषिमुनींनी सांगितलेल्या प्रगल्भ धर्ममार्गाचे अनुसरण करीत राहावे. त्यातच शाश्वत हित आहे.
भगवान श्रीपरशुरामांच्या दिव्य चरित्रलीलेचे विवरण करणारा लेख खालील लिंकवर आहे. प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्या श्रीदत्तमाहात्म्य ग्रंथातील परशुराम चरित्रानुसार लिहिलेला प्रस्तुत लेख, आजच्या त्यांच्या जयंतीदिनी आवर्जून वाचून भगवान श्रीपरशुरामांचे चरित्र यथामूल समजून घ्यावे ही विनंती.
नमामि भार्गवं रामं रेणुकाचित्तनंदनम्
https://rohanupalekar.blogspot.com/2017/04/blog-post_28.html?m=1

अक्षय्यतृतीयेचा अमृतयोग

अक्षय्यतृतीया
आज वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय्यतृतीया !!
या तिथीला केलेली गोष्ट अक्षय्य होते, शाश्वत होते असे आपले धर्मशास्त्र सांगते. म्हणूनच आजच्या तिथीला मनापासून 'दान' करावे असे शास्त्रवचन आहे. अशा दानाने अक्षय्य पुण्य लाभते.
अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य जाणून आपण आपल्या संबंधित सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागायचाही प्रयत्न करायला हवा, म्हणजे तो विश्वबंधुत्वाचा भारतीय संस्कृतीचा विशेषही आपल्यासाठी अक्षय्य होईल. हेच आपल्या संतांनी स्वत: आचरून इतरांसाठी आदर्श म्हणून मांडलेले तत्त्व आहे.
अक्षय्य तृतीयेचे महत्त्व सांगणा-या माझ्या एका जुन्या लेखाची लिंक खाली देत आहे. तोही आवर्जून वाचावा ही विनंती. आपल्या ज्ञानी ऋषिमुनींनी अतीव विचारपूर्वक रचलेल्या सणांचे महत्त्व जाणून, त्यांनी कथन केल्यानुसार वर्तनही ठेवण्याचा आपण मनापासून प्रयत्न करायला हवा. यातच आपलेही अक्षय्य हित आहे !!
अक्षय्यतृतीयेचा अमृतयोग

3 May 2019

भावनारहित वेणी उरलीसे भजनी

आज चैत्र कृष्ण चतुर्दशी, सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांच्या स्वनामधन्य शिष्या सद्गुरु श्रीसंत वेणास्वामी यांची पुण्यतिथी. तसेच राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील अवलिया विभूतिमत्त्व श्रीसंत चिले महाराज यांचीही पुण्यतिथी !
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामींच्या परिपूर्णकृपेने अलौकिक योगानुभूती घेतलेल्या श्री वेणाबाई या फार विलक्षण विभूती होत्या. त्यांची अनन्य गुरुनिष्ठा आणि त्यामुळे लाभलेली उत्तुंग आत्मानुभूती ही खरोखर आश्चर्यचकित करणारीच आहे. श्री वेणास्वामींचे वाङ्मय वाचताना आपण मोहरून जातो. त्यांच्या जीवनात सद्गुरुकृपेचा संपन्न वसंतऋतू एवढा बहरलेला आहे की शब्दच नाहीत ते व्यक्त करायला. त्यांची प्रत्येक रचना अशाच विविधांगी अनुभवफुलो-याने सुगंधित झालेली आहे.
श्रीसद्गुरूंनी कृपापूर्वक दिलेल्या दिव्यनामाने चित्ताचे चैतन्य झाल्याची सुमधुर अनुभूती आपल्या सखीपाशी व्यक्त करताना श्रीसंत वेणाबाई म्हणतात,
काय सांगू साजणी । मनाची करणी ।
चालेना ठाईहूनी । पांगुळले॥१॥
दशलक्षणी घराचार । बिघडला साचार ।
वृत्तीचा विचार । खुंटोनी गेला ॥२॥
भ्रांती ना स्मरण । ना अहंकर्तेपण ।
देखणेपणाचे भान । मावळले ॥३॥
भावनारहित वेणी । उरलीसे भजनी ।
सहज समाधानी । आहे आठवेवीण॥४॥

"अगं साजणी, काय सांगू तुला माझ्या श्रीसद्गुरुरायांची करणी ! त्यांनी माझ्या मनाचा (अंत:करणचतुष्टयाचा) असा वेध केला की ते ठायीच्या ठायीच पांगुळले आहे. त्याचे काहीच चालेनासे झाले आहे. जे मन पाच कर्मेंद्रिये व पाच ज्ञानेंद्रिये अशा दहा मार्गांनी सतत क्रियाशील असते, तो त्याचा दशलक्षणी घराचार, म्हणजे त्याचा संसारच आता उठला आहे. त्यामुळे मनाच्या माध्यमातून बहिर्मुख होणा-या माझ्या सर्व वृत्ती देखील आता खुंटलेल्या आहेत, त्या पूर्णपणे आत वळलेल्या आहेत. (वृत्तींची निवृत्ती झालेली आहे.)
माझ्या सतत स्फुरणा-या अहंभावाचा व त्यामुळे भासणा-या प्रपंचभानाचाही लोप झालेला आहे. आता ना मला कसली जगद्भ्रांती आहे ना कसले स्मरण शिल्लक आहे. मी काही पाहते आहे किंवा जाणते आहे, असेही भान आता उरलेले नाही. माझी सर्व इंद्रिये निर्व्यापार झालेली आहेत. केवळ स्पंदरहित, विकाररहित, विचाररहित अशी उरलेली शुद्ध जाणीव, ते आत्मज्ञानही आता त्या ब्रह्मानंदामध्ये पूर्णपणे लोप पावलेले आहे. 'अहं ब्रह्मास्मि'चे स्फुरणही त्या आनंदानुभूतीमध्ये लोपलेले आहे.
कोणत्याही स्थूल भावना, मायामय प्रपंचाचे भान आणि अंत:करण चतुष्टयाने जाणली जाणारी कसलीच भावना आता या वेणी मध्ये उरलेली नाही. स्वत:च्या वेगळेपणाने होणा-या आठवाशिवाय ही वेणी, सद्गुरुकृपेने आतूनच लाभलेल्या सहज समाधिस्थितीमध्ये, त्या अद्वैतानंदामध्ये आपोआप होणा-या गुरुभजनासाठी मात्र सदैव तत्पर होऊन राहिलेली आहे !"
किती अद्भुत आणि बोलाबुद्धीच्या पलीकडची उत्तुंग योगानुभूती येथे वेणाबाई अगदी सहजतेने कथन करतात पाहा ! ह्यावरून आपल्या लक्षात येईल की समर्थकृपेने श्रीसंत वेणाबाई आत्मानुभूतीच्या केवढ्या मोठ्या सिंहासनावर जाऊन बसलेल्या होत्या. त्यांच्या परमगुरुभक्तियुक्त भावोत्कट विभूतिमत्त्वाला म्हणूनच साश्रुनयनांनी वारंवार साष्टांग दंडवतच घालावेत ; आणि तेच आपल्यासाठी परमभाग्य ठरावे !
तुम्हां-आम्हां साधकांसाठी सदैव मार्गदर्शक असणा-या श्रीसंत वेणाबाईंच्या दिव्यपावन चरित्रावर पूर्वी घडलेले अल्पसे चिंतन खालील लिंकवरील लेखात मांडलेले आहे. आजच्या या पुण्यदिनी तो लेखही आवर्जून वाचावा व श्री समर्थांच्या या मानसकन्येच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक असंख्य दंडवत घालावेत हीच सर्वांना मन:पूर्वक प्रार्थना !
वेणा पावली पूर्णविराम
https://rohanupalekar.blogspot.com/2017/04/blog-post_72.html?m=1

2 May 2019

हम गया नही जिंदा है

नमस्कार  !!
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामीसमर्थ महाराजांची आज १४१ वी पुण्यतिथी आहे. आजच्याच तिथीला, शके १८०० मधील चैत्र कृष्ण त्रयोदशी युक्त चतुर्दशीला त्यांनी अक्कलकोटी समाधिलीला केली होती.
राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराज हे गुरूणां गुरु: । आहेत. त्यांच्याच अनंत कृपापरंपरा आजही कार्यरत आहेत.
श्रीस्वामी महाराजच अनेक रुजलेल्या पारंब्यांचा महान वटवृक्ष आहेत. तेच वटपत्रशयनी भगवान श्रीबालमुकुंदही आहेत आणि तेच औदुंबरतळी विसावलेले मूळ श्रीदत्तब्रह्मही आहेत ! त्यांच्यात आणि परब्रह्मात काहीच भेद नाही, तेच हे आणि हेच ते !!
लीलावतारी श्रीस्वामीगुरूंनी समाधी घेण्याचीही लीलाच साकारलेली आहे. ज्यांना जन्मच नाही त्यांना निर्वाण कसे बरे असणार ? जे सर्वव्यापी आहेत त्यांचे आगमन-निर्गमन कसे संभवणार ? निरंतराला जिथे 'आदी'च नाही, तिथे 'अंत' तरी कोठून असणार ? म्हणूनच तर ते 'निरंतर' म्हटले जातात. निराकाराचा आकार साकारला काय आणि तो साकारलेला आकार पुन्हा निराकाराशी एकरूप झाला काय ? प्रत्यक्षात घडले काहीच नाही ना ! हेच निरंतरदयासिंधू श्रीस्वामीमाउलींच्या समाधिलीलेबद्दलही म्हणता येईल. जग निर्माण व्हायच्या आधीही ते होते व जगाच्या अंतानंतरही तेच एकमात्र उरणार आहेत, कारण तेच शाश्वत परब्रह्म आहेत !!
पुण्यतिथी म्हणा नाहीतर समाधिदिन म्हणा, त्या अफूट, अव्यक्त, अपरंपार अमर्याद, अद्वितीय आणि अलौकिक अशा श्रीस्वामीब्रह्माला काहीच वेगळेपण, उणेपण येणार नाहीये. हा तर केवळ तुम्हां आम्हां भक्तांसाठी असलेला श्रीस्वामीगुरूंच्या सादर भावपूर्ण स्मरणाचाच पुण्यदिन आहे. म्हणून आपण सर्वांनी त्यांचे मनोभावे स्मरण करू या आणि परमानंदाची अनुभूती घेऊ या !
श्रीस्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटी साकारलेल्या अपूर्व समाधिलीलेचे अल्पसे चिंतन खालील लिंकवरील लेखात मांडलेले आहे. त्याचा सप्रेम आस्वाद घेऊन "श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ " या नामगजरात कृपया श्रीस्वामीचरणी भावपुष्पांजली समर्पावी ही विनंती !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
हम गया नही जिंदा है

http://rohanupalekar.blogspot.com/2017/04/blog-post_24.html