2 May 2019

हम गया नही जिंदा है

नमस्कार  !!
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामीसमर्थ महाराजांची आज १४१ वी पुण्यतिथी आहे. आजच्याच तिथीला, शके १८०० मधील चैत्र कृष्ण त्रयोदशी युक्त चतुर्दशीला त्यांनी अक्कलकोटी समाधिलीला केली होती.
राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराज हे गुरूणां गुरु: । आहेत. त्यांच्याच अनंत कृपापरंपरा आजही कार्यरत आहेत.
श्रीस्वामी महाराजच अनेक रुजलेल्या पारंब्यांचा महान वटवृक्ष आहेत. तेच वटपत्रशयनी भगवान श्रीबालमुकुंदही आहेत आणि तेच औदुंबरतळी विसावलेले मूळ श्रीदत्तब्रह्मही आहेत ! त्यांच्यात आणि परब्रह्मात काहीच भेद नाही, तेच हे आणि हेच ते !!
लीलावतारी श्रीस्वामीगुरूंनी समाधी घेण्याचीही लीलाच साकारलेली आहे. ज्यांना जन्मच नाही त्यांना निर्वाण कसे बरे असणार ? जे सर्वव्यापी आहेत त्यांचे आगमन-निर्गमन कसे संभवणार ? निरंतराला जिथे 'आदी'च नाही, तिथे 'अंत' तरी कोठून असणार ? म्हणूनच तर ते 'निरंतर' म्हटले जातात. निराकाराचा आकार साकारला काय आणि तो साकारलेला आकार पुन्हा निराकाराशी एकरूप झाला काय ? प्रत्यक्षात घडले काहीच नाही ना ! हेच निरंतरदयासिंधू श्रीस्वामीमाउलींच्या समाधिलीलेबद्दलही म्हणता येईल. जग निर्माण व्हायच्या आधीही ते होते व जगाच्या अंतानंतरही तेच एकमात्र उरणार आहेत, कारण तेच शाश्वत परब्रह्म आहेत !!
पुण्यतिथी म्हणा नाहीतर समाधिदिन म्हणा, त्या अफूट, अव्यक्त, अपरंपार अमर्याद, अद्वितीय आणि अलौकिक अशा श्रीस्वामीब्रह्माला काहीच वेगळेपण, उणेपण येणार नाहीये. हा तर केवळ तुम्हां आम्हां भक्तांसाठी असलेला श्रीस्वामीगुरूंच्या सादर भावपूर्ण स्मरणाचाच पुण्यदिन आहे. म्हणून आपण सर्वांनी त्यांचे मनोभावे स्मरण करू या आणि परमानंदाची अनुभूती घेऊ या !
श्रीस्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटी साकारलेल्या अपूर्व समाधिलीलेचे अल्पसे चिंतन खालील लिंकवरील लेखात मांडलेले आहे. त्याचा सप्रेम आस्वाद घेऊन "श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ " या नामगजरात कृपया श्रीस्वामीचरणी भावपुष्पांजली समर्पावी ही विनंती !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
हम गया नही जिंदा है

http://rohanupalekar.blogspot.com/2017/04/blog-post_24.html

0 comments:

Post a Comment