12 Nov 2019

त्रिपुरान्तकाय नम: शिवाय

नमस्कार !!
आज त्रिपुरारि पौर्णिमा !
भगवान श्रीशिवांनी आजच्याच दिवशी अत्यंत मायावी अशा त्रिपुरासुराचा अनोख्या पद्धतीने वध केला होता. म्हणून आजच्या पौर्णिमेला 'त्रिपुरारि पौर्णिमा' असे नाव पडले.
या त्रिपुरासुराला भगवान ब्रह्मदेवांनी वर देऊन तीन नगरे प्रदान केली होती. ही नगरे स्वयंपूर्ण तर होतीच पण मायावी सुद्धा होती. ती कोणताही आकार घेऊ शकत, अदृश्य होत, आकाशातही उडू शकत असत. लोखंड, तांबे व सोन्याची ती तीन पुरे त्याच्या मालकीची असल्यामुळेच त्याला 'त्रिपुरासुर' हे नाव पडले. तो त्यांच्या बळावर अत्यंत माजला होता. मुळातच तो राक्षस असल्याने अहंकारी, विकृत तसेच दुष्टही होताच. त्याने साऱ्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग मात्र भगवान श्रीशिवांनी अत्यंत क्रोधाविष्ट होऊन विलक्षण सामग्री वापरून त्याचा वध केला.
त्यासाठी भगवान श्रीशिवशंकरांनी पृथ्वीचा रथ केला, त्याला सूर्य चंद्रांची दोन चाके होती.  भगवान ब्रह्मदेव त्याचे सारथी झाले. मेरू पर्वताचे धनुष्य व साक्षात् भगवान श्रीविष्णूंचा बाण केला व त्या एकाच बाणात तिन्ही नगरांसह त्रिपुरासुराचा वध केला. कारण एकाच बाणात ही तिन्ही पुरे नष्ट करावी लागतील असाच वर त्याने मिळवलेला होता.
तेव्हापासून त्रिपुरी पौर्णिमेला शिवपूजन करतात व शिवमंदिरात साडेसातशे त्रिपुरवाती लावून उपासना करतात. अनेक ठिकाणी या आनंदाप्रीत्यर्थ दीपोत्सवही साजरा केला जातो.
त्रिपुरीचा दीपोत्सव नुसता पाहिल्यानेही पाप नष्ट होऊन विशेष पुण्य लाभते असे म्हणतात. कांचीचे परमाचार्य श्रीमद् जगद्गुरु श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या प्रवचनात सांगितले आहे की, "आजचा त्रिपुरी दीपोत्सव ज्यांच्या ज्यांच्या दृष्टीस पडतो, त्या त्या कृमी-कीटक-प्राणी-पक्षी-वनस्पती व मनुष्यादी सर्व जीवांचे पाप नष्ट होते असे शास्त्र आहे." म्हणून आज आपणही आवर्जून श्रीभगवंतांसमोर यथाशक्य दीप लावून त्या दीपोत्सवाचे दर्शन घ्यावे किंवा मंदिरात जिथे कुठे दीपोत्सव असेल तिथे आवर्जून जाऊन ते नयनरम्य दर्शन घ्यावे ही विनंती.
( http://rohanupalekar.blogspot.in )
श्रीगुरुचरित्राच्या त्रेचाळिसाव्या अध्यायात भक्तराज तंतुकांची कथा आलेली आहे. त्यात श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचे माहात्म्य सांगताना भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज विमर्षण राजाची कथा सांगतात. एक कुत्रा शिवरात्रीच्या दिवशी पंपानगरीतील शिवमंदिरात उपाशी पोटी तीन प्रदक्षिणा घालतो, तेथे उजळलेली दीपमाळ पाहतो व शिवद्वारी प्राणत्यागही करतो. त्या पुण्याईने पुढच्या जन्मी तो कुत्रा शिवभक्त विमर्षण राजा होतो. म्हणजे दीपोत्सवाच्या दर्शनाचेही असे प्रचंड पुण्य प्राप्त होत असते.
आजच्याच तिथीला, भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे धाकटे बंधू व शिष्य सद्गुरु श्री सोपानदेव महाराज, शिख संप्रदायाचे प्रणेते श्रीगुरु नानकदेव महाराज, निम्बार्कमताचे प्रणेते श्रीमत् न्निम्बार्क महामुनींद्र  आणि राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे प्रशिष्य व श्री बीडकर महाराजांचे थोर शिष्योत्तम, प.पू.श्री.रावसाहेब महाराज सहस्रबुद्धे या चार महात्म्यांची जयंती असते. आज श्रीगुरु नानकदेव महाराजांची ५५० वी जयंती आहे.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी या त्रिपुरी पौर्णिमेच्या संदर्भातले एक छान रूपक योजलेले आहे. श्री ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायाच्या श्रीगुरुनमनात ते म्हणतात,
*त्रिगुणत्रिपुरीं वेढिला ।*
*जीवत्वदुर्गीं आडिला ।*
*तो आत्मशंभूनें सोडविला ।*
*तुझिया स्मृती ॥ ज्ञाने.१७.०.२॥*
"हे सद्गुरुभगवंता, आपले माहात्म्य काय वर्णन करावे ? सत्त्व, रज व तम या तीन गुणरूपी पुरांनी वेढल्यामुळे जीवत्वरूपी किल्ल्यात अडकलेल्या व त्या भ्रमामुळे स्वत:ला अपूर्ण मानणाऱ्या श्रीशिवांच्या अंशावर (जीवावर) तुम्ही श्रीसद्गुरुरूपाने जेव्हा कृपा करता, तेव्हाच तो जीव त्या त्रिगुणरूपी त्रिपुरासुराच्या वेढ्यातून मुक्त होऊन आपला मूळचा आत्मानंद पुन्हा उपभोगू लागतो !" अत्यंत दुर्लभ अशी श्रीसद्गुरुकृपा झाल्यानंतरच जीवाचे अज्ञानादी सर्व दोष जाऊन मूळचे शिवस्वरूप पुन्हा प्रकट होते, असे या त्रिपुरासुर कथेच्या रूपकातून श्री माउली स्पष्ट सांगत आहेत.
आजच्या या कथेच्या प्रसंगाचे हुबेहूब दर्शन खालील अप्रतिम शिल्पचित्रामधून होत आहे !
*लेखक - रोहन विजय उपळेकर*
*भ्रमणभाष - 8888904481*