31 Mar 2018

श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये

आज चैत्र पौर्णिमा. बुद्धिमंतांमध्येही श्रेष्ठ असणा-या, महाबलवान व महापराक्रमी असूनही स्वत:ला आपल्या स्वामींचा, प्रभू श्रीरामांचा तुच्छ दास म्हणविण्यात धन्यता मानणा-या, प्रत्यक्ष महारुद्रावतार भगवान श्रीहनुमंतरायांची जयंती  !!
चैत्र पौर्णिमेच्या मनोहर प्रभाती, सूर्योदयाला चित्रा नक्षत्रावर अंजनी मातेच्या पोटी नुकताच त्यांचा जन्म झालेला आहे. रघुकुलभूषण दशरथ राजांनी केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञातला कैकयीचा जो यज्ञचरू घारीने पळवून नेला होता, तो अंजनीमातेच्या ओंजळीत तिने टाकला व त्याच्या भक्षणाने मारुतिरायांचा गर्भ राहिला, असे संत नामदेवराय आपल्या अभंगात सांगतात. म्हणजे भगवान श्रीरामरायांच्या अवतारातील श्रीराम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न या चतुर्व्यूहातच मारुतिरायांचाही समावेश होऊन, हा पंचव्यूह तयार होतो. हे पाचही अवतार परब्रह्मस्वरूपच आहेत.
श्रीमारुतिरायांचे मंदिर नाही असे एकही गाव संपूर्ण भारतात शोधून सापडणार नाही. श्रीमारुतिराय हे हरिभक्तांचे रक्षक म्हणून तर सुप्रसिद्धच आहेत. त्याचवेळी ते भूतप्रेतपिशाचादी गणांपासूनही भक्तांचे संरक्षण करतात. त्यांचे स्मरण केले असता नक्कीच इष्ट कार्यसिद्धी होते. म्हणून ते नित्यवंदनीय आहेत. यासाठीच समर्थ श्री रामदास स्वामी महाराज आपल्याला प्रेमाने उपदेश करतात,
नांव मारुतीचें घ्यावें ।
पुढें पाऊल टाकावें ॥१॥
अवघा मुहूर्त शकुन ।
हृदयीं मारुतीचें ध्यान ॥२॥
दास म्हणे ऐसें करा ।
सदा मारुती हृदयीं धरा ॥५॥
श्रीमारुतिराय म्हणजे मूर्तिमंत दास्यभक्ती ! आपले संपूर्ण सामर्थ्य, आपल्या सर्व शक्ती ते परमप्रिय प्रभूंच्या सेवेसाठीच बाळगून आहेत. दैत्यांच्या ठिकाणी सुद्धा शक्ती असते, अमाप बळ असते, परंतु त्या बळाला क्रौर्याची व अहंकाराची जोड असते. त्यामुळे ते बळ भगवत्कृपेला प्राप्त होत नाही. म्हणूनच ते बळ स्तुत्य नसून निंद्यच मानले जाते. याउलट हनुमंतराय हे अपरिमित बळ असूनसुद्धा स्वत:ला भगवंतांचे दास म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. त्यामुळेच त्यांच्यावर श्रीभगवंतांची निरंतर कृपा असून ते भक्तिमार्गात सुद्धा श्रेष्ठत्वाला पावलेले महावीर आहेत. त्यासाठीच ते चिरंजीव देखील झालेले आहेत. समर्थ म्हणूनच त्यांची स्तुती करताना, *"जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥"* असे म्हणतात.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, *"अहंकार हा परमार्थमार्गातील सर्वात मोठा शत्रू आहे. भगवंतांचे परिपूर्ण प्रेम साधावयाचे असेल तर साधकाचा अहंकार प्रथम समूळ जायला हवा आणि तो तसा जाण्यासाठी त्याने स्वत:ला कमी दर्जाचे, तुच्छ, क्षुद्र मानले पाहिजे. जे नुसतीच ग्रंथांची पोपटपंची करतात त्यांची अशी समजूत असते की, 'दास्यभक्ती मुळे साधक दुबळा आणि पराधीन होतो !' शिवाय; कोणाचीही गुलामगिरी का व कशासाठी करायची ? असाही किंतु त्यांच्या मनात असतो. त्यांच्या या समजुतीचा अर्थ परमार्थात: एवढाच असतो की, त्यांनी खरे तत्त्वज्ञान समजूनच घेतलेले नाही."*
'दास्य' या शब्दाचा व्यावहारिक अर्थ आपण हनुमंतरायांच्या दास्यभक्तीला लावू नये. तर परमार्थमार्गात दास्य म्हणजे आपला अहंकार उत्तरोत्तर कमी करीत जाणे, असा आहे. हे सद्भाग्याने लाभणारे दास्यच अंतिमत: परमार्थाची चरम अनुभूती देत असते.
श्रीमारुतिरायांच्या या अलौकिक दास्यभावाची, प्रभू श्रीरामांवरील उत्कट प्रेमाची व त्यांच्या जगावेगळ्या बुद्धिचातुर्याची एक अद्भुत कथा प.पू.श्री.शिरीषदादा सांगतात. "एके दिवशी भरत आणि शत्रुघ्न विचार करतात, 'हनुमंतराय देवांपुढे सतत उभे असतात, देवांची सर्व कामे करायला सदैव तत्पर राहतात. यावरही कडी म्हणून की काय, देवांनी स्वमुखाने काही सांगण्याआधीच त्यांची इच्छा जाणून ती ते पूर्ण करण्यास प्रयत्नशील असतात. त्यामुळे आम्हाला देवांची सेवा करावयाची संधीच मिळत नाही.' म्हणून एक दिवशी श्रीहनुमंतराय स्नानादी कर्मांसाठी शरयू नदीवर गेले असता ही संधी साधून भरत आणि शत्रुघ्न या दोघांनी देवांच्या सेवेला कोणत्या गोष्टी लागतील, कोणती सेवा कोणत्या वेळेत व्हायला हवी?  अशी यादी तयार केली आणि ती यादी श्रीरामरायांपुढे सादर करून त्यांची अनुमती मिळवली. इकडे हनुमंतराय स्नान आटोपून प्रभूंना पूजेसाठी फुले आणावयास जाणार इतक्यात तेथे भरत आणि शत्रुघ्नाचे आगमन झाले. ते म्हणाले की, ”आतापासून देवांची सेवा करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे, तेव्हा तुम्ही आजपासून रजा घ्यावी." असे म्हणून स्वत: श्रीरामप्रभूंची त्या सेवायादीला असलेली संमती त्यांनी हनुमंतांना दाखवली. हनुमंतराय ती यादी काळजीपूर्वक वाचून त्यांना म्हणाले, "यामध्ये एक सेवा अनुल्लेखित आहे, ती सेवा करण्याची परवानगी मला द्यावी." कोणती सेवा ? अशी विचारणा झाल्यावर, ”भगवंतांना जेव्हा जेव्हा जांभई येईल तेव्हा तेव्हा चुटकी वाजवण्याची सेवा माझ्याकडे द्यावी", असे ते म्हणाले. आता भगवंतांचा देह दिव्य असल्याने त्यांना काही सतत जांभई येणार नाही, असा विचार करून त्यांनी या सेवेला होकार भरला. आता मात्र ' बुद्धिमतां वरिष्ठं ' असे मारुतिराय भगवंतांना केव्हाही जांभई येऊ शकते, म्हणून सदासर्वकाळ त्यांच्यासोबतच असत. त्यामुळे त्यांचे अनुसंधान अबाधित राहिलेले होते. उलट ते आता दिवसभर विनाखंड देवांचे मनोहर रूप डोळ्यांनी सतत पाहू शकत होते. मात्र रात्रीच्या वेळी प्रभू अंत:पुरात जात असताना हनुमंतांना तिथे मात्र प्रवेश दिला गेला नाही. ते खिन्न होऊन महालाच्या बाहेर एके ठिकाणी जाऊन बसले. यांच्या मनात आले की, आता जर प्रभूंना जांभई आली तर आपल्याला कसे कळणार? असा विचार येताच आपली सेवा खंडित होईल या भीतीने त्यांनी सारखी चुटकी वाजवण्यास सुरुवात केली.
इकडे अंत:पुरात मात्र वेगळाच प्रकार घडत होता. बाहेर हनुमंत जसजश्या चुटक्या वाजवत होते तसतश्या प्रभू श्रीरामांना काहीच कारण नसताता अचानक जांभयांवर जांभया येऊ लागल्या. हे पाहून श्रीसीतामाई घाबरून गेल्या, राजवैद्यांना पाचारण केले. त्यांनाही हा प्रकार कळेना. प्रभू तर एकामागून एक जांभयाच देत असल्याने त्यांनाही काही बोलता येईना. भरत शत्रुघ्नाला सुद्धा काय होते आहे हेच कळेना. अखेर कुलगुरु श्री वसिष्ठांना बोलावणे धाडले. त्यांनी काय तो प्रकार जाणून घेऊन, हनुमंतराय कुठे आहेत, असे विचारले. तेच सातत्याने चुटक्या वाजवत राहिल्याने प्रभू रामांच्या जांभया थांबत नाहीत, हे वसिष्ठांच्या नेमके लक्षात आले होते. त्यांनी हनुमंतांना निरोप पाठवला व प्रभू श्रीरामांनी बोलावल्याचे सांगितले. मारुतिरायांना प्रचंड आनंद झाला व ते तत्काळ श्रीरामप्रभूंच्या समोर उभे ठाकले. त्यासरशी त्यांची चुटकी थांबली व पर्यायाने देवांची जांभई देखील थांबली. या अनोख्या लीलेद्वारे श्रीरामरायांनी आपल्या या अनन्यदासाच्या थोर भक्तीचा सर्वांना परिचय करवून दिला. भरत शत्रुघ्नांनीही श्रीहनुमंतांचा दास्यभक्तीचा अधिकार नम्रपणे कबूल केला आणि त्यांना पुनश्च सर्व सेवा सोपवल्या. अशाप्रकारे परम बुद्धिमान श्रीमारुतिरायांनी आपली स्वामीसेवा अबाधित राखून अखंड अनुसंधानही त्यातच बरोबर साधले."
श्रीमारुतिराय हे बल-बुद्धीचे थोर आदर्श आहेत. सामान्यत: बळ व बुद्धी एकत्र नांदत नाहीत, असे म्हटले जाते. पण श्रीहनुमंतराय हे या दोन्हींच्या पूर्ण प्रभावाने झालेल्या अद्भुत संगमाचे विशेष उदाहरण आहेत. शिवाय बळरूपी गंगा व बुद्धीरूपी यमुनेच्या जोडीने हरिभक्तीरूपी गुप्त सरस्वतीचाही अपूर्व त्रिवेणी संगम श्रीमारुतिरायांच्या ठायी झालेला दिसून येतो. म्हणूनच स्वामीभक्तीचेही ते चिरंतन प्रतीक आहेत. आपण आजच्या त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून, बलोपासनेचे व सुबुद्धीयुक्त सद्गुरुसेवेचे प्रयत्नपूर्वक अवलंबन करून आपल्या जीवनाचे सार्थक करून घेऊ या. असे जर आपण मनापासून करू लागलो, तरच आपण खरी हनुमान जयंती साजरी केली असे म्हणता येईल व यातच दासोत्तम श्रीमारुतिरायांचीही प्रसन्नता आपल्याला प्राप्त होईल !!
श्रीमारुतिराय हे भक्तिशास्त्राचे महान आचार्य आहेत. ते दास्यभक्तीचा परमादर्श तर आहेतच, पण एकूणच भक्तिमार्गी साधकांचे थोर मार्गदर्शकही आहेत. पूर्वीच्या काळी कीर्तनभक्तीच्या तीन परंपरा प्रचलित होत्या. एक व्यासपरंपरा, म्हणजे आजची प्रवचनाची पद्धत. दुसरी नारदीय परंपरा म्हणजे उभे राहून करायची कीर्तनाची पद्धत. आणि तिसरी हनुमदीय परंपरा. ही आज प्रचलित नसलेली परंपरा श्री हनुमंतांनीच प्रवर्तित केलेली भक्तिपरंपरा आहे. यामध्ये नाचून, गाऊन, उड्या मारून, भगवन्नामाचे संकीर्तन करीत भक्तीचा उदंड आनंद अनुभवला जात असे. श्री समर्थ रामदास स्वामी 'हरिकथेचा उदंड कल्लोळ करावा' असे जे म्हणतात, ते हेच हनुमदीय भजन होय. पण आता ही परंपरा लुप्तप्राय आहे. भगवान श्री मारुतिराय अशा प्रकारे भक्तिशास्त्रातील अनेक गोष्टींचे आद्य प्रवर्तकच आहेत.
एकदा भगवान श्रीरामरायांनी मारुतिरायांना विचारले, "सांग बरे, तू कोण आहेस? तुझा आणि माझा काय संबंध आहे?" त्यावर हे महाबुद्धिमान रामदास उत्तरले,
देहबुद्ध्या तु दासोऽहं जीवबुद्ध्या त्वदंशक : ।
आत्मबुद्ध्या त्वमेवाहं इति मे निश्चिता मति: ॥
"हे भगवंता, देहाच्या भूमिकेने पाहाल तर मी आपला अनन्यदास आहे. जीवाच्या दृष्टीने बघितले तर मी तुमचाच अंश आहे आणि आत्मस्वरूपाच्या भूमिकेने पाहिले तर मी आपल्याशी एकरूपच आहे, तुम्ही आणि मी एकच स्वरूप आहोत." आपल्या दासोत्तमाची ही विलक्षण अनुभूती पाहून भगवान श्रीरामराय अत्यंत प्रसन्न झाले.
आजच्या तिथीचा अजून एक फार विलक्षण संदर्भ म्हणजे, आजच छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असते. प्रत्यक्ष मारुतिरायांचे अवतार असणा-या आपल्या सद्गुरूंच्या, श्री रामदास स्वामींच्या आराध्य दैवताची व मूळ स्वरूपाची जयंतीच शिवरायांनी देहत्यागासाठी निवडावी, हा योगायोग अजिबात नव्हे. समर्थकृपेने शिवराय परिपूर्ण संतत्वाला पोचलेले होते व त्यांनी श्रीमारुतिरायांच्याच दास्यभक्तीचा आदर्श समोर ठेवून श्रींचे राज्य चालविले होते. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणत, *"श्री ज्ञानेश्वर महाराज हे संतांचे राजे तर शिवाजी महाराज हे राजांमधले संत होते !"* खरोखर शिवरायांनी आपले संतत्व व प्रगाढ गुरुभक्तीच, हनुमान जयंतीला देह ठेवून न बोलता आपल्याला दाखवून दिलेली आहे. या महान विभूतीच्या चरणी पुण्यतिथी निमित्त सादर वंदन !
भगवान श्री मारुतिरायांची सप्रेम प्रार्थना करताना श्रीसंत तुकोबाराय म्हणतात,
शरण शरण हनुमंता ।
तुज आलो रामदूता ॥१॥
काय भक्तीच्या वाटा ।
मज दावाव्या सुभटा ॥२॥
शूर आणि धीर ।
स्वामीकाजी बळिया वीर ॥३॥
तुका म्हणे रुद्रा ।
अंजनीचिया कुमरा ॥४॥
"हे अंजनीसुत रामदूता, मी आपल्याला शरण आहे. आपण महाशूरवीर व धैर्यवान आहात. आपण स्वामींच्या सेवाकार्यामध्ये सदैव रममाण असता. मोठ्या आदराने, प्रेमाने व तत्परतेनेे आपण अखंड स्वामीकार्यात मग्न असता. हे महारुद्रा, मी आपल्या चरणी नम्रभावे प्रार्थना करतो की, भक्तीच्या ज्या सामान्य माणसांच्या आवाक्यात नसलेल्या वाटा आहेत, मार्ग आहेत, ते आपण कृपावंत होऊन मला दाखवावेत, माझ्याकडून त्या मार्गांनी हरिभक्ती करवून घ्यावी व मलाही आपल्याचसारखा अंतर्बाह्य हरिदास बनवावे."
आजच्या या पुण्यपावन तिथीला, श्रीसंत तुकोबारायांच्याच शब्दांत आपण श्रीमारुतिरायांच्या श्रीचरणी दंडवतपूर्वक हरिभक्तीरूपी कृपा करण्याची प्रार्थना करू या आणि 'श्रीरामदूत हनुमान की जय ।' असा जयजयकार करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया  !!
( भगवान श्री हनुमंतांच्या फारशा पाहायला न मिळणा-या चार वेगळ्या प्रतिमा मुद्दामच लेखासोबत शेयर करीत आहे. या चारही प्रतिमांमधील त्यांचे विभिन्न भाव अतिशय सुंदर रेखाटलेले असून ते चिंतनीय, मननीय आहेत. )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
http://rohanupalekar.blogspot.in  )

30 Mar 2018

सूर्य_दिवाळी


आज सकाळी पूजा सुरू करण्यापूर्वी पावणे सात वाजता काहीतरी पाहायला मंदिराच्या बाहेर आलो, तर पूर्वेच्या कॅनव्हासवर भगवान सूर्यनारायणांनी ही अप्रतिम आणि देखणी तेज-रांगोळी रेखाटलेली होती. क्षणभर मी स्तब्धच झालो आणि ती देखणी सूर्य_दिवाळी न्याहाळली. लगेच मोबाईल घेऊन आलो आणि देवांचे हे मनोरम रेखांकन कायमचे छायांकित करून ठेवले.
फारतर पाचच मिनिटे हा नजारा होता, मग तो रंगांचा अनोखा खेळ आवरून तेजोनिधी भुवनभास्कराने आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात केलेली होती; सडासंमार्जन होऊन रांगोळी काढून झाल्याबरोबर आजीने घरकामाला सुरुवात करावी तसे. सूर्याचा तो तेजोमय आधार सुटल्याबरोबर ते ढग, पाचवीला पुजलेले आपले काळेपण पुनश्च त्याच केविलवाणेपणाने दाखवीत आहोत, असे मला वाटू लागले. यातून हेच जाणवले की, आपल्या संपन्न अधिष्ठान-माहेराचे अलौकिक माहात्म्य अशाच प्रसंगी प्रकर्षाने पटते, बरोबर ना ?
छायाचित्राच्या तळवटीला दिसणारा निष्पर्ण बहावा त्या देखाव्यात एक विलक्षण पण अनवट असा गूढ-रम्य भाव निर्माण करतोय.  त्यावरच विचार करतोय मी सकाळपासून. काय सांगत असावा तो बहावा? मला तरी तो बहावा आपलेच प्रतिनिधित्व करतोय असेच वाटत आहे.
श्रीभगवंतांच्या तप्त-तेजस्वी, बहुरंगी, बहुढंगी विस्तारासमोर, स्वत:कडे प्रत्यक्षात काही नसतानाही स्वत:ला मोठे मानणारे आपण मानव असेच रखरखीत, निष्पर्ण, आळसावलेले व एकप्रकारे ती नकारात्मकता दाखवणारे आहोत? की त्या जगव्यापी तेजातही न्यून पाहणारे, काळेकुट्ट अंधारे वास्तव आहोत? का त्या तेजाने न्हाऊन निघून नवसर्जनाच्या फुलो-याची आस पाहणारे, उज्ज्वल भविष्य नजरेसमोर ठेवून मनापासून प्रयत्नशील असणारे सकारात्मक  भान आहोत? का "आदित्याची झाडे । सदा सन्मुख सूर्याकडे ।" असे आदित्याचे झाड बनून आपल्या इवल्याशा बाह्या पसरून त्या तेजोनिधीचा तो तेजपसारा कवटाळू पाहणारे, त्या तेजाचीच शिदोरी मागणारे याचक आहोत? काहीच कळत नाहीये बुवा त्या बहाव्याचे कृष्णकोडे. पण ते असो.
उत्तम चित्रकाराने अवघा एकच दमदार फटकारा मारून एखादी जगविख्यात आणि नेत्रदीपक चित्राकृती निर्मावी, तसे भगवान सूर्यनारायणांनी तितक्याच सहजतेने, एका क्षणात रेखलेले हे नेत्रसुखद वासंतिक " चैत्रांगण " सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या एका बहारदार श्रुतीची आठवण करून देणारेच आहे. मराठी भाषेचे हे अनभिषिक्त चक्रवर्ती सम्राट, सद्गुरुकृपेने हृदयी जागलेल्या आत्मविवेकाने अवघे चराचर विश्वच त्या परमात्म्याचे चिन्मय स्वरूप आहे, हे जाणणा-या महात्म्याच्या त्या अद्भुत प्रतीतिखुणांचे मोठ्या माधुर्याने वर्णन करताना म्हणतात,
जैसी पूर्वदिशेच्या राउळीं ।
उदया येतांचि सूर्य दिवाळी ।
कीं येरीही दिशां तियेचि काळीं ।
काळिमा नाहीं ॥ज्ञाने.५.१६.८६॥

पूर्वेच्या क्षितिजावर सूर्य_दिवाळी साजरी झाल्याबरोबर बाकीच्या सर्व दिशा देखील त्याक्षणी तेजाळून उठतात, त्यांच्यातील जन्मजन्मांतरीचा काळिमा कुठल्याकुठे नाहीसा होतो, जणू तो कधी अस्तित्वात नव्हताच !!
अहो दयावंता, करुणाब्रह्म सद्गुरुराया, आपल्या कृपासूर्याची दिवाळी साजरी करणारे असे तेजाळलेले नयनमनोहर चैत्रांगण माझ्या अंतराकाशात आपण कधी रेखाटणार?
रोहन विजय उपळेकर
8888904481

( http://rohanupalekar.blogspot.in )

25 Mar 2018

सूर्यवंशी उदेला सूर्य तो श्रीराम

नमस्कार,
आज श्रीराम नवमी !!
सूर्यकुलभूषण रघुकुलशिरोमणी मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र प्रभूंची जयंती.
आपली देदीप्यमान भारतीय संस्कृती ही श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन महान आणि विलक्षण अवतारांच्या भोवतीच उभारली गेलेली आहे. हजारो वर्षे हीच दोन अद्भुत विभूतिमत्वे आपल्या जाणिवा, आपले संस्कार, आपल्या वृत्ती व पर्यायाने आपल्या संपूर्ण जीवनालाच व्यापून उरलेलीे आहेत. आम्हां भारतीयांच्या तना-मनात श्रीराम आणि श्रीकृष्ण हीच अस्मिता अंतर्बाह्य भरून राहिलेली आहे; आणि हेच आमच्या सर्वोत्तमत्वाचे, आमच्या उर्वरित जगाहून असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपणाचे द्योतक आहे !!
रामायण, महाभारत आणि भागवत हे महर्षी वाल्मीकी व महामती भगवान वेदव्यासांचे तीन वेदतुल्य दिव्य ग्रंथ आमच्या भारतीय संस्कृतीचे मूळ आधारस्तंभ आहेत. म्हणूनच आम्हां भारतीयांना स्वत:ला याच भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णांचे वंशज म्हणवून घेण्यात, त्यांचे अनन्य दास, निष्ठावंत पाईक म्हणवून घेण्यातच सार्थ अभिमान वाटतो व तो तसा वाटणेही सर्वार्थाने यथार्थच आहे !!
आजच्या परमपावन तिथीला त्रेतायुगात भगवान श्रीरामरायांच्या रूपाने भगवान श्रीमहाविष्णूंनी अयोध्येत राजा दशरथ व माता कौसल्येच्या पोटी अवतार धारण केला. सूर्यकुलाचे नाम जगन्मान्य करणारे हे विश्ववंद्य पूर्णपुरुषोत्तम प्रभू, सूर्य मध्यान्हीच्या आकाशात तेजाने तळपत असतानाच पुष्य नक्षत्रावर कर्कलग्नी प्रकटले. सद्गुरु श्री माउलींनी ज्ञानेश्वरीतील अठराव्या अध्यायात नेमकेपणे वर्णिलेल्या, शौर्य, तेज, धृती, दक्षत्व, अपलायन, दान, आणि ईश्वरभाव या क्षत्रियवर्णाच्या सातही गुणलक्षणांचे मूर्तिमंत आणि अद्वितीय आदर्श उदाहरण म्हणजे भगवान महाविष्णूंचे सातवे अवतार भगवान श्रीरामचंद्र प्रभू होत ! एकवचनी, एकबाणी व एकपत्नी ही वैशिष्ट्ये मिरवणा-या साधुमनविश्राम श्रीरामप्रभूंचे समग्र चरित्र फार विलक्षण असून नित्य चिंतन करण्यासारखेच आहे. वेदमर्यादेचा अभिनव विलास ज्यातून तेजोमय होऊन भव्य-दिव्य रूपात आपल्या समोर उभा ठाकतो, ते लोकाभिराम भगवान श्रीरामप्रभूंचे पावन चरित्र नुसते वाचनीय, चिंतनीयच नाहीतर निरंतर अनुकरणीयही आहे. भगवान श्रीराम हे ब्रह्मचर्य, गृहस्थ आणि वानप्रस्थ या तिन्ही आश्रमांच्या शास्त्रोचित अचूक वर्तनाचे, शास्त्रकथित मर्यादांचे परमआदर्श उदाहरण आहेत.
रघुकुलतिलक मुनिमनरंजन भगवान श्रीरामरायांचे चरित्र मोजक्या शब्दांत सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, 
जेणें सांकडलिया धर्माचे कैवारें ।
आपणपयां धनुष्य करूनि दुसरें ।
विजयलक्ष्मीये एक मोहरें ।
केलें त्रेती ॥ज्ञाने.१०.३१.२५२॥
जेणें देवांचा मान गिंवसिला ।
धर्मासि जीर्णोद्धार केला ।
सूर्यवंशी उदेला ।
सूर्य जो कां ॥ज्ञाने.१०.३१.२५४॥
"त्रेतायुगात जेव्हा धर्माला अधर्म ग्रासू लागला होता, तेव्हा त्या संकटात सापडलेल्या धर्माचा कैवार घेऊन स्वत:च धनुष्यरूप होऊन, ज्यांनी अधर्म ( रावण ) नष्ट करून  विजयलक्ष्मीला आपलेसे केले, ( आपल्या लक्ष्मीला, पत्नी सीतेला परत मिळवले ) ; ज्यांनी रावणाच्या पराक्रमाने मानहीन झालेल्या देवतांना त्यांचा उचित सन्मान पुन्हा प्राप्त करवून दिला आणि स्वत:च्या विशुद्ध आचरणाने धर्माची पुनर्स्थापना केली, सूर्यवंशाच्या पुण्याईचे फळ म्हणून उगवलेल्या त्या साक्षात् प्रतापसूर्याला, भगवान श्रीरामरायांना सादर वंदन असो !"
( http://rohanupalekar.blogspot.in )
आपल्या वारकरी संप्रदायानेही श्रीराम व श्रीकृष्ण याच दोन पूर्णावतारांना विशेष प्राधान्याने स्वीकारलेले आहे. कारण हीच दोन परम-आदर्श विभूतिमत्वे आम्हांला सर्वांगांनी सांभाळत, आमचे सर्व लळे पुरवीत आम्हांला मोक्षापर्यंत सहज नेतील, याची श्री ज्ञानोबारायादी वारकरी संतांना खात्री होती व तसा त्यांचा स्वानुभवही होता. म्हणून त्या प्रगल्भ ज्ञानभूमिकेतूनच श्री माउली आपल्याला उपदेश करतात की,
रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरीं ।
हृदयमंदिरीं स्मरा कां रे ॥१॥
आपुली आपण करा सोडवण ।
संसारबंधन तोडा वेगीं ॥२॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण माळा ।
हृदयीं जिव्हाळा श्रीमूर्ति रया ॥ज्ञा.गा.१०७.३॥
भगवान श्रीरामरायांचे दिव्य चरित्र आणि त्यांच्यासारखेच प्रभावशाली व ब्रह्मस्वरूप असे त्यांचे पावन 'राम'नाम हेच आमच्या जिव्हाळ्याचा विषय झाल्याशिवाय आमचा खरा उद्धार होणार नाही. रामचरित्राचे चिंतन हे पारमार्थिक लाभासोबत व्यावहारिक लाभ देणारेही आहेच. समर्थ श्री रामदास स्वामींनी म्हणूनच "रामकथा ब्रह्मांड भेदून पल्याड" नेण्याची आज्ञा आपल्या संप्रदायिकांना आवर्जून करून ठेवलेली आहे. श्रीरामचरित्र आणि श्रीकृष्णचरित्र हे " आयुष्यात कोणत्या परिस्थितीत आपण कसे वागावे? " याचे फार सुंदर आणि नेमके मार्गदर्शन करते. या दोन अक्षय चरित्र-रत्नदीपांच्या निखळ प्रकाशात जर आपण आपल्या जीवनाची वाट चोखाळत असू; तर नि:संशय आपण त्यांच्याचसारख्या नित्य आणि निरंतर आनंदाचे धनी होऊ, यात अजिबात शंका नाही. समर्थ श्री रामदास स्वामी, "दास म्हणे रघुनाथाचा । गुण घ्यावा ॥ दा.बो.११.६.१९॥" असे महंतलक्षण समासाच्या शेवटी सर्व विवेचनाचा मार्मिक सारांश म्हणून आपल्याला सांगतात, ते उगीच नाही ! अतुल-पराक्रम, लोकाभिराम भगवान श्रीरामरायांचा एक जरी दिव्य गुण आपल्याला अंगीकारता आला तरी जीवन धन्य होऊन जाईल, आपलेही व आपल्याबरोबर असंख्यांचेही !!
आजच्या श्रीरामनवमीच्या या पावन पर्वावरच राष्ट्रगुरु समर्थ श्री रामदास स्वामींचाही जन्म अगदी मध्यान्ही बारा वाजता, रामजन्माच्याच वेळी झाला ; हा काही नुसता योगायोग नव्हे. ही तर या थोर रामदासाच्या भावी कार्याची नांदीच होती !
भगवान श्रीरामही उत्तुंग आणि रामांचा हा दासही तेवढाच उत्तुंग आहे. दोघेही अगदी नगाधिराज हिमालयासारखे; अपार, अद्भुत, डोळ्यांच्या कवेत न मावणारे, लखलखीत सोन्यासारखे, तेजस्वी-ओजस्वी, अमानवी आणि अलौकिक; तरीही आम्हांला हवेहवेसे, अगदी 'आपले' वाटणारे, जवळचे !!
आमची फलटण नगरी ही भगवान श्रीरामरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. वनवासात असताना आपल्या वडलांचे श्राध्द त्यांनी फलटणला केले होते. त्यासाठी शुद्ध जल हवे म्हणून त्यांनी बाण मारून एक प्रवाह निर्माण केला, तोच 'बाणगंगा' नदीच्या रूपाने आजही वाहतो आहे.
फलटणच्या थोर अधिकारी राणीसाहेब साध्वी सगुणामाता निंबाळकर यांनी निर्माण केलेले अडीचशे वर्षे जुने भव्य श्रीराम मंदिर फलटणचे ग्रामदैवत आणि भूषण मानले जाते. प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे आराध्यदैवत असणा-या श्रीरामप्रभूंच्या या मंदिरात पू.काका नित्य नियमाने संध्याकाळी श्रीरामरायाच्या दर्शनाला जात असत व आपल्याकडे आलेल्या सर्व भक्तांनाही आवर्जून दर्शनाला पाठवीत असत. श्रीरामराया, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती अतिशय सुबक, रेखीव आणि बोलक्या आहेत. प.पू.काका खूप वेळ श्रीरामरायासमोर उभे राहून हातवारे करीत दररोज त्यांच्याशी सुखसंवाद करीत असत. हे दिव्य दृश्य पाहिलेले अनेक भाग्यवंत भक्त आजही हयात आहेत.
आजचे हे भगवान श्रीराम-श्री रामदास जन्माचे पावन पर्व, आमच्या जाणिवेचे दैन्य दूर करणारे, आम्हांला पुनश्च स्वत्त्वाचे भान देणारे, आमचा देव-देश-धर्माचा अभिमान जागवून राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्यमग्न व अग्रेसर करणारे, आमच्या स्वकीय-परकीय शत्रूंचे खरे स्वरूप आम्हांला दाखवून सावध करणारे, त्या दुष्ट शत्रूंचा पूर्ण नि:पात करणारे आणि दिव्य-पावन रामनामात रंगवून टाकणारे ठरावे, हीच यानिमित्त जगज्जीवन भगवान श्रीरामरायांच्या श्रीचरणी सर्वांच्या वतीने सादर प्रार्थना करतो !!
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्याच अद्भुत शब्दांमध्ये आपण, देवदेवोत्तमशिखामणी रघुवंशनाथ हनुमत्प्रभू भगवान श्रीरामरायांच्या चरणी मनोभावे वंदन करू या;
गंभीर तूं श्रीरामा ।
नानाभूतैकसमा ।
सकळ गुणीं अप्रतिमा ।
अद्वितीया ॥ज्ञाने.११.४३.५६३॥
म्हणोनि त्रिभुवनी तूं एक ।
तुजसारिखा नाहीं आणिक ।
तुझा महिमा अलौकिक ।
नेणिजे वानूं ॥ज्ञाने.११.४३.५६६॥
यच्चयावत् सर्व सद्गुणांचे एकमात्र अाश्रयस्थान असणा-या, परम-गंभीर, अद्वितीय-उत्तम, त्रिभुवनैक-अलौकिक, अप्रतिम-अद्भुत महामहिम भगवान श्रीरामरायांच्या श्रीचरणी अनंतकोटी दंडवत प्रणाम !!
सीयावर श्रीरामचंद्र की जय ।
जय जय रघुवीर समर्थ ।
(फोटो :  फलटण येथील ग्रामदैवत भगवान श्रीरामप्रभूंची सुंदर श्रीमूर्ती )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.

22 Mar 2018

स्वामीनाम तारू स्वामी कल्पतरू

अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामीसमर्थ महाराज हे साक्षात् परिपूर्ण परब्रह्मच होत ! प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच हा अद्भुत आणि अकल्पनाख्य अवतार धारण करून पृथ्वीवर प्रकटले व आजही त्याच रूपाने कार्य करीत आहेत. श्रीस्वामी समर्थ महाराज हे तुम्हां-आम्हां भक्तांसाठी प्रत्यक्ष श्रीभगवंतच आहेत. जो त्यांना अनन्यभावे शरण जाऊन त्यांची सेवा करतो, तो निश्चितच या भवसागरातून सहजतेने पार जातो.
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या असंख्य कृपांकित शिष्यांपैकी प.पू.मातुःश्री पार्वतीदेवी देशपांडे यांची परंपरा मोठी विलक्षण आहे. या परंपरेतील प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांवर श्रीस्वामी समर्थ महाराजांची पूर्णकृपा होती. श्रीस्वामी समर्थ महाराज त्यांना ‘सख्या’ म्हणत असत. श्रीस्वामी महाराजांचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते व प.पू.श्री.मामांचीही श्रीस्वामी महाराजांवर अनन्य भक्ती होती. प्रत्येक गोष्ट ते श्रीस्वामी महाराजांना विचारूनच करीत. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे उत्तराधिकारी प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांच्यावरही राजाधिराज श्रीस्वामी महाराजांची परिपूर्ण कृपा आहे. त्या कृपेचा परिपाक म्हणून, प.पू.श्री.दादांकडून ‘श्रीस्वामी समर्थ नामपाठ’ या लघुग्रंथाची रचना झाली. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या हरिपाठाप्रमाणेच, सत्तावीस अभंगांचा हा नामपाठ श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या नामाचे व कृपापरंपरेच्या तत्त्वाचे यथार्थ विवरण करतो. यातून श्रीस्वामी महाराजांच्या परंपरेचे अनेक निगूढ सिद्धांत प्रथमतःच प्रकट झालेले आहेत. या नामपाठाला साक्षात् श्रीस्वामी महाराजांचे पूर्ण आशीर्वाद लाभलेले असल्याने ही रचना प्रासादिक व दिव्य झालेली आहे. याच्या नित्यपठणाने असंख्य भक्तांनी श्रीस्वामीकृपेचे अद्भुत अनुभव आजवर घेतलेले आहेत. आज चैत्र शुद्ध द्वितीया, राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या ८७० व्या प्रकटदिनी, श्रीस्वामी महाराजांची सेवा म्हणून त्या पावन नामपाठातीलच एका सुरेख अभंगाचा आपण या लेखातून आस्वाद घेऊया !
https://www.facebook.com/sadgurubodh/
राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या मनोहर नामाचे महत्त्व आणि माहात्म्य सांगताना नामपाठाच्या एकोणिसाव्या अभंगात प.पू.श्री.शिरीषदादा म्हणतात,
स्वामीनाम तारू, स्वामी कल्पतरू ।
सप्रेम उच्चारू, भय नाशी ॥१॥
स्वामीनामी भाव, चरणांसी ठाव ।
आणिक उपाव, कासयांसी ॥२॥
बहुतां दिसांचे, जरी पुण्य साचे ।
स्वामीराजयाचे, नाम मुखी ॥३॥
अमृतेची दिठी, पदी देत मिठी ।
स्वामीनामपाठी, शून्य जाली ॥१९.४॥

राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे "श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ " हे पंचदशाक्षरी नाम हीच जणू दुस्तर भवसागर तरून जाण्यासाठीची खात्रीची नौका आहे. श्रीस्वामी समर्थ महाराज हे प्रत्यक्ष कल्पतरू आहेत. म्हणूनच त्यांच्या पुण्यपावन नामाचे प्रेमभराने सतत उच्चारण केले तर भवभय पूर्णपणे नष्ट होते. श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या श्रीचरणी विसावून त्यांचेच नाम प्रेमभावपूर्वक सतत जपले तर इतर कोणतेही उपाय करण्याची गरजच नाही. या नामस्मरणानेच भुक्ती व मुक्ती प्राप्त होतात. परंतु हे पुण्यपावन स्वामीनाम मुखी येण्यासाठी अनेक जन्मांची पुण्याई गाठीशी असावी लागते. तरच हे नाम मुखी येते व त्याचे स्मरण करण्याची सद्बुद्धी होते. सद्गुरुकृपेने अमृतेची (प.पू.श्री.शिरीष दादांची काव्य-नाममुद्रा ‘अमृता’ अशी आहे.) दृष्टी श्रीस्वामीचरणीच मिठी मारून दृढ स्थिरावली आणि या श्रीस्वामीनामाच्या पाठामुळे ( श्रीस्वामीनामपाठाच्या पठणामुळे ) अमृता सर्वांगाने ब्रह्मस्वरूप होऊन ठाकली !
‘श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ |’ हा श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेचा नित्यसिद्ध महामंत्र आहे. हा मंत्रच या कराल कलिकाळात भयंकर असा भवसागर तरून सुखरूप पैलतीरावर जाण्यासाठीची सुरक्षित नौका आहे. हे स्वामीनामाचे तारू, अकल्पनाख्यकल्पतरू असणाऱ्या श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने ज्याला प्राप्त झाले तो धन्य होय ! ज्या गोष्टीची कल्पनाच करता येत नाही असे अकल्पनाख्य परब्रह्मच जिथे श्रीस्वामीनामाच्या सतत जपाने प्राप्त होते, तिथे लौकिक सुख-समृद्धीची व भौतिक लाभांची तर गोष्टच सोडा ! म्हणून श्रीस्वामी महाराजांचे नाम प्रेमभराने जपल्यास आपला संसार तर सुखमय होतोच; परंतु अत्यंत अवघड म्हणून सांगितलेला परमार्थही आपल्याला अतिशय कमी कष्टात साध्य होतो.
यासाठीच श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या नामाचे प्रेमभावे सतत उच्चारण करावे आणि आपल्या मनाला, आपल्या चित्तवृत्तींना श्रीस्वामीचरणीच गुंतून राहायला शिकवावे. हे दोन्ही जर साधले तर अन्य कोणताही उपाय करण्याची गरजच नाही. असे करणाऱ्या साधकाची, त्याच्या संसाराची, त्याच्या पूर्वीच्या सर्व भल्या-बुऱ्या कर्मांची पूर्ण जबाबदारी श्रीस्वामी समर्थ महाराजच घेतात. त्याला अन्य कोणतेही साधन न करता, केवळ प्रेमाने केलेल्या स्वामीनामाच्या स्मरणाने यच्चयावत् सर्व गोष्टींची सुलभतेने प्राप्ती होतेच !
पण हे अतिशय मोठे परिणाम करणारे आणि नित्यसिद्ध असे स्वामीनाम काही सहज प्राप्त होत नाही बरे का ! हे नामस्मरण अत्यंत सुलभ असले तरी ते नाम मुखात यायला मात्र आपल्या गाठीशी पूर्वजन्मांचे प्रचंड पुण्य असावे लागते. तसे पुण्य नसेल तर मग हे नाम एकदाही घ्यायची बुद्धीच होत नाही. श्रीस्वामी महाराजांची कृपा नसेल, आपल्या गाठीशी पुण्य नसेल, तर आपले मन टीव्हीवरील फडतूस सिरीयलमध्ये किंवा इतरांची उणी-दुणी काढण्यात, बाष्कळ चर्चेत किंवा झोपा काढण्यातच अधिक रमते. परंतु त्याला महाप्रभावी असे स्वामीनाम घेण्याची सद्बुद्धी अजिबात होत नाही. त्यामुळेच संत सांगतात की भगवन्नामाचे साधन अतिशय सुलभ असले तरी ते नाम मुखी येणे मात्र अत्यंत दुर्लभ आहे ! असे हे दुर्लभ स्वामीनाम आपल्या मुखी जर कायमचे स्थिरावले तर आपल्या भाग्याची जगात कशाशी तुलनाच होऊ शकणार नाही !
प.पू.श्री.शिरीषदादा कवडे अभंगाच्या शेवटच्या चरणात आपली अलौकिक आणि देवदुर्लभ अनुभूती कथन करून तुम्हां-आम्हां स्वामीभक्तांना बोध करतात. सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या कृपेने प्राप्त झालेले हे दिव्य-पावन श्रीस्वामीनाम प.पू.श्री.दादांच्या मुखी कायमचे स्थिरावले आणि त्यांची दृष्टी स्वामीचरणी घट्ट मिठी मारून बसली. त्यामुळे घडलेल्या या स्वामीनामपाठाच्या उपासनेने ती दृष्टीच ब्रह्मदृष्टी बनून, सर्वत्र त्यांना तेच अफूट स्वामीब्रह्म प्रत्ययाला येऊ लागले. ती दृष्टी ब्रह्मरंध्री जाऊन परब्रह्माशी एकरूप झाली, सर्वत्र ते स्वामीरूपच ती पाहू लागली. म्हणून जो प्रेमभावाने स्वामीचरणी दृढ शरण जाऊन, सदैव या स्वामीनामाचे अनुसंधान ठेवेल, तो अंतर्बाह्य स्वामीरूपच होऊन जाईल, त्याला अन्य कोणतेही साधन करण्याची आवश्यकताच राहणार नाही; असे प.पू.श्री.दादा येथे स्वानुभवपूर्वक कथन करीत अहेत.
श्रीस्वामी समर्थ महाराजांवर दृढ विश्वास ठेवून फक्त त्यांचेच स्मरण करायला हवे. मग कोणतेही संकट समोर येवो की आपल्याच प्रारब्धाने एखादा भयंकर अनुभव येवो; आनंदाचा एखादा क्षण येवो की दु:खाचा डोंगर कोसळो; अपमानाचा प्रसंग येवो की बहुमानाचे, सन्मानाचे पद प्राप्त होवो; अशी अनन्यता प्राप्त होण्यासाठी आपण सदैव प्रार्थनापूर्वक प्रयत्नशील राहिले पाहिजे. कोणत्याही आणि कसल्याही परिस्थितीत आपल्याला श्रीस्वामी समर्थ महाराजांचाच आधार वाटला पाहिजे. प्रसंग आनंदाचा असो किंवा दु:खाचा, आपल्याला श्रीस्वामी समर्थ महाराजांची आठवण व्हायला हवी. जे काय सांगायचे ते त्यांनाच सांगायचे, जे काय मागायचे तेही केवळ त्यांनाच मागायचे. त्यांच्याशिवाय दुस-या कोणाच्या तोंडाकडे चुकूनही पाहायचे नाही. अशी जर आपली दृष्टी, आपली वृत्ती श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्याच श्रीचरणी घट्ट मिठी मारून राहिली, तर प.पू.श्री.दादा सांगतात तसा अनुभव आपल्यालाही आल्याशिवाय राहणार नाही.
हे घडण्यासाठी आपल्या मनाचा वारू स्वामीप्रेमाच्या लगामाने नियमित करून स्वामीनामाच्या तारूशीच बांधून टाकायला हवा. एकदा का हे साधले की बस ! बाकी सगळे आपल्याला त्याचक्षणी प्राप्त होईल, कारण श्रीस्वामी समर्थ महाराज साक्षात् कल्पतरूच आहेत. त्यासाठीच प.पू.श्री.दादा या सत्तावीस अभंगांच्या दिव्य नामपाठातून आपल्याला स्वामीनामाचे अविरत अनुसंधान ठेवण्याचा उपदेश करतात ! म्हणूनच येता-जाता, खाता-पिता, उठतां-बसता, कामधंदा करता, सुख-दु:खाची अनुभूती घेत असता, मनातून मात्र ते स्वामीनाम सदैव जपायची सवय लावून घ्यायला हवी. ही सवय लावणे कठीण असले तरी अशक्य नाही; आणि ' अशक्य ही शक्य करतील स्वामी । ' हे तर श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे ब्रीदवचनच आहे. तेव्हा अत्यंत तळमळीने, मनापासून आणि प्रेमाने आपण 'श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।' असा जयजयकार करू या व सतत करत राहू या !
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु समर्थ श्रीअक्कलकोट स्वामी महाराज की जय ।
( http://rohanupalekar.blogspot.in )
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481



18 Mar 2018

टाळी वाजवावी गुढी उभारावी

नमस्कार मंडळी !!
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढी पाडवा ! स्वस्तिश्रीमन्नृप शालिवाहन शके १९४०, विलंबीनाम संवत्सराची प्रसन्न सुरुवात. सर्व सुहृदांना हिंदू नूतन वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा !!
वर्षप्रतिपदा हा काही आत्ता सुरू झालेला उत्सव नाही, हा तर प्राचीन आहे. या तिथीला युगादि म्हणतात, भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टिनिर्मिती याच तिथीला केली होती. आता काही भंपक लोक म्हणतात, हा उत्सव छत्रपती संभाजीराजांच्या मृत्युनंतर सुरू झाला, पण त्याला काहीही अर्थ नाही; आणि आपल्याला त्या तद्दन मूर्खांशी वादही घालायचा नाही.
आपल्या सर्वच्या सर्व संतांनी गुढीचा अभंगांमधून अनेकवेळा उल्लेख केलेला आहे. गुढी उभारणे हा पूर्वीच्या काळी आनंद व्यक्त करण्याचा एक भाग होता. त्यासाठी ठरावीक तिथीचा संबंध नाही. कोणत्याही तिथीला आपण गुढी उभारू शकतो. आजही भगवान श्री माउलींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी अनेक गावांमध्ये घरावर गुढ्या उभारल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदेला भगवान श्रीरामराय रावणाचा वध करून अयोध्येत परतले, म्हणून तेथील लोकांनी गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले होते. त्याची आठवण व नवीन वर्षाच्या सुरुवातीला हर्षोल्लास म्हणून आपल्याकडे पाडव्याला गुढी उभारायची पद्धत पडलेली आहे.
सद्गुरु श्री ज्ञानेश्वरमाउली श्रीभगवंतांच्या अवताराचे रहस्य सांगताना म्हणतात,
अधर्माची अवधी तोडीं ।
दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनाकरवीं गुढी ।
सुखाची उभवीं ॥ज्ञाने.४.८.५२॥
श्रीभगवंत जेव्हा अवतार धारण करून येतात तेव्हा ते सर्वत्र बोकाळलेला अधर्म आधी नष्ट करतात, दोषांनी बरबटलेल्या जनांना सन्मार्गाला लावून त्या दोषांचे निराकरण करतात व संतजनांकरवी जगात सुखाची गुढी उभारतात. सद्गुरु श्री माउली येथे स्पष्ट म्हणतात की, या जगात खरे सुख जर हवे असेल, तर त्यासाठी संतांनाच शरण जावे लागेल; कारण प्रत्यक्ष भगवंतही प्रकट झाले तरी ते शाश्वत सुखाचे दान मात्र संतांकरवीच करतात, स्वत: करीत नाहीत.
चैत्र महिना हा वसंतऋतूचा काळ. या काळात निसर्गात सर्वत्र नवसर्जनाची, नवोन्मेषाची सुरेख लगबग चाललेली असते. त्यामुळे प्रसन्नतेची, आल्हाददायक सकारात्मक ऊर्जेची लाट सर्व गोष्टींना या काळात व्यापून राहिलेली असते. म्हणूनही हा उत्सव आनंदाचा, सुखाचा द्योतक मानला जातो आणि सर्वांना कायम हवाहवासा वाटतो. या अंतर्बाह्य व्यापून राहिलेल्या सुखाचे प्रकटन आपण घरावर गुढी उभारून करीत असतो.
श्रीसंत चोखामेळा महाराज आपल्या एका नितांतसुंदर अभंगात म्हणतात,
टाळी वाजवावी गुढी उभारावी ।
वाट ही चालावी पंढरीची ॥१॥
पंढरीचा हाट कौलाची पेठ ।
मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥
पताकांचे भार मिळाले अपार ।
होतो जयजयकार भीमातीरी ॥३॥
हरिनाम गर्जतां भय नाही चिंता ।
ऐसे बोले गीता भागवत ॥४॥
खट नट यावें शुध्द होउनी जावें ।
दवंडी पिटी भावे चोखामेळा ॥५॥
भगवान पंढरीनाथांच्या प्रेमरंगात न्हालेले श्री चोखोबाराय म्हणतात, "बाबांनो, हाताने टाळी वाजवा, गुढी उभारा व पंढरीची वाट नामगजरात चालू लागा. पंढरीच्या हाटात, बाजारात आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी असे चार प्रकारचे वारकरी जमलेले आहेत व हे सर्वच जण भगवंतांचा कृपाप्रसादरूप कौल मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत. त्या कृपाकौलामुळेच तर हे मायेत गुरफटलेल्या सामान्य जनांहून भगवंतांचे भक्त म्हणून वेगळे ठरलेले आहेत.
भीमातीरावर भगव्या पताकांचे असंख्य भार जमलेले असून मोठ्या प्रेमाने भगवान श्रीपंढरीनाथांचा जयजयकार सतत होत आहे. अखंड चालणा-या या नामगजराचे माहात्म्य गीता, भागवतात स्पष्ट केलेले की, या नामजपामुळे कसल्याही प्रकारचे भय, चिंता, दु:ख शिल्लकच राहात नाही. या नामप्रवाहात एवढी ताकद आहे की तो सर्व प्रकारचे दु:ख, दारिद्र्य, भय, चिंता इत्यादी क्षणात वाहून नेतो. म्हणून श्री चोखोबा निश्चयपूर्वक दवंडी पिटून सांगतात की, कोणीही म्हणजे खट, नट, सुष्ट, दुष्ट असे कोणीही या भक्ति-पंढरीत येऊन प्रेमादराने नाम घ्यावे व तत्काळ शुद्धच होऊन जावे.
गुढीच्या रूपकाचा विलक्षण योगार्थ विशद करताना संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या 'साधनजिज्ञासा' या ग्रंथात सांगतात, "ही 'गुढी' सामान्यरूपाने आपल्या लिंगदेहाचे प्रतीक आहे. रामायणातली गुढीची कथा आपल्याला माहीत आहेच. त्यामागचा आध्यात्मिक संदर्भ असा आहे की, लिंगदेह ही लंका आहे; त्यातला 'अहंकार' हाच रावण आहे. ज्यावेळी प्रभुकृपेने त्या अहंकाररूपी रावणाचा नाश होऊन, लंका-लिंगदेह शुद्धी होते; आणि सीतेची म्हणजे आपल्या सद्बुद्धीची सोडवणूक होते; त्यानंतर विजयाचा परम-आनंद होतो. त्यालाच; त्या ब्रह्मानंदालाच 'गुढी उभारणे' असे म्हणतात. त्यासाठीच श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात की, 'रोमांच गुढिया डोलविती अंगें ।(तु.गा.२४३.६)'
संतांनी देखील याच अर्थाने हा शब्दप्रयोग केलेला आहे. ही गुढी आपल्या सप्तकोशांपैकी सगळ्यात आत असलेल्या 'आनंदमय कोशा'चे प्रतीक आहे. त्या आनंदमय कोशाचे जे आत्मस्वरूप मस्तकस्थान असते, ते दाखविण्यासाठीच गुढीवर कलश ठेवलेला असतो. आपल्या शरीरातले सगळेच कोश शरीराच्या आकृतीचे असतात. त्यांपैकी आनंदमय कोश दाखविणारी ही गुढी असते. तिच्या गळ्यात गोड माळ असते. हल्ली साखरेच्या गाठी घालतात. पण शास्त्र असे आहे की, तेथे कोणतीही गोडाची माळ चालते. याचे कारण असे की, ते आनंदमय कोशाचे भ्रूमध्यस्थान आहे, तेथे अमृततत्त्व असते; त्याचेच ही माळ प्रतीक असते."
आजच्या या पुण्यप्रद उत्सवाच्या निमित्ताने, हे विलंबीनाम संवत्सर सर्वांसाठी दु:ख, दोष, अवगुणादी गोष्टींबाबतीत विलंबदायकच ठरो; आणि भगवंतांचे प्रेमदान देण्यासाठी मात्र विलंब न लावणारे ठरून, या वर्षात सर्वांना हरिनामामृताची गोडी लागून, निरंतर आनंदाची गुढी मनोमंदिरावर उभारून सुखाच्या नवीन वर्षाची सुरुवात करण्याचे सौभाग्य लवकरात लवकर लाभो, हीच जगन्नियंत्या आनंदकंद भगवान श्रीपंढरीनाथांच्या व तदभिन्न सर्व संतांच्या, श्रीसद्गुरुभगवंतांच्या श्रीचरणी प्रेमादरपूर्वक प्रार्थना !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in )


11 Mar 2018

झळाळते अलौकिक श्रीदत्तब्रह्म- सप्तम उन्मेष

सप्तम उन्मेष
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )
ज्ञानदेवी मुरले मन-प्राण
‘‘आई, श्रीज्ञानेश्वर माउली ‘पायाळू' हा शब्द वापरतात. ‘पायाळू’चा नेमका अर्थ काय गं?’’ त्यावर मातु:श्री म्हणतात, ‘‘सख्या, सांग बरे आपण ‘मायाळू’ कोणाला म्हणतो? तर ज्याच्या हृदयात सर्वांविषयी अपार माया असते, तो मायाळू. तसे ज्याच्या हृदयात सद्गुरूंचे पाय, श्रीचरण अखंड प्रतिष्ठापित असतात तोच पायाळू.’’ असा माउलींच्या दिव्य शब्दांचा विलक्षण आणि अपूर्व अर्थ सांगणा-या मातु:श्री म्हणजेच राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण कृपांकित प.पू.पार्वतीदेवी देशपांडे होत आणि त्यांचे चिरंजीव म्हणजेच थोर स्वातंत्र्यसेनानी व विश्वविख्यात सत्पुरुष, प.पू.श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे महाराज हे होत. आज फाल्गुन कृष्ण नवमी, श्रीपादनवमी, दि.११ मार्च २०१८ रोजी पू.श्री.मामांची २८ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त गेले सात दिवस आपण या परमाद्भुत श्रीदत्तब्रह्माचे अपूर्व-मनोहर चरित्र सविस्तर पाहात आहोत. हा त्याचा कळसाध्याय आहे.
प.पू.मामांनी आपली संपूर्ण हयात जनता जनार्दनाची नारायणभावाने सेवा करण्यात खर्ची घातली. आपल्या ज्योतिष व वैद्यकी या दोन विद्यांचा विनामोबदला उपयोग करून लाखो जीवांना सौख्याचा मार्ग दाखविला. त्यांनी लोकांवर उपकार करण्यात कधीच आपला-परका असा भेद केला नाही.
पू.मामा जरी निष्कपट भावाने सर्वांचे अखंड हितच पाहात असले तरी, त्यांच्याही वाईटावर टपलेले लोक होतेच. अशा नराधमांनी पू.मामांवर तीन वेळा सायनाईड सारख्या भयंकर विषाचा प्रयोग केला. पण श्रीभगवंतांच्या असीम दयाकृपेने पू.मामा त्या जीवघेण्या विषप्रयोगांमधून सहीसलामत बाहेर आलेे. म्हणून त्यांना सद्यकाळातील नीलकंठच म्हणायला हवे. शेवटी दुर्जनांनी कितीही प्रयत्न केले तरी भगवंतच साक्षात् आपल्या प्रिय भक्तांचे संरक्षण करीत असल्याने, त्यांचे काहीही वाकडे कोणीच करू शकत नाही.
प.पू.श्री.मामासाहेब हे भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे निष्ठावंत भक्त व संतवाङ्मयाचे साक्षेपी, रसज्ञ अभ्यासक होते. ‘माउली' हे त्यांचे हृदय अधिष्ठाते होते. माउलींच्या वाङ्मयाचा अखंड अभ्यास हा त्यांचा एकमात्र ध्यास होता. माउलींच्या शब्द न् शब्दावर त्यांनी सखोल चिंतन केलेले होते. झोपेतून उठल्याक्षणीसुद्धा ते माउलींच्या ओव्यांचे चिंतन मांडू शकत असत, इतकी ज्ञानेश्वरी त्यांच्या आत मुरलेली होती. एवढा प्रचंड अधिकार असूनही हा थोर उपासक आजन्म स्वत:ला माउलींचा दासानुदास मानीत होता. स्वत:ची अभ्यासू वृत्ती त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ताजी, टवटवीत ठेवलेली होती. म्हणूनच श्री माउलींच्या कृपेने त्यांचा हृदयगाभारा अलौकिक ज्ञानतेजाने लखलखीत उजळलेला होता.
http://sadgurubodh.blogspot.in
भगवान माउलींचे वाङ्मय हे बहुआयामी, प्रगल्भ आणि एकाच वेळी अनेक अर्थांनी प्रकटणारे आहे. त्यासाठी त्याचा अभ्यासकही तसाच अष्टावधानी, विलक्षण रसज्ञ, अभिजात सौंदर्यदृष्टी असणारा व परमभक्तिमानच असावा लागतो. तरच त्याच्या बुद्धीत माउलींच्या साहित्याचे बीज रुजते. पू.मामा हे माउलींच्या वाङ्मयाचे असेच आदर्श अभ्यासक होते. त्यांची दृष्टीदेखील माउलींसारखीच सूक्ष्म आणि शुद्ध होती. माउलींना नेमके काय म्हणायचे आहे? हे त्यांना अचूक समजत असे. ज्ञानेश्वरीच्या अतिशय कठीण समजल्या जाणा-या सहाव्या अध्यायातील अभ्यासयोगावर फारच थोड्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. या विषयावरील पू.मामांचेच विवरण जगभर प्रमाण मानण्यात येते. त्यांना आजवरच्या सर्वच थोर महात्म्यांनी व विचारवंतांनी ‘श्रीज्ञानेश्वरीचे अपूर्व भाष्यकार' म्हणून एकमुखाने गौरविलेले आहे. आचार्य अत्रे पू.मामांकडे येऊन आवर्जून ज्ञानेश्वरीचे मार्गदर्शन घेत असत.
प.पू.मामा हे फार दूरदृष्टीचे महात्मे होते. प्रवचनांमधून सांगितलेले ज्ञान हे तेवढ्यापुरतेच राहते. त्यातले सगळे काही लोकांच्या लक्षात राहत नाही. पण त्याच उपदेशाचे संकलन जर पुस्तकरूपाने प्रकाशित झाले तर मात्र त्याचा लाभ अनंतकाळपर्यंत होत राहतो. याच संपन्न जाणिवेतून पू. मामांनी ‘श्रीवामनराज प्रकाशन' नावाने एक संस्था स्थापन करून माउलींच्या व इतर संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास पुस्तकांच्या माध्यमातून ना नफा तत्त्वावर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आजमितीस अडीचशे पुस्तके प्रकाशित करून ना नफा तत्त्वावर, सवलतीच्या दरात त्यांची विक्री करणारी श्रीवामनराज प्रकाशन ही एकमात्र आध्यात्मिक प्रकाशन संस्था म्हणून विख्यात आहे. माउलींचे वाङ्मय जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतरित करण्याचा पू.मामांचा एक महान संकल्पही हळूहळू पूर्ण होत आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून जगाच्या पाचही खंडांमध्ये मराठी संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास होत आहे ही फार अभिमानाचीच बाब आहे.
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या दृष्टांतानुसार, पू.मामांनी श्रीगुरुचरित्राची सर्वजनसुलभ व संपादित पाठावृत्ती तयार केलेली आहे. या "श्रीगुरुचरित्र नित्यपाठ" नावाच्या ग्रंथाच्या आजवर दहापेक्षा जास्त आवृत्या प्रकाशित झालेल्या असून स्त्री-पुरुष सर्वांनाच याचे पारायण करण्याची मुभा आहे. या ग्रंथाला प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंचाच आशीर्वाद असल्याने, याच्या पारायणाने मूळ श्रीगुरुचरित्राच्या पारायणाइतकेच अद्भुत फळ मिळते. शिवाय मूळ चरित्रापेक्षा याची ओवीसंख्या कमी असून नियमही थोडे सोपे आहेत, हे या ग्रंथाचे मुख्य वैशिष्ट्य होय. भगवान श्रीमाउलींचेही "श्रीज्ञानदेव विजय" हे चोवीसशे ओव्यांचे अद्भुत चरित्र पू.मामांनी रचलेले आहे. आजवर माउलींचे असे पारायणासाठी चरित्र उपलब्धच नव्हते. या सुरेख व रसाळ चरित्रग्रंथाने ही उणीवही भरून काढलेली आहे. याशिवाय पू.मामांच्या प्रवचनांवर आधारित ग्रंथही अभ्यासक व साधकांमध्ये खूप प्रसिद्धी पावलेले आहेत. भगवान श्री माउलींच्या कृपा-पसायामृताचे विलक्षण माधुर्य अंगी मिरवणारे हे सर्व शब्दधन अत्यंत मनोहर असून नित्यचिंतनीयच आहे.
प.पू.श्री.मामांनी आपल्या हयातीतच 'श्रीपाद सेवा मंडळ' या संस्थेची संरचना केलेली होती. परंतु रितसर नोंदणी मात्र प.पू.श्री.मामांच्या देहत्यागानंतर झाली. प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्या समर्थ मार्गदर्शनानुसार सध्या जगाच्या पाचही खंडांमध्ये श्रीपाद सेवा मंडळाचे कार्य विस्तारलेले असून लाखो साधक साधनामार्गावर अग्रेसर होत आहेत. भारतातील विविध प्रकल्पांच्या माध्यमातून देव, देश आणि जनसेवा फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. प.पू.श्री.मामांना झालेल्या सद्गुरु श्री माउलींच्या दृष्टांतानुसार, त्यांनी "श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन ज्ञान योग अध्यात्म विद्यापीठ प्रतिष्ठान" या संस्थेची स्थापना केली. या मार्फत त्यांना श्री माउलींच्या जन्मस्थानी, आळंदीतील सिद्धबेटावर त्यांचे आंतर्राष्ट्रीय स्मारक उभारायचे होते. त्या कार्यातीलच, श्री निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय व श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ हे दोन्ही प्रकल्प आळंदीत कार्यान्वित झालेले आहेत.
श्रीदत्तयोग्याचे महानिर्वाण
१९८८-८९ साली प.पू.श्री.मामांचे अमृतमहोत्सवी वर्ष भारतभर फार मोठ्या प्रमाणावर साजरे झाले. पुणे, सांगली, बेळगांव, भिलाई, नागपूर, कोल्हापूर, मुंबई, पंढरपूर, वर्धा, पणजी, डोंबिवली, क-हाड इत्यादी ठिकाणी प.पू.श्री.मामांचे सत्कार समारंभ झाले. विविध मान्यवर, संत-सत्पुरुष, पीठाधिपतींनी आवर्जून येऊन प.पू.श्री.मामांच्या गौरवपर भाषणे केली. प.पू.श्री.मामांवर 'पैल मेरूच्या शिखरी, कैवल्यलेणे, अमृतकण आणि कौस्तुभ' असे चार गौरवग्रंथही प्रकाशित झाले. अमृतमहोत्सवी वर्ष विविध कार्यक्रम आणि सत्कारांनी अक्षरशः गाजले.
प.पू.श्री.मामांनी आपल्या परंपरेचे उत्तराधिकार प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे आणि प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांना पूर्वीच देऊन ठेवलेले होते. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली संप्रदाय सेवेचा सर्व कार्यभार आजही  व्यवस्थितपणे चालू आहे. अमृतमहोत्सवानंतर मात्र प.पू.श्री.मामांना पैलतीराचे वेध लागले. त्या सुमारासच त्यांना राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे दर्शन झाले व त्यांनी आयुष्य वाढवून देऊ का? असे विचारले. त्यावर पू.मामांनी, "देवा, काया शिणली आहे, आयुष्य वाढवून नको आम्हांला. आता आपल्यातच कायमचे सामावण्याची इच्छा पूर्ण करा", अशी विनंती केली. त्यानुसार पू.मामांनी आपल्या देहत्यागाची तिथी निश्चित केली व काही जवळच्या भक्तांना सांगूनही ठेवली होती.
पू.मामांनी अगदी शेवटच्या काळात, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयनानगर जवळी एक क्षेत्र विकसित केले. श्रीक्षेत्र दत्तधाम येथे भगवान श्रीदत्तप्रभूंच्या साक्षात्कारानुसार द्वितीय दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पूर्णाकृती श्रीमूर्तीची स्थापना केली. या स्थानीच प्राचीन काळी भगवान परशुरामांनी भगवान श्री गोरक्षनाथांना श्रीविद्येचा उपदेश केलेला असल्याने ही फार थोर तपोभूमीच आहे. आज श्रीक्षेत्र दत्तधाम हे महाराष्ट्रातील दक्षिण गिरनार म्हणून सुप्रसिद्ध झालेले आहे.
फाल्गुन कृष्ण नवमी, दि.२१ मार्च १९९० च्या पहाटे तीन वाजता पू.मामांनी आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली. "देहाची तीन चिमट्या राख होईपर्यंत साधना सोडायची नाही !" असा त्यांच्या मातु:श्रींचा उपदेश होता. पू.पार्वतीदेवींनी स्वत: देखील आसनमांडी घालून सद्गुरुस्मरणातच देहाचा त्याग केला होता. पू.मामा देखील गादीवर मांडी घालून बसले, सद्गुरुस्मरण केले व त्याच स्थितीत त्यांनी आपले प्राण ब्रह्मरंध्रातून काढून विश्वचैतन्याशी एकरूप केले. आज या घटनेला अठ्ठावीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या देहत्यागाच्या वेळी साक्षात् भगवान श्री स्वामी समर्थ महाराज व सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी तिथे प्रकट झाले व मातु:श्री स्वहस्ते पू.मामांच्या ठायीचे तेज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या ठायी विलीन केले. किती अलौकिक घटना आहे ही ! ज्या आईने जन्म दिला, तिनेच पुढे शक्तियुक्त कृपाही केली व तिनेच शेवटी परब्रह्माशी एकरूपही केले. अशी घटना अद्वितीयच म्हणायला हवी.
पू.मामांच्या उशाशी एक छोटे गजराचे घड्याळ नेहमी असायचे. पू.मामांनी पहाटे तीन वाजता देह ठेवला, बरोबर त्याच वेळी ते घड्याळ आपोआप बंद पडले. या चमत्काराचा प्रत्यय आपण आजही घेऊ शकतो. पहाटे तीनची वेळ दाखविणारे ते बंद पडलेले घड्याळ माउली आश्रमातील पू.मामांच्या वापरातील पावन वस्तूंच्या  संग्रहालयात ठेवलेले आहे. पू.मामांचे अवघे जीवनचरित्र अशा अनंत चमत्कारसदृश घटनांनी भरलेले आहे. त्यांचे चरित्र हा चालता-बोलता जिवंत चमत्कारच आहे, असे म्हणायला हरकत नाही.
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज व प.पू.श्री.मामांचे अत्यंत दृढ प्रेमनाते होते. प.पू मामा प.पू.काकांना गुरुस्थानीच मानत असत. आषाढी वारीतील फलटण मुक्कामात व इतरही वेळी प.पू.मामा प.पू.काकांकडे येत असत. दोघांची ज्ञानेश्वरी या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर सखोल चर्चा होत असे. प.पू.काकांनी एकदा प.पू.मामांच्या मनातील गोष्ट जाणून न विचारताच त्यांना अडलेल्या काही ओव्यांचे मार्गदर्शन आपणहून केले होते. प.पू.मामा नेहमीच प.पू.काकांविषयी अतीव प्रेमादराने बोलत असत. या दोन थोर ज्ञानेश्वरी-भक्तांची प्रत्येक भेट अवर्णनीयच होत असे.
गेले सात दिवस आपण या खळाळत्या श्रीपादचरित्र-गंगेमध्ये प्रेमादरे अवगाहन करीत आहोत, हे आपले परमभाग्य आहे. नगाधिराज हिमालयाची उंची किंवा रत्ननिधी महासागराची खोली जशी कधीच जोखता येत नाही, तशीच संतचरित्रांची महतीही कधी सांगून पूर्ण होत नाही. त्यांचा अवाका इतका मोठा असतो की मानवी बुद्धीच्या कक्षेत तो कधी मावतच नाही. पण माउली म्हणतात तसे, गंगेचे एक घोटभर तीर्थ घेतल्यानेही प्रत्यक्ष गंगेचेच पान केल्याचे सुफळ मिळते, तसे संतचरित्रांच्या यथाशक्य आस्वादनानेही आपल्याला अमृतमय होता येते. मुक्याने गूळ खाऊन त्याचा आस्वाद जसा मनातल्या मनातच पचवायचा असतो, तशी ही संतचरित्रे आतल्या आत सुखाने वारंवार उपभोगायची असतात. त्यांचा अवर्णनीय आनंद कधीच कमी होणारा नसतो, उलट तो त्या चरित्रांच्या सतत अनुसंधानाने चौपटीने वाढत जातो. त्यात प.पू.श्री.मामांसारख्या महान अवतारी महात्म्यांचे चरित्र तर अलौकिकतेलाही अप्रूप वाटावे असे अद्भुतरम्य असते. तेच बोधप्रद व मार्गदर्शक चरित्र आपण गेले सात दिवस मोठ्या भाग्याने आस्वादत आहोत. म्हणून आज प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या अठ्ठाविसाव्या पुण्यदिनी, त्यांच्या श्रीचरणी प्रेमादरपूर्वक साष्टांग दंडवत घालू या आणि त्यांच्याच करुणाकृपेने संपन्न झालेली ही चरित्रचिंतनाची सेवा तेथेच मनोभावे समर्पित करून, आपण त्या अम्लान, सर्वतीर्थास्पद श्रीचरणी त्यांच्याच पावन स्मरणाच्या परमानंदात मग्न होऊन निरंतर सुखी होऊ या !!
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री.मामा महाराज की जय ।
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।
( कालच्या लेखात उल्लेख केलेल्या अद्भुत चमत्काराचा संदर्भ असणारे, पू.श्री.गुळवणी महाराज अतिरुद्र यागाच्या अवभृथ स्नान यात्रेत प्रकट झाल्याचे छायाचित्र आजच्या लेखासोबत घेण्यात आलेले आहे. प्रस्तुत फोटोमधील गोलात श्री.गुळवणी महाराज स्पष्ट दिसतात.
प.पू.श्री.मामांचे वाङ्मय ३०% सवलतीत मिळविण्यासाठी संपर्क क्रमांक - श्रीवामनराज प्रकाशन, पुणे - 020-24356919 )
 http://sadgurubodh.blogspot.in
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

10 Mar 2018

झळाळते अलौकिक श्रीदत्तब्रह्म - षष्ठम उन्मेष

षष्ठम उन्मेष
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )
श्रीगुरुकृपा उखा उजळली
दरवर्षीप्रमाणे १९५४ साली पू.मामा पंढरीच्या वारीला गेले. ते ज्या दिंडीतून जात त्या देशमुख महाराजांच्या दिंडीचे व्यवस्थापक ह.भ.प.यशवंतराव वैद्य मास्तर म्हणून होते. तेही ज्ञानेश्वरीचे अभ्यासक असल्याने त्यांचे पू.मामांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते दरवेळेस पू.मामांना वारीनंतर सोलापूरला आपल्या घरी येण्याची विनंती करीत. पण पू.मामा तोवर कधी हो म्हणाले नव्हते. त्यावर्षी मात्र ते लगेच हो म्हणाले व त्याप्रमाणे आषाढी एकादशी झाल्यावर सोलापूरला वैद्य मास्तरांच्या घरी गेले. दुपारचे भोजन झाल्यावर सोलापूर पाहण्याच्या उद्देशाने सहज फिरायला गेले. परत आले तर घराबाहेर चपलांचा ढीग लागलेला. मोठ्या आश्चर्याने पू.मामा जिना चढून गेले. तेथे तिस-या मजल्यावर एक शांत, तेजस्वी सत्पुरुष व्याघ्राजिनावर बसलेले दिसले. त्यांना पाहताच ज्योतिषाच्या वेगळ्याच ऊर्मीने पू. मामा एकदम बोलून गेले की, "यांच्या पत्रिकेत पंचमात बुध-चंद्र युती असणारच."
पू.मामांचे शब्द कानी पडल्यावर त्या सत्पुरुषांनी पू.मामांना जवळ बोलावले. मामा देखील एका अनामिक ओढीने खेचले गेले. त्या सत्पुरुषांनी आपल्या आसनावरच थोडे सरकून मामांना बसवून घेतले आणि म्हणाले, " सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराज व आपल्या मातुःश्रींची आपल्यावर पूर्णकृपा आहे ! " त्याबरोबर पू. मामांचे डोळे मिटले गेले आणि त्यांना तीव्र भस्रिका होऊ लागली. त्यानंतर जवळपास दीड तास प.पू.मामा प्रगाढ समाधीत होते. समाधीतून उठल्यावर मात्र त्यांनी त्या सत्पुरुषांच्या श्रीचरणांवर आपल्या अश्रूंनी अभिषेक केला व दंडवत घातला. ते सत्पुरुष म्हणजेच प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे शिष्योत्तम व श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू, योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराज हे होते. त्यांना पाहिल्यावरच पू.मामांना अंतरीची खूण पटली व पूर्वी मातु:श्रींनी दीक्षा दिली त्यावेळसारखाच समाधीचा अनुभव पुन्हा आल्यावर तर पक्की खात्री झाली की, हेच आपले मंत्रगुरु आहेत.
लगेचच श्रीगुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर प.पू.श्री.मामांना योगिराज श्री.गुळवणी महाराजांनी, प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांकडून आलेला सांप्रदायिक महामंत्र शक्तिपातपूर्वक प्रदान केला. त्याचबरोबर परंपरेचे उत्तराधिकारही लेखी प्रदान केले. पू.श्री.गुळवणी महाराजांना त्याच दिवशी पहाटे प.प.श्री.टेंब्येस्वामींचे साक्षात् दर्शन झाले व ते म्हणाले, "श्रीपाद आमचीच विभूती आहे, त्याला महामंत्र प्रदान करावा व त्याला सांभाळावे. कुरवपूरला अनुष्ठानासाठी पाठवावे. तेथे त्याला श्रीदत्तप्रभूंचा कृपाप्रसाद लाभेल."
श्री.गुळवणी महाराजांच्या अनुग्रहानंतर पू.मामांची साधना आणखी तीव्रतेने सुरू झाली. त्यांचे कुरवपूरचे अनुष्ठानही फारच अप्रतिम झाले. त्या अनुष्ठानासंबंधी स्वतः पू.मामांनीच अतिशय अद्भुत लेखन करून ठेवलेले असून ' तीर्थदर्शन ' नावाच्या त्यांच्या ग्रंथात ते छापलेले आहे. या काळात त्यांना अद्भुत दर्शने झाली. तसेच स्वतः भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी दिव्य पादुका प्रसाद दिला. त्या अतिदिव्य पादुकांची त्यांनी शेवटपर्यंत पूजा-अर्चा केली व त्यांच्या देहत्यागानंतर, त्यांनीच पूर्वी देवांची जशी परवानगी घेतलेली होती त्यानुसार, त्या पादुका त्यांच्या मुखात ठेवल्या गेल्या. या पादुकांच्या अभिषेक तीर्थाने अनेक भक्तांना अद्भुत अनुभव आलेले होते, अनेकांच्या व्याधी, पिशाचबाधा त्या तीर्थाने नष्ट झाल्या होत्या. आश्चर्य म्हणजे पू.मामांच्या घराण्यात असा दिव्य पादुकाप्रसाद त्यांच्या वडलांना व आजोबांनाही प्राप्त झालेला होता. श्रीदत्तप्रभू सलग तीन पिढ्या पादुकारूपाने या घराण्यातील महापुरुषांकडून सेवा स्वीकारत होते.
कुरवपूरच्या अनुष्ठानानंतर भगवंतांच्या आज्ञेने त्यांनी संपूर्ण भारताची तीर्थयात्रा केली. प्रथम दक्षिणेकडील तीर्थे, अष्टविनायक, जगन्नाथपुरी, गया, काशी करून हिमालयातील चार धाम करून मग ते पुन्हा आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी पुण्यात परतले. सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांना पू.मामांना मिळालेला श्रीपादुकाप्रसाद पाहून अतीव आनंद झाला. त्यांनी पुढील बारा वर्षे तीव्र साधना करण्याची व तोवर हा प्रसाद गुप्त ठेवण्याची आज्ञा केली. पू.मामांनी देखील ती आज्ञा तंतोतंत पाळली.
https://www.facebook.com/sadgurubodh/
कुरवपूरच्या अनुष्ठानाला जाण्यापूर्वी श्री.गुळवणी महाराजांच्या आज्ञेने पू. मामा भगवान श्री माउलींची प्रार्थना करण्यासाठी आळंदीला आले होते. त्याचवेळी भगवान श्री ज्ञानेश्वर माउली समाधीतून प्रत्यक्ष प्रकटले आणि त्यांनी पू.मामांच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवून अनुग्रह केला. अशाप्रकारे प.पू.श्री.मामा हे श्रीदत्त, श्रीनाथ आणि श्रीभागवत (वारकरी) अशा तिन्ही प्रमुख संप्रदायांचे श्रेष्ठ अध्वर्यू ठरले. त्यांच्या ठिकाणी श्रीदत्तसंप्रदायाच्या दोन परंपराशाखा, मातु:श्रींकडून राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी महाराजांची शाखा व श्रीगुळवणी महाराजांकडून भगवान श्रीमन्नृसिंहसरस्वती स्वामी - प.प.टेंब्येस्वामींची शाखा, शिवाय श्रीमाउलींकडून नाथ व भागवत संप्रदाय व श्रीगुळवणी महाराजांकडून शक्तिपात संप्रदाय, अशा तिन्ही संप्रदायांच्या चार परंपरा शाखांचा अद्भुत संगम झालेला होता. एकाचवेळी इतक्या शाखांचा एकाच ठिकाणी संगम झालेला अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. प.पू.श्री.मामांच्या अनेक लीलावैशिष्ट्यांपैकी हे एक प्रमुख वैशिष्ट्य होते !
संप्रदाय सेवा-कार्य
सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांनी प.पू.श्री.मामांना त्यांच्या दीक्षासमयीच इतरांना दीक्षा देण्याचे अधिकार लेखी दिलेले असले, तरी १९६१ सालापर्यंत मामा कोणलाही दीक्षा देत नसत. १९६१ साली मिरजेत एका प्रसंगाने अचानक त्यांच्याकडून पहिली दीक्षा झाली. त्यानंतर मात्र ईशकृपेने त्यांचे दीक्षाकार्य फार मोठ्या प्रमाणावर वाढले. श्री.गुळवणी महाराजांचे जवळपास ७० हजार अनुगृहीत होते. प.पू.श्री.मामांच्याकडून ७४ हजार साधकांना दीक्षा झाल्या त्यांच्या हयातीत.
योगिराज श्री.गुळवणी महाराज देखील अनेक साधकांना प.पू.श्री.मामांच्यावर सोपवत. " प.पू.श्री.मामा आणि आम्ही काही भिन्न नाही ", असे श्रीमहाराजांनी अनेकांना सांगितलेले होते. एवढे असूनही पू.मामा प्रत्येकवेळी दीक्षा झाल्यावर साधकांना आवर्जून सांगत की, " आम्ही दीक्षेसाठी निमित्त झालेलो असलो तरी आपले श्रीगुरु योगिराज श्री.गुळवणी महाराजच आहेत." पू.मामांनी आपले शिष्यपणच शेवटपर्यंत मनापासून जपलेले होते. त्यांनी कधीच गुरु होऊन मिरवले नाही.
प.पू.श्री.मामांना ह.भ.प.श्री.केशवराव महाराज देशमुखांनी स्वप्नात येऊन त्यांच्या ग्रंथांची प्रकाशने करण्याची व त्यांच्या घरात पुन्हा ज्ञानेश्वरी प्रवचने करण्याची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे प.पू.श्री.मामांनी सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांच्या संमतीने, ' ज्ञानेश्वरीचे सुलभ गद्य रूपांतर ' हे देशमुख महाराजांचे पुस्तक ३ खंडांत प्रकाशित केले. नारदभक्तिसूत्रे, अभंगमालिका अशी त्यांची इतरही काही पुस्तके तसेच ' संतकृपा प्रतिष्ठान ' व ' संतकृपा ' मासिकाची सुरुवात केली. देशमुख माडी विकत घेऊन ' श्रीज्ञानेश्वरी निवास ' असे नामकरण करून श्री.गुळवणी महाराजांच्या हस्ते उद्घाटन करून तेथे नित्य प्रवचनसेवा सुरू केली.
श्री.गुळवणी महाराजांनी एकदा प.पू.श्री.मामांना विचारले, "तू सार्वभौम राजाचा प्रधान होऊन राहणार की स्वतंत्र राजा होणार?" प.पू.श्री.मामा उत्तरले, "मी मांडलिक राजा होणार." त्यावर श्री.गुळवणी महाराज म्हणाले, "ठीक आहे, मग संप्रदाय कार्यासाठी तू स्वतंत्र पीठ स्थापन कर, आमचे पूर्ण आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. श्रीदत्तप्रभू प्रचंड कार्य करवून घेतील तुझ्याकडून!" श्रीमहाराजांचे हे शब्द जसेच्या तसे खरे ठरलेले आज आपल्याला पाहायला मिळत आहेत.
श्रीगुरुमहाराजांच्या या आदेशानुसार प.पू.श्री.मामांनी सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी जवळ जागा विकत घेऊन तेथे एक वास्तू निर्माण केली. पौष शुद्ध द्वितीया दि.२६ डिसेंबर १९७३ रोजी या ' माउली ' आश्रमाची वास्तुशांती झाली. श्री.गुळवणी महाराज आजारी असल्याने प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत, पण त्यांच्या पादुका आणवून त्या अधिष्ठानाखाली सर्व सोहळा संपन्न झाला. माउलीच्या वास्तुशांतीनंतर लगेचच प.पू.श्री.गुळवणी महाराजांनी १५ जानेवारी १९७४ रोजी नश्वर देहाचा त्याग केला. आजमितीस प.पू.श्री.मामांची 'माउली' ही जगभरातील लाखो साधकांची चिरंतन साउली ठरलेली आहे !
प.पू.श्री.मामांनी श्री.गुळवणी महाराजांकडून आलेल्या परंपरेचे उत्तमरित्या जतन-संवर्धन करून जगभर विस्तारही केला. १९७३ साली ज्ञानेश्वरीच्या प्रचार प्रसार कार्यासाठी ते इंग्लंडला देखील जाऊन आले होते. तेथेही अनेकांना दीक्षा झाल्या, संत वाङ्मयाचे मार्गदर्शन झाले. पू.मामा नेहमी म्हणत असत, "आमच्या संप्रदायात दीक्षेचा प्रचार प्रसार नाही. फक्त तत्त्वज्ञानाचा व संतवाङ्मयाचा, ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार आम्ही करतो. ' ये लेने देने की नही होने पाने की बात है । ' श्रीभगवंतांच्या इच्छेशिवाय व जीवाची कर्मसाम्यदशा आल्याशिवाय आणि त्याचा गुरूंशी पूर्व ऋणानुबंध असल्याशिवाय कधीही दीक्षा होत नसते. येथे मनमानी चालत नाही." त्यामुळे सरसकट सामुदायिक दीक्षा देणे किंवा घाऊक भावात दीक्षा देणे असले थिल्लर प्रकार श्री.गुळवणी महाराजांना व पू.मामांना अजिबात मान्य नव्हते. ते असल्या गोष्टींचा कडाडून विरोध करीत. पण आता कलियुगाचेच फळ म्हणून की काय, पण या अद्भुत दीक्षा संप्रदायाचे, प्रसिद्धी व पैसा यांच्या तीव्र वासनेपायी तथाकथित गुरुबाजी करणा-या मंडळींनी पार बाजारीकरण करून टाकलेले आहे. पण हे स्वरूप कधीच या थोर महात्म्यांना मान्य नव्हते. त्यांनी त्यांच्या हयातीत वेळोवेळी असल्या शास्त्रविरुद्ध प्रकारांवर ताशेरे ओढलेले आहेत.
याच संप्रदाय सेवाकार्याचा एक मुख्य भाग म्हणून विविध ठिकाणी साधकांची साधना शिबिरे आणि तीर्थयात्रांचे आयोजन केले जात असे. शिवाय परंपरेतील महात्म्यांच्या जयंती-पुण्यतिथी उत्सवांच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम संपन्न होत असत. प.पू.श्री.मामांची या सर्व कार्यासाठी प्रचंड भ्रमंती होत असे. अवघा भारत देश त्यांनी या कार्यासाठी पिंजून काढला, श्रीस्वामी समर्थ महाराजांचे, श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे, श्री.गुळवणी महाराजांचे नाव आणि उज्ज्वल कीर्ती त्यांनी दशदिशांत पोहोचवली.
प.पू.श्री.मामांना यज्ञ-यागादी उपासनांचेही अतीव प्रेम होते. देश-धर्म-जनहितार्थ त्यांनी अनेक यज्ञ-याग संपन्न केले. नवचंडी, शतचंडी, महारुद्र, लक्ष्मीयाग, गणेशयाग, श्रीदत्तमालामंत्र स्वाहाकार, विष्णुयाग आदी विविध ठिकाणी संपन्न झाले. श्री.गुळवणी महाराजांच्या आज्ञेने त्यांनी श्रीनृसिंहवाडी क्षेत्री १९८४ साली अतिभव्य अतिरुद्र स्वाहाकार संपन्न केला. हा 'न भूतो न भविष्यति' झालेला यज्ञसोहळा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. या यागामध्ये एक अलौकिक घटना घडली होती. श्री.गुळवणी महाराजांनी पू.मामांना पूर्वी सांगितले होते की, "तुमच्या अतिरुद्र यागात आम्ही उपस्थित राहू !" प्रत्यक्षात हा याग महाराजांनी देह ठेवल्यानंतर आठ वर्षांनी झाला. त्याच्या अवभृथ स्नान यात्रेत हत्तीवरून पू.मामांची मिरवणूक चालू होती. त्यावेळी अचानक अलौकिक प्रकाशाचा लोळ पू.मामांसमोर प्रकटला व खाली जाऊन ब्रह्मवृंदाच्या मध्ये त्यातून श्री.गुळवणी महाराज साकारले. पू.मामांनी त्यांना तेथूनच वाकून नमस्कार केला. महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिले व ते अदृश्य झाले. सर्वात मोठे आश्चर्य तर पुढे आहे, त्या प्रसंगाचा नेमका कोणीतरी फोटो काढला ज्यात श्री.गुळवणी महाराज स्पष्ट दिसतात. तो फोटो पू.मामांच्या ' रूपसुधा ' या छायाचित्र संग्रहात प्रकाशित केलेला आहे.
पू.श्री.मामांनी संप्रदायसेवा म्हणून विशुद्ध परमार्थाच्या प्रचार प्रसारासाठी प्रचंड कष्ट करून अनेक ग्रंथ प्रकाशित केले, त्यासाठी त्यांनी श्रीवामनराज प्रकाशनाची स्थापना केली. गुरुभक्ती व कृपायोगाच्या अभ्यासाला वाहिलेले 'श्रीवामनराज' नावाचे एक त्रैमासिकही सुरू केले.जवळपास अडीचशे ग्रंथ प्रकाशित करणारे हे प्रकाशन आजमितीस सर्व आध्यात्मिक प्रकाशन संस्थांमध्ये अग्रगण्य मानले जाते. एकाहून एक सुंदर व बोधप्रद ग्रंथ या प्रकाशनाने प्रकाशित करून साधकांना ३०% सवलतीत उपलब्ध करून देऊन पू.मामांचे दिव्य स्वप्न सत्यात उतरवलेले आहे.
( क्रमश: )
http://sadgurubodh.blogspot.in
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

9 Mar 2018

झळाळते अलौकिक श्रीदत्तब्रह्म - पंचम उन्मेष

पंचम उन्मेष
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )
विलक्षण अधिकार
सद्गुरु मातु:श्री पू.पार्वतीदेवी देशपांडे या राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामीसमर्थ महाराजांच्या कृपा-परंपरेतील अद्वितीय विभूतिमत्त्व होत्या. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलेली स्थितप्रज्ञाची, प्राप्तपुरुषाची, अनन्यभक्ताची, ज्ञान्याची अशी सर्व दिव्य गुणवैशिष्ट्ये एकाचवेळी त्या अंगी मिरवीत होत्या. मेणाहून मऊ आणि त्याचवेळी वज्राहूनही कठोर असणे, सामान्य माणसाला जमणारच नाही कधी. मातु:श्री ते लीलया करीत असत. पू.पार्वतीबाई अशा महासिद्धांनाही मार्गदर्शन करतील एवढ्या थोर योग्यतेच्या होत्या. त्या आपल्या दैवी सद्गुणांनी राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांची कन्या शोभतात. म्हणूनच त्यांचे "श्रीस्वामीतनया" हे नाम यथार्थ आहे. त्यांचे चरित्र हा परमार्थ मार्गातील साधकांसाठी अक्षय बोध-ठेवा आहे. त्यानुसार जर एखाद्याने आपली साधकीय मनोवृत्ती, विचारांची पद्धत व दिनचर्या ठेवली, तर परमार्थाचा अत्यंत कठीण पण अद्भुत व मनोहर प्रांत निश्चितच आपलासा होईल.
पू.दत्तूअण्णांनी देह ठेवण्यापूर्वी काही दिवस आधी राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज त्यांच्यासमोर प्रकटले व म्हणाले, "बये, तुला आता दुर्दैवाचे दशावतार पाहायचे आहेत, तयार आहेस ना?" त्यावर मातु:श्रींनी शांतपणे पण आदरपूर्वक विचारले, "आपण आणि माझे भगवंत त्यावेळी माझी साथ सोडून जाणार का?" श्रीस्वामी महाराज म्हणाले, "अगं, बाप कधी पोरीला एकटे सोडतो का असा?" त्यावर तितक्याच निर्धाराने मातु:श्री उत्तरल्या, " महाराज, मग कितीही भयंकर असे दुर्दैवाचे दशावतारच नाहीतर शतावतार देखील बघायला मी आनंदाने तयार आहे !" आपल्या लाडक्या पोरीची ही ' तयारी ' पाहून श्रीस्वामी महाराज प्रसन्नतेने हसले. साक्षात् श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या मांडीवर बालपणी खेळलेल्या होत्या पार्वतीदेवी. त्यांचा अद्भुत अधिकार आपल्याला वर्णन करता येईल थोडाच?
त्या प्रसंगानंतर काही दिवसांनीच पू.दत्तूअण्णांनी देह ठेवला व मातु:श्रींवर दु:खांचे, कष्टांचे डोंगरच्या डोंगर कोसळू लागले. पण किंचितही विचलित न होता, कसलाही किंतू मनात न आणता, त्यांचे साधन व भगवत् अनुसंधान तसल्या भयानक काळातही विनाखंड चालू होते. "जशी हरीची इच्छा !" या एका वाक्यावरच त्यांनी सर्व काही सोडलेले होते. श्रीसद्गुरुचरणीं पूर्ण शरणागत होऊन त्यांनी शांतपणे ते बिकट प्रारब्धही आनंदाने सहन केले. केवढे धैर्य हवे यासाठी ! आपण बारकेसे संकट आले तरी लगेच निराश होऊन दैवाला व देवांना दोष देत बसतो. अगदी तुटपुंजी, नावापुरती उपासना आपण केलेली असते, पण अशा संकटांमध्ये आपला आव असा असतो की बस. आम्ही "एवढे" देवांचे करतो तरी ते आमच्याकडे लक्ष देत नाहीत, आम्हांला दु:ख कसे भोगायला लावतात....वगैरे बडबड आपण करू लागतो. त्यावेळी आपला विश्वास पार रसातळाला जातो. खरेतर अशी परिस्थिती बदलण्याचा हक्काचा उपाय असणारे हातचे साधन सोडून आपण नुसते दु:खाचे कढ काढत बसतो. हाच आपल्यामधला व संतांमधला महत्त्वाचा फरक आहे. मातु:श्री पार्वतीदेवींच्या अंगी परमार्थ परिपूर्ण मुरलेला होता, म्हणूनच त्या अवघड परिस्थितीतही त्यांच्या मनाची शांती ढळली नाही की त्या विचलित झाल्या नाहीत. साधक म्हणून आपण याचे सतत मनन करायला हवे.
http://sadgurubodh.blogspot.in
मातु:श्री पू.पार्वतीबाईंच्या अलौकिक करारीपणाचा एक विलक्षण प्रसंग मुद्दाम सांगतो. प.पू.श्री.मामांचा पाठचा भाऊ, यशवंत हा व्यसनाधीन झालेला होता. पू.मातुःश्रींनी त्याला गोड बोलून बरेच वेळा समजावून सांगितले पण त्याने सुधारणा केली नाही. शेवटी सद्गुरु श्रीस्वामी महाराजांचा कौल घेऊन त्यांनी एकदा त्याला कडक शब्दांत विचारले. तो काहीच उत्तरला नाही. त्यावेळी पू.मामांनीही त्याला समजवायचा प्रयत्न केला. पण त्याने मामांनाच उलट उत्तरे द्यायला सुरू केले. त्यासरशी मातुःश्रींनी त्याला घराबाहेर काढले आणि "पुन्हा या घराची पायरी चढू नकोस !" म्हणाल्या. त्यावेळी त्या उंब-याच्या बाहेर बसलेल्या होत्या. तिथूनच त्यांनी पू.मामांना पाणी तापवायला सांगितले व पाणी तापल्यावर यशवंताच्या नावाने अंघोळ करूनच त्या घरात आल्या. पुन्हा कधीही यशवंताला त्या घरात प्रवेश मिळाला नाही. केवढे धाडस म्हणायचे हे ! आपल्या परमार्थासाठी, नैतिकतेसाठी अडसर झालेल्या पोटच्या पोरालाही असे क्षणात, मनावर माया-मोहाचा तरंगही न उठू देता दूर करणे हे एक आई म्हणून फार फार अवघड आहे. आपण त्याचा साधा विचारही करू शकणार नाही. त्यासाठी खरोखरीच अत्यंत अद्भुत अधिकार आणि आपल्या ध्येयाविषयी तीव्र तळमळ हवी. असा विलक्षण पारमार्थिक अधिकार होता मातुःश्रींचा ! "देव मिळवायचे तर संसारातल्या कुठल्याही पाशात अगर कुठल्याही वाईट गोष्टीत अडकून राहायचे नाही", हा एक फार महत्त्वाचा धडा मामा त्यादिवशी शिकले.
पू.मामांचा लौकिक संसार
प.पू.मातुःश्रींनी आपल्या नात्यातीलच बबी बोपर्डीकरशी प.पू.श्री.मामांचा विवाह करून दिला होता. सौ.इंदिरा बनून बबी मातु:श्रींच्या घरात प्रवेशली. परंतु नियती वेगळीच होती. सौ.इंदिरा आपल्या नवजात पुत्रासह पहिल्या बाळंतपणातच निवर्तली. मामांची वृत्ती मुळातच वैराग्यपूर्ण असल्याने त्यांना संन्यास घेण्याची तीव्र इच्छा होऊ लागली. त्यावर पू.मातु:श्रींनी त्यांची समजूत घातली की, "तुझ्या प्रारब्धात संन्यास नाही, तुला लग्न करायला हवे. पुढे तुला एक मुलगा होईल." त्याप्रमाणे त्यांनी ओळखीच्याच आपटीकर यांच्या शांताशी पू.मामांचे दुसरे लग्न ठरवले देखील. तिची पत्रिका पाहिल्यावर मामा म्हणाले, "आई, ही पण अल्पायुषी आहे." मातुःश्री म्हणाल्या, " माहीत आहे, पण मी आता शब्द दिलाय. तुला लग्न करावेच लागेल." या चर्चेच्या दुस-याच दिवशी मातु:श्रींनी देहत्याग केला.
मातुःश्रींच्या देहावसानानंतर लगेचच प.पू.श्री.मामांचा द्वितीय विवाह झाला. पण तोही अल्पकाळच टिकला. द्वितीय पत्नी देखील बाळंतपणातच अपत्यासह निवर्तली. प्रथेप्रमाणे रुईच्या झाडाशी तिसरा विवाह होऊन बाळेकुंद्रीच्या रंगराव हुद्दारांच्या शकुंतलाशी पू.मामांचा चाैथा विवाह झाला. शकुंतलाची सौ.लक्ष्मी झाली. यांची प.पू.श्री.मामांवर प्रचंड भक्ती होती. दोन वर्षांच्या संसारात त्यांना एक पुत्र झाला. त्यानंतर मंगळागौरीचे खेळ खेळताना पडून सौ.लक्ष्मी यांचे कंबरेचे हाड मोडले. त्यांनी अंथरुण धरले. त्या आजारपणात प.पू.श्री.मामा आपल्या पत्नीची मनापासून सेवा करीत असत. त्यासाठी त्यांनी आपला व्यवसायही बंद केला. त्यांना शिवलीलामृत आवडते म्हणून ते वाचून दाखवीत. पू.मामांनी त्यांना, "भगवंतांचे स्मरण करीत जावे ", असे सांगितले की त्या म्हणत, "माझा देव माझ्या नित्यपूजनात आहे." पण त्यांनी त्यांच्या देवाचा फोटो कधीच मामांना दाखविला नाही. त्या आजारपणातच त्यांचा अंत झाला. आपल्या पतीच्या मांडीवर डोके ठेवून, पतिमुखी दृष्टी ठेवून अहेवपणी जाण्याचे दुर्लभ भाग्य त्यांना लाभले. त्या गेल्यावर उत्सुकतेने प.पू.श्री.मामांनी त्यांच्या उशाजवळचा फोटो पाहिला तर तो मामांचाच होता. इतक्या त्या थोर पतिव्रता होत्या. सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे प.पू.श्री.मामांच्याही नित्याच्या पूजेत शेवटपर्यंत सौ.लक्ष्मी यांचा एक छोटा फोटो होता. पती-पत्नीच्या इतक्या भावोत्कट आणि अलौकिक प्रेमनात्याचे दुसरे उदाहरण क्वचितच सापडेल ! म्हणतात ना, भक्त जेवढे देवांवर प्रेम करतो त्याच्या कैकपटींनी देव भक्तावर प्रेम करतात. देवच खरे भक्त असतात, हेच या भावपूर्ण गोष्टीतून पाहायला मिळते.
वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी प.पू.श्री.मामांचा लौकिक संसार संपला. सौ.लक्ष्मी यांनी आपल्या लहानग्याला, श्रीनिवासला मृत्यूपूर्वीच आपल्या भावजयीच्या हवाली केले होते. श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने १५ जून १९४८ रोजी प.पू.श्री.मामांनी गृहत्याग केला. त्यावर्षीची आषाढी वारी झाल्यावर लगेचच बनेश्वर स्थानी त्यांनी पहिले श्रावण अनुष्ठान केले. तेथे त्यांना एका महासिद्धांचे दर्शन लाभले.
१९३६ पासूनच प.पू.श्री.मामांनी पंढरीची वारी करण्यास मातृआज्ञेने सुरुवात केलेली होती. पहिली १२ वर्षे अत्यंत खडतर अशी ' पडशीची वारी ' झाली. १९४८ नंतर त्यांनी ह.भ.प.केशवराव देशमुख महाराजांच्या दिंडीतून जाण्यास सुरुवात केली. १९८० पर्यंत या दिंडीतून व त्यानंतर शेवटपर्यंत पुढे स्वतंत्रपणे ते वारी करीत होते.
बनेश्वरचे अनुष्ठान झाल्यावर प.पू.श्री.मामा राजकोट येथे राहावयास गेले. तेथे सौराष्ट्र परिवहन खात्यामध्ये त्यांनी नोकरी धरली. राजकोट येथील कैवल्यधाम योगाश्रमाच्या शाखेतील स्वामी दिगंबरजींबरोबर त्यांचे स्नेहबंध जुळले आणि त्यांच्या विनंतीवरून ते योगाश्रमातच राहावयास गेले. स्वामी दिगंबरजींनी त्यांना हठयोगाच्या अनेक क्रिया शिकवल्या. ७२ तासांपर्यंत मातीमध्ये स्वतःला पुरून घेऊन राहण्याची विद्या पू.मामांना साधली होती. तसेच पूर्वजन्मीच्या जलसंकर्षिणी, प्राणसंकर्षिणी इत्यादी अनेक अद्भुत विद्याही त्यांच्याठायी आपोआप प्रकटल्या. दिगंबरजींबरोबर अनेकदा हिमालय यात्राही झाल्या. गिरनारची वारीही त्याच सुमारास सुरू झाली. प.पू.श्री.मामांनी आपल्या आयुष्यात एकूण सहा वेळा हिमालय, दोन वेळा अमरनाथ, एकवीस वेळा गिरनार, पाच वेळा रामेश्वर; द्वारका, कुरवपूर इत्यादी अनेकवेळा, एकदा मानससरोवर, तुंगनाथ, पायी नर्मदा परिक्रमा इत्यादी यात्रा, पंढरीची वारी सलग ५३ वर्षे, इतक्या तीर्थयात्रा केल्या. नुसती यादी वाचूनच आपण आश्चर्याने थक्क होतो. त्यांचे असे वैशिष्ट्य पू.शिरीषदादा सांगतात की, भारतात असे एकही तीर्थक्षेत्र नाही जेथे मामा गेलेले नाहीत. त्यांना त्या सर्व तीर्थांचे पौराणिक व आध्यात्मिक माहात्म्य पुरेपूर माहीत असे. तेथील लोकांना ते वैयक्तिक ओळखतही असत.
https://www.facebook.com/sadgurubodh/
प.पू.श्री.मामांचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास प.पू.मातुःश्रींच्या मार्गदर्शनानुसार सुरू होताच. विष्णुप्रयागला झालेल्या भगवान श्री माउलींच्या विष्णुरूपातील दिव्य दर्शनानंतर त्यांना ज्ञानेश्वरीचे गूढ अर्थही आपोआपच उलगडू लागले. परंतु त्यांचा अभ्यास स्वांतःसुखायच होता. १९५३ च्या रामनवमीच्या दिवशी मात्र एका विलक्षण घटनेने त्यांनी पहिल्यांदा प्रवचनसेवा केली. राजकोटच्या राममंदिरात कैवल्यधामाच्या वतीने प्रवचनसेवा असे. पण त्यावर्षी ठरलेले प्रवचनकार येऊ न शकल्याने मामांनाच सेवा करावी लागली. त्यांच्या अद्भुत विवरणशैलीमुळे लोकांना त्यांचे ते पहिलेवहिले प्रवचन खूप भावले आणि आयुष्यभराच्या एका प्रबोधनलीलेचा शुभारंभ झाला. आपल्या हयातीत प.पू.श्री.मामांनी अक्षरशः हजारो प्रवचने केली. त्यांनीच स्थापन केलेल्या ' श्रीवामनराज प्रकाशन ' या संस्थेने त्यांच्या प्रवचनांवर आधारित अनेक ग्रंथ प्रकाशित केलेले असून ते अभ्यासकांनी वाखाणलेलेही आहेत. जवळपास चार हजार पृष्ठांचे अपूर्व असे पू.मामांचे वाङ्मय आजवर प्रसिद्ध झालेले आहे. त्यातून प्रकट होणारे पूू.मामांचे संतवाङ्मयाचे सखोल व अभिनव चिंतन खरोखरीच विलक्षण आहे. माउलींच्या कृपेने त्यांची ऋतंभरा प्रज्ञा जागृत झालेली होती आणि म्हणूनच संतांच्या शब्दांचे अचूक मर्म ते नेमके सांगू शकत असत.
प.पू.मातुःश्री पार्वतीदेवींनी सांगितल्याप्रमाणे प.पू.श्री.मामांचे तीव्रतम तप चालू होते. राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाने आणि नित्य कृपाछत्राने पू. मामांचा साधना पारिजात पूर्ण बहरला होता. जोडीने ज्ञानेश्वरीचे चिंतनही चालू होतेच. आता मामांना तळमळ लागली होती ती मंत्रप्रदात्या सद्गुरूंच्या भेटीची. मातु:श्रींनी भाकित केलेला बारा वर्षांचा काळही आता संपत आला होता. त्यामुळे ती तळमळही दिवसेंदिवस वाढत चाललेली होती. त्यातच १९५४ साल उजाडले. पू.मामा नेहमीप्रमाणे राजकोटहून आळंदीला येऊन आषाढी वारीत सामील झाले. आषाढी एकादशीला वारी पूर्ण झाली. त्यावेळी एक अद्भुत घटना त्यांची वाट पाहात होती. पू.मामांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ती घटना आपण उद्या पाहू.
( क्रमश: )
( प.पू.श्री.मामांचे प्रासादिक वाङ्मय ३०% सवलतीत मिळविण्यासाठी संपर्क क्रमांक -
श्रीवामनराज प्रकाशन, पुणे - 020-24356919 )
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

8 Mar 2018

झळाळते अलौकिक श्रीदत्तब्रह्म -चतुर्थ उन्मेष

चतुर्थ उन्मेष
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )
काळरात्रीच्या गर्भगृहात
देशपांडे कुटुंबात सर्वकाही छान चालू होते. पू.मामांचा धाकटा भाऊ यशवंताही मोठा होऊ लागला होता. नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर दत्तूअण्णा जरा गंभीरच असत. ते आपल्याच आनंदात रममाण होऊन बसलेले असत. त्यांना आता पैलतीराची ओढ लागलेली होती. ६ मे १९२८ रोजी पू. दत्तूअण्णांनी श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेने योगमार्गाने देह ठेवला. दत्तूअण्णांचे दिवसपाणी झाल्याबरोबर, त्यांचे दत्तक गेलेले थोरले भाऊ सीताराम काका यांनी मातुःश्री पार्वतीदेवी व मामांना सगळ्या संपत्तीतून बेदखल करीत नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढले. जानकीबाईंनी वाटण्या केलेल्या होत्या ख-या, पण दुर्दैवाने कागदोपत्री नाव मोठ्या मुलाचेच राहून गेले होते. त्याचा सीतारामकाकांनी फायदा घेतला. याही प्रसंगी मातुःश्री कमालीच्या शांत राहिल्या. जशी हरीची इच्छा म्हणून ही साध्वी कसलाही त्रागा न करता घराबाहेर पडली. संतांच्या ठायी परमार्थ किती मुरलेला असतो, याचे जिवंत उदाहरणच होत्या पू.मातु:श्री पार्वतीबाई.
पू.पार्वतीबाईंचे बंधू पू.नरहरीमामा सोनटक्के त्यांना पुण्याला घेऊन आले. मंडई जवळच्या रानडे वाड्यात खोली भाड्याने घेऊन पू.पार्वतीदेवी व मामा राहू लागले. इतक्या भयंकर परिस्थितीतही, देव व सद्गुरूंच्या कृपेने, त्यांच्याच स्मरणात पराकोटीची शांती बाळगून अखंड कार्यरत असणा-या आपल्या मातुःश्रींच्या वर्तन व विचारांचा फार मोठा संस्कार पू.मामांच्या अंतःकरणावर कायमचा कोरून ठेवला गेला होता.
श्री.दत्तूअण्णांच्या अकाली निधनाने परिस्थिती एकदम बदलून गेली. मामांचे थोरले बंधू गोविंदराव यांची वृत्ती आधीपासूनच अलिप्त होती. या सर्व गोंधळात त्यांची पत्नी राधा प्रसूत झाली आणि राधाचे वडील अचानक निवर्तले. नातू आजोबांच्या मुळावर आला म्हणून ओल्या बाळंतिणीला त्यांनी देशपांड्यांकडे पाठवून दिले. त्यातच काकांचे हे असे वागणे. राधाला या सर्व घटनांचा इतका धसका बसला की तिने अंथरुण धरले आणि त्यातून ती सावरलीच नाही. लहान पोर शंभूला मागे ठेवून राधा गेली. गोविंदरावांनी घर सोडले व ते संन्यास घेण्यासाठी निघून गेले.
पू.श्री.दत्तूअण्णांनी मामांचे पुण्याच्या भारत इंग्लिश स्कूल मध्ये नाव घातलेले होते. शिक्षण सुरू झाले नाही तोच अण्णा गेले. त्यामुळे मामांना शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाच्या भरण-पोषणाची जबाबदारी इतक्या लहान वयात अंगीकारावी लागली. वर्तमानपत्रे वाटणे, साबण-तेल इत्यादी विकणे, शिकवण्या घेणे असे उपक्रम मग सुरू झाले. पुढे एका छापखान्यात लहानशी नोकरी लागली. पण संकटे कधी एकटी येत नाहीत. त्या छापखान्यात प.पू.श्री.मामांना शिशाचे खिळे वापरताना लेड पॉयझनिंग झाले. ४२ दिवस मातुःश्रींनी त्यांना पूर्णपणे दुधावर ठेवले होते आणि आपल्या वैद्यकीय कौशल्यावर त्या जीवघेण्या विषबाधेतून सुखरूप बाहेर काढले.
त्यासुमारास स्वातंत्र्य चळवळ जोरात चालू होती. भैरवनाथ तालमीचे क्रमांक दोनचे कुस्तीपटू असणारे देव-देशाभिमानी पू.मामा या चळवळीत सहभागी झाले. असहकार, चले जाव, स्वदेशी, सविनय कायदेभंग इत्यादी सर्व चळवळींमध्ये पू.मामा पुढाकाराने कार्यरत होते. १९३० साली एका मोर्च्याचे नेतृत्व करीत असताना प.पू.श्री.मामांनी पुण्याच्या बुधवार चौकात, हॅमंड नावाच्या अधिका-याने मारलेली गोळी उंच उडी मारून सहज चुकविली होती. त्यावेळच्या केसरी आदी वृत्तपत्रांनी त्यांच्यावर लेख छापून कौतुकाचा वर्षाव केला होता.
घरची परिस्थिती ओढाताणीची असूनही प.पू.श्री.मामांचा सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भरपूर सहभाग असे.
प.पू.श्री.मामा हे अतिशय उत्तम नट आणि दिग्दर्शक होते. कथेचे मर्म अचूक जाणून ते नटांना मार्गदर्शन करीत. त्यांनी त्यावेळी दिग्दर्शित केलेली १८ नाटके रंगभूमीवर गाजलेली होती. त्यावेळचे प्रसिद्ध नट त्यांच्या नाटकांमधून कामे करीत. नटवर्य बालगंधर्वांशी देखील पू. मामांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अनेक नाटकांचे मुहूर्त पू.मामांनीच काढून दिलेले होते. पू.मामांनी लिहिलेले भगवान श्री माउलींच्या जीवनावरील " चैतन्यचक्रवर्ती " हे संगीत नाटक त्यांच्या नाट्यक्षेत्रातील व्यासंगाचे दर्शन घडवते.
पू.मातुःश्री पार्वतीदेवींचे मामांच्या जडणघडणीकडे बारीक लक्ष होतेच. ते सामाजिक कार्यात मग्न असले तरी रोजचे साधन, नित्यनेम व्यवस्थित आणि वाढत्या प्रमाणात होत आहे ना, याकडे मातुःश्री लक्ष देत. मूळचाच अधिकार अलौकिक असल्याने प.पू.श्री.मामांचे आध्यात्मिक अनुभवही फार उत्तम दर्जाचे होते.
विविध छोट्या मोठ्या नोक-या करीत करीत शेवटी प.पू.श्री.मामा खडकीच्या अॅम्युनेशन फॅक्टरीत कामाला लागले. त्यावेळी त्यांना मातुःश्रींनी ज्ञानेश्वरीची गोडी लावलेली होती. त्यांनी कसून अभ्यासाला सुरुवात केली. फॅक्टरीत जाता-येता सायकलच्या हँडलला लावलेल्या पॅडवर लिहिलेल्या श्री ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचे त्यांचे चिंतन चालू असे. वर्षभरात त्यांचे असे चिंतनाचे एक पारायण पूर्ण होई. मातु:श्रींनी त्यांना सांगून ठेवले होते की, पुढे तुला माउलींचे दर्शन होईल आणि त्यानंतर भविष्याची (ज्योतिषाची) स्फूर्ती मावळून ज्ञानेश्वरीचे गूढ अर्थ उलगडू लागतील. तरुणपणीच पू.मामा चेहरा पाहताच माणसाची अचूक पत्रिका मांडण्यापर्यंत ज्योतिषशास्त्रात तरबेज झालेले होते. मातुःश्रींनी त्यांना जेवढ्या जेवढ्या विद्या दिल्या, त्या सर्वांचे नीती-नियमही समजावून सांगितलेले होते. ज्योतिष व औषधांच्या बदल्यात कोणाकडूनही कसलाही मोबदला घ्यायचा नाही, हा मातु:श्रींचा कडक दंडक ते तंतोतंत पाळत असत. शास्त्रशुद्ध आचरण, निरपेक्ष वृत्ती, भगवद् भक्ती आणि भगवत्प्रसाद, तपाने शुद्ध झालेली बुद्धी-वाणी या सर्वांमुळे प.पू.श्री.मामा, वैद्यकी, ज्योतिष, मंत्रशास्त्र इत्यादी सर्व विद्यांमध्ये अल्पकाळातच अद्भुत अधिकारसंपन्न झालेेले होते. पू.पार्वतीबाईंनी कृपापूर्वक दिलेल्या नाममंत्राच्या जपाने वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी, १९३२ साली त्यांना भगवान श्रीपांडुरंगांचा सगुण साक्षात्कारही झालेला होता. पुढे १९३६ साली भाऊबीजेच्या दिवशी पंढरपूरला ते पहिल्यांदा दर्शनाला गेले, तेव्हा आधी झालेल्या सगुण दर्शनासारखेच दर्शन त्यांना प्रत्यक्षात लाभले. त्यानंतर मातु:श्रींच्या आज्ञेने त्यांनी पंढरीच्या आषाढी वारीला जायला सुरुवात केली व आजन्म ते व्रत मोठ्या प्रेमादराने पाळले
मातुःश्रींकडून कृपानुग्रह
उत्तम गुरु हे शिष्याचा अधिकार जोखूनच कृपा करीत असतात. प.पू.श्री.मामांच्या बाबतीत मातुःश्रींनी अजिबात हयगय केलेली नव्हती. त्यांनी अत्यंत निगुतीने, पूर्ण विचारपूर्वक पू.मामारूपी हि-याला अद्भुत पैलू पाडलेले होते. दासबोध, एकनाथी भागवत यांचा क्रमाने अभ्यास पूर्ण होऊन आता ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास चालू झालेला होता.
प.पू.श्री.मामांची पारमार्थिक तयारी पाहून, श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने, मार्गशीर्ष शु.अष्टमी, दि.२६ नोव्हेंबर १९४१ रोजी पहाटे मातु:श्रींनी प.पू.मामांना, श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेने आलेला दिव्य शक्तिपात अनुग्रह केला व त्याचवेळी परंपरेचे उत्तराधिकारही प्रदान केले. बारा वर्षे तीव्र साधना करण्याची आज्ञाही त्यावेळी केली होती. अनुग्रहानंतर जवळ जवळ ५ तास प.पू.श्री.मामा प्रगाढ समाधी अवस्थेत होते. समाधीतून उठल्यावर त्यांनी मातुःश्रींच्या श्रीचरणांवर दंडवत घातला. जन्मदाती आईच प्रत्यक्ष मोक्षप्रदाती गुरु असण्याचा दुर्मिळ आणि विशेष योग पू.मामांच्या बाबतीत घडला. प.पू.श्री.मामा देखील आजन्म आपल्या सद्गुरुमातेच्या अनुसंधानात, सेवाऋणातच राहिले.
अनुग्रहानंतर मातुःश्रींनी पू.मामांना सांगितले, "सख्या, तू जरी आता शक्तिसंपन्न झालेला असलास, तरी ही परंपरा चालविण्यासाठी मंत्रही हवा. हा मंत्र मी स्त्री असल्याने तुला देऊ शकत नाही. आजपासून बरोबर बारा वर्षांनी याप्रकारचा दिव्य अनुभव तुला एका थोर सत्पुरुषांकडून पुन्हा प्राप्त होईल. तेच तुझे मंत्रगुरु असतील." प.पू.श्री.मामांना मातुःश्रींच्या या भाकिताची प्रचिती पुढे आली.
प.पू.श्री.मामा हे स्वानुभवानेच विश्वास ठेवणारे होते. मातुःश्रींनी देखील प्रत्येकवेळी त्यांना सर्व गोष्टी स्वानुभवानेच पटवून दिल्या. प्रत्येक प्रक्रिया, अध्यात्माचे सिद्धांत त्यांनी मामांना अनुभव देऊन पटवून दिले. ज्या दिवशी त्यांनी मामांना अनुग्रह केला त्याच रात्री त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. ही लीला अत्यंत अद्भुतच होती.
२६ नोव्हेंबर १९४१ च्या रात्री मातुःश्रींनी मामांना जवळ बोलावले आणि सांगितले, "सख्या, भगवंतांनी गीतेच्या आठव्या अध्यायात योगी देह कसा ठेवतात ते सांगितले आहे, मी ते तुला प्रत्यक्ष दाखवते, पाहा." असे म्हणून त्या आसनावर बसल्या व आपल्या श्रीसद्गुरुनाथांचे स्मरण करून, ऊर्ध्व लावून त्यांनी आपले प्राण देहातून बाहेर काढून परमात्म्यात विलीन केले; आपल्या लाडक्या मुलाच्या देखत ! माउली म्हणतात तसा, घंटेचा नाद घंटेतच विलीन व्हावा, तशा मातु:श्री परब्रह्मामध्ये विलीन झाल्या. मध्यरात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी झालेला हा देहत्यागाचा अपूर्व सोहळा प.पू.श्री.मामा आश्चर्याने पाहत होते. थोड्या वेळाने भानावर आल्यावर त्यांच्या लक्षात आले की, "आपली आई गेली." आयुष्यभर प्रचंड संकटांना धीरोदात्तपणे सामोरी गेलेली, प्रत्येक प्राप्त परिस्थितीत, "जशी हरीची इच्छा", म्हणत आपले अनुसंधान, साधन अखंड ठेवणारी, अत्यंत प्रेमळ, दयाळू तरीही कणखर व खंबीर अशी, आपला परमादर्श असणारी आपली आई, आपली सद्गुरु आता लौकिक अर्थाने आपल्याला कायमची सोडून गेली, याचे पू.मामांना अतीव दुःख झाले.
पू.दत्तूअण्णांच्या देहत्यागानंतर आपल्या आयुष्याची शेवटची बारा वर्षे मातुःश्रींनी क्षणभर देखील जमिनीला पाठ लावली नव्हती. त्या रात्रीसुद्धा अखंड ध्यानाला बसलेल्या असत किंवा नामस्मरणात फे-या मारत असत. प.पू.श्री.मामांनीच त्यांनी देह ठेवल्यानंतर बारा वर्षांनी पहिल्यांदा त्यांची पाठ जमिनीला टेकवली. आयुष्यभर चंदनाप्रमाणे झिजून लोकांच्या उपयोगी पडलेल्या या थोर विभूतीची अंत्ययात्रा ज्या ज्या मार्गाने गेली, तो सर्व मार्ग अलौकिक चंदन सुगंधाने भरून गेला. शिवाय त्यांची चिता पेटल्यावर ओंकारेश्वरचे श्मशानही दिव्य चंदनगंधाने भरून गेले. पू.मातु:श्री पार्वतीदेवींच्या अद्भुत आध्यात्मिक अधिकाराची याहून मोठी खूण काय असणार?
प.पू.मातुःश्री पार्वतीदेवींना राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांनी स्वमुखाने "माझी पोर" म्हणून कृपाप्रसाद केलेला होता, यातच त्यांचा जगावेगळा अधिकार दिसून येतो. त्यांच्या विविध पैलूंवर लिहायचे म्हटले तर ग्रंथच्या ग्रंथ तयार होतील इतके त्यांचे विभूतिमत्त्व अगाध आहे. पू.मामांच्या मानसकन्या प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांनी "श्रीस्वामीतनया" नावाने पू.मातु:श्रींची चरित्रगाथा लिहिलेली आहे. कोणत्याही परंपरेतील साधकाच्या साधना-प्रवासातील फार मोलाचा, मार्गदर्शक-प्रेरक ठरेल असा हा मंत्रमय ग्रंथ नि:संशय अद्भुत आहे.
पू.पार्वतीबाईंनी आपले सर्वस्व ओतून पू.मामांना अक्षरश: घडवले, हे खरेतर तुम्हां आम्हां सर्वांवर त्यांनी फार मोठे उपकारच करून ठेवलेले आहेत. म्हणूनच, सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवींच्या श्रीचरणीं दंडवत घालून त्यांची कृपा भाकणे, हे आपल्या पारमार्थिक प्रगतीसाठी फारच उपयुक्त असल्याने, तेच आता आपण मनोभावे करूया. महासिद्धांच्याही मार्गदर्शक असणा-या पू.पार्वतीदेवींचे काही विशेष प्रसंग उद्याच्या भागात आपण आवर्जून पाहणार आहोत.
( क्रमश: )
( फेसबुक पेज : https://www.facebook.com/sadgurubodh/ )
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

7 Mar 2018

झळाळते अलौकिक श्रीदत्तब्रह्म-तृतीय उन्मेष

तृतीय उन्मेष
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )
श्रीदत्तप्रसादाचे संगोपन
प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचा वरदपिंड म्हणून श्रीपादकडे सर्वांचे विशेष लक्ष होते. विशेषतः मातुःश्री पार्वतीदेवी आणि पू.दत्तूअण्णा खूपच आनंदी आणि समाधानी झाले होते. त्यांनी काळजीपूर्वक या पावन प्रसादाचे संगोपन करण्यास सुरुवात केली.
पू.मामा तीन वर्षांचे असताना पुन्हा त्यांचे बि-हाड पुण्यातून नसरापूरला हलले. श्रीपादचे शिक्षण नसरापुरात सुरू झाले. पाढे, परवचा, मूळाक्षरे तर त्याने घरीच आत्मसात केली होती. पू.मातु:श्री पार्वतीदेवी व पू.दत्तूअण्णा वेळोवेळी लहानग्या श्रीपादला समजेल-उमजेल अशा पद्धतीने परमार्थाचे, सदाचाराचे धडे देतच होते. श्रीपाद जात्याच अत्यंत हुशार आणि तीव्र आकलन क्षमतेचा असल्याने त्यानेही भराभर सर्व गोष्टी आत्मसात केल्या. आपल्या साधुतुल्य आई-वडिलांच्या दैनंदिन वर्तनाचेही फार महत्त्वाचे संस्कार श्रीपादच्या तरल अंतःकरणावर होत होतेच.
श्रीपाद पाच-सहा वर्षांचा असताना आपल्या बहिणीच्या, सौ.अनसूयेच्या सासरी बेळगांवला तिच्या मंगळागौरीसाठी गेलेला होता. अनसूयाताईंचे दीर दत्तोपंत हे श्रीसंत पंत महाराज बाळेकुंद्रीकरांचे अनुगृहीत होते. श्रीपादचा देवाधर्माचा ओढा पाहून दत्तोपंतांनी त्याला आपल्या देवघरात, जेथे पंत महाराज आले की नेहमी बसत, तेथेच ध्यानाला बसविले. त्याचे लगेच ध्यान लागले व थोड्या वेळाने श्रीपादाच्या नेत्रांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. ध्यान आटोपल्यावर दत्तोपंतांनी त्याला काय पाहिलेस? असे विचारले असता, त्याने श्रीपंत महाराजांचे हुबेहूब वर्णन करून सांगितले. त्याला त्यांचे साक्षात् दर्शन झाले होते. योगायोगाने तो दिवस श्रावण वद्य पंचमीचा, प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्या जयंतीचाच होता ! श्रीपादच्या ठिकाणी अशा अलौकिक अनुभूती बालपणापासूनच आपोआप प्रकट होत असत.
एकदा बनेश्वरजवळ खेळता खेळता श्रीपाद वाट चुकला आणि जंगलात हरवला. देवांच्या कृपेने एका साधूने त्याला आपल्या बरोबर ठेवून घेतले, खायला दिले व पहाटे घरी आणून सोडले. ते साधू हे बनेश्वरच्या स्थापनेपासून तेथे असणारे बुवासाहेबच होते. वडलांबरोबर भोरचे पू.श्री.दत्तंभट महाराज, केडगांवचे पू.नारायण महाराज, नाशिकचे पू.गजानन महाराज गुप्ते, पू.कैवल्याश्रमस्वामी महाराज इत्यादी अनेक सत्पुरुषांचे दर्शन-सहवास व आशीर्वाद श्रीपादला लहानपणीच लाभला होता.
पू.मातुःश्री पार्वतीदेवींना ज्योतिषाचे उत्तम ज्ञान होते. त्यामुळे त्यांच्याकडे बरेच लोक पत्रिका दाखवून अडी अडचणींबाबत विचारायला येत. श्रीपादला उपजत वाचासिद्धी आहे, हे त्यांनी अनेकवेळा अनुभवले होते. त्यामुळे त्या काही प्रसंगी श्रीपादला उत्तरे विचारीत आणि तो जसे सांगे तसेच पुढे घडत असे. अर्थात्, या गोष्टीचा त्यांनी कधीच बाऊ केला नाही. श्रीपादाला नीट कळू लागल्यावर मात्र त्यांनी असे विचारणे सोडून दिले.
मौलिक संस्कार
आपले व्यक्तिमत्त्व हे आपल्यावर लहानपणी झालेल्या घरच्या संस्कारांवरच अवलंबून असते. उदरी आलेल्या श्रीदत्तप्रसादावर उत्तम संस्कार करण्याचे अत्यंत महत्त्वाचे व कठीण कार्य मातुःश्री पार्वतीदेवींनी लीलया पार पाडले; इतके की ' हा मामा आईचा केला ' असे माउलींच्या, ' पार्थ द्रोणाचा केला । ' च्या धर्तीवर म्हणता येईल !
http://sadgurubodh.blogspot.in
श्रीपाद बालपणापासूनच अतिशय चौकस, हुशार होता. प्रत्येक गोष्ट तर्काच्या घासपट्टीवर घासून पाहिल्याशिवाय स्वीकारत नसे. त्याला एखादी गोष्ट समजावून सांगणे तसे अवघडच काम होते. पण मातुःश्रींनी हे फार उत्तमरितीने संपन्न केले. त्या लहानग्या श्रीपादाची चौकस बुद्धी सतत वाढती राहील आणि तो सर्व गोष्टी समजून आत्मसात करेल, अशा पद्धतीनेच त्याला शिकवत. त्यांनी व दत्तुअण्णांनी त्याच्या प्रश्नांचा कधीच कंटाळा मानला नाही. प.पू.श्री.मामांना त्यांनी ज्या पद्धतीने वाढविले, त्या पद्धतीचा अभ्यास करून बालसंगोपन विषयात आदर्शवत् म्हणून ती पद्धत मांडता येईल, इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे.
प.पू.श्री.मामांच्या वडलांना पानावर बसून पदार्थांविषयी काहीही तक्रारवजा बोललेले आवडत नसे. पानावर बसून अन्नाला नावे ठेवली किंवा अन्न बनविणा-या वाईट बोलले तर त्या अन्नाचा शाप लागून पुढच्या जन्मी अन्नान्नदशा येते, असे ते म्हणत. एकदा दत्तूअण्णा व मामा जेवायला बसले. भाजीत मीठच नव्हते. अण्णांनी मामांना खूण करून तसेच जेवायला सांगितले. मागाहून पू.मातुःश्री जेवायला बसल्यावर त्यांच्या लक्षात आले की भाजी अळणी आहे. त्यांनी मामांना विचारले, "अरे सख्या, भजीत मीठच नाही हे सांगितले नाहीस रे." त्यावर मामा म्हणाले, "अगं, अण्णांनी मुकाट्याने जेव म्हणून खुणावले. तुला उगीच वाईट वाटले असते ना, म्हणून आम्ही काही बोललो नाही." इतका समंजसपणे त्यांचा संसार चालू होता ! बरे, परमार्थ चालू आहे म्हणून यांच्या संसाराचे वाटोळे झाले असेही नाही. त्या दोघांनी प्रपंचात कधीच कसलीही टाळाटाळ केली नाही की प्रपंचाच्या धावपळीत आपली साधना बुडविली नाही. आपली कर्तव्यकर्मे जेथल्या तेथे शिस्तीने करून त्यांनी संसाराचाच परमार्थ केला. कारण सद्गुरुकृपेने,  'विषय तो त्यांचा जाला नारायण ।' अशी या दांपत्याची वृत्ती हरिमय झालेली होती.
पू.दत्तूअण्णा व पू.सौ.पार्वतीबाई हे दोन देह पण मन एक, अशा प्रकारचे दांपत्य होते. पू.दत्तूअण्णा व पू.मातुःश्री पार्वतीदेवी दोघेही शिस्त आणि टापटिपीला पक्के होते. अण्णा बरोबर सातच्या ठोक्याला पूजेला बसत. त्याआधी घरातले सगळे आवरून पार्वतीबाईंनी त्यांची पूजेची सर्व तयारी करून ठेवलेली असे. पू.पार्वतीदेवींनी केलेली पूजेची तयारीही पाहण्यासारखी असे. सगळे इतके सुरेख मांडलेले असे की बस. त्या गंध उगाळीत तर गंधाचा एक शिंतोडाही सहाणेच्या बाहेर उडत नसे. एवढे शिस्तीत त्यांचे सर्व काम चाले. पू.दत्तुअण्णा पूजेत रुद्र म्हणू लागले की प्रत्यक्ष राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराज तेथे प्रकट होत असत. पू.मातु:श्रींनी त्याचे कारण त्यांना विचारले तर ते म्हणाले की, अाम्हांला अण्णांचे रुद्रपठण ऐकायला अतिशय आवडते. काय भाग्य म्हणावे हे !
अण्णांना ताज्या दळलेल्या पीठाच्या भाक-या आवडत म्हणून पार्वतीबाई दररोज पहाटे ताजी ज्वारी दळून ठेवत असत. दत्तूअण्णांच्या मनात जो पदार्थ खाण्याची इच्छा होई, तोच नेमका त्यादिवशी पानात असे. इतके एकरूपत्व झालेले होते दोघांचे. संपूर्ण आयुष्यात त्या दोघांचे एकदाही भांडण झाले नाही की वादविवाद झाला नाही. पू.मामा म्हणत की, आमच्या घरात कधीच कोणाचाही आवाज चढलेला आम्ही ऐकलाच नाही. असे दैवी कुटुंब खरोखरीच फार दुर्मिळ आहे.
प.पू.श्री.मामांना साबण्या (गोड्या शेवेसारखी मिठाई) खूप आवडत असत. एकदा साबण्यांसाठी त्यांनी आईकडे हट्ट केला. अण्णांना विचारून सांगते असे मातुःश्री म्हणाल्या. पण अण्णा आपल्याच तंद्रीत होते. म्हणून मातुःश्रींनी एक ढब्बू पैसा त्यांच्या कोटाच्या खिशातून काढून दिला. मामा खूश होऊन साबण्या आणायला मित्रमंडळींबरोबर गेले. दत्तूअण्णा कामासाठी बाहेर पडले आणि मग बाजारपेठेत एका दुकानाच्या पायरीवर बसले होते. त्यांनी पोरांच्या घोळक्यात श्रीपादला पाहिले. त्याच्या हातात सर्वात जास्त साबण्या होत्या.
श्रीपादला जवळ बोलावून त्यांनी विचारले, " काय रे, कोठून आणल्यास साबण्या? " बिचारा श्रीपाद घाबरून गप्पच बसला. त्याने आईच्या परभारे हा उद्योग केलेला दिसतोय, असे वाटून दत्तूअण्णांनी मामांच्या श्रीमुखात भडकावली. पू.मामा घरी आले आणि आईला म्हणाले, "आजपासून पुन्हा कधीच साबण्यांना हात लावणार नाही. " दत्तूअण्णा घरी आल्यावर त्यांना सर्व वृत्तांत समजला. त्यांना खूप वाईट वाटले पोराला उगीचच मारल्याचे. त्यांनी गड्याला पाठवून टोपलीभर साबण्या मागवल्या. पण श्रीपादने चुकूनही त्यांना हात लावला नाही. दत्तूअण्णा मातुःश्रींना म्हणाले, " बाई, पोराने साबण्यांना हात देखील लावला नाही. त्याला घ्यायला सांगावे. " पार्वतीबाई म्हणाल्या, "आपण वाईट वाटू घेऊ नये. अत्यंत आवडती गोष्ट सुटायची असेल तर हेच योग्य आहे. ती कधीतरी सुटायलाच हवी ना?" अशा जबाबदार व विलक्षण मायबापांच्या सुयोग्य संस्कारात मामा लहानाचे मोठे होत होते.
प.पू.श्री.मामा हे अत्यंत तल्लख बुद्धीचे व सूक्ष्म निरीक्षण असलेले  होते. आपल्या आई-वडलांच्या शांत-समाधानी स्वभावाचा, भगवत्प्रवण वृत्तीचा, शास्त्रशुद्ध व निर्मळ वर्तनाचा, सदैव चालू असलेल्या भगवत्स्मरणाचा त्यांच्यावर लहानपणीपासूनच संस्कार झाला. संसारातल्या कुठल्याच प्रसंगांनी दत्तूअण्णा व पार्वतीबाईंचे भगवंतांशी असलेले अनुसंधान कधीच सुटले नाही. याचा लहानग्या श्रीपादच्या कोवळ्या मनावर खोल रुजलेला संस्कार पुढे त्यांच्याही आयुष्यात प्रकटलेला दिसून येतो.
पार्वतीबाईंना लिहायला येत नसे, पण जुजबी वाचता येत असे. त्या रोज ज्ञानेश्वरी वाचत, शेजार-पाजारच्या बाया-बापड्यांना दुपारच्यावेळी घरगुती उदाहरणे देऊन, सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी समजावून देखील सांगत. आपली आई ज्ञानेश्वरी वाचताना रोज का रडते? हा प्रश्न नेहमीच मामांना सतावत असे. एकदा त्यांनी आईला तसे विचारले. त्यावर मातुःश्रींनी श्रीज्ञानेश्वरीच्या पानावर बोट ठेवले. श्रीपादला तेथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत आहेत, असे जिवंत दृश्य दिसले. या प्रसंगाने मामांना आपल्या आईचा अद्भुत अधिकारही समजून आला.
वयाच्या आठव्या वर्षी पू.मामांची मुंज झाली. पू.दत्तूअण्णांनी त्यांना प.प.श्री.टेंब्येस्वामींच्याकडून मिळालेल्या अतिदिव्य चतुष्पदा गायत्रीचा कृपापूर्वक अनुग्रह केला. त्यानंतर लगेचच अण्णांनी मामांना हिमालय यात्रेला नेले. अवघ्या आठव्या वर्षी इतकी खडतर यात्रा पू.मामांनी केली. मातु:श्रींनी देखील कसलीही अाडकाठी न करता लहानग्या श्रीपादाला यात्रेला जाऊ दिले. पुढे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी दत्तूअण्णाबरोबर मामांनी अनवाणी नर्मदा परिक्रमादेखील केली होती. या दोन्ही यात्रांमध्ये त्यांना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. अण्णांनी अनेक औषधींचे, मंत्रतंत्रांचे विलक्षण प्रयोगही पू.मामांना त्याकाळात शिकवले होते. त्यांना अनेकानेक दिव्य दर्शनेही झाली. त्यातील चिरंजीव अश्वत्थामा, भगवती नर्मदामैया यांच्या दर्शनाची हकिकत पू.मामा पुढे नेहमी सांगत असत. अण्णांनी मामांना त्यांच्या आयुष्यात पुढे घडणा-या अनेक घटना देखील या यात्रेच्या काळात सांगून ठेवल्या होत्या.
मातुःश्री पार्वतीबाई विनामोबदला वैद्यकी देखील करीत. एकदा नसरापूर जवळच्या नायगांव मधील एका लहान मुलाला घेऊन लोक आले. तो अत्यवस्थच होता. पू.मामांना मातुःश्रींनी एक औषध आणायला तातडीने पाठविले. परंतु कोणत्याही दुकानात ते औषध मिळाले नाही. मातुःश्रींनी सद्गुरुस्मरण करून त्या पोराला गाणगापूरचा अंगारा लावला आणि आईच्या दुधातून चाटवायला सांगितला. दुस-या दिवशी मातुःश्रींनी मामांना पुन्हा तेच औषध आणायला पाठविले. आश्चर्य म्हणजे ते औषध सगळीकडे त्यावेळी मिळाले. ते घेऊन मातुःश्रींनी त्या लहान मुलासाठी औषध तयार करून पाठविले. त्यावर मामांनी विचारले, "आई, काल तर अंगारा दिला, मग आता औषध का दिलेस? " मातुःश्रींनी फार मार्मिक उत्तर दिले. त्या म्हणाल्या, "सख्या, काल औषध मिळाले नाही म्हणून देवांवर जडभार घातला, त्या अंगा-याने पोर बरेही झाले. पण आता औषध मिळाल्यावर मात्र देवांना उगीचच कशाला त्रास द्यायचा?" पू.मामांना या प्रसंगातून आयुष्यभरासाठी मोठाच बोध मिळाला.
https://www.facebook.com/sadgurubodh/
अशा दररोज घडणा-या विविध मार्मिक प्रसंगांमधून प.पू.श्री.मामांचे प्रगल्भ, दिव्य-पावन विभूतिमत्त्व खुलत, बहरत गेले. जोडीने मातुःश्रींनी सदाचाराचे, ज्योतिष व औषधी विद्यांचे धडे दिले ते वेगळेच. पू.मामांचे अत्यंत श्रेष्ठ, परमार्थमार्गाला ललामभूत ठरणारे, तुम्हां-आम्हां साधकांसाठी आदर्शवत् असणारे थोर विभूतिमत्व अशाप्रकारे दत्तूअण्णा व मातुःश्री पार्वतीबाईंच्या अथक परिश्रमांतून साकारलेले होते.
( क्रमश: )
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत

आज फाल्गुन कृष्ण षष्ठी, श्रीनाथषष्ठी  !
शांतिब्रह्म सद्गुरु श्रीसंत एकनाथ महाराजांची पुण्यतिथी  !
आजच्या तिथीला नाथ महाराजांच्या चरित्रात खूप महत्त्व आहे. हिला "पंचपर्वा षष्ठी" म्हणतात. संत एकनाथांचे सद्गुरु श्री जनार्दन स्वामींची जन्मतिथी, त्यांना भगवान श्रीदत्तप्रभूंकडून अनुग्रह व त्यांचे महानिर्वाण या तिन्ही गोष्टी याच तिथीला झालेल्या आहेत. शिवाय नाथ महाराजांची व श्री जनार्दन स्वामींची प्रथम भेट व त्यांना कृपानुग्रह याच तिथीला लाभला. म्हणूनच त्यांनी हीच पवित्र तिथी निवडून इ.स.१५९९ साली गोदावरीमध्ये जलसमाधी घेतली. अन्य कोणाही संताच्या चरित्रात असा दुर्मिळ योग पाहायला मिळत नाही.
नाथ महाराज म्हणजे साक्षात् परमशांतीच ! त्यांना भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचेच कार्यावतार म्हणतात. म्हणून "ज्ञानियाचा  एका, नामयाचा तुका" अशी म्हण संप्रदायात प्रचलित आहे.
"नारायण विधी अत्रिनाथ, दत्त जनार्दन एकनाथ ।" अशी त्यांची श्रीगुरुपरंपरा होय. त्यांना भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी देखील स्वमुखाने 'ज्ञानदेव' हा चतुराक्षरी महामंत्र प्रदान केलेला होता. श्रीदत्त संप्रदाय व वारकरी संप्रदायाचा सुंदर समन्वय त्यांच्याठायी झालेला होता. अर्थात् हे दोन्ही संप्रदाय मुळात एकाच भागवत संप्रदायाचे विभाग आहेत.
श्रीसंत नाथ महाराज म्हणजे अलौकिक गुरुभक्ती ! प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी प्रवचनात सांगितलेले एकच जबरदस्त उदाहरण सांगतो. नाथ महाराज गुरुसेवेत देवगिरी किल्ल्यावर असतानाचा हा हृद्य प्रसंग आहे. एकदा नेहमीचा मेहेतर-सेवेकरी न आल्याने त्यांच्यावर श्री जनार्दन स्वामींचा संडास स्वच्छ करण्याची जबाबदारी आली. त्यांना या नवीन सेवासंधीचा एवढा आनंद झाला की बस. डबडबलेल्या नेत्रांनी, अष्टसात्त्विकाचा आवेश कसाबसा आवरीत, त्यांनी त्या जुन्या काळाच्या टोपलीच्या संडासातील मैला स्वत: डोक्यावरून वाहून नेऊन टाकला.  पुन्हा स्नान करून सोवळे नेसले. सर्व संडास स्वच्छ केला, शेणाने सारवला व तेथे रांगोळ्या काढून उदबत्त्याही लावल्या. संडासाला फुलांचे हार बांधले व बाहेर येऊन दंडवत घातला. आपल्या परब्रह्मस्वरूप सद्गुरूंच्या श्रीचरणांचा स्पर्श या वास्तूला नेहमी होतो, हे पाहून त्यांना त्या संडासाचा हेवाच वाटत होता. म्हणूनच त्यांनी त्या संडासाची अशी जगावेगळी सेवा करून ते भाग्य सप्रेम अनुभवले. नाथांच्या या अपूर्व, अलौकिक गुरुभक्तीचे माहात्म्य काय वर्णन करावे सांगा? तेथे साष्टांग दंडवतच फक्त घालू शकतो आपण.
( http://rohanupalekar.blogspot.in )
श्रीसंत नाथ महाराजांचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे श्रीज्ञानेश्वरीची प्रतिशुद्धी हे होय. ज्ञानेश्वरीच्या संहितेत कालौघात घुसलेले व घुसवलेले अपपाठ शोधून काढून त्यांनीच प्रथम प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरीची तयार केली. हे त्यांचे आपल्यावरील फार मोठे ऋण आहे.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या मुख्य मंदिरासमोरील कृष्णामाईचा घाट स्वत: श्रीसंत नाथ महाराजांनीच बांधलेला आहे.
भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, चिरंजीवपद इत्यादी सर्व ग्रंथ मिळून एकूण लाखभर ओव्या व चार हजार पेक्षा जास्त अभंग, भारुडे, आरत्या असे प्रचंड वाङ्मय त्यांनी सहज लीलेने प्रकट केलेले आहे. त्यांनी रचलेली भगवान श्रीदत्तप्रभूंची आरती सर्व ठिकाणी म्हटली जाते. त्यांचे अवघे चरित्र अत्यंत आदर्श असून नित्य स्मरणीय, चिंतनीय व अनुकरणीय आहे. साक्षात् भगवान पंढरीनाथ त्यांच्या घरी 'श्रीखंड्या' च्या रूपाने सेवा करीत होते, यातच सगळे आले. आजही पाहायला मिळणारी त्यांच्या नित्यपूजेतील श्रीविजय पांडुरंगांची श्रीमूर्ती म्हणजे साक्षात् श्रीभगवंतच होत.
श्री नाथ महाराजांचे हे अद्भुत कार्य जाणून, तुकारामशिष्या श्रीसंत बहेणाबाई त्यांना भागवतधर्म-मंदिराचा मुख्य मध्यस्तंभ म्हणतात व ते सर्वार्थाने सत्यच आहे !
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज रात्री होणा-या आपल्या  नित्याच्या हरिपाठामध्ये संत एकनाथांची आरती रोज म्हणत असत.
श्रीसंत तुकाराम महाराज शांतिब्रह्म श्री नाथ महाराजांची स्तुती करताना म्हणतात,
शरण शरण एकनाथा ।
पायीं माथा ठेविला ॥१॥
नका पाहूं गुणदोष ।
झालों दास पायांचा ॥२॥
उपेक्षितां मज ।
तरी लाज कवणासी ॥३॥
तुका म्हणे भागवत ।
केलें श्रुत सकळां ॥४॥
श्रीमद् भागवताच्या एकादश स्कंधातील मर्म सोप्या भाषेत जनसुलभ करणा-या भक्तवत्सल नाथ महाराजांच्या चरणी कृपायाचना करून श्रीतुकोबा भक्तिभावे वंदन करतात.
आज पंचपर्वा श्रीनाथषष्ठी निमित्त श्रीसंत जनार्दनस्वामी व श्रीसंत एकनाथ महाराज या गुरुशिष्यांच्या  श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!!
( छायाचित्र संदर्भ : डावीकडे वर श्रीसंत नाथ महाराजांच्या पूजेतील श्रीविजय पांडुरंग व त्याखाली त्यांची सुशोभित समाधी. उजवीकडे महाराजांचे लेखनमग्न कल्पनाचित्र. )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

6 Mar 2018

रंगी रंगला श्रीरंग

नमस्कार मित्रहो,
आज रंगपंचमी  !!
महाराष्ट्रामध्ये आज रंगोत्सव साजरा होतो. रंगांची उधळण करून लोक आपला आनंद व्यक्त करतात, एकमेकांना रंग लावून परस्परांमधील प्रेमभाव दृढ करतात.
महाराष्ट्राचे कुलदैवत, आराध्यदैवत आहेत भगवान श्रीपांडुरंग. त्यांच्या नावातच ' रंग ' आहे. पण मजा म्हणजे, नाव आहे पांडुरंग, म्हणजे शुभ्रवर्णाचा आणि प्रत्यक्षात आहेत काळेकुट्ट ! गंमतच आहे सगळी.
संतांनी वर्णन केले आहे की ते निळे, सावळे दिसतात. काहीवेळा काळे दिसतात. या राजस सुकुमार नयनमनोहर रूपाचा खरा रंग कोणता मग?
सर्व रंग हे तांबड्या पासून सुरू होऊन जांभळ्या रंगापर्यंत विभागलेले आहेत. सूर्य किरणाचे जलबिंदूमधून विकिरण होते तेव्हा हे सप्तरंग इंद्रधनुष्याच्या रूपाने पाहायला मिळतात. या सर्व रंगांचा मूळ रंग हा पांढरा आहे. एका पांढ-या रंगातून सर्व रंग निर्माण होतात. तसेच आमचे भगवान श्रीपंढरीनाथच सर्वांचे आद्य आहेत. सर्व देवदेवता, मनुष्यादी योनी, दिसणारे, भासणारे यच्चयावत् सर्व जग हे त्यांच्यापासूनच निर्माण झालेले आहे. म्हणूनही त्यांना आपण " पांडुरंग " म्हणू शकतो. ( http://rohanupalekar.blogspot.in )
आता हे सर्व रंग स्वत:चे वेगळेपण टाकून, बेमालूमपणे कोणत्या रंगात सामावतात? तर केवळ काळा रंगच तसा आहे. काळ्या रंगात इतर कोणताही रंग मिसळला तर तो एकरूप होऊन जातो. ( अपवाद फक्त पांढ-या रंगाचा आहे, पण तो तर त्यांचाच रंग आहे. ) तसे हे सर्व जग अंतिमत: त्या काळ्या श्रीविठ्ठलांमध्ये लय पावत असते. तेच काळाचेही महाकाळ आहेत. त्याचे द्योतक म्हणून  त्यांनी " काळा " हा रंग धारण केलेला आहे.
श्रीसंत तुकाराम महाराज या भगवंतांचे स्वरूप सांगताना म्हणतात,
सकळ देवांचे दैवत ।
उभे असे या रंगात ॥
रंग लुटा माझे बाप ।
शुध्द भावे खरे माप ॥
रंग लुटिला बहुती ।
शुक नारदादि संती ॥
तुका लुटिताहे रंग ।
साह्य झाला पांडुरंग ॥
श्रीतुकोबा सांगतात, जगाच्या रूपाने अनेक रंगांमध्ये अभिव्यक्त होणा-या या सकळ देवांच्याही आराध्य दैवताचा, भगवान श्रीपांडुरंगांचा भक्तिरंग जर लुटलात तरच खरी रंगपंचमी साजरी केल्यासारखे होईल. ज्याचा भाव जितका शुद्ध तितकेच कृपेचे माप त्याला प्राप्त होणार. पूर्वी शुकदेव, नारदादी संतांनी हा रंग अमाप लुटलेला आहे व आता श्रीपांडुरंगांच्या कृपेने सद्गुरूंच्याकडून ती युक्ती कळल्यामुळे तुकोबारायही तो भक्तिरंग भरभरून लुटत आहेत. खरी रंगपंचमी साजरी करीत आहेत व आपल्या सर्वांनाही आग्रहाने ही अलौकिक रंगपंचमी साजरी करण्यासाठी बोलावीत आहेत.
याच स्थितीचे वर्णन करताना, लौकिकार्थाने निरक्षर पण सद्गुरुकृपेने अद्भुत अनुभूती लाभलेल्या श्रीसंत सोयराबाई (श्रीसंत चोखामेळा महाराजांच्या पत्नी ) म्हणतात, "अवघा रंग एक जाला । रंगी रंगला श्रीरंग ॥" भक्त आणि भगवंत एकरूप होऊन गेले व त्या अलौकिक भक्तिरंगात दोघेही निरंतर रंगून राहिलेले आहेत. भक्ताला देवाचा चुकूनही विसर पडत नाही आणि देव भक्ताला क्षणासाठीही अंतर देत नाही, अशी अपूर्व प्रेमस्थिती होऊन गेलेली आहे. हीच खरी रंगपंचमी आहे व ती अनन्यभक्तीशिवाय साध्य होणार नाही. अनन्यभक्ती सद्गुरुकृपेशिवाय प्राप्त होत नसते. यासाठीच माउली उपदेश करतात की, "म्हणोनि जाणतेने गुरु भजिजे । तेणे कृतकार्य होईजे ।"
सर्वांना या अनंगरंगसागर भगवान श्रीपांडुरंगांच्या प्रेमरंगात निरंतर रंगून जाण्याचे, त्यांच्या भक्तिरंगाचे सप्तरंगी इंद्रधनुष्य सप्रेम अनुभवण्याचे देवदुर्लभ सौभाग्य लाभो, हीच आजच्या या रंगपंचमीनिमित्त श्रीगुरुचरणी सादर प्रार्थना !!
रंगपंचमीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा  !!
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in )