24 Feb 2017

लिंग देखिले देखिले त्रिभुवनीं तिहीं लोकी विस्तारिले


आज महाशिवरात्री, आदिदेव भगवान श्रीशिवशंकरांच्या उपासनेचा मुख्य दिवस !!
भगवान श्रीमहादेव हे परमकरुणामूर्ती आहेत, परमप्रेमाने केलेल्या थोड्याशा उपासनेने देखील लगेच प्रसन्न होऊन वरदान देतात म्हणूनच त्यांना 'आशुतोष' म्हणतात. त्यांच्या दयाकृपेला अंत ना पार. त्यांचे भक्तवात्सल्यही काय वर्णावे? मागे-पुढे न पाहता भक्ताला काहीही देण्याचा त्यांचा बाणा आहे.
भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींना उमापती भगवान श्रीआदिनाथांचे अतीव प्रेम आहे. ते त्यांच्या श्रीगुरुपरंपरेचे आदिगुरु तर आहेतच, पण श्रीनिवृत्तिनाथ महाराजांच्या रूपाने प्रत्यक्ष सद्गुरु देखील आहेत ना ! म्हणून माउली त्यांचे भरभरून वर्णन करतात.
भगवान श्रीपशुपतीनाथांच्या अगाध दातृत्वाचे वर्णन करताना माउली म्हणतात,
मागां दूध दे म्हणितलियासाठी ।
आघविया क्षीराब्धीची वाटी ।
उपमन्यूपुढें धूर्जटी ।
ठेविली जैसी ॥ज्ञाने.१०.०.१७ ॥

उपमन्यू नावाच्या एका लहान मुलाने वाटीभर दूध हवे म्हणून तपश्चर्या करून भगवान शिवांना प्रसन्न केले. त्यांनी या बाळाला वाटीभर दुधाच्या ऐवजी कौतुकाने आख्खा क्षीरसागरच देऊन टाकला ! अशी त्यांची अगाध दयाकृपा असते.
भगवान श्रीमहादेव हे अत्यंत अद्भुत आहेत. त्यांचे साकार स्वरूप म्हणून शिवलिंगाची पूजा केली जाते. शिवलिंगामध्ये तीन भाग असतात, लिंग अथवा बाण हा शिवस्वरूप, तो बाण ज्या पन्हाळीसारख्या पिंडीवर ठेवतात ती शक्तिस्वरूप आणि या दोन्हीच्या खाली आधार देणारी बैसका ही शेषस्वरूप मानली जाते.
महाशिवरात्रीला संपूर्ण रात्रभर भगवान श्रीशिवांच्या या दिव्य-पावन लिंगाचे अभिषेकपूर्वक पूजन करण्याचाच प्रघात आहे. म्हणून आपणही त्यांची सद्गुरु श्री माउलींच्या ब्रह्मशब्दांमध्ये पूजा बांधूया. या त्रिभुवन व्यापणा-या दिव्य शिवलिंगाच्या, श्रीसद्गुरुकृपेने आपल्याच हृदयामध्ये संपन्न झालेल्या अद्भुत पूजनाचे सुरेख वर्णन करताना सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
स्वर्ग जयाची साळोंखा ।
समुद्र पाळी पिंड देखा ।
शेषा सारखी बैसका ।
जो आधार तिहीं लोका ॥१॥
लिंग देखिले देखिले ।
त्रिभुवनीं तिहीं लोकी विस्तारिले ॥धृ.॥
मेघधारी स्नपन केले ।
तारापुष्पीं वरी पूजिलें ।
चंद्रफळ ज्या वाहिलें ।
ओवाळिलें रविदीपें ॥३॥
आत्मनैवेद्य समर्पिलें ।
ब्रह्मानंदीं मग वंदिले ।
ज्योतिर्लिंग म्या ध्याईले ।

ज्ञानदेवे हृदयीं ॥४॥
मानसपूजनाचे फळ नेहमीच लौकिक पूजेहूनही मोठे मानले जाते. त्यात भगवान माउलींचे शब्द, मग तर काय बोलायलाच नको. ही मानसपूजा पार्वतीपती भगवान श्रीशिवांच्या श्रीचरणीं समर्पित असो.
भगवान श्रीमहेश्वरांच्या अपूर्व-मनोहर करुणाकृपेचे माहात्म्य, प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे एका हृद्य कथेतून सांगतात. एक अट्टल चोर होता. तो छोट्या मोठ्या चो-या करून कंटाळला होता. म्हणून त्याला जन्माचीच ददात मिटेल असा एक मोठा डाका घालायचा होता. त्याला एकेदिवशी अशी माहिती मिळाली की, अमुक जंगलात एक शिवमंदिर असून त्यात खूप जडजवाहिर आहे. त्याने त्या मंदिरात चोरी करायचे निश्चित केले. त्यानुसार माहिती काढून तो त्या मंदिरात गेला व तेथील संपत्ती पाहून त्याचे डोळेच दिपले. त्या शिवपिंडीवरील रत्नजडित अभिषेकपात्र जरी चोरले तरी त्याची दहा पिढ्यांची सोय होणार होती. म्हणून त्याने सगळी योजना आखली.
त्या जंगलातील मंदिरात रात्री कोणीच थंबत नसे. त्यामुळे रात्री चोरी करणे सोपे जाणार होते. त्यासाठी तो मंदिरातच लपून बसला. रात्री पुजारी कुलूप लावून गेल्यावर तो बाहेर आला व ते अभिषेकपात्र काढण्यासाठी प्रयत्न करू लागला. पण त्याचा हातच पोचेना. मग तो त्या पिंडीवरच चढून प्रयत्न करू लागला. पिंड ही साक्षात् भगवती अंबा. तो चोर पिंडीवर उभा राहिल्याने ती खवळली व देवांना म्हणाली, "अहो, तुमचे लक्ष आहे ना? हा पाहा माझ्यावर पाय देऊन उभा आहे, त्याचा बंदोबस्त करा ताबडतोब." देव म्हणाले, "हो, आम्ही करतो त्याला शिक्षा. पण बघू तरी तो काय करतो पुढे." परंतु तेवढ्यानेही हात पुरत नाही म्हटल्यावर तोवर तो चोर सरळ लिंगावरच उभा राहिला. आता ते त्याचे दुस्साहस पाहून पार्वतीमाता प्रचंड रागावली व देवांना म्हणाली, "महाराज, आता हा पार तुमच्याच डोक्यावर पाय देऊन उभा आहे, कशाची वाट पाहात आहात? त्याला तत्काळ भस्म करा."
पण अहेतुकदयानिधी भगवान श्रीशिवांनी, "वत्सा, तुझे कल्याण असो !" असाच प्रेमाने आशीर्वाद दिला. हे ऐकून भगवती पार्वतीआईला काहीच समजेना, देवांना झाले तरी काय? तिचा तो प्रश्नार्थक चेहरा पाहून स्मितहास्य करीत देवाधिदेव श्रीशंभुमहादेव तिला म्हणाले, "अगं, काही का निमित्ताने असेना, पण त्याने त्याचा सर्व भार माझ्यावर टाकलाय ना? जो माझ्यावर आपला सर्व भार टाकतो त्याचे मी कल्याणच करायला नको का? तेच माझे ब्रीद आहे, मग मी दुसरे काय करायचे? मी या चोराचे कोटकल्याणच करणे योग्य आहे, म्हणून मी तेच केले !" या जगावेगळ्या उत्तराने व भगवंतांच्या त्या अद्भुत कारुण्य वर्षावाने श्रीपार्वतीमाताही संतुष्ट झाली. भगवान श्रीशिवशंभू असे परम उदार, परम करुणामय आहेत. त्यांचेच अभिन्न स्वरूप असणारे सद्गुरुतत्त्व देखील त्यांच्यासारखेच असते. म्हणूनच श्रीसद्गुरूंच्या ठायी शिष्याच्या शाश्वत कल्याणाव्यतिरिक्त अन्य संकल्पच कधी नसतो. श्रीसद्गुरूंची असीम कृपा ज्याला लाभते त्याचेही शाश्वत कल्याणच होते. किंबहुना, श्रीसद्गुरूंच्या करुणाकृपेशिवाय कोणाचेही कधीच परमकल्याण होऊ शकत नाही !!
अशा विलक्षण सद्गुरु श्रीदेशिकेंद्र दक्षिणामूर्ती भगवान श्रीशिवशंकरांच्या श्रीचरणीं आज आपण सर्वांनी प्रेमादरपूर्वक दंडवत घालून परमार्थकृपा-याचना करूया. आपल्या शुद्धाशुद्ध मनोभावांचे प्रामाणिक प्रतीक म्हणून सद्गुरु श्रीमाउलींच्याच अमृतशब्दांत श्रीसद्गुरु भगवंतांना गंगावतीचे, निर्गुडीचे त्रिदल समर्पून महाशिवरात्रीची पूजा देखील साधूया आणि 'नम: शिवाय' या पंचाक्षर ब्रह्मनामाच्या गजरात मग्न होऊया !
प्रभु तुम्ही महेशाचिया मूर्ती ।
आणि मी दुबळा अर्चितसें भक्ती ।
म्हणोनि बोल ज-ही गंगावती ।
त-ही स्वीकाराल कीं ॥ज्ञाने.९.०.१४ ॥

अकारणकृपाळू शिवस्वरूप श्रीसद्गुरुनाथ भगवंतांनी आमची ही यथामती सेवा स्वीकारून आमच्यावर परमकृपेचा अनवरत वर्षाव करावा, हीच प्रेमादरपूर्वक प्रार्थना !!
शिवहरशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो ।
हे गिरिजापती भवानीशंकर शिवशंकर शंभो ॥
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

20 Feb 2017

राम तोचि रामदास

सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज !!
या नावातच सर्व काही आले. त्यांच्या समग्र चरित्राचे व उपदेशाचे सार वरील पाच शब्दांमध्ये पूर्णपणे सामावलेले आहे.
आज आहे माघ कृष्ण नवमी, श्रीदासनवमी, सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांची पुण्यतिथी !!
धगधगते वैराग्य, अपार उत्साहपूर्ण व उत्फुल्ल चर्या, हनुमंतांसारखी पीळदार शरीरयष्टी, सूर्यासमान तेजस्विता, ससाण्यासारखीच चाणाक्ष नजर, अचूक चौफेर निरीक्षण, सागराप्रमाणे गहिरे ज्ञान, हिमालयासारखी उत्तुंग बोध-प्रतीती, उसळत्या गंगौघासारखी अवखळ पण सुमधुर वाणी, अद्वितीय काव्यप्रतिभेची, अलौकिक ऋतंभराप्रज्ञेची वैभवसंपन्न रत्नखाण, पराकोटीची संवेदनशीलता, मायेहूनही मवाळ व बुडत्या जनांचा अपरंपार कळवळा असणारे विशाल हृदय, अपार भगवत्प्रेम, दास्यत्वाची चरम अनुभूती सांगणारी अनन्य शरणागती ; या व अशा असंख्य सद्गुणांची घनीभूत प्रसन्न श्रीमूर्ती म्हणजेच राष्ट्रगुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज  !!
विलक्षण दूरदृष्टीने त्यांनी त्या मोगली काळात ११०० पेक्षा जास्त मठांची स्थापना करून रामभक्तीचा अगदी हलकल्लोळ मांडला होता. हरिकथा ब्रह्मांड भेदून पल्याड नेली. बलभीमाची मंदिरे स्थापून, शरीर कमविण्याचा पायंडा घालून त्यांनी तरुणांमध्ये एक अपूर्व स्वत्व-जाणीव निर्माण केली. स्वधर्म व स्वराष्ट्राविषयी निस्तेज होऊ लागलेल्या समाजात नवचेतना निर्माण केली. विवेकाचे, वैराग्याचे व प्रयत्नांचे महत्त्व पुनश्च अधोरेखित करून हिंदूधर्मावर जमलेली राख फुंकून टाकून, तो दिव्य धर्म-स्फुल्लिंग त्यांनी पुन्हा चेतवला. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संस्थापनेच्या कार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्याकाळी परकीय आक्रमणांमध्ये, मोगली राजवटीतही, समर्थांनीच आपल्या मराठी समाजाचे मन खचू न देता, सतत हिंमत देत स्वत्व जागृत ठेवले. छत्रपती शिवरायांसारखा जाणता राजा निर्माण करून स्वराज्याचे अत्यंत विलक्षण स्वप्न साकारले. आपल्या मठांच्या व शिष्यमंडळींच्या माध्यमातून देखील स्वराज्याचे सुराज्य, श्रींचे राज्य होण्यास मदत केली. छत्रपती शिवरायांवर वेळोवेळी कृपाछत्र घालणारे, आमची धर्मजाणीव सतत जागती ठेवणारे, आमची मराठी अस्मिता निरंतर जपणारे, वाढविणारे, आमचे परमार्थविश्व अखंड आनंदी व वैभवसंपन्न करणारे राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी, तुम्हां आम्हां सर्वांचे लाडके, परम आदरणीय न ठरते तरच नवल ! यासाठीच सद्गुरु समर्थ श्रीरामदास स्वामी महाराजांचे महाराष्ट्राच्या पावन भूमीतील ओजस्वी संतपरंपरेत आगळे-वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण असे अढळस्थान आहे.
शिस्तबद्ध व नेटके संघटन कसे निर्मावे व कसे निरंतर सुव्यवस्थितपणे चालवावे, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे समर्थ श्री रामदास स्वामी महाराज होत !
संसारतापाने पोळलेल्या, भवसागरात हकनाक बुडणा-या जनप्रवाहाला पाहून अत्यंत कोमल अंत:करणाचा हा समर्थ महात्मा कळवळला आणि त्याने दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक तसेच भीमरूपी सारखी स्तोत्रे रचून जनउद्धारासाठी नौकाच निर्माण केली.
त्यांच्या मनोबोधाचे, त्यांच्या दासबोधाचे चिंतन हे आपल्याला सर्वांगांनी पुष्ट करणारे, परमार्थात अग्रेसर करणारे आहे. नित्य नियमाने मनाचे श्लोक म्हणणारा, त्यांचे चिंतन करणारा साधक कधीच दु:खी होणार नाही. नकारात्मक विचारांच्या कधीच तो आहारी जाणार नाही. हळूहळू मनाचे सर्व दोष जाऊन तो वैराग्य, सामर्थ्य व ज्ञान यांचा चढत्या क्रमाने अनुभव घेऊन पूर्णसुखी होईल यात शंका नाही.
सद्गुरु श्री समर्थांशिवाय आपली दररोजची पूजाही गोड वाटणार नाही. कारण आपण नेहमी म्हणत असलेल्या, गणपती, मारुती, शंकर, खंडोबा इत्यादी देवतांच्या लालित्यपूर्ण, रसाळ व बोधप्रद अशा अनेक आरत्या या समर्थांच्याच आपल्यावरील कृपेचे द्योतक आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातही त्यानिमित्ताने नकळत का होईना पण श्री समर्थांचाच सतत सहवास आपल्याला लाभतोय, हे महत्भाग्यच आहे आपले !!
सर्व बाबतीत सतत सावधानता बाळगून, नेटकेपणे पण अलिप्ततेने संसार करीत करीतच परमार्थ साधण्याचा मौलिक उपदेश देऊन, प्राप्त परिस्थितीतही योग्य पद्धतीने हरिकथेचा कल्लोळ करावयास सांगणारा, सांगितल्याबरहुकूम स्वत:ही वागून दाखवणारा हा महात्मा अद्वितीयच म्हणायला हवा.
आपल्या कुबडीमध्ये गुप्तपणे शस्त्र बाळगणारे आणि जोर-बैठका, सूर्यनमस्काराचा सतत पुरस्कार करणारे समर्थ, बलभीमाचे सच्चे उपासक होते. बलवान साधकच परमार्थातही पूर्णत्वास जातो, ही त्यांची सार्थ शिकवण होती.
"मनाची शते ऐकता दोष जाती ।" असे छातीवर हात ठेवून सांगणारी त्यांची समग्र रचना, साधकांसाठी अनंतकाळपर्यंत मार्गदर्शक आहे, तीच आपल्या साधनेचे अमृतमधुर पाथेय आहे. अखंड ऊर्जेचा खळाळता स्रोत आहे.
संत वाङ्मयाचे ज्येष्ठ-श्रेष्ठ अभ्यासक प.पू.श्री.शिरीषदादा कवडे श्री समर्थांचे यथोचित माहात्म्य सांगताना म्हणतात की, "भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या वाङ्मयाचा साक्षेपी आणि सखोल अभ्यास समर्थांनी केलेला होता, हे त्यांच्या वाङ्मयातून स्पष्टपणे दिसून येते. श्री माउलींच्या तत्त्वज्ञानाचे एवढे मूलगामी, यथायोग्य आकलन व त्या उन्मेषांची इतकी समाजहिताभिमुख मांडणी अन्य कोणी संतांनी अभावानेच केलेली दिसेल. म्हणून समर्थ रामदासांचे वाङ्मय अभ्यासले तर श्री माउलींचे सिद्धांत अधिक चांगल्याप्रकारे उलगडतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही."
किती आणि काय काय लिहावे? आपली क्षुद्र वाणी-लेखणी फारच तोकडी आहे या "समर्थ" रूपाचे वर्णन करण्यास !! श्रीरामरायांच्या या अपरस्वरूप दासाचे, श्री समर्थांचे यथार्थ वर्णन करण्यास आपण खरोखरीच असमर्थ आहोत. म्हणूनच त्यांच्या पदीं दंडवत घालून त्यांची करुणा-कृपा भाकून एकवार "जय जय रघुवीर समर्थ ।" असा जोरदार गजर करूया !!
समर्थ ते समर्थच, अपूर्व-अद्वितीय-उत्तम-अलौकिक-अद्भुत..... एवढेच म्हणून त्यांच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक लोटांगण घालून त्यांची करुणा भाकणे व त्यांच्या बोधाचे पाईक होऊन, त्यांच्या शांत-शीतल कृपाछत्राखाली परमार्थ-मार्गक्रमण करणे, हेच आपले परमसौभाग्य आहे. ते तरी थोडके कसे म्हणावे?
जय जय रघुवीर समर्थ ।
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

11 Feb 2017

तेचि वंदू श्रीचरण श्रीगुरूंचें

आज माघ कृष्ण प्रतिपदा. या तिथीला श्रीदत्तसंप्रदायात अतीव प्रेमादराने "श्रीगुरुप्रतिपदा" असे संबोधले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. श्रीगुरुप्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याच पुण्यपावन तिथीला अनेक संतांचे उत्सव असतात. श्रीगुरुप्रतिपदा हीच प्रत्यक्ष शिवावतार भगवान श्री निवृत्तिनाथ महाराजांची जन्मतिथी आहे. वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष, नैष्ठिक ब्रह्मचारी श्री.विष्णुबुवा जोग महाराज, सोलापूर येथील श्रीसंत प्रभाकर महाराज आणि श्रीक्षेत्र औदुंबर येथील प.प.श्री.नारायणानंदतीर्थ स्वामी अशा तीन संतांची ही देहत्यागाची तिथी आहे. अशा सर्व सुयोगांमुळे श्रीगुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्य-तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.
आजच्या तिथीला भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य केले होते. तेथे कालांतराने त्यांच्या 'विमल पादुका' स्थापन करण्यात आल्या. औदुंबरहून श्री स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र वाडीला गमन केले. ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले व त्यांनी तेथे अनेक अद्भुत लीला केल्या. तेथे त्यांनी अाश्विन कृष्ण द्वादशी, श्रीगुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या 'मनोहर पादुका' यांची स्थापन करून गाणगापुरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्याच पावन तिथीला आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत, हे आपण लक्षात घ्यावे.
भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचेच साक्षात् स्वरूप असणा-या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ विचारीत असतात, म्हणून आज याच तीन पादुकांसंदर्भात आपण माहिती घेेणार आहोत.
विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत, हे कोणालाच माहीत नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्रीगुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्रीगुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत.
औदुंबर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास्य आपल्या अनुष्ठानात व्यतीत केले होते. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना 'विमल पादुका' म्हणत असावेत. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल, दोष नसणा-या पादुका. पण या नावाचा उल्लेख श्रीगुरुचरित्रात नाही. या पादुकाही नंतर कोणा भक्ताने श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या तेथील वास्तव्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ, देवांच्याच अद्भुत प्रेरणेने प्रेमादरपूर्वक स्थापन केलेल्या असाव्यात.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वत: भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात,
तुम्हां सहित औदुंबरी ।
आमुच्या _पादुका मनोहरी_ ।
पूजा करिती जे तत्परीं ।
मनोकामना पुरती जाणा ॥श्रीगुरुचरित्र १९.८१॥

वाडी सोडून निघाल्यामुळे दु:खी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना श्री स्वामी महाराज म्हणतात की, "जे कोणी भक्त तुम्हां योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा, सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल !"
भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, गाणगापुरातून शैल्यगमन करण्यापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात,
कल्पवृक्षातें पूजोन ।
यावें आमुचें जेथ स्थान ।
पादुका ठेवितो _निर्गुण_ ।
पूजा करावी मनोभावें ॥श्रीगुरुचरित्र ५१.२१॥

"भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्षसम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी, असे स्वत: श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात.
श्रीक्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत, हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि त्यांना विशिष्ट असा आकार नाही. म्हणून या पादुकांना 'निर्गुण पादुका' म्हणतात. येथे निर्गुण शब्दाचा अर्थ "विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणा-या पादुका", असाच घ्यायला हवा.
या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते. त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात.
श्रीदत्त संप्रदायामध्ये मूर्तीपेक्षाही पादुकांनाच अत्यंत महत्त्व दिलेले दिसून येते. श्रीदत्त संप्रदायातील थोर विभूती, पूजनीय श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "श्रीदत्त संप्रदायात मूर्तिपूजा ज्येष्ठ नाही; गौण आहे. परमश्रेष्ठ आहे ती श्रीचरणपूजा ! तेथून प्राप्त होणारा आदेश आणि त्या तत्त्वाशी एकरूप होऊन बुद्धीच्या वैभवशाली उदरात जागलेला अलख ! ' श्रीचरण ' म्हणजे ' कृपायुक्त, शक्तियुक्त चरण '. या श्रीचरणांची महती कितीही गायिली तरी थोडीच आहे. त्यांच्या व्याप्तीचा आवाका देखील केवढा? तंत्रशास्त्राप्रमाणे एक चरण शिव तर एक शक्ती आहे. एक श्वेतबिंदू आहे तर एक रक्तरजोबिंदू ! आणि या श्रीचरणांच्या सामरस्यातून, संयोगातून जे प्रकट होते ते तर एक विलक्षण परब्रह्म ! ' तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।' अशी अनुभूती देणारेे तेच ते सद्गुरुतत्त्व !!"( संदर्भ: निगूढ योगपंचक, पृ. ११)
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज आपल्या 'विभूती' ग्रंथात सद्गुरूंची व्याख्या करताना म्हणतात, "ज्यांचे चरण म्हणजे साक्षात् श्री." सद्गुरूंचे श्रीचरण म्हणजेच भगवती कृपाशक्ती श्रीजगदंबा होय. तिच्या कृपेनेच साधकाचा परमार्थ सुफळ संपूर्ण होत असतो. म्हणूनच सर्व संप्रदायांमध्ये श्रीसद्गुरूंच्या श्रीचरणांचे, श्रीचरण पादुकांचे प्रेमादरपूर्वक पूजन, अर्चन केले जाते. भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी देखील तुम्हां आम्हां भक्तांच्या सर्वांगीण उद्धारासाठीच विमल, मनोहर व निर्गुण या तीन पादुकारूपांचा आविष्कार केलेला आहे. या तिन्ही पादुका म्हणजे भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे सर्वशक्तिसंपन्न असे सगुण रूपच आहे आणि त्यांची अत्यंत निष्ठेने व प्रेमाने केलेली उपासना, सेवा हीच आपल्यासाठी अमृतसंजीवनी आहे. प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज आपल्या 'औदुंबर पादुकास्तोत्रा'मध्ये म्हणतात की, "या दिव्य पादुकांच्या ठायी भगवान श्रीदत्तप्रभू, श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराज व श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अशा तिघांचेही एकाचवेळी अधिष्ठान असते. म्हणूनच या पादुका फार प्रभावी व अद्भुत आहेत."
श्रीदत्त, श्रीनाथ व भागवत संप्रदायांचे अध्वर्यू, श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज एक मार्मिक गोष्ट नेहमी सांगत असत. ते म्हणत की, "नृसिंहवाडी हे श्रीदत्तप्रभूंचे 'दिवाने खास' असून गाणगापूर हे 'दिवाने आम' आहे." याचा अर्थ असा की, श्रीदत्तप्रभू गाणगापूरला विशेषत्वाने आपल्या सर्व भक्तांना त्यांच्या त्यांच्या मनोभावानुसार योग्य ते प्रापंचिक वरदान देतात, तर नृसिंहवाडीला मात्र ते याबरोबरच निवडक अनन्य भक्तांवर अद्भुत असा पारमार्थिक कृपाप्रसाद देखील करतात. म्हणूनच प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज नृसिंहवाडीला मोठ्या प्रेमाने "दत्ताची राजधानी सुखाची ।" असे यथार्थ गौरवितात.
पू.मामांच्या या मार्मिक वाक्यावर थोडा विचार करूया. 'दिवाना' या शब्दाचा अर्थ आहे प्रेमात वेडा झालेला. गाणगापूर हे देवांवर प्रेम करणा-या आम भक्तांचे, म्हणजेच गीतेत सांगितलेल्या आर्त, अर्थार्थी व जिज्ञासू अशा तीन प्रकारच्या भक्तांचे स्थान आहे. तर श्रीनृसिंहवाडी हे खास भक्तांचे, म्हणजेच गीतेत सांगितलेल्या ज्ञानी भक्तांचे स्थान आहे. गाणगापूरला देव आर्तांचे लौकिक कल्याण करायला बसलेले आहेत, तर वाडीला तेच भक्तांवर परमार्थाची कृपा करून शाश्वत कल्याण करायला स्थानापन्न झालेले आहेत. पू.मामांच्या या वचनाची प्रचिती आज देखील आपण घेऊ शकतो. गाणगापूर आणि वाडी ही दोन्ही त्यांचीच प्रभावी स्थाने असली, तरी तेथील एकूण वातावरण व भाव पूर्णत: भिन्न आहे. वाडी हे जास्त परमार्थानुकूल स्थान असल्याचे त्वरित जाणवते.
आजच्या या परमपावन पुण्यतिथीला, सर्व संतांचे गुरुस्वरूप असणा-या भगवान श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय महाप्रभूंच्या आणि गुरूणां गुरु भगवान श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या सकलतीर्थास्पद अम्लान श्रीचरणकमलीं, सर्वांच्या वतीने वारंवार दंडवतपूर्वक कृपायाचना करतो. आजच्या या श्रीगुरुप्रतिपदा सुमुहूर्तावर, आम्हां सर्वांच्या हृदयात शांतस्निग्ध व नित्यसुगंधी असा श्रीकृपादीप निरंतर उजळो व त्याच्या प्रकाशात गुरूपदिष्ट साधन प्रेमाने व नेमाने अखंड घडून, आमचे अवघे भावविश्वच सद्गुरुमय होऊन ठाको, हीच भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीगुरुरायांच्या श्रीचरणीं कळकळीची प्रार्थना  !!
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

7 Feb 2017

भागवतोत्तम परमहंस श्रीहरी


आज माघ शुद्ध एकादशी, जया एकादशी; भूवैकुंठ पंढरीची माघी वारी !
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज ज्यांना गुरुस्थानी मानत असत, त्या राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे कृपांकित सत्पुरुष श्रीसंत हरिबाबा महाराजांची आज ११९ वी पुण्यतिथी आहे.
श्रीसंत हरिबाबा महाराज हे निरंतर अवधूत स्थितीत राहणारे अवलिया सत्पुरुष होते. त्यांचे पूर्ववृत्त काहीच माहीत नाही. इ.स.१८७५ साली अश्विन महिन्याच्या शुद्ध द्वादशीला ते फलटणच्या मारुती मंदिरात प्रथम प्रकटले. तेव्हापासून त्यांचे २४ वर्षे याच पुण्यनगरीत वास्तव्य झाले. त्यांनी देह ठेवला तेव्हा प.पू.श्री.काका अवघे दहा वर्षांचे होते. श्रीसंत हरिबुवांनी देह ठेवताना आपले सर्व आध्यात्मिक सामर्थ्य पू.काकांना बहाल केले, असे मानले जाते. पू.काकांनाही श्री हरिबुवांविषयी आत्यंतिक प्रेमादराची भावना होती. ते श्री हरिबुवांच्या दर्शनाला गेले की समाधी समोर गडाबडा लोटांगणे घालून दंडवतपूर्वक दर्शन घेत असत. समाधीच्या पाठीमागे असणारी श्री हरिबुवांची पंचधातूची श्रीमूर्ती पू.काकांनीच स्वत: बनवून आणून स्थापन केलेली आहे. लेखासोबत त्याच सुप्रसन्न श्रीमूर्तीचे छायाचित्र दिलेले आहे.
परमहंस श्री हरिबुवांच्या चरित्रातील अद्भुत हकिकती अत्यंत अलौकिक असून भक्तांची श्रद्धा वाढविणा-या आहेत. प.पू.श्री.गोविंदकाकांनीच श्रीहरिबाबांचे व त्यांच्या शिष्या श्रीसंत आईसाहेब महाराजांचे विलक्षण जीवनचरित्र, 'विभूती' नावाने लिहिलेले आहे. त्याची लिंक खाली देत आहे. हे सुरेख चरित्र सर्वांनी आवर्जून वाचावे ही विनंती.
श्रीसंत हरिबाबा महाराजांनी इ.स.१८९८ मध्ये आजच्या तिथीला समाधी घेतली. त्यांचे भव्य समाधी मंदिर फलटणला बाणगंगा नदीच्या काठावर उभे आहे. प.पू.काका दररोज या मंदिरात दर्शनाला जात असत व आपल्याकडे आलेल्या सर्व भक्तांनाही आवर्जून दर्शनाला पाठवीत असत.
आजच्या एकादशीला फलटण परिसरात मोठ्या आदराने "हरिबुवांची एकादशी" असेच संबोधले जाते. श्रीसंत हरिबाबांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग दंडवत.
विभूती चरित्राची लिंक
https://drive.google.com/file/d/0B-4fTpvl_d6seE1FWE9fNWpDbkU/view?usp=drivesdk
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

6 Feb 2017

पुंडलिक सखा आहे जेथे

आज माघ शुद्ध दशमी ! 
सद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिन !
श्रीसंत बाबाजी चैतन्य महाराजांनी स्वप्नात येऊन, आजच्याच पावन तिथीला श्री तुकोबारायांना कृपापूर्वक मंत्रोपदेश केला होता.
श्रीतुकोबांची गुरुपरंपरा, श्री राघवचैतन्य - श्री केशवचैतन्य - श्री बाबाजी चैतन्य - श्री तुकारामचैतन्य अशी आहे. श्रीबाबाजींनी त्यांना 'रामकृष्णहरि' हा महामंत्र दिला होता. म्हणून आजचा दिवस वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरा केला जातो.
आज भक्तश्रेष्ठ श्री पुंडलिकांची पुण्यतिथी देखील असते. या पुंडलिकांमुळेच भगवान श्रीपंढरीनाथ पंढरपुरात प्रकटले व गेली अठ्ठावीस युगे तेथेच स्थिर उभे राहिलेले आहेत. पत्नीवरील प्रेमाने आई वडिलांची काहीच सेवा न करणा-या पुंडलिकांना कुक्कुट ऋषींच्या कृपेने आपली चूक कळून येते. ते आईवडिलांना दैवत मानून त्यांची सेवा सुरू करतात व त्या सेवेने प्रसन्न होऊन भगवंत त्यांची भेट घ्यायला पंढरीत प्रकटतात. पुंडलिक आई वडिलांची सेवा करत असल्याने बाहेर वीट भिरकावून देवांना त्यावर उभे राहून थोडी वाट पाहायला सांगतात. त्यामुळे देव आजही श्री पुंडलिकांच्या भेटीसाठी विटेवर तिष्ठत आहेत.
परमार्थामध्ये पुंडलिक म्हणजे वैराग्य ! या वैराग्याच्या आधारावरच साधकाच्या शुद्ध झालेल्या चित्तात परब्रह्म प्रकटते व कायमचे स्थिर राहाते. वैराग्य जेवढे दृढ होत जाईल तेवढे श्रीभगवंत साधकहृदयात पैसावतात. म्हणूनच वैराग्याला साधनेच्या प्रांतात फार महत्त्व दिलेले दिसून येते.
सगळे संत पुंडलिकांना 'सखा' म्हणतात. ते सर्व वैष्णवांचे, हरिदासांचे जीवाभावाचे सखेच आहेत. कारण त्यांनीच तर उघडे परब्रह्म विटेवर उभे केलेले आहे. वैष्णवांवरील या उपकाराचे उतराई होणे कधीच शक्य नाही. म्हणूनच पुंडलिकांविषयी सर्वांना अतीव प्रेमादर आहे.
भगवान श्री माउली एका महत्त्वाच्या ओवीत म्हणतात की,
वीतरागतेसारिखा ।
जोडोनि ठेविला सखा ।
जो आघवियाचि भूमिका ।
सवें चाले ॥ज्ञाने.१८.५२.१०४६ ॥

श्रीसद्गुरुकृपेने लाभलेल्या साधनेच्या बळावर, साधकाने वैराग्यरूपी सखा एकदा का जोडून आपलासा केला, की तो सर्व भूमिकांमध्ये साधकाला समर्थ साथ देतो. त्याच्या साह्यानेच खरेतर साधकाचा परमार्थ सुफळ संपूर्ण होत असतो. सर्व प्रसंगी जो प्रेमाने व आपुलकीने साथ देतो, तोच तर खरा सखा म्हटला पाहिजे ना? वैराग्यरूपी पुंडलिक हे असेच यथार्थ सखे आहेत.
भक्तश्रेष्ठ श्री पुंडलिकरायांची स्तुती करताना श्रीतुकोबा म्हणतात,
भला भला पुंडलिका ।
मानलासी जनलोका ।
कोण्या काळें सुखा ।
ऐशा कोण पावत ॥१॥
नातुडे जो कवणे परी ।
उभा केला विटेवरी ॥२॥
अवघा आणिला परिवार ।
गोपीगोपाळांचा भार ॥३॥
तुका म्हणे धन्य झाले ।
भूमी वैकुंठ आणिले ॥४॥
परमार्थात पुंडलिक म्हणजे वैराग्य. ते पूर्ण झाले की, साधनेने शुद्ध झालेल्या साधकहृदयरूपी भाव-विटेवर आपल्या सर्व परिवारासह, पार्षदांसह श्रीभगवंत साक्षात् प्रकटतात. म्हणजे एकदा वैराग्य आले की त्यासोबत सर्व दैवी सद्गुण आपोआपच येतात. कोणीही स्वप्रयत्नाने, स्वबुद्धीने कितीही साधन केले, तरी जे कधीच पूर्णपणे प्राप्त होऊ शकत नाहीत, ते श्रीभगवंत श्रीगुरुकृपेने प्रकटलेल्या शुद्ध वैराग्याच्या बळावर मात्र कायमचे आपलेसे होतात. पुंडलिकांच्या भक्तीसाठी ते आजही विटेवर उभे आहेतच ना ! वैराग्याच्या आधाराने अगदी तसेच ते प्राप्त होतात. शिवाय ते एकटे येत नाहीत, आपला सद्गुणरूपी पूर्ण परिवारही सोबत आणतात, म्हणूनच श्रीतुकोबाराय म्हणतात की, "अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥"
आज या पुण्यपर्वावर, वैराग्यरूपी भक्तश्रेष्ठ श्री पुंडलिकराय व वैराग्यशिरोमणी श्री तुकोबारायांचे श्रीचरणीं कृपा-प्रार्थनापूर्वक सादर दंडवत !!
( छायाचित्र संदर्भ : भक्तश्रेष्ठ पुंडलिकराय मंदिर, श्रीक्षेत्र पंढरपूर. )
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

1 Feb 2017

वसंतपंचमीचा सुमुहूर्त

आज माघ शुद्ध पंचमी, वसंत पंचमी ! या तिथीला श्रीपंचमी देखील म्हणतात.
उत्तरभारतात हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. वसंतोत्सवाची सुरुवात म्हणून गोकुळातही हा आनंददायक उत्सव साजरा होतो. भगवती श्रीसरस्वतीची विशेष उपासना या दिवशी केली जाते. कारण ही ज्ञानदात्या शारदा वागीश्वरीची, भगवती श्रीसरस्वतीची जयंतीच मानली जाते. तसेच ही कामदेवांचीही जयंती. त्यामुळे उत्तम वैवाहिक जीवनासाठी यादिवशी रती-कामदेवांचेही पूजन करण्याचा आपल्याकडे पूर्वापार प्रघात आहे.
आजच्या दिवसाचे अजून एक महत्त्व म्हणजे, आजच्याच सुमुहूर्तावर भगवान श्रीकृष्ण व वज्रचूडेमंडित अखंडसौभाग्यवती भगवती रुक्मिणीमातु:श्रींचा विवाह द्वारकापुरीत संपन्न झाला होता. तसेच आजच्याच तिथीला भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या आई-वडिलांचा, श्री विठ्ठलपंत व सौ.रुक्मिणीबाईंचाही आळंदी येथे विवाह झाला होता.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी पैठण क्षेत्री इ.स.१२८८ मध्ये रेड्याच्या मुखातून वेद वदविले होते. अर्धोदय पर्वणीवर, पौष अमावास्येला सुरू झालेले ते वेदपठण, वसंत पंचमीच्याच पावन मुहूर्तावर पाच दिवसांनी पूर्ण झाले होते. साक्षात् भगवान श्री माउलींची अमोघ कृपा लाभलेला तो ज्ञान्या रेडा, पाच दिवस अविरत वेदपठण करीत होता. त्यावेळी पैठण मधील बोपदेवादी ब्रह्मवृंदाने सही शिक्क्यानिशी श्री माउलींना दिलेले 'शुद्धीपत्र' आजही उपलब्ध आहे. यात भगवान श्री माउलींनी केलेल्या अलौकिक लीलांचा, त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांच्या साक्षीने केलेला स्पष्ट उल्लेख पाहायला मिळतो.
आजच्याच तिथीला इ.स.१६०९ मध्ये संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय, देहू गावातील आंबिले(मोरे) या निष्ठावंत वारकरी घराण्यात, कनकाई व बोल्होबा यांच्या पोटी जन्मले. त्यांच्या घराण्यात महाजनकी म्हणजेच सावकारी होती. पण सगळे वारकरी संस्कार असल्याने लोकांची अजिबात पिळवणूक होत नसे.
श्री तुकोबाराय हे भगवंतांचे नित्य पार्षदच होते. श्रीनृसिंह अवतारात भक्तवर प्रल्हाद, श्रीरामावतारात अंगद, श्रीकृष्णावतारात सखा उद्धव, श्री माउलींच्या अवतारकालात श्री नामदेव महाराज व नंतर श्री तुकोबाराय, त्यानंतर पंढरी क्षेत्री श्री तुकाविप्र महाराज व शेवटी श्री चिदंबरशिष्य श्री राजाराम महाराज; असा हा युगानुयुगे चालू असलेला अद्भुत अवतारक्रम आहे.
श्री तुकोबांना सद्गुरु श्री.बाबाजी चैतन्य महाराजांनी स्वप्नात अनुग्रह केलेला होता. त्यांची अलौकिक अभंगरचना हा एक चमत्कारच आहे. रोकडा ब्रह्मानुभव नेमक्या व स्वानुभूत शब्दांमध्ये, परखडपणे सांगण्याची त्यांची हातोटी अद्वितीयच म्हणायला हवी.
अशी ही वसंतपंचमी म्हणजे एक मोठा उत्तम मुहूर्तच होय. या पावन पर्वानिमित्त, भगवान श्रीरुक्मिणी-पांडुरंग, भगवान श्री माउली व श्रीसंत तुकोबाराय यांच्या अम्लान श्रीचरणारविंदी आपण साष्टांग दंडवत घालून विनवूया ! "आमच्या हृदयी सद्गुरुकृपा रूप सरस्वतीचे प्रकटीकरण करवून, आमच्या चित्तात प्रसन्नमाधवी बहरून अर्थात् कृपा-वसंताची संपन्न पखरण करून खरी 'वसंतपंचमी'  घडवून आम्हांलाही धन्य करावे" ; हीच कळकळीची प्रार्थना करूया !!
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )