6 Feb 2017

पुंडलिक सखा आहे जेथे

आज माघ शुद्ध दशमी ! 
सद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिन !
श्रीसंत बाबाजी चैतन्य महाराजांनी स्वप्नात येऊन, आजच्याच पावन तिथीला श्री तुकोबारायांना कृपापूर्वक मंत्रोपदेश केला होता.
श्रीतुकोबांची गुरुपरंपरा, श्री राघवचैतन्य - श्री केशवचैतन्य - श्री बाबाजी चैतन्य - श्री तुकारामचैतन्य अशी आहे. श्रीबाबाजींनी त्यांना 'रामकृष्णहरि' हा महामंत्र दिला होता. म्हणून आजचा दिवस वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरा केला जातो.
आज भक्तश्रेष्ठ श्री पुंडलिकांची पुण्यतिथी देखील असते. या पुंडलिकांमुळेच भगवान श्रीपंढरीनाथ पंढरपुरात प्रकटले व गेली अठ्ठावीस युगे तेथेच स्थिर उभे राहिलेले आहेत. पत्नीवरील प्रेमाने आई वडिलांची काहीच सेवा न करणा-या पुंडलिकांना कुक्कुट ऋषींच्या कृपेने आपली चूक कळून येते. ते आईवडिलांना दैवत मानून त्यांची सेवा सुरू करतात व त्या सेवेने प्रसन्न होऊन भगवंत त्यांची भेट घ्यायला पंढरीत प्रकटतात. पुंडलिक आई वडिलांची सेवा करत असल्याने बाहेर वीट भिरकावून देवांना त्यावर उभे राहून थोडी वाट पाहायला सांगतात. त्यामुळे देव आजही श्री पुंडलिकांच्या भेटीसाठी विटेवर तिष्ठत आहेत.
परमार्थामध्ये पुंडलिक म्हणजे वैराग्य ! या वैराग्याच्या आधारावरच साधकाच्या शुद्ध झालेल्या चित्तात परब्रह्म प्रकटते व कायमचे स्थिर राहाते. वैराग्य जेवढे दृढ होत जाईल तेवढे श्रीभगवंत साधकहृदयात पैसावतात. म्हणूनच वैराग्याला साधनेच्या प्रांतात फार महत्त्व दिलेले दिसून येते.
सगळे संत पुंडलिकांना 'सखा' म्हणतात. ते सर्व वैष्णवांचे, हरिदासांचे जीवाभावाचे सखेच आहेत. कारण त्यांनीच तर उघडे परब्रह्म विटेवर उभे केलेले आहे. वैष्णवांवरील या उपकाराचे उतराई होणे कधीच शक्य नाही. म्हणूनच पुंडलिकांविषयी सर्वांना अतीव प्रेमादर आहे.
भगवान श्री माउली एका महत्त्वाच्या ओवीत म्हणतात की,
वीतरागतेसारिखा ।
जोडोनि ठेविला सखा ।
जो आघवियाचि भूमिका ।
सवें चाले ॥ज्ञाने.१८.५२.१०४६ ॥

श्रीसद्गुरुकृपेने लाभलेल्या साधनेच्या बळावर, साधकाने वैराग्यरूपी सखा एकदा का जोडून आपलासा केला, की तो सर्व भूमिकांमध्ये साधकाला समर्थ साथ देतो. त्याच्या साह्यानेच खरेतर साधकाचा परमार्थ सुफळ संपूर्ण होत असतो. सर्व प्रसंगी जो प्रेमाने व आपुलकीने साथ देतो, तोच तर खरा सखा म्हटला पाहिजे ना? वैराग्यरूपी पुंडलिक हे असेच यथार्थ सखे आहेत.
भक्तश्रेष्ठ श्री पुंडलिकरायांची स्तुती करताना श्रीतुकोबा म्हणतात,
भला भला पुंडलिका ।
मानलासी जनलोका ।
कोण्या काळें सुखा ।
ऐशा कोण पावत ॥१॥
नातुडे जो कवणे परी ।
उभा केला विटेवरी ॥२॥
अवघा आणिला परिवार ।
गोपीगोपाळांचा भार ॥३॥
तुका म्हणे धन्य झाले ।
भूमी वैकुंठ आणिले ॥४॥
परमार्थात पुंडलिक म्हणजे वैराग्य. ते पूर्ण झाले की, साधनेने शुद्ध झालेल्या साधकहृदयरूपी भाव-विटेवर आपल्या सर्व परिवारासह, पार्षदांसह श्रीभगवंत साक्षात् प्रकटतात. म्हणजे एकदा वैराग्य आले की त्यासोबत सर्व दैवी सद्गुण आपोआपच येतात. कोणीही स्वप्रयत्नाने, स्वबुद्धीने कितीही साधन केले, तरी जे कधीच पूर्णपणे प्राप्त होऊ शकत नाहीत, ते श्रीभगवंत श्रीगुरुकृपेने प्रकटलेल्या शुद्ध वैराग्याच्या बळावर मात्र कायमचे आपलेसे होतात. पुंडलिकांच्या भक्तीसाठी ते आजही विटेवर उभे आहेतच ना ! वैराग्याच्या आधाराने अगदी तसेच ते प्राप्त होतात. शिवाय ते एकटे येत नाहीत, आपला सद्गुणरूपी पूर्ण परिवारही सोबत आणतात, म्हणूनच श्रीतुकोबाराय म्हणतात की, "अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥"
आज या पुण्यपर्वावर, वैराग्यरूपी भक्तश्रेष्ठ श्री पुंडलिकराय व वैराग्यशिरोमणी श्री तुकोबारायांचे श्रीचरणीं कृपा-प्रार्थनापूर्वक सादर दंडवत !!
( छायाचित्र संदर्भ : भक्तश्रेष्ठ पुंडलिकराय मंदिर, श्रीक्षेत्र पंढरपूर. )
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

6 comments:

  1. पुंडलिक म्हणजे वैराग्य हा नव्याने बोध झाला ! त्यांचे महत्त्व आपणा सर्वांसाठी अनन्यसाधारण आहे !
    दोन्ही संतांना साष्टांग दंडवत !
    आपणांस मनःपूर्वक ! धन्यवाद

    ReplyDelete
  2. जय जय विठ्ल जय हरी विठल

    ReplyDelete
  3. सर्व संतांच्या हृदयीचे दैवत ज्यांनी पंढरीत आणले अशा भक्ताशिरोमणी पुंडलिक महाराजाना कोटी कोटी दंडवत

    ReplyDelete
  4. तुका म्हणे पुंडलिका | तुचि भक्त बळीया निका ||

    ReplyDelete
  5. पुंडलिक राये बंधू त्याची ख्याती काय सांगू....

    ReplyDelete
  6. 😜🙏🌷🙏

    ReplyDelete