25 Jul 2016

गुरु नाही नाशिवंत गुरु सत्य तो अनंत -उत्तरार्ध


मूळ परब्रह्माचे तीन समान भाग शास्त्रांनी सांगून ठेवलेले आहे. हे तिन्ही मुळात एकरूपच असले तरी कार्यपरत्वे त्यात भेद आहे. मूळ सत्तारूप परब्रह्म हे निष्क्रिय, निष्काम, निर्विकार, निराकार आहे. ते केवळ अधिष्ठानरूप आहे. त्या परब्रह्माच्या साकार रूपाला शक्ती किंवा प्रकृती म्हणतात. " शिवाभिन्ना शिवंकरी ।  " असे भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज स्पष्टच सांगतात. शिवांहून त्यांची शक्ती भिन्न नाही. शिवांच्या अधिष्ठानावर आणि त्यांच्याच संकल्पाने ही शक्ती स्वत:पासून या चराचर जगाचा विस्तार करते. हीच मायाशक्ती होय. याशिवाय शिवांचेच म्हणजेच परब्रह्माचे आणखी एक साकार रूप म्हणजे " श्रीसद्गुरु " होय. शिव निराकार, शक्ती साकार पण नियमांनी बांधलेली आणि सद्गुरु साकार व सर्वतंत्रस्वतंत्र असतात. मायेचा कसलाही बाध त्यांना लागू होत नाही, ते कायमच मायेच्या पलीकडे असतात. श्रीसमर्थ रामदास स्वामी श्रीदासबोधातील सद्गुरुस्तवन समासाच्या पहिल्याच ओवीत म्हणतात, " आतां सद्गुरु वर्णवेना । जेथें माया स्पर्शों सकेना ॥१.४.१॥" सद्गुरूंना माया स्पर्श देखील करू शकत नाही. म्हणूनच प. पू. श्री. शिरीषदादा कवडे आपल्या श्रीगुरुतत्त्वाचे अतीव सुरेख वर्णन करणा-या अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात,
गुरु नाही नाशिवंत ।
गुरु सत्य तो अनंत ॥१॥

या मायेचे नाश हेच मुख्य लक्षण आहे. " उपजे ते नाशे । " हाच खरा सिद्धांत आहे. प. पू. श्री. शिरीषदादा कवडे आपल्या आणखी एका अभंगात म्हणतात, " जे जे डोळां दिसे, ते ते पावे नाश । ऐसा श्रुतिघोष, कानी आहे ॥१॥"  डोळ्यांना जे दिसते ते सर्व नाश पावणारेच आहे. पण त्या मायेचा स्पर्शही नसल्याने सद्गुरुतत्त्व मात्र अविनाशी आहे.
श्रीगुरुतत्त्व सत्य आणि अनंतही आहे. जे कोणत्याही काळी, कोणत्याही स्थितीत अविकृत राहते, म्हणजे ज्यात कसलाही बदल होत नाही, तेच ' सत्य ' म्हटले जाते. सत्याला कसलीही सापेक्षता नाही. श्रीगुरुतत्त्व हेच या असत्य, विकारी, सतत बदलणा-या जगातील अविकारी पूर्णसत्य आहे. श्रीगुरुतत्त्व ज्या देहाच्या आश्रयाने प्रकटते तो पावन देह देखील सत्यच असतो.
अनंत म्हणजे परमात्मा. ज्याची शक्ती अनंत, सामर्थ्य अनंत, लीला अनंत, प्रेमही अनंत; तोच परमात्मा होय. श्रीगुरूच शिष्यासाठी असे चालते बोलते भगवंत असतात. म्हणून तेच अनंतही आहेत, असे प. पू. श्री. शिरीषदादा येथे म्हणत आहेत. श्रीसंत एकनाथ महाराजही म्हणतात, " एका जनार्दनी गुरु देव । येथे नाही बा संशय ॥ "
श्रीगुरूंच्या तात्त्विक स्वरूपाचे वर्णन करताना पू. दादा अभंगाच्या दुस-या चरणात म्हणतात,
गुरु शांतिबोध गुंफा ।
सिद्ध चैतन्याची प्रपा ॥२॥

श्रीगुरु हे शांती व ज्ञानाचे आगर आहेत. शांती हा परमार्थाचा सर्वोच्च गुण आहे. भगवान श्रीमाउलींनी यावर फार सुंदर विवरण केलेले आहे. आत्मज्ञान परिपूर्णतेने झाल्यानंतर त्या महात्म्याच्या ठिकाणी जो भाव प्रकट होतो, त्याला परमशांती म्हणतात. हा भगवद् भावच आहे. अशा ज्ञानोत्तर शांतीची नित्य व एकांत गुंफा म्हणजेच श्रीगुरु होत. त्यांची ती शांती कधीही कशानेही ढळत नसते. डोंगरातील निर्जन ठिकाणची गुहा जशी कायमच नि:शब्द असते, तशीच त्यांची शांती अढळ असते. त्यात कसल्याही प्रकारचे तरंग उठत नाहीत. तसेच ज्ञानाच्या बाबतीत परिपूर्णता केवळ श्रीगुरूंच्या स्वरूपातच असते. ज्ञान त्यांच्या ठायी शोभायमान होत असते.
प्रपा म्हणजे पाणपोई. श्रीगुरु हे निरंतर प्रवाहित होणा-या भगवत् चैतन्याची पाणपोईच असतात. कोणीही यावे व त्या सिद्ध ज्ञानमय चैतन्याचे पान करून सुखी व्हावे, तिथे कसलाही धरबंध नाही, कोणतीही अडवणूक नाही. फक्त अनन्यता व शरणागती मात्र हवी, तरच ह्या चैतन्याचे अमृतपान भरभरून करता येते.
शिष्याच्या विषयी असलेला श्रीगुरूंचा निखळ प्रेमभाव सांगताना अभंगाच्या तिस-या चरणात पू. श्री. दादा म्हणतात,
गुरु प्राणांचाही प्राण ।
शिष्यालागी आत्मदान ॥३॥

आपल्या शरीरात दहा प्राण असतात. प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पाच मुख्य प्राण तर नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे पाच उपप्राण. या दहांचे नियंत्रण प्राणशक्ती म्हणजेच कुंडलिनी शक्ती करते. तिच्याच साहाय्याने आपल्या शरीराची एकूण एक कामे हे दहाजण मिळून करतात. त्यामुळे महात्मे म्हणतात की, आपले शरीर प्राणांवर चालते. श्रीसद्गुरुकृपा म्हणजेच सद्गुरुशक्ती हीच त्या प्राणांचे संजीवन आहे. म्हणून पू. दादा येथे श्रीगुरूंना प्राणांचाही प्राण असे म्हणत आहेत.
कोणत्याही निर्जीव गोष्टीत केवळ कटाक्षाने प्राण फुंकण्याचे अजब सामर्थ्य श्रीगुरूंच्या कृपेक्षणात असते. त्यांची नुसती दृष्टी पडली तरी मेलेला जिवंत होऊन चालू लागतो. आजवरच्या असंख्य महात्म्यांच्या चरित्रात असे प्रसंग आपण सर्वांनी वाचलेले आहेतच. नुकताच काशीच्या पूज्यपाद श्री त्रैलंगस्वामींचा एक मजेशीर प्रसंग मी वाचला. एकदा अचानकच ते आपल्या ब्रह्मासिंह नावाच्या शिष्याला घेऊन दशाश्वमेध घाटावर आले. तेथे काशीचे महाश्मशान आहे. तेवढ्यात नावेतून एक प्रेत घेऊन काही लेक उतरले. त्याबरोबर एक स्त्री देखील उतरून त्या प्रेताला कवटाळून रडू लागली. स्वामींनी शिष्याला माहिती काढायला सांगितली. ती एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिचा नवरा मेला होता व त्यांना मूलबाळही नव्हते. म्हणून ती सती जाण्यासाठी लोकांना विनवीत होती, पण कोणी तयार होत नव्हते. हे ऐकून त्रैलंगस्वामी तिच्या जवळ गेले व तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवीत म्हणाले, " मुली तू का एवढी रडतेस? " तिने सगळी हकीकत सांगितली व त्यांचे चरण घट्ट धरून रडायला लागली. ते तिचे सांत्वन करत म्हणाले, " अगं, माझा पाय तरी सोड. तू कुठे जातेस? अजून तुला तुझ्या नव-याची भरपूर सेवा करायची आहे ना ! " ती चमकून त्यांच्याकडे पाहू लागली. ते शांतपणे उठले व त्या प्रेताच्या बेंबीला त्यांनी आपला उजव्या पायाचा अंगठा लावला आणि सोबतच्या लोकांना त्या प्रेताचे दोर सोडायला सांगितले. आश्चर्य म्हणजे काही क्षणातच त्या निर्जीव प्रेतात पुन्हा जीव आला व ते हालचाल करू लागले. लोक दिङ्मूढ होऊन पाहात आहेत तेवढ्यात स्वामी तिथून हळून निघूनही गेले. श्रीत्रैलंग स्वामींची ही हकीकत प. पू. श्री. दादांच्या " गुरु प्राणांचाही प्राण । " या चरणाचे मूर्तिमंत उदाहरणच आहे. 
या चरणाच्या उत्तरार्धात प. पू. श्री. दादा फार महत्त्वाचा विषय सांगत आहेत. श्रीगुरूंकडून होणा-या दीक्षेची प्रक्रियाच ते येथे सांगत आहेत. श्रीगुरु कृपावंत होऊन दीक्षा देतात म्हणजे काय करतात? तर ते शिष्याच्या हृदयात स्वत:ला स्थापन करतात, शिष्याला ते आत्मदान देतात. हाच महत्त्वाचा संदर्भ पू. दादा येथे मुद्दाम देत आहेत. परमार्थ पूर्णत्वाला जायला हवा असेल तर अशी श्रीगुरूंची आत्मदानरूप कृपा व्हावीच लागते व ती सर्वथा त्यांच्याच इच्छेवर अवलंबून असते. आपल्याला हवा म्हणून आपण कोणाचा असा अनुग्रह नाही घेऊ शकत. तो त्यांनीच कृपावंत होऊन, आपला पूर्व ऋणानुबंध पाहून, सगुण रूपाने किंवा यथार्थस्वप्न दृष्टांतादी मार्गाने स्वत:च्या इच्छेने व प्रसन्नतेने द्यावा लागतो. म्हणूनच असा श्रीगुरूंचा कृपाप्रसाद हा अत्यंत दुर्मिळ व अमोघ असतो असे शास्त्रांनी व संतांनी वारंवार सांगून ठेवलेले आहे. तो प्रसाद झाल्याशिवाय खरा परमार्थ सुरूच होत नाही.
श्रीगुरूंच्या संगतीचे माहात्म्य किती गोड असते, हे प. पू. श्री. दादा अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात,
गुरु निराकारा अंग ।
नि:संगासी नित्यसंग ॥४॥

गुरु म्हणजे निराकार अशा मूळ परब्रह्माचेच अंग आहेत. निराकाराला जेव्हा जगद्कल्याणासाठी साकार व्हायची तीव्र इच्छा होते, तेव्हा ते ज्या रूपात साकार होते, ते म्हणजेच हे परमकरुणामय श्रीगुरुतत्त्व होय. निराकाराचा अलौकिक आकार म्हणजे श्रीगुरु होत.
परब्रह्माचे परिपूर्ण ज्ञान झाल्यावर महात्मा नि:संग, निर्विकार, निर्विचार, निरालंब होतो. त्याला कसल्याही वासना, कामना, इच्छा वगैरे काहीही शिल्लक नसते. अशा नि:संग झालेल्या महात्म्यांनाही आपल्या श्रीगुरूंचा लौकिक तसेच अलौकिक सहवास मात्र सतत हवाहवासा वाटत असतो. आत्मतृप्त झालेल्या त्यांची श्रीगुरु सहवासाची तृप्ती कधीच होत नाही. नि:संगांनाही ज्यांचा नित्य संग व्हावासा वाटते, ते हे श्रीगुरुपरब्रह्म म्हणूनच बोलाबुद्धीच्या पलीकडचे मानलेले आहे.
या अत्यंत मनोहर अभंगाच्या शेवटच्या चरणात प. पू. श्री. शिरीषदादा म्हणतात,
गुरु सगुण निर्गुण ।
अमृतेचे देहभान ॥५॥

श्रीगुरुतत्त्व हे एकाचवेळी सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. श्रीमाउली देखील, " सगुण निर्गुण एकु गोविंदु रे । " म्हणतातच की.
सगुण व निर्गुण या संज्ञांचा अर्थ नेहमीच गोंधळात टाकणारा असतो. यांचे नेमके वर्णन करायचे झाले तर, सगुण म्हणजे गुणांसह असणारे व निर्गुण म्हणजे गुणविरहित होय. पण या दोन्ही शब्दांमध्ये अभिप्रेत असणारे " गुण " भिन्न आहेत, हे ब-याचवेळा लोक ध्यानात न घेताच अर्थ करतात आणि मग गोंधळात पडतात. सगुण म्हणजे दैवी गुणांसह प्रकटलेले. भगवंतांचे सहा विशेष गुण माउली सांगतात. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य या षड्गुणांसह ज्यांनी दिव्य पांचभौतिक पूर्ण शुद्धसत्त्वमय देह धारण केलेला आहे, त्यांच्यासाठी " सगुण " असे शास्त्रांचे संबोधन आहे. तर निर्गुण म्हणजे ज्यांच्या ठायी सत्त्व, रज व तम हे तीन गुण नाहीत ते. निर्गुणचा सामान्यत: निराकार एवढाच अर्थ लोक करतात. पण तो बरोबर नाही. त्रिगुणरहित ते निर्गुण व दैवी सद्गुणसहित ते सगुण होय. भगवान श्रीमाउलींचा " कान्होबा तुझी घोंगडी चांगली । " हा अभंग याठिकाणी  जाणून घेतला तर हे सगुण-निर्गुण वर्णन नीट समजेल. विस्तारभयास्तव एवढेच फक्त सूचित करतो.
श्रीगुरुतत्त्व हे असे एकाचवेळी सगुण व निर्गुण उभयरूप आहे व तेच श्रीगुरुकृपेने आता अमृतेचे देहभानही व्यापून दशांगुळे उरलेले आहे, असा अद्भुत स्वानुभव प. पू. श्री. शिरीषदादा कवडे शेवटी सांगत आहेत. अमृता आता नामरूपातीत होऊन अंतर्बाह्य गुरुमय होऊन गेलेली आहे. हाच परमार्थातील सर्वोच्च ब्रह्मानुभव आहे.
श्रीसद्गुरूंच्या परमकृपेने ही वेडीवाकुडी सेवा हातून घडली. माउली जिथे स्वत:ला " गुरुवर्णनी  मुका । आळशी पोसिजे फुका । " म्हणतात तिथे माझ्यासारख्या खरोखरीच्या ना-लायकाने काय मिजास मारावी? परमभाग्याने लाभलेल्या या श्रीगुरुवर्णनरूप सेवासंधीचे त्यांच्याच कृपेने सोने झालेले आहे, हे माझ्यावरील त्या दयार्द्र प्रभूंचे अपार कृपाऋणच म्हणायला हवे. म्हणून सादर कृतज्ञतेने त्याच परमाद्भुत विश्वव्यापक नित्यमंगलस्वरूप श्रीगुरुचरणकमलीं ही सेवा तुलसीदलरूपाने समर्पितो. आणि; आम्हां सर्वांच्या हातून प्रेमादराने साधन घडून आमचेही देहभान असेच निरंतर गुरुमय होऊन राहो, हीच या श्रीगुरुपौर्णिमेच्या पावन प्रसंगी प्रार्थना करून त्या श्रीचरणस्मरणानंदात माझ्या मनींचे प्रेमभाव व्यक्त करून विराम घेतो.
केव्हा मज भेटशील गुरुराया ।
मस्तक पायांवरी ठेवीन ॥१॥
डोळेभरी पाहीन रूप मनोहर ।
तुलसी चरणांवर वाहीन ॥२॥
भावनैवेद्य अर्पीन प्रेमाने ।
चरणसंवाहने सुखी होईन ॥३॥
केव्हा लाहीन तंव कृपाप्रसाद ।
फिरेल वरद कर पाठी ॥४॥
साहवेना मज विरह आता ।
तंव पोटा माया का न ये ॥५॥
दयामाया काही करी गा देवा ।
मनींच्या प्रेमभावा जाणोनिया ॥६॥
जीव कासावीस अंतर असोस ।
आत्मजा उदास अंतर्बाह्य ॥७॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

(अशा माहितीपूर्ण पोस्ट नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील पेज लाईक करावे ही विनंती.
https:// rohanupalekar.blogspot.in)

19 Jul 2016

गुरु नाही नाशिवंत गुरु सत्य तो अनंत -पूर्वार्ध


आज श्रीगुरुपौर्णिमा  !!!
स्वत:ला अज्ञानी, अपूर्ण समजणा-या जीवाचे ते " जीवपण " फेडून मूळचे शिवपण पुन्हा प्रकट करणा-या, एकमेवाद्वितीय अलौकिक, चालते बोलते परब्रह्म, करुणावरुणालय मायमाउली श्रीगुरु भगवंतांचा हा विशेष स्मरणदिन. अतीव प्रेमादराने, कृतज्ञतेने करुणा भाकण्याचा शिष्यांचा हक्काचा दिवस  !!
श्रीगुरु हे तत्त्व आहे. गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नव्हेत. ते तर साक्षात् परब्रह्माचे परम कोमल परम दयाळू असे विलक्षण स्वरूप आहे. श्रीभगवंतांची अनुग्रहशक्ती म्हणजेच श्रीगुरु. ज्या रूपाच्या दयाकृपेला अंत ना पार त्यांनाच शास्त्रांमध्ये श्रीगुरु असे म्हणतात. हेच जीवाचे खरे सोयरे होत.
शास्त्रांनी गुरुतत्त्वाचे फार सुरेख वर्णन करून ठेवलेले आहे. संतांनी देखील याविषयीचा आपला स्वानुभव भावपूर्ण शब्दांमध्ये सांगून ठेवलेला आहे. त्यांचा सर्वांगीण विचार करणे कोणालाच शक्य नसले तरी, आजच्या या पावन पर्वावर आपण श्रीगुरुतत्त्वाची ही यथाशक्य ' अक्षरपूजा ' बांधून आपलाही प्रेमभाव त्यांच्या श्रीचरणीं अर्पून धन्य होऊया.
आपल्या " दीक्षारहस्य " या पुस्तकात प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी गुरुतत्त्वाचे फार मार्मिकपणे शास्त्रशुद्ध विवेचन केलेले आहे. त्यातील काही भाग आपण समजून घेऊया. गुरुतत्त्वाचे कार्यपरत्वे तीन भेद होतात. यांनाच १. गुरु, २. श्रीगुरु आणि ३. सद्गुरु असे म्हणतात. भगवंतांची केवळ सदिच्छाशक्ती, मार्गदर्शक शक्ती ( लौकिक, पारलौकिक) कार्य करते, पण उद्धारक शक्ती सुप्त असते, तेव्हा ते तत्त्व ' गुरु ' असते. म्हणजे आपण कोणलाही काही विचारले आणि त्यांनी ते सांगून मार्गदर्शन केले, तर तो ' गुरू'च होय. भगवान श्रीदत्तात्रेयांनी असे चोवीस लौकिक गुरु मानून, त्यांच्यापासून एकेक गुण घेतल्याची आख्यायिका श्रीमद् भागवतात आहे.
श्रीगुरु मधील ' श्री ' ही श्रीभगवंतांची कृपाशक्ती, उद्धारक शक्ती. ही शक्ती साधनेच्या युक्तिसहित श्रीभगवंत ज्यांच्या माध्यमातून प्रेरित करतात, त्यांना ' श्रीगुरु ' म्हणतात. श्रीगुरूंकडून जीवाला शक्तियुक्त ज्ञान प्राप्त होते. शिवाय लौकिक पारलौकिक मार्गदर्शनांचीही प्राप्ती होतेच. हे ' श्रीगुरु ' जेव्हा शक्तिस्वरूप होऊन ठाकतात, पूर्णत: शक्तिलीन होतात, तेव्हाच ते ' सद्गुरु ' या संज्ञेला प्राप्त होतात. शास्त्रांनी श्रीगुरु व सद्गुरूंना साक्षात् शिवस्वरूप मानूनच त्यांची उपासना करण्याची आज्ञा करून ठेवलेली आहे. श्रीगुरूंची कृपा झाल्याशिवाय कोणालाच कधीही मोक्ष लाभत नाही.
श्रीगुरूंच्याच ठायी यच्चयावत् सर्व देव-देवतांचा निवास असतो. प्रत्येक शिष्यासाठी त्याचे श्रीगुरूच सर्वदेवस्वरूप असतात. म्हणूनच भगवान श्रीज्ञानेश्वर माउली स्पष्ट सांगतात, " गुरुवीण देव दुजा पाहतां नाही त्रिलोकी ॥ "
प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांनी आपल्या " विभूती " ग्रंथात सद्गुरुतत्त्वाची चौदा लक्षणे सांगितली आहेत. या स्वानुभूत अशा चौदा व्याख्याच आहेत. अर्थात् प. पू. काकांच्या गूढरम्य भाषेत असल्याने त्या व्याख्या तशा सहज आकलन होतील अशा नाहीत. त्यातील शेवटच्या मार्मिक व्याख्येत पू. काका म्हणतात, " ज्यांचे चरण म्हणजे मूर्तिमंत ' श्री ' ! " या वाक्यातून पू. काकांनी फार महत्त्वाचे संदर्भ सांगून ठेवलेले आहेत. नाथ संप्रदायातील अत्यंत गुप्त राखलेल्या " श्रीचरणसंप्राप्तियोग " या विशेष योगाचा सूचक उल्लेख पू. काका येथे करीत आहेत. श्रीगुरूंच्या श्रीचरणांतूनच भगवत्कृपेचा झरा वाहत असतो. म्हणून श्रीगुरूंचे श्रीचरणच शक्तीचे साक्षात् प्रतीक मानले जातात व त्याच श्रीचरणांची, श्रीचरणपादुकांची पूजा करण्याची पद्धत पूर्वीपासून संतांनी घालून दिलेली आहे. श्रीज्ञानेश्वरीतून प्रकट होणा-या  या श्रीचरणसंप्राप्तियोगावर प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनीच सर्वप्रथम " निगूढ योगपंचक " ग्रंथात सविस्तर लिहिलेले आहे.
श्रीगुरूंचे, त्यांच्या स्वरूपाचे आणि कार्याचे यथार्थ वर्णन करणारा एक नितांतसुंदर अभंग प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी रचलेला आहे. आज व उद्या याच अर्थगर्भ अभंगाचा आपण आस्वाद घेणार आहोत. श्रीगुरुगौरव गायनाच्या या महोत्सवात सहभागी होऊन सर्वांनी श्रीगुरुप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती.
प. पू. श्री. शिरीषदादा आपल्या अभंगात म्हणतात,
गुरु नाही नाशिवंत ।
गुरु सत्य तो अनंत ॥१॥
गुरु शांतिबोध गुंफा ।
सिद्ध चैतन्याची प्रपा ॥२॥
गुरु प्राणांचाही प्राण ।
शिष्यालागी आत्मदान ॥३॥
गुरु निराकारा अंग ।
नि:संगासी नित्यसंग ॥४॥
गुरु सगुण निर्गुण ।
अमृतेचे देहभान ॥५॥

श्रीगुरुतत्त्व नाशिवंत तर नाहीच, पण सत्य व अनंत आहे. शांती व बोधाची खाण असणारे सद्गुरुतत्त्व हे नित्यसिद्ध अशा चैतन्याची सतत वाहणारी पाणपोईच आहेत. गुरूच खरे प्राणांनाही संजीवन देणारे मुख्यप्राण आहेत. तेच शिष्यावर कृपा करून त्याला स्वत:चेच दान देऊन टाकतात. निराकार असे परब्रह्मच गुरुरूपाने आकारलेले असून नि:संग असे महात्मेही सतत त्याच तत्त्वाचा संग करीत असतात. गुरूच सगुण व निर्गुण असे उभयरूप असून तेच आता अमृतेचे ( प. पू. श्री. दादांची नाममुद्रा)  देहभानही व्यापून उरलेले आहेत.
या गुरुतत्त्वाचे मनोहर वर्णन करणा-या अभंगाचे सविस्तर आस्वादन आपण उद्याच्या लेखात करणार आहोत.
श्रीगुरुतत्त्व हे नित्यसिद्ध व अविनाशी असते. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, गुरुतत्त्वाचे साकार रूप असणारे भगवान श्रीदत्तप्रभू हे जगद्गुरु आहेत. त्यांचा अवतार हा नित्य अवतार आहे. इतर सर्व अवतार कार्य संपल्यावर स्वधामी परत निघून गेले, पण जगातील अज्ञान नष्ट करण्याचे श्रीगुरूंचे कार्य असल्याने श्रीदत्तप्रभू मात्र अज्ञान संपेपर्यंत कार्यरत राहणारच आहेत. जग आहे म्हणजे कुठे ना कुठे अज्ञान आहेच, त्यामुळे श्रीगुरुतत्त्वाचे मूळस्रोत असणारे श्रीदत्तप्रभू व त्यांचेच अंश असणारे श्रीगुरु अखंड कार्यरत आहेतच.
आज परब्रह्माच्या या नित्य अवताराच्या विशेष पूजनाचा दिवस आहे. हा शिष्यांसाठी सर्व सणांहून मोठा सण आहे. श्रीगुरुतत्त्व नित्य असल्यानेच श्रीगुरुकृपारूपी चंद्रमा देखील अखंड आहे. लौकिक चंद्राप्रमाणे त्याला क्षय-वृद्धी नाही. म्हणूनच पूर्ण कलांनी उगवलेल्या या श्रीगुरुकृपाचंद्राची पौर्णिमाही अखंडच आहे. म्हणजे श्रीगुरुपौर्णिमा हा वर्षातून साजरा करण्याचा एक दिवस नाही. शिष्याच्या हृदयात सतत जागृत असणा-या आपल्या परमदयाळू श्रीगुरूंचे त्याला प्रेमपडिभराने ज्या ज्या वेळी स्मरण होईल, तो तो प्रत्येक क्षण हा श्रीगुरुपौर्णिमा महोत्सवच आहे. असा श्रीगुरुपौर्णिमेचा निरंतर सोहळा आपल्या हृदयात साजरा होण्यासाठी प्रेमाने व नेमाने श्रीगुरूंनी कृपावंत होऊन दिलेले साधन करीत राहिले पाहिजे. साधनाच साध्य मानून हातून सतत घडली की मग श्रीगुरुकृपारूपी महामेघ अविरत वर्षाव करून आपले सर्वांग अंतर्बाह्य पुनीत करतो. त्यानंतरच खरी अ-खंडित श्रीगुरुपौर्णिमा साजरी होत असते, असे संत सांगतात. हाच अमृतयोग सर्व गुरुभक्तांच्या जीवनात लवकरात लवकर येवो या सदिच्छेसह आजच्या पावन प्रसंगी श्रीगुरु भगवंतांच्या अम्लान, सर्वतीर्थास्पद व सर्वार्थद श्रीचरणीं कोट्यनुकोटी दंडवत घालून सादर सप्रेम श्रीगुरुस्मरणात तूर्त रजा घेतो. ( क्रमश: - लेखाचा उत्तरार्ध उद्या )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

17 Jul 2016

*** धन्य कल्याण रामदास ***


भगवान श्रीज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात एक सुंदर ओवी घालतात. गुरुद्रोही माणसाचे नाव मुखाने जरी घेतले तरी ते महान पाप ठरते. मग गीतेच्या विवरणाच्या ओघात अज्ञानलक्षणे सांगताना हे जे पाप झाले, त्याचे प्रायश्चित्त म्हणून माउली म्हणतात,
आतां गुरुभक्तांचें नांव घेवों ।
तें वाचे प्रायश्चित्त देवों ।
गुरुभक्तांचें नाम पाहों ।
सूर्य जैसा ॥१३.६७५॥
येथे माउली अतीव प्रेमादराने गुरुभक्तांच्या नामस्मरणाचे माहात्म्य सांगत आहेत. गुरुभक्त आपल्या गुरुचरणीं समर्पित निष्ठेने इतके मोठे झालेले असतात की, श्रीभगवंतांच्या नामासारखे त्यांचे नामही घेणा-याच्या पापांचा नाश करते.
अशा परम अद्भुत गुरुभक्तांचे शिरोमणी म्हणून शोभून दिसणा-या समर्थ रामदासांचे बहिश्चर प्राण योगिराज श्रीकल्याणस्वामींची आज ३०२ वी पुण्यतिथी. त्यानिमित्त या महान विभूतिमत्वाची ही शब्दपूजा करण्यासाठी तुम्हां सर्वांना मी सादर आमंत्रित करीत आहे. आपलीही गुरुभक्ती दृढावण्यातच या पूजेचे सुफल आहे.
आजवरच्या भारताच्या देदीप्यमान इतिहासात फार थोर गुरु-शिष्य होऊन गेलेले आहेत. मत्स्येंद्रनाथ- गोरक्षनाथ, निवृत्तिनाथ-ज्ञानेश्‍वर, गुरु नानक- गुरु अंगददेव, मुक्ताई-चांगदेव अशा स्वनामधन्य गुरु-शिष्य जोडगोळ्यांमध्ये स्वतेजाने तळपणारी आणखी एक जोडगोळी म्हणजे समर्थ रामदास-कल्याणस्वामी ही होय !
राष्ट्रगुरु समर्थ रामदासांचे श्रेष्ठ शिष्य अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी तथा कल्याणस्वामी हे समर्थ संप्रदायात पूजनीय मानले जातात. अंबाजींची समर्थांशी पहिली भेट इ. स. १६४५ मध्ये कोल्हापूर येथे झाली. त्या वेळी त्यांचे वय अंदाजे बारा वर्षांचे असावे. समर्थांच्याही मनात या हरहुन्नरी, सालस व गुणी मुलाने घर केले असावे. प्रत्येक कामातले त्याचे कौशल्य, कल्पकता व टापटीप, नेटकेपणा, तीव्र स्मरणशक्ती पाहून समर्थ खूश झाले. अंबाजीसोबत त्याच्या मातोश्री रखमाबाई व बंधू दत्तात्रेय हेही समर्थ सेवेत रुजू झाले. समर्थ संप्रदायाच्या इतिहासात मसूर गावी घडलेली झाडाच्या फांदीची गोष्ट प्रचलित आहे. सद्गुरु आज्ञेचे तंतोतंत पालन करण्यासाठी उलट्या बाजूने अंबाजीने फांदी तोडली; पण त्यामुळे फांदीसह तो विहिरीत पडला. समर्थांनी त्याला ‘‘कल्याण आहेस ना?’’ असे विचारले. तेथूनच पुढे हा पट्टशिष्य ‘कल्याण’ नावाने ओळखला जाऊ लागला.
समर्थ रामदास हे फार विलक्षण विभूतिमत्त्व होते. त्यांचा साक्षेप, त्यांचे सूक्ष्म निरीक्षण, त्यांचे अलौकिक व्यवस्थापन कौशल्य, त्यांची दूरदृष्टी, समाजहिताची तळमळ, त्यांचा स्वधर्म व स्वराष्ट्राविषयीचा तीव्र प्रेमादर, सारेच अद्भुत होते. त्यांच्या सर्व सद्गुणांचा दुसरा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे कल्याणस्वामी होत! समर्थांना अभिप्रेत असणारा खरा महंत कल्याणांच्या रूपाने त्यांच्या अखंड सोबत वावरत होता !
कल्याण स्वामींना ही स्थिती काही फुकट मिळालेली नव्हती. समर्थ रामदासांनी या शिष्याची वारंवार परीक्षा घेऊन, तावून-सुलाखून त्याला तयार केलेले होते. कल्याणस्वामींच्या यशस्वी कारकीर्दीत समर्थांचे प्रयत्न व श्रेय नक्कीच महत्त्वाचे आहे.
कल्याणस्वामी इ. स. १६७८ पर्यंत समर्थांच्या सावलीसारखे सोबत वावरले. त्यांना समर्थांचे मार्गदर्शन ३६ वर्षे लाभले. समर्थांचाही आपल्या या पट्टशिष्यावर पूर्ण विश्‍वास होता. त्यामुळे आपल्या पश्‍चात हाच आपला संप्रदाय व उभारलेले ११०० मठांचे संघटन व्यवस्थितरीत्या सांभाळू शकेल, याची खात्री वाटल्याने आपल्या देहत्यागाच्या तीन वर्षे आधी समर्थांंनी कल्याणस्वामींना लोकोद्धारासाठी डोमगावकडे रवाना केले.
कल्याणस्वामींचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची तीव्र स्मरणशक्ती व सुरेख हस्ताक्षर हे होय. व्यवहारामध्ये असे म्हणतात, की शारीरिक बळ आणि बौद्धिक बळ कधी एकत्र जात नाही; पण कल्याणस्वामी हे याला मोठाच अपवाद होते. बलदंड शरीर आणि कुशाग्र बुद्धी, विशेष प्रज्ञा यांचा सुरेख संगम कल्याणस्वामींच्या ठायी झालेला होता. आपल्या या लाडक्या शिष्याचा हा अलौकिक अधिकार, त्याचा हकनाक द्वेष करणा-या इतर शिष्यांना सप्रमाण दाखवून द्यावा म्हणून एकेदिवशी समर्थांनी लीला रचली. दासबोधातील एक ओवी सांगून ती कोणत्या समासातली कितवी ओवी आहे, हे समर्थांंनी विचारले. दासबोधाची निरंतर पारायणे करणार्‍या शिष्यांनाही आठवेना. समर्थ म्हणाले, ‘‘कल्याणाला विचारा!’’ एक शिष्य धावत गेला. कल्याणस्वामी कोठी घरात सुपार्‍या निवडत होते. त्या शिष्याने ओवी उच्चारताच कल्याणस्वामींनी एका क्षणात त्या ओवीचा समास व क्रमांक सांगितला. सगळेच शिष्य अचंबित झाले. समर्थांंनी कल्याणांना बोलावून विचारले, ‘‘कधी वाचलास रे दासबोध?’’ कल्याणस्वामी नम्रपणे उत्तरले, ‘‘स्वामी, रोजच्या कामात वेळ कुठे होतो? आपण सांगितलात तेव्हा लिहून घेतानाच तेवढा वाचला मी दासबोध!’’ आपल्या पट्टशिष्याची जगावेगळी स्मरणशक्ती पाहून समर्थही मनोमन सुखावले.
कल्याणस्वामींनी त्यांच्या शिष्य परंपरांमध्ये लेखनक्रिया रोजच्या रोज झालीच पाहिजे, असा दंडकच घातला होता. कल्याणांचे सर्वच शिष्य एकटाकी, सुंदर व देखणे लेखन करण्यात पटाईत होते. त्या परंपरेतील दासबोधाच्या प्रतींचा सर्मथभक्त शंकरराव देवांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. याशिवाय कल्याण-परंपरेतील मठांमधून ज्ञानेश्‍वरी, संतांचे गाथे यांच्याही सुंदर हस्तलिखित प्रती आजही पाहायला मिळतात. छापखाने अस्तित्वात नव्हते त्या काळात अत्यंत दूरदृष्टीने कल्याणस्वामींनी चालविलेला हा ग्रंथ संवर्धनाचा उपक्रम मोलाचा ठरतो !
बलभीम मारुतीरायांची उपासना करणार्‍या, गुरूंसाठी दोन प्रचंड मोठे हंडे पाणी दररोज सज्जनगड उतरून उरमोडी नदीतून भरून आणणा-या श्रीकल्याणस्वामींनी त्या काळात शारीरिक व बौद्धिक अशा दोन्ही प्रकारांनी बलवान, सशक्त समाज घडवण्याचे केलेले कार्य फारच महत्त्वाचे मानायला हवे. आपले स्वत्वच विसरु लागलेल्या समाजाला पुन्हा जागृत करण्याचे व त्याला सामर्थ्य देण्याचे मौलिक कार्य या समर्थशिष्याने नेमकेपणे केलेले दिसून येते.
आमच्या श्रीक्षेत्र दत्तधाम जवळील हेळवाकच्या घळीत या  गुरुशिष्यांच्या अनोख्या स्नेहबंधाचे दर्शन करविणारा एक सुंदर प्रसंग घडला होता. श्रीसमर्थ रामदास स्वामी हेळवाकच्या घळीत मुक्कामाला असताना एकदा त्यांची विड्याची पाने संपली. म्हणून त्यांनी तसल्या भयाण पावसाळी रात्रीच ती आणून देण्याविषयी आपल्या सोबतच्या शिष्यांना आज्ञा केली. कोणीच ते दिव्य करायला तयार होईना. तेवढ्यात कल्याणस्वामींच्या कानावर समर्थांची इच्छा आली. ते तत्काळ त्या अंधा-या रात्री पाने आणायला बाहेर पडले. आजही हेळवाक परिसरात चांगले जंगल आहे, त्याकाळी तर काय असेल? नेमके त्याचवेळी कल्याणस्वामींच्या पायाला एका भुजंगाने दंश केला व ते बेशुद्ध पडले. हे वृत्त कानी पडताच समर्थ कळवळले. तोवर लोकांनी कल्याणांना घळीत आणले. आपला बहिश्चर प्राण निपचित पडलेला पाहून समर्थांनाही धीर धरवेना. त्यांनी त्याच तगमगीत भैरवनाथाला अकरा मण साखरेचा नवस बोलला. भगवंतांच्याच संकल्पाने तो भुजंग डसला होता, समर्थांच्या संकल्पाने त्याचे विष त्वरित उतरले. कल्याणस्वामी शुद्धीवर आले. समर्थांनी प्रेमपडिभराने आपल्या शिष्याला हृदयाशी धरले. पुढे छत्रपती शिवरायांनी जातीने ती अकरा मण साखर पाठवून दिली व समर्थांनी भैरवनाथाचा नवस फेडला. आजवरच्या इतिहासात शिष्याचे प्राण वाचावेत म्हणून श्रीगुरूंनी नवस केल्याचे हेच एकमात्र उदाहरण आहे. शिष्याची गुरुआज्ञा पालनाची तीव्रतम निष्ठा व गुरूंचे आपल्या शिष्यावरील अकृत्रिम प्रेम यांचा सुरेख वस्तुपाठ असणारी ही कथा प्रत्येक साधकाने मनावर कोरून ठेवावी, इतकी विशेष आहे.
उभी हयात गुरुवचनाचे तंतोतंत पालन करण्यात घालविलेल्या कल्याणस्वामींनी आपली ही गुरुनिष्ठा शेवटच्या क्षणीही कायम ठेवली. सद्गुरु श्रीसमर्थांंचा अस्थिकलश चाफळ मंदिरातील वृंदावनात जपून ठेवलेला होता. त्या अस्थींचे विसर्जन करण्याविषयी उंब्रज मठाच्या केशवस्वामींनी श्रीकल्याणस्वामींना वारंवार विचारले; पण नेहमी ‘ पुढें पाहू ’, असेच उत्तर मिळे.
शेवटी इ. स. १७१४ मध्ये अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशीला, केशवस्वामींनी विसर्जनाची परवानगी मिळेलच या खात्रीने तो पवित्र अस्थिकलश वृंदावनातून उचलला आणि डोमगावकडे प्रयाण केले. पण घडले आक्रीतच ! ज्याक्षणी इकडे तो अस्थिकलश जागेवरून हलवला त्याचक्षणी तिकडे डोमगांवी समर्थांंच्या लाडक्या कल्याणानेही सद्गुरुस्मरणात आपला देह ठेवला. डोमगावला पोहोचल्यावर केशवस्वामींना घडलेली घटना समजून अतीव दु:ख झाले. आश्चर्य म्हणजे गुरु-शिष्यांनी आपली जोडगोळी तिथेही सोडली नाही. शेवटी दोघांच्याही अस्थी एकत्रच गंगेमध्ये विसर्जित झाल्या. काय त्या जगावेगळ्या प्रेमाचे वर्णन करावे? ऐसे गुरुशिष्य होणे नाही  !!
या भावभरल्या प्रसंगाविषयी तितक्याच भावपूर्ण शब्दांत आपल्या " हृदयसंवाद " ग्रंथातील " जईं आनंदघनु स्वामी भेटे " या अप्रतिम लेखात, संत वाङ्मयाचे जाणते अभ्यासक प. पू. श्री. शिरीषदादा कवडे म्हणतात, " ....डोमगांवहून उभय गुरु-शिष्यांच्या अस्थी एकत्रच मार्गस्थ झाल्या आणि पुढे श्रीकेशवस्वामींच्या हस्ते काशीक्षेत्री गंगेत एकाचवेळी विसर्जित झाल्या. तब्बल तेहेतीस वर्षे श्रीसद्गुरुचरणांचे अनुसंधान राखत अखेर त्याच श्रीचरणीं श्रीकल्याणस्वामी कायमचे विसावले. आपल्या सद्गुरूंची छत्रसावली भक्तिबळाने त्यांनी अखेरच्या प्रवासातही मिळवली. सद्गुरुभक्तीने लाभणा-या कृतार्थतेचीही ही परिसीमाच म्हणायला हवी.
कृतार्थतेने धन्यतेच्या आश्रयाला जाण्याचे प्रसंग आधीच अत्यंत दुर्मिळ असतात; आणि अशा प्रसांगांचे साक्षिगणेश तर त्याहून विरळ. चाफळच्या वृंदावनाने मात्र ते महद्भाग्यलेणे वर्षानुवर्षे अंगभर मिरवून जपून ठेवलेले आहे ! बा मायबापा कल्याणराया; आपल्या सद्गुरुसेवास्फूर्ती प्रदान करणा-या चरणधूलीच्या स्पर्शाचे सौभाग्य तरी मज पामराला लाभू द्यावे  ! आपल्या लोकोत्तर, सर्वकलासंपन्न अशा सुमंगल सद्गुरुभक्तीला माझे वारंवार साष्टांग दंडवत प्रणाम असोत ! "
आज आषाढ शुद्ध त्रयोदशी, दि. १७ जुलैला याच भाव-मनोहर प्रसंगाला तीनशे दोन वर्षे पूर्ण होत आहेत. कल्याणस्वामींचे भावोज्ज्वल आणि देदीप्यमान जीवन व कार्य केवळ समर्थ संप्रदायच नाही, तर जगातील सर्व गुरुसंप्रदायांना अनंतकाळपर्यंंत प्रेमभक्तीच्या सोज्ज्वळ दीपाचा शांत-स्निग्ध ब्रह्मप्रकाश देऊन भक्तिमार्गावर अग्रेसर करीत राहील, यात शंका नाही ! श्रीकल्याण स्वामींच्या पुण्यतिथीच्या या पावन पर्वावर, आजवर होऊन गेलेल्या सर्व थोर थोर गुरुशिष्यांच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक दंडवत घालून आपणही, " आमची गुरुभक्ती दृढ होवो, " अशीच सप्रेम प्रार्थना करूया व त्यांच्या दिव्य चरित्र चिंतनाच्या माध्यमातून गुरुप्रेमाचा भावगर्भ आस्वाद घेत श्रीगुरुचरणीं विसावूया  !!
[ श्रीकल्याणस्वामींच्या विषयी अधिक माहितीसाठी kalyanswami.blogspot.com या ब्लॉगला जरूर भेट द्यावी ही विनंती. ]
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(अशा माहितीपूर्ण पोस्ट नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील पेज लाईक करावे ही विनंती.
https:// rohanupalekar.blogspot.in)

15 Jul 2016

*** पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी ***


देवशयनी आषाढी एकादशी, भूवैकुंठ पंढरपूरची आषाढी वारी !
महाराष्ट्रातील सर्वात मोठा व तळागाळापर्यंत रुजलेला, अत्यंत देखणा व विलक्षण संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय होय. आम्हां वारकरी संप्रदायिकांचा दिवाळी-दसरा-पाडवा, सगळे सण एकाच दिवशी असणारा महासण - आषाढी एकादशी !
निष्ठावंत वारक-याला आषाढी जवळ आली की काही सुचत नाही की दुसरे काही दिसतही नाही. श्रीसंत तुकोबाराय ख-या वारकरी भक्ताची ही पंढरी-दर्शनाची विरह-कातर मनस्थिती अगदी नेमकेपणे सांगताना म्हणतात,
संपदा सोहळा नावडे मनाला ।
लागला टकळा पंढरीचा ॥१॥
जावे पंढरीसी आवडी मनासी ।
कधी एकादशी आषाढी हे ॥२॥
इतकी तीव्र प्रेमभावना ज्या भक्ताच्या हृदयगाभा-यात सतत उमसत असते, त्या भक्ताची, पंढरीचा हा निळा लावण्यसुंदरू देखील अत्यंत कासाविस होऊन वाट पाहत असतो. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात,
तुका म्हणे ऐसें आर्त ज्याचे मनी ।
त्याची चक्रपाणि वाट पाहें ॥३॥
खरोखरीच, वारीची व पंढरीची ओढ खूप वेगळीच असते, शब्दांच्या कवेत न येणारी, पण तरीही अवघे हृदय अखंड भरून टाकून सतत विरहज्वाळा वाढविणारी !!
पंढरीचे भगवंत हेही जगावेगळेच नाहीत का? अहो, हा भगवंतांचा एकमात्र अवतार आहे की, ज्यांनी कोणतेही शस्त्र हातात घेतलेले नाही ! या श्रीपंढरीनाथांचे " प्रेम " हेच अस्त्र-शस्त्र आणि सर्वस्व आहे. ते प्रत्येकाला प्रेमानेच वश करतात आणि भक्ताच्या निरपेक्ष प्रेमाला क्षणात वश देखील होतात. त्यांना वेगळ्या शस्त्राची काय गरज ?
पंढरी ही प्रेमनगरी आहे, इथे सर्वत्र केवळ प्रेमाचाच व्यवहार, इथले चलन ही प्रेमच आणि त्या चलनाच्या मोबदल्यात मिळणारी वस्तूही प्रेमच ! पंढरीचा हा सावळा गोवळा भक्तवात्सल्याचे तोडर आपल्या पायात अभिमानाने बाळगतो, ते काही उगीच नाही. अहो, त्याला भक्त-प्रेमाचे इतके व्यसन आहे की, तो साक्षात् परमात्मा असूनही लाचावून भक्तांच्या मागे मागे सतत धावत असतो. भक्तांची गुरे-ढोरे राखतो, चोखोबांबरोबर मेलेली जनावरेही ओढतो. जनाबाईंना कोणी जवळचे नातेवाईक नाहीत म्हणून हा परमात्मा अखंड त्यांची काळजी वाहतो, त्यांना न्हाऊ-माखू घालतो, मायमाउली होऊन त्यांची वेणी-फणी सुद्धा करतो. गोरोबाकाकांच्या साथीने चिखल मळतो, त्यातून माठ, परळ अशा वस्तूही तयार करतो. कान्होपात्रेचे भावपूर्ण सुस्वर गायन ऐकतो, तर सोयराबाईचे बाळंतपणही विठाबाई होऊन स्वहस्ते करतो. बाल नामयाच्या हस्ते दूध पितो आणि सावतोबांसोबत मोट वळतो, धान्य पेरतो, शेतीही करतो. किती लीला सांगाव्यात या परमदयाळू भक्तवत्सल भगवंताच्या? वर्णन करायला आयुष्य पुरणार नाही ......ब्रह्मदेवाचेही !
खरं सांगू का? बाप असूनही मायपण मिरवणा-या या विठूमाउलीचे हे जगावेगळे प्रेम-वात्सल्य पाहून, अहो, आमची रुक्मिणीआई देखील चकितच झालीये. पोरांचे प्रेम ही खरी स्त्रीसुलभ भावना, पण जगाची साक्षात् माता असणारी रुक्मिणी आई देखील आमच्या देवांचे हे जगावेगळे प्रेमळपण पाहून अक्षरश: लाजली आणि त्यांच्या मागे लपून बसलीये हो ! पाहा जाऊन पंढरीत, मी मनाचे सांगत नाहीये.
अशा प्रेमळपणाचे, वात्सल्याचे आगर असणा-या माय-बापाला भेटण्यासाठी कोणते पोर आसुसलेले नसणार? म्हणूनच आज शेकडो वर्षे हा पंढरीचा प्रेम-हाट नित्य वाढतोेच आहे, फुलतोच आहे व पृथ्वीच्या अंतापर्यंत वाढतच राहील, यात अजिबात शंका नाही !
साधी कल्पना करा, खूप दिवसांनी लाडके पोर भेटल्यावर आईची काय अवस्था होते? इथे तर या विठूमाउलीची लाखो लेकरं जमलीत, त्या माउलीचा जयजयकार करण्यात, तिची अपूर्व-मनोहर लीला गाण्यात मग्न झालीत. त्या परमप्रेमळ मायमाउलीच्या आषाढीच्या अलौकिक आनंद-उधाणाची कल्पना महासागरालाही करणे केवळ अशक्य आहे.
खरेतर, आपणही कशाला असल्या काल्पनिक फंदात पडावे? मायमाउलीच्या उबदार कुशीत शिरून तिला आपले सुख-दु:ख सांगून, तिच्याकडून कुरवाळून घेणे, तिच्या आवेगभरल्या चुंबनाचे सौख्य भोगणे, हे आपले हक्काचे कौतुक आहे, तेच या आषाढी महाएकादशीच्या पावन पर्वावर आपण सर्वजण मनसोक्त उपभोगूया आणि निरंतर ते सुख मिळावे म्हणून प्रार्थनाही करूया.
सदा माझे डोळां जडो तुझी मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरीया ॥१॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्वकाळ ॥२॥
विठो माउलीये हाचि वर देई ।
संचरोनि राही हृदयामाजी ॥३॥
तुका म्हणे काही न मागे आणिक ।
तुझे पायी सुख सर्व आहे ॥४॥
भारतीय संस्कृतीतील चातुर्मास्याची सुरुवात आषाढी एकादशीला होते व चार महिन्यांनंतर कार्तिकी एकादशीला समाप्ती होते. भगवान श्रीविष्णूंचा हा चार महिन्यांचा शयनकाल मानला जातो. त्यामुळेच आषाढीला " देवशयनी एकादशी " म्हणतात व कार्तिकीला " प्रबोधिनी एकादशी " म्हणतात.
पंढरपूरला वर्षातल्या सर्वच शुद्ध पक्षातील एकादशांचे महत्त्व आहे, त्यातही आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार एकादशींना महत्त्व जास्त असते. " आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो ।" असे श्रीएकनाथ महाराज देखील म्हणतात.
भगवान श्रीपंढरीनाथ हे योगमूर्ती आहेत. त्यांनी आपले दोन्ही चरण जोडलेले असून नेत्र मिटलेले आहेत. समचरण असणे हे योगशास्त्रातील फार दुर्मिळ आणि दिव्य लक्षण आहे. भगवान पंढरीनाथ हे आपल्या परमप्रिय भक्तांचे निरंतर ध्यान करीत असतात, म्हणून त्यांनी आपले नेत्र मिटलेले आहेत. आपल्या लाडक्या भक्तांची ते अखंड वाट पाहात असतात. त्यांना भक्तांशिवाय करमतच नाही. भक्तांचीही स्थिती याहून काही भिन्न नसते. अशा अनन्य भक्तांसाठीच गेली अठ्ठावीस युगे पांडुरंग भगवंत पंढरीत उभे आहेत. कारण; " प्रेमळांचे सांकड आमुचिया गावी ।" ही त्यांची खरी खंत आहे. अहो, शुद्ध व निरपेक्ष प्रेम करणा-यांची त्यांच्याकडे फार मोठी वानवा आहे.
भगवान श्रीविठ्ठल हे रंगाने काळे असताना त्यांना " पांडुरंग " का बरे म्हणत असतील? हा प्रश्न अनेकांना नेहमीच सतावतो. याचे नेमके उत्तर प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी सांगितलेले आहे. भगवान श्रीकृष्ण किंवा श्रीविठ्ठल हे जलदश्याम, मेघश्याम आहेत. ते पूर्ण काळे नाहीत, श्यामल आहेत. ढगांचा किंवा धुक्याचा रंग जसा असतो तसेच. म्हणून त्यांचे जे दर्शन होते ते त्याच श्यामल रंगातील लखलखीत तेजस्वी स्वरूपाचे. त्या रूपाचा रंग हा पांढुरकाच असल्याने त्यांना संतांनी पांडुरंग हे नाव दिलेले आहे. त्यांचे तेज निळसर पांढरे आहे.
" वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तातडी उतावीळ ॥ " अशी भक्तांची तीव्र आवड असणारे हे भगवंत किती प्रेमळ म्हणावेत? तुलनाच नाही त्यांच्या प्रेमाला ! तेच भक्तलोभी भगवान श्रीविठ्ठल येथे उराउरी भेटतात, भक्तांना अंगाखांद्यावर वागवतात, त्यांचे सर्व लळे पुरवतात. म्हणूनच भूवैकुंठ श्रीपंढरीचे वैभव त्रिखंडात इतरत्र कोठेही पाहायला, अनुभवायला मिळणार नाही. पंढरी ती पंढरीच, एकमेवाद्वितीय, अलौकिक, अद्भुत आणि अवर्णनीय देखील !! तिथले अपरंपार महासुख साक्षात् श्रीपंढरीश परमात्म्याच्या रूपाने विटेवर प्रकटलेले असून तेच सर्व वारक-यांच्या रूपाने आपल्याच आत्मसुखाची अखंड अनुभूती घेत असते. आषाढी कार्तिकीला त्यांच्या या प्रेमसागराला अपरंपार भरते येत असते. त्या उधाणाच्या मत्त कल्लोळामध्ये अवघे चराचरच प्रेममय, आनंदमय होऊन ठाकले, तर त्यात नवल ते काय?
हे सगळे आपल्या अनुभूती-कक्षेच्या पूर्णपणे बाहेरचेे, बोला-बुद्धीच्या पलीकडचे आहे. शब्दांच्या असल्या कुबड्यांना तेथे काय हो मातब्बरी? " येथे अनुभवचि प्रमाण ।" म्हणून पंढरीनाथांच्या त्या सीमारहित आणि अलौकिक प्रेमाचा अनुभव ज्याचा त्यानेच आपापला घेऊन सुखमय होऊन जायचे असते. या परमपावन आषाढी एकादशीच्या पुण्यपर्वावर, नंद-सुनंद, जय-विजय, गरुड-हनुमंत इत्यादी सर्व पार्षदांसह भगवान रुक्मिणी-पांडुरंग आणि त्यांचेच अभिन्न प्रेमस्वरूप असणा-या माउली श्रीज्ञानदेव, श्रीनामदेव, श्रीएकनाथ, श्रीरामदास, श्रीतुकोबादी सर्व संतश्रेष्ठांच्या व त्यांच्या नावाचा गजर करीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वारीत सहभागी झालेल्या सर्व भक्तश्रेष्ठांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत घालूया व शुद्ध भक्तिप्राप्तीसाठी कळकळीची प्रार्थना करून " पुंडलिकवरदा हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम " असा जयजयकार करून त्याच परमानंदात मग्न होऊया !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा माहितीपूर्ण पोस्ट नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील पेज लाईक करावे ही विनंती.
https:// rohanupalekar.blogspot.in)