19 Oct 2020

'आत्मप्रभे'चा तेजस्वी आविष्कार - सद्गुरु श्रीसंत गजानन महाराज गुप्ते


अत्यंत अलौकिक अशा श्रीनाथ संप्रदायातील अतिशय विलक्षण व अद्भुत विभूतिमत्व असणाऱ्या, नाशिक येथे समाधिस्थ झालेल्या सद्गुरु श्रीसंत गजानन महाराज गुप्ते यांची आज ७४ वी पुण्यतिथी आहे. आजपासून त्यांच्या अमृतमहोत्सवी पुण्यतिथी वर्षास सुरुवात होत आहे. 

सद्गुरु श्रीसंत गजानन महाराज स्वत:ला "वेडी केरसुणी" म्हणवून घेत असत. आपल्या 'आत्मप्रभा' ग्रंथातही त्यांनी याच नावाचा उल्लेख केलेला आहे. अतिशय रंगलेले, सदैव आपल्याच आत्मानंदात विचरण करणारे श्रीसंत गजानन महाराज तयारीचे परमार्थ-शिक्षकही होते. आत्मप्रभा ग्रंथातील त्यांचे परखड व स्पष्ट बोल वाचून आपल्याला हे मनापासून पटते. 

प्रत्येक मुमुक्षूने, साधकाने श्री गजानन महाराजांचा आत्मप्रभा ग्रंथ आवर्जून वाचला पाहिजे, मननात ठेवलाच पाहिजे, इतके त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अगदी सहजसोप्या आणि पटकन् समजेल अशा भाषेत श्रीमहाराजांनी त्यातून परमार्थाची मूलतत्त्वे स्पष्ट केलेली आहेत. विविध कथांच्या माध्यमातून अवघड विषय त्यात समजावून सांगितलेला आहे.

आजमितीस व्हॉटस्अप व फेसबुकचा बोलबाला आहे. त्यामुळे या सोशलमिडियावर आपले ज्ञान पाजळणारे महाभागही शेकड्याने निर्माण झालेले आहेत. अशा प्रकारचे तथाकथित ज्ञानी लोक कोणत्याही शास्त्रग्रंथांचा प्रत्यक्षात कसलाही अभ्यास किंवा साधनेचा स्वानुभव नसताना, अनुभूती किंवा चिंतनाच्या नावाखाली काय वाट्टेल ते खरडून प्रसारित करीत असतात. लोक त्यांच्या शब्दांच्या कसरतीला भुलतात आणि परमार्थाच्या नावाखाली भ्रामक गोष्टी करू लागतात व फसतात. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या 'म्हणोनि आसनाचिया गाढिका' ग्रंथात म्हणतात ; "समाजात काही असेही 'स्वयंघोषित विद्वान' असतात की ज्यांचा कुठल्याच विषयाचा धड अभ्यास नसतो, त्यांना स्वत:लाच काहीही कळलेले नसते ; पण दुसऱ्याला शिकवण्याची दांडगी हौस त्यांना असते. स्वत:ला काहीही अनुभव नसताना ते दुसऱ्यांना उपदेश करण्यात आघाडीवर असतात. अशा स्वयंघोषित विद्वानांचा वर्ग सध्या Whatsapp वर किंवा Facebook वर क्रियाशील असलेला दिसतो. हा वर्ग परमार्थाच्या उपयोगाचा नसतो.(पृ.७३)" सद्गुरु श्रीसंत गजानन महाराजांनी देखील 'आत्मप्रभा' ग्रंथात अशाच स्वरूपाचे रोखठोक विचार पंचाहत्तर वर्षांपूर्वी सांगून ठेवलेले आहे. अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडून आपल्या श्रद्धेचे किंवा शुद्ध परमार्थ-इच्छेचे वाटोळे होऊ नये, असे ज्यांना मनापासून वाटते त्यांनी आत्मप्रभा ग्रंथाचा अभ्यास करणे म्हणूनच अत्यंत आवश्यक आहे.

"अमुक संत आमच्या अंगात येतात, त्यांचा संचार होतो किंवा ते ध्यानात आदेश देतात त्याप्रमाणे आम्ही वागतो, लोकांना उपदेश करतो", असे सांगून भोळ्या-भाबड्या लोकांना फसवण्याचा नवीन धंदा सध्या सर्वत्र फोफावलेला आहे. प्रत्यक्षात कोणत्याही संतांचे किंवा श्रीभगवंतांचे वारे कधीही कोणाच्याही अंगात येऊ शकत नसते. ते पूर्णत: शास्त्रविरुद्ध आहे. सद्गुरु श्रीसंत गजानन महाराजांनी त्याकाळात यावर विवेचन करून ठेवलेले आहे. आत्मप्रभेत ते म्हणतात ; "हल्ली कांहीं आधुनिक पंडित आमच्या अंगात अमक्या तमक्या संतांचा वा गुरूचा संचार होतो असे म्हणतांना आढळतात. माझे तर असें मत आहें कीं, प्राचीन व आर्वाचीन संत अशाच शरीरात संचरतील व त्यांजकडून उपदेश लिहवितील ही कल्पना मात्र नि:संशय खुळी आहे. संत-महात्म्यांना भूत, पिशाच्च अगर इतर क्षुद्र दैवतांप्रमाणे इतरांच्या देहांत शिरण्याचे किंवा संचार करण्याचे कांहींच प्रयोजन नाहीं. (पृ.१०५-१०६)"

यापुढील विवेचनात श्री गजानन महाराजांनी खऱ्या साधूंची व स्वत:ला महात्मे म्हणवणाऱ्या खोट्या साधूंची लक्षणे स्पष्ट करून सांगितली आहेत. ती सर्व मुळातूनच वाचावीत इतकी महत्त्वाची आहेत. सध्याच्या विचित्र परिस्थितीत बळावलेला खोटा परमार्थ हा नि:संशय त्याज्यच आहे आणि खऱ्या जिज्ञासूने, मुमुक्षूने चुकूनही त्या भानगडीत कधीच पडू नये. हे विचार पक्के होण्यासाठी व यथायोग्य परमार्थाचे नीट आकलन होण्यासाठी सद्गुरु श्रीसंत गजानन महाराजांच्या 'आत्मप्रभा' ग्रंथाचा अभ्यास करणे हिताचे व खूपच आवश्यक आहे.

( 'आत्मप्रभा' ग्रंथ "स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पांवस" यांनी प्रकाशित केला आहे. )

आज सद्गुरु श्रीसंत गजानन महाराजांच्या पावन श्रीचरणीं प्रेमसुमनांजली समर्पित करण्यापूर्वी, खालील लिंकवरील "वेडी केरसुणी" या लेखात मांडलेले त्यांचे अल्पचरित्र देखील आवर्जून वाचावे ही विनंती.

वेडी केरसुणी

https://rohanupalekar.blogspot.com/2019/10/blog-post.html

लेखक : रोहन विजय उपळेकर

भ्रमणभाष : 8888904481