17 Jun 2019

कहत कबीर सुनो भाई साधो

नमस्कार !
आज ज्येष्ठ पौर्णिमा,
सद्गुरु श्रीसंत कबीर महाराजांची जयंती आणि वारकरी संप्रदायातील श्रीसंत मारुतीबुवा गुरव (श्रीक्षेत्र आळंदी) व श्रीदत्तसंप्रदायातील श्रीसंत म्हादबा पाटील महाराज (श्रीक्षेत्र नृसिंहवाडी) यांची पुण्यतिथी.
या तिन्ही अलौकिक महात्म्यांच्या अद्भुत चरित्रकथांवर आणि उपदेशावर आधारलेला विशेष लेख खालील लिंकवर आहे, आपण सर्वांनी तो आवर्जून वाचावा आणि त्यावर मनन-चिंतन करावे ही सप्रेम विनंती. आजच्या पावन दिनी या तिन्ही महात्म्यांचे प्रेमभावे स्मरण करीत त्यांच्या श्रीचरणीं सादर दंडवत करू या !
कहत कबीर सुनो भाई साधो
https://rohanupalekar.blogspot.com/2018/06/blog-post_28.html?m=1

12 Jun 2019

त्रिभुवनैक सरिता जान्हवी मी पांडुसुता

आज गंगा दशहरा !
भगवती श्रीगंगेच्या अवतरणाचा दिवस. आजच्याच पावन तिथीला हस्त नक्षत्र, व्यतिपात योग, मंगळवार अशा योगावर माध्यान्ही भगवती श्रीगंगेचे पृथ्वीतलावर अवतरण झाले होते. म्हणून ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून आज दशमी पर्यंत "गंगा दशहरा" महोत्सव साजरा करून, आजच्या दिवशी गंगास्नान करून गंगापूजन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. गंगा दशहराच्या दहा दिवसांमध्ये गंगेचे स्नान, स्मरण, पूजन, वंदन आणि स्तुती केल्याने; चोरी, हिंसा व परदारागमन ही तीन कायिक (शारीरिक); कठोर बोलणे, खोटे बोलणे, चहाड्या करणे व असंबद्ध बडबडणे ही चार वाचिक; आणि दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा बाळगणे, दुसऱ्याचे अनिष्ट चिंतणे व खोटा अभिनिवेश धरणे ही तीन मानसिक मिळून एकूण दहा प्रकारांची सर्व पापे नष्ट होतात. म्हणूनच श्रीगंगेला 'दश-हरा' अर्थात् दहा गोष्टी (पापे) हरण करणारी, असेही म्हणतात. तसेच या ज्येष्ठ शुद्ध दशमीलाही त्यामुळे 'दशहरा'च म्हणतात.
भगवती श्रीगंगेच्या स्नान, दर्शन, स्मरण, वंदन, पूजन, तीर्थपान आणि स्तवन या सात प्रकारच्या उपासनेने सुख-समाधान तर लाभतेच; पण दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. यास्तव भगवान श्री माउली म्हणतात,
जोडे अमृताची सुरसरी ।
तैं प्राणांतें अमर करी ।
स्नाने पाप ताप वारी ।
गोडीही दे ॥ज्ञाने.१७.१५.२१९ ॥

गंगेच्या सेवेने हरिभक्तीची खरी गोडी, आवडही निर्माण होते, असा या ओवीत श्री माउलींचा गर्भित अभिप्राय आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे.
कविवर्य जगन्नाथ पंडितांची 'गंगालहरी' आणि श्रीमद् आद्य शंकराचार्यांची दोन गंगास्तोत्रे फार सुंदर आणि सुप्रसिद्ध आहेत. या दशहरा महोत्सवात त्यांचे पठण करण्याची पूर्वापार पद्धत आहे. काही ठिकाणी रोज वाढत्या क्रमाने गंगास्तोत्राची आवर्तने करण्याचीही पद्धत आहे. आज मुद्दाम पठण करण्यासाठी भगवान श्री शंकराचार्यांचे एक गंगास्तोत्र लेखाच्या शेवटी दिलेले आहे. एरवीही ते स्तोत्र म्हणायला हरकत नाही.
भगवती गंगा ही अत्यंत परोपकारी आहे. भगवान श्री माउली, "गंगा काजेवीण चाले ।" अर्थात् ती पूर्णपणे नि:स्वार्थपणे वाहते, असे म्हणतात. तिच्यात स्नान करणाऱ्यांचे पाप-ताप ती नष्ट करते, पूजन करणाऱ्यांना पुण्य प्रदान करते आणि समाधान देते. या तिच्या उपकारांमागे तिचा कोणताच स्वार्थ नाही की अन्य उद्देश नाही. म्हणूनच गंगेला आपण पूजनीय माता, देवता म्हणतो, गंगामैया म्हणतो. मातेसारखे तिला फक्त कल्याणच करणे माहीत आहे. केवळ स्नान, पूजनच नाही, तर तिचे नुसते स्मरण केले तरीही तेच फळ लाभते. यासाठीच आपल्याकडे अंघोळीचा पहिला तांब्या अंगावर घेतला की "हर गंगे भागीरथी" असे म्हणायला लहानपणापासूनच शिकवले जात असे. आजच्या पिढीलाही हे शिकवायलाच पाहिजे.
गंगा भारतीयांच्या मनी-मानसी अशी स्थिरावलेली आहे, आपले अंगांग व्यापून राहिलेली आहे. त्यामुळे आपल्या साध्या साध्या उपमांमध्येही गंगेचा संदर्भ येतोच. "झाले गेले गंगेला मिळाले" हे एक उदाहरण. गंगेला मिळाले म्हणजे साजरे झाले किंवा सार्थक झाले, वाया नाही गेले; अशी आपली त्यामागची भावना असते.
या परमपावनी पुण्यसरितेची स्तुती करताना भगवान श्री माउली म्हणतात,
कां फेडीत पाप ताप ।
पोखित तीरींचे पादप ।
समुद्रा जाय आप ।
गंगेचें जैसें ॥ज्ञाने.१६.३.१९९॥

लोकांचे पाप-ताप फेडीत, तीरावरच्या वृक्षांचे पोषण करीत गंगेचे पाणी समुद्राला जाऊन मिळते." म्हणूनच 'जगाच्या कल्याणा भगवंतांची गंगा विभूती', असे आपण आदराने, प्रेमाने म्हणून गंगामैयाच्या चरणीं नतमस्तक होऊ या !!
भगवान महाविष्णूंनी बळीराजाच्या उद्धारासाठी श्रीवामन अवतार धारण केला. त्यावेळी बळीच्या यज्ञशाळेत प्रकट होताना त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने ब्रह्मांडाचे कवच भेदले गेले आणि ब्रह्मांडाच्या बाहेरची जलधारा त्यांच्या चरणांना स्नान घालून आत आली. त्यांच्या चरणांवर लावलेल्या केशरामुळे तिचा रंग लाल झाला. हीच ती त्रिलोकपावनी भगवती गंगा होय. त्यामुळे तिला 'भगवत्पदी' किंवा 'विष्णुपदी' देखील म्हणतात. या धारेचा नुसता स्पर्श जरी झाला तरी संसारातील सर्व पापे नष्ट होतात, अशी शास्त्रांची मान्यता आहे.
भगवती गंगा ही स्वर्गलोक, मृत्युलोक व पाताळलोक अशा तिन्ही लोकांमधून प्रवास करते म्हणून तिला 'त्रिपथगामिनी' म्हणतात. राजा भगीरथाने शापाने मृत झालेल्या आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी प्रचंड तपश्चर्या करून भगवान श्रीशिवांना प्रसन्न करून घेऊन गंगा पृथ्वीतलावर आणली. त्यामुळे तिला 'भागीरथी' असेही म्हणतात. पुढे एकदा जन्हू ऋषींचा यज्ञ गंगाप्रवाहात सापडला. त्यामुळे विघ्न होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या तपोबलाने हा गंगाप्रवाह संपूर्ण गिळून टाकला. नंतर त्यांची मांडी फाडून ती पुन्हा प्रकट झाली. तेव्हापासून जन्हूंची कन्या म्हणून तिचे नाव 'जान्हवी' असे पडले. थोर भगवद्भक्त आणि महाभारत युद्धातील महावीर भीष्माचार्य हे श्रीगंगेचेच पुत्र होत.
या भगवती गंगेच्या पावन जलाला, भक्तश्रेष्ठ ध्रुव, सप्तर्षी, सनकादिक महात्मे, 'तपश्चर्येची आत्यंतिक फलश्रुती' म्हणून मस्तकी धारण करतात. ही गंगानदी स्वर्गलोकातून मग हिमालयावर उतरून भारतवर्षाला पावन करीत समुद्राला जाऊन मिळते. सर्वश्रेष्ठ तपोनिधी भगवान श्रीशिवशंकर देखील, आपल्या आराध्यांचे, भगवान श्रीविष्णूंचे चरणोदक म्हणून या गंगामातेला नित्य आपल्या मस्तकावर धारण करतात. यासाठीच भगवान श्री माउली आदिनाथ भगवान श्रीशिवांचा गौरव करताना म्हणतात की,
करितां तापसांची कडसणी ।
कवण जवळां ठेविजे शूळपाणि ।
तोही अभिमान सांडूनि पायवणी ।
माथां वाहे ॥ज्ञाने.९.२५.३७२॥

तपश्चर्या म्हणावी तर शिवशंकरांच्या तोडीचा दुसरा कोणी नाही जगात, पण तेही अतीव प्रेमादराने आपल्या देवाचे चरणतीर्थ म्हणून गंगामैयाला मस्तकी धारण करतात.
आपल्याकडे प्रत्येक जलस्रोताला गंगाच म्हणण्याचा प्रघात आहे. आम्हां भारतीयांच्या हृदयी गंगेचे जे अनन्यसाधारण स्थान जन्मजात दृढ झालेले आहे, त्याचेच हे द्योतक आहे. शिवाय त्यानिमित्ताने का होईना, पण गंगेचे पुण्यद स्मरण व्हावे, हाच त्यामागचा उद्देश आहे. आयुर्वेदातही अंतरिक्षजलाला 'गंगाजल'च म्हटले जाते. आम्हां भारतीयांसाठी गंगामैया ही केवळ नदी नाही; ती आमची पूजनीय देवता, आमची जीवनरेखा आहे ! तिच्या नुसत्या सप्रेम स्मरणानेही आमची सर्व पापे नष्ट होतात अशी आमची अढळ श्रद्धा आहे. म्हणूनच मृत्युसमयी तिच्या तीर्थाचा एक थेंब तरी पोटात जावा यासाठी आम्ही भारतीय धडपडतो.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचेही गंगामैयावर नितांत प्रेम आहे. म्हणूनच त्यांनी ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी गंगेसंबंधी अतिशय सुंदर उपमा दिलेल्या आहेत. आज आपण माउलींच्या काही निवडक मनोहर उपमांच्या माध्यमातून या लेखाद्वारे, भगवती श्रीगंगेची 'शब्दपूजा' बांधून, त्या हरिपदपाद्य गंगातीर्थाच्या स्मरणाने पुण्यपावन होत आहोत.
भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंनी गीतेच्या दहाव्या अध्यायात आपल्या पंच्चाहत्तर विभूती सांगितलेल्या आहेत. त्यात ते, सर्व वाहणा-या ओघांमध्ये गंगा ही माझी विभूती आहे; असे म्हणतात. भगवान श्री माउली त्यावर भाष्य करताना म्हणतात,
पैं समस्तांही वोघां - ।
मध्यें जे भगीरथें आणिली गंगा ।
जन्हूनें गिळिली मग जंघा - ।
फाडूनि दिधली ॥ज्ञाने.१०.३१.२५६॥
ते त्रिभुवनैकसरिता ।
जान्हवी मी पांडुसुता ।
जळप्रवाहा समस्तां - ।
माझारीं जाणें ॥ २५७ ॥
समस्त जळप्रवाहांमध्ये, राजा भगीरथाने मोठी तपश्चर्या करून आणलेली आणि राजा जन्हूने गिळून आपली मांडी फाडून बाहेर काढलेली, स्वर्ग-मृत्यू-पाताळ अशा तिन्ही लोकांना पावन करणारी भगवती गंगा ही माझीच विभूती जाण, असे श्रीभगवंत अर्जुनाला सांगतात. देवी भागवतामध्ये मूलप्रकृती भगवती श्रीराधाजींच्या दहा विशेष विभूती सांगितलेल्या आहेत, त्यांमध्ये भगवती श्रीगंगेचा समावेश आहे.
आजच्या दशमीला होणारे "गंगावतरण" ही नुसती कथा नाही. त्यात गूढ योगार्थही आहे. त्यावर भाष्य करताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या 'साधनजिज्ञासा' या प्रश्नोत्तरांच्या अद्भुत ग्रंथात म्हणतात, "गंगेच्या अवतरणाचे जे हे प्रतीक आहे ते सद्गुरुतत्त्वाचेच कार्य-रूपक आहे. श्रीभगवंतांच्या चरणांतून निघालेली त्यांची कृपाशक्तिरूपी गंगा हीच ते शिवरूप सद्गुरुतत्त्व धारण करते; आणि तेथून मग ती लोकांच्या पापक्षालनासाठी प्रवाहित होते. भगवान शिवांनी त्या मूळ कृपाशक्तीचा ओघ लीलया धारण केलेला असतो; व त्यासाठी ते सद्गुरूच केवळ समर्थ असतात. श्रीभगवंतांच्या चरणांपासून ती शक्ती भगवान शिवांपाशी येते. ती त्यांच्या जटेत जाऊन नंतर त्यांच्या हृदयात प्रकटते; आणि त्यांच्या हृदयातून निघून ती सर्व प्राणिमात्रांचे कल्याण करते. गंगावतरणाचे हे रूपक श्रीसद्गुरुतत्त्वाचे रहस्य आहे व हीच शक्तिपात दीक्षेचीही एक निगूढ पद्धत देखील आहे !" 
आजवर झालेल्या यच्चयावत् सर्व महात्म्यांनी, साधुसंतांनी आणि ऋषिमुनींनी भगवती श्रीगंगेची स्तुती व सेवा केलेली आहे. सर्व साधू आयुष्यात कधी ना कधी या गंगामातेच्या पावन जलात स्नान करून पवित्र झालेले आहेत. गंगेचे पूजन, वंदन करणे हे सर्वांनीच आपले कर्तव्य मानलेले दिसून येते. याचे कारणही तसेच आहे. श्रीगंगामैया ही परमाराध्य भगवान श्रीमहाविष्णूंचे श्रीचरणतीर्थ आहे आणि म्हणूनच वैष्णवांसाठी ती सदैव पूज्य, सदैव सेव्य आहेच. श्री रामकृष्ण परमहंस तर "गंगावारि ब्रह्मवारि" असे म्हणत असत. गंगाजल हे प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे, अशीच त्यांची धारणा होती. श्रीगंगेच्या दर्शनाने, सप्रेम स्मरणानेही आमचे पाप-ताप नष्ट होतात व साधुसंतांना समाधान लाभते. जेवढी आपली ही श्रद्धा दृढ असेल, तेवढे अधिक फलही मिळेलच.
आज ज्येष्ठ मासातील या गंगा दशहऱ्याच्या पावन पर्वावर, श्रीगंगामैयाच्या पुण्यदायक स्मरणात तिच्या चरणीं नतमस्तक होऊ या आणि मनानेच तिचे स्नान करू या. भगवान श्री शंकराचार्य आपल्या गंगास्तोत्रात प्रार्थना करतात की, "हे माते गंगे, हरिहराद्वैतात्मक अशी शाश्वत भक्ती आमच्या हृदयात, तुझ्या कृपेने प्रकट होऊन स्थिर होवो व तुझ्या तीरावरच आनंदाने हरिस्मरणात शेवटचा श्वास घेऊन माझा देहपात होवो !" हीच प्रार्थना आपणही मनोभावे व्यक्त करून, 'जयगंगे जय मातर्गंगे जय जय जान्हवी करुणापाङ्गे ।' असा तिचा नामगजर करून दहा प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळवून पावन होऊ या !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
*******************
ll श्रीगंगास्तोत्रम् ll
देवि सुरेश्वरि भगवति गंगे
त्रिभुवनतारिणि तरलतरंगे ।
शंकरमौलिविहारिणि विमले
मम मतिरास्तां तव पदकमले॥१॥
जय गंगे जय मातर्गंगे ।
जय जय जान्हवी करुणापाङ्गे ॥ध्रु.॥
भागीरथि सुखदायिनि मात-
स्तव जलमहिमा निगमे ख्यात: ।
नाहं जाने तव महिमानं
पाहि कृपामयि मामज्ञानम् ॥२॥
हरिपदपाद्यतरंगिणि गंगे हिमविधुमुक्ताधवलतरंगे ।
दूरीकुरु मम दुष्कृतिभारं
कुरु कृपया भवसागरपारम् ॥३॥
तव जलममलं येन निपीतं
परमपदं खलु तेन गृहीतम् ।
मातर्गंगे त्वयि यो भक्त:
किल तं द्रष्टुं न यम: शक्त: ॥४॥
पतितोद्धारिणि जान्हवि गंगे
खण्डितगिरिवरमण्डितभंगे ।
भीष्मजननि हे मुनिवरकन्ये
पतितनिवारिणि त्रिभुवनधन्ये ॥५॥
कल्पलतामिव फलदां लोके
प्रणमति यस्त्वां न पतति शोके ।
पारावारविहारिणि गंगे
विमुखयुवतिकृततरलापांगे ।।६।।
तव चेन्मात: स्रोत: स्नात:
पुनरपि जठरे सोsपि न जात: ।
नरकनिवारिणि जान्हवि गंगे
कलुषविनाशिनि महिमोत्तुंगे ॥७॥
पुनरसदंगे पुण्यतरंगे
जय जय जान्हवि करुणापाङ्गे ।
इन्द्रमुकुट मणिराजितचरणे
सुखदे शुभदे भृत्यशरण्ये ॥८॥
रोगं शोकं तापं पापं
हर मे भगवति कुमतिकलापम् ।
त्रिभुवनसारे वसुधाहारे
त्वमसि गतिर्मम खलु संसारे ॥९॥
अलकानन्दे परमानन्दे
कुरु करुणामयि कातरवन्द्ये ।
तव तटनिकटे यस्य निवास:
खलु वैकुण्ठे तस्य निवास: ॥१०॥
वरमिह: नीरे कमठो मीन:
किं वा तीरे शरट: क्षीण: ।
अथवा श्वपचो मलिनो दीन-
स्तव न हि दूरे नृपतिकुलीन: ॥११॥
भो भुवनेश्वरि पुण्ये धन्ये
देवि द्रवमयि मुनिवरकन्ये ।
गंगास्तवमिमममलं नित्यं
पठति नरो य: स जयति सत्यम् ॥१२॥
येषां हृदये गंगाभक्ति-
स्तेषां भवति सदा सुख मुक्ति:।
मधुराकान्तापञ्झटिकाभि:
परमानन्द कलितललिताभि: ॥१३॥
गंगास्तोत्रमिदं भवसारं
वांछितफलदं विमलं सारम् ।
शंकरसेवक शंकररचितं
पठति सुखी स्तव इति च समाप्त: ॥१४॥
जय गंगे जय मातर्गंगे।
जय जय जान्हवी करुणापाङ्गे ।।
॥ इति श्रीमदाद्य शंकराचार्य विरचितं श्रीगंगास्तोत्रम् ॥
( http://rohanupalekar.blogspot.in )

8 Jun 2019

श्रीस्वामीशिष्य श्री आनंदनाथ महाराज

आज ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे शिष्योत्तम श्रीसंत आनंदनाथ महाराज यांची ११६ वी पुण्यतिथी.
श्रीसंत आनंदनाथ महाराज हे श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या प्रभावळीतील अलौकिक विभूतिमत्त्व होते. त्यांचे समग्र चरित्र श्रीस्वामीसेवेचा आणि अनन्यनिष्ठेचा आदर्श वस्तुपाठच आहे. आजच्या तिथीला १९०३ साली त्यांनी वेंगुर्ले मुक्कामी जिवंत समाधी घेतली होती. त्यांच्या पावन श्रीचरणीं सादर दंडवत प्रणाम !
श्री आनंदनाथ महाराजांवरील लेख खालील लिंकवर आहे. तो आवर्जून वाचावा ही विनंती.
आनंद म्हणे मज झाले समाधान गेलो ओवाळून जीवेभावे
https://rohanupalekar.blogspot.com/2017/05/blog-post_31.html?m=1

2 Jun 2019

तस्मै श्रीगुरवे नम: ।

नमस्कार मंडळी !
आज वैशाख कृष्ण चतुर्दशी, श्रीदत्त-श्रीनाथ-श्रीभागवत संप्रदायांचे अध्वर्यू आणि राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील महान विभूतिमत्त्व प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे दोन्ही उत्तराधिकारी आणि आम्हां सर्व साधकांचे सद्गुरुद्वय, प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आणि नुकत्याच ब्रह्मलीन झालेल्या प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे या दोघांचीही आज जयंती. या दोन्ही विभूतींच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत प्रणाम !
श्रीभगवंतांच्या असीम दयाकृपेने मला श्रीसद्गुरुद्वयांचा सहवास लाभला, आजही लाभतो आहे. त्यांचे सान्निध्य जवळून अनुभवता आले, ही खरोखर जन्मजन्मांतरीची पुण्याई व श्रीभगवंतांची दयाकृपाच होय ! सद्गुरुसहवास ही अत्यंत अलौकिक आणि अद्भुत गोष्ट असते. चालत्या बोलत्या परमप्रेमळ, परमदयाळू परब्रह्माच्या अवतीभोवती वावरण्यात, जमेल तशी त्यांची सेवा करण्यात जे अद्वितीय सुख अनुभवायला मिळते, त्याची जगात अक्षरश: कशाशीही तुलना करता येणार नाही. ती अद्वितीय-उत्तम अशीच गोष्ट आहे. प.पू.सद्गुरु सौ.शकाताई या साक्षात् भगवती श्रीराधाजींच्याच अवतार होत्या. त्यामुळे त्यांचा भक्तिशास्त्राचा एकमेवाद्वितीय अधिकार आपल्या बुद्धीच्या पलीकडचाच होता. त्या श्रीकृष्णप्रेमाची घनीभूत श्रीमूर्तीच होत्या. त्यांच्यात आणि श्रीभगवंतांच्यामध्ये काहीही भेदच नव्हता. त्या परिपूर्ण श्रीकृष्णस्वरूपच झालेल्या होत्या. असे असंख्य प्रसंग देवांच्या कृपेने आम्हांला पाहायला मिळाले, ज्यातून पू.सौ.ताईंचे हे अलौकिकत्व स्पष्ट दिसून येत असे. आज त्यांच्या लौकिक देहत्यागानंतरची ही पहिलीच जयंती आहे, त्यामुळे त्यांची राहून राहून खूपच आठवण येत आहे. अनुत्तरभट्टारिका महारासेश्वरी सद्गुरु सौ.शकाताईंच्या श्रीचरणारविंदी सादर साष्टांग दंडवत !
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांचीही आज जन्मतिथी आहे. प.पू.श्री.दादा हे शास्त्रोचित सद्गुरुलक्षणांचे मूर्तिमंत उदाहरणच आहेत. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलेली सर्व गुरुलक्षणे प.पू.श्री.दादांच्या ठायी सहजतेने विलसताना दिसतात. त्यांचे पुण्यपावन दर्शन आपल्याला वारंवार होते आणि त्यांची कृपा आपल्यावर आहे, हेच आपले अलौकिक महद्भाग्य आहे, असे मी मनापासून मानतो. प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !
प.पू.श्री.दादांच्या अभंगाच्या आधारे लिहिलेला पू.सद्गुरु सौ.ताई व पू.सद्गुरु श्री.दादांवरील एक लेख खालील लिंकवर आहे, तोही आवर्जून वाचावा ही विनंती.
जीव ऋणवंत होई त्यांचा
https://rohanupalekar.blogspot.com/2017/05/blog-post_24.html?m=1