28 Apr 2018

नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख नववा - सानंद सांगता



आज आपल्या लाडक्या भगवान श्रीनरहरीरायांचा पुण्यपावन जन्मदिन आहे. गेले आठ दिवस आपण त्यांच्याच कृपेने आणि आपल्या परमभाग्याने त्यांचे यथाशक्ती गुणगायन करीत आहोत. त्यांनी करवून घेतलेल्या सेवेचा आज लौकिक समारोप आहे.
खरेतर सेवा कधीच पूर्णत्वाला जात नाही, कारण जसजशी सेवा वाढते तसतसे आपले सेवकत्वही मुरत जाते. सद्गुरु श्री माउली म्हणतात की, सेवाभाव किंवा भक्तिभाव गंगेसारखा अव्याहत असतो, तो कधीच संपत नाही. आपणही आता या नवरात्राच्या निमित्ताने सुरू झालेली ही सेवा निरंतर कशी चालू राहील यासाठीच प्रयत्न केला पाहिजे. नवरात्र संपले आता 'कोण नरहरीराया?' असे म्हणून पुन्हा त्या असार संसाराच्या रहाटगाडग्याला जुंपून घ्यायचे नाहीये आपल्याला. उलट त्या दु:खमूळ संसाराचाच श्रीनरहरीरायांच्या सप्रेम स्मरणात सुखमय परमार्थ करायचा आहे. आणि त्यासाठीच आपल्याला झडझडून प्रयत्नरत व्हायचे आहे. करुणामूर्ती वात्सल्यसिंधू भगवान श्रीनृसिंहराज मातृवत् प्रेमाने आपले हे लळे नक्कीच पुरवतील. ते तर त्यांचे ब्रीदच आहे !
भगवान श्रीनरहरीरायांचा अवतार मोठा विलक्षण आहे. त्यात सगळे काही विशेषच आहे. श्रीसंत तुकाराम महाराज या अवताराचे वर्णन करताना म्हणतात,
हाकेसरशी उडी ।
घालूनिया स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण ।
माझ्या विठाईवाचून ॥२॥ 
बाल प्रल्हादाने प्रेमभराने हाक मारताक्षणीच समोरचा खांब फोडून ते भक्तकरुणाकर परमतत्त्व साक्षात् प्रकट झाले. पण हाक मारणारे अनन्य भक्तराज प्रल्हाद होते. ज्याच्या ठायी ती तीव्र आर्तता निर्माण होईल त्याच्यासाठी ते कनवाळू परमतत्त्व त्याक्षणीच धावत येतेच. आजवरच्या अनेक संतचरित्रांमध्ये असे शेकडो प्रसंग आपण वाचलेले आहेत. हा भक्तांचा रोकडा अनुभवच आहे. म्हणून या नवरात्राच्या निमित्ताने आपण त्या भक्तकरुणाकर भगवंतांना त्यांच्या जन्मदिनी मनोभावे प्रार्थना करू या की, देवा आमच्या ठायी तुमच्याविषयीचे प्रगाढ परमप्रेम व केवळ तुमच्यासाठीचीच तीव्रतम लालसा प्रकट करावी व आमचे जीवन धन्य करावे.
सद्गुरु भगवान श्रीनृसिंहराजप्रभूंच्या कृपेने झालेली ही सर्व सेवा, हे लेख आवर्जून वाचणा-या सर्व वाचकांच्या तसेच फेसबुक व व्हॉटसप या माध्यमांतून आपल्या मित्रपरिवारात फॉरवर्ड करून इतरांनाही वाचायला देणा-या यच्चयावत् सर्व सद्भक्तांच्या वतीने मी सद्गुरुस्वरूप करुणाब्रह्म भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणारविंदी प्रेमभावे समर्पित करतो आणि त्यांच्याच अम्लान श्रीचरणी सर्वांसाठी सादर प्रार्थना करतो.
या लेखमालेच्या समारोपाचे काही भावपूर्ण मनोगत खालील लेखातही व्यक्त झालेले आहे. त्याही प्रेमभावनेचा आस्वाद आपण घ्यावा आणि त्या लेखासोबतच्या फोटोतील प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या नित्यपूजेतील श्रीनृसिंहांच्या पावन टाकाचेही दर्शन घ्यावे ही विनंती. या आठ दिवसांत श्रीनरहरीरायांच्या परमकृपेने अनेक भक्तांनी आवर्जून संपर्क करून लेखमाला आवडल्याचे कळविले. मी हा श्रीनरहरीरायांचाच कृपानुग्रह मानतो. जे काही आहे ते त्यांचेच आहे, मी केवळ त्यांच्या हातचे बाहुले आहे; ते जसे चालवतील तसे चालणारे, बोलवितील ते बोलणारे. त्यांच्या हातचे बाहुले होऊन राहण्यातच माझ्या आयुष्याची धन्यता आहे व माझी एवढीच इच्छा त्यांनी पुरवावी, हीच सरतेशेवटी त्यांच्या सर्वतीर्थास्पद, सर्वार्थदायक श्रीचरणी प्रार्थना करतो  आणि त्यांच्या महन्मंगल नामाचा आश्रय घेऊन त्यांच्या श्रीचरणीच विसावतो !
भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनृसिंहराज महाराज की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
 विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ 
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख नववा - सानंद सांगता 
http://rohanupalekar.blogspot.com/2017/05/blog-post_9.html

नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख आठवा



आज भगवान श्रीनरहरीरायांचा परमपावन अवतार दिन. म्हणून या प्रसन्न प्रभाती भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणी सादर साष्टांग दंडवत घालून आपण आपल्या श्रीनरहरी-गुणानुवाद सेवेला प्रारंभ करू या !
यावर्षी नवरात्र आठच दिवसांचे आहे. कारण श्रीनरहरीरायांचा जन्म सायंकाली, सूर्यास्तसमयी झाला. म्हणून ज्या दिवशी सूर्यास्ताला चतुर्दशी असते, त्याच दिवशी जन्मकाळ साजरा केला जातो. म्हणून आज सूर्योदयाला त्रयोदशी असूनही आजच श्रीनृसिंहजयंती आहे. त्यामुळे आज आपण सकाळी एक व संध्याकाळी समारोपाचा एक अशा दोन लेखांद्वारे श्रीनरहरीरायांच्या चरणी आपली सेवा समर्पिणार आहोत.
जोवर आपल्याला आपल्या आराध्य दैवताविषयी तीव्र माझेपणाची भावना निर्माण होत नाही, तोवर आपल्याकडून प्रेमपूर्वक भक्तीही घडू शकत नाही. श्रीनरहरीराया माझे आहेत आणि मी त्यांचा आहे, हा भाव दृढ झाल्याशिवाय आपल्या मनात सतत त्यांचे विचार येणार नाहीत. हे विचार काही आपले कामधाम सोडून करायचे नाहीतच. आपल्या सगळ्या कर्तव्यांमध्ये, आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये, back of the mind सदैव आपल्या आराध्याचे, परमप्रिय भगवान श्रीनरहरीरायांचे स्मरण किंवा विचार करीत राहायला हवा. आपल्या प्रत्येक सुख-दु:खात आपल्या सरगळ्यात जवळचे म्हणून जर सर्वात प्रथम त्यांची आठवण आपल्याला झाली, तरच मग आपल्या मनात त्यांची भक्ती हळू हळू दृढ होत आहे असे समजायला हरकत नाही. जेव्हा आपले आराध्य भगवंतच आपली पहिली प्रायोरिटी होतील तेव्हाच मग आपणही त्यांच्या प्रायोरिटी लिस्ट वर असू. हे जोवर होत नाही तोवर आपली भक्ती हा केवळ देण्या-घेण्याचा निव्वळ एक व्यवहारच आहे. या नृसिंह नवरात्राच्या निमित्ताने आपली निरपेक्ष भक्तिभावना सुदृढ व सुस्थिर व्हावी यासाठीच आपण सर्वांनी मनापासून प्रयत्नशील होऊया. हीच सर्वांना हार्दिक शुभेच्छा देखील.
श्रीनृसिंह पुराणात भक्तश्रेष्ठ प्रल्हादजींच्या अद्भुत भक्तिभावनेचा फार सुंदर परामर्श घेतलेला आहे. त्यातील एक अत्यंत भावमधुर व सुंदर कथा खालील लिंकवरील लेखात आहे. तसेच त्याच लेखात अतिशय महत्त्वपूर्ण अशा श्रीनृसिंहकोशाची देखील काही माहिती दिलेली आहे. श्रीनृसिंहकोशाचा पहिला खंड आता पूर्णपणे संपलेला आहे. दुस-या व तिस-या खंडाच्या अगदी मोजक्या प्रती आता उपलब्ध आहेत. ज्यांना हव्या असतील त्यांनी श्रीवामनराज प्रकाशनात त्वरित संपर्क करावा ही विनंती.
आजचा दिवस श्रीनृसिंह भगवंतांचा आहे, तो त्यांच्याच सप्रेम स्मरणात, लीलागुणानुवादनात, त्यांच्याच भावपूर्ण विचारात व्यतीत व्हावा हीच प्रेमळ प्रार्थना !
भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनृसिंहराज महाराज की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
 विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ 
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख आठवा 
http://rohanupalekar.blogspot.com/2017/05/blog-post_8.html

27 Apr 2018

नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख सातवा



श्रीनृसिंह पुराणात भगवान श्रीनृसिंहांच्या पूजेच्या व उपासनेच्या अनेक पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यात एक विशेष कथाभाग आलेला आहे. पांडुवंशामध्ये एक विष्णुभक्त राजा होता, तो रोज सकाळी आपल्या विष्णुमंदिरात जाऊन स्वहस्ते मंदिर झाडून शेणाने सारवून घेत असे. या सेवेत तो कधीच कुचराई करीत नसे. त्याच्या पुजा-याने त्याला याचे कारण विचारले. त्यावर त्याने त्याच्या पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगितला. तेव्हा तो रैवत नावाचा ब्राह्मण होता. तो शास्त्रविरुद्ध वागत असते. अत्यंत अनाचारी असा तो नीच रैवत एकदा कामेच्छेने काही स्त्रियांना घेऊन जंगलातील एका पडक्या विष्णुमंदिरात गेला. त्यांच्याशी संग करण्यासाठी त्याने आपल्या वस्त्राने त्या मंदिरातील थोडी फरशी स्वच्छ केली. तेवढ्यात तेथे राजाचे काही सैनिक आले व त्यांनी याला चोर समजून याचा शिरच्छेद केला. आश्चर्य म्हणजे त्या पापी रैवताला नेण्यासाठी तेथे विष्णुदूत आले व त्याला विमानातून वैकुंठाला घेऊन गेले. त्या दूतांनी त्याच्या अशा अलौकिक गतीचे कारण सांगितले की, कामेच्छेने का होईना त्या रैवताने नृसिंह मंदिर स्वच्छ केले. त्यामुळे त्याचे सर्व पाप तत्काळ नष्ट झाले व तो वैकुंठाचा अधिकारी झाला. तोच पुढे जयध्वज राजा म्हणून जन्माला आला. त्याची पूर्वस्मृती जागृत असल्याने तो नित्यनियमाने मंदिर झाडून लिंपण्याची सेवा करीत असे.
म्हणूनच श्रीनृसिंहांचे मंदिर झाडण्याची, तेथील परिसर स्वच्छ करण्याची सेवा या उपासनेत अतिशय महत्त्वाची मानली जाते. किती साधी गोष्ट आहे, पण त्याचे फळ पाहा किती महान !! म्हणूनच आपणही आपल्या जवळच्या एखाद्या मंदिरात जाऊन तेथील स्वच्छता करण्याची, जाळेजळमटे काढण्याची, मंदिराचे आवार स्वच्छ करण्याची सेवा करायला हवी. नृसिंहमंदिरातच करायला हवी असे नाही, कोणतेही मंदिर असले तरी चालेल. सर्वत्र भगवान नारायणच व्यापून राहिलेले आहेत, असे उपनिषदात स्पष्ट म्हटलेले आहे. दिवसाच्या व्यस्त कामातून फक्त पाच-दहा मिनिटे काढली तरीही ही सेवा आपण करू शकतो. ऑफिसला जाताना किंवा येताना वाटेतल्या मंदिरात जाऊन मनोभावे नामस्मरण करीत तेथील झाडलोट करणे असे किती कठीण ठरेल सांगा? अवघ्या पाच मिनिटांच्या सेवेसाठी एवढे प्रचंड फळ देणे हे श्रीभगवंतांचे अलौकिक भक्तवात्सल्यच नाही का? भगवान श्रीनृसिंहांची आपल्याला जमेल तेवढी, खारीचा वाटा म्हणा हवे तर, पण तेवढीही सेवा घडणे हे अापले परमभाग्यच आहे आणि ते हरप्रयत्नाने साधणे हेच आपले कर्तव्य आहे.
श्रीनृसिंह पुराणात श्रीनृसिंहांच्या पूजेतील विविध उपचारांचेही वेगवेगळे माहात्म्य सांगितले आहे. त्यांना मनोभावे केवळ भांडेभर पाणी घातले तरी तेवढ्याने ते संतुष्ट होतात. अहो, प्रेमाने अर्पण केलेल्या एखाद्या पानाफुलाच्या बदल्यात पूर्णकृपा करण्याची या भगवंतांना आवडच आहे. तसे अभिवचनच त्यांनी दिले आहे गीतेत. म्हणजे या कृपाळू कनवाळू श्रीभगवंतांची भक्ती करणे हे किती सोपे नाही का? काही साधनसामग्री लागत नाही की मोठा समारंभ लागत नाही त्यांना. केवळ ख-या प्रेमाचेच ते भुकेले आहेत. जो त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो, त्याच्यावर त्याच्या हजारपटीने अधिक तेही प्रेम करतात. त्यांना प्रेमाने साद तर घालून बघा ना एकदा. आपण करत तर काहीच नाही, फक्त आरडाओरडा करत बसतो काहीच होत नाही म्हणून. आपणच काहीतरी प्रयत्न केल्याशिवाय कसे बरे काही चांगले होणार आपल्याबाबतीत?
श्रीभगवंतांचे स्मरण करीत आपली नित्याची कामे केली तरी तीही सेवाच ठरते असे संतांनी सांगून ठेवलेले आहे. श्रीभगवंतांचे भक्तप्रेम इतके मोठे आहे की आपल्या भक्तांच्या छोट्या छोट्या गोष्टीही खूप मोठ्या मानून ते मातृवात्सल्याने कौतुक करतात, त्याच्यावर भरभरून करुणाकृपा करतात. या नवरात्राच्या निमित्ताने आपण सर्वांनी आतापासून निश्चय करूया की, जेवढी जमेल तेवढी मनोभावे सेवा सतत करायचा प्रयत्न मी नक्की करीन.
श्रीनृसिंह भगवंतांच्या असंख्य लीलांपैकी भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या संदर्भातील एक अलौकिक अाणि मधुर लीला खालील लिंक वरील लेखात आहे, कृपया तीही आवर्जून वाचावी ही विनंती.
भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनृसिंहराज महाराज की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
 विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ 
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख सातवा 
http://rohanupalekar.blogspot.com/2017/05/blog-post_7.html?m=1

26 Apr 2018

नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख सहावा



देवदेवेश्वर भगवान श्रीनृसिंह हे भगवान श्रीमहाविष्णूंच्या दशावतारातील चौथे अवतार. भगवंतांचा हा पहिलाच पूर्णावतार आहे. गर्गसंहितेत अवतारांचे जे प्रकार दिले आहेत, त्यात श्रीनृसिंहांना पूर्णावतार म्हटलेले आहे. मत्स्य, कूर्म व वराह हे त्यांच्या आधीचे तीन अवतार काही विशिष्ट कार्यासाठीच झाले होते. त्यामुळे ते कार्य संपन्न झाल्यावर पुढे त्या अवतारांचे उपासना संप्रदाय निर्माण झाले नाहीत. परंतु भगवान श्रीनृसिंहांच्या रूपाने झालेल्या या पहिल्या पूर्णावतारापासून उपासना संप्रदाय निर्माण झाला. भगवान श्रीनृसिंहांनी पहिला अनुग्रह भक्तराज प्रल्हादांवरच केला व त्यांच्यापासून पुढे परंपरा निर्माण झाली.
श्रीभगवंतांच्या अवतार घेण्यामागचे रहस्य श्रीभगवद्गीतेत स्पष्ट सांगितले आहे की,
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥४.८॥
सज्जनांचे, साधूंचे रक्षण, पाप्यांचे व दुष्टांचे निर्दालन व धर्माची स्थापना या तीन प्रमुख उद्देशांसाठी भगवंत अवतार घेतात. हे पूर्णावतारांच्या कार्याचेच व्यवच्छेदक लक्षण आहे. भगवान श्रीनृसिंहांनी आपल्या अनन्यभक्ताचे रक्षण करण्यासाठी व दुष्ट हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी हा अवतार धारण केला. त्याचबरोबर प्रल्हादांवर कृपा करून भक्तीची परंपरा निर्माण करून धर्माची संस्थापनाही केली. आजही तो भक्तिसंप्रदाय अव्याहत चालू आहे. म्हणूनच भगवान श्रीनृसिंह हे पूर्णावतार म्हटले जातात; आणि आजमितीस असलेला त्यांच्या भक्तीचा प्रचंड विस्तार पाहिला की ते मनापासून पटते देखील.
भगवान श्रीनृसिंहांची अनंत स्थाने पुराणकालापासून प्रसिद्ध असून आजही अतिशय जागृत म्हणून ख्याती पावलेली आहेत. श्रीनृसिंह कुलदैवत असलेल्या कुलांची संख्याही प्रचंड आहे. किंबहुना दशावतारातील इतर अवतारांच्या मानाने श्रीनृसिंह हेच सगळ्यात जास्त कुलांचे कुलस्वामी आहेत. हेच त्यांच्या लोकप्रियतेचे स्पष्ट द्योतक आहे. उपासनाक्षेत्रातील श्रीनृसिंह भगवंतांचा वाटा देखील प्रचंड मोठा आहे. मंत्रशास्त्र, तंत्रशास्त्र, नाथ, दत्त व भागवत संप्रदाय तसेच विविध वैष्णव संप्रदायांच्या सर्व शाखांमध्ये श्रीनृसिंह उपासना आजही खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. श्रीनृसिंह ही सर्वपूज्य देवच आहेत, यात तिळमात्र शंका नाही.
श्रीनृसिंहांच्या पूर्णब्रह्मस्वरूपाचे यथार्थ वर्णन करणारा एक सुंदर ध्यानश्लोक संप्रदायात प्रचलित आहे की,
उपास्महे नृसिंहाख्यं ब्रह्मवेदान्तगोचरम् ।
भूयोलालितसंसारच्छेदहेतुं जगद्गुरूम् ॥
"वेदान्ताद्वारे, अपरोक्षानुभूतीने जाणले जाणारे निर्गुणनिराकार परब्रह्मच प्रत्यक्ष श्रीनृसिंहरूपात सगुणसाकार झालेले असून, आपल्या अमोघ कृपेने बंधनकारक व दुर्लंघ्य अशा संसाराचा समूळ नाश करून भक्ताला ब्रह्मस्वरूप करणारे ते साक्षात् जगद्गुरूच आहेत, म्हणून आम्ही मनोभावे त्यांचीच उपासना करतो !"
भगवान श्रीनृसिंह, भगवान श्रीरामचंद्रप्रभू, भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभू व भगवान श्रीदत्तप्रभू, हे चारही पूर्णावतार जगद्गुरूच म्हटले जातात. यांचे उपासना संप्रदाय आजही कार्यरत आहेत. एकूणएक सर्व अनुग्रहपरंपरा यातीलच कोणा ना कोणापासून सुरू झालेल्या आहेत.
जगद्गुरु भगवान श्रीनृसिंह आणि जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभू यांचा फार जवळचा ऋणानुबंध आहे. कारण यांचे कार्यही एकच आहे ना ! गेल्यावर्षीच्या लेखात या दोन्ही पूर्णावतारांचा मधुर स्नेहबंध काहीप्रमाणात उलगडला होता. त्याचविषयीचा आणखी थोडा भाग आजच्या सेवेत मांडलेला आहे. खालील लिंकवर गेल्यावर्षीचा लेख उपलब्ध आहे, तोही साक्षेपाने आवर्जून वाचावा ही विनंती.
श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांनी मोठ्या करुणेने हा सर्व गूढ भाग मला समजावून सांगितला, म्हणून तो आपल्यासमोर ठेवीत आहे. या महत्त्वपूर्ण विषयावर आजवर इतरत्र कुठेच कोणी सविस्तर लिहिलेले नाही. म्हणून हा लेख आपापल्या संपर्कात आवर्जून शेयर करून ही मौलिक व अनवट माहिती सर्व भक्तांपर्यंत पोहोचवावी ही सादर विनंती करतो !
भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनृसिंहराज महाराज की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
 विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ 
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख सहावा 
श्रीदत्तसंप्रदाय व भगवान श्रीनृसिंह : अलौकिक ऋणानुबंध  
http://rohanupalekar.blogspot.in/2017/05/blog-post_6.html?m=1

25 Apr 2018

नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख पाचवा

श्रीनृसिंहपुराणातील यमगीतेचा कथाभाग आपण पाहात आहोत. ही कथा येथे मार्कंडेयऋषींच्या संदर्भाने येते. आता वाचकांना प्रश्न पडेल की, मार्कंडेयांचे आख्यान तर शिवपुराणातही आहे. शिवलीलामृतात देखील त्यावर सविस्तर लिहिलेले आहे. मार्कंडेयांनी त्यासमयी केलेले चंद्रशेखराष्टकही सुप्रसिद्ध आहे. मग आता तेच मार्कंडेय येथे विष्णुभक्त दाखवलेले आहेत. मग खरी कथा कोणती? साहजिकच आहे असे वाटणे. खरेतर मार्कंडेयमुनी आपल्या अनन्यभक्तीच्याच बळावर मृत्यूला पार करून गेले, हेच त्यातले सत्य आहे ! पुराणांमधून अशा एकच प्रकारच्या कथा वेगवेगळ्या दैवतांच्या संदर्भाने आलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे त्यातील तो लौकिक कथाभाग सोडून द्यावा व त्या कथेतून प्रकट होणारे अलौकिक भक्तिमर्मच आपण नीट समजून घेतले पाहिजे. शिवाय सर्व देवदेवता या मूळ परब्रह्माचेच अंश आहेत, त्या देवतांच्या रूपाने ते अव्यय, अविनाशी, अविकारी, निर्गुण-निराकार परब्रह्मच सगुणसाकार होऊन कार्यरत आहे. मग तुम्ही त्या तत्त्वाला शिव म्हणा किंवा विष्णू म्हणा, देवी म्हणा किंवा गणेश म्हणा; आहे ते एकमेव मूळ परब्रह्मच ! त्यामुळे अशा कथांचा विचार तात्त्विक भूमिकेनेच केला पाहिजे. ही एकत्वाची भूमिका एकदा पक्की ठसली की मग पुराणांमधील विसंगती किंवा अर्थवादरूप मांडणी किंवा पुनरुक्ती यांमुळे आपल्या मनात कसलीही शंका निर्माण होत नाही. असो.
यमधर्माने नरकातील जीवांना जो मौलिक उपदेश केला तोच "यमगीता" म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात ते म्हणतात, प्रत्यक्ष भगवान श्रीनारायणांनी स्वमुखाने अशी ग्वाही दिलेली आहे की, "जो मनुष्य कृष्ण कृष्ण केशव नृसिंह अशाप्रकारे माझे नित्य स्मरण करतो, त्याला सर्व कष्टांमधून, अगदी नरकातूनही, ज्याप्रमाणे कितीही खोल पाणी असले तरी ते भेदून कमळ वर येतेच, त्याप्रमाणे मी बाहेर काढतोच. 'हे पुंडरीकाक्षा, देवदेवेश्वरा, नरसिंहा, त्रिविक्रमा ! मी आपल्याला शरण आलो आहे, माझा उद्धार करा', असे जो मनापासून वारंवार म्हणतो, त्याचा मी उद्धार करतो. 'हे देवाधिदेवा, जनार्दना, मी आपल्या आश्रयाला आलो आहे', असे म्हणून जो मला शरण येतो, त्याला मी सर्व क्लेशांपासून मुक्त करतो !"
यमराजांचे हे बोल ऐकून नरकात पडलेल्या त्या पापी जीवांनी कृष्ण, केशव, गोविंद, नरसिंह, मधुसूदन, नारायण अशा नामांचा जयजयकार करायला सुरुवात केली. त्याबरोबर त्यांचे सर्व प्रकारचे दु:ख नष्ट झाले, नरकातील तीव्र अग्नीही त्यामुळे शांत झाला व ते जीव त्या नामस्मरणाच्या प्रभावाने कृष्णस्वरूपच होऊन ठाकले. तेवढ्यात विष्णुदूत तेथे आले व त्यांनी भगवान विष्णूंच्या कृपेने दिव्यदेही झालेल्या त्या पापमुक्त जीवांना दिव्य विमानांमधून विष्णुलोकाला नेले.
ह्या यमगीतेतून प्रत्यक्ष यमधर्मच आपल्याला सांगतात की, कितीही मोठे पाप घडलेले असले तरी केवळ मनापासून केलेल्या भगवंतांच्या नामस्मरणाने, त्या भयंकर पापाच्या कचाट्यातून जीव नि:संशय सुटतात. म्हणूनच भगवान श्रीशिवशंकर श्रीनृसिंहकवचाच्या उपसंहारात भगवान श्रीनृसिंहांच्या भक्तीचे माहात्म्य सांगताना म्हणतात,
भयं नास्ति भयं नास्ति नृसिंहपदसेवनात् ।
सत्यं सत्यं वचो वच्मि शंकरोऽहं त्रिलोचन: ।
कुतो भीति: कुतो मृत्यु: कुतस्तस्य दरिद्रता ।
मृत्योर्मृत्यु: रमानाथो यस्य नाथो नृकेसरी ॥
"भगवान श्रीनृसिंहांच्या पदारविंदांची मनोभावे सेवा करणा-या भाग्यवान भक्ताला कसल्याही प्रकारचे भयच उरत नाही, हे सत्य मी शिव वारंवार कथन करीत आहे. त्या भक्ताला दैन्य, दारिद्र्य, मृत्यू यांचे कशाचेही भय राहात नाही, कारण मृत्यूचेही मृत्यू असणारे रमानायक भगवान श्रीनृसिंह त्याचे नाथ असतात, त्याचे पालक-मालक सर्वकाही तेच असतात."
म्हणूनच, अशा भक्ताभिमानी व परमभक्तवत्सल श्रीनरहरीरायांचे प्रेमभावे स्मरण, मुखावलोकन, वंदन, पूजन, गुणगायन, लीलाकथन करणे हेच आपल्यासाठी महापुण्यकारक असे सर्वात सुलभ साधन नाही का? त्यासाठीच त्या परमदयाळू भगवंतांच्या श्रीनृसिंह अवताराची पावन कथा आपण नवरात्राच्या निमित्ताने प्रेमभावे अभ्यासत आहोत.
श्रीभगवंतांच्या या पूर्णावताराचे सर्वकाही अलौकिक आणि अद्भुतच आहे. त्यांचे रूप अद्भुत, ते खांबातून प्रकट होणेही अद्भुत, त्यांचा क्रोधही अद्भुत नि त्यांचे भक्तवात्सल्यही अद्भुतच ! देवांच्या या रूपाचे योगशास्त्राच्या परिभाषेतही मोठे गोड रूपक म्हणून विवरण केले गेले आहे. श्रीनृसिंह अवताराचा तो विलक्षण व निगूढ असा योगार्थ प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी श्रीनृसिंहकोशात पहिल्यांदाच सविस्तर मांडलेला आहे. नृसिंहअवतारामागची परमपुण्यदायक कथा व त्यातील योगार्थ यांचे विवरण वरील लिंकमधील लेखात गेल्यावर्षी केलेले आहे, ते वाचून त्याचे मनन करावे व त्याद्वारे श्रीनृसिंह भगवंतांच्या स्मरणात त्यांच्या श्रीचरणी श्रद्धासुमने समर्पावीत ही प्रार्थना !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवावी ही प्रेमळ विनंती.)
 विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ 
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख पाचवा 
http://rohanupalekar.blogspot.in/2017/05/blog-post_5.html?m=1

24 Apr 2018

नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख चौथा



श्रीनृसिंह पुराणाच्या सुरुवातीलाच भगवान मार्कंडेय महामुनींची कथा आलेली आहे. भृगू ऋषींचे नातू असणा-या या मार्कंडेयमुनींना बारा वर्षांचेच आयुष्य होते. त्यामुळे अतिशय बुद्धिमान असणा-या मार्कंडेयांनी आपल्या आजोबांना त्यावर उपाय विचारला. भृगू म्हणाले की, "वत्सा, मोठी तपश्चर्या करून भगवान नारायणांचे मनोभावे अर्चन केल्याशिवाय मृत्यूला कोणीच जिंकू शकत नाही. म्हणून तू भगवान नृसिंहांचे स्मरण करीत द्वादशाक्षर मंत्राद्वारे तपश्चर्या कर."
भृगूंच्या आज्ञेने बाल मार्कंडेयांनी सह्याद्री पर्वतावरील तुंगभद्रा नदीच्या तीरावर तपश्चर्या आरंभिली. त्यांच्या मृत्यूची वेळ जवळ आली तेव्हा त्यांनी स्नान करून विधिपूर्वक विष्णुपूजन केले व हरिध्यान करीत नामस्मरण करायला सुरुवात केली. तेवढ्यात यमाचे दूत तेथे पोचले. ते मृत्युपाश टाकणार एवढ्यात पराक्रमी विष्णुदूतांनी आपल्या मुसळाने मारून त्यांना पळवून लावले. जाता जाता ते यमदूत म्हणाले, "आम्ही तर जातो, पण आमचे स्वामी यमधर्मच येतील आता." त्यानंतर प्रत्यक्ष मृत्यूदेवता  आली, पण मार्कंडेयांना स्पर्शही करू शकली नाही. कारण लोखंडी मुसळ उगारलेले वीर विष्णुदूत तेथे उभेच होते. त्यासमयी मार्कंडेयांनी भगवान विष्णूंचे मृत्युंजयस्तोत्राने स्तवन केले. हे अतिशय प्रभावी स्तोत्र महामृत्यूवरही विजय मिळवून देण्यात समर्थ आहे. त्यामुळे भगवान नृसिंहांच्या कृपेने मार्कंडेय मृत्युभयातून कायमचेच मुक्त झाले.
मृत्युदेवता व दूतांनी यमराजांना सर्व प्रसंग कथन केला. आम्हांला मारणारे ते कोण होते? असे विचारल्यावर यमराजांनी क्षणभर ध्यान लावले व सत्य जाणून ते म्हणाले, "अहो, तो मार्कंडेय महान तपस्वी आहे. त्याने भगवान नृसिंहांचे स्मरण करीत द्वादशाक्षरमंत्राने तपश्चर्या केलेली आहे. त्याला आपण कोणीही काहीही इजा करू शकत नाही. भगवान विष्णूंना शरण गेलेल्या जीवाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू सुद्धा शकत नाही. तुम्हांला मारणारे ते विष्णुदूत होते. म्हणून येथून पुढे जेथे विष्णुभक्त, नृसिंहभक्त असतील तेथे तुम्ही कधी जाऊच नका."
तेवढ्यात नरकात खितपत पडलेल्या करोडो दुर्भागी जीवांकडे यमराजाचे लक्ष गेले. त्यांची करुणा येऊन त्याही जीवांवर कृपा व्हावी म्हणून त्यांनी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. "हे दुर्दैवी जीवांनो, तुम्ही क्लेशहरण करणा-या भगवान केशवांची आराधना का करीत नाही? पूजेचे काहीही सामान जवळ नसले, तरी मनोभावे अर्पण केलेल्या केवळ ओंजळभर जलानेही जे संतुष्ट होतात, त्या भगवान मधुसूदनांचे तुम्ही का बरे पूजन करीत नाही? कमलासारखे नेत्र असणा-या करुणामूर्ती भगवान नृसिंहांचे नुसते प्रेमाने स्मरण केले तरी ते त्या महापापी जीवाला त्याक्षणी मुक्ती देतात. म्हणून तुम्ही त्यांचेच स्मरण करावे, यातच तुमचे खरे हित आहे ! त्यासाठी मी पूर्वी महात्म्यांकडून ऐकलेले प्रत्यक्ष भगवान श्रीनारायणांचेच मधुर वचन तुम्हांला सांगतो." असे म्हणून यमधर्माने काही उपदेश केला. त्याला "यमगीता" असे म्हणतात. नरकयातनांपासून मुक्ती देणारा, यमराजांनी कथन केलेला हा मार्मिक भाग आपण उद्या सविस्तर पाहू.
भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीनरहरीराया हे दिसायला उग्र असले, तरी प्रत्यक्षात भक्तवात्सल्य दाखविण्यासाठीच प्रकटलेले असल्याने अत्यंत प्रेमळच आहेत. त्यांच्या ख-या प्रेमाचा अास्वाद घेतला अनन्यभक्त प्रल्हादांनी. कारण त्यांचेही भगवंतांवर अात्यंतिक प्रेम होते. सद्गुरु श्री माउलींनी देखील प्रल्हादांचे वेळोवेळी यथार्थ स्तवन केलेले आहे. देव-भक्ताच्या जगावेगळ्या प्रेमाचा अद्भुत आविष्कार म्हणून प्रल्हादांची कथा आपण बालपणापासूनच ऐकत आलेलो आहोत. त्या कथेची माधुरी अपूर्वच आहे. म्हणूनच सद्गुरु माउलींच्या शब्दांत या भक्तिकथेचे मर्म खालील लिंकवरील लेखातून आपण जाणून घेऊ या; आणि उच्चरवाने भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनृसिंहराज महाराज की जय । असा जयजयकार नृसिंहनवरात्राच्या आजच्या चतुर्थ दिनी प्रेमभराने करून श्रीभगवंतांची करुणा भाकूया !
( कृपया ही पोस्ट अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवावी ही प्रेमळ विनंती.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ 
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख चौथा 
http://rohanupalekar.blogspot.com/2017/05/blog-post_4.html

23 Apr 2018

नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख तिसरा


भगवान श्रीनृसिंह हे अतिशय उग्र दैवत असले तरी भक्तांसाठी मात्र ते अत्यंत प्रेमळ, वत्सल आणि कनवाळूच आहेत. आपल्या भक्तांसाठी ते सदैव सौम्यच आहेत. श्रीनृसिंहलीलेमधील भक्तिमर्म हाच सिद्धांत प्रकर्षाने आपल्यासमोर ठेवते. गेल्यावर्षीच्या "विदारूनि महास्तंभ.." लेखमालेतील आजच्या तिस-या लेखात हाच विचार अधिक स्पष्टपणे मांडलेला आहे. तो सर्वांनी आवर्जून पाहावा.
काल सांगितल्याप्रमाणे, आता आपण भगवान श्रीनृसिंहांच्या उपासनेचा काही भाग बघूया. भगवान श्रीनरहरीरायांना मनोभावे केलेले तुलसीपत्रांचे किंवा सुगंधी पांढ-या पुष्पांचे अर्चन अतिशय आवडते. ते या उपासनेने लवकर प्रसन्न होतात असे पूर्वीच्या महात्म्यांचे सांगणे आहे. ही उपासनाही अत्यंत सोपी आहे, कोणाही स्त्री-पुरुषांना करण्याची मुभा आहे.
श्रीनृसिंहकोशाच्या तृतीय खंडात कोशाचे संपादन प्रमुख आणि  श्रीदत्तसंप्रदायातील थोर विभूतिमत्त्व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "भगवान श्रीनृसिंहांची मूर्ती किंवा चित्र किंवा केवळ "श्रीनृसिंह" असे अष्टगंधाने पिवळ्या वस्त्रावर लिहून किंवा नृसिंहयंत्रावर एक एक नाम घेत तुलसीदल वाहावे. १०८ दले वाहून झाली की दूधसाखरेचा नैवेद्य दाखवून आरती म्हणून साष्टांग नमस्कार घालावा. या अर्चनाने कोठलीही संकटे, आजार, प्रापंचिक दु:खे यांची निवृत्ती होते असा अनुभव आहे. मात्र शुचिर्भूततेचे नियम कटाक्षाने पाळून हे अर्चन करणे आवश्यक आहे."
केवळ भगवान श्रीनृसिंहांची उपासना म्हणून किंवा त्यांच्या प्रसन्नतेसाठी हे अर्चन निष्काम भावनेनेही करता येते आणि तेच अधिक श्रेयस्कर ठरणारे आहे. श्रीनृसिंह नवरात्रात दररोज उपासना म्हणूनही हे अर्चन आपण करू शकतो.
खालील अष्टोत्तरशत नामावलीने हे अर्चन करावे.
श्री नारसिंहाय नम: ।
श्री महासिंहाय नम: ।
श्री दिव्यसिंहाय नम: ।
श्री महाबलाय नम: ।
श्री उग्रसिंहाय नम: ।
श्री महादेवाय नम: ।
श्री स्तम्भजाय नम: ।
श्री उग्रलोचनाय नम: ।
श्री रौद्राय नम: ।
श्री सर्वाद्भुताय नम: ।
श्री श्रीमते नम: ।
श्री योगानन्दाय नम: ।
श्री त्रिविक्रमाय नम: ।
श्री हरये नम: ।
श्री कोलाहलाय नम: ।
श्री चक्रिणे नम: ।
श्री विजयाय नम: ।
श्री जयवर्धनाय नम: ।
श्री पञ्चाननाय नम: ।
श्री परंब्रह्मणे नम: ।
श्री घोराय नम: ।
श्री घोरविक्रमाय नम: ।
श्री ज्वलन्मुखाय नम: ।
श्री ज्वालमालिने नम: ।
श्री महाज्वालाय नम: ।
श्री महाप्रभवे नम: ।
श्री निटिलाक्षाय नम: ।
श्री सहस्राक्षाय नम: ।
श्री दुर्निरीक्ष्याय नम: ।
श्री प्रतापनाय नम: ।
श्री महादंष्ट्रायुधाय नम: ।
श्री प्राज्ञाय नम: ।
श्री चण्डकोपिने नम: ।
श्री सदाशिवाय नम: ।
श्री हिरण्यकशिपुध्वंसिने नम: ।
श्री दैत्यदानवभञ्जनाय नम: ।
श्री गुणभद्राय नम: ।
श्री महाभद्राय नम: ।
श्री बलभद्राय नम: ।
श्री सुभद्रकाय नम: ।
श्री करालाय नम: ।
श्री विकरालाय नम: ।
श्री विकर्त्रे नम: ।
श्री सर्वकर्तृकाय नम: ।
श्री शिंशुमाराय नम: ।
श्री त्रिलोकात्मने नम: ।
श्री ईशाय नम: ।
श्री सर्वेश्वराय नम: ।
श्री विभवे नम: ।
श्री भैरवाडम्बराय नम: ।
श्री दिव्याय नम: ।
श्री अच्युताय नम: ।
श्री कविमाधवाय नम: ।
श्री अधोक्षजाय नम: ।
श्री अक्षराय नम: ।
श्री शर्वाय नम: ।
श्री वनमालिने नम: ।
श्री वरप्रदाय नम: ।
श्री विश्वम्भराय नम: ।
श्री अद्भुताय नम: ।
श्री भव्याय नम: ।
श्री श्रीविष्णवे नम: ।
श्री पुरुषोत्तमाय नम: ।
श्री अमोघास्त्राय नम: ।
श्री नखास्त्राय नम: ।
श्री सूर्यज्योतिषे नम: ।
श्री सुरेश्वराय नम: ।
श्री सहस्रबाहवे नम: ।
श्री सर्वज्ञाय नम: ।
श्री सर्वसिद्धिप्रदायकाय नम: ।
श्री वज्रदंष्ट्राय नम: ।
श्री वज्रनखाय नम: ।
श्री महानन्दाय नम: ।
श्री परन्तपाय नम: ।
श्री सर्वमन्त्रैकरूपाय नम: ।
श्री सर्वमन्त्रविदारणाय नम: ।
श्री सर्वतन्त्रात्मकाय नम: ।
श्री अव्यक्ताय नम: ।
श्री सुव्यक्ताय नम: ।
श्री भक्तवत्सलाय नम: ।
श्री वैशाखशुक्लभूतोत्थाय नम: ।
श्री शरणागतवत्सलाय नम: ।
श्री उदारकीर्तये नम: ।
श्री पुण्यात्मने नम: ।
श्री महात्मने नम: ।
श्री चण्डविक्रमाय नम: ।
श्री वेदत्रयप्रपूज्याय नम: ।
श्री भगवते नम: ।
श्री परमेश्वराय नम: ।
श्री श्रीवत्साङ्काय नम: ।
श्री श्रीनिवासाय नम: ।
श्री जगद्व्यापिने नम: ।
श्री जगन्मयाय नम: ।
श्री जगत्पालाय नम: ।
श्री जगन्नाथाय नम: ।
श्री महाकायाय नम: ।
श्री द्विरूपभृते नम: ।
श्री परमात्मने नम: ।
श्री परंज्योतिषे नम: ।
श्री निर्गुणाय नम: ।
श्री नृकेसरिणे नम: ।
श्री परमत्वाय नम: ।
श्री परंधाम्ने नम: ।
श्री सच्चिदानंदविग्रहाय नम: ।
श्री लक्ष्मीनृसिंहाय नम: ।
श्री सर्वात्मने नम: ।
श्री धीराय नम: ।
श्री प्रल्हादपालकाय नम: ।
भगवान श्रीनरहरीरायांना प्रेमाने व मनापासून त्यांचे नाम घेतलेले अत्यंत आवडते. या अनन्यभक्तीने केलेल्या नामस्मरणाच्या बळावरच तर त्यांनी भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचे सर्व संकटांमधून संरक्षण केले होते व आजही अनेक भक्तांचे करीत आहेत व पुढेही करीत राहतील. कारण तेच त्यांचे ब्रीद आहे. त्यांच्या या अलौकिक आणि भावमधुर भक्तवात्सल्य ब्रीदाचे मनोहर विवरण सोबतच्या लिंकवरील लेखात केलेले आहे. तोही आवर्जून वाचावा ही विनंती.
भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनृसिंहराज महाराज की जय ।
( कृपया ही पोस्ट अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवावी ही प्रेमळ विनंती.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
 विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ  
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख तिसरा 
http://rohanupalekar.blogspot.in/2017/05/blog-post_3.html

22 Apr 2018

नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख दुसरा



आज भगवान श्रीनरहरीरायाच्या नवरात्राचा दुसरा दिवस. काल आपण भगवान श्रीनृसिंहांचे स्मरण सर्वप्रकारच्या भयांचा नाश करते हा भाग पाहिला. कालाचेही महाकाल असणारे भगवान श्रीनृसिंह आपल्याला शरण आलेल्या भक्ताचे भयापासून संरक्षण करतात. म्हणूनच श्रीमद् भागवतातील पंचम स्कंधातील अठराव्या अध्यायात भक्तश्रेष्ठ  प्रल्हादजी आपल्या सारख्या सामान्यजनांना उपदेश करतात की, नृसिंहपादं भजताकुतोभयमिति ।
" इच्छा, लोभ, द्वेष, राग, भय, दु:ख आदी गोष्टींचे मूळ असणा-या, अंतिमत: दु:खदायकच असणा-या घरादारात, प्रपंचात फारसे न गुंतता, अभय देणा-या श्रीनृसिंहचरणांचाच सदैव आश्रय करून राहावे !"
कालचा लेख वाचून अनेकांनी विचारले की, श्रीनृसिंहांचे स्मरण कोणत्या मंत्राने करायचे? म्हणून आज मुद्दाम त्यावरच लेखन करीत आहे.
भगवान श्रीनृसिंहांचे असंख्य पुराणोक्त व तंत्रोक्त मंत्र प्रचलित आहेत. परंतु त्या मंत्रांचे नियम व पद्धती अतिशय क्लिष्ट व कडक आहेत. त्या भानगडीत पडून फायद्यापेक्षा तोटा होण्याचाच धोका अधिक. म्हणून त्या मंत्रांपेक्षा अतिशय सोपे व साधे परंतु तेवढेच प्रभावी असणारे श्रीनृसिंह नाममंत्र जपून आपण श्रीनरहरीरायाचे स्मरण करणे जास्त हिताचे ठरते. नृसिंहाय नम: । किंवा नारसिंहाय नम: । हे दोन्ही श्रीनरहरीरायाचेच प्रभावी नाममंत्र आहेत.
" अटव्यां नारसिंहश्च । " म्हणजे जंगलात असताना 'नारसिंहाय नम: ।' या नामाचाच जप करावा असे वैष्णवशास्त्रात सांगितलेले आहे. या नामांचा जप करता येतो किंवा या नामांनी श्रीनरहरीरायाच्या प्रतिमेवर तुलसी/बिल्व/पुष्पार्चनाही करता येते. तुलसीअर्चना ही भगवान विष्णूंच्या सर्व अवतारांना अतिशय आवडणारी उपासना आहे. याविषयी उद्याच्या लेखात सविस्तर लिहिणार आहे.
आज गंगासप्तमी, भगवती गंगेची उत्पत्ती तिथी आहे. म्हणून मुद्दामच सद्गुरु श्री माउलींच्या भक्तिचिद्गंगेच्या रूपकाचे, श्रीनृसिंह-प्रल्हादचरित्राच्या माध्यमातून केलेले विवरण खालील लिंकवर जाऊन आवर्जून वाचावे. श्रीनृसिंहलीलेतील भक्तिमर्म हे खरोखर अंतर्बाह्य स्तिमित करणारेच आहे. त्याच्या मननाने भावविभोर व्हायला होते आणि आपसूकच आपल्या मुखातून भक्तकरुणाकर श्रीनरहरीरायांचा जयजयकार उमटतो, भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनृसिंहराज महाराज की जय ।
( कृपया ही पोस्ट अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवावी ही प्रेमळ विनंती.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
 विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ  
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख दुसरा 
http://rohanupalekar.blogspot.in/2017/05/blog-post_2.html

21 Apr 2018

नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख पहिला



आज वैशाख शुद्ध षष्ठी, भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीनरहरीरायांच्या जयंती नवरात्राचा पहिला दिवस. आजपासून आमच्या लाडक्या भगवंतांच्या विशेष उपासनेला सुरुवात होत आहे. या नवरात्रात आपल्याला भगवान श्रीनृसिंहांचा उदंड भक्तिकल्लोळ करायचा आहे. त्यासाठी सर्वांचे येथे मन:पूर्वक स्वागत करतो.
श्रीनृसिंह अवताराच्या विलक्षण लीलांवर गेल्यावर्षी श्रीकृपेने स्वतंत्र लेखमाला लिहिली गेली होती. यंदा आता त्याहून वेगळे, पण रोचक आणि भक्तिवर्धक असे नवीन काही देण्याचा प्रयत्न करतो आहे. दररोजच्या लेखात गेल्या वर्षीच्या लेखाची लिंक दिलेली असेलच. वाचकांनी त्या लिंकवरून आधीचे लेखही वाचावेत ही विनंती. त्यामुळे पुन्हा तेच न सांगता नवीन माहिती तेवढी या लेखातून दिली जाईल.
भगवान श्रीनृसिंह ही वेदकालीन देवता नसावी, असे अनेक अभ्यासकांचे प्रामाणिक मत आहे. कारण वेदांमध्ये व ब्राह्मणग्रंथांमध्ये कुठेही श्रीनृसिंहांचा उल्लेख सापडत नाही, परंतु आरण्यक ग्रंथांपैकी कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय अारण्यकात पहिल्यांदा श्रीनृसिंह गायत्री मंत्र आलेला आहे. पुराण वाङ्मयात मात्र या देवासंबंधी विपुल माहिती आलेली आहे. मुख्य अठरा पुराणांपैकी चौदा पुराणांमध्ये श्रीनृसिंहांची कथा कमी-अधिक प्रमाणात येते. तसेच उपपुराणांमध्ये गणले जाणारे श्रीनृसिंहपुराण हे अडुसष्ठ अध्यायांचे सुंदर असे स्वतंत्र पुराणही उपलब्ध अाहे. यावर्षीच्या या लेखमालेतून नृसिंहपुराणातील काही विशेष कथा व घरच्या घरी करता येऊ शकतील अशा श्रीनृसिंह उपासनांचा भाग आपण पाहणार आहोत.
भगवान श्रीनृसिंहांचे नाम हे सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्ती देणारे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे भय उत्पन्न झाले असता किंवा संकट प्राप्त झाले असता श्रीनृसिंहस्मरण करावे, असे संतांनी सांगून ठेवलेले आहे. जंगलात वाट चुकून आपण एकाकी पडलो असताना किंवा जंगली श्वापदांची भीती उत्पन्न झाली असताना जोरजोरात श्रीनृसिंहनामाचा गजर करावा असे पूर्वीच्या महात्म्यांनी सांगून ठेवलेले आहे. श्रीनृसिंहस्मरण करणा-याला जगात कसलेही भय राहात नाही, असे प्रत्यक्ष भगवान श्रीशिवशंकरांनी पार्वतीमातेला सांगितलेले आहे. दुर्लंघ्य अशा कालभयाचाही नाश नृसिंहस्मरणाने होतो, असे जगाला ग्रासणारा महाकालच येथे सांगत आहे. श्रीनृसिंहस्मरणाचे माहात्म्य काय अलौकिक आहे पाहा ! म्हणूनच आजच्या श्रीनृसिंह नवरात्राच्या प्रथमदिनी, श्रीनरहरीरायाच्या आवडत्या शनिवारी, स्तुतिप्रिय भगवान श्रीनृसिंहराज महाराजांचा मनोभावे नामगजर करून आपणही या नवरात्र उपासनेचा श्रीगणेशा करू या !!
भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीनृसिंहराज महाराज की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
 विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ  
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख पहिला 
http://rohanupalekar.blogspot.in/2017/05/blog-post.html?m=1

18 Apr 2018

अक्षयतृतीयेचा अमृतयोग

नमस्कार मंडळी  !!
आज वैशाख शुद्‍ध तृतीया, अक्षय तृतीया  !!
भारतीय संस्कृतीनुसार हा साडेतीन सुमुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त. आजच्या दिवशी केलेली कोणतीही चांगली गोष्ट अक्षय फल देणारी ठरते म्हणून ही अक्षयतृतीया. मुहूर्त अर्धा असला तरी फल मात्र पूर्णच मिळते बरं का !
या दिवशी दानाचे महत्त्व मानले जाते. दान हा भारतीय संस्कृतीचा व ऋषिप्रणित दिव्य जीवनशैलीचा महत्त्वाचा गुणविशेष आहे. दान हे एकप्रकारे धान्यासारखेच असते. एक बी पेरली की शेकडो बिया त्यातून परत मिळतात. हीच भावभूमिका दानामागे आहे; फक्त ती निरपेक्ष असावी, असे संत सांगतात. " देण्यातला " आनंद हा नेहमीच चक्रवाढ पद्धतीने वाढणारा असतो, तो अक्षयच असतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीला दान शब्द लावला जातो, हे लक्षात घ्यावे. अन्नदान, ज्ञानदान, जलदान, न्यायदान.....सर्वच दाने आहेत. कारण त्यातून होणारा शाश्वत लाभ ऋषींच्या चित्रदर्शी दूरदृष्टीने आधीच जोखलेला आहे. आपणही आजच्या या पावन मुहूर्ताचे औचित्य साधून आपल्यापाशी जे काही आहे त्याचे समाधान मानत, त्यातूनच दान देण्याची वृत्ती सतत कशी वाढेल याचा पाठपुरावा करू या आणि अक्षय समाधानाचे धनी होऊ या !
अक्षयतृतीयेचे महत्त्व आणि माहात्म्य कथन करणारा गेल्या वर्षीचा लेख खालील लिंकवर आहे, तोही आवर्जून वाचावा ही विनंती !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
अक्षयतृतीयेचा अमृतयोग
http://rohanupalekar.blogspot.com/2017/04/blog-post_29.html

12 Apr 2018

कर्दळीवन : भंपकपणाचा कळस


कलियुगाचे अगदी तंतोतंत वर्णन पुराणांमध्ये व संतांच्या वाङ्मयामध्ये बघायला मिळते. कलियुगात असत्यच सत्याची जागा घेऊन लोकांना भ्रमित करेल, असे त्यांनी स्पष्ट सांगून ठेवलेले आहे. याचा आपल्याला पदोपदी प्रत्यय येत असतो. याच भंपकपणाचा कळस म्हणजे सध्या चर्चेत असलेली कर्दळीवन यात्रा होय.
श्रीगुरुचरित्र या परमपवित्र ग्रंथात भगवान श्रीदत्तप्रभूंच्या कलियुगातील, भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराज व भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज, या दोन अवतारांच्या लीला सविस्तर वर्णिलेल्या आहेत. आज ५०० हून अधिक वर्षे या ग्रंथाची सेवा हजारो लोक करीत आहेत.
संतांचे वाङ्मय हे वरकरणी सोपे वाटत असले तरी त्यात खूप गूढार्थ भरून राहिलेला असतो. सर्वसामान्य वाचकांना त्याचा मथितार्थ प्रत्येकवेळी कळेलच असे नाही. किंबहुना सद्गुरुकृपेने अंतर्दृष्टी उघडल्याशिवाय त्या शब्दांचा खरा अर्थ उमगतच नसतो. अशी दृष्टी नसलेल्या अभ्यासकांद्वारे मग संतवचनांचे विपरीत अर्थ लावले जातात. सध्याच्या काळात असल्याच प्रकारचे धेडगुजरी अभ्यासक समाजात फार मोठ्या प्रमाणात तयार झालेले असल्याने असे अयोग्य अर्थच प्रचलित होताना दिसत आहेत. शिवाय काही गोष्टी संत मुद्दामहूनच गुप्त ठेवतात किंवा अर्धवट अर्थ सांगून ठेवतात. त्यामुळेही लोक विपरीत अर्थ करतात. कर्दळीवनाच्या बाबतीत हेच झालेले दिसून येत आहे.
श्रीगुरुचरित्राच्या ५१ व्या अध्यायात भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्याचा उल्लेख येतो. श्रीस्वामी महाराजांनी गाणगापुरातून शैल्याला गमन केले व पाताळगंगेत पुष्पांच्या आसनावर बसून त्यांनी आपला दिव्यदेह अदृश्य केला. लौकिक अर्थाने त्यांनी 'कर्दळीवनात गमन केले' असे तेथे म्हटलेले आहे. येथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी की, भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी व भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामींनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही. ते केवळ अदृश्य झालेले आहेत !
शैल्यमल्लिकार्जुनाजवळ पाताळगंगेच्या पैलतीरावर एक घनदाट जंगल असून त्यात खूप केळीची झाडे आहेत. तसेच तेथे चिखल, दलदलीचेही साम्राज्य आहे. कदली या संस्कृत शब्दाचा अर्थ केळी. तसाच त्याचा तेलुगु भाषेत अर्थ दलदल देखील. त्यामुळेच या अरण्याचे नाव 'कदलीवन' असे पडले. पूर्वीचे कर्दळीवन आता तसे राहिलेले नाही. कारण कृष्णामाईवर झालेल्या नागार्जुनसागर या प्रचंड धरणामुळे बराचसा भाग आता पाण्याखाली गेलेला आहे.
या कर्दळीवनात वामचारी बौध्द तांत्रिक तसेच शाक्त व कापालिकांचा अड्डा होता. आजही त्यांचा वावर तेथे आहेच. बौध्दांपैकी रससिध्द नागार्जुन याच प्रदेशात राहात होते. त्यांनी त्यांचे अनेक औषधी प्रयोग याच ठिकाणी केलेले आहेत. आद्य शंकराचार्य स्वामींच्या चरित्रातील कापालिकाचा प्रसंगही याच जंगलात घडलेला आहे. तांत्रिकांची अघोरी पंचमकार साधना या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर चालत असल्याने, सात्त्विक भक्तांनी, उत्तम लक्षणी संन्यासी लोकांनी या ठिकाणी अजिबात जाऊ नये, असा शास्त्रांचा स्पष्ट निर्देश पूर्वी प्रचलित होता. एखादा सुलक्षणी उत्तम पुरुष अशा भागात गेला तर ते तांत्रिक लोक त्याला पकडून त्याचा बळी आपल्या इष्ट देवतेला देत असत. कापालिकाने बळी देण्यासाठीच श्रीमदाद्य शंकराचार्यांना तेथे आमंत्रित केलेले होते. पण भगवान श्रीनृसिंहांनी श्रीपद्मपादाचार्यांच्या देहाचा आश्रय घेऊन कापालिकाचा शिरच्छेद केला होता. अशा ठिकाणी, शास्त्रांचे स्पष्ट निर्देश डावलून श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तपश्चर्येसाठी जातील, असे अजिबात वाटत नाही.
काही जुन्या ग्रंथांमध्ये असा उल्लेख येतो की, श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कर्दळीवनात जाऊन ३०० वर्षे तपश्चर्या केली. लाकूडतोड्याच्या वारुळावरील घावाचे निमित्त होऊन तेच त्या वारुळातून श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराज म्हणून प्रकटले. श्रीदत्त संप्रदायाच्या मूळ परंपराशाखांमध्ये या गोष्टीला अजिबात प्रमाण मानत नाहीत. ही काल्पनिक असल्याचेच अनेक महात्म्यांचे म्हणणे आहे व त्याला तसे भक्कम पुरावेही आहेत.
राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या जन्मासंबंधी त्यांचे प्रमुख शिष्योत्तम श्रीस्वामीसुत महाराजांना जो दृष्टांत झाला होता, त्यानुसार हरियाणा राज्यातील हस्तिनापुर जवळील छेली या खेडेगावात केळीच्या वनाजवळ, चैत्र शुद्ध द्वितीया, शके १०७१ म्हणजेच इ.स.११४९ साली धरणी दुभंगून आठ वर्षाच्या बटू रूपात श्रीस्वामीमहाराज प्रकटले होते. बव्हंशी स्वामीशिष्य याच घटनेला सत्य मानतात. गोपाळबुवा केळकरांच्या बखरीतही हाच प्रसंग आहे. यानुसार अहमदनगरच्या नानाजी रेखी यांनी श्रीस्वामी महाराजांची पत्रिका तयार केली होती. त्या पत्रिकेला स्वतः श्रीस्वामी महाराजांनी आपल्या हयातीतच मान्यता दिलेली होती. श्रीस्वामी समर्थ महाराजांचे पूर्ण कृपांकित, प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना स्वतः श्रीस्वामींनीच सांगितलेले होते की, "सख्या, याच देहातून आम्ही गेली आठशे वर्षे कार्य करीत आहोत !"
याचा अर्थ असा की, श्रीस्वामी समर्थ महाराज हे भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्याही आधीपासून, श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामींच्या काळापासूनच कार्य करीत आहेत. त्यामुळेच कर्दळीवनात घडलेल्या वरील घटनेला संप्रदायामध्ये मान्यताच नाही. ती केवळ कविकल्पनाच आहे. श्रीदत्त संप्रदायाच्या अवतारक्रमामध्ये, श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी हे प्रथम अवतार, श्रीनृसिंहसरस्वती स्वामी हे द्वितीय अवतार, श्रीस्वामी समर्थ महाराज हे तृतीय अवतार, श्री माणिकप्रभू हे चतुर्थ अवतार व प.प.श्री. टेंब्येस्वामी हे पंचम दत्तावतार मानले जातात. हा अवतारक्रम त्या अवतारांच्या जन्मकालावर आधारित नाही.
वरील पाचही अवतार हे प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंचेच परिपूर्ण स्वरूप असले तरी त्या प्रत्येकाच्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये खूप फरक आहे. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज हे वेदशास्त्रांचे कट्टर पुरस्कर्ते आणि कोणतीही शास्त्रविरुद्ध गोष्ट कदापि न मानणारे होते. या उलट श्रीस्वामी समर्थ महाराज हे कायमच शास्त्रांना पूर्णपणे बाजूला ठेवून मनःपूत आचरण करणारे होते. ते सर्वतंत्रस्वतंत्रच वागत असत. या दोन्ही अवतारांची ही वैशिष्ट्ये त्यांच्या लीलांमध्ये स्पष्टपणे जाणवतात. एकाच रूपात अशी सर्वथा भिन्न किंवा विरुद्धधर्मी वैशिष्ट्ये कशी काय राहू शकतील? त्यामुळेच श्रीनृसिंहसरस्वती स्वामीच श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या रूपाने पुन्हा कार्यार्थ आले, ही गोष्ट पटत नाही. हे दोन्ही अवतार भिन्नच आहेत.
श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या अनेक लीलांमध्ये, गाणगापूरला राहून काम्यार्थ उपासना करणा-या भक्तांना स्वतः श्रीनृसिंहसरस्वती स्वामींनी दृष्टांत देऊन अक्कलकोटला पाठवले व त्यांचे कार्य श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने पूर्ण झाले; अशा असंख्य लीला आहेत. आम्ही आणि श्रीस्वामी समर्थ महाराज एकच आहोत असेही त्या दृष्टांतांमध्ये सांगितलेले आढळते. तत्त्वदृष्ट्या हे खरेच आहे कारण दोघेही श्रीदत्तप्रभूंचेच अवतार आहेत. पण श्रीनृसिंहसरस्वती स्वामीच श्रीअक्कलकोट स्वामींच्या रूपाने पुन्हा आले, ही गोष्ट मात्र पटणारी नाही.
आता आणखी एक प्रश्न उरतो तो, श्रीगुरुचरित्रातील कर्दळीवनाच्या उल्लेखाचा. जे कर्दळीवन आज दाखवले जाते त्याचा व श्रीगुरुचरित्रातील कर्दळीवनाचा काहीही संबंध नाही. श्रीदत्तसंप्रदयातील थोर विभूती, प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या श्रीवामनराज त्रैमासिकाच्या कार्तिक शके १९३५ च्या अंकामध्ये छापलेल्या 'कृष्णातिरीच्या वसणा-या' या प्रवचनात याविषयी खूप मौलिक माहिती दिलेली आहे. जिज्ञासूंनी सदर प्रवचन आवर्जून वाचावेच. त्यात ते म्हणतात, "मूळ कर्दळीवन नामक दिव्य तपोभूमी ही प्रत्यक्ष श्रीदत्तलोकातच आहे; आणि त्या श्रीदत्तलोकातील कर्दळीवनात जाण्याचा मार्ग हा श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या लिंगामधूनच सुरू होतो. त्या लिंगात योगबलाने प्रवेश केला असता तेथून थेट श्रीदत्तलोकातील त्या दिव्य कर्दळीवनात जाता येते.
श्रीदत्तसंप्रदायाच्या सांकेतिक भाषेत, स्थूलमानाने श्रीमल्लिकार्जुन लिंग आणि त्याभोवतीच्या साडेतीन कोस परिघाच्या परिसरालाच 'कर्दळीवन ' असे म्हणण्याचा प्रघात आहे! "
भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज वर वर्णन केलेल्या पध्दतीनेच श्रीदत्तलोकातील कर्दळीवनात निघून गेले. लौकिक अर्थाने ते पृथ्वीतलावरून अदृश्य झाले. पण ज्यांना श्रीदत्तसंप्रदायाचे रहस्यच माहीत नाही; खरा संप्रदाय माहीत नाही असे लोक व्यर्थच पाताळगंगेच्या पैलतीरावरील अघोरी उपासना चालणा-या व त्याज्य मानलेल्या कर्दळवनाचा स्वतःच्या फायद्यासाठी सध्या खूप प्रचार-प्रसार करताना दिसत आहेत. कलियुगाचा विचित्र महिमा म्हणूनच की काय, अशा स्थानांशी अनेक दंतकथांचा संबंध जोडून आज शेकडो लोक भलत्याच कर्दळीवनाच्या यात्रा करीत आहेत.
सध्याच्या काळात कर्दळीवन यात्रा हा फार मोठा धंदा झालेला आहे. अनेक धूर्त लोकांनी खास कर्दळीवनासाठीच यात्रा कंपन्या काढलेल्या आहेत. भोळ्या भाविक लोकांना भावनिक स्तरावर ब्लॅकमेल करून, त्यांच्या श्रद्धेशी खेळून या यात्रेला येण्यासाठी भरीस पाडले जात आहे. एवढेच नाही तर, सरकारी अभयारण्य असलेल्‍या या कर्दळीवनाच्या विकासासाठी संघ, संस्था, गोशाळा इत्यादी स्थापून त्यांच्या नावावर देश-विदेशातून बख्खळ पैसा जमवला जात आहे. ही भाविक भक्तांची घोर फसवणूकच आहे. भाविकांनी असल्या भूलथापांना अजिबात बळी पडू नये.
गेल्या एक-दोन वर्षात या कर्दळीवनाचे खोटेच माहात्म्य सांगणारे अनेक ग्रंथ बाजारात आलेले दिसतात. पद्धतशीर मार्केटिंग करून, लोकांच्या मानसिकतेवर वारंवार मारा करून या ग्रंथाच्या हजारो प्रती खपवल्या जात आहेत. लोकांच्या श्रद्धेशी खेळून, त्यांची हकनाक दिशाभूल करून आपली तुंबडी भरण्याचा हा हीन उद्योग किळसवाणाच आहे. अशा एकजात सर्व पुस्तकांमध्ये छापलेले अनुभव देखील अतिशय सामान्य स्तरावरील भावनिक व मानसिक खेळच आहेत. शास्त्रांच्या दृष्टीने त्यांना अनुभव देखील म्हणता येणार नाही. ते शुद्ध कल्पनाविलासच आहेत. पण व्यवहारात जेव्हा अशा गोष्टी विविध माध्यमांमधून वारंवार समोर येतात, तेव्हा स्वाभाविक मानसिकता म्हणून मग लोकांना त्यात तथ्य असावेसे वाटू लागते. हीच पद्धत वापरून खोट्या नाट्या प्रसिध्दीचा अवलंब करून सध्या कर्दळीवन यात्रांचा धंदा तेजीत चालू आहे.
आज जे कर्दळीवन 'महान पवित्र ठिकाण' म्हणून दाखविण्यात येते. तिथे श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज कधीच गेलेलेही नाहीत. मग तेच श्रीस्वामी समर्थ म्हणून तेथून पुन्हा प्रकटले, हेही खोटेच ठरते. शिवाय ते स्थान अपवित्र, अयोग्य म्हणूनही मानलेले आहे. अशा ठिकाणी मोठ्या श्रद्धेने यात्रा करून, प्रचंड कष्ट सोसून काय पदरात पडणार? जंगलात निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर मग कर्दळीवनच कशाला हवे? इतरही जंगले आहेतच की !
एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. श्रीदत्तसंप्रदायातील कारंजा, पीठापूर अशी स्थाने प्रथमतः प.प.श्रीमत् टेंब्येस्वामींनी शोधून काढली. कुरवपूर, नृसिंहवाडी, औदुंबर इत्यादी प्रमुख श्रीदत्तस्थानांचा विकासही त्यांनीच करवला. पण त्यांनी या कर्दळीवनाचा साधा उल्लेखही कुठे केलेला नाही आपल्या वाङ्मयात. ते आसेतुहिमाचल भ्रमण करीत असताना मल्लिकार्जुनाला गेले पण कर्दळीवनात अजिबात गेले नाहीत. म्हणजे जे स्थान त्यांना मान्यच नव्हते, त्याचे महत्त्व आजच्या या लोकांच्या आध्यात्मिक प्रगतीची स्वत:हूनच ठेकेदारी घेतलेल्या तथाकथित बाजारबुणग्यांना जाणवले; असे म्हणायचे का? का या थोर (?) महाभागांचा अधिकार श्रीमत् टेंब्येस्वामींपेक्षा मोठा आहे? असल्या या तद्दन भंपकपणाला भाविकांनी अजिबात भीक घालू नये आणि कर्दळीवनाच्या यात्रांच्या फंदातही पडू नये, हीच कळकळीची विनंती ! प्रचंड हाल-अपेष्टा सोसून या कर्दळीवनात यात्रेला जाण्यापेक्षा घरी बसून केलेली यथाशक्य उपासना देखील जास्त लाभदायक ठरेल !
प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या प्रवचनातून या भयंकर प्रकाराला सर्वप्रथम वाचा फोडलेली असून, फार मोलाची माहिती त्यात सांगितलेली आहे. भाविकांनी ती मुळातून वाचावी व असल्या भलत्याच यात्रांच्या भानगडीत पडून आपली आर्थिक, मानसिक आणि भावनिक फसवणूक करून घेऊ नये. यासाठीच अत्यंत तळमळीने हा लेखन-प्रपंच करीत आहे.
संतांच्या ग्रंथातील वरवर न समजणारी रहस्ये अधिकारी विभूतींकडूनच समजून घेतली पाहिजेत. विद्वान असेल पण सद्गुरुकृपा व संप्रदायोक्त साधना नसेल तर अशांच्या म्हणण्याला काडीची किंमत नसते. आज प्रचंड खप होणारी ही कर्दळीवनाबद्दलची सर्व पुस्तके भलतीच माहिती सांगणारी आहेत. त्यात संप्रदायाला धरून काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे उगीचच अशा भूलथापांना, कल्पनाविलासाला बळी पडून स्वतःची फसवणूक करून घेऊ नये, ही सादर विनंती !
अशा कोणत्याही गोष्टींना, आपल्या सारासार विवेकाच्या मोजपट्टीवर व अधिकारी संतांच्या आधाराने तपासून घेऊन मगच त्यांच्यावर विश्वास ठेवावा, त्यातच आपले खरे हित असते !
लेखक : रोहन विजय उपळेकर
श्रीक्षेत्र दत्तधाम
द्वारा- श्री. श्रीराम नारायण जोशी
मु.पो. कोयनानगर, ता. पाटण
जि. सातारा - ४१५२०७
भ्रमणभाष- ८८८८९०४४८१
( यासंदर्भातील आणखी काही लेख खालील ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
http://kardaliwanachivastusthiti.blogspot.in )

11 Apr 2018

कीं तयाचें पशुत्व वावो जाहालें; पावलियां मातें


नमस्कार मित्रहो,
आज चैत्र कृष्ण एकादशी !
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी ज्या ग्यान्या नावाच्या रेड्याच्या मुखातून वेद वदविले, त्या परम पुण्यवान रेड्याची आज पुण्यतिथी !!
श्री माउलींची ही अद्भुत लीला-कथा खरेतर भक्तिशास्त्रातील अनेक रहस्ये विशद करणारी आहे. शुद्धिपत्र मागायला आलेल्या माउलींची पैठणच्या ब्रह्मवृंदाने परीक्षा घेतली. त्यावेळी माउलींनी रेड्याच्या पाठीवर मारलेल्या आसुडाचे वळ आपल्या पाठीवर उठलेले दाखवून, सर्व जीव भगवंतांचेच अंश असून एकरूप आहेत, हे सिद्ध केले. तेवढ्यानेही समाधान न वाटून त्या ब्रह्मवृंदाने त्याच रेड्याच्या मुखातून वेद वदविण्याची माउलींना मुलखावेगळी आज्ञा केली.
आपल्या श्रीगुरूंच्या संमतीने माउलींनी एक अत्यंत विलक्षण लीला केली आणि त्या ' ग्यान्या ' नावाच्या रेड्याकडून वेदवाणी वदविली. तो रेडा पौष अमावास्येपासून माघ शुद्ध पंचमी पर्यंत सलग पाच दिवस वेदपठण करीत होता. त्यावेळच्या ब्राह्मणांनी आपल्या सह्यांनिशी दिलेल्या शुद्धिपत्रामध्ये या वेदपठणाच्या चमत्काराचा स्पष्ट उल्लेख असून हे शुद्धिपत्र आजही उपलब्ध आहे.
या रेड्याची कथा मोठी विलक्षण आहे. पूर्वी एक मलय नावाचा गंधर्व होता. देवर्षी नारदांच्या शापामुळे त्याला पशुयोनीत जन्म घ्यावे लागले. पण त्याच्या प्रार्थनेने संतुष्ट होऊन, त्या जन्मांमध्ये महात्म्यांच्या कृपेने तुझा उद्धार होईल, असा उश्शाप नारदांनी त्याला दिला. तो मलय गंधर्व संत मुकुंदराजांच्या काळात आंबेजोगाईच्या जैत्रपाळ राजाचा घोडा झाला. मुकुंदराजांच्या कृपेने त्या योनीतून सुटून पुढच्या जन्मी मग तो माउलींचा रेडा झाला. त्यानंतर त्याला मनुष्य जन्म मिळून समर्थ श्री रामदास स्वामींच्या कृपेने तो मोक्षास गेला.
वेदपठण केल्यानंतर तो रेडा माउलींच्या कायम बरोबरच राहिला. पुढे नेवाशाला ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर आळंदीला जाताना वाटेत जुन्नर जवळील आळे या गावी त्या भाग्यवान रेड्याने माउलींच्या समक्ष देहत्याग केला. भगवान श्री माउलींनी स्वहस्ते त्याला समाधी दिली. आजमितीस तेथे त्या रेड्याचे मोठे मंदिर आहे. आजच्या दिवशी तेथे मोठी यात्रा भरते. या पुण्यवान रेड्याची पालखी देखील दरवर्षी आषाढी वारीसाठी आळे गावातून पंढरपूरला येते.
महात्म्यांचा आशीर्वादच नाही तर शापही आपला उद्धारच करतो, हा भक्तिशास्त्रातला सिद्धांत या लीला प्रसंगातून माउलींनी आपल्या समोर पुन्हा एकदा सिद्ध केलेला आहे !!
सद्गुरु श्री माउली ज्ञानेश्वरीत भक्तराज गजेंद्राच्या संदर्भात म्हणतात,
पाहें पां सावजें हातिरुं धरिलें ।
तेणें तया काकुळती मातें स्मरिलें ।
कीं तयाचें पशुत्व वावो जाहालें ।
पावलिया मातें ॥ज्ञाने.९.३१.४४२॥
या परम पुण्यवान रेड्याच्या बाबतीत माउलींनी देखील त्यांचा हा सिद्धांतच स्वत: खरा करून दाखविला आहे.
रेड्यामुखी वेद बोलविण्याचे विलक्षण सामर्थ्य अंगी बाळगणारे भगवान श्री माउली आणि त्यांचा लीलासहचर असणारा तो महापुण्यवान ग्यान्या रेडा, या उभयतांच्या श्रीचरणी सादर साष्टांग दंडवत !!
या संपूर्ण प्रसंगावर व त्यातील भक्तिरहस्यावर बापरखुमादेविवरु मासिकात मी एक सविस्तर लेख पूर्वी लिहिला होता. त्या लेखाच्या पीडीेएफची लिंक खाली देत आहे. कृपया पूर्ण लेख आवर्जून वाचावा व या जगावेगळ्या लीलेचा सप्रेम आनंद घेऊन श्री माउलींच्या श्रीचरणी नतमस्तक व्हावे ही विनंती.
लेखाची लिंक -  
https://drive.google.com/file/d/1UjfACrA-g3816BYYpq9e--GRC8HcH6DR/view?usp=drivesdk
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in )