नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख नववा - सानंद सांगता
आज आपल्या लाडक्या भगवान श्रीनरहरीरायांचा पुण्यपावन जन्मदिन आहे. गेले आठ दिवस आपण त्यांच्याच कृपेने आणि आपल्या परमभाग्याने त्यांचे यथाशक्ती गुणगायन करीत आहोत. त्यांनी करवून घेतलेल्या सेवेचा आज लौकिक समारोप आहे.
खरेतर सेवा कधीच पूर्णत्वाला जात नाही, कारण जसजशी सेवा वाढते तसतसे आपले सेवकत्वही मुरत जाते. सद्गुरु श्री माउली म्हणतात की, सेवाभाव किंवा भक्तिभाव गंगेसारखा अव्याहत असतो, तो कधीच संपत नाही. आपणही आता या नवरात्राच्या निमित्ताने सुरू झालेली ही सेवा निरंतर कशी चालू राहील यासाठीच प्रयत्न केला पाहिजे. नवरात्र संपले आता 'कोण नरहरीराया?' असे म्हणून पुन्हा त्या असार संसाराच्या रहाटगाडग्याला जुंपून घ्यायचे नाहीये आपल्याला. उलट त्या दु:खमूळ संसाराचाच श्रीनरहरीरायांच्या सप्रेम स्मरणात सुखमय परमार्थ करायचा आहे. आणि त्यासाठीच आपल्याला झडझडून प्रयत्नरत व्हायचे आहे. करुणामूर्ती वात्सल्यसिंधू भगवान श्रीनृसिंहराज मातृवत् प्रेमाने आपले हे लळे नक्कीच पुरवतील. ते तर त्यांचे ब्रीदच आहे !
भगवान श्रीनरहरीरायांचा अवतार मोठा विलक्षण आहे. त्यात सगळे काही विशेषच आहे. श्रीसंत तुकाराम महाराज या अवताराचे वर्णन करताना म्हणतात,
हाकेसरशी उडी ।
घालूनिया स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण ।
माझ्या विठाईवाचून ॥२॥
बाल प्रल्हादाने प्रेमभराने हाक मारताक्षणीच समोरचा खांब फोडून ते भक्तकरुणाकर परमतत्त्व साक्षात् प्रकट झाले. पण हाक मारणारे अनन्य भक्तराज प्रल्हाद होते. ज्याच्या ठायी ती तीव्र आर्तता निर्माण होईल त्याच्यासाठी ते कनवाळू परमतत्त्व त्याक्षणीच धावत येतेच. आजवरच्या अनेक संतचरित्रांमध्ये असे शेकडो प्रसंग आपण वाचलेले आहेत. हा भक्तांचा रोकडा अनुभवच आहे. म्हणून या नवरात्राच्या निमित्ताने आपण त्या भक्तकरुणाकर भगवंतांना त्यांच्या जन्मदिनी मनोभावे प्रार्थना करू या की, देवा आमच्या ठायी तुमच्याविषयीचे प्रगाढ परमप्रेम व केवळ तुमच्यासाठीचीच तीव्रतम लालसा प्रकट करावी व आमचे जीवन धन्य करावे.
सद्गुरु भगवान श्रीनृसिंहराजप्रभूंच्या कृपेने झालेली ही सर्व सेवा, हे लेख आवर्जून वाचणा-या सर्व वाचकांच्या तसेच फेसबुक व व्हॉटसप या माध्यमांतून आपल्या मित्रपरिवारात फॉरवर्ड करून इतरांनाही वाचायला देणा-या यच्चयावत् सर्व सद्भक्तांच्या वतीने मी सद्गुरुस्वरूप करुणाब्रह्म भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणारविंदी प्रेमभावे समर्पित करतो आणि त्यांच्याच अम्लान श्रीचरणी सर्वांसाठी सादर प्रार्थना करतो.
या लेखमालेच्या समारोपाचे काही भावपूर्ण मनोगत खालील लेखातही व्यक्त झालेले आहे. त्याही प्रेमभावनेचा आस्वाद आपण घ्यावा आणि त्या लेखासोबतच्या फोटोतील प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या नित्यपूजेतील श्रीनृसिंहांच्या पावन टाकाचेही दर्शन घ्यावे ही विनंती. या आठ दिवसांत श्रीनरहरीरायांच्या परमकृपेने अनेक भक्तांनी आवर्जून संपर्क करून लेखमाला आवडल्याचे कळविले. मी हा श्रीनरहरीरायांचाच कृपानुग्रह मानतो. जे काही आहे ते त्यांचेच आहे, मी केवळ त्यांच्या हातचे बाहुले आहे; ते जसे चालवतील तसे चालणारे, बोलवितील ते बोलणारे. त्यांच्या हातचे बाहुले होऊन राहण्यातच माझ्या आयुष्याची धन्यता आहे व माझी एवढीच इच्छा त्यांनी पुरवावी, हीच सरतेशेवटी त्यांच्या सर्वतीर्थास्पद, सर्वार्थदायक श्रीचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या महन्मंगल नामाचा आश्रय घेऊन त्यांच्या श्रीचरणीच विसावतो !
भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनृसिंहराज महाराज की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख नववा - सानंद सांगता
http://rohanupalekar.blogspot.com/2017/05/blog-post_9.html
0 comments:
Post a Comment