27 Aug 2019

नमन संत त्रिमूर्तींना

नमस्कार !
आज श्रावण कृष्ण द्वादशी, श्रीसंत सेना न्हावी महाराज - पंढरपूर, श्रीसंत नारायण महाराज - बेटकेडगांव व स्वामी श्री स्वरूपानंद महाराज - पावस, अशा तिन्ही थोर सत्पुरुषांची पुण्यतिथी !
भगवान श्रीपंढरीनाथांचे अनन्य भक्त असलेल्या श्रीसंत सेना महाराजांच्या चरित्राबद्दल बरेच मतभेद आहेत. काहींच्या मते ते मूळचे महाराष्ट्रीय आहेत तर काहींच्या मते उत्तरभारतीय आहेत. चरित्रसंदर्भ काहीही असोत, पण ते भगवान श्री माउलींच्या काळातील थोर सत्पुरुष होते, श्री माउलींचे लीलासहचर होते यात मात्र काहीच शंका नाही. त्यांची अभंगरचना खूप छान आहे. "आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ॥"  हा त्यांचा रूपक-अभंग खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी सद्गुरु श्री माउलींवरही अप्रतिम अभंगरचना केलेल्या आहेत. ते त्यात श्री माउलींचा पूर्णब्रह्म म्हणूनच उल्लेख करतात. श्रीसंत सेना महाराजांच्या श्री माउलींवरील सर्व अभंगांच्या आधारे मी 'सेना म्हणे जगी पूर्णब्रह्म अवतरले' या शीर्षकाचा बापरखुमादेविवरु मासिकात एक लेखही पूर्वी लिहिलेला होता. त्यांचे अभंग पाहता हे स्पष्ट दिसून येते की, त्यांच्यावर प्रत्यक्ष श्री माउलींनीच अनुग्रहकृपा केलेली होती. त्यामुळे ते श्री माउलींचा 'आपले सद्गुरु' म्हणूनच सर्वत्र गौरव करताना दिसतात. उत्तरायुष्यात ते पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशात राहिले. त्या भागात आजही त्यांचा अनुयायी वर्ग आहे. त्यांची समाधी पंढरपुरात प्रदक्षिणा मार्गावर बेलीच्या महादेवासमोर आहे. संत सेना महाराजांच्या काही अभंगरचना शिखांच्या पवित्र श्रीगुरुग्रंथसाहिब मध्ये समाविष्ट आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावरील चौफुल्या जवळील बेट केडगांव येथील थोर सत्पुरुष श्रीसंत नारायण महाराज हे महान राजयोगी होते. खूप राजेशाही थाटात ते राहात असत. सत्यनारायणाच्या पूजा करण्याची त्यांना आवड होती. ते एकाचवेळी एकशे आठ, एक हजार आठ अशा सामुदायिक सत्यनारायण पूजा करीत असत. बेटात यांनी बांधलेले श्रीदत्तमंदिर खूप छान असून तेथील श्रीदत्तमूर्ती ही शिवप्रधान आहे. म्हणजे या त्रिमूर्ती मध्ये मधले मुख हे श्रीविष्णूंच्या ऐवजी श्रीशिवांचे आहे. ( फोटो खाली दिलेला आहे. ) श्री नारायण महाराजांचे महानिर्वाण १९४५ साली बंगलोर येथे वयाच्या एकसष्टाव्या वर्षी झाले. त्यांचे समाधी मंदिर नंतर केडगांव येथे बांधण्यात आले. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या वडिलांकडे, प.पू.श्री.दत्तोपंत देशपांडे यांच्याकडे नसरापूरला पू.श्री.नारायण महाराज तरुण असल्यापासून येत असत. पू.मामाही बेटात त्यांच्याकडे बालपणापासून जात असत. प.पू.श्री.नारायण महाराजांच्या नित्यपूजेतील भगवान श्रीदत्तप्रभू आणि भगवान श्रीविष्णू यांच्या सोन्याच्या भरीव मूर्ती सध्या पुणे येथील महाराष्ट्र बँकेच्या विश्रामबाग वाड्यासमोरील शाखेच्या लॉकरमध्ये असतात. दरवर्षी श्रीदत्तजयंतीपूर्वी एक दिवस त्यांची पूजा होते व सर्वांना दर्शनही खुले असते. अतिशय सुबक व देखण्या आहेत या दोन्ही मूर्ती.
रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या परंपरेतील आत्मरंगी रंगलेले थोर सत्पुरुष, स्वामी श्री स्वरूपानंद महाराज हे आमच्या प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे जवळचे स्नेही होते. स्वामी स्वरूपानंदांचे अभंग ज्ञानेश्वरी व इतर वाङ्मय खूप लोकप्रिय आहे. त्यांच्या अभंगरचनाही अतिशय मार्मिक, अनुभूतिप्रचुर आणि रसाळ आहेत. प.पू.श्री.काकांनी आपल्या 'हरिपाठ सांगाती' ग्रंथामध्ये स्वामी स्वरूपानंदांच्या 'ज्ञानेश्वरी नित्यपाठा'च्या निवडक १०८ ओव्यांच्या लघुग्रंथाचा आवर्जून समावेश केलेला आहे.
आजच्या तिथीला, दि.१५ ऑगस्ट १९७४ रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास स्वामींनी पावस येथे देह ठेवला. नेमके त्याच दिवशी फलटण येथे कै.श्री.गोपाळराव फणसे व त्यांच्या पत्नी कै.सौ.अंबूताई प.पू.श्री.काकांच्या दर्शनाला गेले होते. त्यांनी प.पू.काकांना एक शाल अर्पण केली. त्यासरशी प.पू.काका उद्गारले, "आत्ताच तासाभरापूर्वी एका काळ्या माणसाने आम्हांला अशीच शाल घातली." कोणालाच त्यांच्या बोलण्याचा उलगडा झाला नाही. कारण असे कोणीच तत्पूर्वी तेथे आलेलेही नव्हते की कोणी शालही घातलेली नव्हती. सौ.अंबुताईंचे वडील स्वामी स्वरूपानंदांना मानणारे होते, त्याचा संदर्भ घेऊन, प.पू.काकांनी त्या वाक्यातून स्वामी स्वरूपानंदांच्या देहत्यागाचाच नेमका संकेत दिलेला होता. पण फणसेंना ही गोष्ट पुण्याला परत आल्यावर समजली.
यातून प.पू.काका व स्वामी स्वरूपानंद हे एकरूपच होते हे दिसून येते. श्री स्वामींच्या काही अनुगृहीतांनाही प.पू.काका व प.पू.स्वामींचे एकरूपत्व दृष्टांतांमधून अनुभवायला मिळाले होते. त्या अनोख्या लीला "सोनचाफ्याचा सुगंध" या पू.काकांच्या स्मृतिग्रंथाच्या भागांमध्ये छापलेल्या आहेत. पू.श्री.उपळेकर काका आपल्याच अवस्थेत असताना कधी कधी म्हणत की, "आम्ही इथूनच स्वरूपानंदांशी बोलतो !" स्वामी स्वरूपानंद आणि प.पू.योगिराज श्री.गुळवणी महाराज व त्यांचे शिष्योत्तम प.पू.योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचेही अतिशय हृद्य स्नेहसंबंध होते. साधू दिसती वेगळाले । परि ते स्वरूपी मिळाले । हेच खरे आहे अंतिमत: !
या तीनही थोर सत्पुरुषांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग दंडवत !!
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in )


24 Aug 2019

वन्दे आलन्दिवल्लभम् - ७

आज श्रावण कृष्ण अष्टमी, श्रीजन्माष्टमी महोत्सव !!
आमचे परमाराध्य भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू आणि भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांची आज जयंती ! या दोन्ही अद्वितीय अवतारांच्या श्रीचरणारविंदी सादर साष्टांग दंडवत !!
गेले सात दिवस आपण सद्गुरु श्री माउलींच्या स्मरणाचा महोत्सव साजरा करीत आहोत. ही नि:संशय त्यांचीच परमकृपा म्हणायला हवी. कररण त्यांचे स्मरण होणे हे केवळ त्यांच्याच कृपाप्रसादाने शक्य आहे. तो आपल्या कर्तृत्वाचा भागच नाही.
सद्गुरु श्री माउलींच्या चरित्रावर आधारलेले एक सुंदर अष्टक प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी रचलेले आहे. नित्यपाठात ठेवावे असे हे अष्टक आजच्या या समारोपाच्या लेखात मुद्दामच देत आहे. श्री माउलांच्या समग्र चरित्राचे थोडक्यात स्मरण त्याद्वारे होईल.  छोटेसेच असल्याने लवकर पाठ देखील होऊ शकेल. हे अष्टक दररोजच्या श्री ज्ञानेश्वरी वाचनापूर्वी किंवा नंतर म्हणता येण्यासारखे आहे. त्यानिमित्ताने रोज श्री माउलींचे स्मरणही होईल आणि या अष्टकाला असणारा, 'भवसागरातील भयांपासून मुक्ती' हा आशीर्वादही आपल्याला लाभदायक ठरेल, यात शंकाच नाही.
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज विरचित, ॥ श्रीज्ञानदेवाष्टक ॥
महिंद्रायणीचे तटी जे आळंदी ।
दुजी पंढरीक्षेत्र लोकी प्रसिद्धी ।
असा घेतला तेथ जेणे विसावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥१॥
पिता विठ्ठल विख्यात रुक्माई माता ।
दयाशील दांपत्य नाही अहंता ।
तये पोटी न कां जन्म हा घ्यावा । नमस्कार..॥२॥
कलीमाजी तारावया भाविकांना ।
सुविख्यात ज्ञानेश्वरी ग्रंथ केला ।

समाधान जो देई गीतार्थ जीवा । नमस्कार..॥३॥
चमत्कार नाना जगी दावियेले ।
पशूच्या मुखे वेदही बोलविले ।
असे थोर आश्चर्य वाटेचि जीवा । नमस्कार..॥४॥
द्विजाच्या घरी श्राद्धकाळी जिवंत ।
करी जेववी पूर्वजाते समस्त ।
मुखी घालती अंगुली लोक तेव्हा । नमस्कार..॥५॥
अगा व्याघ्रयाने वृथा खेळताहे ।
पहा भिंत निर्जीव ही चालताहे ।
असे दाखवी लाजवी चांगदेवा । नमस्कार..॥६॥
नसे द्वैतबुद्धी दया सर्वभूती ।
अशी देखिली ती संतमूर्ती ।
नसे साम्य लोकी जयाच्या प्रभावा । नमस्कार..॥७॥
महायोगी लोकी ऐसी प्रसिद्धी ।

आळंदीपुरी तोचि घेई समाधी ।
अशा ते न कां विश्वरूपी म्हणावा । नमस्कार..॥८॥
वदे भक्तीने नित्य या भाविकांसी ।
भवाब्धि भये बाधिती ना तयासी ।
म्हणे दास गोविंद विश्वास ठेवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥९॥

सद्गुरु भगवान श्री माउलींच्या अवतरणामागची फारशी माहीत नसलेली एक अनोखी हकिकत प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगत असत. तीच हकिकत खालील लिंकवरील लेखात सविस्तर दिलेली आहे. ते छोटेसे जन्माख्यानच आहे म्हणा हवे तर. आजच्या परम पुण्यदिनी आपण सर्वांनी श्रीहरि भगवंत आणि श्री माउलींची जास्तीतजास्त स्मरण, पूजन, वंदनादी सेवा करून धन्य होऊ या !
गेले सात दिवस तुम्हां सर्व भाविक वाचकांच्या सहकार्याने संपन्न झालेली ही श्री माउली गुणानुवादन सेवा सर्वभावे श्री माउलींच्याच श्रीचरणीं सादर समर्पित करतो ; आणि आम्हां सर्वांकडून निरंतर सेवा, साधना व स्मरण घडो, अशी त्यांच्या चरणीं प्रार्थना करून तेथेच तुलसीदल रूपाने विसावतो !!
वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - ७
https://rohanupalekar.blogspot.com/2018/09/blog-post_2.html?m=1

22 Aug 2019

वन्दे आलन्दिवल्लभम् - ६

सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे सर्वकाही अद्वितीयच आहे ! कारण तेच एकमेवाद्वितीय असे विलक्षण अवतार आहेत. त्यांची संजीवन समाधी सुद्धा एकमेवाद्वितीयच आहे. त्या संजीवन समाधिस्थितीत राहून ते आजही सदैव कार्यरत आहेत. त्यांचे अधिष्ठान तेथे प्रकट आहे. आपल्या भक्तांवर कृपेची, मायेची पखरण करीत हे 'करुणाब्रह्म' आजही अखंड जागृत आहे.
सद्गुरु भगवान श्री माउलींच्या संजीवन समाधीचे माहात्म्य, प्रत्यक्ष भगवान श्रीपंढरीनाथ आणि श्रीसंत नामदेवांच्या संवादाच्या माध्यमातून सांगताना सद्गुरु श्रीसंत एकनाथ महाराज म्हणतात,
मोक्ष मुक्ति ऋद्धिसिद्धि ।
पाहतां समाधी ज्ञानदेवा ॥१॥
ऐसा लाभ सांगे देव ।
ऐके नामदेव आवडी ॥२॥
दरुशनें नासे व्याधी पीडा ।
ऐसा सवंगडा ज्ञानदेव ॥३॥
एका जनार्दनीं मापारी ।
नाचतसे अलंकापुरी ॥ए.गा.३५११.४॥

"श्रीसंत नामदेव महाराजांनी भगवान श्रीपंढरीनाथांनाच सद्गुरु श्री माउलींच्या समाधीचे माहात्म्य विचारले. त्यावर देव म्हणाले की, "अरे नामया, माझ्या अत्यंत लाडक्या ज्ञानदेवाच्या संजीवन समाधीचे प्रेमभावे दर्शन घेतल्यास चारी मुक्ती, मोक्ष, ऋद्धी-सिद्धी सर्वकाही प्राप्त होते. जे जे हवे ते मिळते. या समाधीच्या दर्शनाने सर्व प्रकारच्या व्याधी, पीडा नष्ट होतात, भवपीडाही कायमची जाते. कारण हा ज्ञानोबा माझा अतिशय जिवलग असा सवंगडीच आहे !" सद्गुरु श्रीसंत एकनाथ महाराज म्हणतात की, "हे देवांच्याच मुखातून स्रवलेले माहात्म्य जाणून मी तर अलंकापुरातील या श्री माउलींच्या संजीवन समाधीसमोर त्यांचे नामस्मरण करीत अखंड नाचत आहे. त्यायोगे मोजताही येणार नाही एवढे शुद्ध पुण्य माझ्या पदरी जमा होत आहे. श्रीकृपेने माझे माप शिगोशीग भरलेले आहे."
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी ही अतिशय अद्भुत आणि अलौकिक आहे. ही एकमेवाद्वितीय अशीच आहे. कारण त्यांच्याशिवाय आजवर कोणीही अशा पद्धतीने संजीवन समाधी घेतलेली नाही आणि पुढेही कोणीही घेणार नाही. तो बहुमान केवळ श्री माउलींसाठीच इतर सर्व संतांनी एकमताने राखीव ठेवलेला आहे.
संजीवन समाधी म्हणजे जिवंत समाधी नव्हे. ही एक अत्यंत जटिल व अवघड प्रक्रिया आहे. खालील लिंकवरील सहाव्या लेखात संजीवन समाधीबद्दल पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्याकडून उपलब्ध झालेली अतिशय दुर्मिळ व महत्त्वाची माहिती एकत्र केलेली आहे. सद्गुरु श्री माउलींच्या संजीवन समाधीचे रहस्य कथन करणारा हा लेख आवर्जून वाचावा, त्या माहितीवर मनन करावे म्हणजे श्री माउलींचे लक्षणीय अद्वितीयत्व आणखी चांगल्याप्रकारे जाणवेल.
समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ।
सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय ।
वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - ६
https://rohanupalekar.blogspot.com/2018/09/blog-post.html?m=1

21 Aug 2019

वन्दे आलन्दिवल्लभम् - ५

सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे यच्चयावत् सर्व मराठी संतांचे जीवीचे जिवलग आहेत, सोयरे-धायरे आहेत, सर्वस्वच आहेत. आपल्या संतांचे अवघे विश्वच सद्गुरु श्री माउलींभोवती फिरते. भगवान श्रीपंढरीरायांचे अनन्य भक्त असणारे श्रीसंत सेना न्हावी महाराज तर सद्गुरु श्री माउलींच्या गुणवर्णनात पुरेपूर रंगून जातात. श्री माउलींचे माहात्म्य सांगताना त्यांना सर्वस्वाचाच विसर पडतो, काय नि किती सांगू असे होऊन जाते. आता हाच अभंग पाहा त्यांचा, किती गोड बोलत आहेत ते यात.
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं ।
उतरी पैल पारूं ज्ञानदेव ॥१॥
ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ।
तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥२॥
ज्ञानदेव माझे सोयरे धायरे ।
जिवलग निर्धारे ज्ञानदेव ॥३॥
सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान ।
दाविली निजखूण ज्ञानदेवे ॥स.सं.से.१२६.४॥

"सद्गुरु श्री ज्ञानदेव माउली हे माझे गुरु आहेत, तेच माझे भवसागरातून तरून जाण्याचे महान असे तारू, जहाज देखील आहेत. त्यांच्याच साहाय्याने मी हा दुस्तर भवसागर सहजतेने तरून जाणार आहे, गेलो आहे. (या जहाजाचा माझ्यासारखाच तुम्ही देखील आश्रय घ्यावा.)
सद्गुरु श्री ज्ञानदेव माउली हेच माझे खरे माता-पिता आहेत. कारण तेच आजवर सर्वार्थाने, सर्व बाजूंनी आणि सदैव माझा सांभाळ करीत आलेले आहेत. त्यांच्या कृपाप्रसादानेच ही दुर्धर भवव्यथा नष्ट होणार आहे, याची मला पूर्ण खात्री पटलेली आहे. माझे आप्त, माझे सोयरे-धायरे, माझे जिवलग सखे सर्वकाही हे सद्गुरु श्री माउली भगवानच आहेत. मला त्यांच्याशिवाय दुसरा कोणताच आधार नाही ; आणि आता ते असताना दुसऱ्या कोणत्याही आधाराची मला गरजही नाही.
सेना महाराज म्हणतात की, हे सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज माझे सर्वश्रेष्ठ असे निधान आहेत, माझे अपरिमित वैभव आहेत, माझा अनर्घ्य रत्नांचा खजिनाच आहे. कारण त्यांनीच मला कृपापूर्वक 'निजखूण' दाखवून ब्रह्मस्वरूप केलेले आहे. म्हणूनच मी त्यांना पूर्णपणे, अनन्यतेने शरण जाऊन, त्यांच्याच श्रीचरणीं कायमचा लीन होऊन राहिलेलो आहे !"
(सद्गुरु भगवान श्री माउलींच्या काळातील संतांच्या आणि त्यांच्या अलौकिक स्नेहसंबंधांवर प्रकाश टाकणारा तसेच प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी श्री माउलींवर लिहिलेल्या "चैतन्यचक्रवर्ती" या संगीत नाटकाचे रसग्रहण करणारा लेख खालील लिंकवर वाचता येईल.)
वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - ५
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_23.html?m=1

20 Aug 2019

वन्दे आलन्दिवल्लभम् - ४

सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे नाम हे श्रीभगवंतांच्या नामासारखेच पुण्यपावन आहे. 'ज्ञानदेव' या चतुराक्षरी नामाचा मनोभावे जप करणारा परमार्थाचा अधिकारी होतो असे अनेक संतांनी म्हणूनच सांगून ठेवलेले आहे. प्रज्ञाचक्षू ज्ञानेश्वरकन्या श्रीसंत गुलाबराव महाराजांच्या श्रीज्ञानेश्वर मधुराद्वैत संप्रदायात 'ज्ञानेश्वरमाउली' या सप्ताक्षरी नामाचा सदैव जप करतात. वारकरी संप्रदायातही 'महाराज ज्ञानेश्वर माउली' आणि 'ज्ञानोबा तुकाराम' ही नामे महामंत्र असल्यासारखेच मानतात. आजवर होऊन गेलेल्या असंख्य महात्म्यांनी या नामाच्या जपाने ब्रह्मस्थिती मिळवलेली आहे.
श्रीसंत एकनाथ महाराज, श्रीसंत हैबतराव बाबा आरफळकर व श्रीसंत गुलाबराव महाराज या तीन महात्म्यांना प्रत्यक्ष सद्गुरु भगवान श्री माउलींच्या मुखातून त्यांच्याच नामाचा उपदेश लाभलेला होता. श्रीसद्गुरूंकडून स्वनामाचा उपदेश होणे हाच मुळात अत्यंत दुर्मिळ योग मानला जातो. या तिन्ही महापुरुषांना साक्षात् श्री माउलींकडून असा स्वनामाचा उपदेश झाला होता. याचा अर्थ त्यांच्यावर सद्गुरु श्री माउलींचे अात्यंतिक प्रेम होते. केवढे महान भाग्य आहे हे !!
सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पावन नामाचे आणि आळंदी क्षेत्राच्या दर्शनाचे माहात्म्य सांगताना सद्गुरु श्री एकनाथ महाराज म्हणतात,
ज्ञानदेव ज्ञानदेव वदतां वाचे ।
नाहीं कळिकाळाचे भेव जीवां ॥१॥
जातां अलंकापुर गांवीं ।
मोक्ष मुक्ति दावी वाट त्यासी॥२॥
ब्रह्मज्ञान जोडोनी हात ।
म्हणे मी तुमचा अंकित ॥३॥
वाचे वदतां इंद्रायणी ।
यम वंदितो चरणीं ॥४॥
एका जनार्दनीं भावें ।
ज्ञानदेवा आठवावें ॥ए.गा.३५०९.५॥

"ज्ञानदेव ज्ञानदेव असे सतत वाचेने वदणाऱ्या जीवाला कळिकाळाचे कसलेही भय राहात नाही. तो कधीच कोणत्याही भयाने पीडला जात नाही. मनोभावे अलंकापुर क्षेत्री श्री माउलींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाग्यवान जीवाला प्रत्यक्ष मोक्षच वाटाड्या म्हणून लाभतो. अर्थात् त्याचा मोक्षापर्यंतचा सगळा प्रवास सुखावह होतो. श्री माउलींच्या कृपेने ब्रह्मज्ञानच हात जोडून त्याच्या समोर उभे ठाकते. ज्ञान त्याचे कायमचे अंकित होऊन राहते. कृपासलिला इंद्रायणीचे नाम घेतल्याबरोबर महामृत्यू यमच त्याचे चरणी वंदन करतो.  सद्गुरु श्री माउलींच्या प्रकट अस्तित्वामुळे आळंदी देखील अशाप्रकारे मोक्षदायिनी ठरलेली आहे. म्हणूनच, श्रीसंत एकनाथ महाराज कळकळीने विनवतात की, तुम्ही-आम्ही सदैव प्रेमाने, आदराने, मनापासून सद्गुरु श्री ज्ञानदेवांना आठवावे, त्यांचे भजन-पूजन करावे, त्यांचे नामस्मरण करावे ; आणि धन्य होऊन जावे !"
(सद्गुरु भगवान श्री माउलींच्या चरित्रावर प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी रचलेल्या "श्रीज्ञानदेव विजय" या ओवीबद्ध ग्रंथाची माहिती व त्याआधारे श्री माउलींच्या नामाचे माहात्म्य कथन करणारा लेख खालील लिंकवर वाचता येईल.)
वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - ४
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_30.html?m=1

प.प.श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज

आज श्रावण कृष्ण पंचमी, पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची १६५ वी जयंती.
सद्गगुरु श्री.टेंब्ये स्वामी महाराज म्हणजे परिपूर्ण श्रीदत्तप्रभूच. त्यांचे समग्र चरित्र अनन्यतेचा आणि शास्त्रोचित वर्तनाचा वस्तुपाठच आहे. भगवान श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेशिवाय ते कुठलीही छोटीशी देखील गोष्ट करीत नसत. आणि शास्त्राज्ञेसमोर कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. प्रत्यक्ष भगवान श्रीपंढरीनाथांनाही त्यांनी शास्त्राज्ञेचे कारण सांगून विनम्रपणे प्रसाद नाकारला होता. एवढी अढळ निष्ठा होती त्यांची भगवदाज्ञारूप शास्त्रावर !
एरवी अतीव कोमल आणि कनवाळू असे स्वामी महाराज प्रसंगी मोठा रागाचा आविर्भाव आणीत असत. अर्थात् तो समोरच्या व्यक्तीच्या हितासाठीच धारण केलेला असे. त्यांच्या विशुद्ध चित्तात रागद्वेषादी ऊर्मी कधीच नव्हत्या. ते तर लोण्याच्या गोळ्यासारखे मऊसूत होते. आदर्श भगवद्भक्त जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी प.प.श्री.टेंब्ये स्वामींचे चरित्र मनापासून अभ्यासायला हवे.
प.प.श्री.टेंब्येस्वामींची ग्रंथसंपदा हा तोंडात बोट घालावे असाच चमत्कार आहे. जन्म जन्म जातील त्या संपदेचा अभ्यास करायला. इंद्रधनुष्यातील सातही रंग अप्रतिमच असतात, त्यात उणा-अधिक कोणताच नसतो. तसेच प.प.श्री.टेंब्येस्वामींचे सर्व ग्रंथ विलक्षणच आहेत. त्यांचे कृपासामर्थ्य त्या सर्व ग्रंथांमध्ये, त्यांच्या रचनांमध्ये ओतप्रोत भरलेले आहे. म्हणूनच आपण सदैव त्यांचे वाचन-मनन करायला हवे. पुण्याच्या श्रीवामनराज प्रकाशनाने 'प.प.श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अक्षयवाङ्मयमाला' या प्रकल्पाद्वारे श्रीस्वामी महाराजांचे सर्व वाङ्मय देखण्या स्वरूपात पुन:प्रकाशित केले असून, भाविक-वाचकांना ते ३०% सवलतीत उपलब्ध आहे.
आज प.प.श्री.स्वामींच्या जयंती दिनी त्यांच्या श्रीचरणीं दंडवत घालून सर्वांच्या वतीने मनोभावे कृपायाचना करतो. प.प.श्री.स्वामी महाराजांच्या चरित्र व वाङ्मयावर आणि अलौकिक अशा करुणात्रिपदीवर पूर्वी लिहिलेले एकूण तीन लेख खालील लिंकवर वाचता येतील. आजच्या पावन दिनी तेही लेख आपण सर्वांनी आवर्जून वाचून श्रीचरणीं आपला प्रेमभाव विदित करावा ही सप्रेम प्रार्थना !!
अलौकिक वाङ्मयसम्राट प.प.श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_31.html?m=1

19 Aug 2019

वन्दे आलन्दिवल्लभम् - ३

सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली हे साक्षात् भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंचे परिपूर्णतम अवतार आहेत. श्रीभगवंतांनी श्रीगीतेचा उपदेश केला, सद्गुरु श्री माउलींनी त्या गीतेचा श्रीभगवंतांना अभिप्रेत असणारा नेमका अर्थ सांगण्यासाठी श्री भावार्थदीपिका तथा श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली. भगवद् गीता ही जशी श्रीभगवंतांची वाङ्मयी श्रीमूर्ती आहे, तशीच श्री ज्ञानेश्वरी ही सद्गुरु श्री माउलींची वाङ्मयी श्रीमूर्ती आहे. सद्गुरु श्री माउलींसारखीच त्यांची ही शब्दमूर्ती देखील अत्यंत कनवाळू, कृपाळू, प्रेमळ आणि सर्वसामर्थ्यसंपन्न आहे ! म्हणूनच जो या श्री ज्ञानेश्वरीला अनन्य शरण जाऊन राहतो त्याचे कोटकल्याणच होते, असा आजवरच्या असंख्य महात्म्यांचा स्वानुभव आहे.
सद्गुरु श्री माउलींच्या सारखीच कृपावंत असणारी ही श्री ज्ञानेश्वरी माउली देखील लीलया बद्धांचे साधक करते, साधकांचे सिद्ध करते, सिद्धांचे महासिद्ध करते आणि त्यांना अखंड भगवत्स्वरूप करून ठेवते. तिचे हे माहात्म्य जाणून सद्गुरु श्रीसंत एकनाथ महाराज म्हणतात,
भाव धरूनियां वाची ज्ञानेश्वरी ।
कृपा करी हरी तयावरी ॥१॥
स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु ।
श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेसी ॥२॥
तोचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे ।
भय कळिकाळाचें नाही तया ॥३॥
एका जनार्दनीं संशय सांडोनी ।
दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥ए.गा.३५३३.४॥
" 'सद्गुरु श्री माउली हे साक्षात् भगवंत आहेत आणि त्यांची ज्ञानेश्वरी ही माझ्या उद्धारासाठीच निर्माण झालेली त्यांची प्रत्यक्ष श्रीमूर्तीच आहे' ; असा भाव धरून जर एखाद्याने श्री ज्ञानेश्वरीला शरण जाऊन तिची सर्व प्रकारे सेवा करायला सुरुवात केली तर श्रीभगवंत त्या जीवावर कृपा करतातच !!
श्रीगीता हा प्रश्नोत्तररूप संवाद भगवंत आणि अर्जुनामध्ये झाला. तेच भगवंत पुन्हा माउलींच्या अवतारात ज्ञानेश्वरी वदले. म्हणूनच या पावन ग्रंथाचे नाम घेतल्याने, पूजन केल्याने,  वाचन-मनन-चिंतन-लेखन केल्याने व तिची जशी जमेल तशी सेवा केल्याने कळिकाळाचे भयच उरत नाही. यासाठीच सर्व प्रकारचे संशय सांडून, अत्यंत प्रेमादरपूर्वक आणि दृढ भक्तिभावाने सद्गुरु श्री माउलींच्या या वाङ्मयी श्रीमूर्तीला हृदयी दृढ धरावे. त्यातच आपले खरे हित आहे" ; असे सद्गुरु श्री एकनाथ महाराज येथे स्वानुभवपूर्वक कथन करीत आहेत.
(सद्गुरु श्री माउलींच्या करुणाकृपारूप अक्षरब्रह्माचे, श्री ज्ञानेश्वरीचे महत्त्व आणि माहात्म्य श्रीसंत जनाबाईंच्या अभंगाच्या आधारे खालील लिंकवरील लेखात मांडलेले आहे.
वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - ३
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_29.html?m=1

18 Aug 2019

वन्दे आलन्दिवल्लभम् - २

सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली हे त्यांच्या काळातील व नंतरही आजवर झालेल्या यच्चयावत् सर्व महात्म्यांचे अत्यंत लाडके संत आहेत. प्रत्येक संताने आपल्या वाङ्मयातून हृदयीच्या खोपेत माउलींप्रति वसणारा प्रेमभाव यथार्थपणे प्रकट केलेला आहे. या सर्व संतांचे सद्गुरु श्री माउलींबद्दलचे अभंग वाचताना आपलेही अंत:करण नकळत त्यांच्याबद्दलच्या अपरंपार प्रेमाने कधी भरून येऊन ओसंडू लागते ते कळतही नाही. तो प्रेम-पडिभर खरंच अतीव आनंददायी, अतीव सुखदायीच असतो !!
सद्गुरु श्री माउलींच्या विषयी मनी असणारा प्रेमभाव अत्यंत गोड शब्दांत व्यक्त करताना, एक विठ्ठलभक्त साध्वी श्रीसंत भागू महारीण आपल्या अभंगात म्हणतात,
कृपेच्या सागरा । मायबापा ज्ञानेश्वरा ॥१॥
देहेभाव हे सोडून । बा माझे धरा ध्यान ॥२॥
जेणे पाषाण तारिले । मुखें पशु वेद बोले ॥३॥
भिंती चालविली । ऐसी कृपाळू माउली ॥४॥
ऐसा कृपाळू भक्तांचा । मायबाप हा आमुचा ॥५॥
विश्रांतीचा ठाव । भागु म्हणे ज्ञानदेव ॥६॥

"कृपेच्या सागरा, मायबापा ज्ञानेश्वरा ! आपण आपली सहजसमाधि-स्थिती सोडून कृपया एकदा तरी माझे स्मरण करावे. (कारण आपल्या निरुद्ध चित्तात माझ्याविषयी प्रेमभाव निर्माण झाल्याबरोबर आपल्या कृपेचा प्रवाह तात्काळ माझ्यापर्यंत येईल व मी देखील ब्रह्मस्वरूप होईन ; असा या चरणामागचा त्यांचा गूढ भाव आहे.)
आमचे मायबाप श्री माउली कसे आहेत ? अहो, त्यांच्या कृपेने पाषाणासम असणारे असंख्य जीव भवसागर तरून गेले, अजूनही जात आहेत. त्यांच्या कृपेने रेडा वेदवाणी वदला. त्यांनी नुसता जीवांचाच उद्धार नाही केला, तर प्रत्यक्ष जड, अचेतन भिंतही चालवली. अशी आमची कृपाळू मायमाउली आपल्या भक्तांचाही सदैव सांभाळ करते, त्यांचे मनोरथ पुरते-सरते करते. म्हणूनच, अतीव कृपाळू, कनवाळू असे हे सद्गुरु श्री ज्ञानराज माउली महाराज माझ्या अखंड विश्रांतीचा ठाव आहेत, माझे मायबाप आहेत, माझे श्रेष्ठ असे आधार आहेत, माझे सर्वस्वच आहेत ; असे प्रेमावेगाने गलबलून आलेल्या मधुर वाणीने श्रीसंत भागू येथे सांगत आहेत.
(सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मतारखेविषयीच्या माहितीचा ऊहापोह करणारा लेख खालील लिंकवर.. )
वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - २
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_28.html?m=1

17 Aug 2019

वन्दे आलन्दिवल्लभम् - १

वन्दे आलन्दिवल्लभम् - १
आजपासून सात दिवसांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. आपले दोन्ही परमाराध्य भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू आणि भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज यांची जयंती हा आपल्यासाठी मोठाच पर्वकाल आहे. या निमित्ताने श्रीगुरुकृपेच्या बळावर आपल्या लाडक्या आराध्यांची यथामती शब्दपूजा बांधण्याचा प्रयत्न आपण आजपासून या लेखमालेद्वारे करू या !
गेल्यावर्षी लिहिलेल्या जन्माष्टमीच्या लेखमालेचे लेख यावर्षी देखील प्रत्येक लेखाखाली दिलेल्या लिंकवर वाचता येतील.  यावेळी विविध संतांनी सद्गुरु श्री माउलींच्या प्रेमाने रचलेले अभंग आपण अभ्यासून श्रीचरणीं भावपुष्पांजली समर्पू या !
सद्गुरु श्री माउलींचे माहात्म्य वर्णिताना त्यांचे पूर्णकृपांकित सत्पुरुष प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे अतिशय मधुर शब्दांत म्हणतात,
सागराची गाज शोभे तयापाशी ।
थेंबुटे आवेशी कोण काजा ॥१॥
बापा ज्ञानेश्वरा तुम्हांपुढे केवी ।
वाचाळी करावी लेकराने ॥२॥
बोबड्या उत्तरे रिझें जरी तात ।
अज्ञानाची मात कवणासी ॥३॥
मी तो अज्ञ पोर अंध पंगु मुके ।
उच्छिष्ट भातुके द्यावे माते ॥४॥
अमृतेसी काही ठावे नाही आन ।
मर्यादेचे मौन भले मानी ॥५॥

"अहो सद्गुरु ज्ञानराज भगवंता ! सागराची गंभीर गाज त्यालाच शोभते. लहानश्या थेंबुट्याने अथांग सागरासमोर काय मिजास मारावी ? तसे बापा ज्ञानराया ! तुमच्या समोर आम्हां सर्वार्थाने लहान असणाऱ्या लेकरांनी काय वाचाळी करावी ? आम्ही कितीही बोललो तरी ते हास्यास्पदच ठरणार आपल्यापुढे.
आपल्या बाळाचे बोबडे बोल ऐकून वत्सल बाप नक्कीच रिझतो, कौतुक करतो. पण ते कौतुक झाले म्हणून त्या बाळाचे अज्ञान आहे ते काही जात नसते. मी तर तुमचे अज्ञ, अंध, पंगू असे अबोध बाळच आहे. मला तुमच्याशिवाय कोणताही आधार नाही. तेव्हा आता आपणच कृपावंत होऊन मला आपल्या कृपेचा उच्छिष्ट प्रसाद द्यावा, मला खूप भूक लागलेली आहे.
श्रीगुरुकृपेने या 'अमृते'ला पुरेपूर जाणीव आहे की, आपल्यासमोर मर्यादेचे मौनच खरोखर योग्य आहे. आम्हां पामरांनी आपल्यासमोर शास्त्रोचित असे मौन बाळगूनच राहिले पाहिजे, त्यातच आमचे खरे हित आहे. आपण आमचा सांभाळ करण्याचे यथायोग्य जाणताच, त्याप्रमाणे सदैव करीतही आहात. त्यामुळे आम्हांला त्यासाठी आपल्याला वेगळी विनवणी करण्याची काहीच गरज नाहीये. म्हणूनच आपल्यासमोर आपल्याच कृपेने लाभलेल्या प्रेमादराच्या स्वाभाविक मर्यादेने आम्ही शरणागत होऊन राहिलेलो आहोत !"
( श्रीसंत नामदेव महाराज व श्री माउलींच्या प्रेमसंबंधांवर प्रकाश टाकणारा लेख खालील लिंकवर.... )
वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - १
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_49.html?m=1

16 Aug 2019

स्वामीसुत स्वामी पायी लोळे

आज श्रावण कृष्ण प्रतिपदा,
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे शिष्योत्तम श्रीसंत स्वामीसुत महाराजांची तसेच श्रीसंत सिद्धारूढ स्वामी महाराजांची पुण्यतिथी !
श्रीसंत स्वामीसुत महाराज म्हणजे अनन्य स्वामीभक्तीचा अलौकिक आविष्कारच ! त्यांचे समग्र चरित्र अद्भुत लीलाकथांनी भरलेले आहे. श्रीगुरुचरणीं अनन्य निष्ठा कशी असावी ? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीस्वामीसुत महाराज ! त्यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या श्रीचरणीं सादर दंडवत !!
श्रीसंत स्वामीसुत महाराजांच्या चरित्र व कार्याचा परिचय करून देणारा लेख खालील लिंकवर आहे. तो आवर्जून वाचावा ही विनंती.
स्वामीसुत स्वामी पायी लोळे
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_27.html?m=1

1 Aug 2019

मीराँ गिरधर प्रेम दिवाँणी

आज श्रावण शुद्ध प्रतिपदा, अनुत्तरभट्टारिका महारासेश्वरी श्रीकृष्णप्रेमस्वरूपा भगवती श्री मीराबाईंची जयंती.
श्री मीराबाई ह्या अलौकिक आणि अद्भुत विभूतिमत्व आहेत. त्यांच्या भक्तिविश्वाची व प्रगल्भ प्रेमभावाची किंचितशी कल्पनाही करणे, आपल्या मानवी बुद्धीच्या कक्षेच्या फार बाहेरचेच आहे. त्यांचे विलक्षण जीवनचरित्र, त्यांचे जगावेगळे बालपण, कर्तव्यपालन म्हणून नि:संगपणे त्यांनी केलेला संसार, कृष्णस्मरणात त्यांनी नि:संकोचपणे प्राशन केलेले विष व त्या विषाचा हरिकृपेने तत्काळ नष्ट झालेला प्रभाव, त्यानंतर सर्वसंग त्याग करून संपूर्ण भारतभर त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेला भक्तिप्रचार आणि त्यांचा अद्वितीय देहत्याग ; सारेच कल्पनातीत आहे ! चमत्कारालाही विस्मय वाटावा असेच आहे.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना एकदा एकाने प्रश्न विचारला, "मामा, श्रीसंत मीराबाईंना पण विष पाजले होते व सॉक्रेटिसलाही विषच पाजले गेले. मग दोघांत फरक काय?" प.पू.मामांनी दिलेले उत्तर अतिशय मार्मिक व पुरेसे बोलके आहे. ते म्हणाले, "अरे, विष पिऊन सॉक्रेटिस मेला, पण मीराबाई जिवंतच राहिल्या !" या एकाच वाक्यात प.पू.मामांनी श्रीसंत मीराबाईंचा अद्भुत अधिकार नेमकेपणाने अधोरेखित केला आहे.
.....यापुढील लेखातील श्रीसंत मीराबाईंच्या जीवनचरित्रावरील अल्पसे चिंतन आणि त्यांच्या अभंगसंपदेवरील तीन अद्भुत ग्रंथांचे रसग्रहण वाचण्यासाठी खालील लिंकवरील लेख अवश्य वाचावा ही विनंती.
मीराँ गिरधर प्रेम दिवाँणी
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_12.html?m=1