18 Aug 2019

वन्दे आलन्दिवल्लभम् - २

सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली हे त्यांच्या काळातील व नंतरही आजवर झालेल्या यच्चयावत् सर्व महात्म्यांचे अत्यंत लाडके संत आहेत. प्रत्येक संताने आपल्या वाङ्मयातून हृदयीच्या खोपेत माउलींप्रति वसणारा प्रेमभाव यथार्थपणे प्रकट केलेला आहे. या सर्व संतांचे सद्गुरु श्री माउलींबद्दलचे अभंग वाचताना आपलेही अंत:करण नकळत त्यांच्याबद्दलच्या अपरंपार प्रेमाने कधी भरून येऊन ओसंडू लागते ते कळतही नाही. तो प्रेम-पडिभर खरंच अतीव आनंददायी, अतीव सुखदायीच असतो !!
सद्गुरु श्री माउलींच्या विषयी मनी असणारा प्रेमभाव अत्यंत गोड शब्दांत व्यक्त करताना, एक विठ्ठलभक्त साध्वी श्रीसंत भागू महारीण आपल्या अभंगात म्हणतात,
कृपेच्या सागरा । मायबापा ज्ञानेश्वरा ॥१॥
देहेभाव हे सोडून । बा माझे धरा ध्यान ॥२॥
जेणे पाषाण तारिले । मुखें पशु वेद बोले ॥३॥
भिंती चालविली । ऐसी कृपाळू माउली ॥४॥
ऐसा कृपाळू भक्तांचा । मायबाप हा आमुचा ॥५॥
विश्रांतीचा ठाव । भागु म्हणे ज्ञानदेव ॥६॥

"कृपेच्या सागरा, मायबापा ज्ञानेश्वरा ! आपण आपली सहजसमाधि-स्थिती सोडून कृपया एकदा तरी माझे स्मरण करावे. (कारण आपल्या निरुद्ध चित्तात माझ्याविषयी प्रेमभाव निर्माण झाल्याबरोबर आपल्या कृपेचा प्रवाह तात्काळ माझ्यापर्यंत येईल व मी देखील ब्रह्मस्वरूप होईन ; असा या चरणामागचा त्यांचा गूढ भाव आहे.)
आमचे मायबाप श्री माउली कसे आहेत ? अहो, त्यांच्या कृपेने पाषाणासम असणारे असंख्य जीव भवसागर तरून गेले, अजूनही जात आहेत. त्यांच्या कृपेने रेडा वेदवाणी वदला. त्यांनी नुसता जीवांचाच उद्धार नाही केला, तर प्रत्यक्ष जड, अचेतन भिंतही चालवली. अशी आमची कृपाळू मायमाउली आपल्या भक्तांचाही सदैव सांभाळ करते, त्यांचे मनोरथ पुरते-सरते करते. म्हणूनच, अतीव कृपाळू, कनवाळू असे हे सद्गुरु श्री ज्ञानराज माउली महाराज माझ्या अखंड विश्रांतीचा ठाव आहेत, माझे मायबाप आहेत, माझे श्रेष्ठ असे आधार आहेत, माझे सर्वस्वच आहेत ; असे प्रेमावेगाने गलबलून आलेल्या मधुर वाणीने श्रीसंत भागू येथे सांगत आहेत.
(सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मतारखेविषयीच्या माहितीचा ऊहापोह करणारा लेख खालील लिंकवर.. )
वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - २
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_28.html?m=1

0 comments:

Post a Comment