20 Apr 2019

चैत्र पौर्णिमा !


बलभीम अंजनीसुत पवनतनय श्रीरामदूत भक्तराज श्रीमारुतिरायांची आज जयंती !
बुधकौशिक ऋषी आपल्या अतिशय प्रभावी अशा श्रीरामरक्षा स्तोत्रात श्रीरामदूत मारुतिरायांची स्तुती करताना म्हणतात,
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥
"मनाप्रमाणे सर्वत्र अनिर्बंध गती असणा-या, वायूप्रमाणे अतीव वेगवान, आपल्या सर्व इंद्रियांवर पूर्ण ताबा मिळवलेल्या, जगातील सर्व बुद्धिमानांमध्येही श्रेष्ठ, पराक्रमी वानरांच्या सैन्याचे प्रमुख असणा-या, श्रीरामरायांचे सुयोग्य दूत वायुसुत श्रीमारुतिरायांच्या चरणीं मी सर्वभावे शरण आहे !"
बुधकौशिकांनी येथे अत्यल्प शब्दांत भगवान श्री हनुमंतांची सर्व लक्षणे स्पष्ट सांगितलेली आहेत. खरोखरीच, श्रीमारुतिराय हे सर्वश्रेष्ठ दासोत्तम आहेत ! आज त्यांचा जयंती दिनी आपण सर्वांनी त्यांच्या पुण्यपावन श्रीचरणीं नतमस्तक होऊ या !
भगवान श्रीरामरायांनी आपल्या मागे आपल्या दासांची, हरिभक्तांची काळजी वाहण्याचे अतिशय जबाबदारीचे कार्य आपल्या या सर्वश्रेष्ठ चिरंजीव दासाला प्रेमादरपूर्वक व खात्रीने बहाल केलेले आहे. श्रीरामरायांच्या विश्वासाला किंचितही तडा जाऊ न देता, श्रीरामदूत देखील ते भगवत्प्रदत्त सेवाकार्य नामरंगी रंगून जाऊन आजही तितक्याच निष्ठेने व प्रेमाने करीत आहेत. त्यांच्या आपल्यावरील ह्या एवढ्या मोठ्या उपकाराची आपण भक्त कधी परतफेड करूच शकत नाही. कारण त्यांच्या कृपाऋणात राहण्यातच आपले सर्वथा हित आहे. म्हणूनच, आजच्या त्यांच्या जयंतीच्या पुण्यदिनी, भक्तराजोत्तम भगवान श्रीमारुतिरायांची आपण रामनाम गात मनापासून करुणा भाकू या आणि दासोत्तम म्हणून त्यांच्याच सद्गुणांचे सदैव चिंतन करून त्यातले काही प्रमाणात तरी आपल्याही जीवनात प्रयत्नपूर्वक उतरवू या !!
दासोत्तम-शिखामणी भगवान श्रीमारुतिरायांच्या अशाच काही सद्गुणरत्नांचे अल्पसे चिंतन पुढील लिंकवरील लेखात आहे, ते चिंतन-मननासाठी आपल्यासमोर सादर करीत आहे.
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
https://rohanupalekar.blogspot.com/2018/03/blog-post_31.html?m=1

15 Apr 2019

श्रीनृसिंह द्वादशीचे वास्तव



काही दिवसांपूर्वी श्रीनृसिंह द्वादशीच्या संदर्भाने मी एक प्रामाणिक खुलासा पोस्ट केला होता. त्यामुळे अनेकांच्या शेपट्यांवर पाय पडल्याने बरेच लोक चवताळून उठले. साहजिकच आहे, धंदा बुडतोय म्हटल्यावर राग तर येणारच ना !!
तो खुलासा वाचून आमचे एक सन्मित्र श्री.शिरीष मधुकर कुलकर्णी चांगलेच संतापले की हो. (मी काही त्यांना प्रत्यक्ष ओळखत नाही, पण ते स्वत: श्रीनृसिंहभक्त आहेत म्हणतात, म्हणून सन्मित्र म्हटले आहे एवढेच.) नुसते संतापले नाहीत, तर धडधडीत पुरावेच दिले त्यांनी. आता मलाही त्यावर काही बोलणे भाग आहे, म्हणून त्या तथाकथित पुराव्यांचाच जरा शास्त्रशुद्ध समाचार घ्यावा असे ठरवले.
पहिला पुरावा ते प्रसाद मासिकाच्या १९८३ सालच्या नृसिंह विशेषांकाचा देतात. या अंकातील रानडे यांच्या लेखात व म.स.घोलपांच्या लेखात द्वादशीच्या व्रताचा उल्लेख आहे. मीही ते दोन्ही संदर्भ पाहिलेले आहेत. त्या ठिकाणी कुठेही मूळ ग्रंथांचा काहीही संदर्भ दिलेला नाही. तसेच तोच संदर्भ फारसा फेरफार न करता नोंदवणारे नंदीबुवा-आंबुलगे, बोठे, पितळे यांनीही कुठेच नृसिंह द्वादशीचा उल्लेख असणा-या मूळ ग्रंथाचा संदर्भ दिलेला नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
रूढी म्हणून अनेक घराण्यांमध्ये परंपरेने नृसिंह द्वादशी साजरी होतही असेल व ते चूक आहे हे मीही म्हटलेले नाही. पण आज ज्या संदर्भाने ती सार्वजनिकरित्या साजरी करण्याचा खटाटोप केला जातोय, तो मात्र नि:संशय व्यावसायिक लाभ डोळ्यांसमोर ठेवूनच केला जातोय, हे एखादा शेंबडा लहान पोरगाही सांगू शकेल. कुलकर्णी यांनी उल्लेख केलेल्या कोणाही लेखकांनी, "नृसिंह द्वादशीला श्रीनृसिंह मंदिरात हरभरा डाळ-गूळ अर्पण करावी म्हणजे अलाणा फलाणा दोषांचा परिहार होतो, शनिचा दोष जातो वगैरे लिहिलेले नाही. घोलप एवढेच म्हणतात की, नृसिंह द्वादशीला भगवंतांच्या प्रतिमेची पूजा करावी म्हणजे ब्रह्मप्राप्ती होते.
आपापल्या घरात नृसिंह पूजा करायला कोणाचीच कधीही हरकत नसावी, माझीही काहीच नाहीये. पण त्याचे हे बाजारू रूप नक्कीच चुकीचे व फसवे आहे, यात तिळमात्र शंका नाही. म्हणून मी त्याचा आजही पुन्हा पुन्हा तीव्र निषेधच करतो आहे.
श्री.कुलकर्णी स्वत: कोणत्याही ग्रंथाचे एकही पान उघडून न पाहता छातीठोकपणे एक विधान करतात की, अर्थात या सर्वांनी नृसिंह पुराण, नृसिंह उपनिषद, नृसिंह तापनीय या पौराणिक ग्रंथांमधूनच हे संदर्भ मिळविले हे उघड आहे.
हे विधानच पूर्णपणे चूक आहे. मुळात नृसिंह उपनिषद नावाचे उपनिषद अस्तित्वातच नाही. नृसिंह पूर्वतापनीय व नृसिंह उत्तरतापनीय अशी दोन उपनिषदे आहेत. याशिवाय नृसिंह षट्चक्रोपनिषद नावाचेही एक उपनिषद आहे. या तिन्ही उपनिषदांमधून भगवान श्रीनृसिंहांच्या पूर्णब्रह्म स्वरूपाचा उत्तम ऊहापोह केलेला असून, श्रीनृसिंह मंत्रराजाच्या पदांचा समग्र अभ्यास मांडलेला आहे. ही पूर्णपणे तात्त्विक स्वरूपाची उपनिषदे असून यात एका शब्दानेही लौकिक उपासना किंवा व्रतांचा साधा उल्लेखही नाही. त्यामुळे यात नृसिंह द्वादशीचा संदर्भही नाही हे वेगळे सांगायला नको.
श्रीनृसिंह पुराण हे अडुसष्ट अध्यायांचे एक उपपुराण असून, यातही नृसिंह द्वादशी व्रताचा कुठेही उल्लेख नाही. मी आधीचा खुलासा करण्यापूर्वीच एकदा नृसिंहपुराण पाहिलेले होते व कुलकर्णींची पोस्ट वाचल्यावर पुन्हा नीट पाहिले. त्यात मलातरी कुठेही नृसिंह द्वादशीचा एका ओळीतही संदर्भ सापडला नाही. कुलकर्णींनी स्वत: कष्ट घेऊन हे कोणतेही संदर्भ पाहिलेले नाहीत, हे मलाही माहीत होतेच. तरीही केवळ परत एकदा खात्री करावी म्हणून मी पुन्हा तपासले.
श्रीनरहरीरायांच्या कृपेने मला उलट एक फारच महत्त्वाचा संदर्भ सापडला.
कुलकर्णी मला 'व्यासांचा अाधुनिक अवतार' असे हिणवून म्हणतात की, "याउलट रोहन उपळेकर यांनी जे फाल्गुन शुद्ध एकादशीचे व्रत सांगितले आहे त्या व्रताचा संदर्भ मला अद्याप सापडलेला नाही. मात्र मला सापडला नाही म्हणून तो नाहीच असं रोखठोक म्हणायला मी रोहन उपळेकर यांच्यासारखा व्यासांचा आधुनिक अवतार नाही." कुलकर्णींच्या दुर्दैवाने आणि भगवान श्रीनरहरीरायांच्या कृपेने मला ब्रह्मपुराणात शुक्ल द्वादशीचाच स्पष्ट संदर्भ सापडला !
शिवाय डॉ.गौरव देशपांडे यांच्या सूर्यसिद्धांतावर आधारलेल्या पंचांगात फाल्गुन शुद्ध  एकादशी व द्वादशीचे एक व्रत नोंदवलेले आहे. फाल्गुन शुद्ध एकादशीला श्रीनृसिंहांच्या सुवर्णाच्या नृसिंहमूर्तीची साग्रसंगीत पूजा करावी व द्वादशीला ती मूर्ती ब्राह्मणाला दान द्यावी, असे या व्रताचे विधान आहे.
ब्रह्म पुराणाच्या ५८ व्या अध्यायात श्रीनरसिंह माहात्म्य सविस्तर वर्णिलेले आहे. त्यातील २२व्या श्लोकात स्पष्ट म्हटले आहे की, "(प्रत्येक) शुक्ल द्वादशीला साधकाने निराहार राहून स्वत: स्थापन केलेल्या किंवा सिद्धस्थानातील भगवान नृसिंहांच्या मूर्तीची पूजा करून वीस लक्ष जप करावा." पुढेही त्यात पूजेच्या ब-याच उपचारांबद्दल लिहिलेले आहे. शुद्ध पक्षातील द्वादशी ही नृसिंह उपासनेची विशेष तिथी आहे, हे यावरून स्पष्ट होते. 
न्यायमूर्ती रानडे, य.गो.जोशी, म.स.घोलप व प्र.रा.अहिरराव या विद्वानांबद्दल माझ्या मनात नि:संशय प्रेमादरच आहे व मी कुठेही यांच्या विद्वत्तेला कधीच आव्हान दिलेले नाही की मी त्यांच्याहून अधिक विद्वान आहे, असे म्हटलेलेही नाही. पण तरीही अभ्यासांती हे स्पष्ट सांगू इच्छितो की, यांनी कोणीही नृसिंह द्वादशीच्या व्रताचा एकही प्राचीन ग्रंथोक्त संदर्भ दिलेला नाही. या सर्वांनी श्रीनृसिंह द्वादशीच्या व्रताचा काही ठिकाणी रूढीने चालत आलेलाच संदर्भ नोंदवलेला असावा. कारण या व्रताचे विधानच कुठेही उपलब्ध नाही. म्हणूनच यांपैकी कोणीही आपापल्या लेखात त्याबद्दल काहीच बोललेले नाहीत. त्यामुळे आज जे हरभरा डाळ व गूळ घेऊन श्रीनरहरीरायांच्या दारी भीक मागायला जायचे तद्दन व्यावसायिक व्रत निर्माण केले गेले आहे, ते पूर्णत: अशास्त्रीय व संदर्भहीनच आहे, हे वारंवार सांगू इच्छितो आहे. आजमितीला नव्याने प्रचलित केले जाणारे नृसिंह द्वादशीचे व्रत हे कुडमुडे ज्योतिषी, मंदिराचे पुजारी व इतर व्यावसायिक अशाच कोणाच्यातरी, फायद्यासाठी सतत कल्पना लढवणा-या सुपीक डोक्यातून आलेलाच काहीतरी स्वार्थी प्रकार असून, याला कसलाही शास्त्रीय आधार नाहीये.
भगवान श्रीनृसिंहांची पूजा करण्यासाठी किंवा उपासना करण्यासाठी फाल्गुनातली द्वादशीच कशाला हवी? ती तर रोजही करता येईलच की. उलट रोज केलीच पाहिजे उपासना. अशी वर्षातून केवळ एक दिवस लाच देऊन तुमचे पूर्ण वर्ष उत्तम घालवायला देव काय वेडेबिडे वाटले की काय? असली लांडीलबाडी परमार्थात चालत नसते. श्री गाडगेबाबा कीर्तनात म्हणत की, "देवापुढे नारळ फोडून त्यातला नखाएवढा खोब-याचा तुकडा समोर ठेवून आम्ही आमची चिंगी, पिंगी, मंगी, आमचा चिनू, मनू, सोनू, बंड्या, खंड्या वगैरेंची आख्खी पलटण सुखी ठेव म्हणतो. अहो त्या देवाचा स्क्रू काय ढिला आहे का तसे करायला ?" तेच येथे आठवले मला. आणि जगात कधीच कुठेही अल्प कष्टांत प्रचंड लाभही मिळत नसतात हे पक्के लक्षात ठेवायला हवे. जो सतत उपासना करतो, प्रेमाने व मनापासून सेवा करतो, त्याचेच परमात्मा सुयोग्य रक्षण करीत असतो. पावसाळ्यात उगवणा-या भूछत्रांप्रमाणे कधीतरीच केलेल्या एखाद्या दिवसाच्या अत्यल्प उपासनेने परमात्मा का बरे आपल्याकडे लक्ष देईल? त्यामुळे अशा भंपक गोष्टींपासून सर्वांनी कायमच चार हात दूर राहावे हेच उत्तम.
कुलकर्णी म्हणतात की, श्रीसंत गोंदवलेकर महाराज हे व्रत करीत असत. पण मला तसाही संदर्भ त्यांच्या चरित्रात कुठेच सापडला नाही. कुलकर्णींनी तो कोठून मिळवला हे तेच जाणोत. त्यांच्यापाशी विश्वासार्ह संदर्भ असेल तर त्यांनी तो द्यावा, नुसत्या ढगात गोळ्या मारून काय उपयोग ?
"राहता राहिला प्रश्न गूळ व हरभरा डाळ यांचा........" असे म्हणत कुलकर्णींनी मस्त विनोदीच मते मांडलेली आहेत. नृसिंह उपासनेत पुरणावरणाचाच नैवेद्य असतो, असे ते म्हणतात. आमच्याही घराण्यात नृसिंह जयंतीच्या दुस-या दिवशी, पारण्याला पुरणावरणाचाच नैवेद्य असतो. आमचे कुलदैवत असलेल्या नीरा-नृसिंहपूर स्थानी तर देवांना दररोज अकरा पुरणपोळ्यांचाच महानैवेद्य असतो. पण याचा अर्थ ते नृसिंह उपासनेचे अंग आहे, असा करणे हे विनोदीच मत झाले ना ! अहो, महाराष्ट्रात होळी पासून ते बैलपोळ्यापर्यंत सर्वच सणांना पुरणपोळीच करायची पद्धत आहे. ते तुम्हां-आम्हां मराठी माणसांच्या जिभेचे चोचले आहेत, त्यांचा त्या त्या सणांच्या दैवतांशी काय संबंध ? हाच नियम वापरायचा तर मग उद्या बैलपोळ्यालाचा सुद्धा संबंध जोडता येईल तुम्हांला भगवान नृसिंहांशी, पुरणपोळीच्याच संदर्भाने. काहीही वाटेल ते बोलायचे का??
श्रीनृसिंह उपासना तर संपूर्ण भारतात होते, पण महाराष्ट्र व त्या जवळचा काही भाग सोडता, इतर कुठेच पुरणावरणाचा नैवेद्य दाखवायची पद्धत नाही. गुजराथेत तर तुरीच्या डाळीचेही पुरण करतात. म्हणजे हे पुरणवरण फक्त आपल्या प्रांतात चालते. यावरून स्पष्ट कळते की ही देखील पडलेली एक रूढीच आहे, त्याचा प्रत्यक्ष श्रीनृसिंह उपासनेशी काहीही संबंध नाही.
तरीही शिरीष कुलकर्णींच्या या विनोदी मताचा आदर करीत मी नृसिंहपुराणात काही संदर्भ सापडतात का पाहिले. पण तिथेही त्यांचे दुर्दैवच सोबत होते, त्यामुळे हरभरा डाळीचा कणही सापडला नाही. श्रीनृसिंह पुराणाच्या चौतिसाव्या अध्यायात मार्कंडेय ऋषी व सहस्रनीक राजा यांच्या संवादाच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध श्रीनृसिंह पूजनाचे सविस्तर वर्णन आलेले आहे. त्यातील २९ ते ३१ या तीन श्लोकांमध्ये नैवेद्य म्हणून तूप-साखरयुक्त उत्तम साळीच्या तांदळाचा भात व सातूच्या पीठाची लापशी किंवा खीर यांचाच उल्लेख आलेला आहे. या नैवेद्याने देव संतुष्ट होऊन त्याचे काय फळ देतात, तेही तिथेच लिहिलेले आहे. इथेही नृसिंहपुराणकार पुरणाचा, हरभ-याच्या डाळीचा किंवा गुळाचा साधा उल्लेखही करीत नाहीत, हे नीट लक्षात घ्यावे. जर ह्या गोष्टीच भगवंतांना आवडत असत्या, तर पुराणात त्यांचा उल्लेख आलाच असता ना ! शिरीष कुलकर्णींनी कसा काय पुरणाचा उल्लेख केलाय हे माहीत नाही. त्याशिवाय असे निराधार मत त्यांनी एवढे छातीठोकपणे कसे काय मांडले बुवा ?? किंवा खाल्लेल्या पुरणाने वाताची बाधा झाली असावी त्यांना, म्हणूनच पुरणाचे रटाळ पुराण लावले त्यांनी एवढे. श्रीभगवंत तर भाव पाहतात भक्ताचा. ते तेवढ्याच एकमेव दुर्मिळ गोष्टीचे भुकेले आहेत. पुरणावरणाची त्यांच्यासमोर काय मातब्बरी हो? ते तर परमप्रेमाने अर्पिलेल्या साध्या वाळक्या पानाफुलानेही संतुष्ट होतात. स्वत: गीतेत त्यांनीच स्वमुखाने तसे सांगितले आहे. पण हे प्रेमच अतिशय दुर्मिळ असते व असल्या स्वार्थाने बरबटलेल्या दीड दमडीच्या नवीन व्रतात काय तसले विशुद्ध प्रेम येणार? हरभरा डाळ व गुळाची लाच देऊन भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान नरहरीरायांना फसवायला जाणा-या या आधुनिक भिका-यांकडे ते ढुंकूनही पाहणार नाहीत.
मी पूर्वी एक कथा वाचली होती. एका गुरूंनी आपल्या एका शिष्याला एक जादुई आरसा दिला. त्यात ज्या कोणाचा चेहरा पाहील त्याचे अवगुण स्पष्ट दिसत असत. त्या बहिर्मुख शिष्याला त्यामुळे नवीनच छंद लागला. तो ज्याचा त्याचा चेहरा त्या आरशात पाहून लोकांचे अवगुण शोधत बसू लागला. त्याची मजल शेवटी आपल्या गुरूंपर्यंत गेली. तो त्यांचाच चेहरा त्या आरशात पाहायला गेला. शेवटी ते गुरु त्याला रागावून म्हणाले, "अरे गाढवा, मी तुला तुझे अवगुण पाहून त्यात दुरुस्ती करता यावी, तू सुधारावास म्हणून तो आरसा तुला दिला होता. तू ते समजून न घेता फालतूपणाच करत बसलास !" त्या शिष्यात व कुलकर्णींमध्ये काहीच भेद नाही. शिरीष मधुकर कुलकर्णी यांनी देखील मला किंवा इतर कोणालाही आरसा दाखवण्यापूर्वी, आपलेच श्रीमुख त्यात एकदा जरी पाहिले असते, तरी अशी हसे होण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. स्वत: चार ग्रंथ पाहून, अभ्यास करून जर ते व्यक्त झाले असते तर फार बरे पडले असते. शिवाय नृसिंहद्वादशीच्या सध्या प्रचलित होऊ पाहत असलेल्या भंपकपणाने भरलेल्या व्रताचा मी का विरोध करतोय, त्यामागची माझी शुद्ध व निरपेक्ष तळमळ काय आहे ; हेही त्यांनी नीट पाहायचा, समजून घ्यायचा अल्पसा जरी प्रयत्न केला असता, तरी ते उपयुक्त ठरले असते. माझ्या लाडक्या भगवान श्रीनृसिंहांची कोणी मनापासून उपासना करीत असेल, भक्ती करीत असेल तर त्याचा मला सर्वात जास्त आनंद आहे. पण म्हणून आमच्या या लाडक्या दैवताच्या नावाने कोणी उपटसुंभ नवीन धंदा काढत असेल, काहीतरी खोटेनाटे व्रत तयार करून लोकांची दिशाभूल करून, फसवणूक करून आपला स्वार्थ साधत असेल ; तर त्याचा आम्ही प्राणपणाने विरोध करणारच ! भक्त म्हणून ते आमचे कर्तव्यच आहे. पण दुर्दैवाने तेवढी पोच श्री.कुलकर्णींच्या ठायी नसल्याने, त्यांना माझी ती प्रामाणिक तळमळ समजलीच नाही. मत्सराच्या भावनेने अंध झाले की असेच होते.
शिवाय भगवद् गीतेत श्रीभगवंतांनी स्वत:च सांगून ठेवलेले आहे की, क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम: । क्रोधाने सारासारविवेक नष्ट होतो व विवेक नष्ट झाला की स्मृतीही लोप पावते. स्मृती लोपली की बुद्धीही नष्ट होऊन सर्वनाश ओढवतो. श्री.शिरीष कुलकर्णी यांनी आधीच आपला अनाठायी क्रोध आवरला असता, तर विवेकाने विचार केल्यामुळे त्यांना वास्तवाचे भान राहिले असते आणि अशी निरर्थक व बिनबुडाची मुक्ताफळे त्यांनी उधळलीच नसती. पण तेवढी कृपा काही श्रीनरहरीरायांनी त्यांच्यावर आत्ता केलेली दिसत नाही. असो आपण better luck next time म्हणू या त्यांना.
श्रीनरहरीरायांनीच माझ्याकडून करून घेतलेल्या अल्पस्वल्प अभ्यासांती ज्ञात झालेल्या संदर्भांच्या आधारे, नृसिंह द्वादशीच्या नवीन रूढ होऊ पाहात असलेल्या या खोट्या व्रताचा खुलासा करून कोणा व्यक्तीचा किंवा कुलपरंपरेचा मी कसलाही अधिक्षेप केला आहे, असे मला अजिबात वाटत नाही. उलट असल्या तद्दन खोट्या व्यावसायिक भंपकपणाची भलावण करून, श्री.शिरीष कुलकर्णींनीच साक्षात् भगवान श्रीनरहरीयांच्या विशुद्ध भक्तीचा अपमान केला आहे. देव त्यासाठी त्यांना क्षमा करोत !
कोणाच्याही श्रद्धेशी असा खेळ करणे हे अतिशय भयानक पाप आहे आणि त्याचे प्रचंड वाईट फळ भोगावेच लागते. आजवर कोणीही या पापातून सुटलेले नाहीत. त्यामुळे कलियुगाचा प्रभाव म्हणून असे कितीही भंपक प्रकार जरी लोकांमध्ये प्रचलित झाले, तरी एक ना एक दिवस त्यांचे बिंग फुटतेच. तीच गत या श्रीनृसिंहद्वादशीच्या नवीन व्रताचीही होणारच आहे. तरीही सुज्ञांची व भाविकांची फसवणूक होऊ नये, म्हणूनच केवळ मी या प्रकाराचा हिरिरीने विरोध करीत आहे ; व शिरीष कुलकर्णींसारख्या कोणीही माझ्यावर कितीही अश्लाघ्य टीका केली, तरीही माझे प्रामाणिक प्रयत्न मी सोडणार नाहीये. भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीनरहरीराय माझ्याच बाजूने आहेत व पुढेही असतीलच याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणूनच तर, अनेक सद्भक्तांना माझा खुलासा योग्य वाटला व माझे त्याबद्दलचे मतही मनापासून पटले. ते नवीन व्रत हा खोटेपणाच आहे, शेवटी कधीतरी उघडा पडणारच ना तो !
खरोखर कोणी असे श्री.शिरीष कुलकर्णी अस्तित्वात आहेत की कोणीतरी दुसराच त्यांच्या डमी नावाने हे लिहिले आहे, हेही मला माहीत नाही. तरीपण मी श्री.शिरीष कुलकर्णींना मनापासून धन्यवाद देतो. कारण त्यांच्या वायफळ बडबडीच्या निमित्ताने माझे भगवान श्रीनृसिंहांच्या संदर्भाने पुन्हा एकदा वाचन-मनन झाले. त्याचे श्रेय सर्वस्वी त्यांनाच आहे.
मला खरोखर वाद घालत बसायची इच्छा नाही, वेळही नाही व त्यात आनंदही नाही. पण एखादी भंपक गोष्ट अशी प्रचलित केलेली मला बघवतही नाही. भगवान श्रीनरहरीरायांच्या शुद्ध उपासनेचे जे स्वरूप आहे, ते पूर्वीच्या ज्ञानी ऋषिमुनींनी व संतांनी जसे घालून दिले आहे, तसेच करण्यात आपले खरे हित आहे. अशा कोणत्याही तथाकथित व्रतांचा, उपासनांचा चुकूनही अंगीकर करू नये. कारण अशा सर्व गोष्टी पूर्णपणे स्वार्थातूनच तयार केलेल्या असतात, त्यामुळे त्यांचे फळही मानसिक व अत्यल्पच मिळते. ख-या पुण्यलाभापेक्षा मनस्तापच होण्याचा जास्त धोका त्यात असतो. मनापासून व प्रेमाने घरी बसूनही आपण उपासना करून श्रीनरहरीरायांची कृपा संपादन करू शकतो व तेच आजच्या फसवणुकीने भरलेल्या कलियुगात अधिक श्रेयस्कर ठरणारे आहे, इतकेच मला म्हणायचे आहे. ज्याने त्याने आपापला विचार करून निर्णय घ्यावा. प्रल्हादवरदे जय जय नरहरी शामराज ।
- रोहन विजय उपळेकर. 
( © - 8888904481)

॥ ऐक तू येवढे चंदन पाखरा ॥


आज भाद्रपद शुद्ध द्वादशी, श्रीवामनद्वादशी ! भगवान श्रीमहाविष्णूंचे पाचवे अवतार भगवान श्रीवामनांची जयंती ! भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचा नातू बळीराजासाठी श्रीभगवंतांनी हा अवतार धारण केला. श्रीमद् भागवतामध्ये या अवताराची कथा विस्तृत वर्णिलेली आहे. भगवंतांचे भक्तवात्सल्य आणि भक्ताची अलौकिक अनन्यता, यांचा सुरेख प्रत्यय म्हणजे श्रीवामनावतार.
आजच्याच पावन तिथीला भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचे निस्सीम भक्त व थोर अवतारी सत्पुरुष प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराजांनी १९१५ साली पुणे मुक्कामी देहत्याग केला. आज त्यांची १०१ वी पुण्यतिथी आहे.
स्वत:ला भगवान " श्रीमाउलींची कन्या " म्हणवून घेणारी ही " पंचलतिका " गोपी अत्यंत अलौकिकच आहे. त्यांनी अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात केलेले कार्य हा अद्भुत चमत्कारच आहे. त्यांनी एवढ्या थोड्या काळात १३२ ग्रंथ रचलेले आहेत, विश्वास बसणार नाही आपला हे वाचून. श्रीगुलाबराव महाराजांनी स्वत: "श्रीज्ञानेश्वर मधुराद्वैत दर्शन " या स्वतंत्र तात्त्विक दर्शनशास्त्राची निर्मिती केलेली आहे. ते चालता बोलता चमत्कारच होते, यात शंका नाही.
आज श्रीगुलाबराव महाराजांच्या पावन पुण्यतिथी दिनी, प्रसाद मासिकात गेल्या वर्षी प्रकाशित झालेले, त्यांच्या एका भावपूर्ण अभंगावरील चिंतन सादर करीत आहे.
       ** ** ** ** ** ** ** **
माहेर !!
प्रत्येक स्त्रीची अत्यंत जिव्हाळ्याची ठेव असते. माहेर म्हणजे मायेची उबदार कूस, पित्याचा प्रेममय आश्वासक स्पर्श, सख्या-सुहृदांचा आधाराचा हात आणि बरेच काही... हृदयाच्या अगदी आतल्या गाभ्यात नित्य-सुगंधित कुपीत जपलेल्या, वेध लावणाऱ्या मनोहर आठवणी म्हणजे माहेर. प्रेमाचा खळाळता झरा म्हणजे माहेर. मुळात स्त्री ही भगवंतांची ममतामूर्ती ; तिचे ममत्व जिथे प्रकर्षाने जडलेले असते ते म्हणजे माहेर. अशा माहेरची नुसती सय जरी आली तरी, वैशाख वणव्याने होरपळलेल्या झाडावर श्रावणमेघाने मनसोक्त वर्षाव करावा तशीच काहीशी स्थिती स्त्रीची होऊन जाते. सासुरवासाचा शीण, घालून पाडून बोललेल्या टोमण्यांचा कड जिथे निःशेष नाहीसा होतो, ते विश्रांतीचे, आधाराचे स्थान म्हणजे माहेर !!
माहेर शब्दातला ' मा ' हा 'माय' या जिव्हाळ्याचा नात्याचा द्योतक आहे. जिथे आपले मायबाप राहतात ते माहेर. लौकिक जगातली ही पद्धत संतांनी आपल्या आध्यात्मिक जगतातही वापरलेली दिसून येते. श्रीपंढरीनाथ भगवंत हे संतांचे माय-बाप; म्हणून मग पंढरी हे संतांचे माहेर. " जाईन  गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥ " अशी प्रेमभावना भगवान श्रीमाउली पण व्यक्त करतात ." माझे माहेर पंढरी । " हा संत एकनाथांचा अभंग तर सुप्रसिद्धच आहे. समर्थ रामदास स्वामी महाराजही म्हणतात की, " प्रवृत्ति सासुर निवृत्ती माहेर । तेथे निरंतर मन माझे ॥" अशा या अविनाशी माहेराची सर्व संतांना कायमच ओढ लागून राहिलेली असते.
अर्वाचीन काळातील एक फार थोर अवतारी सत्पुरुष, प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज म्हणजे चालता-बोलता चमत्कारच होते. अवघ्या चौतीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केलेली ग्रंथनिर्मिती आणि जगदुद्धाराचे कार्य इतके भव्य-दिव्य आहे की आश्चर्यालाही आश्चर्य वाटेल. भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींना आपले पिता मानून ही " ज्ञानेश्वरकन्या " त्यांच्या श्रीचरणांचे निरंतर अनुगमन करीत राहिली. माउलींचे पितृत्व पुरेपुर सार्थ ठरवीत या 'पंचलतिका' नावाच्या कृष्णप्रिया गोपीने स्वतंत्र मधुराद्वैत दर्शनाची स्थापना केली. लौकिक अर्थाने बालपणीच दोन्ही डोळ्यांचे अंधत्व प्राप्त झालेल्या या प्रज्ञाचक्षू महात्म्याची अलौकिक दृष्टी जगाच्याही पल्याडचे सारे बसल्याजागी पाहू शकत होती. किती आणि काय बोलणार? श्रीसंत गुलाबराव महाराज म्हणजे श्रीमाउलीकृपेचा जिवंत साक्षात्कारच होते. आज भाद्रपद शुद्ध द्वादशी, दि. १३ सप्टेंबर रोजी श्रीसंत गुलाबराव महाराजांची १०१ वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्त आपल्या प्रेमळ माहेराचे वर्णन करण्याऱ्या त्यांच्या एका नितांतसुंदर पदाचा सप्रेम आस्वाद घेऊन त्याद्वारे आपण त्यांच्या श्रीचरणीं, त्यांना अत्यंत आवडणा-या ज्ञानेश्वरमाउली या सप्ताक्षरी नामब्रह्माच्या गजरात, प्रेमादरपूर्वक भावसुमनांजली अर्पूया !
स्त्री जरी देहाने सासरी वावरत असली तरी मनाच्या एका कोपऱ्यात तिचे माहेरपण तिने जपलेलेच असते. मनाने ती माहेरी जाऊन क्षेमसमाधान मिळवत असते. या नित्याच्या पण अव्यक्त सुखानुभूतीला शब्दरूप देत मनरूपी पक्ष्याला विनंती करताना श्रीगुलाबराव महाराज म्हणतात;
ऐक तू येवढे चंदन पाखरा ।
निरोप माहेरा नेई माझा ॥१॥
पुण्याहुनी आहे गाव सहा कोस ।
पुसत वाटेस जाय तेथे ॥२॥
लक्षिजे दुरुनी सोन्याचा पिंपळ ।
बैसे अळूमाळ तया मुळी ॥३॥
माझिये मायेस सांगावे एकांती ।
माझी ही विनंती प्रेमभरे ॥४॥
तुझिया कन्येस सासुरवास मोठा ।
येऊ द्यावी पोटा कृपा काही ॥५॥
कितीवेळ तुज माझा ये आठव ।
काही गुप्तभाव पुसे सख्या ॥६॥
केव्हा धाडशी लवकरी मूळ ।
घेऊनी सकळ भाक येई ॥७॥
तुझे पक्षीराजा वंदिते मी पाय ।
ज्ञानेश्वरमाय भेटवावी ॥८॥
पूर्वीच्या काळी संदेशवहनाचे काम पक्षी करीत. त्याच परंपरेला अनुसरून श्रीगुलाबराव महाराज ही ' चंदन पाखरा ' रचना करीत आहेत. या पक्ष्याचे रूपक खरे तर त्यांनी साधकाच्या चित्तावरच रचलेले आहे. श्रीसद्गुरुकृपेने साधना घडल्याने साधकाचे चित्त शुद्ध होत आलेले आहे. त्याला विवेक आणि वैराग्यरूपी दोन बळकट पंख असून त्यांना साधनेने ताकद मिळालेली आहे. त्याआधारे आता तो चिदाकाशात संचार करून परमात्म्याच्या, श्रीसद्गुरूंच्या ठिकाणी जाऊन त्यांचे दर्शन घेऊ शकतो, हे जाणून श्रीमहाराज त्या पक्षीराजाला मोठया प्रेमादराने ' चंदन पाखरा ' असे गौरवून विनंती करीत आहेत. चंदन जसे सर्वांगी शुद्ध, सोज्ज्वळ आणि सुगंधी तसेच हे चित्तही साधनेने शुद्ध झालेले आहे त्याच्याकरवी श्रीमहाराज आपल्या श्रीगुरुमायेला निरोप पाठवत आहेत.
" अरे (चित्तरूपी)चंदनपाखरा, तू माझे जरा ऐकतोस का? माझा एक निरोप माझ्या माहेरी पोहचव ना ! माझे माहेर आळंदी, हे पुण्याहून सहा कोस आहे. तू वाटेत विचारत विचारत जा आळंदीला. तिथे जवळ पोहोचलास की, तुला देदीप्यमान असा सुवर्ण पिंपळ लांबूनच दिसेल. तो माझ्या माहेरच्या अंगणाची वैभवसंपन्न खूणच आहे. त्याच्या मुळाशी जरा विसावा घे. तिथे बसल्यावर तुझा प्रवासाचा शीण क्षणात नष्ट होईल. ताजातवाना झालास की माझ्या परमप्रेमळ श्रीज्ञानेश्वरमायेस जाऊन भेट. अतीव प्रेमभराने माझा हा निरोप तिला एकांतात सांग.
माझ्या मधाहूनही गोड अशा ज्ञानाईस सांग की, तुझ्या या कन्येस खूप कठीण सासुरवास भोगावा लागत आहे. प्रपंचरूपी सासरी तिला खूप कष्ट करावे लागतात. या कन्येसाठी तुझ्या पोटी काही माया येऊ देत. तुझ्या प्रेमकृपेशिवाय ही व्यथा कोण हरण करणार? माझ्या आईला विचार की, तुला किती वेळ आपल्या लेकीची आठवण येते? मला तर अखंडच तिची सय येत असते. पक्षीराजा, तिला जरा अशा काही गुप्त गोष्टी विचार. कारण तिला जरी माझी आठवण येत असली तरी वरवर ती ते दाखवणार नाही. म्हणून ही लोकांपासून तिने गुप्त ठेवलेली गोष्ट तू मात्र प्रेमाने तिला विचारून जाणून घे व मला येऊन सांग. माझ्या आईला माझी आठवण येते, हे ऐकून मी किती सुखावेन काय सांगू तुला !
खूप दिवस, वर्ष झाली आईची भेट नाही, माहेरी जाणे झालेले नाही. माझ्या प्रेमार्द्र ज्ञानमातेस विचार की, ती मला माहेरी येण्यासाठी कधी मूळ पाठवणार आहे? मी चातकासारखी वाट पाहत आहे. असे तिचे मूळवणे आल्याशिवाय मला सासरचे लोक सोडणार नाहीत. म्हणून हे विहगा, तू माझ्या कोमल हृदयाच्या अलंकापुरस्वामिनीस सगळ्या गोष्टी नीट विचारून तिचे आश्वासन माझ्यासाठी घेऊनच परत ये !
हे माझ्या प्रिय द्विजवरा, तू माझी आणि माझ्या ज्ञानेश्वरमायेची भेट लवकरात लवकर घडवून आण. मी तिच्या विरहाने कशी दिवस कंठते आहे ते तू पाहतोच आहेस. बा पक्षीराजा, मी तुझ्या पायी वंदन करते पण तू माझा एवढा निरोप माझ्या परमप्रिय मातेला जाऊन सांग आणि तिचे आधाराचे शब्द मला ऐकवून सुखी कर !
माहेराच्या आठवणीने व्याकूळ होऊन आपल्या आईस भेटण्यासाठी आतुर झालेल्या सासुरवाशिणीचे अंतरंग अगदी मोजक्या पण चपखल शब्दांमध्ये श्रीसंत गुलाबराव महाराजांनी येथे मांडले आहे. ही केवळ त्यांची कविकल्पना नाही, तर प्रत्यक्ष त्यांचा अनुभवच ते येथे व्यक्त करीत आहेत. म्हणूनच त्यांच्या या अनुभवातील चैतन्य नुसतेच स्पष्ट जाणवते असे नाही, तर आपलेही हृदय ते उजळून काढते. या श्रीज्ञानेश्वरकन्येचे अंतःकरणही, आपल्या जगद्वंद्य मायमाउलीसारखेच कुसुम-कोमल आहे, हळवे आहे. अपरंपार करुणेची प्रसन्न श्रीमूर्तीच या भावगर्भ पदातून शब्दरूप सुरेख पैठणी लेवून आपल्यासमोर उभी ठाकते. नजर ठरणार नाही अशा त्या देखण्या पैठणीचा तलम पोत, तेजस्वी रंग, नाजूक नक्षीकाम, मनमोहक वेलबुट्टी पाहता पाहता मोहरलेलो आपण, या ज्ञानेश्वरकन्येच्या चिरंतन-माहेरी, ज्ञानमाउलीच्या उबदार मायकुशीत कधी विसावतो ते आपल्यालाही कळत नाही. मनी मानसी भरून उरते ती केवळ अद्भुत प्रेमकृपेची चंदनचर्चित नित्यसुगंधी जाणीव ! सतत हवीहवीशी वाटणारी, अंतर्बाह्य सुखावणारी, ज्ञानमाउलीच्या माहेराचे माहेरपण पुन्हा एकदा सार्थ ठरवणारी  !!!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती.
अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.

http://rohanupalekar.blogspot.in)

13 Apr 2019

सूर्यवंशाचें मंडण रामदासाचें भूषण



आज चैत्र शुद्ध नवमी, राजाधिराज भगवान श्री श्रीरामचंद्र प्रभूंची जयंती आणि त्यांचे दासोत्तम सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांचीही जयंती !
आपल्या भारतीय विचारधारेत, आपल्या संपन्न संस्कृतीमध्ये, तुम्हां-आम्हां भारतीयाच्या मनोमानसी आणि आमच्या अवघ्या आयुष्यातच 'राम' व्यापून राहिलेला आहे. इतका की, काहीही निरस, निरुपयोगी, निरर्थक सांगायचे असेल तर आम्ही "त्यात राम राहिलेला नाही" असेच म्हणतो. इतका राम आमच्यामध्ये आत-बाहेर भिनलेला आहे. अर्थात् तेच अत्युत्तम आहे.
एकवचनी, एकबाणी व एकपत्नी म्हणून सुप्रसिद्ध असलेले मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र प्रभू हेच आमचे परमादर्श आहेत, आमच्या बुद्धीचे प्रेरक आहेत आणि आमच्या कार्यकौशल्याचे चालकही आहेत. जोवर आम्ही श्रीरामरायांचा हात धरून चालत राहू, तोवर आम्हांला कशाचीही व कोणाचीही कसलीच भीती नाही. पण जिथे त्या भगवान श्रीरामरायांचे आमचे ते चिंतन सुटेल, तेव्हा तिथला 'राम'च निघून गेल्याने सर्वकाही निरर्थकच ठरेल. आपल्याशी अनन्य राहण्याचे हेच यथार्थ भान, हीच प्रगल्भ जाणीव आम्हां सर्वांच्या हृदयी सतत तेवती राहो, अशीच आजच्या पावन दिनी आपण प्रभू श्रीरामांच्या श्रीचरणीं सादर प्रार्थना करू या !
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज श्रीरामरायांच्या अतीव देखण्या स्वरूपाचे वर्णन करताना म्हणतात,
शोभे ठकाराचे ठाण ।
एकवचनी एकबाण ॥१॥
बाप विसांवा भक्तांचा ।
स्वामी शोभे हनुमंताचा ॥२॥
मूर्ति शोभे सिंहासनीं । 
तो हा राजीव नयनी ॥३॥
सूर्यवंशाचें मंडण ।
रामदासाचें भूषण ॥४॥
"ठकाराचे ठाण अर्थात् सात्त्विक सौंदर्याची खाण असणारे हे एकवचनी, एकबाणी विभूतिमत्त्व अत्यंत शोभून दिसत आहे. दासोत्तम हनुमंतांचे स्वामी असणारे हे मुनिमनरंजन प्रभू श्रीरामराय भक्तांचे माय-बाप असून तेच त्यांचा विसावाही आहेत, परम आश्रयस्थान आहेत. उत्फुल्ल कमलाप्रमाणे सुकोमल, विशुद्ध आणि तेजस्वी-ओजस्वी असे नेत्र असणारे हे महावीर सम्राट प्रभू श्रीराम आपल्या रत्नजडित सिंहासनावर अतीव शोभून दिसत आहेत. महापराक्रमी सूर्यवंशाच्या सर्व सद्गुणांचे आपल्या अंगीच्या दैवी षड्गुणरत्नांनी आणखी मंडण करणारे आणि आपल्या दासांचे सदैव कैवारी असणारे भगवान श्रीरामचंद्र प्रभू हेच रामदासांच्या हृदयीचे भूषण आहेत, त्यांचे सर्वस्वच आहेत !!"
राजाधिराज भगवान श्रीरामरायांच्या जयंती दिनी त्यांच्या पुण्यपावन नामाचा गजर करून आपणही ऋषिमुनींचे आराध्य व संतमहंतांचे परमश्रेष्ठ असे विसाव्याचे स्थान असणा-या श्रीरामप्रभूंच्या मंगलध्यानात मग्न होऊ या !
रघुकुलभूषण भगवान श्रीरामांच्या विषयीच्या आणखी चिंतनाचा आस्वाद घेण्यासाठी खालील लिंकवरील लेखही आवर्जून वाचावा ही विनंती !!
सूर्यवंशी उदेला सूर्य तो श्रीराम
https://rohanupalekar.blogspot.com/2018/03/blog-post_25.html?m=1


7 Apr 2019

राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन !


आज चैत्र शुद्ध द्वितीया, पूर्णपरब्रह्म राजाधिराज सद्गुरु श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन आहे. श्रीस्वामी महाराज आजच्याच तिथीला सूर्योदयसमयी हस्तिनापूर जवळील छेली या खेडेगावी आठ वर्षांच्या बालरूपात इ.स.११४९ मध्ये प्रथम प्रकटले होते. आज त्यांचा ८७१ वा प्रकटदिन आहे.
राजाधिराज श्रीस्वामी महाराज हे खरोखर अत्यंत विलक्षण अवतार आहेत. त्यांचे समग्र चरित्र व लीला या मानवी बुद्धीच्या पलीकडेच आहेत. जिथे आपली बुद्धी संपते तिथेच त्यांची लीला सुरू होते. त्यांचे भक्तवात्सल्य हे इतके अद्भुत आहे की, नुसती कळवळून त्यांना हाक जरी मारली तरीही ते सर्व बाजूंनी त्या भक्ताचा सांभाळ करतातच !
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जन्माचे रहस्य सांगून त्यांच्या भक्तकामकल्पद्रुम प्रेमवात्सल्याचे सुरेख वर्णन करणा-या श्री स्वामीसुत महाराजांच्या अभंगावरील विवेचन खालील लिंकवरील लेखात मांडलेले आहे, आपण आजच्या पावन दिनी त्याचा आवर्जून वाचन करून श्रीस्वामीचरणीं प्रेमादरपूर्वक दंडवत घालावा ही विनंती.
अवतार समर्थ झाला असे
https://rohanupalekar.blogspot.com/2017/03/blog-post_29.html?m=1
राजाधिराज श्रीस्वामी महाराजांचे दिव्यपावन नाम हे भवरोगाचे रामबाण औषध आहे. या अलौकिक अधिकारसंपन्न नामाचे यथार्थ माहात्म्य, श्रीस्वामी समर्थ महाराजांचे पूर्ण कृपांकित सत्पुरुष प.पू.सद्गुुरु श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या "श्रीस्वामीसमर्थ नामपाठ" या सुरेख रचनेत सविस्तर मांडलेले आहे. या नामपाठातील एकोणिसाव्या अभंगावरील अल्पसे विवेचन खालील लिंकवरील लेखात केलेले आहे. त्यातून श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या प्रेमभावे केलेल्या भक्तीचे व नामाचे महत्त्व आपल्या ध्यानी येईल. त्याचेही वाचन आजच्या पुण्यदिनी करावे ही विनंती.
स्वामीनाम तारू स्वामी कल्पतरू
https://rohanupalekar.blogspot.com/2018/03/blog-post_22.html?m=1


6 Apr 2019

उभवी गुढी सुखाची



श्रीमन्नृपशालिवाहन शके १९४१, विकारी नाम हिंदू नवसंवत्सराच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !!
सध्या गुढीपाडवा हा शब्द नुसता म्हटला रे म्हटला की लगेच अनेक गाढवे केकाटू लागतात. उगीच नाही आपल्या पूर्वजांनी, "गुढीपाडवा नीट बोल गाढवा ।" ही म्हण प्रचलित केलेली आहे. दुर्दैवाने आज मात्र तीच सत्य होताना दिसते आहे.
गुढी पाडवा हा आपला प्राचीन काळापासून साजरा होणारा सण आहे. आपल्या सर्व संतांनी गुढीचा वारंवार उल्लेख केलेला आहे. गुढी उभारणे हे आपला आतला आनंद बाहेर व्यक्त करण्याचे प्रतीक आहे. त्यामुळेच फक्त वर्षप्रतिपदेला गुढी उभारतात, हेही मत बरोबर नाही. श्रीसंत तुकाराम महाराज श्रीकृष्णजन्माच्या अभंगात स्पष्ट म्हणतात की,
गोकुळीच्या सुखा ।
अंतपार नाही लेखा ॥१॥
बाळकृष्ण नंदाघरी ।
आनंदल्या नरनारी ॥२॥
गुढिया तोरणे । 
करिती कथा गाती गाणे ॥३॥
भगवान श्रीगोपालकृष्णांच्या आगमनाने आनंदित झालेल्या गोकुलवासियांनी गुढ्या-तोरणे उभारून आपला आनंद व्यक्त केला होता. यावरून गुढी उभारणे हे आनंद व्यक्त करण्याचे प्रतीकच आहे, हे स्पष्ट दिसून येते.
आजच्या विकारी नाम संवत्सराच्या निमित्ताने आपणही सर्वजण श्रीभगवंतांच्या नामाची गुढी उभारून आपला आनंद व्यक्त करू या ! सर्व वाचकांनी खालील लिंकवरील लेखातील गुढीपाडव्याचे माहात्म्य सांगणा-या संतवचनांचा तसेच प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी कथन केलेल्या गुढीच्या अलौकिक गूढार्थाचाही आवर्जून आस्वाद घ्यावा ही विनंती. त्याद्वारे आपल्या परमश्रेष्ठ भारतीय संस्कृतीच्या या सुखदायक वर्षप्रतिपदेनिमित्त सर्वांसाठी मंगलकामनाही व्यक्त करू या !!
टाळी वाजवावी गुढी उभारावी
https://rohanupalekar.blogspot.com/2018/03/blog-post_18.html?m=1