13 Apr 2019

सूर्यवंशाचें मंडण रामदासाचें भूषण



आज चैत्र शुद्ध नवमी, राजाधिराज भगवान श्री श्रीरामचंद्र प्रभूंची जयंती आणि त्यांचे दासोत्तम सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांचीही जयंती !
आपल्या भारतीय विचारधारेत, आपल्या संपन्न संस्कृतीमध्ये, तुम्हां-आम्हां भारतीयाच्या मनोमानसी आणि आमच्या अवघ्या आयुष्यातच 'राम' व्यापून राहिलेला आहे. इतका की, काहीही निरस, निरुपयोगी, निरर्थक सांगायचे असेल तर आम्ही "त्यात राम राहिलेला नाही" असेच म्हणतो. इतका राम आमच्यामध्ये आत-बाहेर भिनलेला आहे. अर्थात् तेच अत्युत्तम आहे.
एकवचनी, एकबाणी व एकपत्नी म्हणून सुप्रसिद्ध असलेले मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र प्रभू हेच आमचे परमादर्श आहेत, आमच्या बुद्धीचे प्रेरक आहेत आणि आमच्या कार्यकौशल्याचे चालकही आहेत. जोवर आम्ही श्रीरामरायांचा हात धरून चालत राहू, तोवर आम्हांला कशाचीही व कोणाचीही कसलीच भीती नाही. पण जिथे त्या भगवान श्रीरामरायांचे आमचे ते चिंतन सुटेल, तेव्हा तिथला 'राम'च निघून गेल्याने सर्वकाही निरर्थकच ठरेल. आपल्याशी अनन्य राहण्याचे हेच यथार्थ भान, हीच प्रगल्भ जाणीव आम्हां सर्वांच्या हृदयी सतत तेवती राहो, अशीच आजच्या पावन दिनी आपण प्रभू श्रीरामांच्या श्रीचरणीं सादर प्रार्थना करू या !
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज श्रीरामरायांच्या अतीव देखण्या स्वरूपाचे वर्णन करताना म्हणतात,
शोभे ठकाराचे ठाण ।
एकवचनी एकबाण ॥१॥
बाप विसांवा भक्तांचा ।
स्वामी शोभे हनुमंताचा ॥२॥
मूर्ति शोभे सिंहासनीं । 
तो हा राजीव नयनी ॥३॥
सूर्यवंशाचें मंडण ।
रामदासाचें भूषण ॥४॥
"ठकाराचे ठाण अर्थात् सात्त्विक सौंदर्याची खाण असणारे हे एकवचनी, एकबाणी विभूतिमत्त्व अत्यंत शोभून दिसत आहे. दासोत्तम हनुमंतांचे स्वामी असणारे हे मुनिमनरंजन प्रभू श्रीरामराय भक्तांचे माय-बाप असून तेच त्यांचा विसावाही आहेत, परम आश्रयस्थान आहेत. उत्फुल्ल कमलाप्रमाणे सुकोमल, विशुद्ध आणि तेजस्वी-ओजस्वी असे नेत्र असणारे हे महावीर सम्राट प्रभू श्रीराम आपल्या रत्नजडित सिंहासनावर अतीव शोभून दिसत आहेत. महापराक्रमी सूर्यवंशाच्या सर्व सद्गुणांचे आपल्या अंगीच्या दैवी षड्गुणरत्नांनी आणखी मंडण करणारे आणि आपल्या दासांचे सदैव कैवारी असणारे भगवान श्रीरामचंद्र प्रभू हेच रामदासांच्या हृदयीचे भूषण आहेत, त्यांचे सर्वस्वच आहेत !!"
राजाधिराज भगवान श्रीरामरायांच्या जयंती दिनी त्यांच्या पुण्यपावन नामाचा गजर करून आपणही ऋषिमुनींचे आराध्य व संतमहंतांचे परमश्रेष्ठ असे विसाव्याचे स्थान असणा-या श्रीरामप्रभूंच्या मंगलध्यानात मग्न होऊ या !
रघुकुलभूषण भगवान श्रीरामांच्या विषयीच्या आणखी चिंतनाचा आस्वाद घेण्यासाठी खालील लिंकवरील लेखही आवर्जून वाचावा ही विनंती !!
सूर्यवंशी उदेला सूर्य तो श्रीराम
https://rohanupalekar.blogspot.com/2018/03/blog-post_25.html?m=1


0 comments:

Post a Comment