22 Dec 2018

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा





भगवान श्रीदत्तात्रेय हे साक्षात् परिपूर्ण परब्रह्मच आहेत. लौकिक अर्थाने सत्त्व, रज व तम या तिन्ही गुणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव व भगवान शिवांचा त्रिगुणात्मक अवतार म्हणजे भगवान श्रीदत्तात्रेयप्रभू होत. त्रिगुणात्मक भासणारे परंतु सगुणत्वाला येऊनही मुळात निर्गुण-निराकारच असणारे भगवान श्रीदत्तात्रेयप्रभू हे प्रत्यक्ष जगद्गुरूच आहेत. श्रीदत्तप्रभूंच्याच स्वरूपातून या जगात गुरुतत्त्व विविध रूपांतून साकार होत असते. म्हणूनच गुरुतत्त्वाचा मूलाधार भगवान श्रीदत्तप्रभूच आहेत !
सत्ययुगात भगवान ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आणि सप्तर्षींमधील श्रेष्ठ अशा भगवान अत्रिमुनी व त्यांच्या पतिव्रता पत्नी भगवती अनसूयामातेच्या पोटी, त्यांच्या तपश्चर्येचे फळ देण्याच्या मिषाने भगवंतच "दत्त" रूपात प्रकटले. ज्यांच्यापाशी कोणतेही त्रिगुण नाहीत, त्या "अ-त्रि" मुनींपासून हे त्रिगुणात्मक ब्रह्म प्रकटले. जिच्यापाशी असूया नावालाही नाही, ती "अन्-असूया" त्या परब्रह्माची माता झाली. निर्गुण निराकार परब्रह्म त्रिगुणांचा अंगीकार करून "श्रीदत्तात्रेय" रूपात सगुण साकार झाले ; आणि ज्या दिवशी ते असे साकारले, तोच आजचा मार्गशीर्ष पौर्णिमेचा, श्री
दत्तजयंतीचा पुण्यपावन दिवस होय !

भगवान ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार उत्तम पुत्र प्राप्त व्हावा म्हणून महर्षी अत्रि व माता अनसूयेने कठोर तप केले. त्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या श्रीभगवंतांनी स्वतःलाच त्यांना देऊन टाकले. दिलेले म्हणून "दत्त" आणि अत्रिंना दिले म्हणून "आत्रेय"; यापासून "दत्तात्रेय" हे पुण्यनाम साकारले. ते "दत्तात्रय" नाहीत, "दत्तात्रेय" आहेत ; हे लक्षात घ्यावे. सर्वसामान्यपणे त्यांचा "दत्तात्रय" असा चुकीचा उच्चार केला जातो, म्हणून हा खुलासा केला.

महाराष्ट्रात गेली हजार वर्षे तरी श्रीदत्तसंप्रदाय सुस्थिर झालेला आहे. कलियुगातील प्रथम दत्तावतार भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज व द्वितीय दत्तावतार भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे महाराष्ट्रातच बराच काळ वास्तव्य व कार्य झाल्यामुळे, या प्रदेशात श्रीदत्तभक्ती रुजली व खूपच विस्तारली देखील. तृतीय श्रीदत्तावतार राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज व पंचम दत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् टेंब्येस्वामी महाराज आणि यांच्याच सारख्या इतरही अनेक अवतारी महात्म्यांनी श्रीदत्तभक्तीचा वटवृक्ष जोपासून मोठा केला. म्हणूनच आजमितीस महाराष्ट्रातील प्रमुख उपासना संप्रदायांमध्ये श्रीदत्त संप्रदायाची गणना होते. वारकरी संप्रदायानेही श्रीमद् भागवतात कथन केलेल्या चोवीस अवतारांपैकी एक असणाऱ्या श्रीदत्तप्रभूंना मोठ्या प्रेमादराचे स्थान दिले आहे. श्रीनाथ संप्रदायात तर श्रीदत्तप्रभू हे नवनाथांचे गुरुस्वरूपच आहेत. या सर्व कारणांमुळे श्रीदत्त हे दैवत तळागाळापर्यंत पोचलेले आहे. अर्थातच, अगदी थोड्या उपासनेने प्रसन्न होणारे दैवत असल्यामुळेही श्रीदत्तप्रभूंची सेवा-उपासना करण्याकडे सर्वसामान्य जनांचा कल दिसून येतो. शिवाय असंख्य भक्तांना तशा अलौकिक अनुभूती देखील आलेल्या आहेतच

भागवत संप्रदायाचे मुख्यस्तंभ मानलेल्या शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांनी रचलेली "त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।" ही भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंची सुंदर आरती सर्वदूर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील जवळपास निम्म्याहून जास्त जनतेला तोंडपाठ असणारी ही लालित्यपूर्ण आरती अतिशय अर्थगर्भ आणि तत्त्वज्ञानप्रचुर आहे. दररोजच्या म्हणण्यात असल्याने या आरतीच्या अर्थाचा फारसा विचार केला जात नसावा. अर्थ जाणून पठण केल्यास एखाद्या रचनेचा आनंद अधिक प्रमाणात मिळतो हेही खरेच आहे. म्हणूनच आजच्या पावन पर्वावर प्रस्तुत लेखातून आपण या प्रासादिक आरतीच्या मार्मिक भावार्थाचा यथाशक्य विचार श्रीसद्गुरुकृपेने करू या.

( http://rohanupalekar.blogspot.in )

श्रीसंत एकनाथ महाराज आपल्या चार चरणांच्या श्रीदत्तप्रभूंच्या सुप्रसिद्ध आरतीत म्हणतात,
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेति नेति शब्दें न ये अनुमाना ।
सुरवरमुनिजनयोगी समाधि न ये ध्याना ॥१॥
जयदेव जयदेव श्रीगुरुदत्ता ।
आरती ओवाळितां हरली भवचिंता ॥ध्रु.॥
सबाह्य अभ्यंतरी तूं एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।
पराहि परतली तेथे कैंचा हा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥२॥
दत्त येऊनियां उभा ठाकला ।
सद्भावें साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥
दत्त दत्त ऐसें लागलें ध्यान ।
हारपलें मन झालें उन्मन ।
मी तूं पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥४॥


[ या आरतीचे अनेक पाठभेद लोकांच्या म्हणण्यामुळे तयार झालेले आहेत. येथे दिलेला पाठ अतिशय शुद्ध आहे. या पाठानुसारच अर्थ केलेला आहे. ]

सत्त्व, रज व तम या त्रिगुणांचा आपल्या लीलेसाठीच भासमान अंगीकार करून हा परमात्मा त्रिमूर्ती रूप धारण करून प्रकटलेला आहे. प्रत्यक्ष त्रैलोक्याचे अधिपती असणारे भगवंतच हा सर्वसामर्थ्यसंपन्न असा त्रिगुणात्मक अवतार घेऊन सगुणसाकार झालेले आहेत. श्रेष्ठ देवदेवता, तपस्वी मुनी व अलौकिक अधिकाराच्या योगिजनांच्या ध्यानातही जे परमतत्व सहजासहजी प्रकटत नाही ; आणि ज्ञाननिधी वेदही ज्यांचा स्वरूपाचा थांग न लागल्याने नेति नेति म्हणून मौनावतात ; तेच परिपूर्ण परब्रह्मतत्त्व निर्गुण असूनही केवळ भक्तप्रेमाचा आस्वाद घेण्यासाठीच श्रीदत्तरूपाने साकारले आहे. (१)

म्हणूनच आता आपण या परमकरुणामय श्रीगुरु दत्तात्रेय प्रभूंची मनोभावे आरती करू या. त्यांची अशी आरती केल्याने, सहन करण्यास अतिशय कठीण मानली गेलेली भवचिंता देखील सहजासहजी हरते, नष्ट होते. (ध्रु.)

अहो दत्तात्रेय भगवंता, या विश्वाच्या आत-बाहेर, सर्वत्र तुम्हीच भरून राहिलेला आहात. तुमच्याशिवाय अन्य काहीच नाही या सृष्टीत. परंतु ज्याच्यापाशी तेवढी पुण्याई व सद्भाग्यच नाही त्याला कसे काय कळणार बरे हे ? परा वाचा देखील तुमच्या स्वरूपाचे वर्णन करू शकली नाही, तिथे माझी निर्बल वैखरी कितीशी उपयोगी पडणार ? परंतु तुमच्या गुणवर्णनाचे, नामस्मरणाचे माहात्म्यच असे अगाध आहे की, वैखरीने जरी ही सेवा केली तरीही दुर्लंघ्य अशी ही जन्ममरण परंपराच खंडित होते. तो भक्त तुमच्या कृपेने जन्ममरण चक्रातून पार जातो. (२)

( श्रीसंत एकनाथ महाराजांच्यावर कृपा करण्याच्या मिषाने, त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान श्रीदत्तात्रेयप्रभू त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्या प्रसंगाचा उल्लेख करून श्री नाथ महाराज म्हणतात ; ) माझ्यावर कृपा करण्यासाठी साक्षात् श्रीदत्तात्रेय भगवान माझ्यासमोर दत्त म्हणून उभे ठाकले. मी अतिशय सद्भावपूर्वक त्यांच्या श्रीचरणीं साष्टांग दंडवत घातला. त्यामुळे सुप्रसन्न झालेल्या अत्रितनय श्रीदत्त भगवंतांनी मला भरभरून आशीर्वाद दिल्याने माझी जन्ममरण परंपरा त्याक्षणी खंडित झाली. त्यांच्या दर्शनानेच मला पुनरावृत्तिरहित असा मोक्ष प्राप्त झाला. (३)

श्रीभगवंतांच्याच परमकृपेने आता मला "दत्त दत्त" असेच ध्यान सदैव लागून राहिलेले आहे. माझ्या चित्तवृत्ती अंतर्बाह्य दत्तमय झालेल्या आहेत. त्यामुळे सतत संकल्पविकल्प करणारे माझे मन आता उन्मन झालेले आहे. मनच नाहीसे झाल्याने त्याच्या आधारावर भासणारा मी-तू पणाने भरलेला प्रपंचभ्रमही पूर्ण नष्ट झालेला आहे ; आणि मी आता माझे सद्गुरु श्री जनार्दन स्वामींच्या परमकृपेने श्रीदत्तध्यानातच अखंड, अविरत मग्न होऊन गेलेलो आहे. आता माझ्या आत-बाहेर फक्त भगवान श्रीदत्तप्रभूच विराजमान आहेत आणि मी देखील दत्तरूप होऊन वर पुन्हा त्याच परमानंदमय श्रीदत्तांचे ध्यान करण्यातच निमग्न झालेलो आहे. (४)

आरतीच्या या शेवटच्या चरणातील शेवटच्या वाक्याचा आणखी एक सुंदर अर्थ होतो. सद्गुरुकृपेने लाभलेले आणि श्रीदत्तप्रभूंपासूनच परंपरेने आलेले दिव्य असे ते साधन करता करता श्री एकनाथांना आपले सद्गुरु श्री जनार्दन स्वामी हेच प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू आहेत याची साक्षात् अनुभूती आलेली आहे. म्हणूनच ते म्हणतात की, "एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ।" श्रीगुरूंकडून लाभलेल्या त्या "श्री" म्हणजेच परंपरेच्या कृपाशक्तीची साधना करता करता, श्रीदत्तप्रभू व श्री जनार्दन हे दोन्ही एकरूपच आहेत व सर्वत्र, सर्व ठिकाणी, तुझ्या व माझ्यासकट सर्व बाबतीत आता ते श्रीदत्तप्रभूच व्यापून उरलेले आहेत ; असा अद्भुत अद्वैतानुभव श्रीसंत एकनाथ महाराजांना पूर्णपणे अनुभवायला मिळाला. त्या सुमधुर अनुभूतीचाच प्रसन्न आनंदाविष्कार या श्रीदत्तप्रभूंच्या आरतीच्या माध्यमातून त्यांनी शब्दबद्ध केलेला आहे.

संतांचे शब्द हे बहुअर्थ प्रसवणारे असतात. त्यांचा गूढार्थही विशेषच असतो. जितके आपण त्याचे चिंतन-मनन करू तितका तो प्रत्येकवेळी आणखी उलगडत जातो. म्हणूनच आपण सतत त्या अनुसंधानातच राहिले पाहिजे.

भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंची ही आरती आज जगभरात म्हटली जाते. तिच्या निमित्ताने रोजच श्रीदत्तसंप्रदायाचे हे गूढगंभीर तात्त्विक स्वरूप आपल्या मुखात येतेच. अशा त्या तत्त्वरूपाचे अल्पसे का होईना, पण चिंतन-मनन देखील सर्वांकडून व्हावे, या सदिच्छेनेच व श्रीगुरुकृपेने प्रस्तुत लेखाच्या माध्यमातून या सुरेख आरतीचा थोडासा अर्थ उलगडला गेला आहे. तुम्हां-आम्हां सर्वांची चिंतनाची प्रक्रिया सुरू व्हावी व सुरू झालेली कायमच चालू राहावी ; यासाठीच श्रीगुरुचरणीं मनोभावे प्रार्थना करून, त्यांच्याच कृपेने झालेली ही लेखनसेवा श्रीदत्तजयंतीच्या पावन पर्वावर भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या महन्मंगल श्रीचरणीं तुलसीदलरूपाने समर्पितो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481



5 Dec 2018

भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी महोत्सव

आज कार्तिक कृष्ण त्रयोदशी, आमचे परमाराध्य मायबाप भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांचा संजीवन समाधी दिन !
सद्गुरु भगवान श्री माउली हे साक्षात् भगवान श्रीकृष्ण परमात्माच आहेत. माउलींच्यानंतर आपल्याकडे झालेल्या आजवरच्या जवळपास प्रत्येक महात्म्याने आपल्या वाङ्मयात कुठे ना कुठे सद्गुरु श्री माउलींची स्तुती केलेलीच आहे. इतकी श्री माउलींची मोहिनी जबरदस्त आहे. जसे भगवान श्रीराम अद्वितीय, जसे भगवान श्रीकृष्ण अद्वितीय, जसे श्रीमदाद्य शंकराचार्य महाराज अद्वितीय ; तसेच सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजही एकमेवाद्वितीय आहेत. त्यांच्यासारखे तेच, अत्यंत अलौकिक व अद्भुत !
सद्गुरु श्री माउलींचे नुसते नाव जरी उच्चारले तरी हृदयी प्रेमादराचे तरंग उठतात, त्यांच्याविषयीच्या निखळ प्रेमाचे, उत्कट श्रद्धेचे आणि अपूर्व गुरुभावाचे अनुकार आपले अंगांग व्यापून वर अष्टसात्त्विक भावांची मांदियाळी निर्माण करतात. आळंदीला कार्तिकी वारीत किंवा आषाढीच्या वारीत त्यांच्या नामाचा गगनभेदी गजर जेव्हा होतो ना, तेव्हा आपण असे मोहरून येतो की बस ! हा अनुभव ज्याचा त्यानेच एकदातरी घ्यायला हवा. ज्यांच्या नामातच अज्ञानाचा निरास आहे, वेदान्ताचा परमअनुभव आहे आणि ज्यांच्या नामात पराभक्तीचा अपूर्व-मनोहर आविष्कार आहे, त्या कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती परमानंदकंद श्रीविठ्ठलप्राणजीवन भक्तहृदयसिंहासनविहारी अलंकापुराधिपती जगज्जीवन सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांच्या श्रीचरणीं त्यांच्याच ब्रह्मनामाच्या उच्चारात सहजतेने अापल्याला दंडवत घालता येतोय, हे तुम्हां आम्हां भाविकांचे केवढे मोठे भाग्य आहे. खरोखरीच, देवांनी आपल्याला माउलींच्या नंतर जन्माला घातले यातच सगळे आले ! देवदेवतांनाही दुर्लभ असे भगवान श्री माउलींचे दर्शन, त्यांचे नामस्मरण व त्यांच्या अवीट गोडीच्या सारस्वताचे अनुशीलन-अनुगमन आपण त्यामुळेच तर आज करू शकतोय. मी यासाठी सृष्टिकर्त्या परमात्म्याचा जन्मजन्मांतरी ऋणाईत आहे. माझा मलाच या भाग्यासाठी सदैव हेवा वाटतो.
सद्गुरु श्री माउलींच्या स्तुतिगायनात आज स्वर्गादि लोकांत, वैकुंठातही मोठमोठ्यांच्यात अहमहमिका लागलेली असेल, तिथे माझ्यासारख्या मशकाने काय मिजास मारावी हो ? पण मी तर ही माझी मिराशी मानतोय, माझ्यावरचा श्रीजगन्नाथांचा महान उपकार मानतोय की, आजच्या परमपावन दिनी मला ते सद्गुरु श्री माउलींचे स्मरण करून देत आहेत, माझ्याकडून व त्याचवेळी तुम्हां सहृदय वाचकांकडूनही स्मरण करवूनही घेत आहेत.
म्हणूनच माझे तदभिन्न सद्गुरुराज प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी रचलेल्या दोन अभंगांच्या विवरणाच्या माध्यमातून मीही सद्गुरु श्री माउलींच्या सर्वार्थदायक अम्लान श्रीचरणकमली ही अल्पशी वाङ्मयसेवा समर्पून, आज त्यांच्याच स्मरणानंदात मौनावतो ! आपणही खालील लिंकवरील लेखाचा आस्वाद घेऊन श्री माउलींच्या चरणी स्मरणसेवा समर्पावी ही प्रार्थना !
सरतेशेवटी श्रीज्ञानेश्वरकन्या सद्गुरु श्री.गुलाबराव महाराजांच्या शब्दांत मायतात सद्गुरु श्री माउलींच्या चरणी सप्रेम प्रार्थना करतो,
माझ्या समान न जनी अति पापकारी |
नाही तुम्हां समही पावन पापहारी |
यालागि पदकमले नमिते स्वभावे |
ताता तुम्हां दिसेल योग्य तसे करावे ॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
बापा ज्ञानेश्वरा तुम्हां ठावे हित

https://rohanupalekar.blogspot.com/2016/11/blog-post_27.html?m=1

28 Nov 2018

शिवचिदंबर पाहि माम्

नमस्कार  !
आज कार्तिक कृष्ण षष्ठी, भगवान सद्गुरु श्री चिदंबर दीक्षित महास्वामींची जयंती !
श्री.मार्तंड व सौ.लक्ष्मीबाई या सत्शील दांपत्याने चिदंबरक्षेत्री केलेल्या तपाचरणाचे फलस्वरूप हे श्री चिदंबर महास्वामी त्यांच्या पोटी फार अलौकिक अवतारी विभूती म्हणून जन्माला आले. प्रत्यक्ष भगवान श्रीशिवशंकरांनीच त्यांच्या रूपाने बेळगांव जिल्ह्यातील मुरगोड या क्षेत्री अवतार धारण करून अत्यंत अलौकिक लीला केलेल्या आहेत. ते प्रत्यक्ष भगवान श्रीशिवशंकरच होते, हे दाखविण्यासाठीच जणू काही जन्मत: त्यांच्या डाव्या कानावर बिल्वपत्र व अक्षता होत्या. अगदी बालवयापासूनच या वेदशास्त्रसंपन्न विभूतीने विलक्षण चमत्कार केलेले आहेत. त्यांना सावित्रीमाता व सरस्वतीमाता नावाच्या दोन पत्नी होत्या व पुढे त्यांना सहा पुत्रही झाले.
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे त्यांच्यावर अतिशय प्रेम होते. महास्वामींनी त्या काळातला अतिभव्य असा सोमयाग केला होता. त्यावेळी त्यांनी श्रीस्वामी समर्थ महाराजांना मन:पूर्वक विनंती केली की, "आपण सर्व कार्यास उपस्थित राहावे." श्रीस्वामींनी प्रसन्नतेने होकार दिला. श्रीस्वामी महाराज नुसते उपस्थितच राहिले नाहीत, तर त्यांनी स्वत: त्या यज्ञाच्या दररोजच्या हजारो माणसांच्या पंगतींमध्ये स्वहस्ते तूप देखील वाढले. धर्मराज युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ जसा भगवान श्रीकृष्णांच्या पावन उपस्थितीत परिपूर्ण झाला, तसाच हा सोमयाग श्रीस्वामींच्या उपस्थितीत परिपूर्ण झाला.
श्री चिदंबर महास्वामींचा व आपल्या वारकरी संप्रदायाचा एक अनोखा पण अप्रकट ऋणानुबंध आहे. भगवान श्रीमहाविष्णूंच्या अवतारांमध्ये त्यांचे निस्सीम भक्तही बरोबर येत असतात, भगवंत एकटे कधीच येत नाहीत, असा नियमच आहे. श्रीनृसिंहांच्या अवतारात भक्तश्रेष्ठ प्रल्हाद व पद्मिनी नावाची त्यांची एक दासी होती, तेच श्रीरामावतारात अंगद झाले तर ती दासी मंथरा झाली. पुढे श्रीकृष्णावतारात प्रल्हाद हेच कृष्णसखा उद्धव झाले व ती दासी भक्त कुब्जा झाली. पुढे कलियुगात भगवंत सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या रूपाने आले, प्रल्हादच नामदेव झाले तर तीच दासी जनाबाईंच्या रूपाने अवतरली. नंतर नामदेवरायच श्री तुकाराम महाराज म्हणून पुन्हा आले व जनाबाई या बहेणाबाई म्हणून अवतरल्या. पुढे अठराव्या शतकात श्री ज्ञानेश्वर माउलीच चिदंबर महास्वामींच्या रूपाने आले, नामदेवराय हे चिदंबरशिष्य श्री राजाराम महाराज म्हणून आले व जनाबाईच चिदंबर-राजारामशिष्या विठाबाई म्हणून जन्माला आल्या. असा हा श्री चिदंबर स्वामींचा व वारकरी संप्रदायाचा अनोखा ऋणानुबंध आहे. श्रीसंत नामदेव महाराजांनी केलेली शतकोटी अभंगांची प्रतिज्ञा त्यांनी पुढील सर्व अवतारांमध्ये मिळून पूर्ण केलेली आहे. श्री राजाराम महाराजांचे एक लाख पेक्षा जास्त अभंग आजही हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध आहेत.
( http://rohanupalekar.blogspot.in )
श्री राजाराम महाराजांनी आपल्या अभंगांमध्ये श्री चिदंबर महास्वामींचा वारंवार साक्षात् भगवान श्रीपांडुरंग म्हणूनच उल्लेख केलेला आहे. श्री चिदंबर महास्वामींनी देखील अनेक सद्भक्तांना भगवान श्रीपांडुरंगांच्या रूपात दर्शन दिल्याचे प्रसंग त्यांच्या चरित्रात वाचायला मिळतात. श्री राजाराम महाराजांनी स्थापलेली श्री चिदंबर महास्वामींची मूर्ती विठ्ठलरूपातच आहे. ( या पोस्ट सोबतच्या फोटोमध्ये त्या श्रीमूर्तीचे दर्शन होते. )
श्रीसंत विठाबाईंना आळंदीला दर्शनाला गेल्या असताना प्रत्यक्ष माउलींनी आपल्या संजीवन समाधिविवराच्या आत नेले होते. त्यांनी त्या विवरातील अद्भुत दर्शनाचे वर्णन करणारे अभंगही रचलेले आहेत. श्रीसंत राजाराम महाराज हयात होते तोवर दररोजच्या भजनानंतर त्यांनी रचलेली,
आरती ज्ञानराजा । ज्ञानी प्रकाश तुझा ।
विज्ञानपूर्णब्रह्म । तूचि होसी महाराजा ।।१।।

ही माउलींचीच आरती म्हटली जात असे. हेच या दोन्ही अवतारांच्या एकरूपत्वाचे द्योतक नाही का ?
श्री चिदंबर चरित्रात एक सुंदर कथा येते, त्यातूनही माउली  व महास्वामींची एकरूपता दृग्गोचर होते. श्री माउली तीर्थयात्रा करीत काशीला गेलेले असताना, तेथील एका ब्राह्मणाच्या अयोग्य वर्तनावर ते प्रचंड चिडतात व त्याला, तू ब्रह्मराक्षस हो !  असा शाप देतात. त्याने खूप गयावया केल्यावर मग ते त्याला अभय देत सांगतात की, "६०० वर्षांनंतर आम्ही चिदंबर नावाने दक्षिणेत अवतार धारण करणार आहोत, तेव्हा तुझी या योनीतून सुटका करू." पुढे महास्वामींनी त्या ब्रह्मसमंधाचा उद्धार केल्याची गोष्ट त्यांच्या चरित्रात आलेली आहे. त्यावेळी त्या ब्रह्मसमंधानेच ही संपूर्ण कथा सांगितलेली आहे. अशा या श्रीभगवंतांच्या अवतारांच्या लीला फारच अलौकिक असतात. 
श्री चिदंबर महास्वामींच्या सर्वच लीला अत्यंत अद्भुत, भावपूर्ण आणि आश्चर्यकारक आहेत. ते श्रीस्वामी समर्थ महाराजांसारखे, साक्षात् परिपूर्ण परब्रह्मच होते. महास्वामी अत्यंत प्रेमळ, कनवाळू व भक्तवत्सल होते. आपल्या भक्तांचा अतीव प्रेमाने व आईच्या मायेने ते सांभाळ करीत असत व आजही करीत आहेतच. त्यांच्या परमपावन चिदंबर-नामाचे या काळातही अत्यंत दिव्य अनुभव असंख्य भाविकांना नेहमीच येत असतात. कारण, माझा धाक मानी त्रिभुवनी लोक । यम कुंभीपाक धाक मानी ॥ अशा शब्दांत श्री चिदंबर महास्वामींनी आपल्या भक्तांना अभय दिलेले आहे. माझ्या भक्तांना मीच सर्वतोपरि सांभाळीन, असे ब्रीदवचनच महास्वामींनी उच्चारून ठेवलेले आहे व आजतागायत त्या ब्रीदाचे ते मोठ्या आनंदाने पालन करीत आहेत. म्हणूनच या अपूर्व-मनोहर श्री चिदंबर-अवताराच्या चरणीं जयंती निमित्त "शिवचिदंबर शिवचिदंबर" नामगजरात साष्टांग दंडवत घालू या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

23 Nov 2018

त्रिपुरान्तकाय नम: शिवाय

नमस्कार !!
आज त्रिपुरारी पौर्णिमा !
सूर्योदयाला आज चतुर्दशीच असली तरी सायंकाळी पौर्णिमा असल्याने आजच त्रिपुरी पौर्णिमेचा दीपोत्सव साजरा केला जाईल. म्हणूनच त्याविषयी लेख लिहीत आहे.
भगवान श्रीशिवांनी आजच्याच दिवशी अत्यंत मायावी अशा त्रिपुरासुराचा अनोख्या पद्धतीने वध केला होता.
या त्रिपुरासुराला भगवान ब्रह्मदेवांनी वर देऊन तीन नगरे प्रदान केली होती. ही नगरे स्वयंपूर्ण तर होतीच पण मायावी सुद्धा होती. कोणताही आकार घेऊ शकत, अदृश्य होत, आकाशातही उडू शकत असत. लोखंड, तांबे व सोन्याची ती तीन पुरे असल्यामुळेच त्याला त्रिपुरासुर हे नाव पडले. तो त्यांच्या बळावर अत्यंत माजला होता. मुळात तो राक्षस असल्याने अहंकारी, विकृत तसेच दुष्टही होताच. त्याने सा-या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग मात्र भगवान शिवांनी अत्यंत क्रोधाविष्ट होऊन विलक्षण सामग्री वापरून त्याचा वध केला.
त्यासाठी भगवान शिवांनी पृथ्वीचा रथ केला, त्याला सूर्य चंद्रांची दोन चाके होती.  भगवान ब्रह्मदेव त्याचे सारथी झाले, मेरू पर्वताचे धनुष्य व साक्षात् भगवान विष्णूंचा बाण केला व त्या एकाच बाणात तिन्ही नगरांसह त्रिपुरासुराचा वध केला.
तेव्हापासून त्रिपुरी पौर्णिमेला शिवपूजन करतात व शिवमंदिरात साडेसातशे त्रिपुरवाती लावून उपासना करतात. अनेक ठिकाणी या आनंदाप्रीत्यर्थ दीपोत्सव साजरा केला जातो.
त्रिपुरीचा दीपोत्सव नुसता पाहिल्यानेही पाप नष्ट होऊन विशेष पुण्य लाभते असे म्हणतात. कांचीचे परमाचार्य श्रीमद् जगद्गुरु श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या प्रवचनात सांगितले आहे की, "आजचा त्रिपुरी दीपोत्सव ज्यांच्या ज्यांच्या दृष्टीस पडतो, त्या त्या कृमी-कीटक-प्राणी-पक्षी-वनस्पती व मनुष्यादी सर्व जीवांचे पाप नष्ट होते असे शास्त्र आहे." म्हणून आज आपणही आवर्जून श्रीभगवंतांसमोर यथाशक्य दीप लावून त्या दीपोत्सवाचे दर्शन घ्यावे किंवा मंदिरात जिथे कुठे दीपोत्सव असेल तिथे आवर्जून जाऊन ते नयनरम्य दर्शन घ्यावे ही विनंती.
( http://rohanupalekar.blogspot.in )
श्रीगुरुचरित्राच्या त्रेचाळिसाव्या अध्यायात भक्तराज तंतुकाची कथा आलेली आहे. त्यात श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचे माहात्म्य सांगताना भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज विमर्षण राजाची कथा सांगतात. त्यात तो एक कुत्रा शिवरात्रीच्या दिवशी पंपानगरीतील शिवमंदिरात उपाशी पोटी तीन प्रदक्षिणा घालतो, तेथे उजळलेली दीपमाळ पाहतो व शिवद्वारी प्राणत्यागही करतो. त्या पुण्याईने पुढच्या जन्मी तो कुत्रा शिवभक्त विमर्षण राजा होतो. म्हणजे दीपोत्सवाच्या दर्शनाचेही असे प्रचंड पुण्य प्राप्त होत असते.
आजच्याच तिथीला, भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे धाकटे बंधू व शिष्य सद्गुरु श्री सोपानदेव महाराज, शिख संप्रदायाचे प्रणेते श्रीगुरु नानकदेव महाराज आणि श्रीस्वामी समर्थ महाराजांचे प्रशिष्य व श्री बीडकर महाराजांचे थोर शिष्योत्तम, प.पू.श्री.रावसाहेब महाराज सहस्रबुद्धे या तीन महात्म्यांची जयंती असते.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी या त्रिपुरी पौर्णिमेच्या संदर्भात एक छान रूपक वापरलेले आहे. ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायाच्या श्रीगुरुनमनात ते म्हणतात,
त्रिगुणत्रिपुरीं वेढिला ।
जीवत्वदुर्गीं आडिला ।
तो आत्मशंभूनें सोडविला ।
तुझिया स्मृती ॥ ज्ञाने.१७.०.२॥

"हे सद्गुरुभगवंता, आपले माहात्म्य काय वर्णन करावे ? सत्त्व, रज व तम या तीन गुणरूपी पुरांनी वेढल्यामुळे जीवत्वरूपी किल्ल्यात अडकलेल्या व त्यामुळे भ्रमाने स्वत:ला अपूर्ण मानणा-या श्रीशिवांवर तुम्ही श्रीसद्गुरुरूपाने जेव्हा कृपा करता, तेव्हाच ते त्या त्रिगुणरूपी त्रिपुरासुराच्या वेढ्यातून मुक्त होऊन आपला मूळचा आत्मानंद पुन्हा उपभोगू लागतात !" श्रीसद्गुरुकृपा झाल्यानंतरच जीवाचे अज्ञानादी सर्व दोष जाऊन मूळचे शिवस्वरूप पुन्हा प्रकट होते, असे या त्रिपुरासुर कथेच्या रूपकातून श्री माउली स्पष्ट सांगत आहेत.
आजच्या या कथेचे हुबेहूब दर्शन खालील अप्रतिम शिल्पामधून होत आहे !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

21 Nov 2018

तुळशी सबाह्य हरी पूर्ण - २

तुलसी माहात्म्य - २
कार्तिक मासात भगवती श्रीतुलसीचे खूप माहात्म्य मानलेले आहे. संपूर्ण कार्तिक महिनाभर जर श्रीतुलसीची दररोज सकाळी पूजा केली व सायंकाळी तुळशीत दिवा लावला आणि रोज नियमाने एक तुळशीचे पान भगवान श्रीविष्णूंना वाहिले तर दहा हजार सालंकृत गायी दान केल्याचे पुण्य लाभते असे शास्त्र सांगते. केवढे मोठे फळ आहे पाहा या छोट्याशा व्रताचे. अर्थात् श्रद्धा व प्रेमभाव खूप महत्त्वाचा आहे यात. मनात जर शंका आली तर सगळेच मुसळ केरात जाते. म्हणून नि:शंक मनाने व प्रेमाने अशी उपासना केली तर त्याचे सुयोग्य फळ मिळतेच मिळते.
तुळस ही सर्व पुष्पमयी मानलेली आहे. इतर कोणतेही फूल नसले पण पूजेत तुळशीचे एक पत्र जरी वाहिले तरी सर्व फुले वाहिल्यासारखेच असते. तुळस ही श्रीभगवंतांची प्रिय पत्नी आहे व देवताही आहे. त्यामुळे स्नान झाल्याशिवाय आणि प्रार्थना केल्याशिवाय तुळशीची पाने कधी तोडू नयेत. तसेच तुळस तोडताना नख न लावता तोडावी. तुळस कधी तोडू नये, यावर शास्त्रांनी बरेच नियम सांगितलेले आहेत, पण कमीतकमी द्वादशीला तरी कधीच तुळस तोडू नये.
तुळशीच्या झाडाची सेवा करण्याचेही स्वतंत्र पुण्य सांगितलेले आहे. स्वधर्माचे स्वरूप असणा-या सात्त्विक यज्ञाचे विवरण करताना सद्गुरु श्री माउली म्हणतात,
प्रतिपाळ तरी पाटाचा ।
झाडीं कीजे तुळसीचा ।
परि फळा फुला छायेचा ।
आश्रय नाहीं ॥ज्ञाने.१७.११.१८३॥

सात्त्विक निरपेक्ष कर्म कसे असते ? तर तुळशीच्या सेवेसारखे. फळ, फूल किंवा सावली असले काहीही मिळत नसले तरीही आपण मनोभावे तुळशीची सेवा करतो, तिला अगदी राजेशाही थाटात वाढवतो. येथे श्री माउलींनी तुळशीच्या सुयोग्य सेवेची जणू पद्धतच सांगून ठेवलेली आहे. जो अशी निष्काम भावनेने तुळशीची सेवा करतो त्याला सात्त्विक याग केल्यासारखेच महापुण्य लाभते, असेच त्यांना येथे सांगायचे आहे.
तुळशीचे रोप लावणे, त्याची नीट निगा राखणे, वेळच्या वेळी तुळशीच्या वृंदावनाची (कुंडीची) स्वच्छता करणे, तुळशीपाशी सडा टाकून रांगोळी घालणे, तुळशीची पूजा करणे, तुळशीत दिवा लावणे, तुळशीला यथाशक्य प्रदक्षिणा घालणे व नाम घेत तुलसीपत्रांनी श्रीभगवंतांचे अर्चन करणे ; हे सर्व तुळशीच्या सेवेचेच भाग आहेत. हे करताना मनातल्या मनात श्रीभगवंतांचे नाम घेणे अपेक्षित आहे. या सेवेने साक्षात् श्रीभगवंतांना संतोष होतो, असे संतांनी स्वानुभवाने सांगून ठेवलेले आहे. बरं, हे सर्व करायला खूप वेळ लागतो का प्रचंड पैसे खर्च होतात ? काहीच नाही. अगदी थोडक्या वेळेत व थोडक्या कष्टांत हे सहज जमणारे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनातही नक्की जमू शकणारी ही उपासना आहे आणि मनापासून व प्रेमाने केल्यास ती अलौकिक लाभ देणारीच आहे. ( नुकत्याच प्रकाशित झालेल्या माझ्या *जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा* या ग्रंथातील "होईल आघवा तुका म्हणे आनंद" व "अती आदरें शुद्ध क्रीया धरावी" या दोन प्रकरणांमध्ये अशा सहजसोप्या 'लाभाच्या उपायां'ची सविस्तर चर्चा केलेली आहे. जिज्ञासूंनी ते आवर्जून पाहावे ही विनंती.)
( http://rohanupalekar.blogspot.in )
भगवती श्रीतुलसीच्या कृपेने साक्षात् श्रीभगवंतांची प्राप्ती होते, असे पुराणांत म्हटलेले आहे. तुळशीचे एक विशिष्ट व्रत करूनच भगवती श्रीराधाजींना श्रीकृष्णांची भेट झाली होती. आत्ताच्या काळातही प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे यांनी हे कठीण पण प्रभावी व्रत केले होते व त्यांना त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार झाला होता. या व्रताबद्दल प.पू.सौ.शकाताई आगटे यांनी आपल्या *मुंगी उडाली आकाशीं* या ग्रंथात सविस्तर सांगितलेले आहे. आश्विन पौर्णिमेला सुरू करून वैशाख कृष्ण प्रतिपदेपर्यंत हे व्रत करतात. प्रत्येक महिन्यात शुद्ध जल, दूध, पंचामृत, तसेच ऊस,आंबा, द्राक्ष अशा विविध फळांचा रस यांपैकी एका पदार्थाने तुलसीचे सिंचन करतात, विशिष्ट प्रकारे पूजा करतात व शेवटी या व्रताचे उद्यापन करतात. हे व्रत विधिपूर्वक केल्यास तुलसीच्या कृपेने त्याचे अत्यंत अद्भुत फळ मिळते. पू.सौ.ताई पुढे म्हणतात, "हे व्रत करायला समजा नाही जमले तरी तुलसीची पूजा करावी, तिला पाणी घालावे, तिच्यापुढे दीप लावावा व मन:पूर्वक नमस्कार करावा. तरी देखील श्रीभगवंत प्रसन्न होतात ; एवढी तुळस त्यांना प्रिय आहे !
तुळशीचे आणखी एक महत्त्व आहे. आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हा त्यावर तुळशीचे पान ठेवतो. त्याचा अर्थ, "अत्यंत शुद्ध चित्ताने हा नैवेद्य आपल्याला अर्पण करीत आहे. त्याचा कृपावंत होऊन आपण स्वीकार करावा !" असा होतो. तुळशीच्या ठिकाणी सर्व दोषांचे हरण करण्याचे अद्भुत सामर्थ्य आहे. तेव्हा नैवेद्यात असलेले दोष तिने नाहीसे करावेत; व तिसरे म्हणजे, तुळस श्रीभगवंतांना जेवढी प्रिय आहे, तेवढ्याच प्रेमाने त्यांनी हा नैवेद्य ग्रहण करावा ; अशी भावना आहे.
मनुष्य मेल्यावरही आपण त्याच्या तोंडात तुळशीचे पान ठेवतो. कारण तुळशीच्या आशीर्वादाने तरी त्याचे कल्याण व्हावे, यमदूतांनी त्याला न नेता विष्णुदूतांनी त्या जीवाला न्यावे, असा त्यामागे उद्देश असतो. ह्या तुळशीचे एकंदरच उपासनेच्या प्रांतात फार महत्त्व आहे."
प.पू.सौ.ताईंनी पुढे एक प्रत्यक्ष घडलेली कथा सांगितली आहे. तुळशीमाळ गळ्यात असल्याकारणाने एका व्यापा-याला मृत्युनंतर यमदूतांनी न नेता विष्णुदूतांनी नेले होते. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य या ग्रंथात श्रीसंत गुलाबराव महाराजांच्या 'अदृश्यदीपिका' या ग्रंथात नोंदलेली एक सत्यघटना सांगितलेली आहे. त्यातही दररोज तुलसीची पूजा करणारा व भगवन्नाम घेणारा तो रिसालदार घोड्याने लाथ मारून उडवल्याने तुळशी वृंदावनावर पडल्यावर त्याला विष्णुदूतांनी नेल्याचे वर्णन आहे. म्हणजे तुळशीच्या पूजनाने, स्पर्शानेही असे अद्भुत लाभ होतात. म्हणूनच वारकरी संप्रदायात तुळशीची माळ मोठ्या प्रेमादराने गळ्यात वागवायची, तुळशीची सेवा करण्याची परंपरा संतांनी अवलंबिलेली दिसून येते.
एकूण काय, आपणही दररोज न चुकता व प्रेमाने श्रीतुलसीची जशी जमेल तशी सेवा करायला हवी ! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणूनच सांगतात की,
काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें ।
देवाच्या पूजनें । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥
परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण ।
व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥तु.गा.६२०.३॥

भगवती श्रीतुलसीच्या सेवेचे हे अत्यंत सहजसोपे पण महालाभदायक उपायही जर आपण नाही केले तर आपण करंटेच ठरू ! तेव्हा आता श्री समर्थांच्याच शब्दांत सर्वांना प्रेमाने विनवितो, येथें आळस करूं नका । विवेकीहो ॥दा.बो.१२.१.१॥
( क्रमश: )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

20 Nov 2018

तुळशी सबाह्य हरी पूर्ण - १

तुलसी माहात्म्य - १

भारतीय संस्कृतीमध्ये काही प्रतीके विशेष म्हटली जातात. कारण त्यांचे आध्यात्मिक, लौकिक आणि इतरही असंख्य लाभ आहेत. म्हणूनच या प्रतीकांचा विशेषत्वाने प्रचार-प्रसार केला गेलेला दिसून येतो. त्यांपैकी एक म्हणजे तुलसीवृंदावन होय.
प्रत्येक हिंदू घरासमोर तुळशीचे वृंदावन असणारच. किंबहुना तीच त्या घराच्या हिंदुत्वाची प्रकट निशाणी मानलेली आहे. आपल्या दैवतांमधील सर्वात जास्त लोकप्रिय असणा-या भगवान श्रीविष्णूंची प्रिय पत्नी म्हणून भगवती श्रीतुलसीची घरोघर पूजा केली जाते. त्यातही कार्तिक मासामध्ये या तुलसीपूजनाचे विशेष महत्त्व असते. वैष्णवांच्या दैनंदिन जीवनात, उपासनेत तुलसीचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण मानलेले आहे.
आजची कार्तिक शुद्ध द्वादशी ही खास तुळशीचीच तिथी मानली जाते. आज घरोघर तुलसीविवाह संपन्न होत असतो. कार्तिक द्वादशी ते त्रिपुरी पौर्णिमा या चार दिवसांमधील कोणत्याही एका दिवशी तुलसीविवाह करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. म्हणून या चार दिवसांमध्ये आपण विष्णुप्रिया भगवती श्रीतुलसीचे माहात्म्य यथाशक्ती जाणून घेऊ या व रोज तुलसीचे पूजन करून अगदी थोडक्या प्रयत्नांतच विष्णुकृपा संपादन करू या !
आपल्या पुराणांमध्ये व संतांनी देखील भगवती श्रीतुलसीचे माहात्म्य मनापासून गायलेले आहे. पुराणांत तुलसीच्या दोन कथा येतात. एक कथा शंखचूड-तुलसीची तर दुसरी कथा जालंधर-वृंदा यांची. दोन्ही कथा रूपक कथाच असाव्यात असेच वाटते. त्यातील तपशीलात मी आत्ता पडत नाही. मी येथे श्रीविष्णुपत्नी भगवती तुलसीचेच माहात्म्य भक्तिभावाने मांडणार आहे.
श्रीमद् देवीभागवतात अनुत्तरभट्टारिका भगवती श्रीराधाजींनी आपल्या काही प्रमुख विभूती कथन केलेल्या आहेत. यामध्ये भगवती श्रीतुलसीची गणना केलेली आहे. म्हणूनच आम्ही वैष्णव-वारकरी लोक भगवान श्रीकृष्णांची अतीव प्रिय पत्नी असणा-या भगवती श्रीतुलसीला सदैव वंदन करतो, नित्यनेमाने तिचे पूजन करतो व तिच्या पवित्र पानांनी भगवंतांचे अर्चन करतो. आम्हांला यात अत्यंत समाधान व आनंद मिळतो. तसेच त्याचे असाधारण पुण्यही मिळतेच, ते वेगळे.
तुलसीपत्र हे समर्पणाचे प्रतीक आहे. आपल्याकडे काहीही समर्पण करायचे झाल्यास त्यावर "तुलसीपत्र ठेवले" असेच म्हटले जाते आणि प्रत्यक्षात तुलसीपत्र ठेवलेही जाते. भगवती तुलसीने जसे श्रीभगवंतांना सर्वस्वाचे समर्पण केले, तसेच आम्हीही करतो आहोत, हाच त्यामागे उदात्त भाव असतो. यासाठीच तर वारकरी आपल्या गळ्यात तुळशीची माळ धारण करतात. आपल्याला सर्वात प्रिय असणा-या देहावर तुलसीमाळ धारण करून आम्ही हा देहही श्रीभगवंतांनाच अर्पण केला आहे, हीच त्यातली खरी भावना असते. नैवेद्यावर तुलसीपत्र ठेवले नाही तर भगवंत तो स्वीकारत नाहीत, अशी आपल्याकडे मान्यता आहे. तुळशीच्या आरतीत स्पष्ट म्हटले आहे, "तव दलविरहित विष्णु राहे उपवासी ।"
फार पूर्वीपासून मृत्यूसमयी मुखात तुलसीपत्र व गंगाजल घालण्याचीही आपल्याकडे पद्धत आहे. तुलसी व गंगा या दोन्ही श्रीभगवंतांच्या विभूतीच आहेत, त्यांच्या पवित्र स्पर्शाने मृत्युनंतरची गती चांगली व्हावी, मोक्षलाभ व्हावा हा त्यामागचा पावन उद्देश आहे. सांगायचा मुद्दा हा की, आम्हां हिंदूंचे भावविश्व व लौकिक विश्वही तुळशीने असे भरपूर व्यापलेले आहे.
( http://rohanupalekar.blogspot.in )
भगवती श्रीतुलसीचे माहात्म्य व उपासनापद्धत सांगताना श्रीसंत एकनाथ महाराज म्हणतात,
तुळशी पाहतां आपोआप ।
सहज जाय पापताप ॥१॥
तुळशी सेवा रे जननी ।
जे पढिये जनार्दनी ॥२॥
करितां प्रदक्षणा मनें ।
भवरोगा उपशमन ॥३॥
मुळीं निक्षेपितां जळ ।
कळिकाळा सुटे पळ ॥४॥
जिचे लागतां सिंतोडे ।
कर्माकर्म समूळ उडे ॥५॥
भावें करितां पूजन ।
भगवंतीं होय समाधान ॥६॥
मुळी मृत्तिका कपाळीं ।
जन्ममरणा होय होळी ॥७॥
सेवी एका जनार्दन ।
तुळशी सबाह्य हरी पूर्ण ॥३४०७.८॥

नाथ महाराज म्हणतात, "भगवती तुलसीचे दर्शन झाले तरी पाप व ताप नष्ट होतात. म्हणूनच सज्जनहो, मनोभावे तुलसीचे पूजन करा, कारण तेच भगवान श्रीजनार्दनांना अतिशय आवडते. तुळशीला प्रदक्षिणा घातल्याने भवरोगाचेही उपशमन होते. तुळशीच्या मुळात पाणी घातल्याने कळिकाळही पळ काढतो. तुळशीची कृपा झाल्यास कर्माकर्माचे बंधनही नष्ट होते. मनोभावे तुलसीचे पूजन केल्यावर भगवान श्रीकृष्णांना समाधान होते. तुळशीच्या मुळातली माती देखील इतकी पवित्र होते की ती माती कपाळी धारण केल्यास आपल्या जन्ममरण परंपरेचेच उच्चाटन होते. एवढे सर्व लाभ असल्याने श्रीसंत एकनाथ महाराज अंतर्बाह्य हरिरूप असलेल्या भगवती श्रीतुलसीची प्रेमाने सेवा करतात !"
आपणही आजच्या पावन दिवसापासून मनोभावे श्रीतुलसीचे पूजन, वंदन व सेवा करून धन्य होऊ या ! घरात तुलसी वृंदावन किंवा गॅलरीत तुळशीची कुंडी नसेल तर आजच्या आज जाऊन घेऊन यावी व सेवा सुरू करावी. तुळशीचे रोप लावण्याचेही स्वतंत्र पुण्य शास्त्रांनी सांगितलेले आहे आणि आजच्या कार्तिक द्वादशीपेक्षा दुसरा उत्तम मुहूर्त नाही त्यासाठी ! आजपासून आपण सर्वांनी दररोज सकाळी स्नान झाल्यावर तुळशीला पाणी घालून, एक फूल वाहून पूजन व प्रेमाने वंदन करण्याचा छोटासाच, पण अतीव प्रभावी नियम करायला काय हरकत आहे ? हा नियम छोटासाच असला तरी तेवढ्यानेही भगवान श्रीकृष्णांची कृपा लाभते. अगदी थोडक्या कष्टात मिळणारा हा महालाभच आहे !!
( क्रमश: )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

19 Nov 2018

तुका म्हणे जन्मां आल्याचे सार्थक । विठ्ठलचि एक देखिलिया ॥


आज देवप्रबोधिनी कार्तिकी एकादशी ! भगवान श्रीपंढरीनाथांची कार्तिकी वारी !!
भूवैकुंठ पंढरी, भगवान श्रीपांडुरंग आणि त्यांचे अलौकिक भक्त ; सारेच अत्यंत विलक्षण आहेत, इतर कशाशीच यांची तुलना होऊ शकत नाही. पंढरीत रंगणा-या आषाढी व कार्तिकी या दोन एकादशांच्या अपूर्व सोहळ्याची देखील अन्य कशाशीच तुलना होऊ शकत नाही, तो प्रत्यक्ष अनुभवण्याचाच गूढरम्य विषय आहे !
भूवैकुंठ पंढरीचे माहात्म्य अतिशय समर्पक शब्दांत सांगताना भक्तश्रेष्ठ श्री तुकोबाराय म्हणतात,
अवघींच तीर्थें घडलीं एक वेळां ।
चंद्रभागा डोळां देखिलिया ॥१॥
अवघींच पापें गेलीं दिगंतरी ।
वैकुंठ पंढरी देखिलिया ॥२॥
अवघिया संता एक वेळां भेटी ।
पुंडलिक दृष्टि देखिलिया ॥३॥
तुका म्हणे जन्मां आल्याचे सार्थक ।
विठ्ठलचि एक देखिलिया ॥४॥

"जगातील यच्चयावत् सर्व तीर्थांच्या दर्शनाचे पुण्य भूवैकुंठ पंढरीतील परमपवित्र चंद्रभागा नदीच्या केवळ एका वेळच्या दर्शनानेच प्राप्त होते. भूवैकुंठ पंढरपुराचे मनोभावे दर्शन झाल्याबरोबर अवघी पापे दशदिशांना पळून जातात. भक्तश्रेष्ठ पुंडलिकांचे दर्शन हे सर्व संतांच्या दर्शनासारखेच आहे. खरोखरीच, जन्माला आल्याचे सार्थक हे भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीविठ्ठलांचे दर्शन झाल्यानेच केवळ होते !"
पंढरीच्या या सावळ्या सगुण परब्रह्माचे रूप इतके गोड आहे की बस ! अहो, साक्षात् भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य आणि भगवान श्री ज्ञानेश्वर माउली जेथे त्या अपूर्व-मनोहर रूपमाधुरीने वेडावले, तेथे आपला काय हो पाड ? युगानुयुगे हेच ते गोजिरे साजिरे गोवळे परब्रह्म नेणो कित्येकांना जन्माचा वेध लावून उभे आहे. या सुकुमार मदनाच्या पुतळ्याचे प्रेम आल्यागेल्याला असे झडपते की काय सांगायचे. पंढरीच्या या सावळ्याचे प्रेमच जबरी भूत आहे, त्या दिव्य प्रेमाने एकदा झडपले की कोणताही उपाय करा, काही केल्या ते सोडत नाही...
आणि ज्याला ते झडपते त्याला तरी कुठे सुटायचे असते म्हणा त्यातून. त्या प्रेमात आपादमस्तक बुडून जाण्यात जी गोडी, जो आनंद आहे तो अन्य कश्शातच नाही. म्हणूनच तर श्री तुकोबा म्हणतात, पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरी सुकाळ ॥ पंढरीत नामाचा कल्लोळ आहे नि प्रेमाचा सुकाळ आहे. आणि त्याच दैवी प्रेमाचे साकार रूप विटेवरही उभे आहे, लुटाल तितके लुटा, कधीच काही कमी नाही होणार त्यात. तुम्हां आम्हां भोळ्या भाविकांसाठीच तर ही सुखमिराशी अखंडित आहे ना !
हे असे एकमात्र तीर्थ आहे जिथे कळसाच्या दर्शनानेही मोक्ष लाभतो. श्री तुकोबाराय गर्जून सांगतात, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ हा नाश अहंकाराचा ॥ एरवी शेवटच्या क्षणापर्यंत पाठ न सोडणारा आपला अहंकार, पंढरीत येऊन मंदिराच्या कळसाचे दुरून जरी दर्शन झाले तरी तत्काळ नष्ट होतो, त्याचे नावच राहात नाही. सर्वत्र एक विठ्ठलचि दिसू लागल्यावर आपला अहंकार कुठे शिल्लक राहणार ?
पंढरीत नाम आहे, रूप आहे, भाव आहे आणि प्रेम आहे. या चतुर्विध संगमात भक्त एकदा का न्हायला की त्याचे काम फत्ते ! पंढरीचे सगळेच अलौकिक आहे, किती आणि काय बोलू त्याबद्दल ? शब्दांच्या कुबड्यांना तिथे काहीच किंमत नाही. अनुभवच घ्यावा लागतो त्यासाठी ज्याचा त्याने. पण त्यासाठी आधी पंढरीचे उघडे सगुणब्रह्मच पूर्णत्वाने वोळले पाहिजे. त्या प्रेममय सगुण मेघश्याम लावण्यसुंदराने आपल्या प्रेमपिशाच्चाची बाधा करवायला हवी आपल्याला. ते सर्वस्वी त्यांच्याच हातात आहे.
ही प्रेमबाधा व्हावी आणि कायमचीच टिकून राहावी, यासाठीच आपण सर्वांनी त्या त्रिभुवनगुरु परमानंदकंद भगवान श्रीविठ्ठलांच्या अखंड नामगजरात आजची ही कार्तिकी हरिदिनी साजरी करू या आणि आनंदाचा धणीवरी उपभोग घेऊ या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

कार्तिकी एकादशीचे पूर्वीचे चिंतन खालील लिंकवर आहे, तेही आवर्जून पाहावे.
आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो
https://rohanupalekar.blogspot.com/2016/11/blog-post.html?m=1

9 Nov 2018

भगवान श्री माउलींचा ज्ञान-तेजोत्सव - लेखांक - ४


श्रीभगवंतांशी एकरूपत्व झाल्यावरही अनन्यभक्तांचे भक्ती करणे काही सुटत नाही. त्या जगावेगळ्या भक्तिसुखाला लाचावलेले भक्त अद्वैत स्थितीला विघ्नच मानतात. मग भगवंतांशी एकरूप झालेले ते योगी पुन्हा द्वैताची कल्पना करून आपले भक्तिसुख पुरेपूर अनुभवतात. हीच परमार्थाची चरमसीमा आहे, यापरते कोणतेही अनुभवधन नाही. असा हा अलौकिक भक्तिसुखानंद अखंड व अविरतपणे अनुभवणे हीच भगवान श्री माउलींच्या ज्ञान-तेजोत्सवाची परिपूर्ण स्थिती असून हाच त्या तेजोत्सवाचा परमोत्कर्ष आहे. यालाच माउली 'महासुखाची दिवाळी' असे सार्थ नाव देऊन गौरवतात.
या परमोत्कर्षाची सर्व अंगे स्पष्ट करताना भगवान सद्गुरु श्री माउली म्हणतात,
तैसें होय तिये मेळीं ।
मग सामरस्याचिया राउळीं ।
महासुखाची दिवाळी ।
जगेंसीं दिसे ॥ ज्ञाने.६.२८.३८९॥

श्रीसद्गुरुकृपेने लाभलेले कृपायुक्त नाम घेता घेता साधक विवेकी होतो व त्याला साधनेचा सर्वांगीण अनुभव हळूहळू येऊ लागतो. त्याच्या चित्तात बोधाची दीपावली साजरी होऊन तो भगवंतांशी भाव-संयोग होऊन साधकत्वाची स्थिती ओलांडून योगी अवस्थेला पोचतो. यानंतर मग ते अद्वैतही गिळून तो भक्तीसाठी द्वैताची पुन्हा कल्पना करून ते भजनसुख पुरेपूर अनुभवतो. या स्थितीचे वर्णन करताना माउली म्हणतात की, "त्या हरिरंगी रंगलेल्या, एकरूप झालेल्या अर्थात् भगवंतांशी सामरस्य झालेल्या योग्यासाठी मग सर्वत्र अखंड महासुखाची दिवाळीच साजरी होत असते. सूर्याच्या घरी प्रकाशाशिवाय आणखी काय असणार ? तसे श्रीभगवंतांशी समरस झालेल्या या महात्म्याच्या आत-बाहेर, सर्वत्र फक्त महासुखच भरून राहिलेले असते. आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥ हाच त्याचा नित्यानुभव असतो. किंबहुना तो योगी ब्रह्मानंदाचे साकार रूपच होऊन ठाकलेला असतो. आणि त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकालाही त्या महात्म्याच्या कृपेने ती महासुखाची दीपावली अनुभवता येते."
दिवाळी हा काही वैयक्तिक साजरा करायचा सण नाही. तो तर अवघ्या समाजाचा एकत्रित आनंदानुभव आहे. या महात्म्याचेही तसेच असते. तो जरी आत्मानुभव आतून एकटाच उपभोगत असला तरी, त्याची सर्व प्रकारची प्रचिती देखील आनंदमयच झालेली असल्यामुळे, त्याला अवघे जगही आनंदमयच दिसत असते. त्याचा तो आनंद त्याच्या संपर्कात येणा-या प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार अनुभवायला मिळत असतो. हाच त्या महात्म्याचा भाऊबीज सोहळा अर्थात् विश्वबंधुत्वाचा सोहळा होय !
( http://rohanupalekar.blogspot.in )
दुसरेपणाची भावना हीच द्वेष किंवा मत्सराला जन्माला घालत असते. जर मला माझ्याशिवाय दुसरा कोणीच अनुभवाला येत नसेल तर मी द्वेष करणार कोणाचा ? आपण आपला स्वत:चाच द्वेष कधीतरी करू शकू का ? भगवंतांशी एकरूप झालेल्या भक्ताला सर्वत्र स्वत:चाच विस्तार जाणवत असतो. म्हणजे द्वैतच उरलेले नाही, मग द्वैताचे फळ असणारा मत्सर किंवा द्वेष येणार कोठून ? सगळे जगच त्याला बंधुतुल्य, आत्मतुल्य वाटत असते. महासुखाची अशी दिवाळीच त्या महात्म्याला विश्वबंधुत्वाचे अखंड भान प्रदान करते. त्याला वेगळी भाऊबीज साजरी करावीच लागत नाही. असा महात्माच मग स्वत:साठी काहीही न मागता अवघ्या जगाच्या भल्यासाठी भगवंतांकडे 'पसायदान' मागतो. भगवत् सामरस्याने आनंदमय झालेल्या महात्म्याच्या संपर्कात आलेला प्रत्येक जीव मग त्या अपूर्व आनंदाचा कण लाभून सुखाची दिवाळीच साजरी करू लागतो. महासुखाची दिवाळी जगेंसीं दिसे । असे म्हणताना माउली, अशी दिवाळी तो महात्मा जगासह साजरी करतो, हेच तर दाखवून देत आहेत. याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचाय का ? मग माउलींच्या या बोधाबरोबर आत्मरूप पांडुरंगांच्या पंढरीची वारी करा एकदा, तरच कळेल माउलींना अभिप्रेत असणारी 'महासुखाची दिवाळी' म्हणजे काय ते !!
भगवान श्री माउलींनी या चार ओव्यांमधून मांडलेला "ज्ञान-तेजोत्सव" आपण त्यांच्याच कृपेने गेले चार दिवस पाहात आहोत. यातले केवळ पहिले दोनच दीपोत्सव आपण साधक म्हणून अनुभवू शकतो. पुढचे दोन दीपोत्सव हे आपल्या अखत्यारीतले नाहीत. ती महात्म्यांची अनुभूती आहे ; पण माउलींच्या दिवाळी क्रमात आहेत म्हणून आपण त्यावरही विचार केला.
भगवान श्री माउलींना अभिप्रेत असणारा हा अद्भुत दीपोत्सव आम्हांला कसा व केव्हा अनुभवायला मिळणार ? हा प्रश्न कोणालाही पडणे स्वाभाविकच आहे. त्याचे सुंदर उत्तर माउलींचे परमकृपांकित सत्पुरुष प.पू.श्री.मामा देशपांडे महाराजांनी आपल्या 'अमृतबोध' या ग्रंथात दिलेले आहे. ते म्हणतात, "संतांचे स्मरण करून, त्यांना शरण जाऊन त्यांना हृदयात स्थापन करावे. हृदयातल्या त्यांच्या वास्तव्याने जे घडेल त्यालाच 'दिवाळी', 'दसरा' म्हणतात. तोच खरा सण !"
म्हणून या अलौकिक दीपोत्सवाचे गेले चार दिवस आपण जे चिंतन केले त्याचे सार सांगायचे झाले तर असे सांगता येईल की, "श्रीसद्गुरूंना अनन्य शरण जाऊन त्यांनी सांगितलेली साधना नेमाने व प्रेमाने करणे होय !" त्यातूनच सर्व गोष्टी सहजासहजी घडून येतात व तुम्हां-आम्हांलाही घरबसल्या हा ज्ञान-तेजोत्सव सांगोपांग अनुभवायला मिळतो. म्हणून "श्रीसद्गुरुबोधावर एकनिष्ठ राहून साधना व सेवा करण्याची, संतांच्या अद्भुत वाङ्मयाचे चिंतन-मनन करून त्यानुसार वागण्याची सर्वांना सद्बुद्धी लाभो",  याच दीपावली शुभेच्छा व्यक्त करून आपणां सर्वांचे अभीष्ट चिंतितो व श्री माउलींच्याच परमकृपेने झालेली ही सर्व लेखनसेवा त्यांच्याच श्रीचरणीं तुलसीदल रूपाने प्रेमादरपूर्वक समर्पून आपली रजा घेतो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

8 Nov 2018

भगवान श्री माउलींचा ज्ञान-तेजोत्सव - लेखांक - ३


श्रीसद्गुरूंनी करुणाकृपेने दिलेली साधना प्रेमाने व नेमाने करू लागल्यानंतर प्रथम त्या साधकाला विवेकाची दीपावली अनुभवायला मिळते. विवेक जागल्याने त्याचे साधनही उत्तमरित्या सुरू होते. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणत असत की, "श्रीसद्गुरु केवळ, 'पहाटे साधनेला बसत जा !' एवढे एकच वाक्य सांगून त्या शिष्याचे सगळे आयुष्यच बदलून टाकतात." फार यथार्थ आणि अर्थपूर्ण वाक्य आहे हे. पहाटे उठायचे म्हणजे रात्री लवकर झोपले पाहिजे, त्यासाठी वेळेवर जेवले पाहिजे. सर्व कामांचे नियोजनही त्याबरहुकूम करायला हवे. म्हणजे आळस घालवावा लागणार, वेळच्यावेळी सगळी कामे उरकावी लागणार. त्यात धसमुसळेपणा करता उपयोगी नाही, नाहीतर अजून कामे वाढणार. म्हणजे वागण्या-बोलण्यात नियमितपणा, कौशल्य आणावे लागणार. एका दगडात पाहा त्यांनी किती गोष्टी सुधारल्या आपल्या. या सगळ्या प्रक्रियेलाच श्री माउली 'विवेकाची दीपावली' म्हणतात.
काल आपण पाहिलेल्या ओवीत माउली म्हणतात की, सूर्य पूर्वेला उगवला तरी त्याचवेळी इतरही दिशांचा अंधार नष्ट होतोच. तसे श्रीसद्गुरूंची कृपा होऊन साधन मिळाले की आपल्या इतरही गोष्टींमध्ये सुधारणा होते. अवगुणांचा काळा अंधार त्या कृपामय विवेकदीपाच्या सोनप्रकाशात हळूहळू संपूर्ण नष्ट होतो.
विवेकाचा एक जीवश्चकण्ठश्च मित्र देखील अखंड त्याच्या बरोबरच असतो. ते दोघे एकमेकांना कधी सोडतच नाहीत. त्या मित्राचे नाव आहे वैराग्य ! यांची कायम जोडगोळीच असते. विवेक आला की पाठोपाठ वैराग्य येतेच.
वैराग्य म्हणजे आपले ध्येय जो आत्मसाक्षात्कार, त्याच्या प्राप्तीच्या आड येणा-या प्रत्येक गोष्टीबद्दल तिरस्काराची किंवा उदासीनतेची भावना. जी गोष्ट आपल्या ध्येयाच्या विरुद्ध असेल ती प्रत्येक गोष्ट प्रयत्नपूर्वक व निर्धाराने पूर्णपणे टाळायला हवी. यासाठी आधी आपले ध्येयच आपली priority व्हावी लागते. हे कठीण काम प्रत्यक्षात येण्यासाठीचे जे धैर्य आणि खंबीरपणा लागतो, तो या विवेकयुक्त वैराग्यामुळेच लाभतो.
वैराग्य म्हणजे घरदार, बायकापोरे सोडून अंगाला राख फासून जंगलात जाणे नव्हे. वैराग्य ही आतून येणारी भावना आहे, ती केवळ प्रयत्नाने साध्य होत नाही. सोप्या शब्दांत सांगायचे तर, वैराग्य म्हणजे कोणत्याही गोष्टीचा मर्यादेत व सयुक्तिक उपभोग घेण्याची भावना. फार मिळाले म्हणून माज नको नि हातचे गेले म्हणून रडारड नको ; इतपत वैराग्य बाणले तरी त्याचा खूप फायदा होतो. आणि श्रीसद्गुरूंनी दिलेल्या नामसाधनेच्या योगाने हळूहळू असे वैराग्य आतूनच दृढ होत जाते. हे वैराग्यच आत्मलाभाचे भाग्य सोबत घेऊन येते, असे माउलींनी म्हटलेले आहे. म्हणूनच ते या वैराग्याला अध्यात्ममार्गातला सर्वात विश्वासू सखा म्हणतात. विवेकाच्या दीपोत्सवाचा प्रकाश असा वैराग्य-तेजाने भारलेला असतो. हे साधनेच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते.
या कृपाजन्य विवेक आणि वैराग्यामध्ये साधनेने जसजशी वाढ होऊ लागते, तसतशी अधिकाधिक समाधानाची प्राप्ती होते. समाधान जेव्हा आपल्या चित्तात दृढ होते, तेव्हा तेथून इतर सर्व दोष काढता पाय घेतात. श्री गोंदवलेकर महाराज म्हणूनच म्हणतात की, "रामराया समोर प्रकट होऊन वर माग म्हणाला तर आपण समाधानच मागावे. गाय आली की तिचे वासरू न बोलावता मागे येतेच. तसे समाधान आले की बाकी सगळे आपोआप येते !" समाधान म्हणजे भगवंत ठेवतील त्या स्थितीत आनंदाने राहणे होय. यातूनच मग साधकाच्या चित्तात शरणागती दृढ होऊ लागते.
अशाप्रकारे आपली साधना हीच जेव्हा आपले सर्वस्व होते, तेव्हा मग भगवंतही त्या साधकाच्या प्रेमभाग्याने त्याच्याकडे ओढले जातात आणि त्याच्या त्या शुद्ध अंत:करणात स्वत: प्रकट होतात. त्यावेळी त्या भाग्यवंत साधकाला खरी ज्ञान-दीपावली अनुभवाला मिळते.
( http://rohanupalekar.blogspot.in )
सद्गुरु श्री माउली या विवेक-दीपोत्सवाचे सुंदर वर्णन करताना म्हणतात,
मी अविवेकाची काजळी ।
फेडूनि विवेकदीप उजळीं ।
तैं योगियां पाहे दिवाळी ।
निरंतर ॥ ज्ञाने.४.८.५४॥

त्या शरणागत शिष्याच्या अंत:करणात सद्गुरुकृपेने उजळलेल्या विवेकदीपावर साचलेली कर्मजन्य अविवेकाची काजळी प्रत्यक्ष भगवंतच मग स्वत: दूर करून, त्याचा तो विवेकदीप लख्ख पेटवतात. खुद्द भगवंतांनीच अशी कृपा केल्यावर तो साधक, साधकत्वाची सीमा ओलांडून योग्याच्या स्थितीला प्राप्त होतो. त्याचा भगवंतांशी भाव-संयोग होऊन तो निरंतर ज्ञान-दीपावली साजरी करू लागतो. त्याचा तो विवेकदीप अक्षय बोध-तेजाने अखंड प्रकाशमान होऊन त्या योग्यालाही सर्वार्थाने अंतर्बाह्य तेजोमय करतो. या स्थितीतून मग तो पुन्हा कधीच मागे येत नाही. तो भगवंतांशी एकरूपच होऊन राहतो.
साधकत्वातून योग्याच्या स्थितीत पदार्पण करणे ही त्यावेळी त्या शिष्यासाठी एका नवीन जीवनाची प्रसन्न सुरुवातच असते. हेच त्याच्यासाठी दिवाळीच्या पाडव्याला सुरू होणारे नवीन वर्ष म्हणायला हवे.
दिवाळीच्या पाडव्याला विक्रम संवत्सराची वर्षप्रतिपदा असते. श्रीसद्गुरुकृपेने प्रपंचाचा, जन्म मरणाचा 'आवर्त-क्रम' सोडून तो शिष्य 'त्रिविक्रम' भगवंतांच्या राज्यात साधनेच्या 'विक्रमी' यशासह प्रवेश करतो आणि ब्रह्मानुभूती लाभून अखंड सुखी होऊन जातो. त्याच्यासाठी मग दिवाळी हा चार दिवसांचा वेगळा सण न राहता, त्याचे अवघे जीवनच नित्यसुगंधी व महन्मंगल असा दीपोत्सव होऊन ठाकते. तो स्वत:च ब्रह्मानंदाचा अक्षय रत्नदीप होऊन निरंतर आनंदात रममाण होऊन जातो. अशा योग्याच्या तेजप्रकाशात इतरही जीवांना मग सुखाने मार्गक्रमण करता येते. भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींना अभिप्रेत असणारा हाच तो "ज्ञान-तेजोत्सवा"चा तिसरा आणि महत्त्वाचा दीपोत्सव होय !!
बलिप्रतिपदा ही भक्तश्रेष्ठ असुरसम्राट बलिराजाच्या नावाने साजरी होणारी तिथी आहे. बलिराजासाठीच भगवान श्रीवामनांचा अवतार झाला. त्या वामनरूपातील श्रीभगवंतांनी बलिराजाकडे तीन पावले जमीन मागितली. बलीने देतो म्हटल्यावर त्यांनी एका पावलात सारी पृथ्वी म्हणजेच मृत्युलोक, दुस-या पावलात आकाशातील संपूर्ण चराचर सृष्टी अर्थात् स्वर्गादी लोक व्यापले. आता तिसरे पाऊल ठेवणार कुठे ? जागाच शिल्लक नव्हती. तेव्हा भक्तराज बलीने नम्रपणे आपले मस्तक झुकवले व तो भगवंतांना पूर्ण शरण आला. अशी त्याची शरणागती पूर्ण झाल्याबरोबर परमकनवाळू श्रीभगवंतांनी त्याच्यावर आपल्या श्रीचरणाचेच दिव्य कृपाछत्र घातले. परमपावन हरिपादपद्म मस्तकी पडल्याबरोबर, बलिराजा आपली मूळची असुरभावरूप काजळी आणि जीवभावच नष्ट झाल्याने अंतर्बाह्य हरिमयच होऊन ठाकला. सद्गुरु श्री माउली या तिस-या ओवीतून हीच तर प्रक्रिया सांगतात. ज्याक्षणी साधकाची शरणागती पूर्ण होते, त्याच क्षणी श्रीभगवंत त्याच्या ठायी असणारी सर्व प्रकारची काजळी नष्ट करून, त्याच्या चित्तात अपूर्व बोधाची दीपावली प्रकट करतात. त्याबरोबर तो साधक जीवत्वाची मर्यादा कायमची ओलांडतो व त्याचा श्रीभगवंतांशी संयोग होऊन तो योगी अवस्थेला प्राप्त होतो. पुन्हा कधीच तेथून त्याचे पतन होत नाही.
भगवान श्रीवामनांनी तीन पावलात सर्व व्यापले म्हणून त्यांनाच 'त्रिविक्रम' म्हणतात. या तिस-या दीपोत्सवाचे औचित्य पाहा ; श्रीभगवंत देखील साधकाचे सर्वस्व या साधकीय जीवनातील तिस-या दीपोत्सवातच व्यापतात. याही अर्थाने ते त्रिविक्रम म्हटले जात असतील का ? त्यांची लीला खरोखरीच अनाकलनीय आणि अद्भुत असते, हेच खरे !
साधकाचे असे अंतर्बाह्य योगी होणे, हाच भगवान सद्गुरु श्री माउलींना अभिप्रेत असणा-या "ज्ञान-तेजोत्सवा"चा तिसरा दीपोत्सव आहे !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

7 Nov 2018

भगवान श्री माउलींचा ज्ञान-तेजोत्सव -लेखांक - २


भगवान श्री माउलींना अभिप्रेत असलेली, श्रीसद्गुरुप्रदत्त नाम हीच साधकासाठी दीपावली असते, हा भाग आपण काल पाहिला. असा नामदीप शिष्याच्या अंत:करणात सद्गुरूंनी प्रज्वलित केल्यावर, त्या दीपाच्या शांत-स्निग्ध ब्रह्म-प्रकाशात त्या साधकाचे अवघे विश्वच उजळून निघते.
उजळून निघते म्हणजे नक्की काय होते ? भगवान श्री माउलींनी या सर्व प्रक्रियेवर फार सुंदर ओवी घातलेली आहे. ते म्हणतात,
जैसी पूर्वदिशेच्या राउळीं ।
उदया येतांचि सूर्य दिवाळी ।
कीं येरीही दिशां तियेचि काळीं ।
काळिमा नाहीं ॥ ज्ञाने.५.१६.८६ ॥

"पूर्वदिशेच्या क्षितिजावर भुवनभास्कराचे आगमन झाले की, ज्याप्रमाणे केवळ पूर्वच नाही तर इतरही नऊ दिशांमधला अंधार नष्ट होऊन त्याही त्याच अपूर्व सूर्यतेजाने उजळून निघतात, त्याचप्रमाणे श्रीसद्गुरूंनी कृपापूर्वक दिलेल्या त्या दिव्य नामदीपाच्या प्रकाशाने सर्व दुर्गुण जाऊन शिष्याचे सारे अस्तित्वच उजळून निघते, तेजस्वी होते."
श्रीसद्गुरूंनी कृपा केल्यावर शिष्याच्या मनात प्रथम एक अद्भुत विश्वास निर्माण होतो, शब्दांनी सांगता येणार नाही अशी एक अपूर्व निश्चिंतता त्याच्या मनात निर्माण होते.
सद्गुरुकृपेचे मुख्य फळ अथवा पहिल्यांदा जाणवणारे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे "अंत:करणात जागणारा विवेक". हा विवेकच शिष्यहृदयात कृपेची दिवाळी उजळल्याचे उच्चरवाने सांगत असतो. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या एका अभंगात म्हणतात, "विवेक तो मुख्य कृपेचे लक्षण ।"
आपण कसे वागलो म्हणजे आपल्या सद्गुरूंना संतोष होईल ? काय वागल्याने त्यांना त्रास होईल ? अशा प्रकारचे, अनुग्रहापूर्वी कधीच न आलेले विचार आपल्या चित्तात वारंवार निर्माण होऊ लागतात. याच विचारांना 'विवेक' म्हणतात. या विवेकामुळेच साधकाच्या मनाची साधनेच्या अनुकूल जडण-घडण होऊ लागते. त्या साधनेला बाधक ठरू शकणारे सर्व विचार, कल्पना आपोआपच नष्ट होऊ लागतात. साधना मिळाल्यानंतर त्या साधनेचा निर्वाह योग्य रितीने होण्यासाठी आवश्यक असणारी अशी मनाची, चित्ताची, शरीराची व सभोवतालच्या परिस्थितीची अनुकूलता, हीच त्यासमयी त्या साधकासाठी सुखाची जणू दिवाळी असते, असे श्री माउली या ओवीतून सूचित करीत आहेत.
साधना करणे म्हणजे आपल्या सगळ्याच सवयी बदलण्यासारखे असते. साधना म्हणजे नियमितता ! आपल्या सर्व वृत्तींचे, विचारांचे, क्रियांचे नियमन करणे हे साधनेचे पूर्वांग आहे. या पूर्वांगाच्या यशस्वितेवरच साधनेची प्रगती अवलंबून असते.
आपला जन्मजात बाळगलेला अव्यवस्थितपणा, पाचवीला पूजलेला आळस, कंटाळा, आपली जीवाभावाची सखी असणारी चंचलता, धरसोडवृत्ती, कधीच शेवटपर्यंत न टिकणारा उत्साह, आपली कायम पाठराखण करणारा संशय, वेळकाढूपणा, फुकट नको ते विषय चघळत बसण्याची मनाची खोड इत्यादी अनेक दुर्गुणांवर प्रयत्नपूर्वक मात केल्याशिवाय साधना नीट सुरूच होऊ शकत नाही. श्रीसद्गुरुकृपेने अंत:करणात उजळलेला हाच विवेकदीप या सर्व प्रकारच्या अवगुणांच्या नाशामध्ये फार मोठी भूमिका बजावत असतो.
( http://rohanupalekar.blogspot.in )
"नियमितता" या शब्दातच "मितता" अनुस्यूत आहे. माउलींना ही मितता अर्थात् मर्यादितता किंवा मोजकेपणा देखील अभिप्रेत आहेच. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात अभ्यासयोग सांगताना फार सुंदर ओव्यांमधून साधनेशी संबंधित असणा-या या मोजकेपणावर प्रकाश टाकलेला आहे. साधना करणा-या साधकाने आपल्या वागण्यात ही मितता बाणवावीच लागते, नाहीतर साधना परिपूर्ण होऊ शकत नाही. माउली म्हणतात की, जेवण, झोप, दैनंदिन कार्ये, विविध उपभोग इत्यादी प्रत्येक गोष्टीत साधकाने मर्यादा बाळगावी, श्रीसद्गुरूंकडून त्याची युक्ती समजून घेऊनच प्रत्येक गोष्ट करावी, म्हणजे सुख लाभून साधना निर्विघ्नपणे होते. ही जाणीव व त्यानुसार अंमलबजावणी करण्यातही हा विवेकच आपल्याला ताकद देत असतो. याही अर्थाने बघितले तर, असा दुर्लभ विवेक निर्माण होऊन टिकून राहणे व त्याद्वारे साधनानुकूल जीवन घडणे ही त्याकाळात साधकासाठी आनंदाची दिवाळीच नाही का ?
ज्याप्रमाणे पूर्वेला सूर्योदय झाला की बाकीच्याही दिशा प्रकाशमान होतात, त्याप्रमाणे सद्गुरुकृपेचा दीप हृदयात प्रकाशला की असे सर्व बाजूंना त्याचे "विवेकतेज" फाकते आणि त्या स्नेहमयी तेजामध्ये तो साधक सुस्नात होऊन शुद्ध होऊ लागतो. दररोजच्या साधनेने हे तेज हळूहळू त्याच्या चित्तात सद्बुद्धीच्या माध्यमातून प्रकटते व पर्यायाने त्याच्या सर्वच अस्तित्वामध्ये अभिनव दीपोत्सवच साजरा करू लागते. ही दीपकलिका छोटी असली तरी ती मोठ्या तेजाने तळपणारी असते, कारण तिच्या पाठीशी श्रीसद्गुरुकृपेचे अतुलनीय बळ असते !
दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे अमावास्येला असते. अमावास्येला सूर्य व चंद्र एकाच राशीत असतात, म्हणून आपल्याला चंद्र दिसत नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला मनाचा कारक म्हणतात. मन ही वास्तविक मूर्तिमंत कल्पनाच आहे व त्या कल्पनेचा अनाकलनीय विस्तार म्हणजे हा मायिक प्रपंच ; म्हणून प्रपंचाचे द्योतक असणारा हा चंद्र, सद्गुरुकृपारूपी सूर्य उगवल्याने पूर्ण अस्त पावतो व कृपेने जागलेल्या त्या विवेकतेजाच्या प्रकाशात साधकाची वाटचाल सुरू होते. आधी फक्त प्रपंच एके प्रपंच करणारा साधक हळूहळू परमार्थात रस घेऊन प्रेमाने साधना करू लागतो. प्रपंचातली अमावास्या ही परमार्थात खरी लक्ष्मीच होय. याच कृपालक्ष्मीची आराधना करणे अर्थात् श्रीसद्गुरूंनी दिलेली साधना नेमाने व प्रेमाने करणे, हेच मग त्या साधकासाठी खरे लक्ष्मीपूजन ठरते ! हाच सद्गुरु श्री माउलींना वरील ओवीतून अभिप्रेत असलेल्या अपूर्व-मनोहर "ज्ञान-तेजोत्सवा"चा दुसरा दीपोत्सव आहे !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

6 Nov 2018

भगवान श्री माउलींचा ज्ञान-तेजोत्सव - लेखांक - १



नमस्कार सुहृदहो,
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुम्हां-आम्हां भारतीयांसाठी दीपावली हा सर्वात मोठा आणि आनंद उत्साहाने मुसमुसणारा, सगळ्यांना हवाहवासा वाटणारा सण आहे. या सणाचा उत्साह आणि आनंद काही औरच असतो.
आपल्या संतांनी देखील या सणाचा आपल्या वाङ्मयातून वारंवार संदर्भ देत यावर फार सुंदर चिंतन मांडलेले आहे. "विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी ।" म्हणणारे संत या सणाच्या प्रतीकांमधून फार सुरेख विचार मांडतात. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी तर बहारच केलेली आहे. त्यांनी श्रीज्ञानेश्वरीत एकूण चार ओव्यांमध्ये दिवाळीचा उल्लेख केलेला आहे. या चारही ओव्यांमधून माउलींना अभिप्रेत असणारा दिवाळीचा अर्थ "ज्ञानाचा प्रकाशोत्सव" हाच असला, तरी तेवढ्याच सीमित अर्थाने माउली कधीच बोलणार नाहीत. त्यांमधून अर्थाच्या असंख्य सूक्ष्म छटा अत्यंत अप्रतिमपणे त्यांनी दाखवून दिलेल्या आहेत.
या चारही ओव्या जरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भांनी आलेल्या असल्या, तरी त्यांची एका विशिष्ट क्रमाने मांडणी केली की, त्यातून साधकाचा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास फार सुंदर रितीने उलगडतो. त्या त्या साधकीय स्थितीतील दीपावली माउलींनी खास त्यांच्या विशेष शैलीत त्या चार ओव्यांमधून मांडलेली आहे. आजपासून या दीपावलीच्या पावन पर्वावर आपण माउलींच्याच कृपेने, त्यांना अभिप्रेत असणारा हा "ज्ञान-तेजोत्सव" यथामती सविस्तर अभ्यासून एक अनवट पद्धतीची दीपावली साजरी करू या !!
( http://rohanupalekar.blogspot.in )
आपल्या मूळच्या परब्रह्मस्वरूपाची विस्मृती हेच अज्ञान बळावल्याने, परब्रह्माचाच अंश असणारा जीव स्वत:ला बद्ध समजून बसतो आणि कर्माचा अहंकार धरून प्रपंचाच्या, जन्म-मरणाच्या चक्रात अडकून पडतो. जेव्हा त्याची कर्मसाम्यदशा येते, तेव्हा त्याला आपोआपच आपल्या मूळ स्वरूपाला जाणण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ लागते. महद्भाग्यने निर्माण झालेल्या त्या सदिच्छेचा परिणाम म्हणून, त्याला जमतील, सुचतील तसे यथामती प्रयत्नही तो मनापासून करू लागतो. जसजसा त्याचा तो निर्धार व श्रद्धा बळावते, तशी श्रीभगवंतांना त्याची दया येते व त्यामुळे त्याच्या पूर्वपुण्याईचे आणि भगवत्कृपेचे फळ म्हणून त्याला सद्गुरु भेटतात व त्याच्यावर कृपा करून त्याला दिव्यनाम देतात. त्यामुळे तो बद्ध जीव मोक्षेच्छेने मुमुक्षू होतो व सद्गुरुकृपेने तोच 'साधक' या स्थितीला प्राप्त होतो.
अशा साधकासाठी, श्रीसद्गुरूंनी दिलेले कृपायुक्त नाम हीच ज्ञानाची दिवाळी असते, कारण ते नामच त्याच्या अंत:करणात पहिल्यांदा साधनेच्या रूपाने अगदी छोटा का होईना, पण आत्मज्ञान-प्रकाशच निर्माण करीत असते. त्याच्या चित्तातील अज्ञानरूपी नरकासुराचा भगवंतच श्रीसद्गुरुरूपाने वध करून तेथे अपार करुणेने नामबीज पेरून कृपा-दीप लावतात. साधकासाठी हीच नरकचतुर्दशी होय !
या अतिशय दुर्लभ असणा-या व परमभाग्यानेच घडणा-या प्रक्रियेविषयी भगवान श्री माउली म्हणतात,
सूर्यें अधिष्ठिली प्राची ।
जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैसी वाचा श्रोतयां ज्ञानाची ।
दिवाळी करी ॥ज्ञाने.१५.०.१२॥

"ज्याप्रमाणे पूर्वदिशेला सूर्य उगवला की अवघ्या जगाला प्रकाशाचे राज्य प्राप्त होते, त्याप्रमाणे सद्गुरुमुखातून प्राप्त झालेल्या कृपायुक्त नामाच्या श्रवणाबरोबर शरणागत शिष्याच्या अंत:करणात ज्ञानाचे लक्ष लक्ष दीप उजळतात, त्याच्याठायी जणू बोधाची दिवाळीच बहराला येते."
श्री माउलींनी आपल्या एका नामपर अभंगातही या नामसाधनेलाच 'दिवाळीचा सण' असे संबोधले आहे. ते म्हणतात,
यश कीर्ती वानू नेणे मी वाखाणू ।
रामकृष्ण आम्हां सणु नित्य दिवाळी ॥१॥

"सद्गुरुप्रदत्त नामस्मरण त्यांनी सांगितलेल्या युक्तीनुसार करणे हे आमच्यासाठी अखंड दिवाळीचा सण नित्य निरंतर साजरा केल्यासारखेच आहे", असे माउली स्वानुभवपूर्वक सांगतात.
श्रीसद्गुरुकृपेने दिव्यनामाची प्राप्ती होणे, हा भगवान श्री माउलींच्या "ज्ञान-तेजोत्सवा"चा पहिला दीपोत्सव आहे !
असा अलौकिक दिव्यनामदीप उजळल्यामुळे, त्या अपूर्व प्रकाशाने शिष्य-हृदयात काय काय स्थित्यंतरे घडतात ? हेही माउली सविस्तर सांगतात. ते आपण उद्याच्या चिंतनात त्यांच्याच करुणाकृपेने पाहू या !!
*लेखक - रोहन विजय उपळेकर*
*भ्रमणभाष - 8888904481*

5 Nov 2018

बोध-दीपावली

आज धनत्रयोदशी, भारतीय संस्कृतीतील प्रमुख महोत्सव असलेल्या दीपावलीचा दुसरा दिवस. आजच्याच तिथीला देव-दानवांनी समुद्राचे मंथन केल्यामुळे, त्या रत्नाकरातून चौदा रत्ने लोककल्याणासाठी निर्माण झाली होती. म्हणून त्या चौदा रत्नांपैकी,  भगवान विष्णूंची पत्नी भगवती श्रीलक्ष्मी व भगवान विष्णूंचे अवतार भगवान श्रीधन्वंतरी यांची जयंती आज साजरी होत असते. उत्तर भारतात ही धनतेरस खूप मोठ्या प्रमाणावर साजरी होते.
आज भगवती लक्ष्मीमाता व धनाधिपती कुबेरांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. तसेच सप्त धान्यांचीही पूजा करतात, नवीन वस्त्र, धातू, दागिने, सोने अशा वैभवसूचक  गोष्टींची खरेदी देखील करतात. सायंकाळी प्रदोष समयी श्रीलक्ष्मी-कुबेर पूजन करून साळीच्या लाह्या व बत्तासे आणि धने-गुळाचा नैवेद्य अर्पण करून, धन-धान्य समृद्धी व्हावी म्हणून कृतज्ञतापूर्वक श्रीभगवंतांची प्रार्थना करायची असते.
आजच्या तिथीलाच सायंकाळी धर्मदेवता यमराजाच्या नावाने दक्षिणेकडे तोंड करून एक दीप अर्पण करायचा असतो. एरवी आपण वर्षभर कधीही दक्षिणेकडे वात करून दिवा लावत नाही. या दीपदानाने अकालमृत्यू, अपमृत्यूपासून सुटका होते असे म्हणतात.
भगवान विष्णूंच्या श्रीमद् भागवतातील चोवीस अवतारांमध्ये भगवान श्रीधन्वंतरींची गणना होते. दीर्घकाल आयुष्य व उत्तम आरोग्य टिकून राहावे म्हणून आज त्यांची देखील पूजा केली जाते.
आरोग्य हीच खरी संपत्ती असून तेच सुखी व आनंदी जीवनाचे द्योतक आहे; व तेच सर्वथा साध्य देखील ! म्हणूनच की काय, भगवती लक्ष्मी व श्रीधन्वंतरींचा जन्म एकाच वेळेला झाल्याची गोष्ट शास्त्रांमध्ये आलेली आहे. पण दुर्दैवाने लक्ष्मीच्या पाठीमागे लागून लोक पहिल्यांदा आपल्या शरीराचे व आरोग्याचेच वाटोळे करून घेतात. पैसे मिळवण्यात इतके गढून जातात की अत्यंत दुर्मिळ असणारा मनुष्यजन्म, हेलपाट्याच्या गाढवासारखा झापडे लावून तेच ते करण्यात वाया घालवतात. एवढे मर मर मरून कमावलेली संपत्ती देखील मग त्यांना सुखाने उपभोगताही येत नाही. मिळालेला पैसा औषधांवरच खर्च होऊन जातो. ना समाधान ना आरोग्य, ना सुख ना आनंद, फक्त कष्ट; अशा विवंचनेतच सर्व आयुष्य नष्ट होऊन जाते. मानवजातीचे हेच भविष्य बहुदा पूर्वीच्या द्रष्ट्या ऋषींनी आधीच ओळखून लक्ष्मी व धन्वंतरींची सांगड घातलेली असावी.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज एक मार्मिक गोष्ट सांगत असत. भगवती लक्ष्मीचे वाहन आहे घुबड. त्याला संस्कृतमध्ये उलूक म्हणतात. हिंदीत उल्लू म्हणतात. उल्लू म्हणजे बावळट देखील. जेव्हा ही लक्ष्मी एकटीच येते तेव्हा ती घुबडावर बसून येते व ज्याच्याकडे येते त्याला 'उल्लू' बनवून लगेच निघूनही जाते. पण ती जेव्हा भगवान विष्णूंसोबत येते तेव्हा ती गरुडावरून येते व त्यावेळी ती स्थिर देखील राहाते. भगवान श्री ज्ञानेश्वर माउली मुद्दाम म्हणतात की, "मुकुंदीं स्थिरावली लक्ष्मी जैसी ।" एरवी अत्यंत चंचल असणारी भगवती लक्ष्मी श्रीभगवंतांबरोबर आली की एकदम स्थिर राहते. म्हणून जो फक्त लक्ष्मीच्या मागे लागतो तो 'उल्लू'च बनतो. त्याला मग धन्वंतरींचाच आधार घ्यावा लागतो.
भगवान श्रीधन्वंतरी हे आयुर्वेदाचे दैवत मानले जातात. त्यांच्या एका हातात अमृतकुंभ असतो. हा सर्व औषधांचे प्रतीक आहे. 'औषध' हे भगवान विष्णूंचे एक नाम आहे. त्यांची "अमृत, भेषज, भिषक्, वैद्य" इत्यादी अनेक नामे विष्णुसहस्रनामामध्ये आलेली आहेत. या नामांमधून श्रीभगवंतांचेच करुणामय धन्वंतरीस्वरूप आणखी स्पष्ट होते. म्हणून भगवान धन्वंतरींचा हात न सोडता अर्थात् आरोग्य न बिघडवता, गरुडावरून श्रीभगवंतांबरोबर येणारी लक्ष्मी प्राप्त करण्यासाठीच आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. अशी लक्ष्मी प्राप्त झाली तरच आयुष्य अमृतमय होते. अमृतासाठी पूर्वी जे समुद्रमंथन झाले, त्या गूढ प्रक्रियेचे हे विचारमंथनच आजच्या धनत्रयोदशीचे खरे रहस्य आहे ! हे जाणून जर धनत्रयोदशी साजरी झाली, तरच मग दीपावलीचा शाश्वत आनंद लाभेल !
दीपावलीची सुरुवात वसुबारसेला गोपूजनाने होते. गायीच्या सर्वांगात, शेणात, मूत्रातही पावित्र्याचा, मांगल्याचा, आरोग्याचा, लक्ष्मीचा वास असतो. म्हणून तिचे महत्त्व आधी जाणून तिची सेवा करायची, मग धनत्रयोदशीला आरोग्यासह लक्ष्मी प्राप्त होते. त्यानंतरच नरकासुराचा वध श्रीभगवंत करतात. म्हणजे आपलाही नरकाचा संबंध संपतो. मग आपल्या आयुष्यातील पापरूपी नरकाची अर्थात् आपले दुर्गुण, व्यसने व वाईट सवयी यांची व आपली संगत सुटते. तीच नरकचतुर्दशी ! असा नरकासुकाचा वध झाल्यावरच मिळालेली स्वर्गीय संपत्ती संपूर्ण कुटुंबासह आपल्याला सुखाने व योग्य पद्धतीने उपभोगता येते. तेच लक्ष्मीपूजन होय ! यातून आपल्या आयुष्यात एक नूतन प्रकाश-पर्व सुरू होते, तोच दीपावली पाडवा होय. असा जेव्हा बोध-दीपोत्सव संपन्न होतो, तेव्हाच सर्वत्र, सर्व समाजात असूया व द्वेषरहित बंधुभाव, स्नेहभाव उत्पन्न होत असतो, म्हणून दीपावलीची सांगता ही भाऊबीजेने होते. हीच संतांना अभिप्रेत असणारी खरी बोध-दीपावली होय !
आपल्या प्रचंड बुद्धिमान व ज्ञानी ऋषीमुनींनी या सर्व भूमिकांचा सांगोपांग विचार करूनच हा तेजाचा, प्रकाशाचा महोत्सव, दीपावली महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. आपण त्यांचे मर्म जाणून न घेता, भामट्या पुरोगामट्यांनी उगीचच पेटवलेल्या नसत्या वादविवादात व फालतू चर्चांमध्येच रमतो. हे आपलेच दुर्दैव नाही का?
आजच्या या पर्वावर आपण सर्वांनी असा निर्धार करू या की, आम्ही आमच्या प्रगल्भ संस्कृतीचा यथायोग्य मान ठेवू, ती जाणून घेऊन आपले आयुष्य खरे सुखी करू व अभिमानाने भारतीय वैदिक संस्कृतीचे पाईक म्हणून जगात मिरवू ! अशी अलौकिक बोध-जाणीव निर्माण होऊन कायमची स्थिर होणे, हीच खरी दीपावली आहे व अशाच बोध-दीपावलीच्या तुम्हां सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

4 Nov 2018

कलौ श्रीपादवल्लभ:



आज श्रीगुरुद्वादशी, कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार, भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा निजानंदगमन दिन !!
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप, अतर्क्य लीलाविहारी, अपार करुणानिधान आणि विलक्षण असे नित्यअवतार आहेत. प.प.श्री.टेंब्ये स्वामी महाराजांनी एका ठिकाणी त्यांना साक्षात् भगवान श्रीकृष्णांचेच अवतार देखील म्हटले आहे. त्यांच्या लीला वाचल्या की ते साक्षात् परब्रह्मच होते हे मनापासून पटते.
आंध्रप्रदेशातील पीठापूर या गांवी त्यांनी जन्म घेतला आणि कृष्णा तीरावरील कुरवपूर या तीर्थक्षेत्री वास्तव्य करून अनेक लीला केल्या. आश्विन कृष्ण द्वादशीला श्रीगुरुद्वादशी म्हणतात. कारण ते याच तिथीला कृष्णा नदीमध्ये अदृश्य झाले. ते नित्य अवतार असल्याने त्यांनी आपला दिव्य देह कृष्णामाईत केवळ लौकिकदृष्ट्या अदृश्य केलेला आहे, त्यांनी देहत्याग केलेला नाही, हे आपण कायम लक्षात ठेवायला हवे. ते आजही त्याच पावन देहातून कार्य करीत आहेत व पुढेही करीत राहणार आहेत. श्रीगुरुद्वादशी ही त्यांची निजानंदगमन तिथी, श्रीगुरुप्रतिपदा ही भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांची निजानंदगमन तिथी व शनिवार हा भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचाही जन्मवार; म्हणूनच श्रीदत्तसंप्रदायातील स्थानांवर श्रीगुरुद्वादशी, श्रीगुरुप्रतिपदा व शनिवारची वारी करण्याची पद्धत आहे.
भगवान श्री श्रीपादांचा देह अपार्थिव, दिव्य आहे. अशा देहाला कधीच जरा-व्याधी नसतात. त्यांचे स्वरूप सर्वकाळ सोळा वर्षांच्या कुमाराएवढेच होते. ते अत्यंत देखणे व सुकुमार होते. व्याघ्रांबर परिधान केलेली त्यांची दिव्य छबी पाहताच एका अनामिक वेधाने लोक त्यांच्याकडे खेचले जात असत. ते ब्रह्मचारी होते, म्हणून ते कधीच भगवी वस्त्रे घालत नसत, पण नंतरच्या चित्रकारांनी त्यांना भगव्या वस्त्रातच कायम दाखवलेले आहे. अनेक महात्म्यांना त्यांचे दर्शन एक मुख व षड्भुज अशा श्रीदत्तरूपात झालेले असल्याने त्यांचे तसेही फोटो प्रचलित आहेत. या पोस्ट सोबत दिलेला फोटो प.पू.श्री.गुळवणी महाराजांना प.प.श्री.टेंब्ये स्वामी महाराजांनी स्वत:च्या हृदयात करवलेल्या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या दिव्य दर्शनानुसार काढलेला आहे.
पीठापूरहून निघून ते बदरीनाथ आदि हिमालयीन तपस्थानांवर राहून मग गोकर्ण महाबळेश्वर येथे तीन वर्षे गुप्तपणे राहिले. मग काही महिने तिरूपती बालाजी येथे राहून ते कुरवपूरला आले. त्यांचे काही काळासाठी महाराष्ट्रामध्येही वास्तव्य झाले. त्यांमध्ये विदर्भातील जळगांव (जामोद) येथे ते राहिले होते. आज प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या 'श्रीपाद सेवा मंडळ' या संस्थेने तेथे सुंदर मंदिर बांधलेले असून भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची बालरूपातील अप्रतिम प्रासादिक मूर्ती स्थापन केलेली आहे. आजही अनेक भक्तांना तेथे भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची प्रत्यक्ष अनुभूती वारंवार येत असते.
त्यांचे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथेही वास्तव्य झाले होते. त्यांनी आपले शिष्य श्री रामचंद्र योगी यांना तेथेच तपश्चर्या करण्याची आज्ञा केली होती. आपल्या पुढील श्री नृसिंह सरस्वती अवतारामध्ये त्यांनी वाडीला येऊन श्री रामचंद्र योगींना दर्शन देऊन कृतकृत्य केले व स्वहस्ते त्यांना समाधी दिली. श्री रामचंद्र योगींची समाधी श्रीनृसिंहवाडीला घाट चढून आल्यावर पिंपळाखाली आजही पाहायला मिळते.
भगवान श्री श्रीपादांना साजुक तुपातला शिरा अत्यंत आवडतो. याबद्दल एक गोड हकिकत त्यांच्या चरित्रात आलेली आहे. त्यांच्या मातु:श्री सुमतीमाता त्यांना भेटायला कुरवपूरला येत होत्या. त्यांनी मोठ्या प्रेमाने बनवून घेतलेला शिरा गार होऊ नये म्हणून, भगवान श्रीपादांनी पीठापूर ते कुरवपूर हा चार दिवसांचा त्यांचा प्रवास केवळ काही मिनिटातच घडवून त्यांना कुरवपूरला आणले व प्रेमभराने त्या गरमागरम शि-याचा आस्वाद घेतला.
अत्यंत करुणामय असे त्यांचे स्वरूप आहे. त्यांचे जो प्रेमाने स्मरण करेल त्याच्यावर ते कृपा करतातच, असे अनेक महात्म्यांनी स्वानुभवपूर्वक सांगून करून ठेवलेले आहे. त्यांना कळवळून हाक मारणा-या भक्ताच्या हाकेला ओ देऊन त्याचे अभीष्ट करणे, हे भगवान श्रीपादांचे आवडते कार्यच आहे. ते अत्यंत भक्तवत्सल आहेत, भक्ताभिमानी देखील आहेत.
"दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा" हा महामंत्र त्यांनीच प्रकट केलेला असून दत्तसंप्रदायामध्ये मोठ्या श्रद्धेने जपला जातो. हा महामंत्र नंतर प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी सर्वदूर प्रचलित केला. पण याचा प्रथम उपदेश भगवान श्री श्रीपादांनीच एकेदिवशी पंचदेव पहाडी परिसरातील आपल्या दरबारात कुरवपुरातील भक्तांना केला होता. म्हणून हा महामंत्र स्वत: भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनीच निर्माण केल्याचे मानले जाते.
द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आजच्याच तिथीला भक्तांवर निरंतर कृपा करण्याच्या उद्देशाने, श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला आपल्या "मनोहर पादुका" स्थापन करून गाणगापुरी गमन केले होते. नृसिंहवाडीत औदुंबरातळी बारा वर्षे वास्तव्य करून भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी वाडीला आपल्या राजधानीचा दर्जा प्रदान केला. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज श्रीनृसिंहवाडीला श्रीदत्तप्रभूंचा "दिवाने खास" म्हणत असत. त्या राजधानीचे अधिष्ठान म्हणून भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजच श्री मनोहर पादुकांच्या रूपाने आजही विराजमान आहेत ! म्हणून हा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर वाडीमध्येही साजरा होतो. सोबतच्या छायाचित्रामध्ये वाडीच्या मनोहर पादुकांच्या चंदनलेपनाचे सुंदर दर्शनही आहे.
स्मर्तृगामी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं आज श्रीगुरुद्वादशीच्या पावन पर्वावर सादर दंडवत घालून, त्यांची अलौकिक करुणाकृपा निरंतर राहावी, यासाठी कळकळीची प्रार्थना करू या. आमच्याही हृदयात निरंतर निवास करून तेथेही आपल्या पावन वास्तव्याने त्यांनी 'सुखाची राजधानी' निर्माण करावी, हीच त्यांच्या श्रीचरणीं सादर प्रार्थना करून त्यांच्याच स्मरणात श्रीगुरुद्वादशी साजरी करू या  !!
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

18 Oct 2018

श्रीसंत साईबाबा महाराज



आज दसरा, सद्गुरु श्री साईबाबा महाराजांची शंभरावी पुण्यतिथी. विजयादशमी, मंगळवार दि.१५ ऑक्टोबर १९१८ रोजी दुपारी विजयमुहूर्तावर त्यांनी शिर्डी येथे आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली होती. आज त्यांच्या देहत्यागाला शंभर वर्षे पूर्ण झाली.
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींनी श्रीमद् भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायातील बत्तीसाव्या श्लोकाच्या विवरणात फारच बहारीची रचना केलेली आहे. त्यातील एका ओवीत एक विशेष सिद्धांत साक्षात् श्रीभगवंतांच्याच मुखाने सांगताना श्री माउली म्हणतात,
म्हणोनि कुळ जाति वर्ण ।
हें आघवेंचि गा अकारण । 
एथ अर्जुना माझेपण ।
सार्थक एक ॥ज्ञाने.९.३२.४५६॥
श्रीभगवंत सांगतात, "अर्जुना, एखादा छोटासा ओहोळ किंवा नाला जेव्हा गंगेला मिळतो तेव्हा तो आपले मूळचे अस्तित्व टाकून गंगारूपच होऊन ठाकतो. अग्नीत टाकलेली खैरचंदनादी वेगवेगळी लाकडे एकदा अग्निरूप झाली की त्यांचे स्वरूप हे केवळ अग्नी हेच आहे, भिन्नत्व संपले त्यांचे. त्याप्रमाणे एखादा भक्त; कोणत्याही का जातीचा, धर्माचा, वंशाचा, कुळाचा असेना, तो माझ्याशी एकरूप झाला की त्याचे ते मागील सर्व हारपून जाते व तो केवळ माझेच स्वरूप होऊन ठाकतो. त्याला माझ्याहून भिन्न अस्तित्वच नसते !"
भक्तिशास्त्राचा, प्रत्यक्ष श्रीभगवंतांच्या श्रीमुखातून आलेला हा महन्मंगल सिद्धांत जर आपल्याला नक्की पटत असेल तर श्री साईबाबा मुसलमान होते, हे चुकूनही आपल्या मनात यायला नको. आणि जर तसे ते येत असेल तर आपल्याला भक्तीची बाराखडी देखील अजून कळलेली नाही हाच त्याचा स्पष्ट अर्थ आहे. लय टाईम आहे अजून आपल्याला या प्रांतात शिरकाव व्हायला, हेच सत्य !
आजवरच्या इतिहासात पाहिले तर, प्रत्येक महात्म्याला जनांच्या, समाजाच्या विनाकारण त्रासाला सामोरे जावेच लागलेले आहे. किंबहुना ती कसोटीच आहे महात्मेपणाची, असे म्हटले तर वावगे ठरू नये. पण काही महात्म्यांना देहत्यागानंतरही त्याच दिव्यातून हकनाक जावे लागते ; श्रीसंत साईबाबा, श्री रामदास स्वामी महाराज, श्री शिवछत्रपती ही काही त्याची उदाहरणे. अर्थात् देहात असतानाही असल्या भंपकपणाचे त्यांना काहीच देणे-घेणे नसते, तर देह ठेवून विश्वाकार झाल्यावर त्यांना काय घंटा फरक पडणार त्याचा ? रस्त्याने कुत्री भुंकली म्हणून हत्ती काय चाल बदलतो की त्यांना घाबरून रस्ताच सोडतो ? अरे हट् ! जे देहीच विदेहत्वाला आले, अंतर्बाह्य हरिरूप झाले, त्यांना देहाचाच विचार करणा-या असल्या तद्दन मूर्खांचा कसलाही त्रास कधीच होत नसतो. कर्म परीक्षा मांडते ते या मूर्खांचीच. त्यांच्या आयुष्याचे पार भंगार करूनच सोडते त्यांचे हे भयानक संतनिंदेचे कर्म. असो. माझी वाचा मी विटाळून घेत नाही आजच्या चांगल्या मुहूर्तावर.
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील एक अत्यंत अलौकिक व महान अवतारी विभूतिमत्त्व म्हणजे श्री साईबाबा होत. स्वत: श्रीस्वामी महाराजांनीच श्री आनंदनाथ महाराजांकरवी त्यांना प्रसिद्धीला आणले व अनेकांना त्यांच्या दर्शनाला जाण्यास प्रेरित केले होते. यातच त्यांचे अलौकिकत्व सिद्ध होते. ते श्रीदत्तपरंपेरतील एक विलक्षण अधिकारी असे अवतारच होते. आमच्या श्रीगुरुपरंपरेतील सर्व महात्म्यांनाही श्री साईबाबांचा नितांत प्रेमादर आहे. पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज त्यांना बंधुतुल्य मानत. श्रीसंत उपळेकर महाराजांनाही त्यांच्याबद्दल प्रेम होते. श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज नेहमी श्री बाबांचा उल्लेख करीत. त्यांच्या ठायी श्री साईबाबांचे दर्शनही काही भाग्यवान साधकांना झालेले आहे. पू.मामांच्या शेवटच्या काळात कल्याण रेल्वे स्टेशनवर श्री साईबाबा भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा पू.मामांना निरोप द्यायला म्हणून प्रत्यक्ष प्रकटले होते. पू.शिरीषदादा व काही साधक त्या प्रसंगाचे साक्षीदार आहेत. अशा थोर महात्म्याविषयी काही लोक जेव्हा अनुदार उद्गार काढतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. स्वत:चे 'स्वरूप'ही न जाणणा-या, आत्मज्ञानाच्या नावाने 'आनंद'च असणा-या एखाद्याने, साक्षात् श्रीहरींचेच स्वरूप असणा-या श्री साईबाबांच्या विषयी आक्षेप घ्यावेत, याला त्या माणसाची दुस्तर कर्मगतीच म्हणतात दुसरे काही नाही. मोठ्या पदावर बसलेले हे लांडगेच जणू, लोकांची दिशाभूल करणारे. असो, त्यांना या पापाचे योग्य ते प्रायश्चित्त भोगावेच लागेल, कोणी सुटत नसते संतनिंदेच्या महापातकातून. श्रीभगवंत आपल्या भक्तांचे अभिमानी असतात, ते कधीच अशांना क्षमा करीत नाहीत. न मे भक्त: प्रणश्यति । हे काय गंमत म्हणून म्हटलेले नाही त्यांनी.
श्री साईबाबांनी लौकिक अर्थाने आज देह ठेवलेला असला तरी त्यांचे अस्तित्व आजही जाणवते. असंख्य भाविकांना त्यांच्या कृपेचे शेकडो अनुभव आजही येत असतात ; व त्यांच्या अनाठायी निंदेचे पातक मस्तकी घेणा-या या लोकांच्या नाकावर टिच्चून पुढेही येतच राहणार आहेत, यात मला अजिबात शंका नाही. लोकांना अनुभव येतात म्हणूनच तर गर्दी वाढते आहे ना शिर्डीची ? की वेळ जात नाही म्हणून लोक येतात ? एवढा साधा विचारही करत नाहीत हे लोक.
"शिरडीस ज्याचे लागतील पाय टळतील अपाय सर्व त्याचे", असे आपले भक्तवात्सल्य ब्रीद प्रेमाने जपणा-या, भगवान श्रीरामरायांचे निस्सीम भक्त असणा-या, राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील श्रीसंत साईबाबा या महान विभूतिमत्त्वाला शताब्दी पुण्यतिथी दिनी, मी श्रद्धाभक्तिपूर्वक मनोभावे दंडवत घालतो आणि त्यांच्या श्रीचरणीच तुलसीदल रूपाने विसावतो !!
( लेखासोबत श्रीसंत साईबाबांचे अस्सल छायाचित्र. )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

17 Oct 2018

आदिशक्तीचा उदोकार -अष्टमोल्लास



आज नवरात्रीची आठवी माळ, आज भगवती श्रीमहागौरीची उपासना केली जाते. भगवती महागौरी म्हणजेच भगवान श्रीगणेश व श्रीकार्तिकेयांची माता, जगदंबा पार्वती होय.
नवरात्रीतील अष्टमी व नवमीला विशेष महत्त्व असते. म्हणूनच तिला महाष्टमी म्हणतात. अष्टमीच्या रात्री कोकणस्थांकडे महालक्ष्मी स्थापून रात्री जागर केला जातो.
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज या अष्टमीच्या दिनी भगवती श्रीजगदंबेची स्तुती करताना म्हणतात,
अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी ।
श्रीरामवरदायनी सह्याद्री पर्वतीं हो ।
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो ।
स्तनपान घेउनि सुखें निवालों अंत:करणीं हो ॥८॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
"अष्टमीला भगवान श्रीनारायणांची शक्ती आदिमाया भगवती अष्टभुजा नारायणीची मी उपासना करतो. तीच पार्वती रूपाने सीतेच्या शोधात फिरणा-या भगवान श्रीरामरायांना वर देण्यासाठी सह्याद्री पर्वतावर प्रकटली व श्रीरामवरदायिनी म्हणून प्रसिद्धी पावली. महाबळेश्वरजवळ पार नावाच्या गावात श्रीरामवरदायिनीचे स्थान आहे. तसेच तुळजापूरच्या श्रीभवानीमातेलाही रामवरदायिनीच म्हणतात.
आदिजगदंबा महागौरी श्रीनारायणी ही प्रेमळ माता आहे व मी तिचे लेकरु आहे. तिच्या करुणेने अभिभूत होऊन, तिच्या मातृस्वरूपाने मोहून जाऊन मी तिच्या चरणी शरण गेलो व तिच्या प्रसादरूप कृपास्तन्याचे मनसोक्त पान करून मी आता अंत:करणापासून सुखाने निवालो आहे, समाधान पावलो आहे" ; असा आपला स्वानुभव त्या जगदंबाआईचेच नाम मोठ्या आदराने गर्जत सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज येथे सांगत आहेत.
भगवती श्रीजगदंबेचा उपनिषदात वर्णिलेला अवतार म्हणजे भगवती उमा हैमवती होय. या भगवती उमेची व त्यानंतर झालेल्या योगमाया आदी अवतारांची कथा तसेच या सर्व अवतारांचे मूळ असणा-या भगवान श्रीराधा-दामोदरांच्या आपल्या संतांनी केलेल्या मनोहर वर्णनाचा आस्वाद खालील लिंकवरील लेखातून आवर्जून घ्यावा ही विनंती.
[ आदिशक्ती भगवती श्रीजगदंबा मातु:श्रींच्या असीम दयाकृपेने कालच्या अष्टमीच्या रात्री माझ्या ब्लॉगने एक लाख व्ह्यूजचा टप्पा ओलांडला. आपणां सर्व वाचकांचे मी त्यासाठी मनापासून आभार मानतो. आजच्या काळात एखाद्या शुद्ध आध्यात्मिक ब्लॉगस्पॉटला असा भरभरून प्रतिसाद मिळणे ही नि:संशय श्रीसद्गुरूंचीच करुणाकृपा आहे ! यापुढेही आपला असाच पाठिंबा मला सदैव मिळत राहो हीच प्रार्थना. ]
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें
अष्टमोल्लास

https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_8.html

आदिशक्तीचा उदोकार - नवमोल्लास



( उद्या महानवमी व विजयादशमी एकाच दिवशी आल्याने नवमीचा लेख आजच पोस्ट करीत आहे. )

आज नवरात्रीची नववी माळ, भगवती सिद्धिदात्रीची आज उपासना केली जाते. घटोत्थापन करून नवरात्रीची सांगता महानवमीला करतात.
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजही आपल्या नवरात्रीच्या पदात सांगतेचा उल्लेख करताना म्हणतात,
नवमीचे दिवशीं नवा दिवसांचें पारणें हो ।
सप्तशतीचा जप होम हवनादी करुनी हो ।
पक्वान्नें नैवेद्यें केलें कुमारीपूजन हो ।
आचार्य ब्राह्मण तृप्त केले जगदंबेनें हो ॥९॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
"नवमीच्या दिवशी नऊ दिवसांच्या नवरात्रीच्या उपवासाचे पारणे केले जाते. सप्तशतीचे होमहवन, जपजाप्य करून ही सांगता केली जाते. जगदंबेच्या नैवेद्याला विविध पक्वान्ने करून, जगदंबास्वरूप कुमारिकापूजन व ब्राह्मणसवाष्ण भोजन वगैरे आपापल्या कुळाचारानुसार करून आईची सेवा संपन्न केली जाते. अशा प्रकारे नऊ दिवसांचे हे नवरात्र मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरे केले जाते."
आपण गेले नऊ दिवस श्रीसद्गुरूंच्या कृपेने भगवती श्रीजगदंबामातु:श्रींचा हा उदोकार करीत आहोत. त्याचीही उद्या सानंद सांगता होणार आहे. खालील लिंकवरील लेखात नवरात्रीच्या अधिष्ठात्री असणा-या नवदुर्गांची सविस्तर माहिती दिलेली असून दशमहाविद्यांचीही तोंडओळख करून दिलेली आहे. लेखा सोबतच्या फोटोमध्ये नवदुर्गांच्या सुरेख प्रतिमाही आपल्याला पाहायला मिळतील. आज महानवमीच्या पावन पर्वावर आपण जगत्रयजननी आदिशक्ती भगवती श्रीजगदंबामातु:श्रींचा जयजयकार करून तिच्या श्रीचरणीं नतमस्तक होऊ या !
लेखक - रोहन विजय उपळेकर 
भ्रमणभाष - 8888904481

आदिशक्तीचे कवतुक मोठेंनवमोल्लास
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_9.html?m=1

16 Oct 2018

आदिशक्तीचा उदोकार - सप्तमोल्लास



आज नवरात्रीची सातवी माळ, भगवती कालरात्रीची आज आराधना केली जाते. सर्वसंहारक भगवान श्रीमहाकालांची शक्ती तीच भगवती कालरात्री होय. महामृत्यूची अधिष्ठात्री देवताही भगवती कालरात्रीच आहे.
सातव्या माळेला समर्थ श्री रामदास स्वामी महाराज सप्तशृंगनिवासिनी भगवती श्रीजगदंबिकेच्या दर्शनाला जातात व तिचे गुणवर्णन करताना म्हणतात,
सप्तमीचें दिवशीं सप्तशृंग गडावरी हो ।
तेथें तूं राहासी भोंवतीं पुष्पें नानापरी हो ।
जाई जुई शेवंती पूजा देखिली बरवी हो  ।
पडणी पडतां झेलुनी घेसी वरिचेवरी हो ॥७॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
"आई जगदंबे, नवरात्रीच्या सातव्या दिवशी तुझ्या लाडक्या सप्तशृंग गडावर मी दर्शनाला आलो आहे. काय मनोहर आहे तुझे हे स्थान आणि तुझे भव्य रूप देखील ! जाई, जुई, शेवंती यांसारख्या सुगंधी पुष्पांनी तुझी अप्रतिम पूजा बांधलेली आहे. माझे डोळे सुखावले ही पूजा पाहून.
आई, तुझे महिमानच असे अलौकिक आहे की, समजा एखादा आपल्याच पूर्वकर्मांच्या कचाट्यात सापडून, आहे त्या स्थानावरून खाली पडू लागला, त्याचे पतन होऊ लागले आणि त्याने जर तुला कळवळून हाक मारली, तर तू धावत जाऊन त्याला वरच्यावर झेलतेस आणि पुन्हा सुखरूप करतेस, स्वस्थ करतेस. तुझ्या करुणेला ना अंत ना पार ! तुझा हा खरोखरीच अद्भुत महिमा जाणून मीही तुझेच नाम गात आता नाचतो आहे. आई, माझ्याकडे लक्ष देशील ना गं ?"
भगवती अंबामातेचेच एक रूप म्हणजे भगवान शिवांची प्रथम पत्नी भगवती सती होय. दक्ष प्रजापतींची ही कन्या. दक्षाच्या यज्ञात तिचा अपमान झाला व ते सहन न होऊन तिने त्या यज्ञातच देहत्याग केला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवगणांनी दक्षयज्ञाचा विध्वंस केला. श्रीशिवांनी सतीचा देह खांद्यावर घेऊन उन्मत्तपणे भ्रमण करायला सुरुवात केली. त्यावेळी श्रीविष्णूंनी तिच्या देहाचे तुकडे केले व ते तुकडे जेथे जेथे पडले तेथे तेथे एकेक शक्तिपीठ निर्माण झाले. सोबतच्या लेखात भगवती सतीची ही रोचक कथा व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांची थोडक्यात माहिती दिलेली आहे. तसेच भगवती सरस्वतीच्या पूजनाचेही माहात्म्य कथन केले आहे. आजच्या सप्तमी-महाष्टमीच्या पर्वावर भगवती श्रीजगदंबा मातु:श्रींच्या श्रीचरणीं आपण मनोभावे दंडवत घालून तिच्याच नामगजरात मग्न होऊ या !
लेखक - रोहन विजय उपळेकर 
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें
सप्तमोल्लास
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_7.html?m=1

15 Oct 2018

आदिशक्तीचा उदोकार - षष्ठोल्लास



आज नवरात्रीची सहावी माळ, भगवती कात्यायनीमातेची आज उपासना केली जाते.
समर्थ श्री रामदास स्वामी महाराज आपल्या नवरात्रीच्या पदातील सहाव्या चरणात म्हणतात,
षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो ।
करीं घेउनी दिवट्या हर्षें गोंधळ घातला हो ।
कवडीया दर्शनें हार मिरवे मुक्ताफळा हो ।
जोगवा मागतां प्रसन्न जाली निजभक्तां हो ॥६॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
"नवरात्रीच्या सहाव्या दिवशी गळ्यात कवड्यांची माळ घालून हाती दिवटी, पोत व परडी घेऊन आईचा गोंधळ घालून जोगवा मागण्यात तिचे भक्त मोठ्या आनंदाने रममाण झालेले आहेत. आई जगदंबेच्या नावाचा गजर करीत, उदोकार करीत नाचत आहेत. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झालेली आदिमाया जगदंबा त्यांना इच्छित वरप्रसाद देऊन संतुष्ट करीत आहे !"
जोगवा मागणे हा देवीच्या उपासनेतला फार विशेष असा उपचार आहे. या जोगव्याचे तात्त्विक तसेच आध्यात्मिक महत्त्व प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी आपल्या "अनादि निर्गुण प्रकटली भवानी" व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या "आदिशक्तिचे कवतुक मोठें" या दोन अप्रतिम ग्रंथांमधून सविस्तर वर्णिलेले आहे. देवीच्या उपासक व अभ्यासकांनी ही दोन्ही पुस्तके आवर्जून वाचावीत. पू.शिरीषदादांनी तर जोगव्यामध्ये असलेल्या प्रत्येक लहानसहान मुद्द्यावर अतिशय सविस्तर विवरण केलेले आहे. खरोखरीच त्यात वर्णन केलेला जोगव्याचा भावार्थ व आध्यात्मिक अर्थ जाणून आपण हरखूनच जातो, इतके निगूढ अभिप्राय या दोन्ही ग्रंथांमध्ये आलेले आहेत.
भगवती जगदंबामातु:श्रींचा विशेष अवतार म्हणजे भगवती श्रीरेणुकामाता. खालील लिंकवरील लेखात आई रेणुकेच्या संपूर्ण चरित्राचा आढावा घेतलेला आहे. आजच्या पावन दिनी प्रेमभराने "आई" अशी तिला हाक मारून आपणही तिचे चरित्र-यशोगान करून धन्य होऊ या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें
षष्ठोल्लास
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_6.html?m=1

14 Oct 2018

आदिशक्तीचा उदोकार - पंचमोल्लास



आज नवरात्रीची पाचवी माळ. भगवती श्रीस्कंदमातेची आज आराधना केली जाते. भगवती स्कंदमाता म्हणजे देवसेनापती कार्तिकेय यांची माता, भगवती पार्वती ! नवदुर्गांपैकी ही एकमात्र भगवती आहे जिच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. अहो, ती साक्षात् परमप्रेममयी माता आहे, तिला कशाला शस्त्र हवे? ती आपल्या प्रेमानेच जग जिंकते, शस्त्राची कधीही तिला गरजच नाही पडत. अशा या मातहृदयी प्रेममय भगवती स्कंदमातेच्या चरणीं आपण मनोभावे दंडवत घालू या !
काल चौथी माळ असूनही, ललितापंचमी म्हणून आपण नवरात्रीच्या पदाच्या पाचव्या चरणाचा विचार केला. आज त्यामुळे राहिलेले चौथे चरण पाहू. सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज आपल्या पदाच्या चौथ्या चरणात म्हणतात,
चतुर्थीचे दिवशीं विश्वव्यापक भवानी हो ।
नवरात्र करिती निराहार निर्वाणीं हो ।
त्यांसी तूं प्रसन्न जगन्माता मनमोहिनी हो ।
भक्तांची तूं माउली सुरवर येती लोटांगणीं हो ॥४॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
"संपूर्ण विश्व व्यापून राहिलेल्या जगन्माते भवानी, तुझे भक्त नवरात्रात निराहार उपवास करून तुझी आराधना करतात. तू देखील त्यांच्या त्या अनन्यभक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपाप्रसाद करतेस. श्रेष्ठ सुरवर देखील तुझ्या चरणी लोटांगण घालतात, मीही त्यामुळे आनंदाने तुझे नाम गात तुला सर्वभावे दंडवत घालतो !"
भगवती श्रीजगदंबेच्या लीलांचे रसपूर्ण वर्णन करणा-या, भगवान मार्कंडेयमुनींच्या पुराणातील सातशे श्लोकांच्या श्रीदुर्गासप्तशतीला देवीउपासकांमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. या सप्तशतीत वर्णिलेल्या महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मी या तिन्ही देवी रूपांची थोडक्यात माहिती खालील लिंकवरील लेखात आहे.
आपल्या मराठी संतांनी भगवान श्रीपांडुरंगांच्या रूपातच भगवती श्रीजगदंबामातु:श्रींची कल्पना करून त्यांची उपासना केलेली आहे. पंढरीची सावळी विठाईच माउली बनून या भक्तांचे लळे पुरवीत आहे. म्हणूनच तिच्या प्रेमवात्सल्याचे भरभरून वर्णन संतांनी केलेले आहे. त्या सुमधुर अमृतरसाचा आस्वादही खालील लिंकवरील चतुर्थोल्लासातून घ्यावा ही सादर विनंती !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें
चतुर्थोल्लास
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_5.html?m=1

13 Oct 2018

आदिशक्तीचा उदोकार -चतुर्थोल्लास



आज नवरात्रीची चौथी माळ, परंतु पंचमी तिथी लागलेली असल्याने पंचांगानुसर आजच ललितापंचमी व्रत आहे. त्यामुळे आपणही आज भगवती श्रीललिता महात्रिपुरसुंदरीच्या श्रीचरणीं नतमस्तक होऊ या. चौथ्या माळेला भगवती श्रीकूष्मांडादेवीची पूजा करायची पद्धत आहे.
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज आपल्या पदात म्हणतात,
पंचमीचे दिवशीं व्रत उपांगललिता हो ।
भक्त संतोषती आईचें पूजन करितां हो ।
रात्रीचे समयीं कीर्तन जागरण हरिकथा हो ।
आनंदें नाचती प्रेम आलेंसें निजभक्तां हो ॥५॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
(आज चौथी माळ असूनही ललितापंचमी व्रतामुळे आपण समर्थांच्या पदाचे पाचवे चरण विचारात घेत आहोत.) समर्थ म्हणतात, "नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीचे भक्त मोठ्या उत्साहाने उपांगललितेचे व्रत करतात. अतीव आनंदाने भगवती श्रीललितेचे स्वरूप मानले गेलेल्या कुंकवाच्या करंड्याच्या झाकणाची यथासांग पूजा करतात. अठ्ठेचाळीस दूर्वांची एक जुडी याप्रमाणे अठ्ठेचाळीस जुड्या अर्पण करतात. या व्रतात रात्रीचे जागरण मुख्य मानलेले असल्याने भक्त आज रात्री आनंदाने हरिजागर, कीर्तन, भजन-गायन वगैरे करून श्रीललिताजगदंबेची आराधना करतात. आजच्या दिवशी या भक्तांच्या अनन्यप्रेमाला सीमाच राहात नाही !"
भगवती महात्रिपुरसुंदरी श्रीललिताजगदंबा ही श्रीविद्येची अधिष्ठात्री देवता आहे. ललितापंचमी हा तिच्या आराधनेचा मुख्य दिवस. श्रीविद्या ही सर्व मंत्रांची जननीच मानली जाते व अत्यंत गुह्य अशी ही महाविद्या केवळ श्रीसद्गुरुकृपेनेच प्राप्त होत असते. श्रीविद्येचे प्रकट रूप म्हणजे श्रीयंत्र होय. या श्रीयंत्रामध्ये भगवती श्रीअंबिकेचा प्रत्यक्ष वास असतो. सोबतच्या लिंकवरील पूर्वीच्या पंचमोल्लास लेखात भगवती श्रीकूष्मांडा, परमगुह्य अशी श्रीविद्या परंपरा व श्रीयंत्राची अगदी थोडक्यात माहिती दिलेली आहे. तसेच त्या सोबतच्या फोटोमधून श्रीयंत्राचे दर्शनही होईल. आजच्या श्रीललितापंचमीच्या पावन पुण्यपर्वावर श्रीचक्रस्थित भगवती श्रीमहात्रिपुरसुंदरी जगदंबेच्या श्रीचरणीं मनोभावे दंडवत घालून आपणही तिच्या नामस्मरणात मग्न होऊ या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें

https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_4.html?m=1

12 Oct 2018

आदिशक्तीचा उदोकार - तृतीयोल्लास



आज नवरात्रीची तिसरी माळ, भगवती चंद्रघंटा मातेची उपासना आज केली जाते. चंद्रघंटा या नावाचा अर्थ व माहात्म्य खालील लिंकवरील लेखात सविस्तर मांडलेले आहेच.
समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज आपल्या नवरात्रपर पदाच्या तिस-या चरणात म्हणतात,
तृतीयेचे दिवशीं बाईनें शृंगार मांडिला हो ।
सेलीव पातळ चोळी वरती हार मुक्ताफळा हो ।
कंठींचे पदक कांसे पितांबर पिंवळा हो ।
अष्टभुजा मिरवती आईची सुंदर दिसती कळा हो ॥३॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
नवरात्राच्या तिस-या माळेला समर्थ भगवती श्रीजगदंबेच्या सुरेख व देखण्या रूपाचे वर्णन करतात की, "आठ भुजांमध्ये तळपती हत्यारे धारण केलेल्या अंबामातेचे श्रृंगारलेले रूप अतीव मनोहर दिसत आहे. अतिशय तलम आणि राजेशाही असे रेशमी पातळ व पितांबर तिने धारण केलेले असून, गळ्यातले मोत्यांचे हार व त्यातील रत्नजडित पदक तिच्या रूपाची शोभा अाणखीनच वाढवीत आहे. तिची ही दैवी सौंदर्यकळा भक्तांच्या हृदयात भक्तिप्रेमाचा महापूरच निर्माण करीत आहे ! अशा या आदिशक्ती अंबाबाई माउलीचा उदोकार असो, जयजयकार असो !"
भगवती श्रीजगदंबाच श्रीभगवंतांची मायाशक्ती आहे. या मायाशक्तीच्या माध्यामातूनच श्रीभगवंत कार्य करीत असतात. म्हणून तिचा श्रृंगार म्हणजेच हे दृश्य-अदृश्य असे चराचर विश्व होय. समर्थ याही अर्थाने वरील चरणात तिच्या सौंदर्यपूर्ण रूपाचे, श्रृंगारलेल्या स्वरूपाचे वर्णन करीत आहेत.
श्रीभगवंतांचे कार्य तीन प्रकारचे असते. म्हणूनच या मायेला त्रिगुणात्मिका म्हणतात. आणि ते भगवंतच तीन रूपांनी हे कार्य संपन्न करीत असतात. म्हणून तेच त्रैमूर्ती म्हटले जातात. भगवान श्रीदत्तप्रभू हे देखील त्रैमूर्तीरूपच आहेत. श्रीभगवंतांच्या त्या तीन रूपांचे अलौकिक आणि अद्भुत कार्य खालील लिंकवरील लेखामध्ये सविस्तर वर्णिलेले आहे, त्याचेही सप्रेम वाचन करावे ही विनंती.
आजच्या तिस-या माळेला, या त्रिगुणात्मक त्रैमूर्ती स्वरूपातील जगद्गुरु भगवती श्रीजगदंबामातेचे हे गुणानुवाद-कीर्तन आपणही मनापासून करून, 'आम्हांला त्रिगुणांच्या पल्याड असणा-या निर्गुण निराकार आणि विश्वव्यापक परमात्म्याचा साक्षात्कार करवावा', अशीच तिच्या श्रीचरणीं प्रेमभावे प्रार्थना करू या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें
तृतीयोल्लास
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_3.html?m=1

11 Oct 2018

आदिशक्तीचा उदोकार - द्वितीयोल्लास



आज नवरात्रीची दुसरी माळ. नवदुर्गांपैकी भगवती श्रीब्रह्मचारिणी मातेची आज उपासना केली जाते.
समर्थ श्री रामदास स्वामी महाराज आपल्या नवरात्रीच्या पदामधील दुस-या कडव्यात म्हणतात,
द्वितीयेचे दिवशीं मिळती चौसष्ट योगिनी हो ।
सकळांमाजीं श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तुरीमळवट भांगीं शेंदुर भरुनि हो ।
उदोकार गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो ॥२॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
श्रीजगदंबेच्याच अंशरूप अशा चौसष्ट योगिनींचे श्री समर्थ येथे स्मरण करीत आहेत. तसेच या दुस-या चरणात भगवती श्रीअंबिकेच्या माता रेणुका या अत्यंत प्रेमळ अवताराचेही आवर्जून स्मरण करतात. भगवान श्रीविष्णूंच्या श्रीपरशुराम या सहाव्या अवताराची जननी, रेणुराजाची कन्या व जमदग्नी ऋषींची भार्या असणारी भगवती रेणुका ही मातृत्त्वाचा परमादर्शच आहे. आपल्या श्रीदत्तमाहात्म्य ग्रंथात प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी यावर फार सुंदर ओव्या रचलेल्या आहेत. रेणुकामातेची संपूर्ण कथा आपण पुढील एका लेखात पाहणारच आहोत.
अशा या रेणुकामातेने कपाळी कस्तुरीचा सुगंधी मळवट भरलेला असून भांगात सौभाग्यसूचक असा शेंदूर ल्यालेला आहे. तिच्या भोवती तिचा उदोकार करीत असंख्य चामुंडा आनंदाने नाचत आहेत. देवीच्या सेविकागणांना चामुंडा म्हणतात. अशा या त्रिभुवनमातेला, जगदंबा श्रीरेणुकेला समर्थ श्री रामदास स्वामी महाराज नवरात्रीच्या दुस-या दिवशी प्रेमभावे वंदन करीत आहेत. आपणही मनोभावे तिच्या चरणीं दंडवत घालू या !
श्रीरेणुकाआई ही मातृत्त्वाची साकार मूर्तीच आहे. श्रीजगदंबा ही देखील आपल्या सर्वांची प्रेमळ माताच आहे. तिच्या या जगावेगळ्या मातृत्त्वाचा व अलौकिक कार्याचाच ऊहापोह खालील लिंकवरील लेखात केलेला आहे. तसेच तिच्या नामाचे माहात्म्यही कथन केले आहे. आजच्या दुस-या माळेला आपण सर्वांनी या लेखाचे वाचन करून भगवती श्रीजगदंबिकामातेच्या चरणी ही गुणवर्णनरूप सेवा समर्पूया आणि तिचा 'भवानी भवानी भवानी' असा त्रिवार नामजप करून धन्य होऊ या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें
द्वितीयोल्लास
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_2.html?m=1

आदिशक्तीचा उदोकार - प्रथमोल्लास



आज घटस्थापना, शारदीय नवरात्रीचा प्रथम दिन. भगवती श्रीजगदंबामातु:श्रींच्या पुण्यपावन नवरात्र महात्सवास आज सानंद सुरुवात होत आहे.
आपण सर्व त्या भगवती आदिमायेचेच अपत्य आहोत आणि आपल्या बाळाचे निरतिशय प्रेम प्रत्येक आईला असतेच. त्यामुळे आपणही या नऊ दिवसांच्या महोत्सवात आपल्या परमप्रिय मातेच्या गुणानुवादाची, स्तुतीची आणि तिचे भरभरून कौतुक करण्याची ही पुण्यदायक संधी पुरेपूर साधू या !
समर्थ श्री रामदास स्वामी महाराज आपल्या एका सुमधुर पदात नवरात्रीचे माहात्म्य सांगून जगन्मातेचा उदोकार करताना म्हणतात,
आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसली सिंहासनीं हो ।
प्रतिपदेपासुनी घटस्थापना करुनी हो ।
मूळ मंत्रें करुनि दैत्य मारिले निर्वाणीं हो ।
ब्रह्माविष्णुमहेश आईचे लागले पूजनीं हो ॥१॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
"आश्विन मासाच्या शुद्ध प्रतिपदेला भगवती अंबाबाई (भक्ताच्या हृदय-) सिंहासनावर विराजमान झालेली आहे. तिचे प्रतीक असणारा घट स्थापन केला आहे. तिच्या मूळ महामंत्राच्या जपसाधनेने शेवटी अनेक दैत्यांचे ( चित्तातील व बाहेरील ) निर्दालन झाल्याने साधक सुखी झालेला आहे आणि म्हणूनच तो मनोभावे हा नवरात्रीचा महोत्सव साजरा करीत आहे. ह्या भगवती जगदंबेच्या पूजनात प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेशही सहभागी झालेले आहेत ; म्हणूनच आपणही सर्वांनी अत्यंत प्रेमभावे नऊ दिवसांचा हा आदिशक्तीचा जागर तिच्या नामाच्या घनगर्जित उदोकारात उत्साहाने साजरा करू या ! सर्वांना हार्दिक आमंत्रण !!"
आजच्या पावन तिथीला श्री ज्ञानेश्वरभगिनी श्रीसंत मुक्ताबाईंची जयंती व श्री तुकारामशिष्या श्रीसंत बहेणाबाई शिऊरकरांची पुण्यतिथी असते. या दोन्ही महान विभूतींच्या श्रीचरणीं सादर दंडवत प्रणाम !
नवरात्र महात्सवाचे शास्त्रशुद्ध माहात्म्य आणि त्यासंबंधीच्या पुराणांनी व संतांनी सांगितलेल्या अनेकविध मनोहर कथा व संतांचे देवीमाहात्म्य कथन करणारे अलौकिक अभंग यांचा आस्वाद पूर्वी एका लेखमालेतून घेतला होता. ते सर्व लेख आजपासून क्रमाने आपण खालील लिंकवर वाचावेत. श्रीसंत मुक्ताबाई व श्रीसंत बहेणाबाई यांच्याविषयीही खालील लिंकवरील माहिती वाचून त्यांच्याचरणी आदरांजली समर्पावी.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें
प्रथमोल्लास
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post.html?m=1

7 Oct 2018

हा देवांचाही देव जाणिजे

साक्षात् परब्रह्म राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामीसमर्थ महाराजांच्या शिष्य-परंपरांमध्ये फार तयारीचे महात्मे होऊन गेलेले आहेत. आपल्या अवधूती आनंदामध्ये स्वच्छंद विहार करणारे हे सर्व स्वामीशिष्य अलौकिक अधिकाराचे धनी होते. या श्रेयनामावलीमध्ये पूर्णत: अप्रसिद्ध असे एक थोर विभूतिमत्त्व म्हणजे, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावचे सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज हे होत. हेच प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे सद्गुरु ! आज भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, ७ ऑक्टोबर रोजी त्यांची ९५ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या अद्भुत चरित्राचे हे सादर स्मरण !  
शके १७७९ म्हणजे इ.स.१८५७ साली पुसेसावळी येथील राक्षे आडनावाच्या परीट घराण्यात पूजनीय श्रीकृष्णदेवांचा जन्म झाला. वयाच्या ८-१० व्या वर्षी गावातील एक भीषण प्रसंग पाहून त्यांची वृत्ती एकदम पालटली व ते घरदार सोडून, दिगंबर अवस्थेत जंगलात राहू लागले. त्यांच्या वृत्ती अंतर्मुख झाल्या. त्याच सुमारास पलूस येथील सद्गुरु श्री.धोंडीबुवांनी स्वत: येऊन एके दिवशी श्रीकृष्णदेवांना अनुग्रह केला. त्यानंतरच ते पूर्णपणे नि:संग होऊन खडतर तपश्चर्येत निमग्न झाले. बालोन्मत्त वृत्तीने राहू लागले. एका पायावर तासन् तास उभे राहणे, तीन तीन तास पाण्याखाली बसून राहणे, दिवस दिवस तापलेल्या वाळूत पडून राहणे अशा कठीण साधनांचा अवलंब करून त्यांनी आपल्या देहाचे ममत्व संपूर्णपणे टाकून दिले. या खडतर साधनेने अंतरात प्रकटलेल्या वैराग्यअग्नीने त्यांचे अंत:करण सोन्यासारखे शुद्ध झाले. सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेने लाभलेल्या कृपाशक्तीच्या अनुसंधानामुळे त्यांचे साधन पूर्णत्वाला जाऊन ते सदैव आत्मस्वरूपी निमग्न राहू लागले. सद्गुरु श्री.धोंडीबुवांनी आपल्या भक्तांना सांगून ठेवले होते की, "आमच्या पश्चात् पुसेसावळीच्या कृष्णाला आमच्या गादीवर बसवा व आमचेच स्वरूप मानून त्याची सेवा करा !" त्याप्रमाणे श्री धोंडीबुवांनी देह ठेवल्यावर १९०८ साली त्यांच्या भक्तांनी सद्गुरु श्रीकृष्णदेवांना समारंभपूर्वक पलूसच्या गादीवर बसवले. पण अवघ्या दोनच दिवसात सद्गुरु श्रीकृष्णदेव ते वैभव सोडून रात्रीच पुन्हा पुसेसावळीला निघूून आले. ते परत कधी त्या गादीकडे गेलेच नाहीत. त्यांच्या परम वैराग्य-स्थितीला तो संपन्न सरंजाम थोडीच मानवणार होता ?
श्रीकृष्णदेव महाराज अत्यंत मृदू बोलत. ते खूप कमी बोलत, पण बोललेच तर ऐकणा-याला कानांवर अमृत पडते आहे असेच वाटे. रोज सकाळी ओढ्यावर स्नान झाल्यावर ते चराचराला सद्गुरुरूप मानून वंदन करीत. स्नानही दोन दोन तास चाले. त्याआधी मातीचे ढेकूळ घेऊन ते दात घासायला बसत. पूर्ण ढेकूळ संपेपर्यंत दात घासणे चालूच राही. लौकिक क्रियांमधूनही त्यांचे आतून श्रीभगवंतांशी अनुसंधान लागलेले असे. त्यामुळे बाह्यत: ते वेडगळपणा करीत आहेत असे वाटले, तरी तेही त्यांचे एक प्रकारचे साधनच होते. कोणी काही दिले तर मुकाट्याने खात, पण स्वत:हून कोणाकडे मागत नसत. आयाचित, सुडके इत्यादी भक्तांच्या घराच्या पडवीत रात्रीचा मुक्काम करीत. बाकी दिवसभर आपल्याच तंद्रीत फिरत असत. कुळथाचे माडगे त्यांना विशेष आवडत असे.
ब-याचवेळा गावातील मारुतीच्या मंदिरात बसून ते हनुमंतरायांशी प्रेमसंवाद करीत असत. वेळ असला तर मंगळवारी औंधच्या श्रीयमाईच्या दर्शनालाही जात. त्यांचा उपलब्ध एकमेव फोटो हा औंध संस्थानच्या घोड्याच्या पागेत एका झाडाखाली बसून काढलेला आहे. श्रीकृष्णदेव महाराज चांगले उंचपुरे, राकट व श्यामवर्णाचे होते. चेह-यावर बालसुलभ प्रेमळ भाव असत. त्यांच्या सा-या हालचाली अवधूती मस्तीत, आपल्याच आनंदात घडत असत.
[ http://rohanupalekar.blogspot.in ]
पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज १९२० साली प्रथम त्यांच्या सेवेत रुजू झाले तेव्हा देवांना भगेंद्र झाले होते. त्या जखमेत किडे झालेले, पण देवांना त्यांचे काहीच सोयरसुतक नव्हते. देहाचेच जिथे भान नाही, तिथे व्यथा वेदना कळणार तरी कशा ? पू.काका तर निष्णात डॉक्टर, त्यांना ते बघवत नसे. ते देवांना पाठुंगळीवर घेऊन सरकारी दवाखान्यात नेत व ड्रेसिंग करीत. देव प्रचंड विरोध करीत, प्रसंगी पू.काकांना चोपही देत. म्हणत, "त्यांनी माझे अंग खाल्ले तर तुझे काय जाते ? खाऊ देत त्यांना, नाहीतरी कधीतरी जाणारच आहे हे !" पण पू.काकांनी निष्ठेने सेवा करून त्या दुखण्यातून देवांना बाहेर काढले. हीच त-हा पायाला झालेल्या नारूची पण होती. देहबुद्धीचा पूर्ण निरास झाल्याने, सदैव परमहंस स्थितीत विचरण करणारे श्रीकृष्णदेव महाराज हे खरोखरीच मोठे विलक्षण विभूतिमत्त्व होते.
पूजनीय गोविंदकाका उपळेकर महाराजांनी आपल्या या अद्भुत सद्गुरूंचे, 'श्रीकृष्णदेव' या नावाचे फार सुंदर चरित्र लिहिलेले आहे. त्यातील सर्व हकिकती वाचताना आपल्याला आतूनच भरून येते. 
श्रीकृष्णदेव महाराजांच्या दिव्य अधिकाराची एक गोष्ट पू.काका सांगतात. एकेदिवशी परळीचे बापू महाराज आपला सर्व लवाजमा घेऊन पुसेसावळीला आले होते. त्यांनी श्रीकृष्णदेवांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. खूप शोधूनही श्रीकृष्णदेव काही सापडलेच नाहीत. पण नंतर कुठूनतरी अचानक देव त्यांच्यासमोर आले व मांडी घालून खाली मान घालून स्वस्थ बसून राहिले. बापू महाराजांनी दोन तीनदा विचारले, "देवा, कुठे पाहता?" पण श्रीकृष्णदेवांनी काहीच उत्तर दिले नाही. पुन्हा तेच विचारल्यावर एकदम जोरात म्हणाले, "कुणीकडे बघतोय ? पड्याल बघतोय पड्याल !" हे उत्तर ऐकल्यावर बापू महाराजांनी श्रीकृष्णदेवांना दंडवत घातला व लोकांना त्यांच्या वाक्याचा अर्थ सांगितला की, "पड्याल म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या चार वाणींच्या पलीकडे असणा-या, अनिर्वचनीय परब्रह्मतत्त्वाचे दर्शन-चिंतन करतोय ! " केवढा मोठा अधिकार होता पहा श्रीकृष्णदेव महाराजांचा !!
आपल्याच ब्रह्मानंदात अखंड निमग्न असणारे सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील तेजस्वी रत्न होते. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांवर कृपा करण्याचे आपले कार्य पूर्ण झाल्यावर त्यांनी वयाच्या सहासष्टाव्या वर्षी, भाद्रपद कृष्ण त्रयोदशी दि.८ ऑक्टोबर १९२३ रोजी गावाजवळच्या ओढ्यात मध्यान्ही जलसमाधी घेतली. आदल्या दिवशीच त्यांनी, "उद्या आमचा महाळ करा" , असे निकटच्या लोकांना सांगून ठेवले होतेच. त्यांच्या पावन देहाला ओढ्याच्या काठाजवळच समाधी देण्यात आली. आज त्यावर सुरेख मंदिर बांधलेले असून ते भक्तांवर मायेची कृपासावली घालीत आहे. याच वर्षी मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून, आता मंदिराला फार देखणे रूप आलेले आहे.
एक अत्यंत आश्चर्याची गोष्ट म्हणजे प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी देखील त्यानंतर बरोबर ५१ वर्षांनी, ८ ऑक्टोबर १९७४ रोजीच आपला देह त्यागला. पू. काकांनी आधी ठरवून आपल्या श्रीसद्गुरूंच्याच तारखेला देहत्याग करून आपली अद्भुत गुरुभक्तीच जणू श्रीगुरुचरणीं समर्पित केलेली दिसून येते. हे दोघेही गुरु-शिष्य फारच विलक्षण होते.
आज सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांच्या ९५ व्या समाधिदिनी, ही चरित्रस्मरणरूपी सेवा आपण त्यांच्या श्रीचरणीं समर्पून धन्य होऊ या.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481