1 Oct 2016

*** आदिशक्तिचें कवतुक मोठें *** ** प्रथमोल्लास **

नमस्कार !
आज घटस्थापना. शारदीय नवरात्राचा प्रथम दिन.
अश्विन शुद्ध प्रतिपदा ही शरद ऋतूची सुरुवात म्हणून या नवरात्राला " शारदीय नवरात्र " म्हणतात. शार म्हणजे ज्ञान. ते देणारी ती शारदा. त्या भगवती जगदंबा श्रीशारदेचे नवरात्र म्हणूनही हे शारदीय नवरात्र होय. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे नवरात्र सर्वदूर मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरे केले जाते.  प्रत्येक प्रांतात याच्या वेगवेगळ्या पद्धती, रूढी प्रचलित आहेत; तरी पण एक मात्र खरे की, हे देवीचे नवरात्र अतिशय आनंददायी असते, हवेहवेसे वाटणारे असते.
घरोघरी आज घटस्थापना होते. घट हे आमच्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीचे प्रतीक आहे. आम्ही त्याद्वारे आमची शेतीविषयीची आदरभावनाच व्यक्त करतो. एवढ्यावर न थांबता, त्याला दैवीकृपेचे, जगदंबेचे अधिष्ठान देऊन आम्ही तिचे सुयोग्य उदात्तीकरणही केलेले आहे. आमच्या मातीशी असणारी आमची नाळ आम्ही घटाच्या रूपकातून आणखी घट्ट करतो जणू !!
आपल्या शरीरालाही घट म्हणतात. तोही मातीचाच, पार्थिवच आहे. या संदर्भाने पाहिले तर, आमच्या या पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या  पाच महाभूतांपासून बनलेल्या  देहाच्या माध्यमातून आम्ही आदिशक्ती भगवतीचे अधिष्ठान स्थापून तिचे जागरण मांडतो. तीच ही घटस्थापना !
भगवती जगदंबा ही आमची माता आहे. माता हीच अबोध बाळाचे सर्वस्व असते. यच्चयावत् सर्व जगाला स्वत:पासून जन्माला घालणारी, त्याचे स्तन्य पाजून मातृवत् भरण पोषण करणारी, विकास करणारी, ज्ञान देणारी, सर्व आपत्तींमधून सांभाळ करणारी, आमच्या सुख-दु:खांमध्ये सहभागी होणारी, आनंदाच्या प्रसंगी पाठीवर कौतुकाची थाप मारणारी व चुकल्यास आमच्या शाश्वत हिताचा विचार करून योग्य ती शिक्षाही करणारी, कुंभाराप्रमाणे आत आधाराच हात घालून वरून थापटण्याने फटके मारून घडवणारी, आम्हाला लौकिक व पारमार्थिक वैभव प्रदान करणारी, आमचा परमार्थ स्वकृपेने पूर्णत्वास नेणारी; अशी अनंत रूपे धरून आमचे जीवन धन्य करणारी ही आमची श्रीजगदंबा आई खूप विलक्षणच आहे. तिच्या विषयी विनम्रभावाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा व तिच्या प्रेमाचा अधिक गहिरा आस्वाद घेण्याचा हक्काचा काळ म्हणजेच शारदीय नवरात्र होय ! आज पासून या प्रेमसोहळ्यास सानंद सुरुवात होत आहे. त्यानिमित्त आपणां सर्वांचे या शारदीय श्रीजगदंबा कृतज्ञता-स्मरणरूपी शब्दपूजेच्या महोत्सवात हार्दिक स्वागत करतो.
प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " नवरात्र म्हणजे काय? रात्र हा शब्द अंधाराचा द्योतक आहे. अंधार हे अज्ञानाचे प्रतीक आहे. मानवदेहात येऊन, देहाच्या नवद्वारांच्या आधाराने जे करायला हवे, ते न करता संसारात रमल्यामुळे नवद्वारात हा अज्ञानरूपी अंधार कोंदाटला आहे. सद्गुरुकृपेने शक्तिजागृती होऊन ज्ञानोदय होईल व त्यामुळे हा कोंदाटलेला अंधारही नाहीसा होईल. त्यासाठीच नवविधा भक्तींच्या नवरात्री करून हा अज्ञानरूपी अंधकार ज्ञानप्रकाशाने दूर सारावयाचा आहे. यालाच नवरात्र महोत्सव म्हणतात ! "
अश्विन शुद्ध प्रतिपदा ही श्रीज्ञानेश्वर-भगिनी ब्रह्मचित्कला आदिशक्ती श्रीसंत मुक्ताबाईंची जयंती ! तसेच श्रीतुकाराम-शिष्या श्रीसंत बहेणाबाई शिऊरकर यांची पुण्यतिथीही आजच असते.
श्रीसंत मुक्ताबाई या साक्षात् भगवती आदिशक्तीच होत्या. भगवान श्रीमाउलींबरोबर अद्भुत कार्य करण्यासाठीच भगवती जगदंबेने, शके १२०१, इ.स.१२७९ मध्ये अश्विन शुद्ध प्रतिपदेला, मध्यान्ही आळंदीच्या सिद्धबेटावर मुक्ताई रूपाने परिपूर्ण अवतार धारण केेला. त्यांचे तडफदार वागणे-बोलणे, त्यांची रोकडा ब्रह्मानुभव सांगण्याची हातोटी, त्यांचे नित्य सहजसमाधीतील वर्तन, त्यांचे प्रेमळ उपदेशन, आणि सरतेशेवटी त्यांचे जगावेगळे, अद्वितीय असे देहविसर्जन; सारे सारे खूप विलक्षण आहे. तेथे आपल्याला केवळ साष्टांग दंडवतच करणे तेवढे शक्य आहे व तेच आपल्या भाग्याची परिसीमा देखील !
श्रीसंत बहेणाबाई या सद्गुरु श्रीतुकाराम महाराजांच्या स्वनामधन्य शिष्योत्तमा होत. त्यांचे दुसरे असेच थोर शिष्य म्हणजे श्रीसंत निळोबाराय महाराज पिंपळनेरकर. या दोन्ही विलक्षण सत्पुरुषांनी श्रीसंत तुकाराम महाराजांची कृपा यथार्थ ठरविली. आपल्या अलौकिक पारमार्थिक अधिकाराने, अनुभूतीने व लोकविलक्षण वाङ्मय निर्मितीने त्यांनी सद्गुरु श्रीतुकोबारायांचे पितृत्व सार्थ करून दाखविले.
सर्वात आश्चर्य म्हणजे हे दोन्ही सत्पुरुष जन्माने ब्राह्मण होते व त्याकाळच्या समाजरूढीच्या विरुद्ध जाऊन या दोन्ही महात्म्यांनी आपल्यापेक्षा खालच्या जातीचे सद्गुरु करून, भक्तिमार्गात जात-धर्म-वय-शिक्षण अशा कोणत्याही गोष्टींचा परमार्थाशी संबंध नसतो, हेच पुन्हा एकदा सिद्ध केले.
दुर्दैवाने हाच विचार करण्याची बौद्धिक कुवत व अक्कल नसलेले मूर्ख लोक, स्वत:ला सांप्रदायिक अध्वर्यू कल्पून उगीचच संतांना जातीच्या आधाराने वेगवेगळे विभागून जातिद्वेष पसरवत राहतात. त्यांची कीव करावी तेवढी थोडीच. " तुका म्हणे ऐसे माकडाचे छंद । अवघे धिंद धिंद शिंदळीचे ॥" हेच या मायेच्या माईंदांचे यथार्थ वर्णन आहे. असो.
श्रीसंत बहेणाबाईंचे समग्र चरित्र खूप मोहक आणि वेगवान आहे. त्यांच्या पारमार्थिक अनुभूतीची कक्षाही उंच आकाशाला गवसणी घालणारी आहे. त्यांच्या अभंगांतून प्रकटणारा योगानुभव भल्या भल्या तत्त्वचिंतकांना तोंडात बोट घालायला लावणारा आहे. प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज आवर्जून म्हणत की, " प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी श्रीसंत बहेणाबाईंचा गाथा वाचावा, अभ्यासावा, इतका तो महत्त्वपूर्ण आहे !"
श्रीसंत बहेणाबाईंनी आपल्या अभंगांमधून त्यांचे पूर्वीचे तेरा जन्म स्पष्ट करून सांगितलेले आहेत. तसेच फार गूढ व अलौकिक अनुभूतीही त्या अगदी सहज सांगून जातात. रोकडा ब्रह्मानुभव अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये प्रासादिक पद्धतीने त्या जेव्हा सांगतात, तेव्हा आपल्यालाही हृदयात 'सद्गुरुकृपेची' माहात्म्य-जाणीव अगदी अनिवारतेने प्रकटते. त्यांची सारीच अभंगरचना अशी प्रौढ, प्रगल्भ आणि अद्भुत आहे.
संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी आपल्या " अभंग आस्वाद : भाग चौथा " या ग्रंथात श्रीसंत निळोबारायांच्या अठरा व श्रीसंत बहेणाबाईंच्या पंधरा मोजक्या, निवडक आणि महत्त्वपूर्ण अभंगांवर सुरेख विवरण लिहिलेले आहे. ते सर्वांनी आवर्जून वाचावे. त्यातून जाणवणारी, या दोन्ही महात्म्यांच्या आध्यात्मिक अनुभव-संपन्नतेची प्रसन्न प्रचिती, वाचकांचे हृदय अक्षरश: आनंदाने भारून टाकते.
आजच्याच तिथीचे किती औचित्य म्हणावे? साक्षात् आदिमाया भगवती जगदंबाच " श्रीमुक्ताबाई " रूपाने प्रकटली, तर तीच जगदंबा आपल्या " श्रीबहेणाबाई " या तशाच दुस-या रूपाने पुन्हा आपल्यातच सामावली ; तेही शारदीय नवरात्रीचा विलक्षण योग साधून ! खरोखरीच ही आदिशक्तीची लीला न्यारीच म्हणायला हवी.
श्रीतुकाराम महाराजांची कूस धन्य करणा-या श्रीसंत बहेणाबाई महाराजांच्या चरणीं सादर दंडवत घालून त्यांच्या सुप्रसिद्ध अभंगाने आपल्या वैभवसंपन्न मराठी संतपरंपरेला सादर नमन करूया !
संतकृपा झाली ।
इमारत फळा आली ॥१॥
ज्ञानदेवे रचिला पाया ।
उभारिले देवालया ॥२॥
नामा तयाचा किंकर ।
तेणे केला हा विस्तार ॥३॥
जनार्दन एकनाथ ।
खांब दिला भागवत ॥४॥
तुका झालासे कळस ।
भजन करा सावकाश ॥५॥
बहेणि फडकती ध्वजा ।
संकीर्तन झाले वोजा ॥६॥
आजपासून आता पूर्ण नवरात्रभर आपण भगवती श्रीजगदंबा मातेच्या विविध लीलांचा, कथांचा तात्त्विक व प्रेममय आस्वाद घेणार आहोत. श्रीभगवंत स्तुतिप्रिय आहेत, तशीच त्यांची अभिन्ना भगवती शक्ती देखील स्तुतिप्रिय आहे. तिची प्रेमभराने केलेली स्तुती ऐकून ती प्रसन्न होते व आपल्यासारख्या दीनांवर कृपाप्रसाद करते. नवरात्रात जागरण करायची पद्धत असते. जागरण म्हणजे रात्रीच्या प्रहरात जागृतीत केलेली देवीची उपासना. अथवा देवीच्या कार्याच्या जाणिवेचे यथार्थ चिंतन म्हणजेही जागरणच. म्हणून श्रीजगदंबेच्या लीलांचे, कार्याचे व प्रेमकृपेचे जाणीवपूर्वक चिंतन करणे हेही एक प्रकारचे जागरणच आहे ! यासाठीच आपल्या थोर अधिकारी संतांनी भरभरून केलेल्या श्रीभगवतीमातेच्या गूढरम्य स्तुतीचा आस्वाद घेत, तिच्या प्रेमानंदात अंतर्बाह्य निमग्न होण्यासाठी, श्रीआदिमातेच्या या गुणानुवादरूप नवरात्र जागरण सेवासत्रामध्ये आपणां सर्वांना प्रेमपूर्वक निमंत्रण देतो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
rohanupalekar.blogspot.in )

10 comments:

  1. फार अप्रतिम आणि परत परत वाचावी अशी लेखनमाला

    ReplyDelete
  2. अप्रतिम , प्रसन्न वाटले !

    ReplyDelete
  3. देवी जगदंबेच्या श्री चरणी साष्टांग नमस्कार। फारच सुंदर लेखन।... 🙏

    ReplyDelete
  4. Replies
    1. सुंदर लेख... धन्यवाद.... पुढील लेखांची आतुरतेने वाट पाहत आहे... नमस्कार...

      Delete
    2. सुंदर आणि अप्रतिम लेख

      Delete
  5. Wonderful 🙏🙏🙏 blessed self. Jai Jagdamb Udhyostu. Khup sunder ahe.🙏🙏

    ReplyDelete
  6. सुंदर लेख👏👏👌👌

    ReplyDelete
  7. फार सुंदर लेख👌👌👏👏

    ReplyDelete
  8. गुरुदेव दत्त खूप सुंदर विवेचन

    ReplyDelete