*** आदिशक्तिचें कवतुक मोठें *** ** एकादशोल्लास **
सर्व भगवत्प्रेमी सुहृदांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज दसरा, नवरात्रीच्या सांगतेचा दिवस ! आजच्या तिथीलाच विजयादशमी देखील म्हणतात. भगवती श्रीजगदंबेने महिषासुराचा व भगवान श्रीरामांनी रावणाचा वध आजच्याच तिथीला केला होता. त्यांच्या त्या विजयाचे द्योतक, धर्माच्या अधर्मावरील विजयाचे प्रतीक म्हणून प्राचीन काळापासून या तिथीला उत्सव साजरा करून सीमोल्लंघन करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. सगळीकडे झेंडूच्या फुलांची आरास करून, देवांना झेंडूची फुले वाहून, शमी व आपट्याच्या फांदीची पूजा करायची. देवांना व श्रीसद्गुरूंना विशिष्ट पद्धतीने आपट्याची व शमीची पाने आणि झेंडूचे फूल अर्पण करायचे. देवी सरस्वतीची व तिचे प्रतीक असणा-या ग्रंथांची पूजा करायची. नंतर एकमेकांना आपट्याचे सोने द्यायचे आणि सर्वांचे अभीष्ट चिंतून आनंद व्यक्त करायचा; आपल्या गुरुजनांची आवर्जून भेट घेऊन त्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे, अशी या दिवशीची प्रथा आहे. या सगळ्यांचा खूप मोठा अर्थ आपल्या ऋषी-मुनींनी सांगून ठेवलेला आहे. आपण आपल्या जगावेगळ्या संस्कृतीचा खोलात जाऊन विचारच करत नाही, हे आपलेच दुर्दैव आहे. आता फक्त दिवसभर व्हॉटसपवर पडीक राहून, स्वत: न वाचताच भरमसाठ मेसेज नुसते फारवर्ड करायचे, दुपारी भरपेट गोडधोड हाणून ताणून द्यायची आणि सणाचे, सुट्टीचे सार्थक करायचे; हीच सध्या आपल्याकडील उत्सवांची पद्धत रूढ होत चाललेली आहे. दुर्दैवाने बळावलेला हा मूर्खपणा खरंच कुठेतरी थांबायला हवा.
संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक पूजनीय सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज या विजयादशमीच्या प्रतीकांचा गूढ अर्थ फार सुंदर रितीने स्पष्ट करून सांगत असत. त्यांचे उत्तराधिकारी पूजनीय श्री. शिरीषदादा कवडे यांनी आपल्या ' महेशें शिवेसी निजखूण दाविली ' या ग्रंथातील ' विजयादशमी रहस्य ' या प्रवचनात हे सर्व मर्म उलगडून सांगितलेले आहे. आपण त्याचा येथे थोडक्यात आस्वाद घेऊया.
कालच्या लेखामध्ये आपण वैष्णवी माया म्हणून भगवती जे कार्य करते ते पाहिले. तीच मायारूपिणी अंबा सद्गुरुरूपाने जीवावर अनुग्रहकृपा करून त्याचा देहभाव आटवते व त्याला जीवदशेतून पुन्हा मूळच्या शिवस्वरूपात एकरूप करते. याच प्रक्रियेला खरे ' सीमोल्लंघन ' म्हणतात आणि त्याच्या विधीलाच ' नवरात्र ' म्हणतात. जीवाचा जीवभाव नष्ट होण्याची प्रक्रिया म्हणजेच साधना व ही साधना नऊ प्रकारांनी संपूर्ण होते. यांनाच नवविधा भक्ती म्हणतात. श्रीसद्गुरूंची कृपाशक्ती साधकाला क्रमाने, टप्प्यात टप्प्याने या नऊ पाय-यांवरून आत्मस्वरूपाच्या महालात नेऊन ठेवते.
श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य व सख्य या आठ भक्तीपाय-या ओलांडून तो जीव आत्मनिवेदन या नवव्या पायरीवर येतो. तेथे तो श्रीकृपेने भगवंतांशी पुन्हा एकरूप होऊन जातो. त्यालाच विजयादशमी म्हणतात. जीवत्वातून शिवत्वात पुन्हा झालेले हेच खरे सीमोल्लंघन होय. या संपूर्ण प्रक्रियेसाठी आधी श्रीगुरुचरणीं शरण जाऊन त्यांची कृपा संपादन करावी लागते. त्यांच्या कडून ते कृपाबीज हृदयात प्रतिष्ठापित होणे हीच घटस्थापना होय. मग त्यांनी कृपावंत होऊन दिलेले साधन प्राणपणाने जपून वाढवावे लागते. हेच आपल्यासाठी नवरात्र अनुष्ठान असते आणि याची परिपूर्ती म्हणजेच विजयादशमी होय !
प्रत्यक्ष भगवंतच विजयस्वरूप आहेत, तर अर्जुनाचे एक नाव विजय देखील आहे. अर्जुन म्हणजेच हा जीव व तो विजया नावाच्या शक्तीच्या कृपेने भगवंतांशी एकरूप होऊन पुन्हा विजयस्वरूप होऊन जातो. जीव विजयस्वरूप होण्याची ही सर्व प्रक्रिया म्हणजेच नवरात्र होय !
विजयादशमीला देवांना आणि श्रीसद्गुरूंना आपटा व शमीची पाने आणि झेंडूचे फूल वाहतात. याचे शास्त्रीय कारणही खूप सुंदर आहे.
आपट्याला दोन दले असतात. आपट्याला संस्कृतात कांचन म्हणतात. कांचन म्हणजेच मोह, म्हणून तो आपल्या मोहाचे प्रतीक आहे. ' मी ' व ' माझे ' या दोन रूपांनी आपला मोह कार्य करीत असतो. म्हणून ही दोन दले मिटून श्रीसद्गुरुचरणीं वाहतात. " माझे द्वैत मिटले जावो आणि मोह तुमच्या चरणी अर्पण असो," अशी त्यामागची भावना असते.
शमीची पाने ही चिंचेच्या पानांसारखी असतात. तो आपल्या मनाचे प्रतीक आहे. आपल्या मनाला असे अनेक फाटे फुटलेले असतात. ही सगळी पाने हिरवी म्हणजे टवटवीत देखील असतात. आपल्या मनाच्या वृत्ती ह्या अशाच असतात. म्हणून त्या श्रीगुरुचरणीं अर्पण करून आपण मनाला आवर घालायचा असतो. म्हणून शमीचे पान पालथे अर्पण करतात. " माझ्या मनाच्या वृत्ती प्रपंचातून निघून तुमच्या चरणी आश्रयाला येवोत, 'पालटोत' ," हे त्यातून आपण श्रीगुरूंना विनवायचे असते.
याबरोबर झेंडूचे फूलही वाहतात. झेंडूला तसा सुगंध नाही, पण एक विशिष्ट तीव्र गंध असतो. शिवाय हे एक स्वतंत्र फूल नाही, तो अनेक फुलांचा गुच्छ आहे. तसे आमच्या मनाचा भाव जरी वरून एकविध दिसत असला तरी तो बहुविधच असतो. अनेक वासनांचा मिळून बनलेला असतो. त्याला आपापल्या वासनांचा तीव्र गंधही असतो. तो वासनांचा रंग या झेंडू सारखा भगवा होवो, वैराग्याचा होवो म्हणून झेंडू वाहायचा; तोही देठ देवांकडे करून. तो वासनामूळांनी बनलेला देठ श्रीसद्गुरूंनी हातात घेतला तरच आपण त्या वासनांच्या कचाट्यातून सुटणार ना !
असा या प्रतीकांचा सुरेख गूढ अर्थ आहे. हे सगळे रहस्य समजावे, त्यामागचे विचार कळून आपले उत्सव अधिक जाणीवपूर्वक, वाढत्या उत्साहाने व प्रेमाने साजरे व्हावेत यासाठीच आपल्या ऋषीमुनींनी व संतांनी मांडलेले चिंतन आपण वारंवार वाचले, अभ्यासले पाहिजे.
गेले दहा दिवस आपण भगवती श्रीजगदंबा मातेची यथामती शब्दपूजा करीत आहोत. भगवती जगदंबिकेच्या विविध अवतारांच्या लीलांचे आपल्याकडून या नवरात्रात सप्रेम स्मरण घडले. आज या सुमुहूर्तावर, दस-याच्या पावन दिवशी तिच्याच करुणाकृपेने माझ्याकडून लेखन व तुम्हां सर्वांकडून वाचन, मनन रूपाने संपन्न झालेली ही सर्व वाङ्मयसेवा श्रीशारदा भगवतीच्या परमपावन श्रीचरणीं अर्पूया आणि सद्गुरुस्वरूपिणी भगवती जगज्जननी श्रीअंबामातेकडे, ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्ही प्रकारचे वैभव आम्हांला भरभरून द्यावे, असा कृपाप्रसाद मागूया. ही कोमलहृदयाची परमप्रेमळ माता आपली लेकुरवाचेने केलेली प्रार्थना नक्कीच पूर्ण करेल.
सद्गुरु श्रीसंत एकनाथ महाराजांनी आपल्या सुप्रसिद्ध जोगव्यातून श्रीआदिशक्तीचे स्वरूप व कार्य यांचे सर्वांगीण दर्शन घडवलेले आहे. आपण गेले दहा दिवस जे चिंतन करतोय, ते सर्व नाथमहाराजांनी या एकाच अभंगात साररूपाने व्यक्त केले आहे. म्हणून त्याच पावन शब्दांद्वारे आपण कृपापसाय मागून, विजयादशमीचा असा ज्ञानपूर्ण उत्सव साजरा करूया आणि सरतेशेवटी विश्वजननी श्रीभगवतीमातेच्या प्रेमार्द्र मायकुशीत निरंतर विसावूया !
अनादि निर्गुण प्रकटली भवानी ।
मोहमहिषासुर मर्दनालागुनी ।
त्रिविध तापांची करावया झाडणी ।
भक्तांलागोनी पावसी निर्वाणीं ॥१॥
ऐसा जोगवा जोगवा मागेन ।
द्वैत सारूनी माळ मी घालीन ।
हातीं बोधाचा झेंडा मी घेईन ।
भेदरहित वारीसी जाईन ॥२॥
नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा ।
करुनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा ।
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा ।
दंभ संसार सांडीन कुपात्रा ॥३॥
पूर्णबोधाची भरीन परडी ।
आशा-तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडी ।
अद्भुतरसाची भरीन दुरडी ॥४॥
आतां साजणी मी झालिये नि:संग ।
विकल्प नव-याचा सोडियेला संग ।
कामक्रोध हे झोडियेले मांग ।
केला मोकळा मारग सुरंग ॥५॥
ऐसा जोगवा मागुनी ठेविला ।
जाऊनी महाद्वारीं नवस फेडिला ।
एकपणें जनार्दन देखिला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

फारच अप्रतिम सर्व लेखनमाला
ReplyDeleteह्या नवरात्रात देवी भगवतीच्या कृपेने तुमचे फारच सुंदर, मार्मिक, भक्तिमय, आध्यात्मिक असे लेखन द्वारे उपासना, पूजन, मनन, चिंतन सम्पन्न झाले। मी तुमचा आभारी आहे आणि मनपूर्वक धन्यवाद देतो। कर म्हणजे माझ्या कडे शब्दच नाही। प्रेमपूर्वक नमन। 🙏
ReplyDeleteया नवरात्रात आपल्या निरुपणाद्वारे आपण आमच्या ज्ञानात तर बहुमोल भर घातलीतच पण आई जगदम्बेच्या प्रेमवर्षावात आम्हांला हात धरून न्हाऊन काढलत ! तुमचे मानावे तेव्हडे आभार कमीच आहेत .
ReplyDeleteआपणांस मनःपूर्वक शुभेच्छा !
आपला
यशवंत जोशी