27 Nov 2016

बापा ज्ञानेश्वरा तुम्हां ठावे हित

कार्तिक कृष्ण त्रयोदशी !!
जशी आम्हांला श्रावण कृष्ण अष्टमी सर्वात महत्त्वाची तिथी वाटते, तशीच कार्तिक कृष्ण त्रयोदशी देखील आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्रावणात अष्टमीला पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंची, तसेच त्यांचे अभिन्न स्वरूप सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींची जयंती असते. म्हणून तो आमच्यासाठी सर्वात मोठा सण आहे. कार्तिक कृष्णपक्षात श्रीमाउलींनी आळंदीतील आपल्या पुरातन स्थानीच पुन्हा संजीवन समाधी घेतली. म्हणूनच श्रीसंत गुलाबराव महाराज आळंदीला ' नित्यतीर्थ ' असे म्हणतात. हेच त्यांचे समाधीचे युगानुयुगांचे जुनाट स्थान आहे. येथूनच ते पुन्हा पुन्हा अवतार धारण करून येतात व अवतार समाप्तीनंतर पुन्हा तेथेच परत जातात. आळंदी प्रमाणेच ' माउली ' हे पण ' नित्यतीर्थ ' आहेत, तेच सगुण साकार झालेले साक्षात् परिपूर्ण परब्रह्म आहेत !
परमकरुणार्णव श्री माउलींच्या कृपासाम्राज्यात अनेक संतरत्ने निर्माण झालेली आहेत. त्यांतील स्वतेजाने तळपणा-या काही थोर विभूतिमत्वांमध्ये, फलटणचे महान संत प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज व पुण्याचे योगिराज प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज; यांचे नाव अग्रक्रमावर आहे. या दोन्ही निस्सीम माउलीभक्तांचे चरित्र व कार्य श्री माउलींनाही समाधान देईल, इतके वैशिष्ट्यपूर्ण आहे. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे उत्तराधिकारी, प्राचार्य प. पू. श्री. शिरीषदादा कवडे हेही फार विलक्षण माउलीभक्त आहेत.
दरवेळी आपण ज्यांचा उत्सव असेल त्या सत्पुरुषांचे जीवन व कार्याचे थोडक्यात सेवा म्हणून मनन करतो. पण यावेळी नेहमीच्या पद्धतीऐवजी आपण प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी रचलेल्या माउलींवरील नितांतसुंदर अभंगांच्या आधारे, संजीवन समाधिदिनी श्रीमाउलीचरणीं दंडवतपूर्वक पुष्पांजली समर्पूया !
आजवरचे सर्व संत श्रीमाउलींचे गुणगान गाण्यात, त्यांची सेवा-चाकरी करण्यात धन्यता मानत आलेले आहेत. तीच परंपरा पाळत प. पू. श्री. शिरीषदादा देखील भगवान माउलींच्या अलौकिक व अद्वितीय माहात्म्याचे सुरेख वर्णन करताना म्हणतात,
सागराची गाज शोभे तयापाशी ।
थेंबुटे आवेशी कोण काजा ॥१॥
बापा ज्ञानेश्वरा तुम्हांपुढे केवी ।
वाचाळी करावी लेकुराने ॥२॥
बोबड्या उत्तरे रिझे जरी तात ।
अज्ञानाची मात कवणासी ॥३॥
मी तो अज्ञ पोर, अंध पंगु मुके ।
उच्छिष्ट भातुके द्यावे माते ॥४॥
अमृतेसी काही ठावे नाही आन ।
मर्यादेचे मौन भले मानी ॥५॥
महासागराच्या किना-यावर उभे राहिलो असता, त्याची जी रौद्र-मोहक व विलक्षण गाज जाणवते, तिचा मन भरून आस्वादच घ्यायचा असतो. बारक्याशा थेंबुटाने कितीही आवेश आणला, तरी त्याला काही त्या गाजेचा आव आणता येणार नाही. अहो माउलीराया, तुम्ही तर प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात, तुमच्यासमोर आम्ही सर्व त्या थेंबुटासारखेच आहोत. म्हणूनच, मायबापा ज्ञानेश्वरा ! तुमच्यापुढे आम्ही वाचाळी करावी तरी कोणत्या तोंडाने? आम्ही लेकुरवाचेने बोबडे बोलावे, हेच उत्तम. त्या बोबड्या बोलाने मायबाप रिझतात, कौतुकाने बाळाला कडेवर घेऊन लाड करतात; हे जरी खरे असले, तरी शेवटी अज्ञानाची गती आणखी ती काय असणार?
देवा, मी तर आपल्या घरचे अज्ञानी, अंध, पंगू व मुके पोर आहे. मला योग्य काय अयोग्य काय? याचे ज्ञान नाही; माझ्या चर्मनेत्रांना माझे हित कधी दिसतच नाही, म्हणून ते एका अर्थाने अंधच आहेत. मला माझ्या प्रारब्धानुसार, कर्मांचीच गती आहे, म्हणून मी पांगळाच आहे, मला स्वतंत्र चालताही येत नाही. जे बोलायला हवे ते, श्रीभगवंतांचे नाम, गुण, लीला मी कधीच बोलत नाही, पण बाकीचे सर्व अकारण बोलत बसतो, म्हणून मी खरेतर मुकाच आहे. पण अहो दयावंता, तुम्हांला माझी दया येऊ द्यावी. ती आली तर आपल्या कृपेच्या उच्छिष्ट प्रसादावर मी पोसला जाऊन, ख-या अर्थाने संपन्न होईन, धष्टपुष्ट होईन.
प्रेमसागरा माउली भगवंता, मला बाकी काहीही कळत नाही, पण मर्यादेचे मौन मात्र मी आपल्या कृपेने जाणतो व तेच सुयोग्य असे मौन धारण करून आता आपल्या समोर हात जोडून उभा आहे !
खरोखरीच भगवान श्री ज्ञानराज माउलींच्या समोर उभे राहताना साधकाची काय भावभूमिका असावी, याचे अप्रतिम वर्णन प. पू. श्री. दादांनी या अभंगात केलेले आहे.
भगवान श्री माउलींची प्रार्थना करताना प. पू. श्री. दादा म्हणतात,
आपुल्या दयेचा मज भरवंसा ।
जीव जाला पिसा ज्ञानदेवा ॥१॥
अज्ञ मी म्हणोनि करावा अव्हेर ।
व्हावे ना कठोर ऐसे ताता ॥२॥
मूर्ख मतिमंद दोषांचे आगर ।
खुळे जरी पोर आपुले ना ॥३॥
बापा ज्ञानेश्वरा तुम्हां ठावे हित ।
जाणता उचित लेकुराचे ॥४॥
रसरंगी मिठी घातलीसे पायी ।
दुजी आस नाही अमृतेसी ॥५॥
सद्गुरु श्री ज्ञानदेवा भगवंता, आपल्या निरंतर दयेचा मला भरवसा आहे. आपल्यासाठी माझा जीव वेडापिसा झालेला आहे. अहो कृपावंता ताता, आपण कठोर होऊन अज्ञानी म्हणून माझा अव्हेर करू नका. मी जरी मूर्ख, मतिमंद, अनेक दोषांचे आगर असलो, वेडा खुळा असलो तरी आपलेच पोर आहे ना !
मायबापा ज्ञानेश्वरा, आपणच माझे खरे हित कशात आहे ते जाणता, तेव्हा माझ्यासाठी जे काही उचित असेल तेच आपण कृपावंत होऊन मला प्रदान करावे. आपल्या श्रीचरणीं मी मिठी घालून निश्चल बसलेलो आहे, आता मला आपल्या स्मरणाशिवाय, आपल्या कृपेशिवाय दुसरी कसलीही आस उरलेली नाही. आपल्या या अजाण लेकरावर माय माउली भगवंता, आपण कृपावर्षाव करणार ना !
भगवान श्री माउली नुसते समाधिस्थ नाहीत, ते ' संजीवन समाधिस्थ ' आहेत. ते कुठेही गेलेले नाहीत. ते आजही आळंदीत आहेत, त्यांच्या भक्तांच्या हृदयात प्रेमाचा आस्वाद घेत आहेत, त्यांच्या नामामध्ये आहेत, त्यांच्या चरित्रात आहेत. जो प्रेमादराने व कळवळून त्यांना हाक मारेल, त्याच्यासाठी ते सदैव त्या अनन्यभक्ताच्या समोरच आहेत !
आज भगवान सद्गुरु श्री ज्ञानराज माउली महाराजांच्या संजीवन समाधी दिनी, त्यांच्या सर्वार्थदायक श्रीचरणारविंदी वारंवार दंडवतपूर्वक नमन करून, प. पू. श्री. दादांच्याच शब्दांद्वारे कृपायाचना करूया आणि ' श्रीज्ञानदेव माउली ' या पुण्यपावन नामगजरात त्याच श्रीचरणीं विसावूया !!!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

25 Nov 2016

नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा

आज कार्तिक कृष्ण एकादशी, उत्पत्ती एकादशी, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधिसोहळ्याची कार्तिकी आळंदी वारी  !!
अलं ददाति इति आलंदि । अशी आळंदी शब्दाची फोड आहे. जी पुरे म्हणेपर्यंत देते ती आळंदी  ! अहो, भगवान श्री ज्ञानराय तर आहेतच, पण त्यांची पावन
आळंदी नगरी देखील " जो जे वांच्छिल तो ते लाहो । " हा श्री माउलींचाच अमृत-शब्द गेली साडेसातशे वर्षे पूर्ण करीत आलेली आहे. साक्षात् श्रीभगवंतांचेच अभिन्न स्वरूप असणा-या श्री माउलींसारखेच अगाध व अचाट सामर्थ्य, त्यांचे चिरंतन अस्तित्व लाभल्याने ही लौकिक नगरी देखील सर्वार्थाने अंगोअंगी मिरवत आहे. प्रत्यक्ष श्री माउलींच्या संजीवन समाधीचे अधिष्ठान-माहेर लाभल्यास काय होणार नाही? ज्यांच्या दारातला पिंपळही प्रत्यक्ष सुवर्णाचा आहे, त्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री माउलींच्या साम्राज्यात उणेपणाच कायमचा उणावलेला आहे  !!
आज कार्तिकी वारी. पहाटे पवमानपंचसूक्ताच्या अभिषेकाने उत्सवास सुरुवात होते. दुपारी श्री माउलींची पालखी नगर परिक्रमेस बाहेर पडते व हजेरी मारुती मंदिरात सर्व दिंड्यांच्या हजे-या होऊन पालखी सोहळा पुन्हा मंदिरात परत येतो. उद्या द्वादशीला श्री माउलींची रथातून मिरवणूक निघते व गोपाळपु-यातून फिरून परत येते. परवा त्रयोदशीला श्री माउलींचा समाधिउत्सव साजरा होतो. वारकरी संप्रदायात या उत्सवाला अतिशय महत्त्व आहे! 
आळंदीचा व तिचे अक्षय अधिष्ठान असलेल्या श्री माउलींचा महिमा गाताना सर्व संत वेडावून जातात. श्रीसंत तुकोबाराय तर श्री माउलींविषयीच्या अत्यंत जिव्हाळ्याने शपथपूर्वक म्हणतात,
चला आळंदीला जाऊ।
ज्ञानेश्वर डोळा पाहू ॥
होतील संतांचिया भेटी।
सांगू सुखाचीया गोष्टी ॥
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ।
मुखी म्हणता चुकती फेर ॥
जन्म नाही रे आणिक।
तुका म्हणे माझी भाक ॥
अशा या आळंदी क्षेत्राचे आजचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण साक्षात् श्रीपांडुरंगांनीच स्वमुखे नामदेवरायांना सांगितले आहे की, " कार्तिक शुद्ध एकादशी माझी तर कृष्ण एकादशी ज्ञानोबांची. आम्ही कार्तिकात या एकादशीला कायम आमच्या लाडक्या ज्ञानोबांच्या सोबतच असू ! " श्रीभगवंतांचे हे अलौकिक माउली-प्रेम पाहून श्री नामदेवराय हर्षोत्फुल्ल होऊन धन्योद्गार काढतात,
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार ।
धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥
धन्य भागीरथी मनकर्णिका वोघा ।
आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग ।
मिळालें तें सांग अलंकापुरी ॥३॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हें संत ।
झाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४॥
" कार्तिक कृष्ण अष्टमीपासून ते त्रयोदशीपर्यंत जो कोणी माझ्या परमप्रिय श्रीज्ञानराज माउलींचे स्मरण, वंदन, पूजन, भजन, नमन, चरित्रगायन व नामस्मरण करेल, त्याच्यावर मी प्रसन्न होईन ! " असा प्रत्यक्ष आनंदकंद भगवान श्रीपंढरीनाथांचाच आशीर्वाद आहे. म्हणूनच आजपासून त्रयोदशीपर्यंत सद्गुरु भगवान श्री माउलींच्या संजीवन समाधीस वारंवार साष्टांग दंडवत घालून, श्री माउलींचे प्रिय भक्त प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज विरचित श्रीज्ञानदेवाष्टकाचे प्रेमादरपूर्वक वाचन, चिंतन करून आपणही श्रीपंढरीश परमात्म्याचे शुभाशीर्वाद प्राप्त करून घेऊया व धन्य होऊया  !!
॥ श्रीज्ञानदेवाष्टकम् ॥
महिंद्रायणीचे तटी जे आळंदी ।
दुजी पंढरीक्षेत्र लोकी प्रसिद्धी ।
असा घेतला तेथ जेणे विसावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥१॥
पिता विठ्ठल विख्यात रुक्माई माता ।
दयाशील दाम्पत्य नाही अहंता ।
तये पोटी न कां जन्म हा घ्यावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥२॥
कलीमाजी तारावया भाविकांना ।
सुविख्यात ज्ञानेश्वरी ग्रंथ केला ।
समाधान जो देई गीतार्थ जीवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥३॥
चमत्कार नाना जगी दावियेले ।
पशूच्या मुखे वेदही बोलविले ।
असे थोर आश्चर्य वाटेचि जीवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥४॥
द्विजाच्या घरी श्राद्धकाळी जिवंत ।
करी जेववी पूर्वजाते समस्त ।
मुखी घालती अंगुली लोक तेव्हा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥५॥
अगा व्याघ्रयाने वृथा खेळताहे ।
पहा भिंत निर्जीव ही चालताहे ।
असे दाखवी लाजवी चांगदेवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥६॥
नसे द्वैतबुद्धी दया सर्वभूती ।
अशी देखिली ती संतमूर्ती ।
नसे साम्य लोकी जयाच्या प्रभावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥७॥
महायोगी लोकी ऐसी प्रसिद्धी ।
आळंदीपुरी तोचि घेई समाधी ।
अशा ते न कां विश्वरूपी म्हणावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥८॥
वदे भक्तीने नित्य या भाविकांसी ।
भवाब्धि भये बाधिती ना तयासी ।
म्हणे दास गोविंद विश्वास ठेवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥९॥
इति सद्गुरु श्रीगोविंदकाका उपळेकर महाराज विरचितम् श्रीज्ञानदेवाष्टकम् संपूर्णम् ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

11 Nov 2016

आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो


नमस्कार सुहृदहो,
आज प्रबोधिनी कार्तिकी एकादशी, पंढरपूर यात्रा !!
चातुर्मास्याची सुरुवात आषाढी एकादशीला होते व चार महिन्यांनंतर कार्तिकी एकादशीला समाप्ती होते. भगवान श्रीविष्णूंचा हा चार महिन्यांचा शयनकाल मानला जातो. त्यामुळेच आषाढीला " देवशयनी एकादशी " म्हणतात व कार्तिकीला " प्रबोधिनी एकादशी " म्हणतात.
भूवैकुंठ पंढरपूर क्षेत्री प्रत्येक महिन्यातल्या शुद्ध पक्षातील एकादशीचे महत्त्व आहेच. पण त्यातही आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार एकादशींना महत्त्व जास्त असते. " आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो ।" असे श्री एकनाथ महाराज आपल्या, कर कटेवर ठेवून उभ्या राहिलेल्या कृष्णाबाईच्या गोंधळात म्हणतात.
भगवान श्रीपंढरीनाथ हे योगमूर्ती आहेत. त्यांनी आपले दोन्ही चरण जोडलेले असून नेत्र मिटलेले आहेत. समचरण असणे हे योगशास्त्रातील फार दुर्मिळ आणि दिव्य लक्षण आहे. भगवान पंढरीनाथ हे आपल्या परमप्रिय भक्तांचे निरंतर ध्यान करीत असतात, म्हणून त्यांनी आपले नेत्र मिटलेले आहेत. आपल्या लाडक्या भक्तांची ते कंबरेवर हात ठेवून अखंड वाट पाहात असतात. त्यांना भक्तांशिवाय करमतच नाही. भक्तांचीही स्थिती याहून काही भिन्न नसते.
संपदा सोहळा नावडे मनाला ।
लागला टकळा पंढरीचा ॥
जावे पंढरीसी आवडे मनासी ।
कधी एकादशी आषाढी हे ॥
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी ।
त्याची चक्रपाणि वाट पाहे ॥
अशी प्रत्येक हरिभक्ताची हृदयभावना असते व अशाच अनन्य भक्तांसाठीच गेली अठ्ठावीस युगे श्रीभगवंत पंढरीत उभे आहेत. कारण; " प्रेमळांचे सांकड आमुचिया गावी ।" ही त्यांची खरी खंत आहे. अहो, शुद्ध व निरपेक्ष प्रेम करणा-या भक्तांची त्यांच्याकडे फार मोठी वानवा आहे. आणि ज्या गोष्टीची आपल्याकडे कमतरता असते, तिचे महत्त्व वेगळे का पटवून द्यावे लागते कोणाला? म्हणूनच श्रीभगवंतांचेही आपल्या या अनन्यदासांवर निरपेक्ष प्रेम असते.
" वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तातडी उतावीळ ॥ " असे उतावीळ होऊन प्रेमवर्षाव करणारे हे भगवंत किती प्रेमळ म्हणावेत? तुलनाच नाही त्यांच्या प्रेमाला ! म्हणूनच भूवैकुंठ श्रीपंढरीचे वैभव त्रिखंडात इतरत्र कोठेही पाहायला, अनुभवायला मिळणार नाही. पंढरी ती पंढरीच, एकमेवाद्वितीय, अलौकिक, अद्भुत आणि अवर्णनीय देखील !! तेथील सुख साक्षात् श्रीपंढरीश परमात्म्याच्या सगुण रूपाने विटेवर प्रकटलेले असून तेच सर्व वारक-यांच्या रूपाने आपल्याच प्रेमसुखाची अखंड अनुभूती घेत असते. आषाढी कार्तिकीला त्यांच्या या प्रेमसागराला उधाण येत असते. त्या आनंद-उधाणात अवघे चराचरच प्रेममय, आनंदमय होऊन ठाकले, तर त्यात नवल ते काय?
हे सगळे आपल्या अनुभूती-कक्षेच्या पूर्णपणे बाहेरचेे, बोला-बुद्धीच्या पलीकडचे आहे. शब्दांच्या असल्या कुबड्यांना तेथे काय हो मातब्बरी? प्रेम कोणाला कधी शब्दांनी सांगता येते काय? तो तर डोळे झाकून हृदयाच्या गाभेवनात अनुभवायचा भाग आहे ! म्हणून आनंदकंद भदवान श्रीपंढरीनाथांच्या त्या अपरंपार आणि अलौकिक प्रेमाचा अनुभव ज्याचा त्यानेच आपापला घेऊन सुखमय होऊन जायचे असते.
आजच भगवान पंढरीनाथांचे अत्यंत लाडके भक्त, त्यांचे प्रेमभांडारी सद्गुरु श्री नामदेव महाराजांची ७४६ वी जयंती. इ.स. १२७० मध्ये कार्तिकी एकादशीला त्यांचा जन्म झाला. श्रीनामदेवांच्या उत्कट प्रेमभक्तीचे वारकरी संप्रदायामध्ये फार मोठे महत्त्व आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीपांडुरंगांना त्यांच्याशिवाय क्षणभरही करमत नसे, यातच त्यांचे महत्त्व समजून येते. त्यांच्या श्रीचरणीं सादर दंडवत!
कार्तिकी एकादशी ही प्रबोधिनी आहे. या दिवशी श्रीभगवंत चातुर्मास्य निद्रेतून जागे होतात, असे म्हणतात. देव कधी तरी झोपतात का हो? झोपतो आपण. नुसते झोपतो नाही, तर त्या झोपेत नाही नाही ती स्वप्नेही पाहतो. स्वप्नातले जगच खरे मानून त्यात इतके रमतो की खरे जग पार विसरूनच जातो. आपली ही झोप संतांना काही पाहावत नाही, म्हणून ते वारंवार आपल्याला जागे करीत असतात. त्यासाठी श्रीभगवंतांची प्रेमभक्ती ते आपल्याला प्रदान करतात. त्या विशुद्ध भगवत्प्रेमाची यथार्थ जाणीव होऊन तोच निजध्यास होणे, हीच आपल्यासाठी साधक म्हणून खरी ' प्रबोधिनी एकादशी ' आहे. मात्र ही भान-जागृती श्रीगुरुकृपेशिवाय कदापि येऊ शकत नाही. म्हणून श्रीगुरुकृपेने श्रीभगवंत त्यांच्या अलौकिक प्रेम-रूपाने आपल्या हृदयात जागे होणे, हेच आपल्यासाठी एकादशीचे खरे जागरण आहे व याचीच सतत वाट पाहत राहिले पाहिजे. हे वाट पाहणेही किती समाधानकारक आहे ना !
आज या परमपावन कार्तिकी एकादशीच्या पुण्यपर्वावर, नंद-सुनंद, जय-विजय, गरुड-हनुमंत इत्यादी सर्व पार्षदांसह भगवान श्रीरुक्मिणी-पांडुरंग आणि त्यांचेच अभिन्न प्रेमस्वरूप असणा-या माउली श्री ज्ञानदेव, श्री नामदेव, श्री एकनाथ, श्री तुकोबादी सर्व संतश्रेष्ठ-भक्तश्रेष्ठांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत करूया आणि  त्यांंच्या प्रेमभक्तीच्या प्राप्तीसाठी त्यांनाच कळकळीने प्रार्थूया !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )