19 Jan 2018

गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद - ६

आज माघ शुद्ध द्वितीया, प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा १३० वा जयंती दिवस आहे. त्यानिमित्त आपण प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक आणि अद्भुत लीलांचा आस्वाद घेऊया.

६. इथं यावं, बसावं, इथं बसल्याने धुतलं जातं  !!

आज माघ शुद्ध द्वितीया, प.पू.सद्गुरु श्री गोविंदकाका महाराजांचा १३० वा जन्मदिन. आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य असे की, आजच प.पू.काकांच्या पत्नी ती.पू.रुक्मिणीदेवी तथा ती.मामींची तारखेने पुण्यतिथी आहे. पू.काकांनी ८ ऑक्टोबर १९७४ रोजी देह ठेवला. त्यानंतर बरोबर १०३ दिवसांनी, आजच्या तारखेला १९७५ साली ती.पू.मामींनी देहत्याग केला.
पू.काकांनी देह ठेवल्यावरही पू.मामींनी आपले सौभाग्यालंकार काढले नव्हते. त्यांचे म्हणणे होते की, पू.काका कुठेही गेलेले नाहीत, ते आहेतच. आश्चर्य म्हणजे, पू.मामींच्या अंत्यक्रियेनंतर त्यांच्या हातातला हिरवा चुडा व मणिमंगळसूत्र जसेच्या तसे सापडले होते. चितेच्या प्रखर अग्नीतही ते जळले नाही. हीच पू.मामींच्या ' पू.काका सदैव आपल्यासोबत आहेतच ', या मनोधारणेला देवांनीच दिलेली पावती समजायला हरकत नाही.
पू.काका व पू.मामींचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. ती.मामी पू.काकांना सर्वभावे शरण जाऊन त्यांच्याशी एकरूपच झालेल्या होत्या. माहेरची एवढी प्रचंड श्रीमंती आणि सासरी अशी आबाळ, पण त्यांनी आयुष्यात कधीही एका शब्दाने त्याची तक्रार केली नाही. अतिशय मनापासून त्यांनी आपल्या अवलिया पतिदेवांचा जगावेगळा संसार सांभाळला. पतीच्या इच्छेतच आपले सर्वस्व मानल्याशिवाय असे वागणे शक्यच नाही. आजच्या काळात तर ह्याचा विचारही करू शकणार नाहीत सध्याचे नवरा-बायको. पण पू.काका व पू.मामींची जोडी प्रत्यक्ष भगवंतांनीच घातलेली होती. पू.मामींचे जन्मजन्मांतरीचे  महत्पुण्य होते व त्यांचा पू.काकांशी पूर्वीचाच दृढ ऋणानुबंध होता, म्हणूनच त्यांचा हा संसार असा संपन्नतेने बहरला.
पू.मामींवर पुढे कधीतरी सविस्तर लेखन करायची तीव्र इच्छा आहे. तूर्तास आजच्या या पावन दिवसाचे औचित्य साधून या अलौकिक दांपत्याच्या, रुक्मिणी-गोविंदांच्या श्रीचरणी सादर दंडवत घालतो.
काल आपण पू.काकांच्या काही अमृतवचनांवर चिंतन केले. आजही त्याच संदर्भाने थोडा आणखी विचार करूया.
प.पू.काका हे त्यांच्या काळातील विलक्षण विभूतिमत्व होते; कोणत्याच कसोट्यांमध्ये न बसणारे, अद्वितीय आणि अलौकिक  !! अखंड अवधूती मस्तीत जगणारे, आपल्याच आनंदात सदैव रममाण होऊन विचरणारे ते अद्भुत अवलिया होते. बोलाबुद्धीच्या पलीकडे असणारे त्यांचे वागणे-बोलणे हा त्यामुळेच अनेकांसाठी मोठ्या कोड्याचा विषय ठरला. आजही ते कोडे सुटलेले नाही. " तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण । तरीच महिमान येईल कळो ॥ " हेच त्यामागचे खरे कारण आहे.
प.पू.श्री.काका अगदीच मितभाषी होते, पण जी काही दोन-चार वाक्ये ते बोलत ती मात्र मोठमोठ्या ग्रंथांनाही पुरून उरणारी असत. आता त्यांचे हेच एक वाक्य पाहा. ते म्हणतात, " इथं यावं, बसावं, इथं बसल्याने धुतलं जातं ! "
ब्रह्मनिष्ठ श्रीसंत गोविंदकाका उपळेकर महाराजांचे हे नितांत सुंदर आणि अर्थगर्भित वाक्य आहे. संतांचे बोल हे अर्थगर्भ असतात. संतांचे बोल म्हणजे ' काळ्या दगडावरील रेघ ', अर्थात् ' चिरंतन सत्यच ' ! संतांना श्रीभगवंताच्या स्वरूपाचा पूर्ण साक्षात्कार झालेला असल्याने तेही भगवत्स्वरूप होऊ  ठाकलेले असतात. म्हणूनच त्यांची वाणी देखील भगवंतांसारखी अमृतमयी, प्रेमरूपा आणि गंभीर होते. संतांच्या वाणीमध्ये ' सत्य ' प्रतिष्ठित असते. या सर्वांमुळे त्यांची वाणी साधकांसाठी सदैव ' संजीवक ' ठरते. त्यामुळेच प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे वरील वाक्य ' गूढ अमृतबोल ' ठरावे असेच आहे !
प.पू.श्री.काका फलटणला आलेल्या काही अंतरंग-भक्तांना उद्देशून हे वाक्य म्हणालेले आहेत. प.पू.श्री.काका सतत आपल्या स्वानंद स्थितीत, अवधूती मस्तीमध्ये रंगून गेलेले असत. त्या आत्मानंदाच्या अमृताचे पान करीत अथवा ज्ञानेश्वरीचे चिंतन करीत ते आपल्या खोलीत पहुडलेले असत. प.पू.श्री.काका क्वचित भानावर असले तर एखाद दुसरा शब्द बोलत, नाहीतर आत्ममग्नच राहात. काहीवेळा त्यांच्या त्या अवस्थेतही अधे मधे ते एखादे सुंदर वाक्य बोलून जात. त्यांपैकीच हे एक जबरदस्त वाक्य आहे.
संतांच्या, सद्गुरूंच्या रूपाने भगवंतांची शक्ती मूर्तिमान झालेली असते. त्यामुळे त्यांचा देहही शक्तिस्वरूपच असतो. त्यांच्या सभोवती, त्यांच्या तपस्थानामध्ये आणि त्यांच्या वास्तव्यस्थानामध्ये तीच शक्ती सर्वत्र आणि सदैव भरून राहिलेली असते. तेथे ती शक्ती अनंतकालपर्यंत कार्यरत असते.
ही शक्ती अत्यंत शुद्ध असून, तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक वस्तूला शुद्ध करीत असते. म्हणून जेव्हा आपण अशा स्थानांमध्ये किंवा सद्गुरूंच्या प्रत्यक्ष सान्निध्यात जातो, तेव्हा आपले शरीर-मन-वृत्ती देखील त्या शक्तीच्या प्रभावाने काही प्रमाणात शुद्ध होतात. याचाच संदर्भ घेऊन प.पू.श्री.काकांनी वरील वाक्य उच्चारले आहे.
' धुतलं जाणे ' म्हणजे स्वच्छ होणे, शुद्ध होणे. संतांच्या सान्निध्यात आपल्या मनाची, मनाच्या वृत्तींची, वासनांची शुद्धी होते. अर्थात् आपले अंतःकरण धुतले जाते. म्हणूनच श्री गुलाबराव महाराज म्हणतात, " संतचरणाची रज ते पार्थिव । परी हा स्वभाव पालटविती ॥ ८८.२॥ संतचरणांचे रजःकण, अर्थात् संतांच्या चरणांमधून प्रसृत होणारी त्यांची कृपाशक्ती ही अत्यंत श्रेष्ठ आहे. ती आपला स्वभावच पालटवते. स्वभाव म्हणजेच आपल्या मनाच्या वृत्ती, वासना, इच्छा, कामना. त्या कमी झाल्या की मन स्थिर होऊ लागते, बुद्धी योग्य दिशेने कार्य करू लागते, अहंकारही कमी होतो आणि परमार्थाची खरी गोडी लागून आपल्या स्वभावात जमीन-आस्मानाचा फरक होतो. इतका या संतचरणांच्या कृपेचा प्रभाव असतो. "म्हणोनियां तेथें रज तें पवित्र । सर्व नारीनर गंगारूप ॥८८.७॥ " असे श्री गुलाबराव महाराज त्यासाठीच म्हणतात. संतचरणांची कृपा, त्यांची शक्ती ही संपर्कात आलेल्या सर्वांना इतकी शुद्ध करते, पवित्र करते की त्यांची तुलना प्रत्यक्ष भगवती श्रीगंगेशी करता येईल. प.पू.श्री.काकांच्या या वाक्यामागे हा देखील संदर्भ आहेच.
पू.काकांच्या या अमृतवचनाचा आणखी एक अर्थ असा की, संतांच्या सान्निध्याने, संगतीने व सेवेने आपले ' कर्म ' धुतले जाते. आपले संचित व क्रियमाण धुतले जाऊन प्रारब्धाचीही शुद्धी होते. कर्मांनुसारच जगाची सारी व्यवस्था आहे. या कर्मांमुळेच चांगला अथवा वाईट भोग घडतो. संतांच्या शक्तीमुळे आपली कर्मे शुद्ध होतात, सात्त्विक होतात. अशी सात्त्विक कर्मे श्रीभागवंतांपर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ करीत असतात.
श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात की,
संतचरणरज लागतां सहज ।
वासनेचें बीज जळोनि जाय ॥१॥
मग रामनामीं उपजे आवडी ।
सुख घडोघडी वाढों लागें ॥२॥

संतांच्या चरणांचे रजःकण प्राप्त झाले तर आपल्या वासनेचे बीजच जळून जाते. वासनेचे बीज म्हणजे कर्म. हे कर्मच वांझ होते. म्हणजे वासनेला जन्मालाच घालत नाही. त्यानंतरच आपल्याला रामनामामध्ये खरी आवड निर्माण होते. आपल्याकडून जास्तीतजास्त प्रमाणात नामस्मरण होऊ लागते आणि त्यापासून मिळणारे सुख हळू हळू वाढत जाते. सद्गुरु श्री माउलींनी देखील हरिपाठात , " संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथें ॥८.१॥" असे म्हटले आहे. संतांच्या संगतीतच मनाला योग्य मार्ग व गती मिळते. हा एकच मार्ग फक्त श्रीभगवंतांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. कारण हा त्यांच्या कृपेचा, त्यांच्याशी अभिन्न असणा-या त्यांच्या कृपाशक्तीचा मार्ग आहे. याच मार्गाने गेल्यास श्रीभगवंतांची प्राप्ती होते.
प.पू.श्री.काकांच्या या अत्यंत मार्मिक व महत्त्वपूर्ण वाक्याचा सरळ अर्थ असा की, " संतांच्या संगतीमध्ये बसल्याने, त्यांनी तपश्चर्येने पवित्र केलेल्या स्थानांमध्ये बसल्याने ( अर्थात् तेथे बसून उपासना केल्याने ) आपली कर्मे धुतली जाऊन , शुद्ध होऊन श्रीभगवंतांविषयी आवड निर्माण होते, त्यांचे भक्तिप्रेम लाभते आणि त्याद्वारेच अखंड सुखाची प्राप्ती होते ! "
प.पू.श्री.काकांच्या १३० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्याच कृपेने गेले सहा दिवस घडलेली ही त्यांच्या चरित्र व वाङ्मयाची अल्पशी सेवा त्यांच्याच पावन श्रीचरणी समर्पित करू या. संतांच्या चरित्राचे, वाङ्मयाचे चिंतन-मनन ही एक प्रकारे त्यांची संगतीच आहे. महद्भाग्याने लाभलेली प.पू.काकांची ही चिंतन-संगती आपण सर्वार्थाने आपलीशी करून घेऊया, त्यात आणखी खोलवर जाऊन तो आनंद अधिकाधिक उपभोगूया आणि त्यांच्याच स्मरणानंदात रममाण होऊन जाऊया  !!
प्रणमत गोविन्दं परमानंदम् ।
लेखक  - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

[ प.पू.काकांचे पूर्वी पोस्ट केलेले संक्षिप्त चरित्र खालील लिंकवरून डाऊनलोड करून वाचावे.
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wbU1pd1AweW5zUms/view?usp=drivesdk ]


18 Jan 2018

गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद - ५

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा १३० वा जयंती उत्सव सुरू झालेला आहे. त्यानिमित्त आपण प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक आणि अद्भुत लीलांचा आस्वाद घेऊया.
५. सहज बोलणे हित उपदेश
फलटणच्या प.पू.सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांची काही वाक्ये फारच अप्रतिम आहेत. अगदी मनाचा ठाव घेतात. प.पू.काकांच्या वाङ्मयसागरातील महत्त्वाची अशी काही उपदेशपर वाक्ये एकत्र करून हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. श्री काकास्वरूप सद्गुरुमाउलींची दया हेच माझे भांडवल आणि प्रेरणास्रोत आहे.
सर्वच महात्म्यांनी आपल्यासारख्या साधकांना साधनेच्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी काही सुंदर उपदेश करून ठेवलेलाच आहे. तसाच उपदेश उपनिषदांमधूनही दिसतो. उपनिषदे म्हणतात, 'उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।' उठा, जागे व्हा आणि ध्येयाची ( मोक्षाची किंवा भगवत्स्वरूपाची ) प्राप्ती झाल्याशिवाय ( प्रयत्न करणे ) थांबवू नका !'उपनिषदकारांनी येथे ध्येयप्राप्तीसाठी काय करा? हे सांगितलेले नाही. परंतु प.पू.श्री.काका हाच धागा धरून पुढे सांगतात, " वाचा, शिका, अभ्यास करा, उन्नती करून घ्या ! अभ्यासाची हेळसांड करू नका ! प्रयत्न करीत राहा ! "
प.पू.श्री.काका येथे आपल्याला उपायही सांगतात. ते म्हणतात, प्रथम 'वाचा'. आपल्याला उपलब्ध असलेल्या संतांची, महापुरुषांची चरित्रे वाचा, त्यांचे ग्रंथ वाचा. वाचन हे ज्ञानप्राप्तीचे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनाने काही अंशी ज्ञानाची प्राप्ती होते. परंतु शेवटी वाचन संपूर्ण ज्ञानप्राप्तीसाठी तोकडेच पडते. म्हणून प.पू.श्री.काका पुढे लगेच 'शिका' असे म्हणतात.
काय वाचा? तर, 'संतचरित्रे' वाचा ! कारण, " आजपर्यंत झालेल्या महात्म्यांची चरित्रे बोधप्रद असून प्रगती देणारी आहेत ."असे त्यांनीच सांगून ठेवलेले आहे. संतचरित्रांमधून बोधाबरोबरच आपल्याला प्रेरणाही मिळते, शिवाय त्याच्या अनुसंधानातून आपल्याला त्या महात्म्यांची कृपाही प्राप्त होते.
प.पू.श्री.काका म्हणतात, " आजपर्यंत झालेल्या थोर पुरुषांची चरित्रे पहा. त्यांची इच्छाशक्ती अभ्यासाने इतकी प्रचंड झालेली होती की तिने आपल्या स्वतःचीच नव्हे, तर आपल्या सर्वस्वाची सुधारणा करून जग हालवून सोडले. "

अशा संतचरित्रांच्या अभ्यासाने आपल्या सत्कार्याची फार मोठी प्रेरणा मिळते. शिवाय कसे वागावे ? कोणत्या परिस्थितीत कोणता व कसा निर्णय घेतला की आपल्याला लाभप्रद ठरतो ? इत्यादी विषयांबद्दल उत्तम बोधही मिळतो. मनात जेव्हा विचारांचे, मतांचे काहूर माजते, तेव्हा फक्त ह्याच प्रकारचा बोध ते वादळ शांत करू शकतो. म्हणून वाचन जरी तोकडे साधन असले तरी ते महत्त्वाचे आहेच. म्हणूनच प.पू.श्री.काका 'वाचा'च्या पुढे 'शिका' असे म्हणतात.
वाचन हे एकतर्फी साधन आहे. वाचलेल्या भागाचा अर्थ कसा लावावा, हे प्रत्येकवेळी वेगवेगळे असते, प्रत्येकाचा अर्थही वेगळा असतो. तसेच लावलेला अर्थ प्रत्येकवेळी बरोबर असेलच असे नाही. पण शिक्षणाचे तसे नाही. शिक्षणात जिला सर्व सिद्धांत ज्ञात आहेत अशी व्यक्ती शिकवते आणि विद्यार्थी शिकतो. विद्यार्थ्याला येणाऱ्या सर्व शंकांची लगेच उत्तरेही मिळू शकतात. म्हणून वाचनापेक्षा शिक्षण श्रेष्ठ.
येथे 'शिका' म्हणण्यामागे प.पू.श्री.काकांचे दोन संदर्भ आहेत.एक म्हणजे जे काही वाचले आहे ते आचरणात आणायला शिका. जसे महात्म्यांच्या चरित्रातील सद्गुण, त्यांची प्रबल इच्छाशक्ती, ध्येयासक्ती इत्यादी आपल्याही आचरणात आणायला शिका.
दुसरा संदर्भ असा की, अशाच थोर महात्म्यांच्या, सद्गुरूंच्या सहवासात जे काही वाचलेले आहे त्याचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळवा. हाच पर्याय सर्वोत्तम ! अशा थोर सद्गुरूंच्या सहवासात, त्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली आपली उत्तम तयारी होते. आपल्यातील सारे दोष निघून जाऊन आपली जडणघडण सुयोग्य रितीने होते. म्हणून नुसत्या वाचनापेक्षा शिक्षण कधीही वरचढच ठरते !
अरे असले तरी फक्त शिक्षण पुरे पडत नाही. नुसते शिकल्याने सारे भागत नाही तर, जे शिकलो ते पदोपदी जीवनात वापरायला हवे. म्हणूनच प.पू.श्री.काका पुढे म्हणतात की, 'अभ्यास करा.'
अभ्यास करणे म्हणजे शिकलेली गोष्ट आपल्या अनुभवाशी पडताळून पाहणे. कोणतीही गोष्ट कौशल्याने, आपलेपणाने करणे म्हणजे अभ्यास. प.पू.श्री. काका म्हणतात, " जे काही तुम्ही कराल ते 'आपले' असे समजून, त्यात काया-वाचा-मन अर्पण करून केले असता ते आनंदयुक्त यशाचा मोबदला देते." पू.काकांच्या या सांगण्याचा अर्थ असा की, जितक्या प्रेमाने आपण आपली अत्यंत आवडती गोष्ट करतो त्याच आवडीने व सातत्याने आपल्या पुढ्यात आलेले प्रत्येक कर्म, आपले सारे कौशल्य वापरून, मनापासून भगवंतांचीच सेवा म्हणून करणे म्हणजे अभ्यास करणे होय !
प्रत्येक कर्म असे प्रेमाने घडले की ते आनंदाचा मोबदला देते. अशा सेवा म्हणून झालेल्या कर्माने प्रगती होते, उन्नती साधते.
अशी उन्नती झाली म्हणून चालू असलेला अभ्यास सोडून देऊन मात्र चालत नाही.
साधकांचे सर्वतोपरि कल्याण करणारे बोधामृत प्रकट करताना प.पू.श्री.काका म्हणतात, " करिता उठा, आपल्या उद्योगास लागा, व्यर्थ पांगुळपणाचे  पांघरूण घेऊन निजून राहू नका, काम करीत राहा. वेळ टाळू नका. सर्व कामे जेथल्या तेथे व्यवस्थित रीतीने होऊ द्यात. स्वतःचे जीवनसर्वस्व असे व्यर्थ दवडण्यासाठी नाही. त्याचा सदुपयोग करा. "
पांगुळपणाचे पांघरून म्हणजे आळस. हा आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. म्हणून तो आळस झटकून काम करा, असे पू.काका म्हणतात. सारे काही व्यवस्थित होऊ लागले की, अभ्यास पक्का झाला असे म्हणता येईल. म्हणून प.पू.श्री.काका मूळ वाक्यात पुढे मुद्दामच, "अभ्यासाची हेळसांड करू नका ! " असे म्हणतात.
अभ्यासाचे माहात्म्य सांगताना ते पुढे म्हणतात, " अशा तऱ्हेने वरचेवर अभ्यास व वरचेवर त्याची परीक्षा हीही घेऊन स्वतः धैर्याची कसोटी लावून पहावी. जे जरूर असते ते सर्व आपल्याजवळ तयार असते ; व नसले तरी, 'तुम्ही पुढे व्हा' की सर्व काही एखाद्या जादूप्रमाणे तुम्हास साहाय्य करावयास लागेल." आपल्या मनाला अभ्यासाची गोडी वाटेल आणि उभारीही येईल, आपले मनोधैर्य वाढेल अशा सुंदर शब्दांत प.पू.श्री.काका आपल्याला उपदेश करीत आहेत.
संतांच्या वचनांमध्ये श्रीभगवंतांची कृपाशक्ती असते. त्यामुळे एखादा साधक जेव्हा त्या बोधावर मन एकाग्र करून त्यासारखे वागायचा प्रयत्न करू लागतो, तेव्हा ती शक्ती त्या साधकावर कृपा करून त्याला आतूनच साहाय्य करते, त्याचा परमार्थ प्रशस्त करीत असते. म्हणूनच संतवचनांवर आपण मनापासून विसंबून सतत साधनारत राहिले पाहिजे. त्यातच आपले खरे कल्याण आहे !
लेखक  - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

[ प.पू.काकांचे पूर्वी पोस्ट केलेले संक्षिप्त चरित्र खालील लिंकवरून डाऊनलोड करून वाचावे.
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wbU1pd1AweW5zUms/view?usp=drivesdk ]


17 Jan 2018

गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद - ४

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा १३० वा जयंती उत्सव सुरू झालेला आहे. त्यानिमित्त आपण प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक आणि अद्भुत लीलांचा आस्वाद घेऊया.

४.  एक अद्वितीय सिद्धपुरुष 

[ प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा अनेक वर्षे सहवास लाभलेले पुण्यातील एक संस्कृत शिक्षक कै.श्री.रा.बा.कुलकर्णी यांनी पू.काकांवर पूर्वी लिहिलेला एक भावपूर्ण लेख आज पोस्ट करीत आहोत. यातून आपल्याला पू.काकांचे अत्यंत मनोज्ञ दर्शन घडते. श्री.कुलकर्णी यांनी या लेखामध्ये पू.काकांच्या वाङ्मयातील अनेक संदर्भ नेमकेपणे वापरलेले आहेत. पू.काकांनी लिहिलेल्या ' विभूती ' ग्रंथाची लिंक लेखाखाली देत आहोत. जिज्ञासूंनी हा सुरेख ग्रंथ डाऊनलोड करून आवर्जून वाचावा ही विनंती. ]

सिद्ध पुरुषांची परंपरा महाराष्ट्रात अखंड चालू आहे. त्या परंपरेत आपल्या जगावेगळ्या अनोख्या व्यक्तिमत्वाने शेकडो साधकांना, प्रपंचाने गांजलेल्या आर्त सांसारिकांना व जिज्ञासूंना ज्यांनी मार्गदर्शन केले, त्यांची प्रेमाने दखल घेऊन साधनेला लावले त्या सिद्ध पुरुषांमध्ये पू.काका आपल्या वैशिष्ट्याने उठून दिसतात. तसे म्हटले तर फलटण स्थानावर श्रीरामरायाची व प्रसिद्ध योगी श्री हरिबाबांची मूळची कृपा आहेच. त्याच फलटणमध्ये पू.काकांनी साधक व सिद्ध या दोन्ही अवस्थातील आपली हयात घालवली व फलटणला त्यांनी पवित्र क्षेत्राचे स्वरूप आणून दिले.
सुमारे ३५ वर्षांपूर्वी पू.काकांचे मला प्रथम दर्शन झाले. भोर संस्थानच्या राजेसाहेबांच्याबरोबर मी फलटणला पू.काकांच्या दर्शनासाठी गेलो होतो. काका त्यावेळी गावाबाहेर हरिबुवांच्या समाधी मंदिराच्या समोर असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीपुढे देवाकडे पाठ करून मोठमोठ्याने टाळ घेऊन भजन करीत होते. आम्ही त्यांना वंदन केल्यावर मला उद्देशून ते म्हणाले, "काय रे मंगेश, तू इकडे कोणीकडे आलास ?" त्यांनी मला 'मंगेश' या नावाने का हाक मारली याचा उलगडा मला अजूनही झालेला नाही.
पण त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने मी भारावून गेलो. अर्धोन्मीलित दृष्टी, मधुर हास्य व एक विशिष्ट भावावस्थेत चाललेले त्यांचे भजन पाहून हा एक प्राप्तपुरुष आहे असे वाटले व त्या दिवसापासून मी सवड सापडेल तेव्हा फलटणला त्यांच्या दर्शनासाठी जाऊ लागलो.
१९५२ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे चारच्या सुमारास पू.काकांनी स्वप्नात येऊन मला नारळ व पेढे दिले. मी त्यांचा तो अनुग्रह मानला व त्याप्रमाणे त्यांना पत्राने ती हकीकत कळवली.
त्यानंतर पू.काकांची ज्यांच्यावर विशेष कृपा झालेली होती ते श्री.बागोबा महाराज कुकडे माझ्याकडे आले व ज्ञानेश्वरीवर काकांनी केलेल्या 'सुबोधिनी' या तिसऱ्या अध्यायावरील भाष्याची मुद्रणप्रत मी करावी अशी काकांची इच्छा आहे असे सांगितले. त्यानिमित्ताने काकांच्या सन्निध जाण्याची मला संधी प्राप्त झाली व मी त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांपैकीच एक झालो व पू.काकांच्या व्यक्तिमत्वाचे मला जवळून अवलोकन करता आले.
पू.काकांच्याकडे केव्हाही गेले तरी ते मांडीवर ज्ञानेश्वरी घेऊन वाचन करीत, हातातील पेन्सिलने त्यावर खुणा करीत बसलेले दिसायचे. आल्या गेल्याचे स्वागत चहा देऊन व्हायचे, त्यांची प्रेमळ चौकशी करून लहर असेल तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत. संध्याकाळी नियमाने अगोदर फलटणकरांच्या रामाचे दर्शन घेऊन हरिबाबांच्या समाधीच्या दर्शनाला जात. तेथे समाधीसमोर सारखी 'लोटांगणे' घेत. ती लोटांगणे पाहून, पुसेसावळीला कृष्णदेवांच्या भोवती काट्याकुट्यातून, दगडधोंड्यातून अंग रक्तबंबाळ होईपर्यंत काका लोटांगणे घेत असत, असे तेथील लोक सांगत असत त्याची आठवण येई.
समाधी दर्शनानंतर परत येताना पू.काका निवृत्ती मेळवणे नावाच्या त्यांच्या भक्ताच्या घरी हरिपाठ करीत असत. बरीच वर्षे हा प्रघात चालला होता. त्यावेळी काका कधी कधी आपल्या 'सुबोधिनी' मधील काही भाग वाचावयला सांगत व त्याचा आशय समजावून देत. अशा बैठकीत कधी कधी पुण्याचे एक सद्भक्त बॅ. रावसाहेब मेहेंदळे असत. ते कृष्णमूर्तींचे मोठे प्रेमी व चिकित्सक अभ्यासू होते. ते काकांना कृष्णमूर्तींची प्रवचने वाचून दाखवीत व काकाही मोठ्या आस्थेने ती ऐकत. हा परिपाठ पुढे पू.काकांच्या घरी, श्रीगुरुकृपा वास्तूत होऊ लागला.
पू.काकांचे हरिपाठावर विलक्षण प्रेम होते. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना त्यांनी शेकडोनी हरिपाठ दिले. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांत प्रापंचिक आधीव्याधींनी त्रस्त झालेले लोक जास्त येत व लहर असेल त्याप्रमाणे पू.काका त्यांना उपाय सांगत. पुष्कळ वेळा काकांचे बोलणे परोक्ष असे. प्रथम दर्शनी त्याचा उलगडा होत नसे. याचे रहस्य पू.काकांनी आपल्या 'श्रीकृष्णदेव' चरित्रात दिले आहे. "केव्हाही एखादी काळाच्या जबड्यात सापडलेली व्यक्ती किंवा दुःखाने पोळलेली व्यक्ती देवांच्याकडे ( श्रीकृष्णदेव महाराजांकडे ) आली तर ते तिचे दुःख हरत-हेने कमी करत. कारण त्या व्यक्तीच्या पुढील जन्मामधील कोणती तरी भर घालून सध्याच्या काळात त्याची दुरुस्ती होऊ देणे हे त्यांच्या हाती असे. मात्र ते कधीही व केव्हाही स्पष्ट बोलत नसत कारण 'प्रकृतिगत' या न्यायाने त्यांच्या बोलण्याचा अर्थ उलट सुलट मध्ये फिरत राहतो." काकांचेही बोलणे बहुधा असेच असे. 'प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षय: ।' या न्यायाने प्रारब्ध भोग कोणालाही, संतांना सुद्धा चुकत नाहीत. संत फक्त त्याची adjustment करू शकतात, असे प.पू.काका नेहमी म्हणत असत.
पू.काकांनी आपल्या 'श्रीकृष्णदेव' या ग्रंथात लिहिले आहे, " युगायुगाच्या ठिकाणी महान साधू व्यक्ती उत्पन्न होऊन त्यांनी जगाच्या कल्याणाशिवाय दुसरी कोणतीच उज्ज्वलता व्यक्त केलेली नाही. असे सत्पुरुष म्हणजे त्यांच्या नुसत्या कृपादृष्टी बरोबरच त्या त्या व्यक्तीमधील बंध नाहीसे होऊन 'अनंत समतानंद' त्यास आपल्या कामामध्ये निर्वेध श्रेय प्राप्त झाले पाहिजे , मग त्यांचे काम ऐहिक असो वा आत्मिक असो."
काकांचे बोलणे परोक्ष असे कारण काकांनी मानापमानाचे गोवे गुंडाळून ठेवलेले होते. कोणत्याही गोष्टीचे श्रेय ते आपल्याकडे घेत नसत. 'अलौकिका नोहावे लोकांप्रति' हा माउलीचा दंडक त्यांनी अक्षरश: पाळला. याची एक दोन उदाहरणे देतो, मुंबईचे एक न्यायाधिकारी श्री.मंजेश्वर हे पू.काकांचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी पुसेसावळीला जाऊन काकांच्या साधक दशेबद्दल बरीचशी माहिती गोळा करून 'The Maharshi of Phaltan' म्हणून एक पुस्तिका छापली व तिच्या काही प्रती फलटणला वाटण्यासाठी पू.काकांच्याकडे  पाठविल्या. काकांनी त्या सगळ्या प्रती घेऊन पाण्याच्या बंबात जाळून टाकल्या.
मुंबईचे एक भक्त काकांच्याकडे नेहमी येत असत. एका विश्वस्त निधीबद्दल त्यांना एक अडचण आली होती. पू.काकांना त्यांनी ती सांगितली. पू.काका त्यांना म्हणाले, "पुण्याला कुलकर्णी मास्तरांकडे जा व त्यांना घेऊन हरिकृष्ण आश्रमात इंदिरादेवीचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घ्या." मी इंदिरादेवींना संस्कृत शिकवत असे. त्यामुळे त्यांचा माझा परिचय होता. पू.काकांच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना इंदिरादेवींकडे घेऊन गेले व त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. अशी त्यांची लीला करण्याची पद्धत होती. ते स्वत:कडे कसलेच श्रेय घेत नसत. कारण अलौकिक असे अमानित्व त्यांच्याठायी पूर्ण बहरलेले होते.
तसे पाहिले तर, पू.काकांचे सांसारिक जीवन इतरांसारखेच नव्हे तर जास्त हलाखीचे होते. श्रीकृष्णदेवांच्या कृपेने प्राप्तपुरुष झाल्यावर व पुढील काही वर्षे परिभ्रमणावस्थेत घालविल्यावर ते फलटणला आले. तो काळ व नंतरची काही वर्षे त्यांच्या घरी मूर्तिमंत अठराविश्वे दारिद्र्य होते. पण पू.काका स्थितप्रज्ञ असत. " देह तरी वरिचिलीकडे । आपुलियापरी हिंडे । परी बैसका न मोडे । मानसीची ॥" अशा अवस्थेत ते आत्मलीन असत.
आपल्या गतायुष्यातील कोणत्याही गोष्टीचा उल्लेख करण्याचे ते टाळीत. न जाणो त्यात आत्मश्लाघेचा दोष लागेल असे त्यांना वाटे. एकदा प्रसिद्ध साधू मेहेरबाबा त्यांच्या दर्शनास फलटणला आले होते. त्या दोघांमध्ये दारे बंद करून चर्चा झाली होती. मला त्या भेटीबद्दल औत्सुक्य होते, म्हणून पू.काकांना त्याबद्दल मी विचारले. पण त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
समकालीन संत व पू.काका यांच्यामध्ये देवाण घेवाण होत होती. इस्लामपूर नाक्यावर असलेले अवधूत धोंडिबाबा यांच्याकडे काका काही लोकांना पाठवीत. पावसाचे सिद्ध पुरुष स्वरूपानंद यांचे काही शिष्य पू.काकांच्या दर्शनाला येत. स्वामींचा 'नित्यपाठ' त्यांची अनुमती घेऊन काही साधकांना काका देत असत. पुण्याचे सत्पुरुष श्री.गुळवणी महाराज व काका यांचे परस्परांवरील प्रेम दोघांच्याही शिष्यात सर्वज्ञात आहे.
प.पू.श्री.काकांची ग्रंथरचना अपूर्व आहे. 'श्रीकृष्णदेव', श्रीहरिबाबा व आईसाहेब यांचे 'विभूती' चरित्र व विशेषत: श्रीज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायांवरील त्यांचे 'सुबोधिनी'चे अठरा भाग हे साधकांना मार्गदर्शन करण्याकरता त्यांनी केलेले लेखन आहे. त्यात त्यांचे विविध ग्रंथाध्ययन, बहुश्रुतता व श्रेष्ठ दर्जाचा पारमार्थिक अनुभव दिसून येईल. शांकरभाष्य , योगवासिष्ठ, विवेकसिंधू, दासबोध, संस्कृत नाटके इतर संत वाङ्मय यांचा सखोल व्यासंग त्यात दिसून येतो. पुसेसावळी येथे होऊन गेलेल्या, त्रिपुटीच्या गोपाळनाथ परंपरेतील शाहीर हैबतीबाबा यांच्या काव्य संपदेबद्दल काकांना फार प्रेम व आदर वाटत असे व त्यांचे समग्र काव्य प्रसिद्ध व्हावे अशी त्यांची इच्छा होती.
पण पू.काकांच्या जिव्हाळ्याचे खरे स्थान, प्रेमाचा विषय म्हणजे ज्ञानेश्वर माउली व त्यांचे वाङ्मय. पू.काकांच्या जवळ एक जुने ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित होते. त्यातील पाठच त्यांनी 'सुबोधिनी'मध्ये घेतले आहेत. 'अमृतानुभव' हा सिद्धरहाटीचा ग्रंथ म्हणून पू.काकांचा ज्ञानेश्वरीवर फार भर. विशेषत: ज्ञानदेवांच्या विरहिण्या काकांना फार प्रिय. भगवान श्री ज्ञानदेवांच्या काही विरहिण्यांचा गूढार्थ काकांनी 'सुबोधिनी'मध्ये प्रकट केला आहे. 'सुबोधिनी'चे सूक्ष्म वाचन ज्यांनी केले आहे त्यांना ज्ञानेश्वरीमधील सहाव्या अध्यायातील काही गूढ अनुभवात्मक योगपर ओव्यांचे काकांनी केलेले रहस्योद्घाटन विचारांना चालना देणारे वाटेल.
श्री.बागोबा महाराजांना एकदा पू.काका म्हणाले होते, " बागबा, ह्या गोविंदाने माउलींची प्रत्येक ओवी अनुभवलेली आहे." किती मोठा अनुभव ते सहज सांगून जातात पाहा. सद्गुरु माउलींची एक ओवी अनुभवली तरी जीवन धन्य होते, इथे पू.काका प्रत्येक ओवी अनुभवली आहे म्हणून सांगत आहेत. बापरे !!
श्री ज्ञानेश्वर महाराजांना संगीत प्रिय होते व त्या शास्त्रात ते तज्ज्ञ होते, असे पू.काकांचे मत होते म्हणून काही अध्यायातील ओव्या कोणत्या रागदारीत गाव्यात याची माहिती ते देत असत. उदाहरणार्थ दहावा अध्याय 'जयजयवंती' व तेराव्या अध्यायातील ओव्या 'मालकंस' रागात आहेत असे त्यांनी आपल्या 'हरिपाठात' छापले आहे.
'विरहीव प्रभो प्रयामयं परिपश्यामि जगत्' असे म्हणणाऱ्या उपमन्यूप्रमाणे पू.काकांना 'अवघे जग कोंदाटले ज्ञानदेवे' असे वाटत असे. त्यांना सर्वत्र, सर्वकाळी श्री माउलींचीच प्रचिती येत असे. आळंदीचा प्रसाद-बुक्का, पंढरीचा बुक्का कोणी आणला की पू.काकांना प्रेमाचे भरते येई. कपाळभर तो बुक्का लेऊन ते आनंदविभोर होत. घरात चहाची वर्दी जाई व जमलेल्या भक्तजनांत त्याचे प्रेमाने वाटप होई. वर्तमानपत्र घरी येत असत. शेजारच्या खोलीत मुले रेडिओ लावीत असत. पण " जगाच्या जीवी आहे । परी कवणाचा काही नोहे । जगचि होय जाये। तो शुद्धीही नेणे ॥" या न्यायाने तशा परिस्थितीतही पू.काकांचा ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय अविरत, अखंड सुरू असे. सद्गुरुकृपेने असा लोकांतातला एकांत त्यांना पुरेपूर साधलेला होता.
इतकी अद्भुत विद्वत्ता व बहुश्रुतता असतानाही पू.काका त्याचे प्रदर्शन करीत नसत. 'व्युत्पत्ति आघवी विसरिजे ।' या श्री ज्ञानेश वचनाप्रमाणे 'पांडित्यं निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत्' अशा अवस्थेत काका असत. 'जाणीव शहाणिव ओझे सांडूनियां दूरी । आपणी वस्तीकर वर्ततसे संसारी ॥' असे पू.काका वागत.
त्यांचे हे बहुमोल ग्रंथ ते साधकांना विनामूल्य देत असत. त्याने ते वाचावेत एवढीच त्यांची अपेक्षा. हरिपाठ व ज्ञानेश्वरी यांचे नित्यपठण, नामस्मरण व संत सहवास यावर त्यांचा फार भर असे. मला एकदा ते म्हणाले होते, " मास्तर संत सहवासा सारखे दुसरे श्रेष्ठ साधन नाही !" कारण ' सज्जन संगतिरेका भवति भवार्णव तरणे नौका ॥' सत्पुरुषांच्या सहवासाची योग्यता प्रत्यक्ष मोक्षसुखाइतकीच आहे. ' परम पद प्रतिमो हि साधुसङग: ।'
प.पू.काकांना भजन फार प्रिय होते. "म्हणून ' भजन साधन अभ्यास । येणेचि पाविजे परलोकास ॥' असे ते म्हणत. " अनन्य भावाने कोणतेही कार्य करीत रहाणे, एकदा धरलेली वारी किंवा व्रत सहजगत्या जर सारखे चालविले तर तेवढे तप देवाला कळवळा येण्यास पुरेसे होते ", असे पू.काकांनी आपल्या श्रीकृष्णदेव चरित्रात लिहिले आहे. " तुका म्हणे काही नेमावीण । जो जो केला तो तो शीण ॥" अशा रीतीने ज्यांनी काळासही वळसा घालून आपले सत्त्व कायम ठेवले, ज्यांनी सद्गुणाचे मूर्तिमंत स्वरूप स्वतःस म्हणजे जगतास दिले. ज्यांनी चराचराचे ऐक्य स्वतः अनुभवले, ज्यांचे चरण म्हणजे मूर्तिमंत 'श्री' ! " असे पू.काका सद्गुरूंचे वर्णन करतात.
आमच्या पू.गोविंद महाराजांनी घटातला दीप जसा सहज मावळावा त्याप्रमाणे आपला देह फलटण मुक्कामी ठेवला.
पू.काकांनी ज्या दिवशी देह ठेवला तो दिवस मंगळवार होता. सोमवारी रात्री पुण्यातील प्रसिद्ध सिद्धपुरुष श्री शंकर महाराजांचे एक सद्भक्त श्री.अभ्यंकर यांच्या स्वप्नात काका आले व त्यांना म्हणाले, "अरे मी कुठे गेलो नाही व जाणार नाही. मी फलटणलाच राहणार आहे." श्री.अभ्यंकर सकाळी उठल्यावर स्वप्नाबद्दल विचार करू लागले तोच त्यांच्या पत्नीने त्यांना 'तरुण भारत'चा अंक आणून दिला. त्यात पू.काकांनी देह ठेवल्याची बातमी होती. श्री.अभ्यंकर नेहमी पू.काकांच्याकडे येत असत व त्यांनी काकांची सुंदर छायाचित्रे घेतलेली आहेत.
उपनिषदांमध्ये असे सांगितले आहे की, ब्रह्मनिष्ठ पुरुषांचे चैतन्य त्यांचे शरीर सोडून मृत्यूनंतर जात नाही. 'न तस्य प्राणा: उत्क्रामन्ति ॥' तिरुमुलर या तमीळ सिद्धपुरुषांच्या 'तिरु मंत्रम्' या तमीळ ग्रंथात असे म्हटले आहे की, 'ब्रह्मनिष्ठ पुरुषाचे चैतन्य समाधी स्थितीतही कार्य करीत राहते. आगम ग्रंथात असे लिहिले आहे की, 'ब्रह्मनिष्ठ पुरुष देहपातानंतर आपल्या १६ चैतन्य कलांपैकी एक कला आपल्या समाधीत ठेवून देतो. ती कला सर्व शक्तिमान असते व भक्तांना आशीर्वाद प्रदान करीत राहते. पण त्या समाधीचे शुचिर्भूतत्व  काळजीपूर्वक जोपासले पाहिजे.' म्हणूनच आजही प.पू.काका फलटणला आहेत व तळमळीच्या साधकांना मार्गदर्शन करीत आहेत असा कित्येकांचा अनुभव आहे.
[ प.पू.काकांनी लिहिलेल्या ' विभूती ' ग्रंथाची लिंक -
https://drive.google.com/file/d/0B-4fTpvl_d6seE1FWE9fNWpDbkU/view?usp=drivesdk
प.पू.काकांचे पूर्वी पोस्ट केलेले संक्षिप्त चरित्र खालील लिंकवरून डाऊनलोड करून वाचावे.
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wbU1pd1AweW5zUms/view?usp=drivesdk ]


16 Jan 2018

गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद - 3

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा १३० वा जयंती उत्सव सुरू झालेला आहे. त्यानिमित्त आपण प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक आणि अद्भुत लीलांचा आस्वाद घेऊया. 
३. संकटी भक्तां रक्षी नानापरी
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे फलटण मधील काही कुटुंबांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या घरांमध्ये पू.काका नि:संकोच वावरत असत व त्या लोकांचेही पू.काकांवर आत्यंतिक श्रद्धा व प्रेम होते. यांपैकी वेलणकर कुटुंब फारच भाग्यवान म्हणायला हवे. या घराण्यातील श्री.पंत महाराज वेलणकरांवर भगवान श्रीदत्तप्रभूंची कृपा होती. देव त्यांच्याशी बोलत असत. त्यांना लाभलेल्या श्रीदत्त पादुकांचे मंदिर फलटणला बाणगंगा नदीकाठी आजही मोठ्या दिमाखाने उभे आहे. या वेलणकर घराण्याला आजवर अनेक सत्पुरुषांच्या सेवेचे भाग्य लाभलेले आहे. श्रीसंत हरिबाबा, लाटे गावाच्या श्रीसंत आईसाहेब, आष्ट्याचे श्रीदत्तमहाराज, प.प.श्री.टेंब्येस्वामींचे शिष्योत्तम प.प.श्री.नृसिंह सरस्वती (दीक्षित) स्वामी महाराज, पू.गोविंदकाका, पू.श्री.गुळवणी महाराज, पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज अशा थोर थोर महात्म्यांची या घराण्याकडून निरलस सेवा घडलेली आहे. त्या पुण्याईमुळेच वेलणकरांकडून श्रीदत्तप्रभूंची सेवा अविरतपणे चार-पाच पिढ्या होत आहे आणि हे परमभाग्यच म्हणायला हवे.
पू.काकांचे पंत महाराज वेलणकरांवर प्रेम होते. पंतांनी पू.काकांचा अधिकार बालपणीच ओळखलेला होता. पंतांच्या रानातील विहिरीत पू.काका पाण्याखाली तास न् तास आपल्याच आनंदात बसून राहात असत. पंतांचे चिरंजीव कै.श्री.महादेवराव वेलणकर हे पू.काकांचे शाळासोबती होते. त्यांचीही श्रीदत्तोपासना उत्तमरित्या होत होती. त्यांच्यावर पू.काकांचीही प्रेमकृपा होती. श्री.पंतांचे चौथे चिरंजीव कै.श्री.जनार्दन वेलणकर हेही प.काकांना फार मानत असत. पू.काका त्यांना शंभू नावाने हाक मारीत. त्यांचे चिरंजीव श्री.पुरुषोत्तम वेलणकर यांनी सांगितलेल्या प.पू.काकांच्या काही अविस्मरणीय लीला आपण आज त्यांच्याच शब्दात पाहणार आहोत.
प.पू.सद्गुरु श्री.डॉ. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्याविषयी माझ्या मनात खूप गोड आठवणी आहेत. त्यांची आठवण जरी झाली तरी ते गोड रूप डोळ्यासमोर उभे राहते. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात शर्ट व त्यावर कोट, कोटाच्या खिशाला अडकवलेली काठी, पायात बूट, गुडघ्यापर्यंत स्ट्रॅपिंग्स्, डोळे अर्धोन्मीलित आणि चेहऱ्यावर अतिशय गोड मोहक हास्य, कपाळाला बुक्का, डोक्यावर टोपी; खरोखरीच प्रत्यक्ष पांडुरंगच वाटत ते. त्यांचे नुसते दर्शनच इतके आश्वासक होते की बस.
आमच्या घरावर त्यांची वडिलांसारखी माया होती. आम्हां सर्वांची ते सतत पाठराखण करायचे. त्यांनी आम्हांला अनेक प्रसंगांमधून सुखरूप सांभाळलेले आहे व आजही सांभाळत आहेत. दररोज सकाळी पू.काकांची आमच्याकडे एक चक्कर तरी होत असे. ते श्री भैरवनाथाच्या दर्शनाला येत. तेथून परत जाताना आमच्या घरी येत. आमच्या वाड्याच्या आतल्या बाजूला एक मारुतीरायांची मूर्ती आहे. या दक्षिणमुखी मारुतीशी पू.काका आले की नेहमी गप्पा मारीत असत. ते म्हणायचे की हा मारुती बोलतो बरं का आमच्याशी. जागृत आहे हा. आमच्या घरावर लक्ष ठेवायला सांगायचे ते त्या मारुतीरायांना.
त्यावेळी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी बघणे चालू होते. वडलांचे  एका स्थळाकरता प्रयत्न चालू होते. सकाळी सकाळी पू.काकांची स्वारी घरी आली. वडलांना हाक मारून त्यांच्या हातावर त्यांनी तुरी ( तुरीचे दाणे ) ठेवल्या आणि काही न बोलताच ते निघून गेले.  दुपारच्या डाकेला त्या स्थळाकडून नकार आला. हातावर तुरी देऊन पू.काकांनी ही गोष्ट सकाळीच सुचवलेली होती.
असेच काही दिवस गेल्यावर महाबळ म्हणून एका स्थळाकरिता वडील प्रयत्न करत होते. एकेदिवशी पू.श्री.काकांची स्वारी आमच्या वाड्यासमोर उभी राहिली. बाहेरूनच वडलांना हाक मारून देवडीवरच्या गणपतीच्या चित्राकडे हात करून  म्हणाले, "शंभू, गणपतीने सही केली रे." आणि त्याच दिवशीच्या पहिल्या डाकेला श्री.महाबळांकडून होकाराचे पत्र आले.
पुढे रितसर लग्न झाल्यानंतर नूतन दांपत्य फलटणला आले होते. सकाळी ते दोघे फिरून येत असताना शंकर मार्केटमध्ये पू.श्री.काकांची गाठ पडली. तेव्हा माझी बहीण कै.सौ.माधुरी महाबळ हिने मंडईतच श्री.काकांना नमस्कार केला. त्याबरोबर काकांनी तेथील फुलवाल्याकडून २ गुलाबाची फुले घेऊन तिला दिली. पुढे तिला दोन सुपुत्रांची प्राप्ती झाली.
आठवणी खूप आहेत पण महत्त्वाची, माझ्याशी संबंधित एक सांगतो. लहानपणी मी खूप आजारी असायचो. त्यामुळे सतत अंथरुणालाच खिळलेलो असायचो. मी अगदी लहान असताना एकदा पू.काका घरी आले. त्यांना माझ्या वडलांनी सांगितले की मुलाचे नाव पुरुषोत्तम ठेवलेले आहे. त्यावर पू.काका म्हणाले, "अरे, याला पाणी आणि आगीपासून भय आहे, त्यामुळे याचे नाव ' अनिल ' ठेवा." तेव्हापासून मला घरातले सगळे लोक अनिल नावानेच हाक मारतात.
माझे वडील माझ्या सततच्या  आजारपणाला कंटाळले होते.
एके दिवशी आमच्या घरी एक ज्योतिषी आला. त्याने सगळ्यांचे भविष्य सांगण्यास सुरुवात केली. वडील नुकतेच कारखान्यातून आलेले होते. हात पाय धुवून चहा घेत होते. त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, त्यांनी माझी पत्रिका त्या ज्योतिषासमोर ठेवली. एकवार नजर टाकून ज्योतिषी म्हणाला, "ही मृत व्यक्तीची पत्रिका का दाखवत आहात ?" हे ऐकल्यावर वडील संतापले. त्यांनी त्याला माझ्याजवळ आणले व म्हणाले, "हा माझा मुलगा. याची पत्रिका आहे ही." त्यावर तो ज्योतिषी म्हणाला की, ग्रहमान तर स्पष्ट मृत्युयोग दाखवते. रागारागाने त्याला त्यांनी हाकलून दिले. वैतागून ते उठले व सरळ श्री.काकांच्या दर्शनाला गेले. तेथे गेल्यावर त्यांनी सर्व प्रसंग पू.काकांना सांगितला. तेव्हा पू.काकांनी माझ्या वडलांना पंढरपूरला जाऊन श्रीपांडुरंगाच्या देवळातील श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीला सर्व हकीकत सांगण्यास सांगितले.
वडलांची श्री.काकांवर अतूट श्रद्धा होती. त्यामुळे काही दिवसांनी आम्ही तिघे (मी आई-वडील) पंढरपूरला गेलो. पांडुरंगांचे दर्शन घेऊन नंतर त्यांच्या पाठीशी असलेल्या नवग्रहमंदिराच्या जवळच्या श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीपाशी आलो. तेथे माझी परिस्थिती मी स्वतःच श्रीदत्तात्रेयांना कथन केली. दर्शन घेऊन परत फलटणला आल्यावर आम्ही थेट पू.श्री.काकांच्या दर्शनाला गेलो. वडलांनी श्री.काकांना सर्व वृत्तांत सांगितला.
तेव्हा मी श्री.काकांच्या समोरच बसलो होतो. माझ्याकडे बघत ते  गोड हसले. त्यांनी आपले पाय पुढे केले. वडलांनी मला त्यांचे पाय चेपण्यास सांगितले. मी तसे करायला सुरुवात केली.
थोड्यावेळाने पू.काकांनी खिशातून एक रुपयाचे नाणे काढून माझ्या हातात दिले व म्हणाले, "जा, तुझे काम झाले." आणि त्यानंतरच माझ्या प्रकृतीमध्ये खूप आश्चर्यकारक फरक पडू लागला. पुढे एक चांगला बालरोगतज्ज्ञ डॉक्टर आम्हांला मिळाला. त्याची ट्रिटमेंटही सुरू झाली. तेव्हापासून माझे आजारपण कायमचे संपले. माझा जो मृत्युयोग आलेला होता, तो प.पू.सद्गुरु श्री.काकांच्या कृपेने टळला. मला पू.काकांनी अक्षरश: जीवनदान दिले. त्यांचे हे उपकार माझ्या कातड्याचे जोडे करून जरी त्यांच्या पायात घातले तरी कमी होणार नाहीत. किंबहुना माझी तर इच्छा आहे की सतत त्यांच्या उपकाराखालीच राहावे.
प.पू.श्री.काका म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीपांडुरंगच. माझ्या मातु:श्रींना पू.काकांनी एका आषाढी एकादशीला खरोखरीच भगवान पंढरीनाथांच्या रूपात दर्शन करविले होते. या जन्मात अशा अवतारी सत्पुरुषांचे दर्शन होणे, त्यांचे कृपाछत्र लाभणे, असे अलौकिक अनुभव येणे हे पूर्वीच्या अनेक जन्मांमधील पुण्याईचे फलच म्हणायला हवे.
प.पू.श्री.काकांचे आपल्या भक्तांवर असे निरतिशय प्रेम होते. ते परोपरीने, न सांगता स्वत:हूनच भक्तांचे सर्व संकटांपासून रक्षण करीत असत व आजही करीत आहेत. श्रीसद्गुरूंच्या श्रीचरणी अनन्यभावाने शरण जाऊन, त्यांच्यावरच सर्व भार टाकून जो आपल्याला दिलेली साधना शांतपणे व मनापासून करतो, त्या भक्ताचे सर्वबाजूंनी ते कल्याण करतातच. तेच या महात्म्यांचे ब्रीद आहे व आवडते कार्य देखील !
लेखक  - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
[ प.पू.काकांचे पूर्वी पोस्ट केलेले संक्षिप्त चरित्र खालील लिंकवरून डाऊनलोड करून वाचावे.
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wbU1pd1AweW5zUms/view?usp=drivesdk ]

15 Jan 2018

गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद - २

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा १३० वा जयंती उत्सव सुरू झालेला आहे. त्यानिमित्त रोज आपण प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक आणि अद्भुत लीलांचा आस्वाद घेऊया.
२. चाले चराचरावरी सत्ता
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज श्रीभगवंतांच्या मुखाने ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात म्हणतात की, " मी या जगाचा समर्थ नाथ आहे, मीच वेदांचा बोलविता असून काळाचाही मीच नियंता आहे, माझीच आज्ञा हे चर-अचर विश्व सतत पाळीत असते."  तेच भगवंत चौदाव्या अध्यायात एका मार्मिक ओवीत सांगतात की, " जे ज्ञानाने देहाची उपाधी निरसून माझ्याशी एकरूप होतात त्या गुणातीत महात्म्यांमध्ये व माझ्यात कसलाही भेद उरत नाही. ते माझ्यासारखेच सर्वसामर्थ्यसंपन्न होतात. तेही सत्यसंध होतात अर्थात् त्यांचे सर्व संकल्प नेहमी सत्यच होतात. ते महात्मे देखील माझ्याप्रमाणे अनंत व अखंड आनंदमय होऊन ठाकतात."  म्हणूनच या विदेही महात्म्यांची चराचरावर सत्ता चालत असते. ते स्वत:हून कधीच कोणते चमत्कार करीत नाहीत, चमत्कारच सहजतेने त्यांच्याठायी घडत असतात.
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हेही असेच पूर्ण हरिरंगी रंगलेले महान विभूतिमत्व होते. ते अखंड उन्मनी स्थितीतच राहात असल्याने त्यांची चराचरावर सत्ता चालत असे. अशा प्रकारचे असंख्य चमत्कार त्यांच्याठायी घडलेले पाहायला मिळत. तरी त्यांचे कसलेही सोयर-सुतक पू.काकांना नसे, ते सदैव आपल्याच अवधूती मस्तीमध्ये रममाण असत.
प.पू.काका पुण्याला शनिवार पेठेतील सुप्रसिद्ध फणसळकर वैद्यांच्या घरी नेहमी जात असत. त्यांच्या सूनबाईंनी स्वत: मला सांगितलेली ही हकिकत खरोखरीच अद्भुत आहे.
एके दिवशी पू.काका त्यांच्या घरी अचानक आले. त्यावेळी वैद्य फणसळकर घरी नव्हते. पू.काकांनी आल्या आल्या चहाचे फर्मान सोडले. एरवी देखील पू.काकांना चहा खूप आवडत असे. म्हणजे ते तसे दाखवीत तरी असत. वारंवार चहा लागत असे त्यांना. पू.काकांच्या आज्ञेनुसार सौ.काकूंनी चहा करून आणला.
पू.काकांच्या काही विशिष्ट लकबी होत्या. ते कपातला पूर्ण चहा बशीत काठोकाठ ओतून घेत व एक थेंबही न सांडवता पीत असत. त्याही दिवशी पू.काकांनी बशीत सगळा चहा ओतला. बशी पूर्ण भरली. आता तो चहा प्यावा की नाही? पण सरळपणे वागतील तर ते काका कसले? त्यांनी अचानक बशी धरलेला तो हात झटका देऊन सरळ केला. पण गंमत म्हणजे ती बशी पडली नाही की त्यातला चहा सांडला नाही. हात जमिनीला काटकोनात असूनही सगळे जिथल्या तिथे होते. मग तोंडावर आश्चर्याचे भाव आणून मिश्कीलपणे पू.काका म्हणाले, " अरेच्चा, चहा सांडला नाही की ! जाऊदे , पिऊनच टाकतो त्याला. " असे म्हणून स्वारीने खुशीने हसत हसत तो चहा पिऊन टाकला व घराबाहेर पडले. अनाकलनीय लीला दाखवणे हा या तूर्यातीत अवधूतांचा आवडता खेळच तर आहे !
अवाक झालेल्या सौ.फणसळकर काकूंच्या चेह-यावरचे आश्चर्य लपतच नव्हते. जिवंत चमत्कार त्यांनी उघड्या डोळ्यांनी समोर घडताना पाहिलेला होता ! आजही हा प्रसंग सांगताना त्यांना पू.काकांच्या प्रेमाने भरून येते
काय अद्भुत सामर्थ्य आहे पाहा ! गुरुत्वाकर्षणाचा सर्वमान्य नियमही या अलौकिक त्रिभुवन -गुरुत्वासमोर सपशेल लोटांगण घालता झाला. माउली म्हणतात तेच त्रिकालाबाधित सत्य आहे, " पर्वतीं बैसका न संडावी । समुद्रीं रेखा नोलांडावी । पृथ्वीया भूतें वाहावी। हे आज्ञा माझी ॥ज्ञाने.९.१८.२८२॥" या महात्म्यांची सत्ता चराचर जगतावर चालते, त्यांची आज्ञा यच्चयावत् जग शिरोधार्य मानीत असते. म्हणूनच आपल्याला आपले खरे, शाश्वत कल्याण व्हावे असे जर वाटत असेल, तर आपण या महात्म्यांचे चरण घट्ट धरून, ते सांगतील तसे साधन आपले डोके न चालवता श्रद्धेने व प्रेमाने करीत राहिले पाहिजे. मग तेच सर्व बाजूंनी आपला सांभाळ करीत आपल्याही जीवनात त्या ब्रह्मबोधाचा अपूर्व सूर्योदय करवून आपले कोटकल्याण करतात !
लेखक  - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
[ प.पू.काकांचे पूर्वी पोस्ट केलेले संक्षिप्त चरित्र खालील लिंकवरून डाऊनलोड करून वाचावे.
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wbU1pd1AweW5zUms/view?usp=drivesdk ]
अशा पोस्ट नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी लाईक करावी.


13 Jan 2018

गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद -1

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा १३० वा जयंती उत्सव सुरू झालेला आहे. त्यानिमित्त आजपासून रोज आपण प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक आणि अद्भुत लीलांचा आस्वाद घेऊया.
१. त्रिकालदर्शी कनवाळू सद्गुरु
हा प्रसंग घडला तेव्हा प.पू.श्री.काकांनी देह ठेवलेला होता. त्यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे पू.काकांच्या घरी रोज रात्री हरिपाठ होत असे. त्या हरिपाठास जवळपासचे बरेच लोक उपस्थित असत. पू.काकांना मानणारे काही तरुणही हरिपाठाला रोज नेमाने येत असत.
या तरुणांनी मोहाला बळी पडून कोणाच्या नकळत एकदा बियर प्यायली. त्यांनी कोणालाही कळू दिले नसले तरीपण हे पू.काकांपासून थोडीच लपणार होते? पू.काकांनी श्री.दामोदर गायकवाड यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना सांगितले, "अरे, फलटणला जा जरा आणि त्या पोरांना विचार काय चाललंय काय तुमचे म्हणून. हे बरे नाही म्हणून सांग त्यांना."
प.पू.काकांच्या आदेशानुसार श्री.गायकवाड फलटणला आले व त्या पोरांना गाठून त्यांनी विचारले. पू.काकांनीच असे विचारायला सांगितले आहे, हे म्हटल्यावर पोरांचे धाबेच दणाणले. ती सारी खजील झाली व पू.काकांसमोर जाऊन त्यांनी सगळ्यांनी मनापासून माफी मागितली. त्यानंतर पुन्हा कोणी मग अशा वाटेला गेली नाहीत.
पाहा, सद्गुरूंचे आपल्यावर कसे लक्ष असते ते ! लौकिक अर्थाने ते देहात असोत अगर नसोत, जवळ असोत किंवा दूर असोत; परंतु ते सदैव आपल्या भक्तापाशीच असतात, त्याचे सर्वकाही पाहात असतात, भक्त चुकला तरी त्याला वेळच्यावेळी सुयोग्य मार्गदर्शन करून त्याचा सांभाळही तेच मोठ्या मायेने व  प्रेमाने करीत असतात. दुर्दैवाने आपण भक्तच त्यांचे हे प्रत्यक्ष न दिसणारे तरीही प्रकट असणारे  अस्तित्व समजून उमजून वागत नाही, याला ते तरी काय करणार? आपण जर मनापासून व प्रेमाने ते सतत आपल्यासोबत आहेत, असे समजूनच वागलो-बोललो, तर खरोखरीच ते सदैव सोबत असल्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपणच आपला भाव दृढ ठेवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपासना केली पाहिजे, म्हणजे मग त्यांच्या त्या अद्भुत ममतामयी कृपाछत्राची प्रसन्न व आश्वासक साउली आपल्याला अखंडितपणे अनुभवता येईल. यातच आपले खरे हित आहे.
लेखक  - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
[ प.पू.काकांचे पूर्वी पोस्ट केलेले संक्षिप्त चरित्र खालील लिंकवरून डाऊनलोड करून वाचावे.
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wbU1pd1AweW5zUms/view?usp=drivesdk ]





उत्तिष्ठत ! जाग्रत !

अवघं ३९ वर्षाचं आयुष्य. पण त्यात केलेलं कार्य ? अक्षरशः आकाशाला गवसणी घालणारं ! त्या अद्भुत कार्याचे यश संपूर्ण  जग अनेक शतके गाईल, अनेक युगे ते कार्य टिकून राहील,  इतक्या भक्कम आधारावर निर्माण करण्यात आलेले आहे. कोण हा महामानव ? की मानवीरूपात अवतरलेला कोणी देवच ? आज ज्यांची १५५ वी जयंती सानंद साजरी होत आहे, तेच ते युगपुरुष, योद्धा संन्यासी, वादळी हिंदू ( Cyclonic Hindu ),  श्री रामकृष्ण परमहंसांचे लाडके शिष्य नरेंद्र अर्थात् स्वामी विवेकानंद !
कलकत्ता महानगरातील सिमुलीया भागात दत्त कुटुंब सुप्रसिद्ध होते. याच कुटुंबातील विश्वनाथ दत्त व त्यांच्या पत्नी भुवनेश्वरीदेवींच्या पोटी, १२ जानेवारी १८६३ रोजी सूर्योदयानंतर लगेचच एक तेजस्वी बालसूर्य जन्माला आला. भुवनेश्वरी शिवभक्त होत्या व त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवांची खूप उपासना केलेली होती. त्याचे फळ म्हणूनच जणू काही कैलासपती भगवान शिवच पुत्ररूपाने त्यांच्या पोटी आले. शिवप्रसादाने जन्मला म्हणून मुलाला आपल्या कुलदेवतेचे 'वीरेश्वर' असे नाव ठेवण्यात आले. पुढे त्यांना नरेंद्र असे नाव ठेवले व तेच रूढही झाले.
बाल नरेंद्र अत्यंत खोडकर होते. कोणाच्याही कुठल्याही धाक-धपटशाचा त्याच्यावर उपयोग होत नसे. भीती हा शब्दच त्याच्या कोशात नव्हता. भुवनेश्वरीदेवी त्राग्याने म्हणत असत, " पुष्कळ उपासना करून शिवाकडे एक मुलगा मागितला होता. परंतु त्याने पाठवले आहे एक भूत ! " त्या बिचाऱ्या मातेला काय माहीत की पुढे जाऊन हेच भूत अवघ्या जगाला झपाटून सोडेल !
नरेंद्र जात्याच नेतृत्वगुण घेऊन आलेला होता. तो जन्मजात पुढारीच होता. सगळ्या मित्रमंडळींच्या खेळात पण तो कायम राजाच होत असे. आणि आश्चर्य म्हणजे त्याचे सगळे वागणे-बोलणे राजासारखेच होते. मुक्या प्राण्यांवर त्याचे खूप प्रेम होते. शरीर बलदंड, कुस्ती खेळण्यात तरबेज. तलवार चालवणे, शारीरिक कसरती तसेच विविध खेळांमध्येही त्याने प्राविण्य मिळवलेले होते. अतुलनीय धाडस हा तर त्याचा स्वाभाविक गुण होता. भीती त्याला नव्हती कशाची, कधीही ! लहान मुले बागुलबुवा किंवा भुताला घाबरतात. नरेंद्राला जर भुताची भीती घातली तर तो कधीच घाबरत नसे, उलट ते भूत समोर यावे म्हणून मुद्दाम तिथे जाई. पण हेच धाडस, साहस त्याला खिशात एक दमडाही नसताना जगभराचा प्रवास करण्यासाठी उपयोगी पडले. विविध ज्ञानशाखांमधील त्याची हुशारी तर आश्चर्यकारक होती. बी.ए. होईपर्यंत त्याने भारतवर्षाचा सगळा इतिहास आवडीने वाचला होता. न्यायशास्त्र, इंग्लंड व युरोपचा वर्तमान व प्राचीन इतिहास तसेच पाश्चात्य दर्शनशास्त्र देखील त्याने आत्मसात केलेले होते. अलौकिक स्मरणशक्तीची देणगी असणारा हा असामान्य विद्यार्थी आपल्या प्रतिभेने व चारित्र्यसंपन्न वागणुकीने सर्वांचा लाडका झालेला होता. तेजस्विता हा त्याच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. त्याने आपला बाणेदारपणा कधीच सोडला नाही. त्याची वाचनाची क्षमता इतकी प्रगत होती की तो काही क्षणातच पान वाचत असे.
तरुणपणी केशवचंद्र सेनांच्या प्रभावाने नरेंद्र ब्राह्मसमाजाचा पुरस्कर्ता झालेला होता. त्यामुळे मूर्तिपूजेला विरोध, हिंदू धर्माची निंदा करणे, जातिभेद न मानणे अशा तत्कालीन बाबींमध्ये तो सहभागी होई. पण त्यानेही त्याची मानसिक भूक भागली नाही. ईश्वराचा शोध काही त्याला लागला नाही. तो भेटलेल्या सर्वांना आवर्जून विचारीत असे की " तुम्ही ईश्वर पाहिला आहे का ? " त्याच्या या रोखठोक प्रश्नाचे, " हो, जसा तुला पाहतो तसाच मी ईश्वरालाही पाहतो ! " असे अद्भुत उत्तर देणारा महात्मा त्याला वयाच्या अठराव्या वर्षी, १८८१ साली पहिल्यांदाच भेटला. ते होते परमहंस श्री रामकृष्णदेव ! श्री रामकृष्णांनीच या असामान्य मुलातला खरा स्फुल्लिंग ओळखला व त्याला हळूहळू मार्गदर्शन करीत उच्च पदावर पोहोचवले.
बालवयापासूनच गंभीर ध्यानात मग्न होणे, अगदी बाह्य जाणीवही लोपून त्याच स्थितीत बराच काळ राहणे नरेंद्रला आपोआप जमत असे. रात्री झोपले की त्यांच्या डोळ्यांसमोर विविध रंगांचे तेजस्वी बिंदू येत आणि त्यातून साकारत असे प्रकाशाचा अनोखा खेळ. श्री रामकृष्णांनी त्यांचा हा अनुभव ऐकून त्यांच्याविषयी प्रसंशोद्गार काढले होते की, " हे ध्यानसिद्धाचे लक्षण आहे ! "
नरेंद्र लहानपणापासून अतिशय तार्किक होते. विलक्षण प्रज्ञा असल्यामुळे अनेक विषयांमध्ये प्रचंड गती होती. कोणताही मुद्दा योग्य तर्काच्या आधाराने पटल्याशिवाय ते मानतच नसत. हीच सवय त्यांना वेदान्तादी शास्त्रांच्या सखोल अभ्यासासाठी खूप उपयोगी पडली. त्यांचा गळा अतिशय गोड होता व शास्त्रीय संगीताचेही त्यांना सखोल ज्ञान होते. त्यांनी तरुणपणीच भारतीय संगीतावर एक अभ्यासपूर्ण ग्रंथ रचलेला होता. आपल्याकडील संगीतक्षेत्रातील एक दिग्गज पं.रामकृष्णबुवा वझे हे काही काळ त्यांच्याकडे संगीत शिक्षणासाठी जाऊन राहिलेले होते.[http://rohanupalekar.blogspot.in]
श्री रामकृष्णांकडून अनुग्रह प्राप्त झाल्यावरही नरेंद्र त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करी. त्यांचे प्रसंगी वादही होत. पण श्री रामकृष्णदेव त्याचे यथायोग्य समाधान करीत असत. रामकृष्णांनी नरेंद्र नावाच्या जातिवंत हिऱ्याला देखणे पैलू पाडून त्याला जगद्वंद्य केले यात शंका नाही !
१८८६ साली श्रीरामकृष्णांनी देहत्याग केला. त्यानंतर लगेचच नरेंद्रांच्याच नेतृत्वाखाली काही भक्तांनी संन्यासदीक्षा घेतली. या सर्वांना रामकृष्णांनीच भगवी वस्त्री पूर्वी देऊन ठेवलेली होती. नरेन्द्राचे नाव झाले विवेकानंद ! आज याच नावाने अवघे जग ढवळून काढलेले आहे.
एकांताची अत्यंत आवड असणारा हा पूर्ण वैराग्यवान संन्यासी मनाने खासच करुणामय होता. संन्यासी म्हणजे कर्तव्यकठोर, रुक्ष अंतःकरणाचाच असावा, या प्रचलित समीकरणात ते बसतच नसत. दीन दुबळ्यांच्या दुःखाने हेलावून जाऊन अश्रू गाळणारा हा महामानव फार फार कोमल अंतःकरण घेऊनच जगभर संचारला. याच जोरावर पहिल्याच वाक्यात त्याने जागतिक धर्मपरिषदही सहज आपलीशी केली. वक्तृत्वाचा ओजस्वीपणा तर अनुपमेय होता त्यांचा ! भारतीय तत्त्वपरंपरेचा, आपल्या प्राचीन ज्ञानवैभवाचा आत्यंतिक आदर व अभिमान बाळगणारा हा आधुनिक ऋषी अमेरिका, इंग्लंड, युरोपादी देशांमधील सुबुद्ध तत्त्ववेत्यांना आपल्या व्याख्यानांनी सहज खिळवून ठेवीत असे. या तरुण, तडफदार आणि तेजस्वी संन्याशाला पाहून, त्याची अभ्यासपूर्ण व्याख्याने ऐकून अनेकांनी भारताविषयीचे आपले मतच समूळ बदलून टाकले. त्यांच्या दृष्टीने खेडवळ, गावंढळ, मागास असा भारत आता ज्ञानाचा एकमात्र आधार ठरलेला होता. म्हणूनच स्वामी विवेकानंदांच्या या अद्भुत कार्याविषयी त्याकाळचे अनेक विद्वज्जन प्रशंसोद्गार काढीत असत.
स्वामी विवेकानंदांनी आपल्या अत्यल्प आयुष्यात अक्षरशः तोंडात बोटे घालावे इतके अलौकिक कार्य केलेले आहे. प्रचंड दगदग, योग्य अन्नाची कायमची ददात, शरीराच्या मनाने प्रचंड प्रवास व फिरस्ती यामुळे त्यांच्या आरोग्याची पूर्ण हेळसांड झालेली होती. त्यातच त्यांना डायबिटीस, बहुमूत्रता, दमा, निद्रानाश, क्षय इत्यादी अनेक रोगांनी पछाडलेले होते. इतक्या सगळ्या नकारात्मक परिस्थितींमध्येही या महामानवाची जिद्द इतकी विलक्षण होती, की तिच्या जोरावरच त्याने संपूर्ण जग हलवून सोडले. सर्वसामान्य माणूस त्यांच्याइतके कार्य तर सोडा, तेवढ्या कार्याची कल्पनाही करू शकणार नाही. त्यांची दूरदृष्टी, त्यांचे कल्पनाविश्व, त्यांचा परिस्थितीचा सखोल अभ्यास आणि या सर्वांच्या मुळाशी असणारा खरा कळवळा, करुणा..... अक्षरशः अगाध होते सर्व काही. म्हणूनच त्यांना अवतारी महात्मा म्हटले जाते व ते सार्थही आहे !
स्वामी विवेकानंदांचे विचार फार मूलगामी परिणाम करणारे आहेत. त्यांच्या चिंतनामध्ये मातृभूमी भारताच्या तत्कालीन स्थितीचा खूप मोठा भाग होता. त्यांना भारताला गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे, अशी दुर्दम्य आकांक्षा होती व त्यादृष्टीने त्यांनी प्रचंड चिंतन केलेले आजही पाहायला मिळते. तेच विचार आपण जर आज अमलात आणले तर भारत हीच पुन्हा जागतिक महासत्ता होईल, यात तिळमात्र शंका नाही.
स्वामीजींच्या मनात तरुण मुलांबद्दल फार आपुलकी होती. भारताच्या विकासाचे खरे शिल्पकार तरुणच आहेत असे त्यांचे स्पष्ट मत असल्याने त्यांनी कायमच तरुणांना खूप मार्गदर्शन केले. ते म्हणत की, 'एका ध्येयाने, एका दिलाने प्रेरित झालेल्या मोजक्याच पण शारीरिक मानसिकरित्या सशक्त तरुणांच्या आधारे ते संपूर्ण भारताचा कायापालट करू शकतील ! ' म्हणून १२ जानेवारी ही त्यांची जयंतीच  ' राष्ट्रीय युवक दिवस ' म्हणून साजरा होतो. याच ध्येयाने भारून जाऊन स्वामीजींनी काही मोजक्या ध्येयवेड्या तरुणांना सोबत घेऊन, १ मे १८९७ रोजी 'श्रीरामकृष्ण मिशन'ची स्थापना केली. आज या  संस्थेचा महान वटवृक्ष झालेला आपण पाहतोच आहोत.
भारताच्या अवनतीला दोन महत्त्वाची कारणे आहेत असे त्यांचे मत होते. एक म्हणजे शिक्षणाचा अभाव आणि दुसरे म्हणजे आत्मविस्मृती, आपल्या संपन्न वारशाचा, राष्ट्राचा, तत्त्वज्ञानाचा अभिमान नसणे. त्यांनी शिक्षणाविषयी मांडलेली मते खूप चिंतनीय आहेत. आजच्या शिक्षणाच्या दिवाळखोरी व शिक्षण सम्राटांच्या मनमानीच्या भयंकर परिस्थितीत तर विवेकानंदांचे हे विचार दीपस्तंभासारखे आहेत. आम्ही आमची अस्मिताच हरवून बसलेलो आहोत. आजमितीस शिक्षणाच्या नावावर जो बाजार भरवलाय आणि आम्हीच खतपाणी घालून तो वाढवतोय, ते पाहून हा योद्धा संन्याशी अक्षरशः ढसाढसा रडला असता. त्याच्या भावनेत्रांनी जाणीवपूर्वक पाहिलेले स्वर्गीय हिंदुस्थानचे सुस्वप्न आज आम्ही धुळीला मिळवतो आहोत, हे पाहून त्याचे कोमल अंतःकरण शतशः विदीर्ण झाले असते.
" Manifestation of Perfection already present in man. " अशी शिक्षणाची वेगळीच व्याख्या स्वामीजी करतात. पुस्तकी शिक्षणाला ते कुचकामी मानतात. दुर्दैवाने आज आम्ही त्याच पुस्तकी व मार्कांच्या शिक्षणाला सर्वश्रेष्ठ मानून बसलेलो आहोत.
त्यांच्या काळात तर भारताचा फार मोठा भाग शिक्षणापासून वंचित होता. म्हणून ते म्हणतात, " If the poor cannot come for education, education should reach the poor. " शिक्षणाच्या अभावामुळेच आपण आपली अस्मिता हरवून बसतो आणि मग त्यामुळेच आपल्याला कोणा ना कोणाची गुलामगिरी पत्करावी लागते !
स्वामीजींना 'चतुर्विध विकास' अभिप्रेत होता. 'निर्बलतेने गुलामगिरी वाढते.' म्हणून 'शारीरिक विकास' हवा ! बलवान शरीरच खरे कार्यक्षम असते. 'बळी तो कान पिळी' म्हणतात ते खोटे नाही. शरीरात ताकद असेल तरच आपल्या म्हणण्याला किंमत. ताकदीने हिंमत वाढते. यशस्वी होता येते. स्वामी विवेकानंद सुरवातीला काशीमध्ये असताना एकदा त्यांच्यामागे माकडांचा कळप लागला. ते पळू लागले. त्यावर शेजारच्या एका संन्याशाने त्यांना सांगितले की, 'पळू नकोस. त्यांना तोंड दे !' ते ऐकून स्वामीजी हिमतीने मागे वळून खंबीरपणे उभे राहिले. त्याबरोबर माकडांनी पळ काढला. या प्रसंगातूनच सबलता, हिंमत आणि संकटांना न घाबरता तोंड देण्याची क्षमता यांचे महत्त्व त्यांना समजले. हाच शारीरिक विकास त्यांना पहिल्या स्तरावर अभिप्रेत आहे.
दुसरा ' मानसिक विकास '. मनाने खंबीरता बाळगली पाहिजे. विजिगिषू वृत्ती नसेल तर साध्या साध्या ध्येयांचीही प्राप्ती कठीण होऊन बसेल. एकाग्रतेने मानसिक शक्ती वाढते, असे ते आवर्जून सांगत. एकाच ध्येयावर सर्वांगाने मन केंद्रित करण्याची सवय लावली पाहिजे.
तिसरा  ' सामाजिक विकास '. आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना दृढमूल हवी. सामाजिक विकासासाठी मातृभूमीवर अपार प्रेम व आदर हवा. समाजाप्रति आपली नैतिक बांधिलकीच आपण विसरलो आहोत. जोवर ही बांधिलकी पक्की होत नाही तोवर एकजूट होणारच नाही आणि सामाजिक एकजूट नसेल तर कोणतेच राष्ट्र प्रगती करू शकणार नाही.
स्वामीजींना भारताविषयी फार प्रेम होते. अमेरिकेत एका स्त्रीने त्यांना विचारले, "मी तुमच्या कार्यात कशाप्रकारे मदत करू शकते ?" त्यावर स्वामीजींनी दिलेले उत्तर त्यांच्या हृदयातले मातृभूमीचे अपार प्रेम सांगणारे आहे. ते म्हणाले, " Love India! " म्हणूनच हा सामाजिक विकासही फार महत्त्वाचा आहे.
आणि सर्वात महत्वाचा 'आत्मिक विकास '. आत्मिक विकास म्हणजे आध्यात्मिक जीवनशैली अंगीकारणे. स्वामीजी म्हणतात, " आपल्या मातृभूमीच्या राष्ट्रीय जीवनाचा पाया आहे धर्म ! तोच आपला मेरुदंड आहे. दुसऱ्यांकडून शिकायला जाऊन त्यांचे संपूर्ण अनुकरण करून आपले स्वातंत्र्य हरवू नका ! " किती सूक्ष्म दूरदृष्टी आहे पाहा त्यांची. आज आम्ही आमचे स्वत्त्व सोडून Americanize होण्यात धन्यता मानतो आहोत. हेच करू नका, म्हणून स्वामीजी शंभर वर्षांपूर्वी आपल्याला जागे करीत होते.[http://rohanupalekar.blogspot.in]
" जो धर्म गरिबांचे दुःख दूर करू शकत नाही. त्यांना पोटभर जेवायला घालू शकत नाही. मानवाला देवता बनवत नाही तो खरा धर्मच नव्हे ! " असे त्यांचे स्पष्ट मत होते. म्हणूनच ' शिवभावाने जीवसेवा ' या महान सिद्धांताचा त्यांनी आपल्या मिशनद्वारे भक्कम पाया रोवला. 'दरिद्रीनारायणाची सेवा' करणे हे आद्य कर्तव्य आहे, असे ते मुद्दाम म्हणत व तसेच कार्य आजही त्यांच्या संस्थेद्वारे जगभर चालू आहे.
आत्मिक विकासासाठी, ध्यानाचा अवलंब करणे, भक्तिभावाने प्रेरित होऊन भगवंताला आळवणे आणि सदाचारी, चारित्र्यसंपन्न, आयुष्य असणे खूप गरजेचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या ज्ञाननेत्रांनी ' प्रबुद्ध भारत '  पाहिलेला होता. त्यांना ते स्वप्न साकारायचेच होते, पण दुर्दैवाने नियतीने त्यांना तेवढा काळच हातात दिला नव्हता ! परंतु त्यांच्या सद्विचारांची ज्योत आजही तितकीच तेजस्वी आहे,  आपल्याला सुयोग्य मार्ग दाखविण्यासाठी समर्थ आहे. त्या चिरंतन ज्योतीच्या स्निग्ध प्रकाशात आपले सर्वांचे आयुष्य, पर्यायाने संपूर्ण भारतच पुन्हा एकदा ऊर्जस्वल होईल, तेजस्वी, ओजस्वी होईल आणि अवघ्या जगासाठी आदर्श ठरेल, यात शंका नाही !
आज स्वामीजींच्या १५५ व्या जयंतीच्या महन्मंगल पर्वावर, त्यांच्या तेजस्वी स्वप्नांसारखे कार्य करण्यासाठी तुम्हा आम्हा तरुणांनी कटिबद्ध होऊन Work is Workship मानून अखंड सावधानतेने प्रयत्न करायला हवेत. ही आजच्या काळाची नितांत गरज आहे, आणि त्या दृष्टीने सर्वबाजूंनी अग्रेसर होणे हीच या अलौकिक महामानवाला वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल ! स्वामीजींनी आयुष्यभर कळकळीने व उच्च रवाने दिलेला उपनिषदांचा संदेशच आपले खरे प्रेरणास्थान व्हायला हवा. उत्तिष्ठत ! जाग्रत ! प्राप्यवरान्निबोधत !!!!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( स्वामी विवेकानंदांच्या १५१ व्या जयंतीदिनी, रविवार दि. १२ जानेवारी २०१४ रोजी बेळगावच्या दै.तरुण भारतच्या अक्षरयात्रा पुरवणीमध्ये छापून आलेल्या लेखाचा संपादित अंश. )
[ असे अनेक लेख वाचण्यासाठी कृपया खालील ब्लॉगला भेट द्या व ब्लॉग फॉलो करा.
 http://rohanupalekar.blogspot.in ]



2 Jan 2018

आळंदीचे स्वामी

राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रभावळीतील, त्यांचे कृपांकित थोर सत्पुरुष म्हणजे आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे होत. त्यांचा जन्म व पूर्वायुष्य कोणालाच माहीत नाही. श्री चिदंबर दीक्षित महास्वामींच्या सोमयागात आळंदीचे स्वामी उपस्थित होते. श्री गोंदवलेकर महाराज गुरुशोधार्थ भ्रमंती करीत असताना नैमिष्यारण्यातील एका गुहेत गेले होते. त्यात सहा तपस्वी होते. त्यांपैकी एक आळंदीचे स्वामी देखील होते, असे मानले जाते. श्री स्वामींचे सांप्रदायिक मानतात की, द्वितीय दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजच पाचशे वर्षांनी पुढे आळंदीत प्रकटले व प्रचंड कार्य करून समाधिस्त झाले. अर्थात् या मताला कोणताच ठोस आधार देता येत नाही. तरीही आळंदीचे स्वामी भगवान श्रीदत्तप्रभूंचेच अंश होते यात मात्र शंका नाही !
इ.स. १८७४ च्या सुमारास स्वामी भरपूर ठिकाणी भ्रमंती करून आळंदीत आले. आळंदीच्या स्वामींवर राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांची पूर्णकृपा होती. दोनदा स्वामी अक्कलकोटी श्री समर्थांच्या दर्शनास गेल्याचा उल्लेख श्री गोपाळबुवांच्या बखरीत आहे. श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या केवळ दृष्टिक्षेपानेच त्यांची समाधी लागली व ते दोन अडीच तास त्या प्रगाढ समाधीतच होते. त्यामुळे आळंदीचे स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुस्थानीच मानत. श्री स्वामी समर्थ महाराजही आळंदीच्या स्वामींना सन्मानाने वागवत असत.
आळंदीच्या स्वामींचे चरित्र अतिशय मनोहर आहे. त्यांचा प्रसन्न चेहरा आणि मनमोहक हास्य पाहून आपणही आनंदित होतो. ते अतिशय प्रेमळ व भक्तवत्सल होते. त्यांच्या चरित्रातील अद्भुत लीला वाचताना खूप आनंद व समाधान लाभते. त्यांनी आळंदीत अनेक कार्ये केली. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा रथोत्सव त्यांनीच सुरू केला. माउलींच्या समाधी मंदिराच्या मागचा मुक्ताई मंडप बांधून श्री मुक्ताईंच्या श्रीमूर्तीची त्यांनीच स्थापना करवली. इंद्रायणीचा घाटही त्यांनीच बांधून घेतला.
आळंदीचे स्वामी भजनप्रिय होते. ते इतके तल्लीन होऊन भजन करीत की, त्या भजनानंदातच त्यांची समाधी लागत असे. भगवान माउलींच्या मंदिरात त्यांनी रात्रीच्या भजनाची पद्धत सुरु केली. भजनाला गर्दी व्हावी म्हणून भजनानंतर सुकामेवा इत्यादी प्रसाद ते वाटत असत. त्यांचीच एक मजेशीर लीला म्हणजे, त्यांना दरमहा रु.५/- ची एक मनिऑर्डर येई. कोण पाठवत असे देव जाणे. पण त्यातून ते प्रसादासाठी वस्तू आणत. त्यांच्या या युक्तीमुळे रात्रीच्या भजनाची गर्दी भरपूर वाढली हे मात्र खरे !
आळंदीचे स्वामी भक्तांची परीक्षा मात्र जोरदार बघत. एकदा एका भक्ताला त्यांनी सांगितले की, "वाघोलीच्या तळ्याजवळील शिवमंदिरात रात्री जाऊन पूजा करून ये. काहीही झाले तरी घाबरायचे नाही बरे का !" तो बरे म्हणून पूजेला गेला. ते मंदिर तसे जंगलातच होते. गाभाऱ्यात पणतीच्या प्रकाशात पूजा सुरू केल्यावर त्याला दिसले की, पिंडीच्या मागे एक मोठे अस्वल बसलेले आहे. तो इतका घाबरला की सगळे तिथेच सोडून धावत सुटला. तो जेव्हा आळंदीला स्वामींच्या दर्शनाला आला, तेव्हा त्याला पाहताच स्वामी पोट धरून हसले आणि म्हणाले, " अरे, घाबरू नकोस असे आम्ही सांगितले होते ना तुला आधीच. ते अस्वल म्हणून आम्हीच तर बसलो होतो तिथे. घाबरलास काय एवढा."
आळंदीच्या स्वामींचे एक भक्त होते. त्यांना  त्यांनी दररोज पार्थिव पूजा करण्याची आज्ञा केलेली होती. ते नियमाने व अतीव प्रेमाने पार्थिव शिवपूजा करीत असत. एके दिवशी त्यांनी हातावर पार्थिव करून पूजेला सुरुवात केली आणि अचानक एक काळा कभिन्न नाग त्यांच्या हातावर प्रकट झाला. त्याने त्या पार्थिवावर आपल्या फण्याची सावली केली होती. या भक्ताची कमाल पाहा, त्यांनी किंचितही न घाबरता आपली पूजा पूर्ण केली. आपल्याला हे नुसते वाचून सुद्धा धडकी भरते. पण ते अजिबात घाबरले नाहीत. तो नाग जसा प्रकट झाला होता तसाच पूजा झाल्यावर अदृश्य झाला. संध्याकाळी हे गृहस्थ स्वामींच्या दर्शनाला आले. त्यावेळी स्वामींनी सकाळचा प्रसंग जाणून त्यांना अक्षरश: उचलून घेतले व म्हणाले, "बाळा, जिंकलंस आज आम्हांला. काय हवे ते माग !" त्यावर त्या भक्ताने मागितले, "सद्गुरुराया, जन्मजन्मांतरी आपलीच सेवा घडू देत व आमच्या कुळाकडूनही आपली सेवा अविरत घडू दे !" स्वामी महाराजांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला. असे धैर्य केवळ अमोघ सद्गुरुकृपेने व अनन्य निष्ठा असल्यासच येऊ शकते. तशी तयारी त्या भक्ताची असल्याने स्वामींनी त्याच्यावर पूर्णकृपा केली, यात नवल नाही.
आळंदीचे स्वामी थोर योगाभ्यासी देखील होते. योगशास्त्रातील अनेक अवघड प्रक्रिया ते सहज करीत. आपले आतडे मुखावाटे बाहेर काढून स्वच्छ करताना त्यांना एकाने पाहिल्याचा उल्लेख आहे चरित्रात. त्यांनी अनेक भक्तांवर कृपा करून त्यांना परमार्थाचे दान दिले.  लोकमान्य टिळक ज्यांना गुरुस्थानी मानत ते पुण्यातील प्रसिद्ध वैद्यराज  महर्षी अण्णासाहेब पटवर्धन हे त्यांचेच शिष्य. श्री नरसिंह सरस्वती स्वामी - महर्षी पटवर्धन - श्री गोडबोले महाराज - श्री अप्रबुद्ध अशी त्यांची शिष्यपरंपरा आहे. या शिवायही अनेक भक्तांवर कृपा करून स्वामींनी त्यांना मोक्षाधिकारी केलेले आहे. स्वामी ज्ञानेश्वरी, नाथभागवतावर उत्तम प्रवचने करीत. त्यांना संस्कृत रचना करण्याचीही आवड होती. त्यांनी रचलेले संस्कृत 'श्रीज्ञानदेवाष्टक' अतिशय सुंदर व अर्थपूर्ण आहे. 'समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ।' असे त्याचे पालुपद आहे.
पौष पौर्णिमेला, इ.स. १८८६ साली त्यांनी आळंदीत जिवंत समाधी घेतली. त्यांचे समाधीमंदिर इंद्रायणीच्या काठावर, गोपाळपुऱ्याकडे जाताना आहे. समाधीवरील स्वामींचा गोड हसणारा मुखवटा पाहिला की, आनंदाचे भरते येते आणि मनही अगदी शांत होते. आज श्रीस्वामींच्या १३२ व्या पुण्यतिथीदिनी, त्यांच्या समाधीवर साकारलेल्या त्यांच्या मधुरातिमधुर रूपाचे दर्शन घेऊन आपण त्यांच्या श्रीचरणीं नतमस्तक होऊया !!
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )