10 Jan 2020

आळंदीचे स्वामी

आळंदीचे स्वामी

राजाधिराज सद्गुरु समर्थ श्रीअक्कलकोट स्वामी महाराजांच्या प्रभावळीतील महान सत्पुरुष, देवाची आळंदी येथील सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आज १३३ वी पुण्यतिथी !
'आळंदीचे स्वामी' नावाने सुप्रसिद्ध असलेले श्रीमत् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे विलक्षण अधिकाराचे महासिद्धच होते. त्यांनीच भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या स्थानावरील अनेक प्रथा-परंपरा सुरू केल्या. त्यांच्याच कृपेने त्या आजही अबाधितपणे चालू आहेत. श्री स्वामींचे चरित्र अत्यंत अलौकिक अाहे. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!
सद्गुरु श्रीमत् नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रावरील लेख खालील लिंकवर वाचता येईल.
आळंदीचे स्वामी
https://rohanupalekar.blogspot.com/2018/01/blog-post.html
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

खरी शाकंभरी पौर्णिमा

आज पौष पौर्णिमा, श्रीशाकंभरी पौर्णिमा !! 
भगवती श्रीजगदंबेने आजच्याच तिथीला स्वत: पासून अनेक भाज्या निर्माण करून दुष्काळाने पीडलेल्या जनांच्या प्राणांचे रक्षण केले होते. तेव्हापासून अतीव कृतज्ञतेने या तिथीला श्रीजगदंबेची महापूजा करून अनेक भाज्यांचा नैवेद्य दाखवायची प्रथा रूढ झालेली आहे.
श्रीशाकंभरी पौर्णिमेनिमित्त, या तिथीचे पौराणिक  महत्त्व सांगून, सध्याच्या काळात एकूणच बिघडत चाललेल्या अन्नाविषयीच्या आपल्या सामाजिक जाणिवा आणि पडू लागलेल्या घाणेरड्या प्रथांबद्दल भाष्य करून, श्रीभगवंतांच्या प्रसादरूप अन्नाचे महत्त्व व माहात्म्य मनावर ठसवणारा खालील लिंकवरील लेख आपण आवर्जून वाचावा ही विनंती.
खरी शाकंभरी पौर्णिमा
हा लेख आपणही वाचा व आपल्या परिचयातील तरुणांना, मुलांना, मोठ्यांनाही वाचून दाखवा, व्हॉटसप-फेसबुक सारख्या माध्यमांमधून अनेकांपर्यंत पोहोचवा ही कळकळीची विनंती. अन्नाचे महत्त्व वेळीच समजून नाही घेतले, तर जगाचा सोमालिया व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा मग रडूनही काहीच उपयोग होणार नाही. देव करो आणि सर्वांना अन्नाचे महत्त्व वेळीच जाणवून तसेच वर्तन सर्वांकडून घडो ही आजच्या पावन दिनी भगवती श्रीशाकंभरी मातेच्या श्रीचरणीं सादर प्रार्थना !!
- रोहन विजय उपळेकर (#8888904481)

2 Jan 2020

थोर पतिव्रता पू.ती.सौ.रुक्मिणीदेवी गोविंद उपळेकर



सप्तभिर्धार्यते मही । असे शास्त्रवचन आहे. गाय, ब्राह्मण, वेद, सती (पतिव्रता) स्त्री, सत्यवादी, निर्लोभी आणि दानशील पुरुष असे सात घटक जोपर्यंत पृथ्वीवर आहेत, तोपर्यंत धर्माचे आचरणही राहील व धर्मही राहील. तोपर्यंतच पृथ्वीवरील संस्कृती देखील टिकून राहील, असे शास्त्र सांगते. खरोखरीच, अापल्या दैवी आचरणाने देवतांनाही पूज्य ठरलेल्या असंख्य पतिव्रता स्त्रिया या भारतभूमीमध्ये होऊन गेलेल्या आहेत, आजही अल्प प्रमाणात का होईना पण आहेत व पुढेही असतीलच. श्रीरेणुकामाता, श्रीसीतामाता, अहल्या, द्रौपदी, मंदोदरी, हिमालयपत्नी मेनका, लोपामुद्रा यांसारख्या प्रात:स्मरणीय पतिव्रतांच्या स्मरणानेच आपला दिवस सुरू होतो. अशाच स्वनामधन्य पतिव्रतांच्या यादीत नोंद व्हावे असे एक विभूतिमत्व म्हणजे माझ्या पणजी व प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या पत्नी प.पू.ती.सौ.रुक्मिणीदेवी उपळेकर तथा ती.सौ.मामी या होत. आज पौष शुद्ध सप्तमी, त्यांची पंचेचाळिसावी पुण्यतिथी आहे. आजच्याच तिथीला, दि.१९ जानेवारी १९७५ रोजी त्यांचे देहावसान झाले होते. त्यांचे पुण्यस्मरण म्हणून त्यांच्या चरणीं साश्रू नयनांनी ही शब्दपुष्पांजली समर्पितो आहे. 
गुरुवर्य दादोजी कोंडदेवांच्या वंशातली शेवटची वारस, गडगंज संपत्तीची एकुलती मालकीण असलेली तेरा वर्षांची कु.दुर्गा, सकलसौभाग्यमंडित होऊन १९१३ साली सून म्हणून उपळेकरांच्या घरात प्रवेशली. कु.दुर्गाचे सौ.रुक्मिणी गोविंद उपळेकर असे नामकरण झाले आणि या संबंधानेच तिला धन्यताही प्राप्त झाली. 
एका आत्मरंगी रंगलेल्या अवलियाची धर्मपत्नी होणे, हे किती मोठे दिव्य आहे, याची पुसटशी कल्पनाही आपण कधीच करू शकत नाही. ती.सौ.मामींनी ही जगावेगळी जबाबदारी समर्थपणे पेलली व त्याबरोबरच स्वत:चेही कल्याण साधून घेतले. 
माहेरच्या श्रीमंतीचा सासरी फार काळ अनुभव मिळाला नाही. काही काळ सासरी देखील संपन्नता होती. नवरा रॉयल आर्मीमध्ये 'कैसर ई हिंद' पुरस्कार मिळालेला निष्णात सर्जन होता. त्यामुळे रुबाब होता, मान होता व संपत्ती देखील होती. पण पुढे जन्माचे खरे रहस्य समजल्यावर ही लौकिक संपन्नता क्षणात सोडून, फकिरी धारण केलेल्या डॉ.गोविंद उपळेकरांचा नंतरचा तो 'विश्वचि माझे घर' असा संसारही या रुक्मिणीने तितक्याच प्रेमाने व निष्ठेने सांभाळला ; कसलीही कुरकुर न करता, कोणालाही दोष न देता ! लौकिक जीवनातली ही लंकेची पार्वती, आपल्या अलौकिक पातिव्रात्याने प्रकटलेल्या दैवी सद्गुणसंपत्तीमुळे आतून क्षीरसागरातली महालक्ष्मीच होती जणू ! म्हणूनच तर या 'गोविंदा'शी असला आगळा वेगळा संसार ही 'रुक्मिणी' मनोभावे करू शकली. 
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज श्रीसद्गुरुकृपेनंतर जवळपास बारा वर्षे अज्ञातवासातच होते. अधून मधून घरी येत, पण सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्यांचे कसलेही वर्तन नसे. त्यातही बराच काळ मौनच होते. कसा संसार केला असेल त्यावेळी ती.सौ.मामींनी ? आजच्या काळात अशा प्रकारच्या संसाराची कल्पनाही करता येणार नाही, इतकी परिस्थिती बदललेली आहे. पतिव्रताधर्म लोपच पावत चाललेला आहे. 
लग्नानंतर लगेचच प.पू.काका पहिल्या महायुद्धात कमिशनवर रुजू झाले. ही लहानगी सौ.रुक्मिणी त्यावेळी फलटणलाच होती. पुढे १९१८ साली युद्ध संपल्यावर प.पू.काकांना रावळपिंडी येथे फॅमिली स्टेशन मिळाले. तेव्हा या दांपत्याला थोडा काळ एकत्र राहता आले. १९२० साली प.पू.काकांनी नोकरी सोडून दिली व ते पुसेसावळी येथे सद्गुरुसेवेत रममाण झाले. पुन्हा रुक्मिणीचा विरह सुरू झाला. १९२३ ते १९३३ प.पू.काका अज्ञातवासात होते. त्यानंतर मात्र ते फलटणी स्थिरावले. पण तोवर डॉ.गोविंद उपळेकर अवधूती आनंदात रंगलेले महात्मे झालेले होते, उपळेकर महाराज म्हणू लागले होते लोक त्यांना. त्यामुळे ती.सौ.मामी देखील पू.काकांना 'महाराज' असेच संबोधत असत.
'ब्रह्मानंदी लागली टाळी' अशी अवस्था असल्याने, देहावर असतील तेव्हाच पू.काका घरात थोडेबहुत लक्ष देत. त्यातही त्यांची लेखनसेवा चालू असल्याने कितपत वेळ काढत असत ते देव जाणे. पण सौ.मामींनी चुकूनही कधी तक्रार केली नाही की रडत बसल्या नाहीत. पोटच्या आठही पोरांना त्यांनीच जसे जमेल तसे वाढवले. शेवटी सग्या सोयऱ्यांची अशी किती मदत होणार ? थोरले दीर कै.मनोहरपंत उपळेकर यथाशक्य मदत करीत. तरीपण संसाराचे गाडे कसेतरी करून सौ.मामीच ओढत होत्या. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे मधाळ हास्य आणि मनातला अपरंपार पतिप्रेमाचा भाव कधीच कमी झाला नाही. या अनन्य प्रेमभावापायीच तर ती.सौ.मामींच्या आयुष्याचे सोने झाले, असे म्हटले तर वावगे ठरू नये !
प.पू.काकांचे आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम होते. भगवंत आणि भक्ताचा जसा दृढ प्रेमसंबंध असतो ना, अगदी तसाच पू.काका व ती.सौ.मामींचा होता. दोघे एकमेकांचे अंत:करण न बोलताच जाणत होते. आपल्या स्वामीचा मनोभाव जाणूनच त्या सदैव सेवारत होत्या. प.पू.काकांच्या भक्तांनी देखील त्यांना कायमच गुरुमातेची पूज्यता दिली व त्यांनीही तेवढ्याच मायेने पोटच्या पोरांसारखा सर्वांचा सांभाळ केला. 
रोजचा दर्शनाला आला गेला पू.काकांच्या पंगतीलाच असायचा. कधीही त्याबद्दल धुसफूस न करता, ती.सौ.मामींनी सर्वांचे मनापासून सगळे केले. पू.काकांचे उत्तराधिकारी पू.श्री.बागोबा कुकडे यांच्या देहत्यागानंतर ती.सौ.मामी व प.पू.काकांनीच त्यांचे चिरंजीव श्री.विहार कुकडे यांचे लग्न लावून दिले व पूर्ण वर्षभर सर्व सण फलटणला प्रेमाने साजरे केले. याशिवाय कितीतरी मुले पू.काकांच्या घरी वाराने जेवायला असत. पुढे ते सर्व घरातल्या सारखेच झाले. त्यातील कित्येकांची लग्ने, बाळंतपणे, बारशी सगळे काही ती.सौ.मामींनी पोटच्या पोरांसारखेच साजरे केले. अशा अनेक नातवंडांची बारशी ती.सौ.मामींच्याच मांडीवर झालेली आहेत. आजही हे सांगताना त्या भाग्यवान लोकांचा ऊर भरून येतो.
( http://rohanupalekar.blogspot.in )
रंगाने उजळ, नाकी डोळी नीट, मध्यम उंचीच्या पण रेखीव बांध्याच्या ती.सौ.मामी नऊवारी साडीत खरंच सात्त्विक सौंदर्याने झळकत असत. त्यांच्या चेहऱ्यावरचे दैवी तेज, मुखावरचे मधुर हास्य व डोळ्यांतली प्रेमळ सात्त्विक ममता फोटोतही लपत नाही. विश्व होऊनि विचरे विश्वामाजी । अशी उत्तुंग योगावस्था लाभलेल्या पू.काकांची पत्नी होण्याचे उत्तरदायित्व त्यांनी आपल्या अंगभूत सद्गुणांच्या आधारे खरोखरीच समर्थपणे पेलले होते !
पू.काकांचा अलौकिक पारमार्थिक अधिकार त्या पुरेपूर जाणून होत्या. जणू त्यांचा जन्मजन्मांतरीचा ऋणानुबंधच असावा. असावा कशाला, होताच म्हणू या. त्याशिवाय हे दिव्य त्या पार पाडूच शकल्या नसत्या. संसार गिळून हरिरंगी पूर्ण विनटलेल्या परमवैराग्यवान अवधूताची पत्नी होणे काय खायची गोष्ट आहे ? प.पू.श्री.काकांची ती अवधूती अवस्था सांभाळून ती.सौ.मामींनी त्यांची आजन्म मनापासून सेवा केली. त्यांनी खूप प्रेमाने पू.काकांची सदैव काळजी वाहिली, त्यांचे मनोगत जाणून त्यांना हवे-नको ते जातीने सांभाळले. "स्वामीचिया मनोभावा । न चुकिजे हेचि परमसेवा । ( ज्ञाने.१८.४५.९१२)" या श्रीज्ञानेशवचनाचे मूर्तिमंत रूपच होत्या पू.ती.सौ.मामी, असेच म्हटले पाहिजे.
ती.सौ.मामींनी अगदी शेवटच्या काळात एकदा आपले मनोभाव फार गोड शब्दांत व्यक्त केले होते. जन्मभर जपलेल्या पातिव्रात्याचा मनोहर आविष्कार होता तो. सद्गुरु श्री माउली म्हणतात, पतिव्रतेला वार्धक्य येते तेव्हा तिचे पातिव्रात्य पण तेवढे मुरलेले असते, गहिरे झालेले असते, तसेच आहे हे पण. 
एकदा ती.सौ.मामींना कै.ती.ज्ञाननाथजी रानडे म्हणाले, "मामी, आपण खूपच निरनिराळ्या अवस्थांतरांत पू.काकांना साथ दिलीत व आजही देत आहात. त्यांच्या सारखीच तुमचीही तपश्चर्याच आहे ही !" त्यावर ती.सौ.मामी म्हणाल्या, "तुम्ही म्हणालात ते सर्व खरे आहे. पण असे पाहा की, दीपावलीतल्या पणत्या चार दिवस उजळतात. पुन्हा वर्षभर दिसत नाहीत. परंतु निरांजन हे देवाजवळ व तुलसीवृंदावनाजवळ अखंड तेवत असते. तशी आमच्या आयुष्याची पणती होऊ न देता, महाराजांनी आपल्या कृपेने आमचे जीवन तुलसीवृंदावनाजवळील अखंड निरांजन केले. ऊन-सावल्यांच्या संसार मार्गावर ते सावली झाले. असा आमचा संसार बाह्यत: ओबडधोबड दिसला तरी अंतरी तो सुखाचाच झाला आहे !"
इथेच ती.सौ.मामींच्या ठायी अपार तपश्चर्येचे फळ म्हणून पूर्ण प्रभावाने प्रकटलेली पतिव्रता आपल्या समोर भव्य रूपात साकारते व आपण कधी त्यासमोर भावभरल्या मनाने नतमस्तक होतो ते आपले आपल्यालाही कळत नाही ! उरतो तो केवळ एक अलौकिक प्रेमादराचा तृप्त भाव !!
प.पू.श्री.काकांचे ती.सौ.मामींवर प्रगाढ प्रेम होते. रोज रात्री हरिपाठानंतर ते जेवायला बसत तेव्हा ती.सौ.मामी त्यांना समोर हव्या असत. त्यावेळी ते बालसुलभ उत्सुकतेने त्यांना दिवसभरातल्या घडामोडी सांगत. महात्मे काहीवेळा असे सर्वसामान्यांसारखेच जेव्हा वागतात ना, तेव्हा त्यातली गोडी फारच न्यारी असते. 
ती.सौ.मामींना शेवटी बरेच आजारपण झाले. त्या ससूनमध्ये अॅडमिट होत्या. त्यांना पाहायला प.पू.काका फलटणहून आले होते. प.पू.काका त्यावेळी पंचाऐंशी वर्षांचे होते. हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांनी ती.सौ.मामींचा हात हातात घेऊन इतक्या गोड भाषेत त्यांना विचारले, "कशी आहेस ? बरे वाटते आहे का तुला ?" काय त्या माउलीला त्यावेळी वाटले असेल ते मला शब्दांत नाही सांगता येत. तासभर पू.काका तिथे बसले होते. त्यांनी ती.सौ.मामींचा हात प्रेमाने पूर्णवेळ धरून ठेवला होता. खरंच सांगतो, त्याक्षणीच ही सती आपला आजार कायमचाच विसरली असेल. त्यानंतर थोड्याच दिवसांत ती.सौ.मामींना फलटणला आणले. 
पुढे साधारण वर्षभराने प.पू.श्री.काकांनी, भाद्रपद कृष्ण अष्टमी, मंगळवार दि.८ ऑक्टोबर १९७४ रोजी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. दुसऱ्या दिवशी प.पू.काकांच्या पावन देहाला घराच्या परसातच भूगर्भ समाधी देण्यात आली. त्यावेळी ती.सौ.मामींनी मात्र आपले सौभाग्यालंकार काढले नव्हते. शास्त्रविरुद्ध असूनही त्या तसेच वागल्या. बहुदा त्यांना प.पू.काकांची उपस्थिती जशीच्या तशी जाणवत असावी. पण त्यांची ही जाणीव पूर्ण सत्य होती, हे पुढे लोकांनाही दिसून आले. ती.सौ.मामींनी पू.काकांच्या नंतर बरोबर शंभराव्या दिवशी, दि.१९ जानेवारी १९७५ रोजी देहत्याग केला. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांचे मणिमंगळसूत्र व हिरवा चुडा असे सौभाग्यालंकार जसेच्या तसे सापडले. एवढ्या अग्नीतही ते वितळले नाहीत, हे केवढे आश्चर्य ! ही त्यांच्या सेवातत्पर पातिव्रात्यावर, त्यांच्या सौभाग्यधारणेवर श्रीभगवंतांनीच उमटवलेली सत्यतेची मोहोर होती जणू. आजही त्यांचेच अमिट सौभाग्य असणारे प.पू.श्री.काका आमचेही लळे पुरवत आहेत. त्यांचे ते सौभाग्य अजरामरच आहे, यात शंकाच नाही.
सद्गुरु भगवान श्री माउली पतिव्रतेचे माहात्म्य सांगताना म्हणतात, 
पैं आघवांचि भोगेसी ।
पतिव्रता क्रीडे प्रियेंसीं ।
कीं तयाचि नामें जैसी ।
तपें तियां केली ॥ज्ञाने.१८.४५.९०७॥
सर्व बाबतीत केवळ पतीबरोबर राहून, त्याच्या सेवेतच, त्याच्याशीच अनन्य राहून ती पतिव्रता सर्व प्रकारचे सुखभोग संपादन करते. खरेतर ते एकप्रकारे तिचे तपच आहे आणि त्याच शुद्ध तपाच्या प्रभावाने ती पतिव्रता देवतांनीही पूज्य ठरते. पू.ती.सौ.मामी देखील सद्गुरु श्री माउलींना अभिप्रेत असलेल्या अशा थोर पतिव्रताच होत्या. आपल्या जगद्वंद्य पतीच्या मनोभावे केलेल्या सेवारूप तपाने ती.सौ.मामी देखील संतत्वाला पोचल्या यात शंका नाही.
ती.पू.मामींचे शब्द प.पू.श्री.काका मानत असत. तेवढा प्रेमाधिकारच होता त्यांचा. एकदा एक दांपत्य पू.श्री.काकांच्या दर्शनाला फलटणला आले. त्यांना संतती नसल्याने ते फार चिंतेत होते. त्यांनी पू.श्री.काकांकडे संततीसाठी प्रार्थना केली असावी, पण काय कारण माहीत नाही, पू.श्री.काका मौन बाळगूनच होते. पू.सौ.मामी त्यावेळी तिथे आल्या व स्वाभाविक करुणेने पू.श्री.काकांना म्हणाल्या, "महाराज, आपण म्हणालात तर यांना संतती होईल. तेव्हा आपण आशीर्वाद द्यावा." प.पू.श्री.काका आपल्याच अवस्थेत होते, ते ती.सौ.मामींना म्हणाले, "असे का ? आम्ही म्हणालो तर होईल ? बरं, तू म्हणतेस तर म्हणतो, जा, तुम्हांला संतती होईल !" प.पू.श्री.काकांचेच आशीर्वाद ते, त्या दांपत्याला पुढच्या वर्षी खरोखर पुत्र झाला. 
असेच आणखी एक कुटुंब आले होते, त्यावेळी पू.सौ.मामी पटकन् म्हणून गेल्या, "ही मंडळी इकडे कशाला येतात ? यांनी संतती होत नाही तर डॉक्टरांकडे जावे !" बहुधा त्यांचा संततीयोग नसावा, त्यामुळे पू.श्री.काका देखील त्यावर काहीच बोलले नाहीत. त्यांचे प्रारब्धच जणू पू.सौ.मामींच्या मुखाने बाहेर आले असावे. यावरून दिसून येते की, पू.श्री.काका ती.सौ.मामींचे शब्द मानत असत.
ती.सौ.मामींविषयी अजूनही लिहिण्यासारखे खूप आहे, पण तूर्त एवढेच. ज्यांचा पणतू म्हणवून घेण्यात मला अपार धन्यता वाटते, त्या प.पू.ती.सौ.रुक्मिणीदेवी तथा प.पू.ती.मामींच्या चरणीं मन:पूर्वक साष्टांग प्रणिपात करून, आजच्या पुण्यतिथी दिनी ही शब्दरूप श्रद्धांजली समर्पण करतो !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481