12 Jan 2017

खरी शाकंभरी पौर्णिमा

नमस्कार मंडळी  !!
आज पौष पौर्णिमा, श्रीशाकंभरी पौर्णिमा. भगवती शाकंभरीमातेचा अवतार दिवस  !!
पुराणकालात एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सर्व सृष्टीत हाहाकार माजला.  पृथ्वीवरील जीवनच नष्ट होईल की काय? अशी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली. जगल्या-वाचलेल्या लोकांनी कळवळून भगवती जगदंबेची प्रार्थना केली. ती जगदंबा शेवटी आईच ना सगळ्यांची, तिला दया आली व ती अन्नपूर्णामाताच " शाकंभरी " रूपात प्रकटली. शाक म्हणजे भाजीपाला व भरी म्हणजे भरण-पोषण करणारी. तिने स्वत:च्या देहातून अनेक भाज्या, धान्य इत्यादी खाद्यसामग्री निर्माण केली व पृथ्वीवरील जीवन अबाधित राखले. तेव्हापासून या तिथीला उपलब्ध सर्व भाज्या, फळे यांचा नैवेद्य दाखवून आई जगदंबेची पूजा केली जाते.
या कथेतील एक फार महत्त्वाचा भाग म्हणजे, प्रत्यक्ष जगदंबेच्या शरीरातूनच अन्नधान्य, भाजीपाला निर्माण झालेला आहे. म्हणजे अन्न हे तिचेच स्वरूप आहे. आपल्याकडे लहानपणापासून अन्नाचा आदर करण्याचे, त्याला पूर्णब्रह्म मानून सेवन करण्याचे संस्कार केले जातात, ते उगीच नाही  !!
आजच्या या पावन दिनी, ब्रह्मस्वरूप अशा अन्नाचे सुयोग्य महत्त्व मनावर ठसावे, यासाठी एक लेख पोस्ट करीत आहे. लेख जुनाच असला तरी त्यातला विचार फार फार महत्त्वाचा आहे. वेळीच ही जाणीव मनात ठसली तर पुढे सोपे जाईल; म्हणून लेख जरा मोठा असला तरी पूर्ण वाचावा, आपल्या फेसबुक-वॉलवर शेयर करावा, कॉपी करून व्हॉटस्अॅप द्वारे आपापल्या संबंधितांना मुद्दाम पाठवून, लोकांची अन्नाविषयीची जाणीव वाढविण्यास हातभार लावावा ही नम्र विनंती  !!
---------********---------
जीवन करि जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म
नुकताच एका लग्नाला जाण्याचा प्रसंग आला. एकुलत्या एका लेकाचे लग्न अगदी थाटामाटात पार पडले. वैभवाचा झगमगाट प्रदर्शनात मांडलेल्या वस्तूंसारखा चमकत होता. नवदांपत्य सर्वांच्या शुभेच्छा-आशीर्वादांचा सहर्ष स्वीकार करीत होते. वरमाय-वरबाप प्रत्येकाची आवर्जून विचारपूस करून आग्रहाने भोजनगृहाकडे नेत होते.
भोजनगृह अतिशय नेटके, देखणेपणाने सजवलेले होते. मंद सुगंध भरून राहिलेला होता. त्यातच सुग्रास, गरमगरम पक्वांनांचा दरवळ मिसळून पोटातल्या कावळ्यांना उत्तेजित करीत होता. भल्या मोठ्या ताटातही मावणार नाहीत, एवढे पदार्थ होते.  मराठमोळ्या लग्नात अगदी 'विविध भारती' खवय्येगिरीच अवतरलेली होती जणू !
कितीही शौकीन, पट्टीचा खवैय्या असला तरी मोजक्याच पदार्थांचा रसिकतेने आस्वाद घेऊ शकतो. चवीचवीने जेवणे म्हणजे काही गपापा करीत पोट भरणे नव्हे !  शेळीसारखे चरून उपयोग नसतो;  तेथे गाईसारखा रवंथच हवा !
भोजनगृहातील सर्वजण सुशिक्षित होते. सुसंस्कारितही असावेत; असे कपड्यालत्यांवरून तरी वाटत होते. मी सहजच त्या भोजनगृहातून एक फेरी मारली; डोळे उघडे ठेवून !  मनातील सहजता कुठल्या कुठेच गेली. विचारांचे काहूर आषाढमेघांसारखे दाटून आले; काळेकुट्ट, अस्वस्थ करणारे !  वास्तव नेहमीच असे भयाण का बरे असते?
एका पैठणी नेसलेल्या, गरजेपेक्षा जरा जास्तच कृत्रिमपणे नटलेल्या, तरुण आईने आपल्या लहानग्या लेकीच्या हट्टापायी तिला वेगळ्या डिशमध्ये वाढून दिलेले होते. बुफे असल्याने सारखे उठायला लागू नये म्हणून ' अपना हात जगन्नाथ ' करीत अंमळ जास्तच वाढून आणलेले होते. ती चिमुरडी त्यातले पाव अन्नही खाऊ शकणार नाही, याची त्या सुज्ञ आईलाच नाही तर मला देखील पक्की खात्री होती. त्यांचा प्रेमळ ( ? ) संवाद मात्र काळजाला घर करून गेला.
ती जबाबदार आई म्हणाली,  " सोनू, सगळं संपवायचं हं!  " सोनू वाकडा चेहरा करून उत्तरली, " मम्मी, मला नको हे ! " घराचे घरपण पूर्णपणे इंग्रजाळलेले असल्याने व सोनू कुठल्याशा सेंट ........... कॉन्व्हेंट मध्ये शिकत असल्याने आई काहीशा त्राग्याने म्हणाली,  " सोनू, This is not fair. Clean your dish my dear !  " सोनूचा चेहरा कसनुसा झालेला. जन्मदात्या आईलाही पोटच्या गोळ्याच्या भुकेचा अंदाज नसावा, याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत
होते. कहर म्हणजे कसेबसे जेवण उरकल्यावर ( ! ) त्यांनी टबमध्ये डिश ठेवल्या तर पोरीच्या सोडा,  आईच्या डिशमध्येही भरपूर पुलाव, साजुक तुपातला मुगाचा शिरा....... सारे तस्सेच्या तस्से होते. ( अशा  अनेक डिश  त्या टबमध्ये केविलवाण्या होऊन, कोणाचाही ' ग्रास ' होऊ न शकल्याची खंत वागविणा-या त्या अन्नाची मूक समजूत काढत  असल्याचा  मला भास झाला !  ) वारे !  एटिकेट्स आणि मॅनर्स ! !
मनात दाटलेला विचारांचा कढ तसाच रिचवत दुसरीकडे वळलो. तिथे त्याच वयाची एक गृहिणी आपल्या छोट्या  लेकाला घेऊन जेवायला बसली होती. मुलाला आवडतील, हवे होते तेवढेच मोजके पदार्थ पानात वाढलेले होते. त्या गुणी पोराने आनंदात ते पान लख्ख केलेले पाहून माझ्याच चेहर्‍यावर समाधानाचे स्मित उजळले.
दोन्ही आया चांगल्या शिकल्या-सवरलेल्या होत्या. सुसंस्कृत वाटत होत्या. पण या दोन टोकाच्या अनुभवांनी माझ्या मनात एक प्रश्नचिन्ह तरळू लागले. शिक्षण, आर्थिक प्रगती, सुबत्ता व सुसंस्कार, सामाजिक-वैश्विक भान यांचा परस्पर संबंध नसतो का काहीच? शिक्षणाने संस्कार  व्हायला हवेत ना? होतातच; का नाही? अजूनही माझ्या मनातला प्रश्न-वेताळ अतृप्तच आहे!
अन्नं बहु कुर्वीत ।  अन्नं ब्रह्मेति व्यजानात् ।  अन्नं न निन्द्यात् । असा गौरवपूर्ण विचार मांडणारी  आमची ऋषीप्रणित भारतीय  संस्कृती  ! अन्नाला नावे ठेवू नयेत. अन्न भरपूर करावे, पात्रापात्र न पाहता सर्व गरजवंतांना अन्न द्यावे. अन्न ब्रह्मरूपच मानावे. एक शीत देखील वाया घालवू नये; असे आवर्जून बिंबवणारी आमची भारतीय संस्कृती काळाच्या उदरात गुडुप झालीये की काय? पौराणिक कथेत का होईना, पण एक तीळ सात जणांमध्ये वाटून खाण्याचा आदर्श वस्तुपाठ आमच्या मनावर उमटवणारी आमची संस्कृती श्रेष्ठ आहे, हे विसरून चालणार नाही !
विचारांच्या त्या ओघातच माझे जेवण झाले. त्याच तारेत मी तेथून बाहेर पडलो. समोर रस्त्यावर तीच तरुण आई आपल्या आलीशान गाडीत बसत होती. तेवढ्यात एक कळकट कपड्यातला गरीब लहानगा तिच्या जवळ येऊन काहीतरी खायला मागू लागला. त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता, यांत्रिक चेहर्‍याने तिने गाडीची काच वर केली आणि गाडी भुर्रकन् निघूनही गेली. वैभव, संपत्ती ओसंडून वाहत असली, आर्थिक सुस्थिती कितीही उत्तम असली तरी वृत्ती किंवा  अंत:करण किती संकुचित, क्षुद्र असते; याचा तो जीवघेणा प्रत्यय  मला तरी भयानकच वाटला.
परदेशीयांचे संस्कार हिरीरीने सामावून घेऊन आपल्या लोप पावणार्‍या भारतीयत्वाला,  ' जुनाट - बुरसटलेले ' अशा सदरात घालून टाकावू ठरवणारी ही आमची तरुण पिढी, कोणत्या विनाशगर्तेकडे आगेकूच करीत आहे, हे जाणवून मन खूपच विषण्ण झाले हो !
हा लेख लिहीत असतानाच टेबलवरच्या आजच्या पेपरकडे लक्ष गेले आणि विचारांचे मळभ आणखी गडद झाले. एका सर्व्हे नुसार दररोज १९ कोटी लोक भारतात उपाशीपोटीच झोपतात; अशी भयावह बातमी त्यात होती !  ते वाचून नुकतेच जेवलेले अन्न माझ्या पोटात डचमळायलाच लागले !
मी शाळेत असतानाचा एक फारच भावपूर्ण प्रसंग सांगण्याचा मोह मला आवरत नाहीये. तो प्रसंग खोलवर रुतून बसलाय माझ्या अंतरात.
एका दिवाळीत मी फलटणच्या घरी एकटाच होते. बाकीचे बाहेर गेलेले होते. पहिलीच अंघोळ असल्याने सकाळी साडेनऊच्या सुमारास माझे सगळे आवरून, देवपूजा वगैरे पूर्ण करून बसलेलो होतो. फलटणचे आमचे घर खूप मोठे आहे. एकरभर जागेत दहा एक हजार स्क्वे. फुटांचे बांधकाम सहजच असेल. घरासमोरील अंगणात मोठा ओटा, त्यापुढे अंगण, बाग असे सर्व आहे. मी काहीतरी करत बसलो होतो. एवढ्यात बाहेर अंगणात मला कोणाचीतरी चाहूल लागली. कुत्री पण भुंकू लागली. म्हणून मी दारात गेलो.
बाहेर माकडवाल्या समाजापैकी ( वंजारी/कोमटी/लमाणी इ. प्रकारची एक जमात) एक फाटके  कपडे नेसलेली बाई व तिचे ४-५ वर्षांचे पोर उभे होते. हातात कळकटलेले हिंडालियमचे पातेले. मी काही न विचारताच, थांबा म्हणालो आणि घरात जाऊन दिवाळीचा फराळ घेऊन आलो.  आता कोणी फारसे येत नाहीत, पण माझ्या लहानपणी  दिवाळीचा फराळ मागायला बलुतेदार येत असत फलटणमध्ये.
मी पुढे होऊन तिला फराळ दिला. ते लहान पोर समोर आले व त्याने ते हातात घेतले. मोठ्या  उत्सुकतेने त्याने त्यातील एक पिशवी उघडून पाहिली. त्यात नेमत लाडू होते. ते लाडू पाहताच त्याच्या चेहर्‍यावर आनंदाची कमळेच उमलून आली; सूर्य  उगवल्यावर सरोवरातील सर्वच्या सर्व कमळे फुलावीत; अगदी तशीच ! त्याचा तो अपूर्व आनंद मी अनिमिष नेत्रांनी अक्षरशः गटागटा प्यायला. पण त्या आनंदाला डोळ्यांच्या पाणावलेल्या कडांची झालर मात्र होती.
ती बाई मला म्हणाली, "अवो, फराळ नगं हुता मला. सक्काळच्यान् सगळ्यांनी शिळी भाकर, चपाती दिलिया, पर तेच्यासंगं खायला कालवनच न्हाई. तुमी मला वाईच कालवन द्याल का?" मी घरात जाऊन जी दिसली ती भाजी घेऊन आलो व तिच्या भांड्यात ओतली. ती पण समाधानाने, दुवा देत घराकडे वळली.
दिवाळीच्या दिवशी कोणी शिळेपाके थोडीच खाते का घरात? म्हणूनच तर सर्वांनी सोयिस्करपणे घरची शिळवण त्या बिचारीला उदारपणे (?) देऊन महत्पुण्य पदरी पाडलेले होते. कोणाची दिवाळी फराळाची तर कोणाची शिळ्याची; चालायचंच !
त्या निरागस पोराच्या चेह-यावर प्रकटलेला आनंद काही माझ्या डोळ्यांसमोरून जाईना. मी तसाच वळलो, समोरच माझी देवांची खोली आहे. तेथे गेलो आणि पाझरत्या डोळ्यांनी हात जोडून देवांना म्हणालो, "देवा, आज मला समजले तुमचा प्रसाद हाती आल्यावर काय प्रकारचा आनंद व्हायला हवा ते ! खरंच, आम्ही किती करंटे आहोत हो. तुम्ही भरभरून देता आणि  आम्ही मात्र ते नीट घेऊ पण शकत नाही ! "
जीवनरूपी ग्रंथाचे आद्य भाष्यकार, भगवान श्री ज्ञानदेवांची एक सुंदर श्रुती आहे. भगवद्गीतेचा शिष्ट संप्रदाय सांगताना ते अर्जुनाला म्हणतात,
धालिया दिव्यान्न सुवावें ।
मग जे वाया धाडावें ।    
तें आर्तीं कां न करावें ।
उदारपण ॥
॥ ज्ञाने.१८.६७.१९४३ ॥

ज्याचे पोट भरलेले आहे त्यालाच पुन्हा प्रसादाचे दिव्य अन्न खाण्याचा आग्रह करावा आणि एक प्रकारे ते दिव्यान्न वाया घालवावे; यापेक्षा ज्याला गरज आहे, ज्याला अन्न मिळतच नाही किंवा जो दोनवेळच्या पोटभर जेवणाला मोताद आहे, त्याला का तुम्ही हे तुमचे उदारपण दाखवत नाही? माउलींच्या या प्रश्नाचे आपल्यापैकी कितीजण योग्य उत्तर देऊ शकतील?
ब्राह्मण-सवाष्ण म्हणून किंवा घरचे काही कार्य म्हणून आपण आपल्या नातेवाईकांना, इष्ट मित्रांनाच जेवायला बोलावतो. त्यांना एरवीसुद्धा पोटभर अन्न मिळतेच. मग त्यांना आग्रह करकरून वाढून काय वेगळे होणार? पण आमच्या हे पचनीच पडत नाही; याची खंत वाटते !
आजही दिवाळी जवळ आली की, मला हा प्रसंग प्रकर्षाने आठवतो. लगेचच श्रीज्ञानदेव माउलींची प्रसन्न आश्वासक मुद्राही आठवते आणि मग माझ्या मनात पुन्हा प्रश्नांचे वादळ निर्माण होते. कधी येणार आम्हाला शहाणपण? शिकले सवरले म्हणून आम्ही आमची सुसंस्कृती अशीच गमावून कफल्लकाचेच जीवन जगणार का? मानवता धर्माचा आदर्श वस्तुपाठ असणारी आमची प्रगल्भ संस्कृती आम्ही तद्दन टाकावू म्हणून अशीच तिची अवहेलना करणार का? आमच्या असलेल्या अनर्घ्य वैभवाचे आम्हाला भान येणार तरी केव्हा? अशा विचारांनी केविलवाणी स्थिती होऊन जाते अगदी.
माझी एक कळकळीची विनंती आहे सर्वांना ! अन्नाचे महत्त्व वेळीच ओळखा व आपल्या मुला-बाळांनाही योग्य वयात ते महत्त्व असे बिंबवा की मरेपर्यंत कधीच विसरता कामा नये. कोणतेही अन्न हे भगवंतांच्या कृपेनेच समोर येते, त्याला नावे ठेवू नयेत. आवडीचे नसले तरी न कुरकुरता खावे. एकवेळ खाल्ले तर काही फरक पडत नाही. आई-बापांनीच ही सवय स्वतःपासून सुरू करावी. मुले पाहून पाहून आत्मसात करतील. शिवाय आपल्या घासातला एक घास तरी गरजवंताला देण्याची उत्तम सवय लावून घ्यायला हवी. यथाशक्य द्यावे पण देत रहावे. देव भरभरून परतफेड करतातच त्याची !
जाता जाता एक फार महत्त्वाचा शास्त्रसिद्धांत सांगतो. संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक, योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराज नेहमी सांगत की, "अन्नाचे एक शीत जरी आपल्या माजोरीपणाने किंवा हलगर्जीपणाने वाया घालवले तर त्या प्रत्येक शितासाठी एक आख्खा जन्म अन्नान्नदशेत काढावा लागतो, असे वेदवचनच आहे. म्हणून अन्नाचे महत्त्व ओळखा व चुकूनही कधी त्याची नासाडी होऊ देऊ नका !"
हा सद्विचार पक्का ठसणे व त्यानुसारच वागणे, हीच खरी "अन्न सुरक्षा" आहे  !       
ही शाकंभरी पौर्णिमा, ब्रह्मरूप अन्नाच्या या भान-जाणीवेच्या स्निग्ध दीपाने उजळवून आपण सर्वजण जाणतेपणाने साजरी करूया व पुढील पिढ्यांसाठीही आदर्श घालून देऊया ! " जीवन करि जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।।" अशी भाव-जागृती, सर्वांच्या अंतरात बोध-पौर्णिमा साजरी करीत बहरून येवो, हीच याप्रसंगी प्रार्थनापूर्वक शुभकामना !!
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481

( कृपया ही पोस्ट भरपूर शेयर करून अन्नाचे यथार्थ महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सत्कृत्यात सहभागी व्हावे, ही नमेर विनंती !
http://rohanupalekar.blogspot.in )

8 comments:

  1. माहिती बद्दल अनेक धन्यवाद. उत्तम लेखन.

    ReplyDelete
  2. गजानन महाराजानी उष्टावळीतील शिते खाऊन हाच संदेश दिला .
    जर्मनीतील एका रेस्तराँची गोष्ट आठवली .अन्न टाकणे हा गुन्हा असून एका गेस्ट ला दंड भरावा लागला !

    ReplyDelete
  3. अगदी खरय वास्तव छान शब्दांत मांडले आहे या सगळ्या गोष्टी ंंची सुरुवात स्वतः पासून केली पाहिजे

    ReplyDelete
  4. डोळ्यात अंजन घालणारा लेख आहे. खूप भावला

    ReplyDelete
  5. गजानन महाराजांच्या "अन्नम ब्रम्हेती" या वचनाचा अर्थ ऊमगला

    ReplyDelete
  6. खूप छान आणि वास्तविकता दर्शवणारा लेख!

    ReplyDelete
  7. अन्नाची महती सांगणारा लेख आहे, जगात अनेक लोकांना पोटभर अन्न मिळत नाही म्हणून अन्नाचा नाश होऊं नये याची दक्षता घ्यावी

    ReplyDelete