28 Jan 2017

दिनरजनी हाचि धंदा गोविंदाचे पवाडे - लेखांक - ७

नमस्कार मंडळी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या १२९ व्या जन्मोत्सवास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक लीलांचा आपण सप्रेम आस्वाद घेत आहोत. गेल्या वर्षी पुण्यतिथी महोत्सवात आपण रोज एक अध्याय याप्रमाणे प.पू.काकांचे संपूर्ण चरित्र पाहिलेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा न लिहिता, त्यांच्या जीवनातील काही अद्भुत अनुभवच या सप्ताहात आपण दररोज पाहणार आहोत. सर्वांचे या 'गोविंदगुण-गायन' सेवेसाठी सहर्ष स्वागत.
( अधिक माहितीसाठी : दररोज क्रमाने गेल्या वर्षीच्या एका लेखाची लिंक येथे दिली जाईल, त्यावर जाऊन चरित्राचेही वाचन आपण सहज करू शकता. ज्यांना गेल्यावर्षी पोस्ट केलेले ते संक्षिप्त चरित्र डाऊनलोड करून संग्रही ठेवायचे आहे, त्यांनी कृपया लिंकवरून पीडीएफ डाऊनलोड करावी, ही विनंती.
सद्गुरुपुराण : अध्याय ७ -
http://rohanupalekar.blogspot.in/2016/09/blog-post_22.html
संपूर्ण चरित्र पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B-4fTpvl_d6seWl1eGJwOEs3Ylk/view?usp=drivesdk )
           ***********
७ : तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ
साधुसंत म्हटले की आपल्या मन:चक्षूंसमोर उगीचच भगवे कपडे, गळ्यात भारंभार माळा, कपाळावर मोठे गंध, भोवती शिष्यमेळा वगैरे कल्पनाचित्र उभे राहते. पण प्रत्यक्षात साधूंची अशी कोणतीच बाह्य लक्षणे सांगता येत नाहीत. किंबहुना, बाह्यात्कारी मिरवणारे खरे साधूच नव्हेत, असे सर्व संत एकमुखाने सांगतात. सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी दोन अफलातून ओव्यांमधून संतत्वाची लक्षणे सुंदर सांगितलेली आहेत. ते म्हणतात,
जो अंतरीं दृढ ।
परमात्मरूपीं गूढ ।
बाह्य तरी रूढ ।
लौकिक जैसा ॥ज्ञाने.३.७.६८॥

नैष्कर्म्यसिद्धी झालेला महात्मा आपल्या भूमिकेवर अातून पक्का दृढ असतो, आपला अनुभव तो कायम गुप्तच राखतो व बाहेर रूढार्थाने सर्वसामान्यांसारखेच लौकिक आचरण करून दाखवत असतो. तो कसल्याही प्रकारचे आपले वेगळेपण चुकूनही भासवत नाही.
माउली अशा महिमावान संताचे नेमके लक्षण सांगतात की,
तें चालतें ज्ञानाचें बिंब ।
तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ ।
येर माणुसपण तें भांब ।
लौकिक भाग ॥ज्ञाने.१०.३.७७॥

श्रीभगवंतांचे समग्र स्वरूप जाणून त्याच्याशीच एकरूप होऊन ठाकलेले महात्मे म्हणजे चालते-बोलते ज्ञानसूर्यच. त्यांचे शरीर, त्यांचे सर्व अवयव हे अलौकिक आत्मसुखाला फुटलेले कोंभच होत. बाहेरून दिसणारे त्यांचे माणूसपण किंवा मनुष्यरूप हे निव्वळ लौकिक असून ते मूळचे खरे नव्हे. पण तरीही ते लौकिक रूपही त्या अलौकिकाच्या छायेतच असल्याने, आपल्याला अपार सुखदायकच ठरत असते.
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हे असेच प्रसन्न विभूतिमत्व होत. त्यांचे वागणे, बोलणे, हसणे, पाहणे; सारे काही निखळ व मधुरच होय. आजही त्यांच्या फोटोंमधून त्यांचे ते निरागस हास्य व त्यामागची निर्मळ प्रेमभावना स्पष्ट जाणवते व आपले ऊर त्याच प्रेमावेगाने भरून येते.
साधू संत म्हटले की ते कायम गंभीरच असतात असे अजिबात नाही. उलट त्यांनाच खरा विनोद आकलन झालेला असतो. श्रीभगवंतांनी आपल्याला एकट्याला करमत नाही म्हणून तर हा मायाविस्तार केलेला आहे. म्हणजे आनंद घेण्यासाठीच ते विश्वरूप झालेले आहेत. त्यांची ही सुखमय विश्व-नाटक विनोदलीला या संतांनाच केवळ खरी समजलेली असल्याने, तेच तिचा यथार्थ आस्वाद घेत असतात. बाकी सर्वसामान्य लोकांच्या म्हणजे आपल्या आयुष्याचाच एक प्रकारे आपल्या कर्मांनी विनोद मांडलेला असल्याने, आपण विनोदी नव्हे तर विदूषकच झालेलो आहोत. पण संत मात्र खरा श्रीभगवंतांचा विनोद पुरेपूर आस्वादत असतात.
मिश्कीलपणा हा संतांचा जात्याच सद्गुण असतो. ते लीलानाटकी भगवंतांचेच अंश असल्याने त्यांना विविध नाटके एकाचवेळी उत्तमरित्या वठवता येतात. पू.काका देखील याला अपवाद नव्हते.
सर्व काही करून नामानिराळे राहणे, हा तर पू.काकांचा सवयीचा हातखंडा प्रयोग होता. उदाहरण म्हणून श्रीमती कुसुमावती हिरकण्णवर आजींचा हा किस्सा पाहा.
हिरकण्णवर कुटुंबाने निवृत्तीनंतर बारामतीला स्थायिक व्हायचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे व्यवस्थाही केलेली होती. सहज बोलता बोलता पू.काकांसमोर हा विषय निघाला. ते पटकन् म्हणाले, "तुम्ही बारामतीकर नव्हे, फलटणकरच आहात!" बारामतीस जाण्याची त्यांची सर्व तयारी तोवर खरेतर पूर्ण झालेली होती, भाड्याचे घरही घेतलेले होते. पण पू.काकांचे शब्द ते, कोण टाळू शकणार? पुढे नकळत अनेक घडामोडी घडल्या व त्यांचे बारामतीकर होण्याचे रहितच झाले.
पू.काकांच्याच आशीर्वादाने म्हणा, पण फलटणातच उत्तम जागा मिळून त्यांची स्वत:ची वास्तू उभी राहिली. काही काळानंतर हिरकण्णवरांच्या मुलाला टायफॉईड झाला व मुलीला घशाखाली गाठी झाल्या. दोघांवरही भरपूर औषधोपचार झाले, पण काहीच गुण आला नाही.
एके दिवशी अचानकच पू.काका त्यांच्या घरी गेले. पत्ता वगैरे काही माहीत नसतानाही एकटेच गेले. त्यांनी आनंदाने पू.काकांच्या चरणीं मस्तक ठेवले. दोन कॉटवर पडलेली मुले पाहून पू.काकांनी विचारले, "काय झाले? कशाला काळजी करता? मुलाला टायफॉईड झाल्याला चौदा दिवस झाले ना? आता काळजीचे कारण नाही." असे बोलून त्यांनी मुलीच्या गाठींवरून हळुवार हात फिरवला व "चुन्याने गाठींवरून रोज चोळत जा", असे सांगून ते निघून गेले.
आश्चर्य म्हणजे, तीन-चार दिवसांतच मुलाचा ताप पूर्ण बरा झाला व मुलीच्या गाठीही शमल्या. पू.काकांना जाऊन हे सांगितल्यावर ते आश्चर्य दाखवीत गमतीने म्हणाले, "ऑ ! इतक्या लवकर कसे काय झाले? कोणत्या डॉक्टरचे औषध लागू पडले?" आता यावर ते तरी काय उत्तर देणार? त्यांनी फक्त कृतज्ञतेने पू.काकांना मनोभावे वंदन केले. 'मी त्या गावचाच नाही', याचे हुबेहूब नाटक संतांशिवाय कोणाला बरे जमणार?
सामान्यांप्रमाणे लौकिक व्यवहारातही संत आनंद घेतच असतात. श्री तुकाराम महाराज म्हणतात, "विषय तो त्यांचा झाला नारायण ।" अशी त्यांना सर्वत्र हरिप्रचितीच येत असल्याने, त्याही गोष्टींत ते तेवढाच आनंद घेतात.
१९६९-७० सालची गुरुपौर्णिमा. त्यादिवशी भक्तांची वर्दळ चालू होती. पू.काका खोलीत बसलेले होते. श्रीमती फणसे आजी दर्शनाला आल्या होत्या. त्यांना पू.काका म्हणाले, "काय काय आणले आहेस? काढ काढ". आणि ते सामान काढेपर्यंत स्वत:च गुणगुणायला लागले, "हिरवा शालु नवा ल्याली, वेणीमध्ये मरवा ।" चेह-यावर गोड हास्य होते. फणसे आजींनी खरोखरीच बागेतला मरवा नेला होता, ते आधीच त्यांनी असे गाणे गाऊन सुचवले.
तेवढ्यात पू.सौ.मामी खोलीत डोकावून गेल्या. पू.काका तक्क्याला टेकून अर्धवट बसलेले होते. त्यांनी चटकन् अंबूताईंना हाक मारली व अभिनय करीत बोलू लागले, "हे (डोकावून गेलेले) कोण आहे? मी गोविंद आहे, पण हे कोण डोकावून गेले?" हाताचा पंजा गालावर ठेवून अगदी गोड हसत हसत, हे कोण आहे? असे सारखे म्हणू लागले. त्यानंतर आपणच वर्णन करायला सुरुवात केली, "पाठीवर सुवर्ण गोंड्याच्या फुलाची लांबसडक नागिणीसारखी वेणी, बिंदीबिजवरा, सफरचंदासारखे लालबुंद गोबरे गाल, कमरेला शालु शेला गुंडाळलेला, वेणीत गुंफलेला हिरवागार मरवा, कोण आहे हे कोण आहे?" मग अंबूताईंचा हात हातात घेत अतिशय गोड हसत म्हणाले, "ही तर मामी, ही तर मामी !"
त्यांचे ते लाघवी मनोहर रूप पाहून उपस्थितांनाही आनंदाचे भरते आले. गोविंद-रुक्मिणीचा हा जोडा खरोखरीच श्रीकृष्ण-रुक्मिणीचाच तर जोडा होता !
ती.सौ.रुक्मिणीदेवी तथा मामी याही मोठ्या तयारीच्या होत्या. पू.काकांची पत्नी होणे तसे सोपे नव्हते. फार फार अवघड काम ते. पण आपल्या पतीशी असलेल्या जन्मजन्मांतरीच्या ऋणानुबंधामुळे पू.सौ.मामींनी ही जबाबदारी लीलया पेलली. पू.काकांचा विश्वप्रपंच त्यांनीही समर्थपणे साजिरा-गोजिरा केला. माहेरची गडगंज संपत्ती सोडून ही लंकेची पार्वती झाल्यावरही अजिबात डगमगली नाही. जे आहे त्यातच त्यांनी सगळे सुखाने सांभाळले. पू.काकांचे कधीच घरात लक्ष नसायचे. पण पू.मामींनी न कुरकुरता बिनबोभाट पू.काकांचा संसार आनंदाने केला.
पू.सौ.मामींचे पू.काकांवर निरतिशय प्रेम होते. पू.काकाही फार मायेने त्यांच्याशी बोलत. त्या आजारी असताना त्यांना पुण्याला उपचारासाठी ठेवले होते. पू.काका त्यांना भेटायला आले व त्यांचा हात हातात घेऊन फार ममतेने त्यांनी ती.मामींची विचारपूस केली होती. पू.काकांनी देह ठेवल्यानंतर पू.मामी देखील खूप अस्वस्थ झाल्या व बरोबर शंभराव्या दिवशी, १९ जानेवारी १९७५ रोजी त्यांनीही देहत्याग केला. पू.काका गेलेले नाहीत, ते सतत बरोबर आहेतच; या भावनेने पू.मामींनी सौभाग्यालंकार काढलेले नव्हते. हीच भावना देवांनाही सत्य ठरवायची इच्छा झाली असावी बहुदा; कारण पू.मामींच्या अंत्यक्रियेनंतर रक्षा संकलन करताना, त्यांचा हिरवा चुडा व गळ्यातले मंगळसूत्र जसेच्या तसे सापडले. पू.सौ.मामी पू.काकांशी अशा एकरूपच झालेल्या होत्या !
लौकिकात राहूनही आपले अलौकिकत्व अंतरी जपणा-या, अखंड अवधूती मस्तीमध्ये निमग्न असणा-या, सद्गुरु श्री माउलींच्या या अनन्यदासाची, सद्गुरु श्री.गोविंदकाकांची जीवनगाथा खरोखरीच विलक्षण व मनोहर आहे. जितके जितके त्यात आपण अवगाहन करू, तितके अधिकाधिक आनंदाचे धनी होऊ, यात शंका नाही. गेले सात दिवस हीच तर अपूर्व सुखानुभूती आपण सर्वजण घेतो आहोत, बरोबर ना?
( छायाचित्र संदर्भ : पू.श्री.काका व पू.सौ.मामींची फलटणला 'श्रीगुरुकृपा' वास्तूच्या प्रवेशद्वारातील पाय-यांवर टिपलेली प्रसन्न भावमुद्रा.
हेच ते अनादि दांपत्य !!!!
"तिये वंदिली मियां मूळिके । देवो देवी ॥" )
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

0 comments:

Post a Comment