15 Jan 2017

हरीच्या दासा शुभकाळ अवघ्या दिशा

मकर संक्रांतीच्या दुस-या दिवशी करीदिन असतो. तीच किंक्रांत होय. पंचांगाच्या नियमानुसार आपल्याकडे हा अशुभ दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतीही नवीन, चांगली कामे सुरू केली जात नाहीत.
संतांची गणिते मात्र फारच भिन्न असतात. ते शास्त्र निष्ठेने पाळतातच, पण तरीही त्यांच्या शास्त्रनियमांची धारणा खूप वेगळी असते. त्यांच्या भावभूमिकेचा विचार करता ती पूर्ण योग्यही असते. भगवान शिव जिथे असतात तिथेच त्यांची शक्ती श्रीजगदंबा देखील असतेच; तसे संत जिथे असतात तिथे विवेक असतोच, असे श्रीज्ञानोबाराय स्पष्ट सांगतात. हेच दुस-या शब्दांत सांगायचे तर, संत कधीही चुकत नाहीत. त्यांचे वागणे हे त्रिकालाबाधित सत्यच असते. कोणत्याही शास्त्रकसोटीवर घासून पाहिले तरी ते अचूकच ठरते.
आता तुम्ही म्हणाल की, हा आज काय संदर्भहीन बडबडतोय? पण तसे नाही, सांगतो संदर्भ. किंक्रांत ही अशुभ असेल, मी नाही म्हणत नाही. पण माझ्यासाठी तरी ती अतिशय शुभच आहे. अहो, आजच्याच तारखेला व किंक्रांतीलाच दोन फार थोर महात्म्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत.
श्रीभगवंतांच्याच संकल्पाने १८८८ साली १५ जानेवारीच्या पहाटे ४ वाजता, आमच्या उपळेकर कुळाचे भाग्य उजळले होते. सद्गुरु श्री गोविंदकाका उपळेकर महाराजांचा या कुळात जन्म झाला व एका महान अध्यायाला सुरुवात झाली.
१५ जानेवारी १९७४ रोजी दुपारी १ च्या सुमारास श्रीवासुदेव निवास आश्रमात, साक्षात् श्रीदत्तप्रभूंचेच अपररूप असणारे योगिराज सद्गुरु श्री वामनरावजी गुळवणी महाराज आपल्या मूळ स्वरूपात पुन्हा सामावले.
किंक्रांत हा पंचांगातील अशुभ दिवस असला, तरी या दोन दिव्य घटनांमुळे माझ्यासाठी मात्र हा 'पुण्य-पावन' दिवसच ठरलेला आहे !
श्रीसंत तुकाराम महाराजांनी तर सांगूनच ठेवलेले आहे की,
अवघा तो शकुन ।
हृदयी देवाचे चिंतन ॥
तुका म्हणे हरीच्या दासा ।
शुभकाळ अवघ्या दिशा ॥

या दोन्ही महान विभूतींनी मुद्दाम किंक्रांत निवडून जणू आपल्याला संदेशच दिलेला आहे की, श्रीहरींच्या दासाला अवघ्या दिशा व सर्व काळ हे नित्य शुभच असतात. कारण हरिदासाच्या हृदयात मांगल्याचे आगर असणारे साक्षात् श्रीभगवंत आपल्या नामाच्या व स्मरणाच्या रूपाने निरंतर प्रकटलेलेच असतात. जिथे सद्भाग्याचे, परममांगल्याचे अधिष्ठान असणारे श्रीभगवंत व श्रीसद्गुरु, त्यांचे पावन नाम व परमभाग्याने होणारे त्यांचे स्मरण वसतीला आलेले आहे, तिथे अमंगलाचा, अशुभाचा प्रवेश तरी कधी होऊ शकेल काय?
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

0 comments:

Post a Comment