29 Jan 2017

*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण *** *** सप्तम अध्याय ***

(प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या ४२व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या सप्ताहास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त आपण प. पू. श्री. काकांच्या अलौकिक चरित्र आणि कार्यावर आधारलेल्या लेखमालेचा दररोज आस्वाद घेत आहोत. सर्वांना या ब्रह्मरसाच्या मेजवानीचे हार्दिक आमंत्रण !! )

*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण ***

*** सप्तम अध्याय ***

भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचे दिव्य सारस्वत हे साक्षात् त्यांचे स्वरूपच आहे आणि हीच प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांची पक्की धारणा होती. स्वत: श्रीमाउली भगवद्गीतेविषयी म्हणतात की,
म्हणौनि मनें कायें वाचा ।
जो सेवकु होईल इयेचा ।
तो स्वानंदसाम्राज्याचा ।
चक्रवर्ती करी ॥
ज्ञाने.१८.७८.१६६८॥
जो भगवद् गीतेचा मन, शरीर व वाचेने अनन्य दास होईल, सेवक होईल, त्याला ती स्वानंदसाम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट करून ठेवते. माउलींची ही प्रतिज्ञा त्यांच्या श्रीज्ञानेश्वरीलाही पूर्णपणे लागू आहे आणि प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज हे त्याचे जागते उदाहरण आहेत. माउलींच्या कृपेने पू. काका स्वानंदसाम्राज्याचे चक्रवर्ती झालेले होते. माउलींच्या अमृतरसाचे ते निरंतर पान करीत होते आणि माउलींच्याच प्रेरणेने कृपावंत होऊन त्यांनी तो अमृतरस तुम्हां-आम्हां भक्तांसाठी ग्रंथरूपाने उपलब्ध करून दिला. ही त्यांची आपल्यावरील फार मोठी करुणाकृपाच म्हणायला हवी.
प. पू. काकांच्या वाङ्मयाची ओळख करून देण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. पू. काकांचे लेखन पूर्णपणे आपल्या अवधूती मस्तीत झालेले असल्याने ज्याला त्या स्थितीचा अनुभव आहे, त्याच्या साठीच केवळ ते सुबोध असते. इतरांना तो अनुभव नसल्याने ते वाङ्मय तसे अत्यंत क्लिष्टच वाटते. त्यांची लेखनाची शैली खूप चांगली असली तरीही ती एकप्रकारे स्वतंत्रच आहे. त्यामुळे त्यांच्या शैलीची व्यवस्थित ओळख होईपर्यंत त्यांची वाक्ये देखील सलग वाचता येत नाहीत आपल्याला. म्हणूनच पू. काकांचे वाङ्मय त्यामानाने लोकांच्या नित्यवाचनात राहू शकले नाही. अर्थात् त्यांचे ज्योतिज्योति, आमोद, प्रास्ताविक, श्रीकृष्णदेव हे चिंतनपर ग्रंथच असे कठीण आहेत. बाकी श्रीसिद्धांत ज्ञानेश्वरी, विभूती, हरिपाठ सांगाती हे ग्रंथ त्यामानाने सोपे आहेत.
पू. काकांना एका भक्ताने सांगितले, " काका, आम्हांला तुमचे लेखन कळत नाही. " त्यावर काका पटकन् उत्तरले, " अरे, तुम्हांला कळावे म्हणून मी लिहिलेच नाही! " खरोखरीच, पू. काकांनी स्वांत:सुखाय वाङ्मयनिर्मिती केलेली आहे. त्यांची ती आत्मप्रचितीची अंत:प्रेरणा होती, जी त्यांनी फक्त शब्दबद्ध केलेली आहे. तो आतून स्वयंभ प्रकटलेला त्यांचा स्वानुभव-अनुकारच आहे. पण त्यांची जर कृपा झालेली असेल एखाद्यावर तर मात्र त्यांचे वाङ्मय अगदी सोपे होऊन जाते, हेही तितकेच खरे आहे.
पू. काका सलग दहा दहा तास लेखन करीत असत. त्यांचे एक जुने भक्त कै. हिरालालजी काबरा यांनी मला स्वत:ला एकदा सांगितलेला एक विलक्षण प्रसंग सांगतो. हाच काकांच्या आठवणींमध्येही छापून आलेला आहे पूर्वी. एकदा हिरालालजी पू. काकांच्या दर्शनाला फलटणला आले होते. त्यावेळी पू. काका श्रीज्ञानेश्वरी सुबोधिनीचे लेखन करीत बसलेले होते. लहानगा शशिकांत ( पू. काकांचे सर्वात लहान चिरंजीव ) त्यांच्या मांडीवर होता. ते भराभरा पानेच्या पाने लिहीत होते. गंमत म्हणजे त्यांच्या दौतीतील शाई कधीच संपलेली होती, तरी ते तसेच त्या दौतीत टाक बुडवून झरझर लेखन करीत होते. जवळपास दोन तासांनी त्यांनी थोडी उसंत घेतली व चाहूल लागली म्हणून मागे पाहिले तेव्हा त्यांना हिरालालजी आलेले समजले. किती एकाग्रता असेल पाहा त्यावेळी पू. काकांची !
पू. काकांना पुस्तक छापताना शब्दांत किंचितही बदल केलेला खपत नसे. ते खूप काळजीपूर्वक शुद्धलेखन तपासत असत. काकांची वाक्यरचना तशी पल्लेदार, मोठी आणि अनेक उपवाक्यांचा समूह वाटावी अशीच आहे. आपल्याला दोन तीनदा वाचल्याशिवाय आशय लक्षात येतच नाही. पू. काकांच्या वाङ्मयापैकी, " विभूती " हा तुलनेने बाकीच्यांपेक्षा सर्वात सोपा ग्रंथ म्हणायला हवा. ( प्रस्तुत लेखाच्या शेवटी या पुस्तकाची लिंक दिलेली आहे, जिज्ञासूंनी तो ग्रंथ डाऊनलोड करून जरूर वाचावा. ) फलटण येथील थोर सत्पुरुष श्रीसंत हरिबाबा महाराज व त्यांच्या शिष्योत्तम लाटे गावच्या पू. आईसाहेब महाराज यांचे सुंदर चरित्र पू. काकांनी विभूती मधून उलगडलेले आहे. त्यातही स्फुटलेखन भाग थोडा क्लिष्ट असला तरी चरित्रपर भाग सोपा आहे.
" हरिपाठ सांगाती " या ग्रंथात पू. काकांनी नामसाधनेवर भर देऊन, भगवान माउलींच्या हरिपाठाबरोबरच, सर्वांगीण परमार्थासाठी आवश्यक असणा-या विविध संतांच्या ओव्या व निवडक अभंगांचे संकलन केलेले आहे. हे अभंग व ओव्यांचे संकलन अगदी नेमके, काळजीपूर्वक व नीट विचार करूनच केल्याचे वाचताना स्पष्ट जाणवते. म्हणूनच त्याचे " सांगाती " हे नाव यथार्थ आहे. हा ग्रंथ म्हणजे परमार्थ मार्गातील साधकांचा सज्जन सांगाती, काळजी वाहणारा, सांभाळणारा जोडीदारच आहे, यात शंका नाही.
हरिपाठ सांगाती चे अजून एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात पू. काकांनी श्रीज्ञानेश्वरीच्या ओव्या कोणकोणत्या रागात गायच्या त्याची नोंद केलेली आहे. ज्ञानेश्वरीच्या इतिहासात रागांचा असा उपयोग सर्वात प्रथम पू. काकांनीच नोंदवलेला आहे. वेगवेगळ्या रागांचा त्यांना जो संदर्भ लागला ती नि:संशय माउलींचीच कृपा म्हणायला हवी. त्यातून पू. काकांचेही ज्ञानेश्वरीचे सर्वांगीण चिंतन दिसून येते. त्यांनी माउलीकृपेने ध्यानावस्थेत त्या ओव्यांचा तसा सांगीतिक अनुभवच घेतला असावा, असे मला वाटते.
" सिद्धांत ज्ञानेश्वरी " चे चार खंड म्हणजे श्रीज्ञानेश्वरीतील ओव्यांचे त्यातील सिद्धांतांनुसार केलेले संकलन असून  त्यांचा अर्थही सोबत दिलेला आहे. हा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांसाठी विशेष महत्त्वाचाच आहे. आजही दररोज रात्रीच्या हरिपाठानंतर यातील दोन पाने वाचली जातात. तशी पू. काकांच्यापासूनच चालत आलेली पद्धत आहे.
पू. काकांच्या वाङ्मय प्रसारासाठी " साहित्य संस्था " स्थापन करण्यात आलेली होती. संस्थेमार्फतच आजवर पू. काकांच्या ग्रंथांच्या अनेक आवृत्या काढल्या गेल्या. पण आजमितीस त्यातले फारसे ग्रंथ उपलब्ध नाहीत. त्यामुळे आम्हीच ते सर्व ग्रंथ हळूहळू स्कॅन करून आपल्या कम्युनिटीवर पोस्ट करणार आहोत.
पू. काका हे माउलींचे नुसतेे निस्मीम भक्त नव्हे तर त्यांच्या वाङ्मयाचे सखोल ज्ञानी देखील होते. माउलीकृपेने स्वानंदसाम्राज्याच्या सम्राट पदावर बसलेला हा कोमल अंत:करणाचा महात्मा ज्ञानेश्वरी क्षणोक्षणी जगत होता. ते माउलींविषयी किती हळवे होते? याचा एक हृद्य प्रसंग सांगतो. हा प्रसंग १९७१ सालचा आहे. एकदा एका तरुण मुलाला त्यांनी विचारले, तुमचे गोत्र काय? शाखा कोणती? त्याने यजुर्वेदी वाजसनीय शाखेचे आहोत, असे नुसते सांगितल्याबरोबर पू. काकांनी त्याला तेथेच साष्टांग नमस्कार घातला. कारण, माउली यजुर्वेदी वाजसनीय शाखीय होते म्हणून  ! पाहा, केवढी निष्ठा होती त्यांची. आणि अशी निष्ठा, असे अनन्य प्रेम असेल तर ती कनवाळू, दयाळू माउली आपला दिव्य-अलौकिक कृपा-प्रेमपान्हा त्या भक्ताला का बरे पाजणार नाही? माउलींचे ते सतरावियेचे स्तन्य पिऊन आत्मतृप्त झालेले पू. काका हे म्हणूनच फार फार विलक्षण आणि नित्य वंदनीय विभूतिमत्व होते, यात शंका नाही  !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

0 comments:

Post a Comment