29 Jan 2017

*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण *** *** अष्टम अध्याय ***

(प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या ४२व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या सप्ताहास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त आपण प. पू. श्री. काकांच्या अलौकिक चरित्र आणि कार्यावर आधारलेल्या लेखमालेचा दररोज आस्वाद घेत आहोत. सर्वांना या ब्रह्मरसाच्या मेजवानीचे हार्दिक आमंत्रण !! )

*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण ***

*** अष्टम अध्याय ***

भगवान श्रीकृष्णांचे हृद्गत सांगताना सद्गुरु श्रीज्ञानेश्वर माउली म्हणतात,
तेही प्राणापरौते ।
आवडती हें निरुतें ।
जे भक्तचरित्रातें ।
प्रशंसिती ॥
ज्ञाने.१२.१९.२२७॥
अर्जुना, जे माझ्या भक्तांचे चरित्र गातात, वाचतात व त्या चरित्राचे परिशीलन करून इतरांनाही सांगतात, ते मला माझ्या प्राणांपेक्षाही जास्त आवडतात. एखाद्या पोराचे कौतुक केले की जशी त्याची आईच खूश होऊन हवे ते देते, तसेच हे भगवंतही भक्तांची चरित्रे गाणा-यांवर कृपा करतात.
म्हणूनच गेले आठ दिवस आपण भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचे पूर्णकृपांकित व राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील थोर विभूतिमत्व सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या दिव्य-पावन चरित्रसागरातील काही अंश पाहात आहोत. खरोखरीच महात्म्यांचे चरित्र हा अगाध महासागरच असतो. हिमालयातील पुष्पघाटी मध्ये गेल्यावर जसे आपण भांबावून जातो की, कोणती फुले पाहायची? कोणाचे कौतुक करायचे?  बघावे तिकडे निसर्गाचा अनोखा रंगसाज सजलेला दिसतो. अगदी तशीच आपली स्थिती प. पू. काकांचे चरित्र पाहताना होऊन जाते. त्यांच्या चरित्रसागरातील कोणकोणते मोती, कोणकोणती रत्ने आपण पाहणार? अवघे आयुष्य अपुरे पडून जाईल. माउली म्हणतात की, गंगेचे घोटभर पाणी जरी प्यायले तरी ते पूर्ण गंगेचे पान केल्याची तृप्ती देते, तसे पू. काकांच्या चरित्रातील हे काही अंशही आपल्याला सर्वांगतृप्ती देण्यास सक्षम आहेत.
संतांचे चरित्र हे बहुआयामी असते. ते जसे आपल्यासाठी आदर्शांचा खजिना असते तसेच तनमनाचे पोषकही असते. आपली साधनेची, परमार्थाची मरगळ नष्ट करून आपल्याला साधनमार्गावर अग्रेसर करण्याचे फार मोलाचे काम संतचरित्रे करतात. संतचरित्रांचे चिंतन, अनुशीलन व अनुगमन ही एक प्रकारे संतसंगतीच आहे, जी सहज सोपी व सहजसाध्यही आहे.
प. पू. काकांचे चरित्र आपल्याला कोणता संदेश देते? असे जर विचारले, तर आपण सांगू शकतो की ते चरित्र अनन्यभक्तीचा संदेश देते. सर्वकाही आपल्या श्रीसद्गुरूंवर सोपवून शांतपणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधन करावे, त्यातच आपले सर्वार्थाने हित असते. पू. काका म्हणत, " तुम्ही मनुष्य आहात एवढेच तुम्हांला तुमच्या स्वरूपाच्या दर्शनाचा अधिकारी करण्यास बस आहे ! " म्हणजे आम्हांला आधी " मनुष्य " बनायला हवे. आमच्यातील पशुत्व पूर्णपणे जायला हवे. पुढे पू. काका म्हणतात, " सर्व आकर्षकतेचे रहस्य वैराग्य हेच आहे ! " म्हणून नुसते मनुष्य होऊन चालणार नाही तर त्यामध्ये वैराग्यही बाणायला हवे. असे वैराग्य चित्तात प्रकट झाल्यावर मगच खरे साधन हातून घडते. त्यासाठी प. पू. काका याठिकाणी महत्त्वाचा उपदेश करतात की, " सर्व साधनांचा राजा म्हणजे सद्गुरूपासना ! " जेव्हा सद्गुरूंची अशी अनन्यभक्ती साधते तेव्हाच खरे मनुष्यजन्माचे सार्थक होते ! पू. काकांच्या पावन चरित्राचा हाच मुख्य उपदेश आहे.
प. पू. काकांचा उपदेश अगदी सोपा होता. कोणत्याही लौकिक अवडंबराच्या भानगडीत न पडता, आपली दररोजची कर्तव्ये प्रेमाने व निष्ठेने, भगवंतांची पूजाच आहे या बुद्धीने अलिप्तपणे करावीत व निरंतर त्या परमात्म्याचे स्मरण करीत राहावे, असे ते सांगत. माउलींचा परमदिव्य हरिपाठ दररोज वाचणे, जवळ बाळगणे व श्रीज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा इत्यादी सद्ग्रंथांचे जमेल तसे प्रेमाने वाचन-चिंतन करणे, असे त्यांच्या उपासनेचे सुटसुटीत रूप होते. त्यांनी कधीच कोणाला अनुग्रह दिला नाही की कोणाचे गुरुपदही भूषवले नाही. पण माउलींच्या हरिपाठाचा मात्र प्रचंड प्रचार प्रसार केला. ते यच्चयावत् सर्व अडचणींवर माउलींचा हरिपाठ वाचण्याचा सल्ला देत असत. अक्षरश: लाखो लोकांनी त्यांच्या सांगण्यावरून हरिपाठाचे नित्य वाचन करून मनातील इच्छा पूर्ण करून घेतल्या. हा अनुभव आजही असंख्य भक्त दररोज घेत आहेत. याच्याही पुढे जाऊन पू. काका तर म्हणत असत की, " माउलींचा हरिपाठ श्रद्धेने नुसता जवळ बाळगला तरीही त्याच्यावर माउली कृपा करतात, इतके ते प्रेमळ आहेत व हरिपाठही तितकाच श्रेष्ठ आहे. "
प. पू. काका हे अंतर्बाह्य माउलीमय झालेले होते. त्यांना माउलींच्या शिवाय करमतच नसे. त्यांनी कधी लौकिक चमत्कार स्वत:हून केले नाहीत, पण भगवदीच्छेने आपोआपच चमत्कार घडत असत. पू. काकांचा सर्वात मोठा चमत्कार हा त्यांनी लाखो लोकांच्या चित्तात जागवलेला हरिपाठप्रेमाचा आविष्कार हाच होय !  आणि या कामी ते पूर्ण तयार विभूतिमत्व होते.
पू. काकांना दीर्घ आयुष्य लाभले. इ.स. १८८८ मध्ये माघ शुद्ध द्वितीयेला पृथ्वीतलावर अवतरलेले पू.  काका, ८७ वर्षांचे कृतार्थ आयुष्य क्रमून इ.स. १९७४ साली भाद्रपद कृष्ण अष्टमी, दि. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी समाधिस्थ झाले. पू. काका किती थोर गुरुभक्त होते पाहा. त्यांच्या सद्गुरूंनी, पू. श्रीकृष्णदेव महाराजांनीही १९२३ साली ८ ऑक्टोबरलाच महासमाधी घेतली होती. पू. काकांनी त्याच तारखेला समाधी घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत आपली गुरुनिष्ठा अबाधित राखली होती.
पू. काकांच्या चरित्रसागरात आपण गेले आठ दिवस यथामती, यथाशक्ती अवगाहन करीत आहोत. हे चिंतन सर्वांनाच आनंददायी ठरले, यात शंका नाही. प. पू. काकांचे माउलींच्या हरिपाठावर नितांत प्रेम होते, म्हणून त्या हरिपाठाचे श्रद्धा व प्रेमादरपूर्वक नित्य पठण करण्याची प्रतिज्ञा करून, आज त्यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या श्रीचरणीं नतमस्तक होऊया आणि आत्तापर्यंत वाचलेल्या चरित्र प्रसंगांचे चिंतन करून आपापल्या साधनेत मग्न होऊन पू. काकांचा कृपाप्रसाद पुरेपूर अनुभवूया  !!
आठव्यात ' आठवा ' आठवा ।
हृदयी निरंतर साठवा ॥
दिवसाच्या आठव्या प्रहरी, ब्राह्ममुहूर्तावर देवकीचा आठवा पुत्र भगवान श्रीकृष्ण, गोविंद, केशव वेळोवेळा आठवा. प. पू. काकांचेही नाव ' गोविंद ' व आठ ही प. पू. काकांची आवडती संख्या होती. म्हणून प्रेमादराचा सुगंध असलेल्या सुमधुर आठवणींच्या आठ भावपुष्पांची ही लेखमाला प. पू. काकांच्या जयंतीदिनी त्यांच्या श्रीचरणीं सर्वांच्या वतीने मी समर्पित करतो.
गेले आठ दिवस या लेखमालेला वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. पू. काकांच्या चरित्राची गोडीच इतकी विलक्षण आहे की तिने वाचकांना वेध लावला नाही तरच नवल ! याचा सुखद प्रत्यय मी गेले आठ दिवस अनुभवतोय. लेखाची दररोज वाचक आतुरतेने वाट पाहात होते, हे लेखक म्हणून माझ्यासाठी खूपच समाधानकारक होते. माझी मनोमन धारणा आहे की, हे लेखन वाचकांनी इतक्या प्रेमाने, आवडीने वाचले, म्हणजेच ही सेवा श्रीसद्गुरूंनी रुजू करून घेतली ! असाच तुम्हां सद्गुरुस्वरूप वाचकांचा प्रेमाशीर्वाद आम्हां सर्वांना निरंतर लाभो, हीच श्रीचरणीं कळकळीची प्रार्थना !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

0 comments:

Post a Comment