14 Jan 2017

साधला हा पर्वकाळ

आज मकर संक्रमण !!
नाविन्याचा, परस्पर-स्नेहाचा, सात्त्विकतेचा संदेश घेऊन येणा-या  या मकरसंक्रांतीच्या, सण संपता संपता सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !!
संक्रांतीचा गर्भितार्थ हा वाईटातून चांगल्याकडे केलेल्या मार्गक्रमणाचा आहे. 'स नाम परमात्मा' असे शास्त्रवचन आहे. म्हणून जीवाने आपल्या जीवभावातून त्या परमात्म्याकडे केलेल्या संक्रमणाचे द्योतक असणारा हा उत्सव, ' संक्रांती ' या नावाने आपल्या भारतीय परंपरेत तीळगूळ वाटून साजरा होतो. भगवान सूर्यदेव आपल्या कर्कवृत्तावरून आजच्या दिवशी मकरवृत्तावर संक्रमण करतात. तसेच आपणही दररोजच चाललेल्या अशाश्वत, कष्टमय, दु:खपूर्ण प्रपंचातून नित्यनूतन, आल्हाददायक, आनंदमय व शाश्वत अशा परमार्थमार्गावर अधिक्रमण करण्याचाच शुभ संदेश हा उत्सव आपल्याला देत असतो. मात्र हे संक्रमण आपण निष्ठेने, प्रयत्नपूर्वक साधायचे असते, ते काही आपोआप घडत नाही.
तीळाची गोडी गुळामध्ये घोळल्याने अधिक वाढते, तसे आपल्या चित्तातील सात्त्विक वृत्ती भगवन्नामाच्या गोडीने अधिक मधुर होतात आणि या दोघांच्या एकत्रिकरणातूनच परमार्थाचा खरा मधुरस निर्माण होतो, ज्याची गोडी अवीट असते.
श्रीभगवंतांच्या नामालाच केवळ संत 'गोड' म्हणतात. 'अवीट गे माये विटेना ।' नामाची गोडी कधीही न विटणारी आहे, असे माउली सांगतात. म्हणूनच सद्गुरु श्री माउली श्रीभगवंतांना विनवतात की, 'श्रवण नाम गोडी श्रवण नाम गोडी । हीच आवडी देई मना ॥' माझ्या मनाला तुझ्या अवीट गोडीच्या नामाचाच सतत छंद लागून राहो. संक्रांतीला जे 'गोड बोला' असे आपण म्हणतो, त्याचा खरा अर्थ हाच आहे. गोड बोला म्हणजेच सतत प्रयत्नपूर्वक नाम घ्या !
मकरसंक्रांत हा खरा महिलामंडळाचा सण आहे. महाराष्ट्रात आजच्या दिवशी सवाष्ण स्त्रिया देवीला वोवसायला जातात व एकमेकींनाही कुकू लावून वोवसतात. मातीच्या सुगडांमध्ये ऊस, बोरे, ज्वारीची कणसे, गाजर, हरभरा इत्यादी या ऋतूत आलेल्या गोष्टी घालून ते एकमेकींना देतात. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचे 'माउलीपण' आमच्या हाडीमासी किती मुरलंय पाहा. आजच्या दिवशी आळंदीला माउलींना वोवसायला माताभगिनांची प्रचंड गर्दी असते. देहाने पुरुष असूनही, एकट्या माउलींनाच अशा प्रकारे वोवसले जाते. सद्गुरु श्री माउलींचे 'आईपण' आम्हां मराठी मनांमध्ये पक्के घर करून राहिलेले आहे, याचा हा जिवंत प्रत्यय नव्हे काय?
श्रीसंत तुकाराम महाराजांनी एका सुंदर अभंगातून संक्रमणाची ही संपूर्ण प्रक्रिया मार्मिक शब्दांत कथन केलेली आहे. ते म्हणतात,
देव तिळीं आला ।
गोडें गोड जीव धाला ॥१॥
साधला हा पर्वकाळ ।
गेला अंतरीचा मळ ॥२॥
पापपुण्य गेले ।
एका स्नानेचि खुंटले ॥३॥
तुका म्हणे वाणी ।
शुद्ध जनार्दन जनीं ॥
श्रीसंत तुकोबाराय म्हणतात तसा मकरसंक्रमणाचा पर्वकाल साधण्याची सुवर्णसंधी सगळ्यांच्या आयुष्यात लवकरात लवकर येवो, हीच यानिमित्त श्रीसद्गुरुचरणीं प्रार्थना करून सर्वांना पुनश्च मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो !!
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

2 comments:

  1. सण्क्रमणाचा आध्यात्मिक अर्थ आज सुन्दर कळला ! धन्यवाद !

    ReplyDelete
  2. पुनश्च वाचून उजळणी छान झाली

    ReplyDelete