26 Jan 2017

दिनरजनी हाचि धंदा गोविंदाचे पवाडे - लेखांक - ५


नमस्कार मंडळी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या १२९ व्या जन्मोत्सवास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक लीलांचा आपण सप्रेम आस्वाद घेत आहोत. गेल्या वर्षी पुण्यतिथी महोत्सवात आपण रोज एक अध्याय याप्रमाणे प.पू.काकांचे संपूर्ण चरित्र पाहिलेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा न लिहिता, त्यांच्या जीवनातील काही अद्भुत अनुभवच या सप्ताहात आपण दररोज पाहणार आहोत. सर्वांचे या 'गोविंदगुण-गायन' सेवेसाठी सहर्ष स्वागत.
( अधिक माहितीसाठी : दररोज क्रमाने गेल्या वर्षीच्या एका लेखाची लिंक येथे दिली जाईल, त्यावर जाऊन चरित्राचेही वाचन आपण सहज करू शकता. ज्यांना गेल्यावर्षी पोस्ट केलेले ते संक्षिप्त चरित्र डाऊनलोड करून संग्रही ठेवायचे आहे, त्यांनी कृपया लिंकवरून पीडीएफ डाऊनलोड करावी, ही विनंती.
सद्गुरुपुराण : अध्याय ५ -
http://rohanupalekar.blogspot.in/2016/09/blog-post_20.html
संपूर्ण चरित्र पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B-4fTpvl_d6seWl1eGJwOEs3Ylk/view?usp=drivesdk )
           ***********
५ : नेणती चंद्रकिरणें जिव्हाळा तो
भगवान श्री ज्ञानेश्वर माउली संतांचे सद्गुणैश्वर्य फार सुंदर शब्दांमध्ये सांगतात. अद्भुत उपमा द्याव्यात त्या माउलींनीच ! आपल्याकडे 'उपमा कालिदासस्य' असे म्हणतात. ते खरेही आहे; पण त्या कविकुलगुरु  कालिदासालाही शरणागती पत्करून दास्यत्व करावेसे वाटेल, इतक्या अलौकिक उपमा सद्गुरु भगवान श्री माउली देतात. त्यांचे सूक्ष्म निरीक्षण व त्या संदर्भांचा नेमक्या जागी चपखल वापर करण्याची हातोटी वादातीत विलक्षण आहे. आता हेच पाहा; साधुत्वातील दयेची परिसीमा सांगताना ते म्हणतात,
निम्न भरलिया उणें ।
पाणी ढळोंनि नेणे ।
तेंवि श्रांता तोषौनि जाणें ।
सामोरें पां ॥ज्ञाने.१६.२.१५८॥

पाणी वाहते आहे, त्याच्या वाटेत एक खड्डा आला, तर ते पाणी तो खड्डा भरूनच पुढे जाते. तसे समोरच्याच्या ठिकाणी जे काही न्यून असेल ते पूर्ण करून, त्याचे ते शल्य, त्याचे ते दु:ख नष्ट करूनच हे संत स्वस्थ बसतात. हा त्या संतांचा सहजस्वभावच आहे. सद्गुरु श्री माउलींनी किती गोड उपमा योजलेली आहे पाहा !
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हे तर पेशाने डॉक्टरच होते. रोग्याचे दु:ख हरण करून त्याला सुख देणे, हे त्यांनी जाणतेपणी स्वीकारलेले जीवनव्रतच ! त्यातही ते संत, मग तर बोलायलाच नको. इवल्याशा परदु:खानेही तळमळणा-या त्यांच्यासारख्या महात्म्याने, सत्याऐंशी वर्षांच्या आपल्या जीवनकालात किती जीवांचे दु:ख, शोक, उद्वेग, भयादी हरण करून त्यांना शाश्वत समाधान दिले असेल, याची गणतीच होऊ शकत नाही.
प.पू.श्री.काकांचे असे काही हृद्य प्रसंग भक्तांनी प्रेमादरपूर्वक नोंदवून ठेवलेले आहेत, म्हणूनच आपण त्यांचा प्रेमास्वाद आजही तेवढ्याच उत्कटतेने घेऊ शकतो आहोत; हे आपले भाग्यच!
प.पू.श्री.काकांच्या निस्सीम भक्त, ती.अंबूताई फणसे यांची एक भावपूर्ण हकीकत त्यांच्याच शब्दांत.
"इ.स. १९४४ साली माझे वडील ती.माधवराव उपाख्य नाना वेलणकर श्रीदत्तचरणीं विलीन झाले. आता माझे माहेरच संपले, ही तीव्र भावना निर्माण होऊन कुठेतरी खोलवर मनात रुतून बसलेली होती. त्यावेळी आम्ही अंबाल्यास होतो. तब्बल सहा वर्षांनी आम्ही सिकंदराबादला बदलीवर आलो. इ.स.१९५० साली मी एकटीच सिकंदराबादहून फलटणला आले.
दुसरे दिवशी प.पू.काकांचे दर्शनास गेले. आता घरी आईवडील कोणीच नसल्यामुळे, शिवाय वडिलांच्या दुःखद निधनाने व्याकुळ मनाला सांत्वनाचे दोन शब्द सांगून दिलासा देणारे, पाठीवरून मायेचा हात फिरवून धीर देणारे प.पू . काकांशिवाय कोण होते मला?याच विचारातच मी पू.काकांच्याकडे गेले व एकदम त्यांच्या कमरेला मिठी मारून हमसाहमशी रडले. माझा रडण्याचा आवाज ऐकून ती.सौ.मामी बाहेर आल्या. पू. काका आपल्याच तंद्रीत, सद्गुरूंच्या अनुसंधानात निमग्न होते. त्यांनी सौ.मामींना विचारले, "कोण आहे ? का रडते आहे ?"
ती.सौ.मामी पू.काकांना म्हणाल्या, "अहो, असे काय करता? माधवरावांची अंबू नव्हे का? नाना वारले म्हणून तिला फार वाईट वाटते आहे." ती.सौ.मामींनी असे सांगताच पू.काका देहभानावर आले व माझ्या पाठीवरून हळुवार मायेने हात फिरवून, "उगी उगी बाळ, ऊठ ऊठ", असे म्हणाले व प्रेमभराने त्यांनी आपल्या धोतरच्या सोग्याने माझे अश्रू देखील पुसले. आई-वडीलसुद्धा अतीव दु:खाच्या प्रसंगी अशी निरपेक्ष, निखळ माया व्यक्त करू शकतील की नाही सांगता येत नाही. पण पू.काकांनी आपल्या निर्व्याज प्रेमाने माझे सांत्वन केले. मला पोटाशी घेऊन, चार शब्द सांगून शेजारी बसवून घेतले. त्याक्षणापासून माझी पोरकेपणाची ती भावना कायमची नष्टच झाली. कशी नाही जाणार हो ती भावना? पू.काकांसारखे अलौकिक माहेर जे मला लाभलेले होते!"
संतांच्या ठायी भगवत्कृपेने प्रकटलेल्या अद्भुत अहिंसेचे सुरेख वर्णन श्री माउलींनी तेराव्या अध्यायात केलेले आहे. त्यातील हातांच्या माध्यमातून प्रकटणा-या अहिंसेचे वर्णन करताना ते म्हणतात की, "या अहिंसा-सिद्ध संतांच्या हातांना कसलाही व्यापार शिल्लकच नसतो. त्यांना जरी कर्तव्यच काही उरलेले नसले, तरी ते हात सदैव नमस्कारासाठी तत्पर असतात. त्या हातांना केवळ आशीर्वाद देणे माहीत असते किंवा पडलेल्याला हात देऊन उठवणे माहीत असते अथवा आपल्या मृदुमुलायम स्पर्शाने आर्ताचे दु:खहरण करणेच फक्त माहीत असते." माउली म्हणतात, *"नेणती चंद्रकिरणें । जिव्हाळा तो ॥ज्ञाने.१३.७.२८९॥"* अहो, या संतांच्या हातांमधून (सर्वांगातून, शब्दांमधून) जे अद्भुत प्रेम, जो अलौकिक जिव्हाळा प्रकट होतो; जगातील सर्वात मुलायम व शीतल मानले गेलेले चंद्रकिरणही तो कधीच समजू शकणार नाहीत. पू.काकांच्या प्रत्येक व्यवहारातून, क्रियेतून हाच अपरंपार प्रेमभाव स्वाभाविकपणे प्रकट होत असे.
पू.काकांची नात श्रीमती पद्मा मिराशी आपल्या लहानपणीचा एक प्रसंग सांगतात. तो वाचून सद्गुरु माउलींचे वरील म्हणणे नक्की पटेल.
"प.पू.गोविंद महाराज माझे आजोबा. मी पाचवीमध्ये असताना मला टायफॉईड झाला होता. त्यावेळी आजोबा माझ्याजवळ बसून चमच्याने तोंडात पाणी घालत होते. कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवत होते. तरीही ताप वाढतच होता. रात्री ताप १०५° पर्यंत गेला. माझी आई घाबरून आजोबांना सारखे विचारत होती, "पद्माचा ताप केव्हा उतरणार?" आजोबा व आई रात्रभर माझ्याजवळ बसूनच होते. शेवटी पहाटे ५ वाजता ताप उतरला. त्यावेळी मिश्कीलपणे आजोबा माझ्या आईला म्हणाले, "पद्माला न्यायला यम आला होता. मी त्याला दूध, कोल्ड्रिंक देऊन परत पाठवले." त्यानंतर ताप उतरतच गेला. पुन्हा काही ताप आला नाही.
अशी दैवी शक्ती माझ्या पाठीशी आजोबांच्या रूपाने असल्यामुळेच मी त्या भयंकर दुखण्यातून सहीसलामत बाहेर आले. मृत्यूवरही नियंत्रण राखण्याचे सामर्थ्य बाळगून होते माझे आजोबा !
मी त्यांची नात म्हणून ते माझ्यावरील प्रेमाने बसून राहिले, असे अजिबात नाही. त्यांना असा कळवळा सर्वांविषयीच होता. म्हणून तेच आजही तुम्हां-आम्हां भक्तांच्या पाठीशी सतत उभे आहेत. त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आपले सगळे बिनबोभाट होत आहे. तेच कसल्याही संकटांतून आपल्याला  तारतात व त्यांचे स्मरणही करवून देतात, ही केवढी मोठी कृपा आहे त्यांची !!"
जणू अमृताच्या अवखळ गंगेने स्वत:च येऊन एखाद्यावर अविरत प्रेमवर्षाव करावा, तसे हे संत सर्वांचे अखंड कल्याणच करीत असतात. त्यांच्या श्रीचरणीं नतमस्तक होऊन, त्या श्रीचरणांद्वारे प्रकट होणा-या भगवत्कृपा-गंगेत सुस्नात होण्याच्या या महद्भाग्याचा हेवा करावा तेवढा थोडाच ! जन्मोत्सवानिमित्त सध्या चालू असलेल्या या 'गोविंदगुण-गायन सेवे'चे हेच तर एकमात्र उद्दिष्ट आहे !!!
( छायाचित्र संदर्भ : सद्गुरु श्री माउली सांगतात की, "जे सदांचि ते मोकळे । जैशीं चंदनांगें शीतळें ।(ज्ञाने.१३.७.२९१) चंदन जसा सर्वांगानेच शीतळ आहे, न फळताच तो सर्वांना सर्वांगाने फलप्रद ठरतो, तसे हे संतांचे हात सदैव आशीर्वादच देतात, कसलाही भेदभाव न बाळगता! श्री माउलींच्या या मधुर श्रुतीचा प्रकट दिव्य अनुभव म्हणजेच पू.काकांचे हे छायाचित्र !!)
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

0 comments:

Post a Comment