25 Jan 2017

दिनरजनी हाचि धंदा गोविंदाचे पवाडे - लेखांक - ४


नमस्कार मंडळी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या १२९ व्या जन्मोत्सवास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक लीलांचा आपण सप्रेम आस्वाद घेत आहोत. गेल्या वर्षी पुण्यतिथी महोत्सवात आपण रोज एक अध्याय याप्रमाणे प.पू.काकांचे संपूर्ण चरित्र पाहिलेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा न लिहिता, त्यांच्या जीवनातील काही अद्भुत अनुभवच या सप्ताहात आपण दररोज पाहणार आहोत. सर्वांचे या 'गोविंदगुण-गायन' सेवेसाठी सहर्ष स्वागत.
( अधिक माहितीसाठी : दररोज क्रमाने गेल्या वर्षीच्या एका लेखाची लिंक येथे दिली जाईल, त्यावर जाऊन चरित्राचेही वाचन आपण सहज करू शकता. ज्यांना गेल्यावर्षी पोस्ट केलेले ते संक्षिप्त चरित्र डाऊनलोड करून संग्रही ठेवायचे आहे, त्यांनी कृपया लिंकवरून पीडीएफ डाऊनलोड करावी, ही विनंती.
सद्गुरुपुराण : अध्याय ४ -
http://rohanupalekar.blogspot.in/2016/09/blog-post_19.html
संपूर्ण चरित्र पीडीएफ -

           ***********
४ : विचरे विश्व होउनि विश्वामाजी
थोर ज्ञानेश्वर्युपासक प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज आपल्या 'अमृतबोध' ग्रंथात म्हणतात, "देव सांगतात 'सगळी कर्मे संपवून या, तरच जवळ करतो!' तर संत सांगतात की, 'सगळ्या कर्मांसह या'. त्यांच्या संगतीत कर्मेच मोक्ष देणारी होतात." खरोखरीच, किती मार्मिक आणि जबरदस्त आहे हे वाक्य !! संत आणि भगवंतांमधला  अचूक फरक पू.मामा येथे सांगत आहेत. एकाच श्रीभगवंतांची दोन रूपे आहेत, पण भेद पाहा; श्रीभगवंत पित्याच्या भूमिकेत असतात, तर संत हे कायमच हजारो लाखो मातांची माया ल्येऊन साकार झालेले असतात. श्रीभगवंतांचे अपरंपार प्रेमच घनीभूत होऊन संत हे रुपडे धारण करीत असते. श्रीभगवंत स्वत:च निर्माण केलेले शास्त्र जसेच्या तसे पालन करतात; पण त्यांनी आपल्या संत रूपाला त्यात सवलत ठेवलेली आहे. संतांनी जीवांच्या कळवळ्यापोटी असंख्य वेळा शास्त्र मोडून उपकार केलेले दिसून येतात. आजही संतांच्या या अकारण-करुणेचे अक्षरश: हजारो अनुभव भक्तांना येत असतात; व पृथ्वीच्या अंतापर्यंत येत राहतीलच.
संतांना ना आपला-परका हा भेद असतो, ना लाडका-दोडका ही भावना असते. सगळे चराचर जग त्यांना स्वत:चे स्वरूपच असल्याचे सतत जाणवत असते. आपण आपल्या स्वत:शी कधीतरी वाईट वागू शकतो का? तसेच तेही कधीच कोणाशी वाईट वागू शकत नाहीत, कारण त्यांना सर्वत्र आत्मप्रचितीच असते. *पू.शिरीषदादा कवडे म्हणतात की, "सद्गुरूंच्या शब्दकोशात 'अकल्याण' हा शब्दच अस्तित्वात नाही. त्यामुळे, 'कल्याण व्हावे' असा वेगळा आशीर्वाद द्यायची त्यांना गरजच नसते. त्यांच्या हृदयात यच्चयावत् सर्वांच्या अखंड कल्याणाचीच एकमात्र भावना सदैव असते."* भगवान श्री माउलींनी देखील यावर फार सुंदर ओव्या रचलेल्या आहेत. बाराव्या अध्यायात भक्तांची लक्षणे सांगताना ते म्हणतात, श्रीमंत-गरीब हा भेद न पाहता प्राण सर्वांचे पोषण करतो, वाघ आहे का गाय आहे, हे न पाहता पाणी सर्वांची तहान भागवते, तसेच हे संतही सर्वांवर समान प्रेम करतात. समोरचा कितीही कृतघ्नपणे वागला, तरी मनात किंचितही किंतू न आणता त्याचेच हित हे क्षमाशील संत साधतात. प्राणांवर बेतले तरीही ते समोरच्याचा फायदाच करवून देतात. हा त्यांचा सहज स्वभावच असतो.
तैसी आघवियांची भूतमात्रीं ।
एकपणें जया मैत्री ।
कृपेसि धात्री।
आपण जो॥ज्ञाने.१२.१३.१४८॥

करुणाकृपेचे साक्षात् आगर असणारे हे संत, अवघ्या भूतमात्रांशी समान मैत्री ठेवून असतात. त्यांच्या अंत:करणात कधीही कोणाविषयीही परकेपणाची भावनाच नसते.
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हेही असे विलक्षण करुणामूर्तीच होते. ते जरी अखंड आपल्याच अवधूती आनंदात रममाण होऊन राहात असले, तरीही संतांचा स्थायीभाव असणारा, आपल्याकडे आलेल्या संसारश्रांत, क्लांत जीवांचा स्वाभाविक कळवळा त्यांच्या ठायी पूर्ण प्रभावाने विलसत होताच.
या संबंधी पू.काकांचे एक भक्त श्री.गुरुनाथ वेलणकर यांनी सांगितलेली हकीकत मोठी बोलकी आहे. पू.काकांच्या अलौकिक करुणेचे ते प्रसन्न व भव्य दर्शनच होय !
श्री. वेलणकर म्हणतात, "डॉ. उपळेकर काकांसारख्या महान संतांच्या सान्निध्यात यायला मिळाले, आजही मिळते, हे मी माझे भाग्य समजतो. मी नोकरीला मिलिटरीमध्ये असल्यामुळे, देव-धर्म-बुवाबाजी वगैरे गोष्टींकडे बघण्याचा माझा दृष्टिकोण वेगळाच होता, परंतु पू.काकांच्या अल्पशा सहवासात आलेले अनुभव सांगितल्याशिवाय मन स्वस्थ बसू देत नाही.
असाच एकदा दोन महिन्यांच्या सुट्टीवर फलटणला आलो असताना, प.पू.काकांचे दर्शनास गेलो. त्यांच्या बंगल्याबाहेरच्या ओट्यावर बसून बूट काढीत असताना, माझे विचारचक्र जोरात चालू झाले. "आपण सर्वजण पू.गोविंद काकांसारख्या थोर पुरुषाच्या दर्शनाला जाऊन, 'काका, माझे हे केव्हा होणार? काका, माझे ते केव्हा होणार? हा आजाराने त्रासला आहे, त्यावर काय करायचे? याला नोकरी केव्हा मिळणार? तिचे लग्न कधी होणार? आम्हांला मूल कधी होणार?' इत्यादी अनेक प्रापंचिक प्रश्नच वारंवार विचारतो. त्यावर ही महान विभूती, आपल्या सामर्थ्याने, आपले कठोर तपश्चर्येचे बळ व सद्गुरुकृपा खर्ची घालून उपाय सुचवणार. म्हणजे एका दृष्टीने आपण सर्व लोक त्यांच्या पुण्याईतला काही भाग, कारण नसताना आपल्यासाठी खर्च करावा अशीच गळ त्यांना घालत नाही का? आपला असे म्हणण्याचा अधिकार काय? आपण असे काय करतो म्हणून त्यांनी आपल्यावर फुकटच कृपा करावी? त्याची परतफेड आपण कधीतरी करतो का? त्यांचे सांगणे किंचित तरी ऐकतो का?" अशा तऱ्हेचे असंख्य विचार माझ्या मनात येत होते. म्हणून मी तत्काळ ठरविले की, आपण दर्शन घेतल्यावर पू.काकांकडे काहीही मागायचे नाही की काही बोलायचेही नाही. फक्त दर्शन घेऊन परत जायचे. असा सुविचार करूनच हरिपाठाच्या खोलीत शिरलो.
नेहमीप्रमाणे तिथल्या गादीला नमस्कार करून पू.काकांचे चरणांवर डोके ठेवून एका बाजूला बसलो. पू.काका आपल्याच आनंदाच्या अवस्थेत गोड हसत बसलेले होते. योग असा की, तेव्हा खोलीत कोणीही नव्हते. मी शांत बसलेला बघून आणि माझ्या मनातली ती विचारांची खळबळ अचूक जोखून पू.काका स्वत:हूनच मला म्हणाले, "अरे वेड्या, कोणी कोणाचे काही घेत नाही, कोणी कोणाचे काही ओरबाडत नाही. कोणी कोणासाठी काही खर्चही करत नाही. तुझ्यात आणि माझ्यात फरकच जर नाही, तर मी तुझ्यासाठी काही केले आणि तू मजकडे काही मागितलेस, असे वावगे विचार तरी तुझ्या मनात आलेच कसे?"
त्यांची ती अपरंपार करुणा आणि माउली म्हणतात तशी, *"विचरे विश्व होऊनि । विश्वामाजी ॥"* अशी उत्तुंग योगावस्था पाहून माझ्या डोळ्यांत खळकन् पाणीच आले. कसाबसा सावरून मी पू.काकांना म्हणालो, "अहो, मी एक सर्वसामान्य माणूस आहे. मी एवढ्या उच्च विचारांचा अजून झालेलो नाही की चराचर सृष्टीमध्ये स्वत:ला पाहीन. आपली स्थिती भिन्न आहे. जे आपल्याला सहज शक्य आहे, ते सर्वसाधारण बुद्धी असणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला कसे जमणार? आपली कृपा होईल, तरच या सद्विचाराचे मर्म-वर्म समजेल व तदनुरूप कर्म होईल, खरे ना?"
यावर पू.काका दिलखुलास हसले. त्यांचे ते निर्व्याज प्रेम व तुम्हां आम्हां बुडत्या जनांबद्दलचा अपार कळवळा पाहून मी एका भारावलेल्या अवस्थेतच पुन्हा त्यांच्या पायी मस्तक ठेवले व त्यांची अनुज्ञा, आशीर्वाद घेऊन बाहेर पडलो."
श्रीभगवंतांचेच अपर-स्वरूपच असणा-या संतांच्या या जगावेगळ्या दया-कृपेचे वर्णन करणे सरस्वतीमातेलाही जिथे शक्य होत नाही, तिथे मी बोबड्याने किती वाचाळी करावी? म्हणून सद्गुरु श्री माउली स्वत: करतात तेच कर्तव्य; मी, माझ्या व तुम्हां सर्वांच्याही वतीने प्रेमादरपूर्वक करतो,
तैसें श्रीगुरूंचें महिमान।
आकळितें कें असे साधन ।
हें जाणोनियां नमन ।
निवांत केलें ॥ज्ञाने.१०.०.१३॥

करुणामूर्ती दयाघन सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या श्रीचरणीं सादर दंडवत !!!
( छायाचित्र संदर्भ : प.पू.श्री. काका अनेकवेळा, काहीतरी दूरचे नीट ऐकू यावे म्हणून जसा आपण हात लावतो, तसे उजवा हात कानाशी घेऊन आपल्याच तंद्रीमध्ये आनंदाने स्मितहास्य करीत बसलेले असत. याही छायाचित्रात त्यांचे ते अज्ञात विश्वातील अगम्य शब्द म्हणा किंवा श्रीभगवंतांची वाणी म्हणा,  कान देऊन ऐकणे चालू आहे आणि त्यामुळेच एक अलौकिक, मधुर व त्रिभुवनमोहक हास्य त्यांच्या मुखावर उमटलेले स्पष्ट दिसत आहे. दृष्टी अगोचरी लागलेली आहे.)
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

0 comments:

Post a Comment