23 Jan 2017

दिनरजनी हाचि धंदा गोविंदाचे पवाडे - लेखांक - २

लेखांक - २

नमस्कार मंडळी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या १२९ व्या जन्मोत्सवास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक लीलांचा आपण सप्रेम आस्वाद घेत आहोत. गेल्या वर्षी पुण्यतिथी महोत्सवात आपण रोज एक अध्याय याप्रमाणे प.पू.काकांचे संपूर्ण चरित्र पाहिलेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा न लिहिता, त्यांच्या जीवनातील काही अद्भुत अनुभवच या सप्ताहात आपण दररोज पाहणार आहोत. सर्वांचे या 'गोविंदगुण-गायन' सेवेसाठी सहर्ष स्वागत.
( अधिक माहितीसाठी : दररोज क्रमाने गेल्या वर्षीच्या एका लेखाची लिंक येथे दिली जाईल, त्यावर जाऊन चरित्राचेही वाचन आपण सहज करू शकता. ज्यांना गेल्यावर्षी पोस्ट केलेले ते संक्षिप्त चरित्र डाऊनलोड करून संग्रही ठेवायचे आहे, त्यांनी कृपया लिंकवरून पीडीएफ डाऊनलोड करावी, ही विनंती.
सद्गुरुपुराण : अध्याय दुसरा -
http://rohanupalekar.blogspot.in/2016/09/blog-post_17.html
संपूर्ण चरित्र पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B-4fTpvl_d6seWl1eGJwOEs3Ylk/view?usp=drivesdk )
           ***********
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हे ब्रह्मानंदाच्या अगम्य अवस्थेतच अखंड राहात असत. यालाच उपनिषदांत 'तुरीयातीतावधूत अवस्था' असे म्हटले जाते. राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेचे व्यवच्छेदक लक्षण असणा-या या अलौकिक व अद्भुत स्थितीत सदैव राहणा-या, पू.काकांसारख्या महात्म्यांचे वागणे-बोलणे तुम्हां-आम्हां सर्वसामान्यांना पटकन् कळत नाही, उमजत नाही. श्रीसंत तुकाराम महाराज यांचे वर्णन करताना म्हणतात, "जगात पिशाच्च अंतरी शहाणा । सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो ॥" आतून पूर्ण ज्ञानी असणारा हा महात्मा बाहेर मात्र वेड्यासारखाच वागताना दिसतो. वस्तुत: त्यांचा तो वरकरणी भासणारा वेडाचारही शास्त्रकसोटीवर घासून पाहिला तर चोखच ठरतो. खरेतर आपली तोकडी मनुष्यबुद्धी या ब्रह्मस्वरूप लीलावतारांचे जगावेगळे वर्तन कधीही जाणूच शकत नाही. म्हणूनच सद्गुरु श्री माउली म्हणतात,
वाचस्पतीचेनि पाडें ।
सर्वज्ञता तरी जोडे ।
परि वेडिवेमाजीं दडे ।
महिमेभेणे ॥ज्ञाने.१३.७.१९१॥
हे महात्मे ज्ञानाच्या बाबतीत साक्षात् ब्रह्मदेवांशी तुलना करण्याच्या योग्यतेचे असतात, पण आपले माहात्म्य वाढून त्याचा उपसर्ग होऊ नये म्हणून वेड्याचे सोंग घेऊन वावरतात.
प.पू.काका याच अवस्थेत सतत राहात असल्याने त्यांचे बोलणे अतिशय गूढ असे. त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, हे कालांतरानेच समजून येत असे.
पू.काकांच्या नात, कै.सौ.विनताताई गुळाणीकर यांनी पू.काकांच्या काही विलक्षण हकीकती सांगितलेल्या आहेत. त्यातून पू.काकांच्या त्या लोकविलक्षण अवस्थेचे नितांतसुंदर व लोभस दर्शन आपल्याला होते.
कै.विनताताई सांगतात," माझी आई कै.गोदुताई ही पू. गोविंदकाकांची पुतणी. ती आम्हांस पू.काकांच्या खूप आठवणी सांगायची. माझे वडील श्री.अण्णासाहेब खासनीस हे पू. गोविंदकाकांचे परमभक्त. आमचा वाडा पुण्याला आंबेकरांच्या बोळात होता. तेथे पू.काका पुष्कळ वेळा यायचे. बरोबर ती.सौ.काकी, दोन तीन लहान मुले असायची. त्यांच्यासोबत बॅरिस्टर रावसाहेब मेहेंदळे, पू.बागोबा कुकडे, दामुअण्णा देशपांडे असे बरेच भक्त असायचे. कितीही लोक असले तरी माझी आई सगळ्यांचे करायची व पू.काकांच्या कृपेने स्वयंपाक कधीही कमी पडायचा नाही.
माझी आई सांगायची की, घरांत जे काही भविष्यात होणार असेल ते पू.काका अगोदरच सांगायचे. माझी आजी, श्री.मनोहरपंत उपळेकरांची पत्नी ही निवर्तण्याच्या आधीच पू काकांनी 'ही जाणार आहे' म्हणून सांगितले होते.
माझी बहीण कै.सौ.मालती धोकटे फलटणला येणार होती. तिने येण्यापूर्वी पत्र किंवा निरोप काहीच पाठविला नव्हता. त्या दिवशी सकाळपासूनच पू. काका घरातल्या माणसांना सांगत होते, आज सौ.माली येणार. आणि खरोखर ती सायंकाळी आलेली पाहून आम्हां सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.
साधारणतः १९५१-५२ सालातली गोष्ट आहे. पू.काका आमच्याकडे आले होते. ती.सौ.काकू त्यावेळी आमच्याकडेच होती. माझ्या चुलतबहिणीची तब्येत खूप चांगली होती. पण लग्नानंतर पाच वर्षे झाली तरी मूल झाले नव्हते. आमच्या आईने पू.काकांना विचारले, "काका, सौ.लीलीला मूल कधी होईल ?" पू.काका उन्मनी अवस्थेत होते. वर पाहात म्हणाले, "बुंदीचे झारे करावयास टाकलेत. लग्न झालं की मूल होईल. अजून लग्न व्हायचेय !" आई परत म्हणाली, "काका, अहो सौ.लीलीचे लग्न झाले आहे. तिला मूल कधी होईल ?" त्यावर ते काहीच बोलले नाहीत. जरा वेळाने पू.काका नेहमीच्या अवस्थेत आल्यावर म्हणाले, "भंग्या मारुतीला नैवेद्य दाखव." या वाक्याचा संदर्भ आम्हां कोणालाही त्यावेळी लागला नाही.
पू. काकांच्या पहिल्या वाक्याचा अर्थही त्यावेळेस कोणालाच कळला नाही. परंतु चार पाच महिन्यातच एकाएकी माझी बहीण वारली व तिच्या नवऱ्याचे दुसरे लग्न होऊन मग पुढे त्याला मुले झाली.म्हणजे, 'बुंदीचे झारे करायला टाकले आहेत, लग्न झाले की मूल होईल', या वाक्याचा हा अर्थ होता."
प.पू.श्री.काका नेहमीच असे गूढ बोलत असत. त्यांची ती विशिष्ट शैली नवीन माणसांना खूपच वेगळी वाटे, पण त्याचे पू.काकांना काहीच सोयर-सुतक नसे. सर्वकाळी, सर्व अवस्थांमध्ये ते आपल्याच आनंदात रममाण झालेले असत. श्री माउली म्हणतात, "भोगितां उन्मनी । आरायेना ॥" तसे पू.काका आपल्या अवधूती आनंदातून कोणत्याही कारणासाठी बाहेर येत नसत. त्यांची ती दिव्य सहज-समाधी सद्गुरुकृपेने शेवटपर्यंत अविच्छिन्नच होती ! अशा परिपूर्ण परब्रह्माचे दर्शन होणे हेही जन्मजन्मांतरीच्या महद्भाग्याचे फलितच नव्हे काय ?
( छायाचित्र संदर्भ: आपल्या नातवंडांच्या मुंजीच्या प्रसंगी, श्री ज्ञानेश्वर मंदिराच्या समोर बाकड्यावर बसून काढलेले ती.सौ.रुक्मिणीदेवी व पू.काकांचे दुर्मिळ छायाचित्र. यात पू.काकांच्या प्रसन्न चेह-यावर प्रकटलेले अवधूती मस्तीचे ब्रह्मानंद-हास्य स्पष्ट दिसून येते.)
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

0 comments:

Post a Comment