24 Jan 2017

दिनरजनी हाचि धंदा गोविंदाचे पवाडे - लेखांक - ३

नमस्कार मंडळी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या १२९ व्या जन्मोत्सवास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक लीलांचा आपण सप्रेम आस्वाद घेत आहोत. गेल्या वर्षी पुण्यतिथी महोत्सवात आपण रोज एक अध्याय याप्रमाणे प.पू.काकांचे संपूर्ण चरित्र थोडक्यात पाहिलेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा न लिहिता, त्यांच्या जीवनातील काही अद्भुत अनुभवच या सप्ताहात आपण दररोज पाहणार आहोत. सर्वांचे या 'गोविंदगुण-गायन' सेवेसाठी सहर्ष स्वागत.
( अधिक माहितीसाठी : दररोज क्रमाने गेल्या वर्षीच्या एका लेखाची लिंक येथे दिली जाईल, त्यावर जाऊन चरित्राचेही वाचन आपण सहज करू शकता. ज्यांना गेल्यावर्षी पोस्ट केलेले ते संक्षिप्त चरित्र डाऊनलोड करून संग्रही ठेवायचे आहे, त्यांनी कृपया लिंकवरून पीडीएफ डाऊनलोड करावी, ही विनंती.
सद्गुरुपुराण : अध्याय-३ -
http://rohanupalekar.blogspot.in/2016/09/blog-post_23.html
संपूर्ण चरित्र पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B-4fTpvl_d6seWl1eGJwOEs3Ylk/view?usp=drivesdk )
           ***********
३ : अपार महिमा नारायण
परमपावन श्रीगुरुचरित्राच्या शेहेचाळिसाव्या अध्यायात भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची एक अलौकिक लीला विशद करून सांगितलेली आहे. दिवाळीसाठी घरी बोलविणा-या सातही शिष्यांना श्री स्वामी महाराज येऊ म्हणून सांगतात. गावातील लोक दिवाळीला येथेच राहावे म्हणून विनवितात. सर्वच भक्तांचे अंत:करण राखण्यासाठी, श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आठ रूपे धारण करून आठही ठिकाणी दिवाळी साजरी करतात.
श्रीगुरुचरित्रकार म्हणतात,
आठरूप झाले आपण ।
अपार महिमा नारायण ।
सात ठायीही गेले आपण ।
गाणगापुरीं होतेचि ॥४६.२६॥

अशाच प्रकारच्या अद्भुत लीला, भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंचेच अंश असणा-या, पू.गोविंदकाका उपळेकर महाराजांसारख्या थोर संतांच्या चरित्रातही घडलेल्या पाहायला मिळतात. त्यांचे हे अतर्क्य सामर्थ्य म्हणजे केवळ सिद्धी नव्हेत. हा तर त्यांच्या महात्मेपणाचा, भगवत्स्वरूप असण्याचा दृश्य पुरावाच आहे !
प.पू.श्री.काकांच्या बाबतीतले असे दोन प्रसंग आज आपण पाहणार आहोत. पहिला अनुभव खुद्द पू.काकांचे चिरंजीव कै.ती.प्रभाकरपंत उपळेकरांचा  आहे. तर दुसरा त्यावेळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीनेच स्वत: मला सांगितलेला आहे.
कै.प्रभाकरपंत सांगतात, "माझी बदली इ.स. १९६१ साली फलटणला झाली होती. मी बहुतेक वेळ प.पू. काकांच्या सहवासात घालविण्याचा प्रयत्न करीत असे. साधारणतः १९६१ सालचे मे महिन्याचे ते दिवस असावेत. मी प.पू.काकांच्या खोलीतच रात्री झोपत असे. त्या दिवशी रात्री हरिपाठ झाल्यानंतर, प.पू.काकांनी नेहमीप्रमाणे लांब बाह्यांचा स्वेटर घातला. डोक्याला उपरणे गुंडाळले. डोक्याखाली काही पुस्तकांची उशी केली आणि रात्री साधारणतः बारा वाजता ते झोपले असावेत.
पहाटे चारच्या सुमारास मला जाग आली. त्यावेळी मी प.पू काकांना गादीवर शांतपणे झोपलेले पाहिले. मी तेथून उठून लघुशंकेसाठी घराबाहेर जाऊन डावीकडे वळलो, तर प.पू.काका मला समोरून येताना दिसले. हातात काठी, डोक्याला करड्या रंगाची टोपी, अंगात कोट, पायात सॉक्स व कॅनव्हासचे बूट होते. प.पू.काका त्यांच्या या बाहेर जाण्याच्या पोशाखात शेजारच्या कट्टयावर 'अगं आई' असे त्यांच्या नेहमीच्या सवयीने म्हणत बसले.
त्यावेळी त्यांचेकडे नुसते पाहिले आणि मी लघुशंकेसाठी निघून गेलो. काहीतरी वेगळे घडते आहे हे दोन क्षण माझ्या अजिबात लक्षात आले नाही. अवघ्या काही सेकंदांपूर्वी तर मी त्यांना गादीवर झोपलेले पाहिलेे होते. शिवाय रात्रभर मी त्यांच्या शेजारीच झोपलेलो होतो. ते बाहेर कुठे गेल्याचे मला कळलेही नव्हते. पण त्यावेळी माझ्या डोक्यात हा काहीच प्रकाश पडला नाही. मी लघुशंका करून परत आलो, तर प.पू.काका त्या कट्ट्यावर दिसले नाहीत. दारातून आत येऊन खोलीत बघतो, तर तेथे गादीवर प.पू.काका पहिल्याच पद्धतीने झोपलेले दिसले.
प.पू.काका बाहेर कुठे व कधी गेले? असे ते रात्री कोणत्या कार्यासाठी गेले असावेत? परत केव्हा आले? कपडे कधी बदलले? एकाच वेळी ते खोलीतही झोपलेले आणि बाहेरही कुठेतरी गेलेले; हे कसे काय घडले? इत्यादी प्रश्नांची उत्तरे मला आजवर उमगलेली नाहीत. पण राहून राहून या विलक्षण अनुभवाचे आश्चर्य मात्र वाटते. ही आठवण अद्यापही मी विसरलेलो नाही, अजूनही जशीच्या तशी माझ्या स्मरणात आहे. खरोखरीच, आमचे पितृचरण अलौकिक अधिकाराचे थोर महायोगी होते, यात तीळमात्र शंका नाही !"
पू.काकांचे एक निस्सीम भक्त कै.श्री.हिरामण तेली वकील यांनी स्वत: अनुभवलेला एक प्रसंग मला लहानपणी सांगितला होता. ते एकदा पू.काकांबरोबर सकाळी फलटणातील शुक्रवार पेठेतील एकांच्या घरी गेले होते. तेथे त्यांनी चहा घेतला व बोलणे वगैरे झाल्यावर तेथून परत घरी आले. संध्याकाळी ते पू.काकांकडे गेले होते, तेव्हा दुसरे एक गृहस्थ त्यांना म्हणाले की, "आज सकाळी ९ वाजता पू.काका आमच्या घरी येऊन गेले." तेली वकील चक्रावलेच. ते म्हणाले, "अहो, असे काय करताय? सकाळी ९ वाजता तर मी स्वत: पू.काकांच्या बरोबर अमक्यांच्या घरी शुक्रवार पेठेत होतो. त्याचवेळी ते तुमच्या इथेही कसे काय आलेले होते?" पू.काकांची ही अतर्क्य लीला पाहून तेली वकील नतमस्तकच झाले.
श्रीगुरुचरित्रकार म्हणतात ते खरेच अाहे; *'अपार महिमा नारायण ।'* हेच याचे उत्तर आहे. चराचरावर सत्ता असणे व हवे तेव्हा हवे तसे वागणे; हे केवळ श्रीभगवंतांना व त्यांचेच अंश असणा-या व त्यांच्याशी सदैव एकरूप होऊनच वावरणा-या प.पू.काकांसारख्या संतांनाच शक्य आहे ! आपली मती व गती त्यांच्या महन्मंगल श्रीचरणांपर्यंतच सीमित आहे. देवदेवताही जिच्या प्राप्तीसाठी आसुसलेले असतात, ती परमभाग्याने मिळणारी यांची दिव्य श्रीचरणधुली प्रेमादराने मस्तकी धारण करण्यात जो अपूर्व-मनोहर आनंद आहे, त्याची तुलना आणखी कशाशी बरे करता येईल?
( छायाचित्र संदर्भ : प.पू.श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या दोन आत्ममग्न भावमुद्रा )
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

0 comments:

Post a Comment