25 Oct 2019

कलौ श्रीपादवल्लभ: ।

आज श्रीगुरुद्वादशी, कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार, भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा निजानंदगमन दिन !!
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप, अतर्क्य लीलाविहारी, अपार करुणानिधान आणि विलक्षण असे नित्यअवतार आहेत. प.प.श्री.टेंब्ये स्वामी महाराजांनी एका ठिकाणी त्यांना साक्षात् भगवान श्रीकृष्णांचेच अवतार देखील म्हटले आहे. त्यांच्या लीला वाचल्या की ते साक्षात् परब्रह्मच होते हे मनापासून पटते.
आंध्रप्रदेशातील पीठापूर या गांवी त्यांनी श्रीगणेशचतुर्थी दिनी सूर्योदयाला श्री.अपळराज व सौ.सुमतीमातेच्या पोटी जन्म घेतला आणि कृष्णा तीरावरील कुरवपूर या तीर्थक्षेत्री वास्तव्य करून अनेक लीला केल्या.
आश्विन कृष्ण द्वादशीला श्रीदत्तसंप्रदायात मोठ्या प्रेमादराने 'श्रीगुरुद्वादशी' म्हणतात. कारण ते याच तिथीला कृष्णा नदीमध्ये अदृश्य झाले. ते नित्य अवतार असल्याने त्यांनी आपला दिव्य देह कृष्णामाईत केवळ लौकिकदृष्ट्या अदृश्य केलेला आहे, त्यांनी देहत्याग केलेला नाही, हे आपण कायम लक्षात ठेवायला हवे. ते आजही त्याच पावन देहातून कार्य करीत आहेत व पुढेही करीत राहणार आहेत.
'श्रीगुरुद्वादशी' ही भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची निजानंदगमन तिथी, 'श्रीगुरुप्रतिपदा' ही भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांची निजानंदगमन तिथी व शनिवार हा भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मवार ; म्हणूनच श्रीदत्तसंप्रदायातील स्थानांवर श्रीगुरुद्वादशी, श्रीगुरुप्रतिपदा व शनिवारची वारी करण्याची पद्धत आहे.
भगवान श्री श्रीपादांचा देह अपार्थिव, दिव्य आहे. अशा देहाला कधीच जरा-व्याधी नसतात. त्यांचे स्वरूप सर्वकाळ सोळा वर्षांच्या कुमाराएवढेच होते. ते अत्यंत देखणे व सुकुमार होते. व्याघ्रांबर परिधान केलेली त्यांची दिव्य छबी पाहताच एका अनामिक वेधाने लोक त्यांच्याकडे खेचले जात असत. ते ब्रह्मचारी होते, त्यामुळे ते कधीच भगवी वस्त्रे घालत नसत. पण नंतरच्या चित्रकारांनी त्यांना भगव्या वस्त्रातच कायम दाखवलेले आहे. अनेक महात्म्यांना त्यांचे दर्शन एक मुख व षड्भुज अशा श्रीदत्तरूपात झालेले असल्याने त्यांचे तसेही फोटो प्रचलित आहेत. या पोस्ट सोबत दिलेला फोटो प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांना प.प.सद्गुरु श्री.टेंब्ये स्वामी महाराजांनी स्वत:च्या हृदयात करविलेल्या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या दिव्य दर्शनानुसार काढलेला आहे.
पीठापूरहून निघून भगवान श्री श्रीपाद स्वामी महाराज बदरीनाथ आदि हिमालयातील तपस्थानांवर राहून मग पश्चिमसागराच्या तीरावरील गोकर्ण महाबळेश्वर येथे तीन वर्षे गुप्तपणे राहिले. त्यानंतर काही महिने तिरूपती बालाजी येथे राहून ते कुरवपूरला आले. त्यांचे काही काळासाठी महाराष्ट्रामध्येही वास्तव्य झालेले आहे. त्यांमध्ये विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव (जामोद) येथे ते राहिले होते. आज प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या 'श्रीपाद सेवा मंडळ' या संस्थेने तेथे सुंदर मंदिर बांधलेले असून भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची बालरूपातील अप्रतिम प्रासादिक मूर्ती स्थापन केलेली आहे. आजही अनेक भक्तांना तेथे भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची प्रत्यक्ष अनुभूती वारंवार येत असते.
( http://rohanupalekar.blogspot.in )
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथेही वास्तव्य झाले होते. त्यांनी आपले शिष्य श्री रामचंद्र योगी यांना तेथेच तपश्चर्या करण्याची आज्ञा केली होती. आपल्या पुढील श्री नृसिंह सरस्वती अवतारामध्ये त्यांनी वाडीला येऊन श्री रामचंद्र योगींना दर्शन देऊन कृतकृत्य केले व स्वहस्ते त्यांना समाधी दिली. श्री रामचंद्र योगींची समाधी श्रीनृसिंहवाडीला घाट चढून आल्यावर पिंपळाखाली आजही पाहायला मिळते.
भगवान श्री श्रीपादांना, माठ/राजगिरा पालेभाजी, वांग्याची भाजी आणि साजुक तुपातला शिरा अत्यंत आवडत असे. याबद्दल एक गोड हकिकत त्यांच्या चरित्रात आलेली आहे. त्यांच्या मातु:श्री सुमतीमाता त्यांना भेटायला कुरवपूरला येत होत्या. त्यांनी मोठ्या प्रेमाने बनवून घेतलेला शिरा गार होऊ नये म्हणून, भगवान श्रीपादांनी पीठापूर ते कुरवपूर हा चार दिवसांचा त्यांचा प्रवास केवळ काही मिनिटातच घडवून त्यांना कुरवपूरला आणले व प्रेमभराने आपल्या मातु:श्रींनी केलेल्या त्या गरमागरम शिऱ्याचा आस्वाद घेतला.
अत्यंत करुणामय असे भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे स्वरूप आहे. त्यांचे जो प्रेमाने स्मरण करेल त्याच्यावर ते कृपा करतातच, असे अनेक महात्म्यांनी स्वानुभवपूर्वक सांगून करून ठेवलेले आहे. त्यांना कळवळून हाक मारणाऱ्या भक्ताच्या हाकेला ओ देऊन त्याचे अभीष्ट करणे, त्याच्यावर कृपा करणे, त्याचा प्रेमाने सांभाळ करणे हे भगवान श्री श्रीपादांचे आवडते कार्यच आहे. ते अत्यंत भक्तवत्सल आहेत, भक्ताभिमानी देखील आहेत !
"दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा" हा महामंत्र त्यांनीच प्रकट केलेला असून श्रीदत्तसंप्रदायामध्ये मोठ्या श्रद्धेने जपला जातो. हा महामंत्र नंतर प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी सर्वदूर प्रचलित केला. पण याचा प्रथम उपदेश भगवान श्री श्रीपादांनीच एकेदिवशी पंचदेव पहाडी परिसरातील आपल्या दरबारात कुरवपुरातील भक्तांना केला होता. म्हणून हा महामंत्र स्वत: भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनीच निर्माण केल्याचे मानले जाते.
द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आजच्याच तिथीला, भक्तांवर निरंतर कृपा करण्याच्या उद्देशाने, श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला आपल्या "मनोहर पादुका" स्थापन करून गाणगापुरी गमन केले होते. नृसिंहवाडीत औदुंबरातळी बारा वर्षे वास्तव्य करून भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी वाडीला आपल्या राजधानीचा दर्जा प्रदान केला. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज श्रीनृसिंहवाडीला श्रीदत्तप्रभूंचा "दिवाने खास" म्हणत असत. त्या राजधानीचे अधिष्ठान म्हणून भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजच श्रीमनोहर पादुकांच्या रूपाने आजही विराजमान आहेत ! म्हणून हा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर वाडीमध्येही साजरा होतो. सोबतच्या छायाचित्रामध्ये वाडीच्या मनोहर पादुकांच्या चंदनलेपनाचे सुंदर दर्शनही आहे.
स्मर्तृगामी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं आजच्या श्रीगुरुद्वादशीच्या पावन पर्वावर सादर दंडवत घालून, त्यांची अलौकिक करुणाकृपा आपल्या सर्वांवर निरंतर राहावी यासाठी आपण कळकळीची प्रार्थना करू या. "आमच्या हृदयात निरंतर निवास करून तेथेही आपल्या पावन वास्तव्याने 'सुखाची राजधानी' निर्माण करावी आणि आपल्याच सादर स्मरणात आम्हांला सदैव रममाण करून ठेवावे", अशी प्रेमादरपूर्वक प्रार्थना त्यांच्या श्रीचरणीं करून, त्यांच्या स्मरणानंदात श्रीगुरुद्वादशी साजरी करू या  !!
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

21 Oct 2019

प.प.श्रीमत् नृसिंह सरस्वती (दीक्षित) स्वामी महाराज

ज्यांचे प्रेमाने नुसते नाव जरी घेतले तरी आपल्याही हृदयात श्रीगुरुभक्तीचा आविष्कार होतो आणि आपलेही नेत्र प्रेमादराने भरून येतात, त्या परमगुरुभक्त, साक्षात् गुरुभक्तीची प्रकट मूर्तीच असणाऱ्या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् नृसिंह सरस्वती (दीक्षित) स्वामी महाराजांची आज पुण्यतिथी !
भारतातील अत्यंत थोर गुरुशिष्यांच्या श्रेयनामावलीमध्ये ज्यांच्या नावाचा समावेश मोठ्या आदराने केला जातो, त्या प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज व प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराज या गुरुशिष्यांचे अलौकिक प्रेमनाते अत्यंत हृद्य व भावपूर्ण आहे. अतीव मनोरम असे यांचे प्रसंग वाचताना आपण खरोखरीच मोहरून जातो. शिष्य व्हावा ऐसा गुंडा । ज्याचा तिहीं लोकी झेंडा ॥ असे म्हणून श्री तुकोबाराय शिष्याचे यथार्थ माहात्म्यच प्रतिपादन करतात. प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराज अगदी असेच स्वनामधन्य शिष्योत्तम होते ; ज्यांच्याबद्दल परमगुरु श्रीमत् टेंब्येस्वामी महाराजांनाही अत्यंत कौतुक होते. खरोखरीच, गुरूंनाही अभिमान वाटावा असे भाग्य फारच थोड्या शिष्यांच्या वाट्याला येत असते !
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज आचार्योपासनेच्या विवरणात म्हणतात की, "गुरुसंप्रदायधर्मच हाच ज्याचा श्वास असतो, गुरुसेवा हाच ज्याचा वर्णाश्रम व विहित कर्तव्य, नित्यकर्म असते, त्या गुरुभक्ताच्या घरी ज्ञानच मोठ्या आदराने पाईकी करीत असते. तो शिष्य गुरुभक्तीला गवसणी घालून राहिलेला असतो. त्याच्या रूपाने गुरुभक्तीच साकारलेली असते !" प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराज अशा परमगुरुभक्तांचे शिरोमणीच होते.
कधीही पायात पादुका न वापरणाऱ्या प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी, आपल्या या शिष्योत्तमासाठीच एकवार केवळ पादुकांना एकदा स्पर्श करून त्यांना प्रसाद म्हणून त्या पादुका दिलेल्या होत्या. आजही त्या श्रीपादुका औरवाडच्या 'श्री वासुदेवानंद सरस्वती पीठा'त प्रेमादराने पूजिल्या जातात. आपल्या श्रीगुरुमहाराजांच्या शेवटच्या आजारपणात प.प.दीक्षित स्वामी महाराज या प्रसाद पादुकांवर विविध काढे व औषधी अर्पण करीत असत. शेवटी गरुडेश्वरहून श्रीगुरुमहाराजांनी निरोप पाठवून "आपली सेवा पोचली, अाता थांबवावी", असे सांगितले आणि नंतरच पूर्वनियोजितपणे त्यांनी देहत्याग केला. त्या पादुकांच्या रूपाने प्रत्यक्ष आपले श्रीगुरुदेवच आहेत, ही प.प.श्री दीक्षित स्वामींची धारणा किती यथार्थ होती पाहा !
श्रीगुरुनिष्ठेचा उत्तुंग आदर्श होते प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराज. त्यांच्या चरित्रातील काही अलौकिक व अद्भुत प्रसंगांची माहिती खालील लिंकवरील लेखात थोडक्यात दिलेली आहे. आजच्या पावन दिनी त्याद्वारे आपणही प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं मनोभावे दंडवत घालू या आणि भाग्याचेही भाग्य असणाऱ्या श्रीगुरुभक्तीच्या कृपालेश-प्राप्तीसाठी त्यांना कळकळीने विनवू या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
जाला गवसणी गुरुभक्तीसी

https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_22.html?m=1

8 Oct 2019

सद्गुरु श्रीसंत साईबाबा महाराज पुण्यतिथी

आज विजयादशमी,
सद्गुरु श्रीसंत साईबाबा महाराजांची आज १०१ वी पुण्यतिथी आहे. विजयादशमी, दि.१५ ऑक्टोबर १९१८ रोजी नेमक्या विजयमुहूर्तावर त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता.
राजाधिराज सद्गुरु श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील हे महान अवलिया विभूतिमत्व त्याकाळात व आजच्याही काळात लोकांच्या जाणिवेत मावलेले नाही, कधीच मावणारही नाही. त्यामुळेच त्यांच्याविषयी, त्यांच्या धर्माविषयी निरर्थक वाद घालण्यातच काहींना मोठा पुरुषार्थ केल्यासारखे वाटते. श्रीभगवंतांच्या मायेने पक्के भुलवलेले असले हे अज्ञानी जन त्यांच्या कुकर्मांच्या योगाने असे व्यर्थ बरळत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आपण मात्र चुकूनही महात्म्यांच्या निंदेचे, अधिक्षेपाचे महापातक घेऊ नये. आपण प्रेमाने व मनापासून श्रीसंत साईबाबांच्या श्रीचरणीं अभिवादन करून धन्य होऊ या !
श्रीसंत साईबाबांच्या शताब्दी पुण्यतिथी दिनी लिहिलेला लेख खालील लिंकवर वाचता येईल.
श्रीसंत साईबाबा महाराज
https://rohanupalekar.blogspot.com/2018/10/blog-post_76.html?m=1

1 Oct 2019

'वेडी केरसुणी' तथा श्रीसंत गजानन महाराज गुप्ते, नाशिक


आज आश्विन शुद्ध तृतीया, नाथ संप्रदायातील एक महान विभूतिमत्व, श्रीसंत गजानन महाराज गुप्ते यांची आज पुण्यतिथी.
विदर्भातील यवतमाळ येथे श्रीगोकुळाष्टमी, दि.१५ ऑगस्ट १८९२ रोजी जन्माला आलेले श्री.गजानन मुरलीधर गुप्ते तथा सद्गुरु श्री.गजानन महाराज गुप्ते तथा श्री गुप्तनाथ हे खरोखर अत्यंत अद्भुत असे जन्मसिद्ध महापुरुष होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रचंड देवी आल्याचे निमित्त होऊन लहानगा गजानन पांगळा झाला. बालवयातच आई-वडिलांचा वियोग त्याला सहन करावा लागला. त्याच्या बालविधवा मावशीने त्याचा सांभाळ केला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील रानअंत्री या क्षेत्री राहणाऱ्या श्री नारायण सरस्वती महाराजांकडे हे गुप्ते कुटुंब एकदा दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी गजानन दहा-बारा वर्षांचा होता. त्याच्या मावशीने डोळ्यांत पाणी आणून श्री.नारायण महाराजांसमोर पांगळ्या गजाननाची व्यथा सांगून त्याच्यावर कृपा करावी म्हणून प्रार्थना केली. त्याला पाहताच श्री.नारायण महाराज म्हणाले, "हा पूर्वजन्मीचा नाथपंथी योगी आहे. हा काही वर्षांनी मोठा साधू म्हणून खूप प्रसिद्धी पावेल, अध्यात्ममार्गातील पुष्कळ साधकांना मार्गदर्शन करेल. याच्या डोळ्यांतील बाहुल्यांवरून मी सांगतो की हा पूर्वजन्मी नाथयोगी होता. तुम्ही याची मुळीच काळजी करू नका !" श्री.नारायण महाराजांचे हे शब्द पुढे खरोखर सत्यात उतरलेले पाहायला मिळतात.
त्याच रात्री गजाननासह सर्व कुटुंबीय महाराजांच्या आश्रमातच राहिले. गजाननाला झोप येत नव्हती, म्हणून पहाटेच्या सुमारास आपल्या अंथरूणावर अर्धवट झोपेत उठून बसलेल्या गजाननाला एक अद्भुत दृश्य दिसले. त्याला समोर दिसले की, एक समाधी आहे. ती दुभंगून त्यातून एक दिव्य नाथसिद्ध प्रकट झाले. त्याचवेळी 'आदेश ॐ हंस: सोऽहं ब्रह्म' असा प्रचंड ध्वनी ऐकू आला. त्या सिद्धांच्या मुखातून 'हंस: सोऽहं' असे शब्द सतत निघत होते. तेच शब्द आपणही उच्चारत आहोत, असे गजाननाला स्पष्ट जाणवले. समोरच्या नाथसिद्धांनी सौम्य रूप धारण करून 'मच्छिंद्र आदेश' अशी गर्जना केली व हे सर्व दृश्य एका क्षणात हरपले. भान हरपलेला गजानन जेव्हा जागृतीत आला तेव्हा नुकताच सूर्योदय झालेला होता. त्याचे सर्व अंग घामाने डबडबलेले होते, कपडे भिजून चिंब झालेले होते. त्याच्या अंगातून सुगंध येत होता.
बरोबरच्या मंडळींनी त्याला श्री.नारायण महाराजांकडे नेले. त्यासरशी महाराज म्हणाले, "एवढ्या लहान वयात तुला श्रीमत्स्येंद्रनाथांचे दर्शन लाभले आहे. तुला जो मंत्र मिळाला तो मला म्हणून दाखवतोस का ?" त्या पूर्ण मंत्रातील केवळ 'सोऽहं' एवढेच लक्षात राहिलेले शब्द गजाननाने म्हणून दाखवले. प्रसन्न झालेल्या सद्गुरु श्री.नारायण महाराजांनी प्रेमाने गजाननाला अाशीर्वाद दिला, "जगात तुझी कीर्ती वाढेल. तू सदैव आत्मानंदात निमग्न राहशील. तुझ्या श्वासात तुला निरंतर माझे दर्शन होईल !" आणि अंगभर कुरवाळून वात्सल्यप्रेमाने निरोप दिला.
पुढे श्री.गजानन महाराज आपल्या वडीलबंधूंबरोबर, श्री.नारायणराव तथा कवी बी यांच्याबरोबर राहिले. अकोल्यात त्यांचे चौथीपर्यंत शिक्षण झाले. त्यांनी नंतर शिक्षण सोडून दिले. अकोल्यातल्या पडक्या किल्ल्यात जाऊन ते ध्यानाभ्यास करीत. ते सदैव सोऽहं भावातच वावरत असत. पुढे तरुणपणी सद्गुरुकृपेने त्यांना साधनेची पूर्णता अनुभवाला आली. त्यानंतर ते सदैव त्या आत्मानुसंधानातच वावरत असत.
तत्कालीन अनेक थोर साधुसंतांशी त्यांचा संबंध आला. शेगावचे श्री गजानन महाराज, शिर्डीचे श्री साईबाबा, प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज, कल्याणचे श्री राममारुती महाराज, वाशीम येथील श्री नंगे महाराज व श्री हरिरहरस्वामी, यवतमाळचे खटिया महाराज अशा अनेक विभूतींशी त्यांचे हृद्य संबंध होते. उत्तरायुष्यात ते या साधुसंतांच्या भेटींच्या कथा नेहमी सांगत असत.
आपल्या शिष्यांच्या घरी धुळे, मालेगांव, येवला, नाशिक, मुंबई इत्यादी ठिकाणी त्यांचे वास्तव्य होई. त्यांनी कधीच प्रवचन वगैरे केले नाही. साधकाचा भाव व पूर्वऋणानुबंध जाणून ते अनुग्रह देत असत. त्यांच्या कृपेचे अत्यंत अलौकिक अनुभव साधकांना येत असत. त्यांच्या ठायी नाथ संप्रदायाचे शांभव कृपावैभव पूर्ण बहरलेले होते. आयुष्याची शेवटची पंचवीस वर्षे त्यांचे वास्तव्य नाशिक येथेच होते. आजच्या तिथीला, वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी, दि.२८ सप्टेंबर १९४६ रोजी रात्री ११ वाजता त्यांनी नश्वर देहाचा त्याग केला. नाशिक येथे गोदावरीच्या काठावर त्यांचे समाधी मंदिर आहे. आज त्यांची ७३ वी पुण्यतिथी आहे.
श्री.गजानन महाराज नाशकात 'बायकांचा राम' म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवळाजवळच्या बैठ्या घरातील खोलीत राहात. ते दिवसातून दोनदा चहा घेत व दोन-तीन दिवसांतून एकदा जेवण करीत, तेही अर्धी पोळी व बिनाफोडणीची भाजी एवढेच. त्यांना स्वच्छ पोशाखाची व सुगंधी वस्तूंची आवड होती. त्यांची राहणी टापटिपीची व नेटकी होती. त्यांची शरीरयष्टी कृश, रंग गोरा, तरतरीत चेहरा, सरळ व धारदार नाक, पाणिदार डोळे आणि एकदम भेदक नजर होती. त्यांचा स्वभाव मिश्कील व विनोदी होता, स्वभाव अत्यंत सरळ व बालवत् होता. मनोवृत्ती अतिशय प्रसन्न व समोरच्याला सहज आपलेसे करणारी होती.
महाराज नेहमी सिगारेट ओढत व कधी कधी मद्यपानही करीत असत. ते पाहून बऱ्याच जणांना त्यांच्या साधुत्वाविषयी शंका येई. मुळात शंका यावी हाच तर त्यांचा त्यामागचा उद्देश होता. पण जे नि:शंक मनाने व श्रद्धेने त्यांना शरण गेले त्या भाग्यवान जीवांवर त्यांनी आपल्या अमोघ कृपेचा वर्षाव करून त्यांना धन्य केले.
सद्गुरु श्री.गजानन महाराजांचे "आत्मसाक्षात्कार मार्गप्रदीप" या नावाचे सुंदर चरित्र, श्रीसंत बीडकर महाराजांचे चरित्र लिहिणारे पुण्याचे कै.श्री.ल.ग.बापट यांनीच लिहिलेले आहे. त्यात शेवटी श्री.महाराजांच्या अनेक शिष्यांचे अद्भुत अनुभवही ग्रथित केलेले आहेत. ते वाचताना आपण अक्षरश: चकितच होऊन जातो.
श्री.गजानन महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा व आजच्याही काळात प्रत्येक परमार्थ साधकाने अावर्जून अभ्यासावा असा ग्रंथ म्हणजे "आत्मप्रभा" हा होय. प्रस्तुत ग्रंथ गुरुशिष्य संवादात्मक अाहे. त्यात महाराज स्वत:चा उल्लेख अत्यंत विनम्रतेने "वेडी केरसुणी" असा करतात. श्रीसद्गुरूंच्या घरची मी केरसुणी आहे, अशी त्यांची भावना होती. आत्मप्रभा ग्रंथ श्रीसंत स्वरूपानंद स्वामी महाराजांना अतिशय आवडत असे. ते त्यांच्या प्रत्येक शिष्याला तो वाचायलाच सांगत. सध्या या ग्रंथाची आवृत्ती पावसच्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने प्रकाशित केलेली उपलब्ध आहे. प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे देखील नेहमी या ग्रंथाचा गौरवाने उल्लेख करतात. परमार्थ साधकांसाठी अत्यंत मोलाचे व मार्मिक असे उपदेशामृत या ग्रंथामधून श्री.गजानन महाराजांनी उपलब्ध करून दिलेले आहे. साधनेची पथ्ये, साधकाची कर्तव्ये, साधनेतील Do's and Don'ts, खरे व खोटे साधुत्व ओळखण्याचे मार्ग, अाध्यात्मिक प्रगतीची लक्षणे, शिष्यकर्तव्ये आणि गुरूंची कर्तव्ये, परमार्थासाठी आवश्यक असणारे सद्गुण यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा सुंदर ऊहापोह त्यात श्री.महाराजांनी केलेला आहे. पाऊणशे वर्षांपूर्वीच त्यांनी जे मांडले आहे, तेच आजही पूर्णसत्य आहे. परमार्थाच्या नावाने बाजार मांडलेल्या तथाकथित गुरूंचा त्यात त्यांनी सुयोग्य समाचार घेतलेला आहे. आजमितीस अशा भंपक व भोंदू गुरूंचाच सर्वत्र सुळसुळाट आहे. श्री.गजानन महाराजांचे त्याबद्दलचे परखड बोल म्हणूनच साधकांनी अभ्यासपूर्वक जाणून घेऊन आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. अतिशय साध्या-सोप्या, सहज समजेल अशा भाषेत व चपखल उदाहरणे देऊन श्री.गजानन महाराजांनी आत्मप्रभा ग्रंथात अध्यात्माचे विविधांगी विवेचन केलेले आहे. हा ग्रंथ प्रत्येकाने आवर्जून वाचावाच, अशी मी आजच्या पावन दिनी सर्वांना प्रार्थनापूर्वक विनंती करतो.
सद्गुरु श्री.गजानन महाराजांचे फार अधिकारी असे शिष्य होऊन गेले. पुण्याचे प.पू.श्री.दादा महाराज आंबेकर, सोलापूरचे प.पू.श्री.नाना पाठक आणि वेळापूरचे प.पू.श्री.भाईनाथ महाराज कारखानीस हे तिन्ही श्री.गजानन महाराजांचे अधिकारी शिष्योत्तम होते. यांतील प.पू.श्री.नाना पाठक व प.पू.श्री.भाईनाथ महाराजांचा प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांशी चांगला संबंध आलेला होता. हे दोन्ही महात्मे फलटणला पू.श्री.काकांच्या दर्शनाला नेहमी येत असत. दोघांच्याही चरित्रात अशा भेटींचे उल्लेख आहेत. प.पू.श्री.भाईनाथ महाराज व प.पू.श्री.दादा महाराज आंबेकर यांचा प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांशीही हृद्य स्नेह होता. पू.भाई महाराज तर पू.श्री.मामांच्या श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन संस्थेचे विश्वस्तही होते. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज लहानपणी आपल्या वडिलांबरोबर एकदा नाशिकला गेले असताना पू.श्री.गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले होते. हे सर्व अतिशय रंगलेले महात्मे असल्याने सर्वांचा एकमेकांशी फारच गोड स्नेहबंध होता.
मी पहिल्यांदा जेव्हा श्रीसंत गजानन महाराजांचे चरित्र वाचले तेव्हा मी प्रचंड भारावूनच गेलो होतो. त्यात भरभरून नोंदवलेला, त्यांच्या शिष्यांना आलेल्या अत्यंत अलौकिक अनुभूतींचा खजिना फारच वेड लावणारा आहे. त्यानंतर एकदा नाशिकला गेलो असताना मी आवर्जून श्री.गजानन महाराजांच्या समाधिस्थानी जाऊन दर्शन घेऊन आलो होतो. सद्भाग्याने मला पू.श्री.गजानन महाराजांचे शिष्योत्तम प.पू.श्री.भाईनाथ महाराज कारखानीस यांचे दोन-तीनदा दर्शन लाभलेले आहे. पू.नाना पाठक यांचे 'सद्गुरुचरणाखाली' हे चरित्र व पू.दादा महाराज आंबेकर यांनी लिहिलेला ग्रंथ 'नाथपंथी ध्यानयोग' तसेच त्यांच्या चरित्रातील प्रसंग वाचतानाही फार आनंद लाभला होता, नेहमीच लाभतो. खरोखर ही सर्व फार फार महान विभूतिमत्वे होती.
आज प.पू.श्री.गजानन महाराजांच्या पुण्यतिथी दिनी, त्यांच्या आणि त्यांच्या अनन्य गुरुभक्त अशा सर्व शिष्यांच्या श्रीचरणीं सद्भावपूर्वक दंडवत घालतो व ही शब्दपूजा त्यांच्या श्रीचरणीं समर्पितो !
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

( http://rohanupalekar.blogspot.com)