21 Oct 2019

प.प.श्रीमत् नृसिंह सरस्वती (दीक्षित) स्वामी महाराज

ज्यांचे प्रेमाने नुसते नाव जरी घेतले तरी आपल्याही हृदयात श्रीगुरुभक्तीचा आविष्कार होतो आणि आपलेही नेत्र प्रेमादराने भरून येतात, त्या परमगुरुभक्त, साक्षात् गुरुभक्तीची प्रकट मूर्तीच असणाऱ्या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् नृसिंह सरस्वती (दीक्षित) स्वामी महाराजांची आज पुण्यतिथी !
भारतातील अत्यंत थोर गुरुशिष्यांच्या श्रेयनामावलीमध्ये ज्यांच्या नावाचा समावेश मोठ्या आदराने केला जातो, त्या प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज व प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराज या गुरुशिष्यांचे अलौकिक प्रेमनाते अत्यंत हृद्य व भावपूर्ण आहे. अतीव मनोरम असे यांचे प्रसंग वाचताना आपण खरोखरीच मोहरून जातो. शिष्य व्हावा ऐसा गुंडा । ज्याचा तिहीं लोकी झेंडा ॥ असे म्हणून श्री तुकोबाराय शिष्याचे यथार्थ माहात्म्यच प्रतिपादन करतात. प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराज अगदी असेच स्वनामधन्य शिष्योत्तम होते ; ज्यांच्याबद्दल परमगुरु श्रीमत् टेंब्येस्वामी महाराजांनाही अत्यंत कौतुक होते. खरोखरीच, गुरूंनाही अभिमान वाटावा असे भाग्य फारच थोड्या शिष्यांच्या वाट्याला येत असते !
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज आचार्योपासनेच्या विवरणात म्हणतात की, "गुरुसंप्रदायधर्मच हाच ज्याचा श्वास असतो, गुरुसेवा हाच ज्याचा वर्णाश्रम व विहित कर्तव्य, नित्यकर्म असते, त्या गुरुभक्ताच्या घरी ज्ञानच मोठ्या आदराने पाईकी करीत असते. तो शिष्य गुरुभक्तीला गवसणी घालून राहिलेला असतो. त्याच्या रूपाने गुरुभक्तीच साकारलेली असते !" प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराज अशा परमगुरुभक्तांचे शिरोमणीच होते.
कधीही पायात पादुका न वापरणाऱ्या प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी, आपल्या या शिष्योत्तमासाठीच एकवार केवळ पादुकांना एकदा स्पर्श करून त्यांना प्रसाद म्हणून त्या पादुका दिलेल्या होत्या. आजही त्या श्रीपादुका औरवाडच्या 'श्री वासुदेवानंद सरस्वती पीठा'त प्रेमादराने पूजिल्या जातात. आपल्या श्रीगुरुमहाराजांच्या शेवटच्या आजारपणात प.प.दीक्षित स्वामी महाराज या प्रसाद पादुकांवर विविध काढे व औषधी अर्पण करीत असत. शेवटी गरुडेश्वरहून श्रीगुरुमहाराजांनी निरोप पाठवून "आपली सेवा पोचली, अाता थांबवावी", असे सांगितले आणि नंतरच पूर्वनियोजितपणे त्यांनी देहत्याग केला. त्या पादुकांच्या रूपाने प्रत्यक्ष आपले श्रीगुरुदेवच आहेत, ही प.प.श्री दीक्षित स्वामींची धारणा किती यथार्थ होती पाहा !
श्रीगुरुनिष्ठेचा उत्तुंग आदर्श होते प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराज. त्यांच्या चरित्रातील काही अलौकिक व अद्भुत प्रसंगांची माहिती खालील लिंकवरील लेखात थोडक्यात दिलेली आहे. आजच्या पावन दिनी त्याद्वारे आपणही प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं मनोभावे दंडवत घालू या आणि भाग्याचेही भाग्य असणाऱ्या श्रीगुरुभक्तीच्या कृपालेश-प्राप्तीसाठी त्यांना कळकळीने विनवू या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
जाला गवसणी गुरुभक्तीसी

https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_22.html?m=1

0 comments:

Post a Comment