5 Dec 2023

श्रीहैबतीराय श्रेष्ठ बंधू

श्रीहैबतीराय श्रेष्ठ बंधू

सद्गुरु भगवान श्रीज्ञानेश्वरशिष्य श्रीसंत हैबतरावबाबा आरफळकर (पवार) यांच्या पुण्यतिथि निमित्त विशेष लेख !

- रोहन विजय उपळेकर

प्रास्ताविक :
भगवान श्री ज्ञानेश्वर माउली महाराज हे एक अद्भुत, परमआश्चर्यकारक असे श्रीभगवंतांचे स्वरूप आहे. श्री माउलींच्या ठिकाणी सारेच मावळते; बुद्धी, शब्द, विचार, तर्क इत्यादी सर्वांच्या अतीत असे त्याचे विलक्षण स्वरूप आहे. पराभक्तीचे परमाचार्य असणाऱ्या श्री माउलींच्या भक्तमालिकेतही, त्यांच्याचसारखे विलक्षण भक्त होऊन गेलेले आहेत. भगवान श्री माउलीच त्यांचे सारसर्वस्व होत ! अशा थोर भक्तांमध्ये, वै.हैबतरावबाबा आरफळकर (पवार) यांचे स्थान निश्चितच फार वरचे आहे !
जन्म आणि पूर्वायुष्य :
सातारा जिल्ह्यातील कृष्णाकाठी वसलेल्या आरफळ गावी, पवार आडनावाच्या मातब्बर क्षत्रिय घराण्यात, सन १७५० च्या आसपास वै.बाबांचा जन्म झाला. या घराण्यात शूर-वीरतेबरोबरच आळंदी-पंढरीची वारी देखील होती. त्यामुळे हे दोन्ही संस्कार वै.बाबांवर लहानपणापासूनच झाले. पुढे तरुणपणी, वै.बाबा ग्वाल्हेरच्या सरदार महादजी शिंद्यांच्या सैन्यात सामील झाले. आपल्या तलवारबहादुरीवर त्यांनी सरदारकी देखील मिळवली. या काळात वै.बाबांचा वारकरी संप्रदायाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी, त्यांचा आंतरिक ओढा मात्र श्रीमाउलींकडेच होता.
विलक्षण प्रसंगाने उपरती :
पुढे एकदा, युद्धात मोठा पुरुषार्थ गाजविल्यावर, वै.बाबा आरफळला यायला निघाले. सोबत विपुल धनसंपत्ती आणि सैन्य होतेच. परंतु प्रारब्धयोगाने, सातपुड्याच्या जंगलातील एका भिल्ल टोळीने त्यांच्यावर हल्ला करून सारे लुटले. वै.बाबांना सैन्यासह कैद करून नेले. वै.बाबांना एकमात्र आधार होता श्री माउलींचाच ! त्यांनी कळवळून प्रार्थना केली. 'तयांचे सर्व मी करीं । (ज्ञाने. ९.२२.३४०) अशी प्रतिज्ञा केलेल्या भक्ताभिमानी, भक्तवत्सल श्री माउलींना दया आली; आणि त्यांनी त्या भिल्ल प्रमुखाच्या स्वप्नात जाऊन, वै.बाबांना सोडून देण्याची आज्ञा केली. त्याच वेळी योगायोगाने, त्या भिल्लप्रमुखाची पत्नी प्रसूत झाली व तिला पुत्ररत्न झाले. ह्या घटनाक्रमामुळे त्या भिल्लप्रमुखाची खात्री झाली की, आपण कैद केलेली असामी काही सामान्य नाही. त्याने वै.बाबांची क्षमा मागून सुटका केली. सारी संपत्ती व सैन्य परत केले.
ह्या प्रसंगाने, वै.बाबांच्या अंत:करणामध्ये श्री माउलींविषयी अपार प्रेम उचंबळून आले. आपला हा पुनर्जन्मच असल्याचे त्यांनी जाणले. आता उरलेला सारा जन्म, श्री माउलींच्या सेवेतच व्यतीत करण्याचा त्यांनी पक्का निर्धार केला. मजल दरमजल करीत ते आरफळला पोचले. घरी पोचल्याबरोबर त्यांनी जाहीर केले की, "येथून पुढे आळंदीत राहून श्रीज्ञानोबारायांची सेवा करणार !" आणि या लढवय्या सरदाराने क्षणात सर्व संपत्ती, मान-मरातबाचा त्याग करून, ज्ञानियांच्या राजाची चाकरी पत्करली. ते कायमचे आळंदीत स्थायिक झाले.
साधना व श्री माउलींची कृपा :
सुरुवातीच्या काळात, वै.बाबा सिद्धबेटावर राहून श्रीमाउलींची सेवा- चाकरी, भजन करू लागले. या साधनाकाळात त्यांनी ज्ञानेश्वरीची पारायणे केली. जिभेला, चित्ताला श्री माउलींच्या अखंड स्मरणाची सवय लावली; आणि पिकल्या फळासारखे हे भक्तरत्न तयार झाले. त्यांच्या निष्ठेमुळे आणि प्रेमामुळे भगवान श्री माउलींची पूर्ण अनुग्रहकृपा वै.बाबांवर झालेली होती ! असे म्हणतात की, वै.हैबतराव बाबांना सद्गुरु श्री माउलींनी स्वमुखाने स्वनामाचा उपदेश केलेला होता. त्यामुळेच वै.बाबांच्या मुखी, 'महाराज ज्ञानेश्वर माउली' हे नाम अखंड स्थिरावलेले होते.
एका पावसाळ्यात इंद्रायणीला पूर आला. सारे सिद्धबेट पाण्याखाली गेले. त्यामुळे वै.बाबा देखील त्या पुरात एका झाडावर चढून बसले. आपल्या निष्ठावंत भक्ताची काळजी शेवटी माउलींनाच ! त्यांनी ग्रामस्थांना दृष्टांत दिला की, "माझा भक्त पुरात अडकला आहे; त्याची सोय करा !" ग्रामस्थांनी तातडीने होडी पाठवून सन्मानाने वै.बाबांना आळंदीत आणले आणि त्यांची देऊळवाड्यातील ओवरीत सोय केली. वै.बाबा शेवटपर्यंत, नाथांच्या पारासमोरील याच ओवरीत राहात होते. आजही पादुकारूपाने या ओवरीत त्यांचे वास्तव्य आहे. या ओवरीला, 'वै.हैबतराव बाबांची ओवरी' असेच म्हणतात.
वै.बाबा माउलींचे भजन फार सुंदर गात असत. अंगात सैनिकी पोषाख, डोक्यावर पगडी, हातात वीणा आणि चिपळ्या व पायांत चाळ अशा वेषात वै.बाबा तासन् तास श्रीज्ञानोबारायांसमोर भजन करीत. पायांत चाळ बांधून भजन करणारे तेच पहिले वारकरी भक्त. त्यामागचा उद्देशही मोठा विलक्षण. ते स्वतः सरदार; त्यामुळे एक प्रकारची मगरुरी, अहंकार मूळचाच असतो. तो अहंकार पूर्णपणे ठेचला जावा; नाचणाऱ्याप्रमाणे हीनता आपल्या ठिकाणी बाळगली जावी; ज्यायोगे संपूर्ण शरणागती सहजतेने साधेल; अशा विचाराने ते पायांत चाळ बांधून देवांसमोर भजन करीत. रात्री शेजारती झाल्यावर, पहाटे काकड्यापर्यंत वै.बाबा माउलींच्या मंदिरात 'महाराज ज्ञानेश्वर माउली' भजन करीत. त्यांच्या वेळेपासून सुरू झालेला वीणेचा पहारा, आजही श्री माउलींसमोर अखंड चालू आहे.
एकदा काही उपद्रवी मंडळींनी त्रास दिला; म्हणून वै.बाबा भंडारा डोंगरावर जाऊन राहिले. इकडे श्री माउलींनी दृष्टांत देऊन, "बाबांच्या भजनाशिवाय मला करमत नाही !" असे सांगितले. त्यामुळे गावकऱ्यांनी जाऊन वै.बाबांना परत आणले. या सर्व प्रसंगांनी, वै.बाबांचा अधिकार गावकऱ्यांना समजून चुकला.
पालखी सोहळ्याची सुरुवात:
पुढे श्री माउलींच्या प्रेरणेने, वै.बाबांच्या मनात सद्गुरु श्री माउलींची पालखी पंढरीला न्यावी असे येऊ लागले. यापूर्वी श्रीसंत तुकाराम महाराजांचे सुपुत्र वै.नारायण महाराज यांनी, श्री माउली व श्री तुकोबांच्या पादुका पालखीतून आषाढी वारीसाठी पंढरीला नेण्याची पद्धत सुरू केलेलीच होती. परंतु त्यांच्या वंशजांमधील बेबनाव आणि कोर्टकचेऱ्या यांचा पालखीवर परिणाम होऊ लागला. वै.बाबांच्या मनातील श्री माउलींचा स्वतंत्र पालखी सोहळा पंढरपूरला नेण्याच्या विचारांमागे, देहूकरांमधील अंतर्गत वादविवाद हे देखील एक कारण असावे.
त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना हा विचार सांगितला. तो सर्वांना अतिशय आवडला. वै.बाबांचे स्नेही वै.खंडुजीबाबा पुणेकर यांनीही मोठे सहकार्य केले. आजही वै.खंडुजीबाबांची दिंडी पालखी सोहळ्यात रथापुढे दुसऱ्या क्रमांकावर चालते. १८३२ साली पहिल्यांदा, डोक्यावर पादुका घेऊन, वै.बाबांनी हा सोहळा सुरू केला. सुरुवातीच्या दिंड्यांमध्ये शेडगे, शिरवळकर, भोरकर, टेंभूकर, वासकर, खडकतकर, वडगांवकर, फरताळे, जळगांवकर, कराडकर, उखळीकर, आजरेकर, माई दिंडी इत्यादी दिंड्यांचा समावेश होता. आजही या सर्व दिंड्या सोहळ्यात सहभागी होतात.
वै. बाबांचे पाठांतर भरपूर होते. तसेच ते कडक शिस्तीचे भोक्ते होते. त्यामुळेच आजही सोहळा ज्या पद्धतशीर रितीने संपन्न होतो, त्याचे सर्व श्रेय वै.बाबांनाच आहे. त्यांच्या भजनी मालिकेनुसारच भजने होतात. प्रत्येक टप्प्यानुसार, त्यांनी अभंगांची उत्तम निवड केलेली आहे. वारीत अडचणी आल्यास घ्यावयाचे निर्णय, तक्रार करण्यासाठी समाज-आरतीच्या वेळचे टाळ वाजवणे, देवांभोवती उभे राहावयाच्या जागा; इत्यादी सर्व शिस्त, जशी वै.बाबांनी घातली होती, तशीच आजही पाळली जाते.
वारीची व्यवस्था :
वै. बाबा श्री माउलींच्या पादुका डोक्यावरून घेऊन जात. त्याचे प्रतीक म्हणून, आजही पंढरीच्या वेशीजवळील विसाव्यापासून ते नाथ चौकातील श्री माउलींच्या मंदिरापर्यंत, माउलींच्या पादुका हातातच घेऊन जातात. स्वतः शितोळे सरदार, वै. बाबांचे वंशज आणि विणेकरी सोबत चालतात.
बेळगांव जिल्ह्यातील अंकलीचे शितोळे सरदार वै.बाबांचे अनुगृहीत होते. ज्ञानियांच्या राजाचा सोहळा सुरू झाल्यावर, वै.बाबांनी शितोळे सरदारांकडून देवांसाठी हत्ती, घोडे, तंबू इत्यादी मानमरातब मागविला. शितोळे सरकारांनी हत्ती, जरीपटक्यासह घोडे, देवांचा तंबू आणि दररोजच्या नैवेद्याची संपूर्ण व्यवस्था करून दिली. हत्ती वगळता सर्व गोष्टी आजही शितोळे सरकारांच्या वतीने चालविल्या जातात.
वै.बाबांवर श्री माउलींची अपार कृपा होती. त्यामुळे श्री माउलींची सेवा घडावी, पंढरीची वारी घडावी आणि अधिकाधिक भगवद् अनुसंधान घडावे; या उद्देशाने सुरू झालेला हा सोहळा, श्री माउलींनीच सांभाळला, वाढवला. आजचे सोहळ्याचे भव्य स्वरूप, हे वै.बाबा आणि त्यांचे सहकारी असणाऱ्या सर्व थोर महात्म्यांच्या सत्संकल्पांचेच फळ म्हणायला हवे.
आषाढी वारीबरोबरच, वै.बाबा पौषातील त्र्यंबकेश्वरची वारी, माघातील श्रीसंत निळोबांच्या पुण्यतिथीची पिंपळनेरची वारी, फाल्गुनातील श्रीतुकाराम- बीजेची देहूची वारी; आणि श्री माउलींच्या समाधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठीची आश्विनातील पंढरीची वारी देखील करीत असत. त्यांच्या पश्चात ह्या सर्व प्रथा, त्यांचे वंशज आजही सांभाळत आहेत.
वै.बाबांनी ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती करून ठेवल्या होत्या. या ग्रंथांची पारायणे ते स्वतः करीत. हे ग्रंथ आळंदीला, वै.बाबांच्या ओवरीत आजही सुस्थितीत पाहायला मिळतात.
महानिर्वाण :
१८३२ साली सुरू झालेला श्री माउलींचा पालखी सोहळ्याची घडी आता नीट बसलेली होती. वै.बाबांचेही वय झालेले होते. श्री माउलींच्या नामात आणि सेवेत पूर्णपणे 'रंगलेल्या' श्री माउलींच्या या शिलेदाराने, जवळजवळ ८० वर्षांचे कृतार्थ आयुष्य क्रमून, १८३६ सालच्या कार्तिक कृ.अष्टमीला, श्री माउलींच्या श्रीचरणीं देह ठेवला. त्यांच्या इच्छेनुसार, पंढरीतील नामदेव पायरीप्रमाणे, श्री माउलींच्या महाद्वारातील पहिल्या पायरीखाली त्यांच्या परमपावन देहाला चिरविश्रांती देण्यात आली.
देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढभावो ।। १ ।।
चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ।। ना.गा. १५८१.२ ।।
अशी वै.बाबांची प्रखर निष्ठा होती. श्री माउलींच्या सर्व भक्तमंडळींची पावन चरणधुली निरंतर मस्तकावर पडत राहावी; म्हणून वै.बाबांनी पहिल्या पायरीखाली समाधी घेण्याची इच्छा केली होती, 'संत पाय हिरे वरी देती ।' या ओढीने ! धन्य ती गुरुमाउली आणि धन्य ते भक्तोत्तम वै.हैबतरावबाबा !
आन गोमटे न मनूं :
वै.हैबतराव बाबांसारखे थोर निष्ठावंत आणि अनन्यशरण भक्त मोजकेच असतात. देवांनाही 'तयांचें आम्हां व्यसन । (ज्ञाने. १२.२०.२३७)' असे म्हणावेसे वाटते; एवढे हे महात्मे थोर असतात. श्री माउली म्हणूनच म्हणतात,
परि मातें परम करूनि । इये अर्थीं प्रेम धरूनि ।
हें सर्वस्व मानूनि । घेती जे पैं ॥ २३३ ।।
पार्था गा जगीं। तेंचि भक्त तेचि योगी ।
उत्कंठा तयांलागीं । अखंड मज ॥ २३४।।
आम्ही तयांचें करूं ध्यान । ते आमुचें देवतार्चन ।
तेवांचूनि आन । गोमटें न मनूं ।। ज्ञाने. १२.२०.२३६ ।।
श्री माउलींनाच सर्वस्व-आधार मानून, त्यांच्याच श्रीचरणांच्या अखंड उत्कंठेने सतत सेवारत, नामस्मरणरत राहणारे वै.बाबांसारखे भक्त श्री माउलींचे अत्यंत लाडके असतील, यात शंका कोणती ? देवांनाही त्यांच्याशिवाय चैन पडत नाही. म्हणूनच तर त्यांच्या विशुद्ध चित्तामध्ये क्षेत्रसंन्यासी बनून राहण्यात श्रीभगवंत धन्यता मानतात !
आज उभ्या जगाला कुतूहलाचा विषय असणाऱ्या अतिशय शिस्तबद्ध, सुंदर आणि भव्य पालखी सोहळ्याचे आद्य संयोजक, शिल्पकार, वै.हैबतराव बाबांचे वारकऱ्यांच्या हृदयातील स्थान अढळच राहणार आहे. या अतीव आदराचे द्योतक म्हणून, 'पालखी सोहळा मालक' या संबोधनाने वै.बाबांचा उल्लेख होतो.
वै. बाबांचा अधिकार आणि कार्य विलक्षण आहेच. म्हणूनच तर प्रज्ञाचक्षु श्रीसंत गुलाबराव महाराज, वै.बाबांचा 'श्रीहैबतीराय श्रेष्ठ बंधू ।। गु.अ.गा.२११.३।।' असा गौरव करतात. श्रीगुलाबराव महाराजांच्या संप्रदायात, आज देखील, वै.बाबांनी घालून दिलेला भजनक्रम आणि पालखीक्रम आगमवत् पाळला जातो. तशी श्रीगुलाबराव महाराजांची आज्ञाच आहे. भजनानंतर स्वतः श्रीगुलाबराव महाराजांनी केलेली वै.बाबांची आरती देखील दररोज म्हटली जाते.
शूर सरदार असूनही श्रीज्ञानोबारायांचा दासानुदास शिलेदार होऊन, अनन्यअगतिक चित्ताने, 'माउलींवाचून आणखी गोमटे काहीच नाही' म्हणणाऱ्या; आणि तदनुसार अखंड वर्तन करणाऱ्या, सद्गुरु भगवान श्री माउलींच्या अत्यंत लाडक्या प.पू.वै.हैबतराव बाबांच्या परममंगल श्रीचरणीं आजच्या पुण्यतिथी दिनी सादर साष्टांग दंडवत !
( पूर्वप्रसिद्धी : 'बापरखुमादेविवरु' मासिकाच्या २००६ सालच्या वारी-विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख. )