12 Jul 2019

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी

नमस्कार मंडळी !
आज देवशयनी आषाढी एकादशी, भूवैकुंठ पंढरीची वारी, आम्हां वारकऱ्यांचा दिवाळी, दसरा, पाडवा आणि सर्व काही !
जशी सासुरवाशिणीला माहेराची सतत सय येत असते, अगदी तशीच आपल्या लाडक्या लेकीची मायेलाही सतत आठवण येत असते. माय कामात मग्न दिसली तरी तिचे चित्त आपल्या पिलापाशीच असते. आणि आमची पंढरीची कासे पितांबर ल्यालेली, कटीवर कर ठेवून वाट पाहणारी सावळी सुंदर विठुमाय तर अवघ्या जगाचीच मायमाउली आहे, तिचेच बाळगोपाळ साऱ्या जगभर विखुरलेले आहेत. आजच्या दिवशी ते सारे या परमप्रेमळ विठुमायेच्या कुशीत येऊन विसावण्यासाठी धडपडत असतात. जे प्रत्यक्ष पंढरीत येतात त्यांना तर ती प्रेमावेगाने जवळ ओढून त्यांचे मुके घेतेच ;  पण जे तिथवर येऊ शकत नाहीत, त्यांनाही ती आपल्या स्मरणाच्या प्रेमभरल्या मांडीवर बसवून त्यांचे तितकेच लाड करते, त्यांची अलाबला काढते व पदराखाली घेऊन अमृतस्तन्यही पाजते.
आमची ही सावळी सुंदर विठुमाय फारच गोड आहे, कनवाळू आहे आणि अंतर्बाह्य वेडावणारी देखील आहे. एकदा का हिची गोडी लागली की मग इतर कशातही रसच राहात नाही. आपण जिथे जातो तिथे सतत ती बरोबरच असते, आपली सर्व बाजूंनी न सांगताच काळजी देखील घेते. आज अठ्ठावीस युगे उलटली तरी तिचे हे वात्सल्यप्रेम व्यक्त करणे थांबलेलेच नाही, ना तिचे भक्त कमी झाले ना तिचे प्रेम आटले. सर्वकाही चौगुणे वाढतच आहे ! खरोखरीच आमची ही विठुमाउली एकमेवाद्वितीय आणि अत्युत्तम आहे !!
पंढरीच्या आषाढी प्रेमसोहळ्याचे भावपूर्ण संस्मरण करतानाच, भगवान श्रीपांडुरंगांच्या स्वरूपाचा, त्यांच्या अलौकिक भक्तवात्सल्याचा, भक्तांच्या भगवत्प्रेमाचा आणि 'पांडुरंग' या विशेष नामाचा विविधांगी परामर्शही प्रस्तुत लिंकवरील लेखात घेतलेला आहे. आजच्या आषाढी महाएकादशीच्या पावन पर्वावर या भगवान श्रीविठ्ठल-स्तुतिसुमनांजलीचा आपणही अास्वाद घ्यावा ही विनंती.
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी
https://rohanupalekar.blogspot.com/2016/07/blog-post_15.html?m=1

11 Jul 2019

तयाचिये सेवे लागो हे जीवित

नमस्कार !
आज आषाढ शुद्ध दशमी,  श्रीज्ञानेश्वरकन्या प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराजांची जयंती !
पंचलतिका गोपीचे अवतार असणारे श्रीसंत गुलाबराव महाराज हे श्रीज्ञानेश्वर मधुराद्वैत दर्शनाचे प्रणेते मानले जातात. त्यांची अलौकिक ग्रंथसंपदा हा खरोखर विलक्षण चमत्कार आहे. त्यांच्या श्रीचरणीं सादर दंडवत !
श्री गुलाबराव महाराजांनी आपल्या तातांच्या, अर्थात् श्री ज्ञानेश्वर माउलींच्या अनन्य सेवेकऱ्याविषयी आपल्या मनातला उत्कट प्रेमभाव एका सुंदर अभंगात प्रकट केला आहे. त्या अभंगावरील अल्पसे चिंतन खालील लिंकवरील लेखात मांडलेले आहे, ते आवर्जून वाचावे ही प्रार्थना !
तयाचिये सेवे लागो हे जीवित
https://rohanupalekar.blogspot.com/2016/07/blog-post_14.html?m=1

4 Jul 2019

सद्गुणरत्नाकर ; प.पू.श्री.मामा

श्रीसद्गुरूंच्या असीम दयाकृपेने, 'श्रीपाद जयंती'चे पावन पर्व आणि गुरुपुष्यामृत योगावर, प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांच्या शुभहस्ते "सद्गुणरत्नाकर ; प.पू.श्री.मामा"  याआमच्या ग्रंथाचे आज प्रकाशन झाले. श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू प.पू.सद्गुरु योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या सद्गुणसमृद्ध विभूतिमत्वाचा विविधांगी वेध घेणारे चोवीस लेख या ग्रंथात संकलित करण्यात आलेले आहेत.
हा १४४ पानी ग्रंथ सवलतीच्या दरात ₹ १००/- मध्ये उपलब्ध आहे. ज्यांना हवा असेल त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा ही विनंती. पोस्टानेही ग्रंथ पाठविला जाईल.
- रोहन विजय उपळेकर

3 Jul 2019

भावार्थ करुणात्रिपदीचा

आज पंचम श्रीदत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये ) स्वामी महाराजांची १०५ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या श्रीचरणीं साष्टांग दंडवत !!
श्रीस्वामी महाराज यांच्या सुप्रसिद्ध 'करुणात्रिपदी' रचनेचा भावार्थ खालील लिंक वरील लेखात मांडलेला आहे. तो आवर्जून वाचावा ही विनंती. त्याच लेखात श्रीस्वामी महाराजांच्या चरित्रावरील आणि करुणात्रिपदीच्या जन्मकथेवरील लेखही आपण वाचू शकाल.
भावार्थ करुणात्रिपदीचा
https://rohanupalekar.blogspot.com/2017/06/blog-post_39.html?m=1