24 Nov 2019

भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी महोत्सव


आज कार्तिक कृष्ण त्रयोदशी, परमाराध्य मायबाप भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांचा संजीवन समाधी दिन !
सद्गुरु भगवान श्री माउली हे साक्षात् भगवान श्रीकृष्ण परमात्माच आहेत. सद्गुरु श्री माउलींच्यानंतर आपल्याकडे झालेल्या आजवरच्या जवळपास प्रत्येक महात्म्याने आपल्या वाङ्मयात कुठे ना कुठे सद्गुरु श्री माउलींची स्तुती केलेलीच आहे. इतकी श्री माउलींची मोहिनी जबरदस्त आहे. जसे भगवान श्रीराम अद्वितीय, जसे भगवान श्रीकृष्ण अद्वितीय, जसे श्रीमदाद्य शंकराचार्य महाराज अद्वितीय ; तसेच सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजही एकमेवाद्वितीय आहेत. त्यांच्यासारखे तेच, अत्यंत अलौकिक व अद्भुत !
सद्गुरु श्री माउलींचे नुसते नाव जरी उच्चारले तरी आपल्या हृदयी प्रेमादराचे तरंग उठतात, त्यांच्याविषयीच्या निखळ प्रेमाचे, उत्कट श्रद्धेचे आणि अपूर्व गुरुभावाचे अनुकार आपले अंगांग व्यापून वर अष्टसात्त्विक भावांची मांदियाळी निर्माण करतात. आळंदीला कार्तिकी वारीत किंवा आषाढीच्या वारीत श्री माउलींच्या नामाचा गगनभेदी गजर जेव्हा होतो ना, तेव्हा आपण असेच अंगभर मोहरून येतो की बस ! हा अनुभव ज्याचा त्यानेच एकदातरी घ्यायला हवा. ज्यांच्या नामातच अज्ञानाचा निरास आहे, वेदान्ताचा परमअनुभव आहे आणि ज्यांच्या नामात पराभक्तीचा अपूर्व-मनोहर आविष्कार आहे, त्या कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती परमानंदकंद श्रीविठ्ठलप्राणजीवन भक्तहृदयसिंहासनविहारी अलंकापुराधिपती जगज्जीवन सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांच्या श्रीचरणीं त्यांच्याच ब्रह्मनामाच्या उच्चारात सहजतेने अापल्याला दंडवत घालता येतोय, हे तुम्हां आम्हां भाविकांचे केवढे मोठे भाग्य आहे. खरोखरीच, देवांनी आपल्याला सद्गुरु श्री माउलींच्या नंतर जन्माला घातले यातच सगळे आले ! देवदेवतांनाही दुर्लभ असे भगवान श्री माउलींचे दर्शन, त्यांचे नामस्मरण व त्यांच्या अवीट गोडीच्या सारस्वताचे अनुशीलन-अनुगमन आपण त्यामुळेच तर आज करू शकतोय. यासाठी सृष्टिकर्त्या परमात्म्याचे आपण सर्वजण जन्मजन्मांतरीचे ऋणाईत आहोत. मला आपल्या या भाग्याचा सदैव हेवा वाटतो.
सद्गुरु श्री माउलींच्या स्तुतिगायनात आज स्वर्गादि लोकांत, वैकुंठातही मोठमोठ्या महात्मांच्यात अहमहमिका लागलेली असेल, तिथे आपल्यासारख्यांनी काय मिजास मारावी हो ? पण आपण तर ही आपली मिराशी मानायला हवी, आपल्यावरचा भगवान श्रीजगन्नाथांचा हा महान उपकारच आहे की, आजच्या परमपावन दिनी आपल्याला ते सद्गुरु श्री माउलींचे स्मरण करून देत आहेत.
म्हणूनच आजच्या पावन दिनी, माझे सद्गुरुराज प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी रचलेल्या दोन अभंगांच्या विवरणाच्या माध्यमातून मीही सद्गुरु श्री माउलींच्या सर्वार्थदायक अम्लान श्रीचरणकमलीं ही अल्पशी वाङ्मयसेवा समर्पून, आज त्यांच्याच स्मरणानंदात मौनावतो ! आपणही खालील लिंकवरील त्या लेखाचा आस्वाद घेऊन श्री माउलींच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक स्मरणसेवा समर्पावी ही प्रार्थना !
सरतेशेवटी श्रीज्ञानेश्वरकन्या सद्गुरु श्री गुलाबराव महाराजांच्या शब्दांत मायतात सद्गुरु भगवान श्री माउलींच्या चरणीं सप्रेम प्रार्थना करतो,
माझ्या समान न जनी अति पापकारी |
नाही तुम्हां समही पावन पापहारी |
यालागि पदकमले नमिते स्वभावे |
ताता तुम्हां दिसेल योग्य तसे करावे ॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

बापा ज्ञानेश्वरा तुम्हां ठावे हित

https://rohanupalekar.blogspot.com/2016/11/blog-post_27.html?m=1&fbclid=IwAR1ODJxjUixrE88dB562Bm2bxkJF8djqg6jEq537kxIHj4lEnMhdpxrJLdg



23 Nov 2019

नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा

आज कार्तिक कृष्ण एकादशी, उत्पत्ती एकादशी, भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधिसोहळ्याची कार्तिकी आळंदी वारी  !!
अलं ददाति इति आलन्दि । अशी आळंदी शब्दाची फोड आहे. जी पुरे म्हणेपर्यंत देते ती आळंदी  ! अहो, भगवान श्री ज्ञानराय तर महान अवतार आहेतच, पण त्यांची पावन आळंदी नगरी देखील "जो जे वांच्छिल तो ते लाहो ।" हा श्री माउलींचाच अमृत-शब्द गेली साडेसातशे वर्षे पूर्ण करीत आलेली आहे. साक्षात् श्रीभगवंतांचेच अभिन्न स्वरूप असणाऱ्या श्री माउलींसारखेच अगाध व अचाट सामर्थ्य, त्यांचे चिरंतन अस्तित्व लाभल्याने ही अलौकिक नगरी देखील सर्वार्थाने अंगोअंगी मिरवीत आहे. प्रत्यक्ष श्री माउलींच्या एकमेवाद्वितीय संजीवन समाधीचे अधिष्ठान-माहेर लाभल्यास काय होणार नाही ? ज्यांच्या दारातला पिंपळही प्रत्यक्ष सुवर्णाचा आहे, त्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपासाम्राज्यात तर उणेपणाच कायमचा उणावलेला आहे  !!
आज आळंदीची कार्तिकी वारी. पहाटे पवमानपंचसूक्ताच्या अभिषेकाने उत्सवास सुरुवात होते. दुपारी श्री माउलींची पालखी नगर परिक्रमेस बाहेर पडते व हजेरी मारुती मंदिरात सर्व दिंड्यांच्या हजेऱ्या होऊन पालखी सोहळा पुन्हा मंदिरात परत येतो. द्वादशीला श्री माउलींची रथातून मिरवणूक निघते व गोपाळपुऱ्यापासून फिरून परत येते. त्रयोदशीला श्री माउलींचा समाधिउत्सव साजरा होतो. वारकरी संप्रदायात या उत्सवाला अतिशय महत्त्व आहे ! 
आळंदीचा व तिचे अक्षय अधिष्ठान असलेल्या श्री माउलींचा महिमा गाताना सर्व संत वेडावून जातात. श्रीसंत तुकोबाराय श्री माउलींविषयीच्या अत्यंत जिव्हाळ्याने, आळंदी क्षेत्री येऊन मनोभावे घेतलेल्या श्री माउलींच्या समाधिदर्शनाचे फल सांगताना शपथपूर्वक म्हणतात,
चला आळंदीला जाऊं ।
ज्ञानदेवा डोळां पाहूं ॥१॥
होतील संतांचिया भेटी ।
सुखाचिया सांगों गोष्टी ॥२॥
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ।
मुखीं म्हणतां चुकती फेर ॥३॥
तुम्हां जन्म नाहीं एक ।
तुका म्हणे माझी भाक ॥४॥

अशा या परमपावन आळंदी तीर्थक्षेत्राचे आजचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण साक्षात् भगवान श्रीपांडुरंगांनीच स्वमुखे नामदेवरायांना सांगितले आहे की, "कार्तिक शुद्ध एकादशी माझी तर कृष्ण एकादशी ज्ञानोबांची. आम्ही कार्तिकात या एकादशीला कायम आमच्या लाडक्या ज्ञानोबांच्या सोबतच असू !" श्रीभगवंतांचे हे अलौकिक माउली-प्रेम पाहून श्री नामदेवराय हर्षोत्फुल्ल होऊन धन्योद्गार काढतात,
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार ।
धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥
धन्य भागीरथी मनकर्णिका वोघा ।
आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग ।
मिळालें तें सांग अलंकापुरी ॥३॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हें संत ।
झाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४॥

"कार्तिक कृष्ण अष्टमीपासून ते त्रयोदशीपर्यंत जो कोणी माझ्या परमप्रिय श्री ज्ञानराज माउलींचे स्मरण, वंदन, पूजन, भजन, नमन, चरित्रगायन व नामस्मरण करेल, त्याच्यावर मी प्रसन्न होईन !" असा प्रत्यक्ष आनंदकंद भगवान श्रीपंढरीनाथांचाच आशीर्वाद आहे. म्हणूनच आजपासून त्रयोदशीपर्यंत सद्गुरु भगवान श्री माउलींच्या संजीवन समाधीस वारंवार साष्टांग दंडवत घालून आपण त्यांचे प्रेमभावे स्मरण करू या. 
सद्गुरु श्री माउलींचे प्रिय भक्त प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी रचलेल्या 'श्रीज्ञानदेवाष्टका'मध्ये त्यांनी मोठ्या प्रेमादराने श्री माउलींचे चरित्र गायिलेले आहे. त्या प्रासादिक स्तोत्राचे प्रेमपूर्वक वाचन, चिंतन करून आपणही भगवान श्रीपंढरीश परमात्म्याचे शुभाशीर्वाद प्राप्त करून घेऊ या व धन्य होऊ या  !!
॥ श्रीज्ञानदेवाष्टकम् ॥
महिंद्रायणीचे तटी जे आळंदी ।
दुजी पंढरीक्षेत्र लोकी प्रसिद्धी ।
असा घेतला तेथ जेणे विसावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥१॥
पिता विठ्ठल विख्यात रुक्माई माता ।
दयाशील दांपत्य नाही अहंता ।
तये पोटी न कां जन्म हा घ्यावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥२॥
कलीमाजी तारावया भाविकांना ।
सुविख्यात ज्ञानेश्वरी ग्रंथ केला ।
समाधान जो देई गीतार्थ जीवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥३॥
चमत्कार नाना जगी दावियेले ।
पशूच्या मुखे वेदही बोलविले ।
असे थोर आश्चर्य वाटेचि जीवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥४॥
द्विजाच्या घरी श्राद्धकाळी जिवंत ।
करी जेववी पूर्वजाते समस्त ।
मुखी घालती अंगुली लोक तेव्हा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥५॥
अगा व्याघ्रयाने वृथा खेळताहे ।
पहा भिंत निर्जीव ही चालताहे ।
असे दाखवी लाजवी चांगदेवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥६॥
नसे द्वैतबुद्धी दया सर्वभूती ।
अशी देखिली ती संतमूर्ती ।
नसे साम्य लोकी जयाच्या प्रभावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥७॥
महायोगी लोकी ऐसी प्रसिद्धी ।
आळंदीपुरी तोचि घेई समाधी ।
अशा ते न कां विश्वरूपी म्हणावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥८॥
वदे भक्तीने नित्य या भाविकांसी ।
भवाब्धि भये बाधिती ना तयासी ।
म्हणे दास गोविंद विश्वास ठेवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥९॥
इति सद्गुरु श्री गोविंदकाका उपळेकर महाराज विरचितम् श्रीज्ञानदेवाष्टकम् संपूर्णम् ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( http://rohanupalekar.blogspot.in )


18 Nov 2019

श्री शिवचिदंबर महास्वामी


आज कार्तिक कृष्ण षष्ठी,
शिवावतार भगवान श्री चिदंबर महास्वामींची जयंती !
सद्गुरु भगवान श्री चिदंबर महास्वामी हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप असे साक्षात् अवतारच होते. राजाधिराज भगवान सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांचे त्यांच्यावर अतिशय प्रेम होते. श्री महास्वामींच्या लीला खरोखर विलक्षण आहेत. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या श्रीचरणीं साष्टांग दंडवतपूर्वक वंदन !
श्री चिदंबर महास्वामींच्या चरित्र व लीलांवरील अल्पसे चिंतन, खालील लिंकवर जाऊन आजच्या पावन दिनी आपण आवर्जून वाचावे ही विनंती.
शिवचिदंबर पाहि माम्
https://rohanupalekar.blogspot.com/2018/11/blog-post_28.html

12 Nov 2019

त्रिपुरान्तकाय नम: शिवाय

नमस्कार !!
आज त्रिपुरारि पौर्णिमा !
भगवान श्रीशिवांनी आजच्याच दिवशी अत्यंत मायावी अशा त्रिपुरासुराचा अनोख्या पद्धतीने वध केला होता. म्हणून आजच्या पौर्णिमेला 'त्रिपुरारि पौर्णिमा' असे नाव पडले.
या त्रिपुरासुराला भगवान ब्रह्मदेवांनी वर देऊन तीन नगरे प्रदान केली होती. ही नगरे स्वयंपूर्ण तर होतीच पण मायावी सुद्धा होती. ती कोणताही आकार घेऊ शकत, अदृश्य होत, आकाशातही उडू शकत असत. लोखंड, तांबे व सोन्याची ती तीन पुरे त्याच्या मालकीची असल्यामुळेच त्याला 'त्रिपुरासुर' हे नाव पडले. तो त्यांच्या बळावर अत्यंत माजला होता. मुळातच तो राक्षस असल्याने अहंकारी, विकृत तसेच दुष्टही होताच. त्याने साऱ्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग मात्र भगवान श्रीशिवांनी अत्यंत क्रोधाविष्ट होऊन विलक्षण सामग्री वापरून त्याचा वध केला.
त्यासाठी भगवान श्रीशिवशंकरांनी पृथ्वीचा रथ केला, त्याला सूर्य चंद्रांची दोन चाके होती.  भगवान ब्रह्मदेव त्याचे सारथी झाले. मेरू पर्वताचे धनुष्य व साक्षात् भगवान श्रीविष्णूंचा बाण केला व त्या एकाच बाणात तिन्ही नगरांसह त्रिपुरासुराचा वध केला. कारण एकाच बाणात ही तिन्ही पुरे नष्ट करावी लागतील असाच वर त्याने मिळवलेला होता.
तेव्हापासून त्रिपुरी पौर्णिमेला शिवपूजन करतात व शिवमंदिरात साडेसातशे त्रिपुरवाती लावून उपासना करतात. अनेक ठिकाणी या आनंदाप्रीत्यर्थ दीपोत्सवही साजरा केला जातो.
त्रिपुरीचा दीपोत्सव नुसता पाहिल्यानेही पाप नष्ट होऊन विशेष पुण्य लाभते असे म्हणतात. कांचीचे परमाचार्य श्रीमद् जगद्गुरु श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या प्रवचनात सांगितले आहे की, "आजचा त्रिपुरी दीपोत्सव ज्यांच्या ज्यांच्या दृष्टीस पडतो, त्या त्या कृमी-कीटक-प्राणी-पक्षी-वनस्पती व मनुष्यादी सर्व जीवांचे पाप नष्ट होते असे शास्त्र आहे." म्हणून आज आपणही आवर्जून श्रीभगवंतांसमोर यथाशक्य दीप लावून त्या दीपोत्सवाचे दर्शन घ्यावे किंवा मंदिरात जिथे कुठे दीपोत्सव असेल तिथे आवर्जून जाऊन ते नयनरम्य दर्शन घ्यावे ही विनंती.
( http://rohanupalekar.blogspot.in )
श्रीगुरुचरित्राच्या त्रेचाळिसाव्या अध्यायात भक्तराज तंतुकांची कथा आलेली आहे. त्यात श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचे माहात्म्य सांगताना भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज विमर्षण राजाची कथा सांगतात. एक कुत्रा शिवरात्रीच्या दिवशी पंपानगरीतील शिवमंदिरात उपाशी पोटी तीन प्रदक्षिणा घालतो, तेथे उजळलेली दीपमाळ पाहतो व शिवद्वारी प्राणत्यागही करतो. त्या पुण्याईने पुढच्या जन्मी तो कुत्रा शिवभक्त विमर्षण राजा होतो. म्हणजे दीपोत्सवाच्या दर्शनाचेही असे प्रचंड पुण्य प्राप्त होत असते.
आजच्याच तिथीला, भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे धाकटे बंधू व शिष्य सद्गुरु श्री सोपानदेव महाराज, शिख संप्रदायाचे प्रणेते श्रीगुरु नानकदेव महाराज, निम्बार्कमताचे प्रणेते श्रीमत् न्निम्बार्क महामुनींद्र  आणि राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे प्रशिष्य व श्री बीडकर महाराजांचे थोर शिष्योत्तम, प.पू.श्री.रावसाहेब महाराज सहस्रबुद्धे या चार महात्म्यांची जयंती असते. आज श्रीगुरु नानकदेव महाराजांची ५५० वी जयंती आहे.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी या त्रिपुरी पौर्णिमेच्या संदर्भातले एक छान रूपक योजलेले आहे. श्री ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायाच्या श्रीगुरुनमनात ते म्हणतात,
त्रिगुणत्रिपुरीं वेढिला ।
जीवत्वदुर्गीं आडिला ।
तो आत्मशंभूनें सोडविला ।
तुझिया स्मृती ॥ ज्ञाने.१७.०.२॥

"हे सद्गुरुभगवंता, आपले माहात्म्य काय वर्णन करावे ? सत्त्व, रज व तम या तीन गुणरूपी पुरांनी वेढल्यामुळे जीवत्वरूपी किल्ल्यात अडकलेल्या व त्या भ्रमामुळे स्वत:ला अपूर्ण मानणाऱ्या श्रीशिवांच्या अंशावर (जीवावर) तुम्ही श्रीसद्गुरुरूपाने जेव्हा कृपा करता, तेव्हाच तो जीव त्या त्रिगुणरूपी त्रिपुरासुराच्या वेढ्यातून मुक्त होऊन आपला मूळचा आत्मानंद पुन्हा उपभोगू लागतो !" अत्यंत दुर्लभ अशी श्रीसद्गुरुकृपा झाल्यानंतरच जीवाचे अज्ञानादी सर्व दोष जाऊन मूळचे शिवस्वरूप पुन्हा प्रकट होते, असे या त्रिपुरासुर कथेच्या रूपकातून श्री माउली स्पष्ट सांगत आहेत.
आजच्या या कथेच्या प्रसंगाचे हुबेहूब दर्शन खालील अप्रतिम शिल्पचित्रामधून होत आहे !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

8 Nov 2019

तुका म्हणे जन्मां आल्याचे सार्थक ।विठ्ठलचि एक देखिलिया ॥


आज देवप्रबोधिनी कार्तिकी एकादशी ! भगवान श्रीपंढरीनाथांची कार्तिकी वारी !!
भूवैकुंठ पंढरी, भगवान श्रीपांडुरंग आणि त्यांचे अलौकिक भक्त ; सारेच अत्यंत विलक्षण आहेत, इतर कशाशीच यांची तुलना होऊ शकत नाही. पंढरीत रंगणाऱ्या आषाढी व कार्तिकी या दोन एकादशांच्या अपूर्व सोहळ्याची देखील अन्य कशाशीच तुलना होऊ शकत नाही, तो प्रत्यक्ष अनुभवण्याचाच गूढरम्य विषय आहे !
भूवैकुंठ पंढरीचे माहात्म्य अतिशय समर्पक शब्दांत सांगताना भक्तश्रेष्ठ श्री तुकोबाराय म्हणतात,
अवघींच तीर्थें घडलीं एक वेळां ।
चंद्रभागा डोळां देखिलिया ॥१॥
अवघींच पापें गेलीं दिगंतरी ।
वैकुंठ पंढरी देखिलिया ॥२॥
अवघिया संता एक वेळां भेटी ।
पुंडलिक दृष्टि देखिलिया ॥३॥
तुका म्हणे जन्मां आल्याचे सार्थक ।
विठ्ठलचि एक देखिलिया ॥४॥

"जगातील यच्चयावत् सर्व तीर्थांच्या दर्शनाचे पुण्य भूवैकुंठ पंढरीतील परमपवित्र चंद्रभागा नदीच्या केवळ एका वेळच्या दर्शनानेच प्राप्त होते. भूवैकुंठ पंढरपुराचे मनोभावे दर्शन झाल्याबरोबर अवघी पापे दशदिशांना पळून जातात. भक्तश्रेष्ठ पुंडलिकांचे दर्शन हे सर्व संतांच्या दर्शनासारखेच आहे. श्रीतुकोबाराय म्हणतात, खरोखर सांगतो, जन्माला आल्याचे सार्थक हे एकमात्र भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीविठ्ठलांचे दर्शन झाल्यानेच केवळ होते !"
पंढरीच्या या सावळ्या सगुण परब्रह्माचे रूप इतके गोड आहे की बस ! अहो, साक्षात् भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य आणि भगवान श्री ज्ञानेश्वर माउली जेथे त्या अपूर्व-मनोहर रूपमाधुरीने वेडावले, तेथे आपला काय हो पाड ? युगानुयुगे हेच ते गोजिरे साजिरे गोवळे परब्रह्म नेणो कित्येकांना जन्माचा वेध लावून उभे आहे. या सुकुमार मदनाच्या पुतळ्याचे प्रेम आल्यागेल्याला असे झडपते की काय सांगायचे. पंढरीच्या या सावळ्याचे प्रेम जबरी भूतच आहे. या दिव्य प्रेमाने एकदा झपाटले की कोणताही उपाय करा, काही केल्या ते सोडतच नाही... !!
आणि ज्याला ते झपाटते त्याला तरी कुठे सुटायचे असते म्हणा त्यातून. त्या प्रेमात आपादमस्तक बुडून जाण्यात जी गोडी, जो आनंद आहे तो अन्य कश्शातच नाही. म्हणूनच तर श्री तुकोबा म्हणतात, पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरी सुकाळ ॥ पंढरीत नामाचा कल्लोळ आहे नि प्रेमाचा सुकाळ आहे. आणि त्याच दैवी प्रेमाचे साकार रूप विटेवरही उभे आहे, लुटाल तितके लुटा, कधीच काही कमी नाही होणार त्यात. तुम्हां आम्हां भोळ्या भाविकांसाठीच तर ही अखंडित सुखमिराशी आहे ना !
हे असे एकमात्र तीर्थ आहे जिथे कळसाच्या दर्शनानेही मोक्ष लाभतो. श्री तुकोबाराय गर्जून सांगतात, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ हा नाश अहंकाराचा ॥ एरवी शेवटच्या क्षणापर्यंत पाठ न सोडणारा आपला अहंकार, पंढरीत येऊन मंदिराच्या कळसाचे दुरून जरी दर्शन झाले तरी तत्काळ नष्ट होतो, त्याचे नावच राहात नाही. सर्वत्र एक विठ्ठलच दिसू लागल्यावर आपला अहंकार कुठे शिल्लक राहणार ?
पंढरीत नाम आहे, रूप आहे, भाव आहे आणि प्रेम आहे. या चतुर्विध संगमात भक्त एकदा का न्हाला की त्याचे काम फत्ते ! पंढरीचे सगळेच अलौकिक आहे, किती आणि काय बोलू त्याबद्दल ? शब्दांना तिथे काहीच किंमत नाही. अनुभवच घ्यावा लागतो त्यासाठी ज्याचा त्याने. पण त्यासाठी आधी पंढरीचे उघडे सगुणब्रह्मच पूर्णत्वाने वोळले पाहिजे. त्या प्रेममय सगुणमेघश्याम लावण्यसुंदराने आपल्या प्रेमपिशाचाची बाधा करवायला हवी आपल्याला. ते सर्वस्वी त्यांच्याच हातात आहे.
ह्या अपूर्व-मनोहर प्रेमबाधेची लागण व्हावी आणि ती आजन्म कायमचीच टिकून राहावी, यासाठीच आपण सर्वांनी त्या त्रिभुवनगुरु परमानंदकंद भगवान श्रीविठ्ठलांच्या अखंड नामगजरात आजची ही कार्तिकी हरिदिनी साजरी करू या आणि आनंदाचा धणीवरी उपभोग घेऊ या ! आजच्या प्रबोधिनीच्या पावन मुहूर्तावर आमच्याही चित्ताला तोच दिव्य प्रेमबोध होवो, हीच श्रीविठ्ठलस्वरूप श्रीगुरुचरणीं सादर प्रार्थना !
भगवान श्रीपंढरीरायांचे प्रेमभांडारी श्रीसंत नामदेवराय महाराजांच्या चरणीं जयंतीनिमित्त सादर दंडवत !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

श्रीपांडुरंगांच्या योगरूपाचे आणि 'प्रबोधिनी' शब्दाच्या विशेष अर्थाच्या विवेचनाचा समावेश असणारे कार्तिकी एकादशीचे पूर्वीचे चिंतन खालील लिंकवर आहे, तेही आवर्जून पाहावे.
आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो
https://rohanupalekar.blogspot.com/2016/11/blog-post.html?m=1