24 Dec 2019

योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराज

आज मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी, श्रीज्ञानेश्वरबंधू सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांचा समाधिदिन, श्रीसंत संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी आणि सद्गुरु योगिराज श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांची जयंती ! या तिन्ही संतश्रेष्ठांच्या श्रीचरणीं सादर दंडवत !!
मनापासून व प्रेमाने केलेले संतांचे स्मरण हे पूर्वीच्या पापाचा तर नाश करतेच ; पण त्याचबरोबर आपल्या अंत:करणात त्या महात्म्यांच्या कृपेची एक लहानशी ज्योतही लावते.  सद्बुद्धीची ही लहानगी ज्योत देखील उभे आयुष्य उजळून काढण्यास पुरेशी असते ; म्हणूनच तिला कधीच कमी लेखू नये, असे सद्गुरु भगवान श्री माउलींनी म्हटलेले आहे. याच उदात्त भूमिकेने आपणही वारंवार संतांच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या अलौकिक चरित्र व कार्याचा यथाशक्य आस्वाद घेऊन त्याद्वारे मनोभावे त्यांचे स्मरणही करीत असतो.
संतांवर श्रीभगवंतांचे अमर्याद प्रेम असल्याने त्यांचे स्मरण, पूजन, वंदन, सेवन आणि त्यांच्या बोधाचे व चरित्रलीलांचे मनन-चिंतन करणाऱ्या, त्यानुसार वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या भक्तावर आपोआपच श्रीभगवंतांची असीम दयाकृपा होत असते. हा या स्मरणाचा महालाभच म्हणायला हवा. एरवी कोणाही जोगा नसलेला, कशालाही बांधील नसलेला परमात्मा, संतांच्या सेवेने मात्र त्वरित आपलासा होतो, हे वैश्विक सत्य आपण कधीच विसरता कामा नये.
याच मनोभूमिकेने आजच्या पावन दिनाचे औचित्य असणाऱ्या या तिन्ही महात्म्यांच्या चरित्र व कार्यावर प्रकाश टाकणारा लेख खालील लिंकवर जाऊन आवर्जून वाचावा व आपल्या परमार्थप्रेमी सख्या-सुहृदांनाही वाचायला द्यावा ही विनंती.
योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराज हे साक्षात् भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच होते. त्यांच्या अतीव भावपूर्ण अशा दोन छोट्याच पण हृद्य लीला खालील लेखात कथन केलेल्या आहेत. आजच्या पुण्यदिनी त्यांचे वाचन करून त्यांच्या श्रीचरणीं प्रेमपुष्पांजली समर्पावी ही प्रार्थना !!
गुरुवरा ओवाळू आरती
https://rohanupalekar.blogspot.com/2017/12/blog-post_15.html?m=1
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

23 Dec 2019

स्वामी श्री स्वरूपानंद महाराज

आज मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी, सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपापरंपरेतील थोर सत्पुरुष, पावस येथील स्वामी श्री स्वरूपानंद महाराज यांची आज जयंती !
सद्गुरु श्री माउलींच्या कृपेने बहरलेले सारस्वत वैभव म्हणजे स्वामी स्वरूपानंद महाराज होत. म्हणूनच त्यांची वाङ्मयसंपदा ही अतिशय अलौकिक व सुरेख आहे. त्यांच्यावरील श्री माउलींचा वरदहस्त ठायी ठायी जाणवतोच.
श्रीसद्गुरुकृपेने लाभलेल्या आत्मानंदात, अद्वितीय सोऽहं बोधात नित्य निमग्न असणारा हा 'स्वरूपहंस' खरोखरीच आत्मतृप्त होता. त्याच बोधवृत्तीचे पावन अनुकार म्हणजे त्यांचे सुरेख वाङ्मय होय. साधकांसाठी त्या वाङ्मयाचे महत्त्व आणि माहात्म्य म्हणूनच अनन्यसाधारण आहे !!
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज, प.पू.सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराज व प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज या आमच्या तिन्ही परमादर्शांचे स्वामी श्री स्वरूपानंद महाराजांशी अतिशय हृद्य संबंध होते. परस्परांवर यांचे निरतिशय प्रेम होते. म्हणूनच आजच्या पावन दिनी स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या चरणीं सादर साष्टांग दंडवत करतो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

स्वामी श्री स्वरूपानंद महाराजांचे चरित्र व कार्य, तसेच या महात्म्यांच्याशी असलेल्या हृद्य संबंधांवरील अल्पसे चिंतन, खालील लिंकवरील लेख उघडून आवर्जून वाचावे ही विनंती.
स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन
https://rohanupalekar.blogspot.com/2016/12/blog-post_25.html?m=1

9 Dec 2019

वाङ्मयी भगवन्मूर्ती भगवती श्री गीता

आज सूर्यसिद्धांत पंचांगानुसार मोक्षदा एकादशी, श्रीगीता जयंती !!
परिपूर्ण परब्रह्म भगवान श्रीकृष्णांनी भक्तराज अर्जुनाच्या मोहाचे निराकरण करण्यासाठी जो परमामृतमय उपदेश केला तोच भगवती श्री गीता होय. श्री गीतेला आजवरच्या सर्व आचार्यांनी, महात्म्यांनी व संतांनी परमश्रेष्ठ मानून गौरविलेले आहे. भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली तर श्री ज्ञानेश्वरीत ठायी ठायी गीतेची अलौकिक स्तुती करतात ; आणि तेच यथार्थही आहे.
"गीता गीता गीता असे नुसते तीनदा जरी म्हटले तरी त्या जीवावर भगवत्कृपा होते", असे श्रीसंत नामदेवराय म्हणतात. श्री रामकृष्ण परमहंस म्हणत की, "गीता गीता गीता असे सलग म्हटले की 'त्याग त्याग त्याग' असे त्यातून ध्वनित होते व तोच गीतेचा खरा अर्थ आहे !" पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी आपल्या सांप्रदायिकांना घालून दिलेल्या दैनंदिन उपासनेत श्री गीतेचा आवर्जून समावेश केलेला आहे. श्री गीतेचे महत्त्व असे अनन्यसाधारण आहेच !
श्रीभगवंतांनी गीतेतून विविध मार्ग सुचवून मोक्षाची साधनेच आपल्यासमोर ठेवलेली आहेत, ज्याला जो रुचेल, पचेल, त्याने तो मार्ग अवलंबावा व मोक्षाप्रत जावे. म्हणून भगवती श्री गीतेचे अनुसंधान, चिंतन-मनन, पठण, पूजन, प्रदक्षिणा, लेखन, सेवन अशा विविध प्रकारे आपण दररोज श्री गीतेची सेवा केली पाहिजे. यातच आपले हित आहे.
आजच्याच पावन तिथीला, चतुर्थ श्रीदत्तावतार प.पू.सद्गुरु श्री माणिकप्रभू महाराजांनी हुमणाबाद येथे समाधी घेतली. श्रीसंत माणिकप्रभू महाराजांच्या सर्व रचना अतिशय प्रासादिक व भगवद्भक्तीचा परमोच्च आदर्श सांगणाऱ्या आहेत. त्यांचे चरित्रही फार विलक्षण आहे. सद्गुरु श्रीसंत माणिकप्रभू महाराजांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींनी वर्णिलेला श्री गीता महिमा खालील लिंकवरील लेखात थोडक्यात मांडलेला आहे. कृपया त्याचे वाचन-मनन करून श्रीभगवंतांचे शब्दमय स्वरूप असणाऱ्या भगवती श्री गीतेस मनोभावे दंडवत घालून, जसे जमेल तसे श्री गीता चिंतन करण्याचा, श्री गीतेचे यथाशक्य पठण, पूजन, वाचन करण्याचा आपण सर्वांनी निर्धार करू या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
गीता जाणा वाङ्मयी श्रीमूर्ति प्रभूची

https://rohanupalekar.blogspot.com/2016/12/blog-post_10.html?m=1

4 Dec 2019

श्रीस्वामीतनया - प.पू.सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे

अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या कृपापरंपरेतील महान विभूतिमत्व म्हणजे प.पू.सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे ; साक्षात् श्रीस्वामीतनया !!
राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामी महाराजांच्या मांडीवर बसून खेळण्याचे, त्यांच्याकडून प्रेमभराने कुरवाळून घेण्याचे व त्यांचा अमोघ कृपाहस्त शिरी मिरवण्याचे देवदुर्लभ सौभाग्य प्रेमादराने मिरवणारी ही त्यांची लाडकी लेक खरोखरीच अत्यंत अद्भुत आहे ! सद्गुरुकृपेने सदैव ब्रह्मभावातच विचरण करणाऱ्या मातु:श्री, श्री ज्ञानेश्वरीची ओवी न् ओवी अक्षरश: जगल्या. लौकिक अर्थाने लिहायलाही न येणाऱ्या मातु:श्रींच्या सर्वांगी भगवती ज्ञानदेवीच भरून राहिलेली होती, त्यांचे जीवनसर्वस्व झालेली होती. श्री ज्ञानदेवीची अलौकिक ज्ञानमयता त्यांचे पूर्ण अस्तित्वच व्यापून वर दशांगुळे उरलेली होती. त्यामुळेच त्यांनी अगदी साध्या साध्या उदाहरणांनी व सोप्या शब्दांत केलेला बोध उपनिषदांप्रमाणे श्रेष्ठतेला पावलेला आहे, आजही हजारो साधकांना अचूक मार्गदर्शन करीत आहे.
सद्गुरु श्री माउलींच्या, "जो अंतरीं दृढ । परमात्मरूपीं गूढ । बाह्य तरी रूढ । लौकिक जैसा ॥ज्ञाने.३.७.६८॥" या अमृतवचनाचे आरस्पानी नितळ आणि तेजस्वी प्रतिबिंब प.पू.मातु:श्रींच्या चरित्रात मूर्तिमान झालेले आपल्याला दिसून येते. सद्गुरु श्रीस्वामी महाराजांच्या कृपापरंपरेचे शांभव अद्वयानंदवैभवच प.पू.मातु:श्रींच्या रूपाने परिपूर्णतेने सगुणसाकार झाले होते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. अपरंपार सद्गुरुशरणागतीचा पुण्यपावन आविष्कार प.पू.मातु:श्रींच्या ठायी समग्रतेने झालेला होता. त्यांचे दिव्य चरित्रच याचे प्रत्यक्ष द्योतक आहे ; आणि म्हणूनच ते सर्व साधकांसाठी सतत प्रेरणादायी आहे, साधनेच्या मार्गावर दृढतेने अग्रेसर करणारे आहे. श्रद्धेने रोज त्याचे थोडे जरी परिशीलन केले, तरी साधनेतील समस्त विघ्नांचा आपोआप नाश होतो, अशी असंख्य साधकांची रोकडी प्रचिती आहे.
आज मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी, प.पू.मातु:श्री पार्वतीदेवींची ७८ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त या महान विभूतिमत्वाचे श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत प्रणाम !
प.पू.मातु:श्रींच्या पावन चरित्राचा मी स्वत: अनुभवलेला एक विलक्षण प्रत्यय व साधकांनी सदैव चिंतनात ठेवाव्यात अशा त्यांच्या चरित्रातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा ऊहापोह खालील लिंकवरील लेखात केलेला आहे. आजच्या पावन दिनी सर्वांनी त्याचे चिंतन करून प.पू.मातु:श्रींच्या श्रीचरणीं श्रद्धासुमने समर्पावीत ही मन:पूर्वक प्रार्थना.
खरोखरीच, या लेखात वर्णन केल्याप्रमाणे, श्री.कुलकर्णी यांच्यासारखीच प.पू.मातु:श्रींच्या करुणेची, अमोघ कृपेची प्रचिती आपल्यालाही आली, तर तो आपल्या परमार्थ-साधनेसाठी अत्यंत दिव्य अनुभवच ठरेल यात शंका नाही !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
प्रसन्न कृपाछाया 'श्रीस्वामीतनया'

https://rohanupalekar.blogspot.com/2016/12/blog-post.html?m=1