9 Dec 2019

वाङ्मयी भगवन्मूर्ती भगवती श्री गीता

आज सूर्यसिद्धांत पंचांगानुसार मोक्षदा एकादशी, श्रीगीता जयंती !!
परिपूर्ण परब्रह्म भगवान श्रीकृष्णांनी भक्तराज अर्जुनाच्या मोहाचे निराकरण करण्यासाठी जो परमामृतमय उपदेश केला तोच भगवती श्री गीता होय. श्री गीतेला आजवरच्या सर्व आचार्यांनी, महात्म्यांनी व संतांनी परमश्रेष्ठ मानून गौरविलेले आहे. भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली तर श्री ज्ञानेश्वरीत ठायी ठायी गीतेची अलौकिक स्तुती करतात ; आणि तेच यथार्थही आहे.
"गीता गीता गीता असे नुसते तीनदा जरी म्हटले तरी त्या जीवावर भगवत्कृपा होते", असे श्रीसंत नामदेवराय म्हणतात. श्री रामकृष्ण परमहंस म्हणत की, "गीता गीता गीता असे सलग म्हटले की 'त्याग त्याग त्याग' असे त्यातून ध्वनित होते व तोच गीतेचा खरा अर्थ आहे !" पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी आपल्या सांप्रदायिकांना घालून दिलेल्या दैनंदिन उपासनेत श्री गीतेचा आवर्जून समावेश केलेला आहे. श्री गीतेचे महत्त्व असे अनन्यसाधारण आहेच !
श्रीभगवंतांनी गीतेतून विविध मार्ग सुचवून मोक्षाची साधनेच आपल्यासमोर ठेवलेली आहेत, ज्याला जो रुचेल, पचेल, त्याने तो मार्ग अवलंबावा व मोक्षाप्रत जावे. म्हणून भगवती श्री गीतेचे अनुसंधान, चिंतन-मनन, पठण, पूजन, प्रदक्षिणा, लेखन, सेवन अशा विविध प्रकारे आपण दररोज श्री गीतेची सेवा केली पाहिजे. यातच आपले हित आहे.
आजच्याच पावन तिथीला, चतुर्थ श्रीदत्तावतार प.पू.सद्गुरु श्री माणिकप्रभू महाराजांनी हुमणाबाद येथे समाधी घेतली. श्रीसंत माणिकप्रभू महाराजांच्या सर्व रचना अतिशय प्रासादिक व भगवद्भक्तीचा परमोच्च आदर्श सांगणाऱ्या आहेत. त्यांचे चरित्रही फार विलक्षण आहे. सद्गुरु श्रीसंत माणिकप्रभू महाराजांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींनी वर्णिलेला श्री गीता महिमा खालील लिंकवरील लेखात थोडक्यात मांडलेला आहे. कृपया त्याचे वाचन-मनन करून श्रीभगवंतांचे शब्दमय स्वरूप असणाऱ्या भगवती श्री गीतेस मनोभावे दंडवत घालून, जसे जमेल तसे श्री गीता चिंतन करण्याचा, श्री गीतेचे यथाशक्य पठण, पूजन, वाचन करण्याचा आपण सर्वांनी निर्धार करू या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
गीता जाणा वाङ्मयी श्रीमूर्ति प्रभूची

https://rohanupalekar.blogspot.com/2016/12/blog-post_10.html?m=1

0 comments:

Post a Comment