20 Apr 2020

अक्कलकोटनिवासी परब्रह्म सगुण


( सद्गुरु श्रीसंत गुलाबराव महाराजांनी आपल्या अभंगांमधून प्रकट केलेल्या, राजाधिराज सद्गुरु श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य स्वरूप, अद्भुत कार्य व अलौकिक कृपाशक्तीच्या रहस्योद्घाटक विवरणाचे अल्पसे चिंतन. 
पूर्वप्रसिद्धी : श्रीवामनराज त्रैमासिक - श्रावण श्रीशके १९२६. )

प्राक्कथन :

विश्वातील साऱ्या शास्त्रांमधल्या, भल्याभल्यांनाही थक्क करणाऱ्या आपल्या अप्रतिहत गतीने, ज्यांनी आपले 'ज्ञानेश्वरकन्या' हे नाम सार्थ ठरविले, अलौकिक प्रज्ञाविलासाने ज्यांनी सर्वच वेदादी शास्त्रांचा सुयोग्य समन्वय करून 'समन्वयमहर्षी' हे बिरूद भूषविले, लौकिकार्थाने अंध असूनही ज्यांची प्रज्ञा सर्व ज्ञानविभांगामध्ये स्वैर, समर्थ संचार करीत असल्याने ज्यांनी 'प्रज्ञाचक्षू' हे विशेषण सत्य ठरविले, त्या माधुर्यभक्तीचे आचार्य, महाभागवत सद्गुरु श्री गुलाबराव महाराजांच्या परमपावन श्रीचरणी सादर दंडवत प्रणाम !
या कराल-कलिकालात धर्माचे आणि भक्तीचे योग्य मंडन करून, माधुर्यभक्तीचे सर्वश्रेष्ठत्व ठसविण्याचे, तसेच सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्त्वपरंपरेच्या सुप्रतिष्ठापनेचे दिव्य कार्य, ज्यांनी आपल्या अवघ्या चौतीस वर्षांच्या अल्पायुष्यात केले, ते प्रज्ञापरमावधी सद्गुरु श्री गुलाबराव महाराज हे जगातील अद्वितीय आणि अतर्क्य असे आश्चर्यच होते. त्यांचे सारे वाङ्मय, चरित्र आणि कार्य हे भल्याभल्यांना कोड्यात पाडते ; आणि ते प्रत्यक्ष 'ज्ञानेश्वरकन्या'च होते असे म्हणण्यास प्रवृत्त करते. 
वेदान्तातील तसेच इतर शास्त्रांमधील अनेक विवाद्य विषयांवर त्यांचे अधिकारपूर्ण भाष्य हा शेवटचा शब्द मानला जातो. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या विनवणीचे, प्रार्थनेचे त्यांचे अभंग हे असेच सुंदर भक्तहृदय प्रकट करतात. शास्त्रचर्चा करावी तर श्रीमहाराजांनीच. किती सांगावे ; त्यांच्यासमोर आपले शब्द खरंच तोकडे पडतात ! 
सद्गुरु श्री गुलाबराव महाराजांना, भगवान श्री माउलींनी स्वमुखाने, स्वत:च्या मांडीवर बसवून स्वनामाचाच उपदेश केलेला होता. श्रीमहाराजही भगवान श्रीगोपालकृष्ण व भगवान सद्गुरु श्री माउलींच्या ठायी अनन्यशरण होते. श्रीमहाराजांना श्री माउलींप्रति केवढा जिव्हाळा होता, हे त्यांच्या कोणत्याही अभंगाच्या शेवटच्या चरणात पाहावे. अभंग कोणत्याही विषयावरचा असो, त्याचा शेवट श्री माउलींच्या स्तुतीने, वर्णनाने अथवा कृपासामर्थ्याच्या दिग्दर्शनानेच होणार. प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांच्या कृपेने, सद्गुरु श्री गुलाबराव महाराजांच्या चरणीं, त्यांच्या अद्भुत वाङ्मयाप्रति मला अतीव आदरभाव, श्रद्धाभाव निर्माण झाला ; हे मी माझे सद्भाग्यच समजतो. आज या छोट्याशा लेखाच्या माध्यमातून, श्रीस्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या पुण्यपर्वावर, आपण सद्गुरु श्री गुलाबराव महाराजांनी केलेल्या राजाधिराज सद्गुरु समर्थ श्रीअक्कलकोट स्वामी महाराजांच्या मनोहर स्तुतीचा सप्रेम आस्वाद घेऊ या. 

अक्कलकोटनिवासी ब्रह्म सगुण :

भगवान सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराज हे साक्षात् परिपूर्णब्रह्म आहेत. अनाद्यनंत परमानंदकंद भगवान श्रीहरीच त्यांच्या रूपाने साकार झाले. प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात त्याप्रमाणे, "श्रीस्वामी महाराज हे साक्षात् परिपूर्णब्रह्म, कलियुगातील सगुण-साकार भगवद्रूप, बोला-बुद्धीच्या पलीकडले, सद्गुरूंचे आदिपीठ होत." श्रीस्वामी महाराज हे अवधूतशिरोमणी, सर्व संप्रदायांचे गुरुपीठ आणि विश्वाचे पालकपोषक आहेत. सर्व परंपरांचे कृपाबीज श्रीस्वामी महाराजच आहेत, म्हणूनच तर त्यांना 'गुरूणां गुरु:' म्हणतात. 
प.पू.श्री.दादा आपल्या 'श्रीस्वामी समर्थ नामपाठा'च्या अर्पणपत्रिकेत म्हणतात,
पूर्णब्रह्म स्वामीराया । वटमूला अप्रमेया ।
प्रवर्तिले संप्रदाया । लीलावेगी ॥१॥
भगवान सद्गुरु श्रीस्वामीमहाराज हे सर्व परंपरांचे, संप्रदायांचे मूळ आहेत. वडाचे झाड जसे अपार विस्तारते, त्याच्या पारंब्या रुजतात व पुन्हा नवीन वृक्षांच्या रूपाने विस्तारतात, पण मूळ खोड तरीही वेगळे दिसतेच. तसे ; श्रीस्वामी महाराज हे अनंत संप्रदायांचे 'वटमूल' आहेत !
राजाधिराज श्रीस्वामी महाराजांनी स्वत:ची माहिती सांगताना, "वडाचे झाड, मूळ मूळ..." असे म्हटले होते. याचा अजून एक संदर्भ आहे. भगवान श्रीशिवांनी ज्या आपल्या गुरुरूपाने ऋषिमुनींना उपदेश केला, त्या जगद्गुरु भगवान श्रीदक्षिणामूर्ती यांचे वर्णन करतात की, 
चित्रं वटतरोर्मूले वृद्धा शिष्या: गुरुर्युवा ।
गुरौस्तु मौनं व्याख्यानं शिष्यास्तु छिन्नसंशया: ॥
अत्यंत तरुण वयातील भगवान श्रीदक्षिणामूर्ती हे वडाच्या झाडाच्या मुळाशी बसलेले असतात आणि त्यांचे अनेक वृद्ध ज्ञानी शिष्य समोर बसून त्यांच्याकडून ज्ञान घेत असतात. भगवान श्रीदक्षिणामूर्ती व भगवान श्रीस्वामी महाराजांच्या ठायी विलसणाऱ्या जगद्गुरुत्वाचे निदर्शक असणारे वडाच्या झाडाचे मूळ हे व्यवच्छेदक लक्षणच आहे !
सद्गुरु श्री गुलाबराव महाराज श्रीस्वामी महाराजांना साक्षात् भगवान श्रीदत्तप्रभूच म्हणतात.
कलियुगीं श्रीदत्तात्रय ।
अवतार तुमचा खरा ॥१॥
अक्कलकोट निवासी ब्रह्म ।
सगुण हृदयीं उतरा ॥श्रीगु.गा.२८.२॥
पूर्वीं तिही युगी देव दत्तसद्गुरु ।
कलियुगीं बुद्धिग्रामि हे मुनीश्वरू ॥श्रीगु.गा.३०.१॥
अनसूयानंदन कलियुगी ।
अवतारचि दुसरा ॥श्रीगु.गा.३४.१॥
सद्गुरु श्रीस्वामी महाराज हे प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयच आहेत ! सद्गुरु श्री माउली म्हणतात, 'मूळपीठ शङ्करू I दत्तात्रेय जगद्गुरु II या अखिल विश्वाचे गुरुपद हे भगवान श्रीदत्तप्रभूंचेच मानले जाते ; म्हणूनच ते 'जगद्गुरु' म्हटले जातात. विश्वाच्या गुरुत्वाचा सारा भार ज्यांचा आहे, ते श्रीदत्तप्रभूच आपल्या पूर्णांशांनी राजाधिराज श्रीस्वामी महाराजांच्या स्वरूपाने प्रकटलेले आहेत. 
हेच सांप्रदायिक रहस्य जाणून श्रीसंत गुलाबराव महाराज एक अतिशय मार्मिक मुद्दा मांडतात की,
उदय होता मार्तंडा मग ।
प्रकाश सर्व घरा ॥३॥
तैसें सर्वहि संप्रदायातें ।
ज्ञान सुवर्णीं भरा ॥श्रीगु.गा.३४.४॥
ज्याप्रमाणे सूर्य उगवल्याबरोबर सर्वच घरांमध्ये प्रकाश पडतो, त्याप्रमाणे श्रीस्वामीमहाराजांच्या कृपासूर्यामुळे सर्वच संप्रदायांमध्ये गुरुरूपाने ज्ञान प्रकट होते. सर्वच संप्रदायांना कृपाशक्ती श्रीस्वामी महाराजांचीच असते ; म्हणूनच ते गुरुणां गुरु:,  जगद्गुरु आहेत !

अक्कलकोट ग्राम कलियुगीं काशी :

भगवान सद्गुरु श्रीस्वामीमहाराज हे साक्षात् विश्वाचे ईश्वर, भगवान श्रीशिवशंकरच आहेत. त्यामुळे त्यांचे राहण्याचे ठिकाणही काशी होय. श्री गुलाबराव महाराज म्हणतात ;
स्वामी दीनानाथ राहति जया देशी ।
तेचि वाराणसी शिव सांगे ॥१॥
गुरुगीता वाक्य सर्वत्र प्रमाण ।
सद्गुरुवचन त्याची श्रुति ॥२॥
अक्कलकोट ग्राम कलियुगीं काशी ।
जिवंत कैलासी लोक सारे ॥३॥
स्वामी विश्वेश्वर दत्तात्रेयरूप ।
महिमा अमूप वर्णवेना ॥ श्रीगु.गा.३५.५ ॥
भगवान श्रीशिवांनी गुरुगीतेत म्हटल्याप्रमाणे, जगद्गुरु श्रीस्वामी महाराज हेच विश्वेश्वर होत ; आणि त्यांचे चरणतीर्थ हीच त्रिभुवनपावनी गंगा होय.
काशीक्षेत्रं तन्निवासो जान्हवी चरणोदकम् ।
गुरु: विश्वेश्वर: साक्षात् तारकं ब्रह्म निश्चितम् ॥गु.गी.१६॥
श्रीस्वामी महाराज हे साक्षात् भगवान श्रीविश्वेश्वर आहेत. वर भगवान श्रीस्वामी महाराज व भगवान श्रीदक्षिणामूर्तींचे एकत्व प्रतिपादित केलेले आहेच.
यामागे एक आणखी कारण आहे. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, गुरुतत्त्व हे श्रीशिवांचेच स्वरूप आहे. गुरुरूपामध्ये त्रिमूर्तींपैकी शिवरूपाचा, शिवतत्त्वाचा प्रकर्ष असतो. श्रीस्वामी महाराज हे जगद्गुरु असल्याने, त्यांच्या ठिकाणी शिवरूपाचेच प्राधान्य होते. म्हणूनच श्री गुलाबराव महाराज आवर्जून 'स्वामी विश्वेश्वर दत्तात्रेयरूप I' असे म्हणतात. 
श्रीस्वामी महाराज जसे शिवस्वरूप आहेत, तसेच त्यांच्यामध्येच भगवान श्रीब्रह्मदेव व भगवान श्रीविष्णू सदैव असतात, असे प.पू.श्री.मामा म्हणत. म्हणूनच श्री गुलाबराव महाराज श्रीस्वामी महाराजांना 'विश्वेश्वर' म्हटल्यावर पुन्हा 'दत्तात्रेयरूप' देखील म्हणतात. 
राजाधिराज श्रीस्वामी महाराजांच्या प्रकट अधिष्ठानामुळे अक्कलकोट ग्राम हे कलियुगामध्ये काशी होय. त्यामुळे येथील लोकांना 'कैलासवासी' होण्यासाठी 'मरण्याची' आवश्यकता नाही. येथील सारे लोक जिवंतपणीच कैलासवासी अाहेत, असे श्री गुलाबराव महाराज नमूद करतात. 

सद्गुरुवचन त्याचि श्रुति :

सद्गुरु श्री गुलाबराव महाराज वरील अभंगात एक अतिशय महत्त्वाचा सिद्धांत सांगतात. ते म्हणतात, 'सद्गुरुवचन त्याची श्रुति ।' भगवान श्रीसद्गुरूंच्या मुखातील शब्द हे शिष्यासाठी साक्षात् श्रुतीच असतात, ते वेदतुल्यच असतात. भगवान श्री सद्गुरु माउली देखील म्हणतात,
तयाचें बिसाट शब्द । सुखें म्हणों येती वेद ।
सदेह सच्चिदानंद । कां नोहावे ते ॥ज्ञाने.१८.७८.१६४६ ॥
भगवान सद्गुरु श्रीस्वामी महाराजांचे सारे चरित्र पहिले की याचा वारंवार प्रत्यय येतो. त्यांच्या लीलांमध्ये असे दिसते की, त्यांच्या मुखातून आलेल्या वाक्याबरहुकूम जे चालले-वागले, त्या सर्वांचे निःसंशय कल्याणच झाले. श्रीस्वामी महाराजांच्या बखरीत जागोजागी हे पाहायला मिळते. त्यांच्या नुसत्या शब्दाखातर केवळ अशक्य, अतर्क्य गोष्टीही सहज घडून येत. 'कर्तुमकर्तुमन्यथा कर्तुम्' अशी श्रीस्वामी महाराजांची प्रचंड शक्ती आहे. त्या शक्तीला, त्यांच्या प्रचंड सामर्थ्याला उद्देशूनच, श्री गुलाबराव महाराज 'सद्गुरुवचन त्याची श्रुति ।' असे म्हणतात. आपल्या श्रीसद्गुरूंची आज्ञा जशीच्या तशी पाळायची असते, असाच महत्त्वाचा बोध श्रीमहाराज यातून आपल्याला करू इच्छितात. 

स्वामी आणि ज्ञानेश्वर ; अनादि निधान ब्रह्ममय :
सद्गुरु श्री गुलाबराव महाराज हे श्री माउलींच्या श्रीचरणीं इतके अनन्य होते की, त्यांना दुसरे कोणी आठवतच नाहीत. सर्वत्र ते श्री माउलींनाच पाहतात. येथे ते राजाधिराज श्रीस्वामी महाराजांची अतीव प्रेमाने स्तुती करीत असले, तरी श्रीस्वामी महाराजांच्या ठिकाणी ते आपल्या लाडक्या श्री माउलींनाच पाहत आहेत. ते म्हणतात ;
स्वामी आणि ज्ञानेश्वर दीनबंधु ।
मिळोनिया इंदु पूर्णरूप ॥३॥
मिळणीचे कांही नाहींचि कारण ।
अनादि निधान ब्रह्ममय ॥श्रीगु.गा.३७.४॥
भगवान श्री माउली आणि भगवान श्रीस्वामी महाराज, हे दोघेही सद्गुरूच असल्याने त्यांचे तत्त्वरूप एकच आहे. जसा पौर्णिमेचा चंद्र पूर्णरूप ; तसे हे दोघेही पूर्णपरब्रह्म आणि एकरूपच. दोघे एकरूप म्हणण्याचेही कारण नाही ; कारण दोघेही अनादी अनंत अशा परब्रह्माचे  साक्षात् सगुणरूप आहेत. म्हणून श्री माउली आणि श्रीस्वामी महाराज हे एकरूप नसून एकच होत, असे श्रीमहाराज या चरणात सांगतात. 
साधक शिष्याची अशी निष्ठा हवी की, माझे सद्गुरु हेच सर्व देवदेवता आहेत, तेच ब्रह्मा-विष्णू-महेश ; तेच परब्रह्म. खऱ्या शिष्यासाठी 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥' हीच सर्वश्रेष्ठ धारणा आहे. म्हणूनच श्रीमहाराजही येथे श्रीस्वामी महाराजांची स्तुती करताना म्हणतात ; 
श्रीज्ञानेश्वरचरणीं भक्ती तैसीच तुमच्या चरणी ।
परि ज्ञानेश्वररूपें दर्शन होईल ही करा करणी ॥ श्रीगु.गा.३३॥
श्री गुलाबराव महाराजांचा हा एकनिष्ठ दृढभाव सर्वत्रच आहे, म्हणून तर ते आपल्या श्रीस्वामी महाराजांवरील सर्वच अभंगांच्या शेवटच्या चरणांत अशीच प्रार्थना करतात की,
श्रीज्ञानेश्वर रूप धरूनी ।
शिरिं ठेवा स्वकरा ॥ श्रीगु.गा.२८.३॥
अक्कलकोट निवासिया स्वामी श्रीवरा ।
ज्ञानेश्वर रूप धरूनि पुनित मज करा ॥ श्रीगु.गा.३०.३ ॥
ज्ञानेश्वर गुरुरूप धरूनि ।
माझ्या हृदयी शिरा ॥श्रीगु.गा.३४.५॥
ज्ञानेश्वर रूप होवोनिया देवा ।
स्वीकारावी सेवा बाळकृत ॥ श्रीगु.गा.३५.५ ॥
या सर्व अभंगचरणांमधून, श्री गुलाबराव महाराजांची सद्गुरु श्री माउलींच्या ठिकाणची अनन्यशरणागती दिसते. हाही आपल्यासारख्या साधकांना एक प्रकारे महत्त्वाचा बोधच ठरावा. 
या संदर्भात मागे एकदा प.पू.सद्गुरु सौ.शकाताईंशी झालेला माझा संवाद आठवला. मी प.पू.सौ.ताईंना विचारले की, "आपण नेहमी सगळ्यांना सांगता की श्रीस्वामी महाराजांचे किंवा पू.श्री.मामांचे स्मरण करा. मला सद्गुरु श्रीस्वामी महाराज, सद्गुरु श्री.मामा महाराज यांच्याविषयी खरोखरीच पूर्ण आदर आहे ; पण जर पटकन् कोण आठवत असेल किंवा कुणाचे जास्त स्मरण होत असेल म्हणावे तर आपले व प.पू.श्री.दादांचेच होते. मला त्यांची जास्त आठवण येत नाही. हे गैर आहे काय ?" यावर प.पू.सौ.ताई स्मितहास्य करीत म्हणाल्या, "अरे, तुझ्यापक्षी ते बरोबरच आहे. आपण सतत फक्त आपल्या श्रीसद्गुरूंनाच आठवायचे असते. यात गैर काहीच नाही !"
श्रीसंत गुलाबराव महाराजही या अभंगांमधून स्वत:च्या उदाहरणाने आपल्याला देखील हाच मार्मिक बोध करीत अाहेत, असेच मला मनापासून वाटते. 

सकळही कर्म झालें प्रेमरूप :

श्रीसंत गुलाबराव महाराज सद्गुरु श्रीस्वामी महाराजांची विनवणी करताना म्हणतात ; 
दीन मी पदरी धरा स्वामी ॥ध्रु.॥
संप्रदायि मी नाहीं तरी प्रभु ।
करुणें पुनित करा ॥श्रीगु.गा.३४.२॥
अहो दयावंता स्वामीराया ! मी आपल्या संप्रदायातील नाही ; तरीही मला पदरी धरून मजवर करुणाकृपा करा.
कृपायोगें करुनिया अंगीकार ।
त्वरें द्यावा या भवीं नाभिकार ॥श्रीगु.गा.३१.३॥
देवा ; करुणेने माझा अंगीकार करून आपल्या कृपायोगाचा, महायोगाचा प्रसाद माझ्यावर करा. मला या दुस्तर भवसागराची भीती वाटते आहे ; मला नाभिकार द्या , 'भिऊ नकोस, मी आहे तुझ्या सोबत' असे आश्वासन द्या !
श्रीमहाराज श्रीस्वामी महाराजांना अशी विनंती आवर्जून करतात, कारण ;
ज्ञानेश्वरप्रभू जीवीचा जिव्हाळा ।
संतकृपा डोळा तेणें लाहे ॥श्रीगु.गा.३७.५॥
श्री ज्ञानेश्वर भगवान हे आपल्या जीवीचा जिव्हाळा होण्यासाठी, त्यांच्या श्रीचरणीं अपार प्रेम उद्भवण्यासाठी आधी संतकृपा होणे आवश्यक आहे. श्रीसद्गुरूंची करुणाकृपा झाली तरच ती प्रेमशक्ती जागृत होऊन, हृदयात अपरंपार प्रेमाचा भाव निर्माण करेल. याची पूर्ण जाणीव असल्यामुळेच, श्री गुलाबराव महाराज सद्गुरु श्रीस्वामी महाराजांना, कृपायोगें करुनिया अंगीकार । अशी कळवळून विनवणी करतात. 
सद्गुरु श्रीस्वामी महाराजांच्या करुणाकृपेमुळे त्यांचे स्वरूप आकळले आणि त्या अद्भुत दर्शनानुभवाने अतीव आनंदित झालेले श्री गुलाबराव महाराज म्हणतात;
मरण आणि जन्म गेली आटाआटी ।
पाहतांचि दृष्टी स्वामीसी या ॥१॥
सकळही कर्म झालें प्रेमरूप ।
पाहतां स्वरूप स्वामिचेचीं ॥श्रीगु.गा.३७.२॥
श्रीस्वामी महाराजांना डोळ्यांनी नुसते पाहिले, त्यांचे स्वरूपदर्शन झाले ; आणि माझ्या मागची जन्ममरण विवंचना संपली. त्यांच्या स्वरूपदर्शनाने सकळ कर्म प्रेमरूप झाले. श्री गुलाबराव महाराज येथे सद्गुरुकृपाशक्तीच्या प्रसादाचा दिव्य अनुभवच सांगतात. 
राजाधिराज श्रीस्वामी महाराजांच्या संप्रदायाची करुणामय कृपाशक्ती साधक हृदयात प्रकटली की, ती सर्वात आधी तेथे परमप्रेम प्रकट करते. तिच्या योगाने पुढे 'हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्त्वीं ॥हरि.६.४ ॥' अशी प्रेमाची उत्कट अवस्था प्राप्त होते. आणि एकदा का सर्वत्र श्रीभगवंत दिसू लागले की, तो जीवही अंतर्बाह्य प्रेमस्वरूपच होतो. म्हणून श्रीमहाराज श्रीस्वामी महाराजांच्या करुणाकृपेने आलेला आपला स्वानुभव सांगतात की, 'सकळही कर्म झालें प्रेमरूप ।'

समारोप :

भगवान सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या स्वरूपाचे, त्यांच्या अलौकिक लीलाशक्तीचे आणि त्याच्या कृपाकार्याचे श्री गुलाबराव महाराजांनी आपल्या अभंगांमधून केलेले हे स्तवन खरोखरीच अतिशय सुंदर आहे. यावर आपण सर्वांनी वारंवार मननपूर्वक अभ्यास करायला हवा. त्यातून दरवेळी वेगवेगळे अर्थधुमारे निर्माण होऊन अपार आनंद देतील. सद्गुरु श्रीस्वामी महाराज हे साक्षात् परब्रह्मच आहेत, याची यथार्थ जाणीव आपल्या हृदयात गोंदवणारे श्री गुलाबराव महाराजांचे हे विचारधन अद्भुतच म्हणायला हवे. श्रीसद्गुरूंच्या कृपेनेच त्यावर ही अल्पशी आणि वेडीवाकुडी लेखनसेवा घडली. ती सर्व सेवा राजाधिराज श्रीस्वामी महाराजांच्या श्रीपादपद्मी सादर समर्पित करतो ; आणि 'ज्ञानेश्वरप्रभूच माझ्या जीवीचा जिव्हाळा होवोत' अशी प्रेमादरपूर्वक कृपाप्रार्थना करून, 'श्रीस्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ' या पंचदशाक्षरी ब्रह्मनामाच्या सप्रेम गजरात विराम घेतो !
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481