15 Aug 2023

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील महान हुतात्म्यांप्रति सदैव कृतज्ञ

नमस्कार !!

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त परमवंदनीय मायभू भारतमातेच्या चरणीं प्रेमादरपूर्वक वंदन करतो आणि माझ्या सर्व भारतीय बंधुभगिनींना स्वातंत्र्यदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो !! 

आजचे आपले सुखी स्वातंत्र्य हे आपल्याला स्वातंत्र्यसंग्रामातील लक्षावधी हुतात्म्यांच्या दयेने मिळालेले आहे, हे आपण चुकूनही विसरता कामा नये. लहान-मोठा, तरुण-वृद्ध, शिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असे अनेक लौकिक भेद असूनही, आपल्या प्राणप्रिय मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी झपाटून गेलेल्या व वैयक्तिक सुख-वैभव वगैरे कशाचीही पर्वा न करता मृत्यूला हसत हसत कवटाळण्याचे विलक्षण धैर्य अंगी असलेल्या अगणित ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या रक्ताच्या बदल्यात हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले आहे. हे स्वातंत्र्य कोणी भीक म्हणून दिलेले नाही, आपल्याच शूरवीर पूर्वजांनी प्रचंड कष्टाने हस्तगत केलेले आहे. "दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमतीके संत तूने कर दिया कमाल ।" वगैरे सगळी खान्ग्रेसी बकवास आहे बकवास. साबरमतीच्या काठी राहणाऱ्या कोणामुळे ही भीक मिळालेली नाही, आमच्याच भारतीय पूर्वजांनी हे स्वातंत्र्य स्वकष्टाने कमावलेले आहे, हे कधीही विसरून चालणार नाही. साबरमती नसून ती तर बाबरमतीच होती. त्यामुळे 'बिना खड्ग बिना ढाल स्वातंत्र्य मिळाले' असे म्हणणे हीच मुळात खोटारडेपणाची कमाल आहे. 

मायभूमीसाठी प्राणार्पण केलेल्या हे समस्त स्वातंत्र्यवीरांनो ! आज आम्ही तुमच्या प्रयत्नांमुळे हे सुख उपभोगतो आहोत, ही तुम्हीच आम्हां सर्वांना दिलेली स्वकष्टार्जित बक्षिसी आहे. त्यासाठी आजच्या महान दिनी आम्ही सर्वजण मनापासून व साश्रुनयनांनी तुम्हां सर्वांच्या चरणीं नतमस्तक होतो आहोत. आमच्या कातडीचे जोडे करून तुमच्या पायी घातले तरी कमीच ठरतील. अर्थात् तुम्ही पण कोणत्याच लाभासाठी नाही तर निखळ प्रेमानेच हे जीवघेणे कष्ट केले होतेत, हे आम्ही पूर्णपणे जाणतो.

तुम्ही ज्या भारतमातेसाठी प्राणार्पण केलेत, ती आता जगातील एक महासत्ता झाली आहे, जगभरातील सर्व देश भारतमातेचे महत्त्व ओळखून तिच्याशी प्रेमादराने वागत आहेत. हे पाहून तुमचा ऊर नक्कीच भरून येत असेल, तुम्ही उपसलेल्या अपरिमित कष्टांचे चीज झाल्याचे समाधान तुम्हांला स्वर्गात आज लाभत असेल, याची मला खात्री आहे. 

आजच्या पिढीतील आम्हां तरुणांना तुमचे कष्ट अनुभवाने माहीत नसले तरी त्यांची अल्पशी कल्पना करण्याइतपत आम्ही नक्कीच देशप्रेमी आहोत. तुम्ही मायभूमीसाठी सांडलेले रक्त वाया जाणार नाही याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ आणि सर्व बाजूंनी आपला भारतदेश उत्तम प्रगती करेल यासाठी आम्ही पुढेही सदैव प्रयत्नशील राहू !

आजच्या दिवशी नव्हे, खरेतर रोजच तुमचे देदीप्यमान यश व अतुलनीय उपकार यांचे आम्ही कृतज्ञतेने स्मरण केले पाहिजे व आम्ही करतोही. तरीसुद्धा आजच्या दिनाचे औचित्य म्हणून पुन्हा एकदा तुम्हां सर्व हुतात्म्यांना भरलेल्या डोळ्यांनी वंदन करतो आणि "भारतमाता की जय । वन्दे मातरम् ।" अशी जोरकस ललकारी देऊन कृतज्ञता व्यक्त करून लेखणीला विराम देतो ! 

- भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील महान हुतात्म्यांप्रति सदैव कृतज्ञ...

- रोहन विजय उपळेकर.