31 May 2017

आनंद म्हणे मज झाले समाधान, गेलो ओवाळून जीवेभावे

राजाधिराज श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या प्रभावळीत फार फार मौल्यवान रत्ने, श्रीस्वामी कृपेनेच लाभलेल्या अपार तेजाने तळपताना दिसतात. या अनर्घ्य रत्नांपैकी, एक अलौकिक विभूतिमत्व म्हणजेच, सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज हे होत.
श्रीआनंदनाथ महाराज हे तळकोकणातील वालावल गांवचे, म्हणून त्यांचे आडनाव पडले वालावलकर. पुढे ते वेंगुर्ले कॅम्प परिसरात स्वामी महाराजांचे मंदिर बांधून राहू लागले. तिथेच त्यांनी १९०३ साली आजच्याच तिथीला, ज्येष्ठ शुद्ध षष्ठीला जिवंत समाधी घेतली. त्यांची आज ११४ वी पुण्यतिथी आहे.
श्री स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून श्री आनंदनाथ महाराज अक्कलकोटी दर्शनासाठी निघाले. इकडे श्री स्वामीमाउलीलाही आपले लाडके लेकरू कधी एकदा भेटते असे झाले होते. म्हणून श्री स्वामीराज महाराज स्वत:च अक्कलकोटाबाहेर येऊन एका झाडावर वाट पाहात बसले होते. श्री आनंदनाथ महाराज नेमके तेथेच येऊन जरा विसावले. झाडावरून श्री स्वामीराजांनी त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांना खूण दाखवली. आपली साक्षात् परब्रह्ममाउली समोर उभी राहिलेली पाहून श्री आनंदनाथांनी गहिवरून त्यांचे श्रीचरण हृदयी कवटाळले. श्री स्वामीरायांनीही आपल्या या अनन्यदासाच्या मस्तकी कृपाहस्त ठेवून पूर्ण कृपादान केले. तसेच तोंडातून कफाचा बेडका काढून ओंजळीत टाकला. त्या बेडक्यात इवल्याशा श्रीचरणपादुका स्पष्ट दिसत होत्या. हेच श्रीस्वामीमहाराजांनी श्री आनंदनाथांना प्रसाद म्हणून दिलेले 'आत्मलिंग' होय. आजही ते दिव्य आत्मलिंग वेंगुर्ले येथे पाहायला मिळते.
श्री आनंदनाथांनी जवळपास सहा वर्षे अक्कलकोटात श्रीस्वामीसेवेत व्यतीत केली व त्यानंतर स्वामीआज्ञेने ते प्रचारार्थ बाहेर पडले. येवल्याजवळ सावरगांव येथेही त्यांनी एक आश्रम स्थापन केला. पण त्यांचे वेंगुर्ले येथेच जास्त वास्तव्य होते.
श्री आनंदनाथ महाराज हे सिद्धहस्त लेखक व कवी होते. त्यांच्या श्रीस्वामी महाराजांवरील अप्रतिम रचना 'स्तवनगाथा' मधून प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचे 'श्रीगुरुस्तवन स्तोत्र' तर असंख्य स्वामीभक्तांच्या नित्यपठणात आहे.
शिर्डीच्या श्री साईबाबांना जगासमोर आणण्याची श्री स्वामीरायांची आज्ञा श्री आनंदनाथांनीच पूर्ण केली. श्री साईबाबा हा साक्षात् हिरा आहे, हे त्यांनीच प्रथम लोकांना दाखवून दिले.
श्री आनंदनाथांचा स्तवनगाथा फार सुरेख, भावपूर्ण आणि स्वामीस्वरूपाचे यथार्थ वर्णन करणारा आहे. आज त्यांच्या पावनदिनी त्यातील काही रचना आपण मुद्दाम अभ्यासूया. आपल्या एकूण २२८८ अभंगरचनांमधून त्यांनी स्वामीस्वरूप व स्वामीनामाचे अलौकिक माहात्म्य सुरेख आणि मार्मिक अशा शब्दांत स्पष्ट करून सांगितलेले आहे. त्यांच्या अपार प्रेमाने भारलेल्या या रचना वाचताना आपल्याही अंत:करणात स्वामीप्रेम दाटून येते व हेच त्यांना अपेक्षितही होते. "श्रीस्वामी पवाडा गाण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे", हे ते वारंवार सांगतात. त्यांच्याच रचना आज शतकापेक्षाही जास्त काळ झाला तरी स्वामीभक्तांच्या ओठी रंगलेल्या आहेत, हीच त्यांच्या अद्भुत स्वामीसेवेची पावती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
श्रीस्वामी महाराजांच्या विलक्षण अवताराचे माहात्म्य सांगताना ते म्हणतात,
अक्कलकोटीचा व्यवहारी ।
केली कलीवरी स्वारी ॥१॥
पायी खडाव गर्जती ।
भक्तवत्सल कृपामूर्ती ॥२॥
दंड कमंडलु करी ।
आला दासाचा कैवारी ॥३॥
कटी कौपीन मेखला ।
ज्याची अघटित हो लीला ॥४॥
करी दुरिताचा नाश ।
नामे तोडी माया पाश ॥५॥
आनंद म्हणे श्रीगुरुराणा ।
आला भक्ताच्या कारणा ॥११४.६॥

"अक्कलकोटातील लीलावतारी श्रीस्वामीब्रह्म हे कलियुगावर स्वारी करण्यासाठी आलेले आहेत. पायी खडावा, हाती दंड कमंडलू घेणारी ही भक्तवत्सल कृपामूर्ती दासांचा कैवार घेण्यासाठीच आलेली आहे. कटी कौपीन धारण करणारे हे साक्षात् दत्तदिगंबर अत्यंत अघटित लीला करीत भक्तांचा सांभाळ करतात, त्यांचे भक्तिप्रेम पुरेपूर आस्वादतात. या श्रीस्वामीनामाच्या निरंतर उच्चाराने सर्व पापे नष्ट होतात व भक्तांवर मायेचा प्रभावच उरत नाही. आनंदनाथ म्हणतात की, आमचा हा परब्रह्मस्वरूप श्रीगुरुराणा भक्तांसाठीच अवतरलेला आहे. म्हणून जो यांची भक्ती करील, नाम घेईल, तो या कळिकाळातही सुखरूपच राहील !"
राजाधिराज श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या अलौकिक नामाचे अद्भुत माहात्म्य सांगताना श्री आनंदनाथ महाराज म्हणतात,
स्वामी नेमधर्म उपासना कर्म ।
नामाचें तें वर्म वेगळेंची ॥१॥
जीवेंभावें ज्यानें धरियेलें नाम ।
साधे सर्व कर्म तयालागी ॥२॥
अनंत जन्मींच्या पापांचा संहार ।
नामाचा उच्चार एक वेळ ॥३॥
सर्व ते मनोरथ पूर्ण हेचि होती ।
स्वामीनामीं प्रीती ठेविलिया ॥४॥
आनंद म्हणे ऐसे धरा हें बळकट ।
नको खटपट आणिक ती ॥५॥

"विविध उपासना, नित्यनेम व धार्मिक कर्मांपेक्षाही सद्गुरुमुखाने लाभलेल्या श्री स्वामी महाराजांच्या दिव्यनामाचे वर्म वेगळेच आहे. असे श्रीगुरूंनी दिलेले स्वामीनाम जो जीवेभावे धारण करतो, प्रेमाने घेतो, त्यालाच इतर सर्व कर्मांच्या परिपूर्णतेचे सौभाग्य लाभते.
सद्गुरु स्वामीराजांचे नाम एकवेळ जरी प्रेमाने घेतले, तरी अनंत जन्मांमधील असंख्य पापांचा तत्काळ संहार होतो. स्वामीनामावर परमप्रेम बसल्यावर त्या साधकाचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. नव्हे नव्हे, त्याचे मन मनोरथ करणेच विसरून जाते. ते मनच उन्मन होऊन जाते.
म्हणूनच स्वामीशिष्य श्री आनंदनाथ सांगतात की, इतर सर्व खटपटी सोडून तुम्ही सर्वांनी हे परमदिव्य स्वामीनाम बळकट धरा, सदैव त्या नामाचेच अनुसंधान करा, यातच खरे हित आहे !"
अशा सहजसुंदर आणि अपार प्रेमभावयुक्त रचना करून जगात स्वामीनामाचा, स्वामीकीर्तीचा डंका पिटून, अवघा स्वामीभक्तिरंग उधळणा-या, सद्गुरु स्वामीचरणीं स्वत:लाच सर्वभावे ओवाळून टाकल्याने पूर्ण समाधानी झालेल्या, या स्वनामधन्य श्रीस्वामीशिष्य श्री आनंदनाथ महाराजांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग प्रणिपात.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

(अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

24 May 2017

जीव ऋणवंत होई त्यांचा

आज वैशाख कृष्ण चतुर्दशी !
सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या शिष्यपरिवारासाठी ही अतीव महत्त्वपूर्ण तिथी आहे. या तिथीचे औचित्य म्हणजे, प.पू.श्री.मामांचे उत्तराधिकारी, प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे या दोन्ही महात्म्यांची हीच जन्मतिथी आहे. एकाच परंपरेतील एकाच काळात कार्यरत असलेल्या दोन अधिकारी सद्गुरूंची जन्मतिथी एकच असणे हा किती विशेष योग आहे ! प.पू.सौ.शकाताईंचा जन्म २० मे १९४७ रोजी पुणे येथे झाला, तर प.पू.श्री.शिरीषदादांचा जन्म १३ मे १९६१ रोजी विदर्भात, बुलढाणा जिल्ह्यात जळगांव(जामोद) येथे झाला.
प.पू.सौ.शकाताईंनी स.प.महाविद्यालयातून रसायनशास्त्रात पदवी घेऊन पुढे पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी काही काळ फर्ग्युसनमध्ये व बराच काळ स.प.महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्य केले. त्याहीनंतर त्या अभिनव अभियांत्रिकी व संगणक केंद्रात अध्यापन करीत होत्या. पुढे प.पू.श्री.मामांच्या परंपरेच्या कार्यानिमित्त त्यांचे अक्षरश: जगाच्या पाचही खंडांमध्ये प्रचंड भ्रमण झाले. त्यांनी आजवर जगभरातील चाळीस हजारांहून अधिक परदेशी नागरिकांना आपल्या विलक्षण अध्यात्मसाधनेची महती पटवून साधनारत केलेले आहे. आपल्या संतवाङ्मयाचा प्रचार-प्रसार करून प.पू.श्री.मामांच्या परंपरेनुसार साधना देऊन हजारो साधकांना परमार्थपथावर अग्रेसर केलेेले आहे. पूर्णपणे अनोळखी प्रांतात जाऊन, तिथे संतवाङ्मयावर प्रवचने करून त्या लोकांना परमार्थ करण्यास प्रवृत्त करणे, हे कार्य किती कठीण असेल, याची साधी कल्पनाही आपण करू शकत नाही. पण सद्गुरुकृपेने हे अवघड शिवधनुष्य पू.सौ.ताईंनी समर्थपणे पेललेले आहे.
पू.सौ.ताईंवर राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा आहे. तसेच भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंचाही अपार प्रेमलोभ त्या निरंतर, क्षणोक्षणी अनुभवत असतात. त्यांचे अवघे भावविश्व श्रीसंत मीराबाईंच्या जातकुळीचे आहे, तितकेच वैभवसंपन्न आहे. विशेष म्हणजे त्यांची काव्य नाममुद्राही 'मीरा'च आहे. हा केवळ योगायोग नव्हे, हे तर भक्तिप्रांतातील एक अद्भुत वास्तवच !
प.पू.श्री.शिरीषदादांचे सुरुवातीचे शिक्षण यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे झाले. त्यांनी क-हाडच्या शासकीय इंजिनियरींग कॉलेज मधून बी.ई. केले. पुढे त्यांनी एम.ई. पदवी देखील मिळवली. त्याच काळात त्यांची व प.पू.श्री.मामांची भेट झाली व पौष कृष्ण षष्ठी, दि.२६ जानेवारी १९८१ रोजी श्रीनृसिंहवाडी मुक्कामी त्यांना पू.मामांकडून कृपानुग्रह व परंपरेचे उत्तराधिकारही प्राप्त झाले. पू.दादांना बालवयातच ज्योतिषादी विद्यांची सिद्धी होतीच, त्यात कालौघात असंख्य गूढविद्यांचीही भर पडली. परंतु पू.मामांच्या कृपेने त्यांचे विश्व पूर्णत:च बदलून गेले. सद्गुरुकृपेने त्या परमअद्भुत पराविद्येचेच आकलन झाल्यावर, या इतर अपरा-विद्यांची काय मिरास उरणार?
पू.मामांच्या आज्ञेने पू.दादांनी त्यावेळी नवीनच प्रकाशित होऊ घातलेल्या 'श्रीवामनराज' नावाच्या त्रैमासिकाचे संपादन करायला सुरुवात केली. तिथूनच त्यांच्या जगावेगळ्या संतवाङ्मयीन सेवाकार्यास सुरुवात झाली. आजमितीस पू.दादांच्या संपादित तसेच लिखित ग्रंथसंपदेने सव्वाशेचा आकडा पार केलेला असून, या ग्रंथांची एकत्रित पृष्ठसंख्या साधारणपणे वीस हजारांहूनही जास्तच आहे. मराठी संतसाहित्य विभागात पू.शिरीषदादा कवडे यांचे नाव त्यामुळेच सर्वाग्रणी आहे. त्यांच्या काव्याचे, अभंगांचेही संग्रह प्रकाशित झालेेले आहेत.
प.पू.श्री.शिरीषदादा आपल्या *'हंसा उडहूँ अगम को देस'* या पदसंग्रहातील एका अभंगात संतांचा महिमा सुरेख व नेमक्या शब्दांत व्यक्त करताना म्हणतात,
जाणोनी संतांचे उपकार अनंत ।
जीव ऋणवंत, होई त्यांचा ॥१॥
अनुभव चोख ठेवला बोलोनी ।
भाग्य कडसणी, साधकांसी ॥२॥
जनांचिये संगे चित्तासी अपाय ।
होती, तव पाय, तारक ते ॥३॥
धरोनिया हात, कृपे चालविती ।
अमृते प्रचिती, आली साच ॥४॥
संतांनी ग्रंथांच्या माध्यमातून आपला चोख स्वानुभवच स्पष्ट सांगून ठेवलेला आहे. हे त्यांचे अनंत उपकार पाहून आपला जीव जन्मजन्मांतरी त्यांचा ऋणवंत होतो. साधकांच्या कळवळ्याने त्यांनी किती सोपी पायवाट केलेली आहे ना ! एवढेच नाही तर, जनसंसर्गात असताना जेव्हा आपल्या चित्ताची परमार्थभूमिका गढूळ होऊ लागते, ते चित्त पुन्हा पुन्हा प्रपंचात गुंतू लागते तेव्हा हेच संतपाय आपल्यासाठी तारक ठरतात. त्यांच्या चरणीं शरण गेलेल्या जीवाला ते निगुतीने, अगदी प्रेमाने, त्याचा हात धरून आपल्या अमोघ कृपेने चालवीत जीवघेण्या प्रपंचाच्या पलीकडे सहजतेने नेतात. सद्गुरूंचे हे अद्भुत कृपापसाय सप्रेम अनुभवून 'अमृतमय' झालेली 'अमृता' (अर्थात् पू.श्री.शिरीषदादा) आपल्याला संतांचा हा विलक्षण महिमा कथन करीत आहे.
मी मुद्दाम हाच अभंग घेतला कारण, प.पू.सौ.शकाताई व प.पू.श्री.शिरीषदादा यांचेच जसेच्या तसे वर्णन यात आलेले आहे. आज बावीस वर्षे मी या दोन्ही विभूतींच्या जवळून संपर्कात आहे, त्यांची कृपा अनुभवतो आहे आणि त्यांच्या अपरंपार प्रेमवर्षावात अक्षरश: सुस्नान होत आहे. माझा हा अहंकार नव्हे, पण स्पष्ट सांगतो, या कृपाप्रेमामुळे मी खरोखरीच गर्भश्रीमंत झालेलो आहे; ही श्रीमंती कधीही कमी न होणारी आहे, कारण ती साक्षात् श्रीभगवंतांचीच शाश्वत कृपालक्ष्मी आहे !
पू.सौ.ताई व पू.श्री.दादांची समग्र ग्रंथसंपदा हे साधकांचे लळे पुरविणारे मधुर पाथेयच आहे. या पाथेयाच्या आस्वादनात साधनापथ सहजतेने आक्रमिला जातो, आजवर अनेकांचा हाच अनुभव आहे, उद्याही असणारच आहे. कारण या दोन्ही विभूतींनी आपला रोकडा स्वानुभवच मोठ्या  कळवळ्याने ग्रंथांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेला आहे. त्यामुळे त्यातून मिळणारी ऊर्जा ख-या साधकासाठी संजीवनीच ठरणार यात नवल नाही.
संतांचे वाङ्मय हे श्रीगुरुकृपेचे अलौकिक, अजर, अमर लेणे असते. त्यामुळे ते समजून घेण्यासाठी ती श्रीगुरुकृपा हेच अत्यंत आवश्यक साधनही असते. या दोन्ही विभूतींनी आपल्या प्रचंड  साहित्यातून तुम्हां-आम्हां भाविक अभ्यासकांना संतवाङ्मयाच्या आस्वादनाची ही आगळी वेगळी श्रीगुरुकृपादृष्टीच उलगडून दाखवलेली आहे. हे त्यांचे ऋण आपण कधीही फेडूच शकणार नाही, जन्मजन्मांतरी त्यांच्या त्या ऋणात राहण्यातच उलट आपले खरे हित आहे.
आज माझ्या या परमप्रेमळ सद्गुरुद्वयीचा पुण्यपावन जन्मदिन आहे. त्यांचे कृपाऋण हेच माझे अनर्घ्य वैभव आहे आणि तीच माझी मिराशी देखील ! देवा, आम्हां लेकरांवर असाच आपला कृपावर्षाव निरंतर होत राहो, हीच आपल्या महन्मंगल श्रीचरणीं सादर प्रार्थना !
जन्मदिवस जरी या महात्म्यांचा असला, तरी त्याचे बक्षीस तुम्हां-आम्हां लेकरांनाच मिळणार आहे. म्हणून सरतेशेवटी प.पू.श्री.दादांच्याच शब्दांत, श्रीसद्गुरूंच्या श्रीचरणीं पसायदान मागतो.
खंड पडो नेदी चालविल्या नेमा ।
अगा मेघश्यामा, पांडुरंगा ॥१॥
संधिकालामाजी कृपेचे साधन ।
कीर्तन पूजन, निरंतरी ॥२॥
अतिथीसंतोष ब्राह्मणा आदर ।
सेवेसी तत्पर, संतांचिया ॥३॥
बांधव भगिनी, श्रीगुरु सेवका ।
वाढो एकमेका, प्रेमभाव ॥४॥
नामाचा विसर, नको क्षणभरी ।
अमृते पदरी, नित्यदान ॥५॥
खरेतर पू.सौ.ताई व पू.श्री.दादांना त्यांची स्तुती केलेली अजिबात आवडणार नाही, हे माहीत असूनही ही शब्द पुष्पांजली मी अर्पण करतोय. अहो, दोघांचेही एवढे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत, पण एकातही त्यांची बोटभरसुद्धा वैयक्तिक माहिती नाही की फोटो नाहीत. त्यांनी जन्मभर आपल्या सद्गुरूंचाच उदोकार केलेला आहे आणि त्यातच त्यांना अपरंपार आनंद आहे. *"माझे असतेपण लोपो । नामरूप हारपो ।"* ही सद्गुरु श्री माउलींची श्रुती पू.सौ.ताई व पू.श्री.दादांचे ब्रीदवाक्यच आहे जणू. तरीही माझ्या मायबापांचे गुणगान करण्याचा माझा हक्क आहे आणि कर्तव्य देखील. शिवाय आजचा दिवसही मोठा भाग्याचा आहे. म्हणून मी धारिष्ट्य करून ही अनधिकार सेवा समर्पित करीत आहे. माउली म्हणतातच ना, बाळ बोबडे बोलले, वाकडे विचके चालले तरी त्याचा मायबापांना आनंदच होतो, त्याचे कौतुकच केले जाते. म्हणून त्याच आधारावर ही सेवा आपल्या श्रीचरणारविंदी विदित करतोय; देवा, गोड मानून घ्यावी व मज लेकराला, *"करीन तळहात साउली ।"* असाच वरप्रसाद द्यावा हीच आजच्या परमपावन पुण्यदिनी कळकळीची प्रार्थना !!
श्रीसद्गुरुनाथ महाराज की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

21 May 2017

आदिशक्ती मुक्ताबाई



आज वैशाख कृष्ण दशमी, श्रीज्ञानेश्वरभगिनी ब्रह्मचित्कला सद्गुरु श्रीसंत मुक्ताबाई महाराजांचा ब्रह्मलीन दिन !
श्री मुक्ताबाई या फार थोर विभूतिमत्व होत्या. अश्विन शुद्ध प्रतिपदेला, घटस्थापनेला पृथ्वीतलावर आविर्भूत झालेल्या त्या साक्षात् आदिशक्ती भगवती श्रीजगदंबाच होत्या. त्यांचे वर्णन करताना सर्वच संत गहिवरून जातात, ते उगीच नाही.
श्रीसंत मुक्ताईंच्या अलौकिक स्वरूपात; मातेचे वात्सल्य, कारुण्याचा परमोत्कर्ष, भगिनीचा अवखळपणा, श्रीगुरुकृपेचे शांभव समाधी-वैभव, अखंड स्वरूपस्थितीचा अपूर्व आविष्कार, स्वानुभूत ज्ञानाचा निरंतर वाहणारा झरा व त्यामुळे प्राप्त झालेला परमार्थप्रांतातला लोकविलक्षण अद्वितीय अधिकार, अखंड आत्मतदाकारतेमुळे आलेली जगाविषयीची एक मस्तवाल बेफिकिरी अर्थात् अवधूती मस्ती यांसारख्या अनेक गोष्टी एकाच वेळी प्रकटलेल्या पाहायला मिळतात. म्हणूनच सगळे संत त्यांना "आदिशक्ती मुक्ताबाई" असे अतीव गौरवाने म्हणतात.
भक्तश्रेष्ठ नामदेवांसारख्या महात्म्याला, भक्तीत न्यून ठरणारा अल्पसा अहंकारही स्पष्टपणे दाखवून देण्याची हिंमत बाळगणारी लहानगी मुक्ताई त्यांना "सणकांडी" भासली तर नवल नाही. सणकांडी म्हणजे तडतडणारी प्रकाशमय फुलबाजी. चौदाशे वर्षे योगसाधनेने जिवंत राहिलेल्या श्री चांगदेवांना, सिद्धींच्या नादात आयुष्य व्यर्थ गेले असे ठणकावून सांगून श्रीगुरुकृपेचे खरे माहात्म्य पटवून देणारी आणि वर ती अद्वयानंद वैभव असणारी श्रीगुरुकृपा प्रदान करून परिपूर्ण करणारी ही ब्रह्मचित्कला खरोखरीच अवर्णनीय व अद्भुत आहे. प्रत्यक्ष आपल्या सद्गुरूंना, श्री ज्ञानेश्वर माउलींनाही, आपल्या जन्म-कर्माचे भान सुटू नये म्हणून विनम्रपणे ताटीचे अभंग रचून बोध करणा-या या श्री मुक्ताईंचे अवघे विश्व, आपल्या सारख्यांच्या सामान्यांच्या बुद्धीला अनाकलनीय आहे, शब्दांच्या पलीकडचे, त्यांच्या कवेत न मावणारे आहे. त्या साक्षात् आदिशक्तीच आहेत, हेच त्यांच्याकडे पाहून वारंवार मनापासून पटते.
भगवान श्री माउलींनी संजीवन समाधी घेतल्यानंतर महिन्याभराने मार्गशीर्षात सासवडला श्री सोपानदेवांनी समाधी घेतली. त्यानंतर पुणतांब्याला श्री मुक्ताईंचे स्वनामधन्य शिष्य श्री चांगदेवांनीही माघातील महाशिवरात्रीला समाधी घेतली. त्यासुमारास श्री मुक्ताईंना स्वरूपाची फार ओढ लागली असल्याचे सर्व संतांना जाणवू लागले. म्हणून श्री निवृत्तिनाथांनी मुक्ताईला, "कोणत्या दिवशी तू गमन करणार ?" असे विचारले. त्यावर मुक्ताईंनी दिलेले उत्तर त्यांचा पारमार्थिक अधिकार स्पष्टपणे सांगणारे आहे. त्या म्हणतात,
आमुच्या स्वस्थानीं नाहीं पा अंधार ।
अवघे चराचर प्रकाशत्वें ॥१॥
उदय आणि अस्तु नाही स्वरूपासी ।
ऐसे मुनिऋषी जाणताती ॥२॥
आम्ही कधीं आलो स्वरूप सोडोन ।
जावे पालटोन जेथील तेथे ॥३॥
अंतर बाहेर स्वामींचें स्वरूप ।
स्वयें नंदादीप उजळिला ॥४॥

"श्रीसद्गुरुराया, आमच्या नित्यवसतीच्या स्थानी कसलाच अंधार नाही, तेथील सगळे विश्वच प्रकाशरूप आहे. आमच्या निरंतर अनुभूतीला येणा-या आत्मसूर्याला लौकिक सूर्याप्रमाणे उदय-अस्त नाहीत, तो अखंड उदितच आहे. आम्ही कधी आमचे स्वरूप सोडून आलो म्हणून आम्हांला तेथे पुन्हा जायची गरज? आमच्या श्रीगुरुस्वामींचेच अपरंपार व आनंदमय स्वरूप, त्यांच्याच कृपेने प्रकटलेल्या शांत-स्निग्ध बोधदीपाच्या तेजात आमच्या नित्य अनुभूतीला सर्वत्र प्रतीत होत असल्याने, सर्व ठिकाणी, सर्व काळी तो ब्रह्मानंदोत्सवच आम्ही अविरत साजरा करीत आहोत. तेव्हा जाणे-येणे हा आमच्यासाठी केवळ एक उपचार मात्रच आहे." काय ही अनुभूतीची सखोलता !! श्रीगुरुकृपेने आकळलेला शांभव बोध सर्वांगी धारण करून त्या बोधाचा परिपाक असणारी ही निरालंब स्वानंदस्थितीच जणू श्री मुक्ताई हे नामरूप धारण करून प्रकटलेली होती. खरोखरीच धन्य त्या श्री मुक्ताई !!
श्रीसंत मुक्ताबाईंची अभंगसंपदा अल्प असली तरी त्यांच्याच स्वरूपासारखी अत्यंत गूढ-गहन आहे. सर्वसामान्यांच्या आकलनकक्षेच्या कैक योजने दूर असणारे हे शब्दधन केवळ श्रीगुरुकृपेच्याच बळावर आपल्या बुद्धीत प्रकाशते, म्हणून त्याचे मोल अनन्यसाधारण आहे. श्रीसंत मुक्ताबाईंच्या *"मुंगी उडाली आकाशी ।"* या सुप्रसिद्ध पण अत्यंत गहन अभंगावर श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराजांच्या अधिकारी शिष्या, प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांनी फार सुरेख प्रवचनसेवा केलेली आहे. श्रीवामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे लहानसेच पण विलक्षण पुस्तक, श्रीसंत मुक्ताबाईंचा सर्वार्थाने थोर अधिकार व त्यांच्या "सांगण्याची" खोली आपल्याला जाणवून देण्यात समर्थ आहे. हा अभंग वाचून एखाद्याला त्याचा सरळ अर्थही सांगणे शक्य नाही. पू.सौ.ताईंनी तर त्याचा अद्भुत योगार्थही अप्रतिमरित्या समजावून सांगितला आहे. भगवती कुंडलिनी शक्तीच्या कार्याचे मार्मिक वर्णन करणा-या श्री मुक्ताबाईंच्या या कूट अभंगाचे हे विवरण नक्कीच वाचनीय, नित्य चिंतनीय आहे. ( मुंगी उडाली आकाशी : श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. सवलत मूल्य: ₹ २० /-)
प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी देखील विविध संतांच्या अभंगांवरील आपल्या "अभंग आस्वाद" या सुरेख ग्रंथमालेतील दुस-या भागात श्रीसंत मुक्ताबाईंच्या आठ अभंगांचे अर्थ-विवरण केलेले आहे. ह्याही अभंगांमधून श्री मुक्ताई महाराजांचा जबरदस्त अधिकार स्पष्ट दिसून येतो. ( अभंग आस्वाद - भाग दुसरा, सवलत मूल्य, ₹ - ३५/- )
भगवान श्री माउलींबरोबर अद्भुत कार्य करण्यासाठीच भगवती जगदंबेने, शके १२०१, इ.स.१२७९ मध्ये अश्विन शुद्ध प्रतिपदेला, मध्यान्ही आळंदीच्या सिद्धबेटावर मुक्ताई रूपाने परिपूर्ण अवतार धारण केेला. त्यांचे तडफदार वागणे-बोलणे, त्यांची रोकडा ब्रह्मानुभव सांगण्याची हातोटी, त्यांचे नित्य सहजसमाधीतील वर्तन, त्यांचे प्रेमळ उपदेशन; आणि सरतेशेवटी त्यांचे जगावेगळे, अद्वितीय असे देहविसर्जन; सारे सारे खूप विलक्षण आहे. तेथे आपल्याला केवळ साष्टांग दंडवतच करणे तेवढे शक्य आहे व तेच आपल्या परमभाग्याची परिसीमा देखील !
तापी तीरावरील पुरातन तपोभूमी असलेल्या मेहूण गावी आजच्या तिथीला श्रीमुक्ताई ब्रह्मलीन झाल्या. ही आदिमाया जशी प्रकटली तशीच नकळत स्वरूपी मिसळली देखील ! मनोहर नभात अंकुरलेल्या विराटाच्या गाभ्यात वीज कडाडली, तशी ही भूलोकीची तेजस्वी ज्ञान-शलाका आपल्या मूळ स्वरूपात सर्वांच्या देखत, पण कोणाच्याही नकळत विरून गेली. मागे उरले ते त्यांचे *"मुक्ताबाई"* हे पावन नाम, त्यांनी लीलया प्रकट केलेले अलौकिक अक्षरधन आणि त्यांच्या परमपावन लीला-कथा. त्या पापहारक नाम-रूप, वाङ्मय व कथांच्या सप्रेम स्मरणाने आजच्या पुण्यदिनी आपणही पावन होऊया  !!
श्रीसंत एकनाथ महाराज श्री मुक्ताबाईंचा यथोचित गौरव करताना अतीव प्रेमभराने म्हणतात,
मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ ।
सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती ॥
'मुक्ताबाई' चतुर्विधा ।
जो जप करील सदा ।
तो जाईल मोक्षपदा ।
सायुज्यसंपदा पावेल ॥
जय मुक्ताई माउली !!
[ पुस्तकांसाठी संपर्क -
श्रीवामनराज प्रकाशन, पुणे
© 02024356919
contact@ssmandal.org ]
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

9 May 2017

विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ- श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख नववा - सानंद सांगता

आज वैशाख शुद्ध चतुर्दशी, भक्तवत्सल भक्ताभिमानी प्रल्हादवरद भगवान श्रीनृसिंहराजांची जयंती  !! तुम्हां आम्हां श्रीनृसिंह-पदसेवकांसाठी परम आनंदाचा दिन.
"न मे भक्त: प्रणश्यति ।" ही  साक्षात् भगवंतांची प्रतिज्ञा आहे. "माझे भक्त कधीच नाश पावत नाहीत", असे स्वत: भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभू गीतेत उच्चरवाने सांगतात. त्यांच्या त्या सत्यप्रतिज्ञेचेच साकार रूप म्हणजे हा परमकरुणामय श्रीनरहरी अवतार होय  !!
श्रीभगवंतांचे अत्यंत लाडके जर कोणी असतील तर ते केवळ त्यांचे अनन्यभक्तच असतात, हे त्रिवार सत्य आहे. त्यांचे जेवढे प्रेम आपल्या भक्तांवर असते, तेवढे स्वत:वरही नसते. जीवप्राणाने अनुसरणारे भक्त साक्षात् भगवंतांचे हृदय अधिष्ठाते असतात. एका क्षणासाठीही भगवंतांना त्यांचा विरह सहन होत नाही. भक्तांसाठी ते कोणत्याही थराला जाऊन कार्य करू शकतात. श्रीनृसिंह अवतार हे त्याचे समर्पक उदाहरण आहे. प्रल्हादजींसाठी भगवंतांनी नर व सिंहाचा एकत्रित अवतार धारण केला. ऐसा पूर्वी न ऐकिला न देखिला । हेच भगवंतांच्या परमप्रेमाचे द्योतक नव्हे काय?
श्रीभगवंतांच्या प्रत्येक अवताराचे एक एक वैशिष्ट्य असते. श्रीरामावतारात मर्यादा तर श्रीकृष्णावतारात प्रेम हेच मुख्यप्राण आहेत. तसे या अभिनव श्रीनृसिंह अवतारात भक्तकरुणा किंवा भक्तवात्सल्य हेच प्रधान वैशिष्ट्य आहे. भक्तांचे सर्व बाजूंनी संरक्षण करणे, हेच त्यांचे मुख्यब्रीद आहे. म्हणूनच खरेतर अत्यंत उग्र, भीषण, भयानक असला तरी हाच देवबाप्पा आम्हांला खूप जवळचा, हवाहवासा वाटतो.
भगवान श्रीकृष्ण व ऋषींच्या संवादातील एक 'श्रीनृसिंहस्तवराज स्तोत्र' सुप्रसिद्ध आहे. त्यात शेवटी प्रसन्न झालेले भगवान श्रीनृसिंह प्रकट होऊन एक विशेष वर देताना म्हणतात,
भो भो भक्तवरा: सर्वे श्रृणुध्वं वरमुत्तमम् ।
अहं भक्तपराधीनो अन्येषामतिदुर्लभ: ॥

" माझ्या सर्व श्रेष्ठ भक्तांनो, माझा उत्तम वरप्रसाद ऐका, मी माझ्या भक्तांच्या आधीन आहे, प्राप्त करून घ्यायला इतरांसाठी मात्र मी अत्यंत अवघड आहे  !" येथे प्रत्यक्ष भगवान श्रीनृसिंहच आपल्या अवताराचे मार्मिक रहस्य स्वमुखाने सांगत आहेत.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउली या विलक्षण अवताराचे माहात्म्य सांगताना म्हणतात, "भक्तांच्या भल्यासाठीच हा नरहरी अवतार स्तंभामधून प्रकट झाला. अत्यंत भव्य-दिव्य अशा नृसिंह रूपात प्रकटलेले हे हरितत्त्व दुसरे तिसरे काही नसून वेदांनाही ज्याचा थांग कधी लागला नाही तेच साक्षात् परिपूर्ण परब्रह्मच आहे."
आपण गेले नऊ दिवस ज्या श्रीनृसिंह भगवंतांची ही शब्दपूजा बांधत आहोत, ते अहेतुकदयानिधी, भक्तहृत्कमलविहारी श्रीनृसिंहप्रभू, या लेकुरवाचेने अर्पिलेल्या भातुकलीच्या नैवेद्याने संतुष्ट होऊन आपल्या सर्वांवर कृपाप्रसाद करोत, हीच कळकळीची प्रेमभावना या शेवटच्या सांगतेच्या लेखात त्यांच्या अम्लान श्रीचरणीं सर्वांच्या वतीने निवेदितो. गेले नऊ दिवस या निमित्ताने आपण कळत नकळत पण सतत भगवान श्रीनृसिंहदेवांच्या नित्य अनुसंधानातच आहोत, हे भाग्य काय थोडे आहे?
भगवान श्रीनृसिंहराज प्रभू हे किती दयाळू आहेत? याचे आजवर सर्वश्रेष्ठ अशा वेदांनाही वर्णन करणे शक्य झालेले नाही. या संदर्भात श्रीनृसिंह पुराणात एक गमतीशीर कथा येते. एक आचारभ्रष्ट झालेला ब्राह्मण एकदा तीव्र कामवासनेने एका स्त्रीला घेऊन जंगलात जातो. तेथे कामक्रीडेसाठी त्याला एक पडकी जागा सापडते. तो ती स्वच्छ करतो व आपला कार्यभाग साधतो. त्याच्या लक्षातही येत नाही की ती पडकी जागा हे प्राचीन नृसिंह मंदिर असते. तेवढ्यातच त्याला मृत्यू येतो. पण अशा पापी जीवाला न्यायला जेव्हा यमदूत येतात, तेव्हा त्यांना तेथेच पुण्य पावन विष्णुदूतही आलेले दिसतात. त्या दोघां दूतांमध्ये संवाद होतो व ते विष्णुदूत सांगतात की, या पापी भक्ताचे सर्व पाप केवळ एकदा नृसिंह मंदिराची स्वच्छता केल्याने भगवंतांनी नष्ट केलेले अाहे. तसेच त्याला विष्णुलोकाला आणण्याची भगवंतांची आज्ञाही आहे. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे सांगतात की, तेव्हापासूनच नृसिंह उपासनेत मंदिराची स्वच्छता हा एक प्रभावी सेवाप्रकार रूढ झालेला आहे. या एवढ्याशा सेवेनेही भगवंत प्रसन्न होऊन कृपाप्रसाद करतात. श्रीनृसिंह उपासना तशी खूपच सोपी अाहे. श्रीनरहरीरायांना पांढरी सुगंधी फुले व तुळशीपत्रे अतीव प्रिय आहेत. त्यामुळे जो कोणी मनापासून त्यांचे नाम घेत एकेक पांढरे सुगंधी पुष्प किंवा तुलसीपत्र त्यांना अर्पण करतो, त्याच्यावर ते प्रसन्न होतात. एखाद्याजवळ नृसिंहमूर्ती किंवा प्रतिमा नसली तरी हरकत नाही, कागदावर अष्टगंधाने "श्रीनृसिंह" असे लिहून त्यावर फुले-तुळशीपत्रे वाहिली तरी चालतात. श्रीनृसिंह भगवंत तेही प्रेमाने स्वीकारतात. बघा, किती सोपी उपासना आहे ना ही तर ! आवळा घेऊन कोहळा देण्याचाच हा प्रकार नाही का? अल्पशा स्वार्थप्रेरित सेवेनेही भगवान श्रीनृसिंह संतुष्ट होऊन किती भरभरून फळ देतात पाहा. म्हणूनच त्यांच्याठायी विलसणा-या याच अद्वितीय करुणारसपूर्ण स्वभावाचे, त्यांच्या भक्तपराधीनत्वाचे, वात्सल्याचेच सर्व संत वारंवार वर्णन करतात.
आज त्या परमकारुणिक श्रीनरहरी अवताराची जयंती आहे. आजच्या सूर्यास्ताला हे करुणाब्रह्म पुन्हा अवतरणार आहे, आपल्यावर अपरंपार कृपावर्षाव करण्यासाठी ! म्हणून त्यांना अतिप्रिय असणा-या त्यांच्या सप्रेम स्मरणात आपण रममाण होऊन त्यांची प्रार्थना करूया की, "देवा, सततच्या प्रापंचिक विषयांनी लिप्त झालेल्या आमच्या अशुद्ध चित्तातील, काम-क्रोध-लोभ-मोह-मद व मत्सररूपी  हिरण्यकश्यपूचे विदारण करण्यासाठी आपण लवकरच आविर्भूत व्हावे व आम्हांला आपल्या भक्तिप्रेमाचे दान देऊन, भक्तश्रेष्ठ प्रल्हादांप्रमाणे कृपाछत्र घालून आमचाही उद्धार करावा." हाच श्रीनृसिंहजन्माचा खरा आनंदोत्सव असून, तो सद्गुरुकृपेने नक्कीच सुफलित होईल, असा मला दृढ विश्वास आहे 
भगवान श्री माउलींची एक ओवी आहे. त्यात ते भक्तवर प्रल्हादांची भगवंतांच्या तोंडून महती गातात की, "माझे नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमें ॥" त्या माझ्या लाडक्या भक्तासाठीच केवळ मी हे रूप धारण केलेले आहे. माझे हे नृसिंहरूप 'लेणे' म्हणजेच अलंकार आहे. तोही मी माझ्या भक्ताचे माहात्म्य वाढविण्यासाठीच घातलाय. सुंदर दागिन्यांनी जशी मूळच्या सौंदर्यात आणखी वाढ होते, तसे या नृसिंहरूपामुळे षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीभगवंतांच्या गुणगणांमध्ये भक्तवात्सल्य या थोर गुणाचा प्रकर्षाने समावेश होऊन देवांचे सद्गुणसौंदर्य आणखी वाढलेले आहे.
आईच्या प्रेमावर खरा हक्क तिच्या अबोध बाळाचाच असतो. तसे या भगवंतांच्या प्रेमावर तुम्हां आम्हां भक्तांचाच खरा हक्क आहे, फक्त आपण सर्वार्थाने आईला शरण जाऊन, ती ठेवेल तसे राहणारे, केवळ तिचीच आस असणारे बालक व्हायला हवे. हेच बालकत्व भक्तश्रेष्ठ प्रल्हादांनी निरंतर जपले म्हणून अनावर, अपार असे उग्र-भीषण श्रीनृसिंह भगवंत कायमचे त्यांचेच होऊन राहिले. 'प्रल्हादवरद' असे बिरुद ते दयाळू भगवंत आजही अभिमानाने मिरवीत आहेत. भक्तीचे अलौकिक श्रेष्ठत्व यापरते काय सांगणार?
आजच्या या पावन पर्वावर भक्ताग्रणी श्रीप्रल्हादजींच्या श्रीचरणीं आपण सर्वजण एकच मागणे मागूया की, "देव आपलासा कसा करावा? याचे यथार्थ ज्ञान आपण कृपापूर्वक आमच्या हृदयात प्रतिष्ठापित करावे व भक्तकरुणाकर श्रीनृसिंह भगवंतांचा खरा आविर्भाव आमच्या हृदयकोशात करवून त्यांना कायमचे तेथेच स्थिर करावे. आपण त्यांच्यासाठी आहात व ते आपल्यासाठीच आहेत, म्हणून ते आपल्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. तेव्हा आमची दया येऊ द्यावी व आम्हांलाही तुमच्यासारखी प्रत्यक्ष  "नृसिंहजयंती" लवकरात लवकर साजरी करण्याची सुवर्णसंधी प्रदान करावी !"
नृसिंहकवचात भगवान श्रीशंकर म्हणतात,
कुतो भीति: कुतो मृत्यु: कुतस्तस्य दरिद्रता ।
मृत्योर्मृत्यु: रमानाथो यस्य नाथो नृकेसरी ॥

भगवान श्रीनृसिंहांच्या भक्तांना ना मृत्यूची भीती ना दारिद्र्याची. मृत्यूचाही मृत्यू असणारे भगवान श्रीनृसिंह ज्यांचे स्वामी आहेत, त्यांच्या भाग्याची तुलना कशाशी करणार?
म्हणूनच आजच्या या नृसिंहजयंती पर्वावर, श्रीसद्गुरुकृपेने गेले नऊ दिवस निर्माण झालेली ही नवविधा भक्तीरूपी सुगंधी श्वेत पुष्पे, परमप्रेमादरे भगवान श्रीनृसिंहप्रभूंच्या श्रीचरणीं त्यांच्याच पावन नामाच्या गजरात समर्पूया व आत्मनिवेदन साधून धन्य होऊया ! सरतेशेवटी ज्ञानी ऋषींनी स्तवराजात मागितलेलाच वरप्रसाद मागून भगवान श्रीनरहरीरायांच्या परममंगलमय श्रीचरणीं तुलसीदल रूपाने कायमचे विसावूया !!
यदि नोऽसि प्रसन्नस्त्वं देवदेव कृपानिधे ।
त्वमेव नितरां देहि त्वयि भक्तिं दृढां प्रभो ॥

देवा नरहरीराया, जर तुम्ही आमच्यावर प्रसन्न झालेला असाल, तर आपली निर्मळ दृढभक्तीच आम्हांला कृपापूर्वक प्रदान करून आमचा उद्धार करा !"
देवा, आपणच हे आपले गुणगान मज अज्ञ लेकराकरवी करवून घेतलेत, माझी काहीच लायकी नसताना. कशीही का असेना, पण आपण सेवा करवून घेतलीत हे भाग्य माझ्यासाठी अतुलनीयच आहे व त्याच कृपाऋणात जन्मजन्मांतरी राहण्याचीच एकमेव इच्छा माझ्या हृदयात आहे. तुमचा आवेश तात्कालिक होता हे लोक म्हणतात खरे; पण मला तरी तसे अजिबात वाटत नाही. आजही तेच परममंगलकारक रूप धारण करून तुम्ही अनंतकोटी भक्तांच्या हृदयातील प्रेमभाव आस्वादत आहात. तुम्ही उदारांचे शिरोमणी आहात, द्यायला बसलात तर अवघे त्रैलोक्यही सहज देऊन टाकाल एखाद्याला, तुमच्या प्रेमाचा काहीच नेम नाही. तेव्हा श्री नरहरीराया, मी आपल्या श्रीचरणीं सदैव विनीत आहे, आपल्याला हवे तसे, हवे त्याप्रमाणे माझ्याकडून सेवाकार्य करवून घ्यावे, परंतु देवा, आपुल्याच द्वारीचा कुत्रा बनवून ठेवावे, तुमचे प्रेम द्या, बास ! बाकी काहीही नको मला. सद्गुरुस्वरूप श्रीनरहरीराया, हा दीनदास रोहन आपल्या चरणीं इतकेच मागणे मागतो आहे, नाही म्हणू नका. मला तरी ज्यांना काही मागावे असे अजून कोण आहे अापल्याशिवाय?
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
( छायाचित्र संदर्भ : उपळेकर घराण्यातील पुरातन असा व  प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या नित्यपूजेतील भगवान श्रीनृसिंहांच्या आविर्भाव-लीलेचे सम्यक दर्शन घडविणारा चांदीचा देखणा व रेखीव टाक. श्रींच्या या मनोहर रूपाचे आज नृसिंहजयंती निमित्त मनोभावे दर्शन घेऊया !)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

8 May 2017

विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख आठवा

श्रीमद् भागवत महापुराणामध्ये भगवान श्रीनारायणांच्या चोवीस अवतारांचे वर्णन आलेले आहे. सर्वसामान्यपणे आपल्याला "मत्स्य, कूर्म, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध व कल्की" हेच दशावतार माहीत आहेत. या दहांबरोबरच अजून चौदा अवतार श्रीमद् भागवतात सांगितलेले आहेत. हे सर्व अवतार श्रीभगवंतांचे  कलावतार, अंशावतार किंवा पूर्णावतार आहेत. हा वैशाख महिना खरेतर श्रीभगवंतांचा जन्ममास म्हणूनच गणायला हवा. कारण या चोवीस अवतारांपैकी, श्री परशुराम (शुद्ध तृतीया), श्री व्यास (शुद्ध त्रयोदशी), श्री नृसिंह (शुद्ध चतुर्दशी), श्री कूर्म (पौर्णिमा), बौद्ध (पौर्णिमा), श्री नारद (कृष्ण प्रतिपदा) या सहा अवतारांची जयंती वैशाखातच येते. शिवाय काल द्वादशीला श्रीभगवंतांचा आविर्भाव दिवस होताच. म्हणून हा महिना वैशिष्ट्यपूर्णच म्हणायला हवा.
या चोवीस अवतारांपैकी भगवान श्री वेदव्यासांना श्रीभगवंतांचा कलावतार मानतात. श्रीगुरुचरित्रात त्यांच्या अवताराचे कारण सांगताना म्हटले आहे की, "वेदव्यासाऐसा मुनी । नारायण अवतरोनि । वेद व्यस्त करोनि । 'व्यास' नाम पावला ॥२६.२॥" प्रत्यक्ष श्रीनारायणांनीच भगवान वेदव्यासांच्या रूपाने कलावतार धारण करून वेदांचे प्रचंड मंत्रजाळ सुटसुटीत अशा चार विभागांमध्ये विभागून, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद असे चार वेद निर्माण केले. याच वेदव्यासांनी पुढे मुख्य अठरा पुराणांची व काही उपपुराणांचीही रचना केली. श्रीमन् महाभारतासारखी अलौकिक ग्रंथनिर्मिती पण त्यांनीच केलेली आहे. अर्थात् आज उपलब्ध असलेल्या पुराणांच्या संहितांमध्ये नंतरच्या काळात काही भर पडलेली आहे, हेही नाकारता येत नाही. तरीही परंपरेने भगवान वेदव्यासांनाच या पुराणांचे कर्ते मानले जाते. म्हणूनच, त्यांचा यथोचित गौरव करताना भगवान श्री माउली म्हणतात, "म्हणऊनि महाभारतीं नाहीं । तें नोहे लोकीं तिहीं । येणेंकारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्त्रय ॥ज्ञाने.१.०.४७॥" महाभारतात एकही विषय सुटलेला नाही. त्यामुळे जे महाभारतात नाही, ते तिन्ही लोकांत अस्तित्वातच नाही; म्हणूनच या स्वर्ग, मृत्यू व पाताळरूप त्रिजगताला भगवान श्री व्यासांचे उच्छिष्टच म्हणतात. त्या भगवान महामती व्यासदेवांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या श्रीचरणीं कृतज्ञतापूर्वक दंडवत घालून आपण त्यांचीच सुरेख निर्मिती असलेल्या श्रीनृसिंहपुराणाचा थोडक्यात परिचय करून घेऊया !
श्रीनृसिंह पुराणाची गणना उपपुराणांमध्ये केली जाते. तरीही हे पुराण नक्कीच प्राचीन आहे. भगवान आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी याचा उल्लेख आपल्या विष्णुसहस्रनामाच्या भाष्यातही केलेला आहे, त्यावरून याचे महत्त्व लक्षात येते. श्रीनृसिंह पुराणात एकूण अडुसष्ट अध्याय असून त्यातून श्रीनृसिंह दैवताच्या स्वरूपाचा व उपासनेचा सर्वांगीण विचार मांडलेला आहे. काही काही विलक्षण संदर्भही यात आलेले आहेत. पुढे कधीतरी आपण सविस्तर या पुराणावरच एक स्वतंत्र लेखमाला प्रकाशित करू, तूर्तास एवढीच थोडी माहिती देत आहे.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादांसाठी प्रकटलेला हा 'आवेश' अवतार मोठा विलक्षणच आहे. श्रीनृसिंह पुराणामध्ये भक्त प्रल्हाद व भगवंतांचा फार सुंदर आणि भावपूर्ण असा संवाद त्रेचाळिसाव्या अध्यायात आलेला आहे. भगवद् भक्तांचे अंत:करण किती वैशिष्ट्यपूर्ण असते, याचा सुखद प्रत्यय या कथेतून आपल्याला वाचायला मिळतो.
हिरण्यकश्यपूने आपल्या दूतांना प्रल्हादाला नागबंधनात जखडून समुद्रात नेऊन टाकण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे त्या राक्षसांनी प्रल्हादाला रात्रीच्या वेळी गाढ समाधी अवस्थेत असतानाच बांधून नेऊन समुद्रात टाकले. प्रल्हाद समाधीच्या आनंदसागरात रममाण असल्यामुळे त्यांना समजलेच नाही की आपण खा-या पाण्याच्या समुद्राच्या तळाशी पोचलेलो आहोत. समुद्रदेवानेच स्वत: प्रल्हादांना किना-यावर आणले. तोवर ते समाधीतून जागे झाले व त्यांचा समुद्रदेवाशी संवाद झाला. भगवंतांच्या साक्षात् दर्शनाची प्रल्हादांची तीव्र तळमळ जाणून समुद्राने त्यांना भगवंतांचे स्तुती-गान करण्याचा सल्ला दिला. प्रल्हाद तेथेच रात्रभर व्याकूळ अंत:करणाने श्रीभगवंतांना आळवीत बसले.
शेवटी भगवान नारायणांनी त्यांना पहाटे प्रत्यक्ष दर्शन दिले. त्यावेळी देवांनी अत्यंत प्रेमभराने प्रल्हादांना वर माग म्हटले. प्रल्हाद म्हणाले की, "देवा, मला तुमचे दर्शनच सतत हवे असते. ते मिळाल्यावर, त्यापेक्षा काय मोठे असे आणखी मागू?" देव म्हणाले, तरीही काहीतरी मागच. त्यावर प्रल्हाद म्हणाले, "मला जन्मजन्मांतरी गरुडाप्रमाणे आपला दास करून ठेवा." त्यावर देव म्हणाले, "काय कठीण समस्या ठेवलीस समोर? मीच मला तुला देऊन टाकायची, तुझ्याच स्वाधीन होण्याची इच्छा बाळगतोय आणि तुला माझे दास व्हायचे आहे. आणखी दुसरे काहीतरी माग."
त्यावर भक्तश्रेष्ठ प्रल्हाद फार सुंदर म्हणतात, "देवा, वर द्यायचाच असेल तर, माझी आपल्या ठिकाणी सात्त्विक भक्ती सदैव स्थिर राहील, त्या भक्तीमुळे मी सतत तुमचे नाम-गुण-कीर्तीच गात राहीन, असाच वर द्या !" भगवंत आपल्या या श्रेष्ठ भक्तावर अतीव प्रसन्न झाले व त्यांनी प्रेमपूर्वक तसाच वर त्याला दिला.
भक्तांचे अंत:करण कसे सर्वांगांनी भक्तिमय झालेले असते पाहा. त्यांना भक्तीशिवाय दुसरे काहीही सुचतच नाही. सर्वत्र त्यांना हरिरूपच दिसत असते व तेच सतत हवेहवेसेही वाटत असते. त्यासाठीच तर त्यांचा जन्म झालेला असतो. भगवान श्री माउली भक्तांच्या या अनन्य प्रीतीला गंगामैयाची उपमा देतात. ती गंगा समुद्राला काल मिळाली, आज मिळाली, नव्हे आत्ताही मिळतच आहे. तरीही नित्यनवीन प्रेमाने, उत्साहाने ती सतत समुद्राशी एकरूप होत असते. त्याचा तिला ना कंटाळा ना आळस. तसेच हे भक्तही भगवंतांशी एकरूप होऊनही पुन्हा पुन्हा तीच इच्छा करीत असतात. त्यांच्यासाठी तो अनुभव प्रत्येक क्षणी नवीनच असतो. हीच परम अद्भुत अशी अद्वैतीभक्ती होय.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादच भगवंतांकडून मिळालेल्या वरप्रसादामुळे या भक्तिसुखाच्या आस्वादनासाठी, श्रीरामावतारात अंगद, श्रीकृष्णावतारात उद्धव, श्री माउलींच्या अवतारात भक्त श्री नामदेव, नंतर श्री तुकाराम महाराज, त्यानंतर श्री तुकाविप्र महाराज व त्याहीनंतर श्री चिदंबर महास्वामींचे शिष्य श्री राजाराम महाराज; असे पुन्हा पुन्हा जन्म घेते झाले. शिवाय दक्षिणेत श्रीमत् राघवेंद्रस्वामींच्या रूपानेही भक्तश्रेष्ठ प्रल्हादजीच अवतरले होते. भक्तश्रेष्ठ प्रल्हाद व भगवान नरहरी ही पूर्ण एकरूप अशी थोर जोडगोळीच आहेत, युगानुयुगे भक्तिसुखासाठी प्रल्हादजी सतत पृथ्वीतलावर विविध रूपांनी अवतरित होऊन भक्तीचा आनंद लुटतात व लोकांनाही भरभरून देत असतात. या एकरस जोडगोळीच्या अम्लान चरणीं सर्वांच्या वतीने सादर साष्टांग दंडवत करतो !
भगवान श्रीनृसिंहांविषयी अक्षरश: प्रचंड वाङ्मय पूर्वीच्या ऋषीमुनींनी व साधुसंतांनी रचून ठेवलेले आहे. यामध्ये नृसिंह अवताराच्या लीला, प्रल्हादादी नृसिंहभक्तांच्या कथा, नृसिंहविषयक स्तोत्रे, मंत्र, सहस्रनामे, मालामंत्र, पूजापद्धती, प्रार्थना स्तोत्रे अशाप्रकारचे विविध भाषांमधील विपुल प्रासादिक वाङ्मय पाहायला मिळते. हे सर्व एकत्रित स्वरूपात प्रथमच एकूण साडेसोळाशे पानांच्या तीन खंडात्मक 'श्रीनृसिंह कोशा'मधून उपलब्ध झालेले आहे. सर्वात आनंददायक गोष्ट अशी की, हे ₹ ५७५/- मूल्याचे तीन खंड सवलतीत केवळ ₹ ३००/- मध्ये श्रीवामनराज प्रकाशन नृसिंहभक्तांना देत आहेत. आज या कोशाच्या केवळ हाताच्या बोटांवर मोजता येण्याएवढ्याच प्रती शिल्लक आहेत व भविष्यात असे अद्भुत काम पुन्हा होईल अशी आत्तातरी शक्यताही दिसत नाही.
थोर नृसिंहभक्त प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली अनेक मान्यवर अभ्यासकांनी या कोशात मोलाचे योगदान दिलेले आहे. हे तीनही खंड प्रत्येक नृसिंहभक्ताच्या संग्रही असायलाच हवेत, इतके महत्त्वपूर्ण व विलक्षण आहेत.
प्रथम 'संहिता' खंडात वेद, उपनिषदे, स्मृती व पुराणांमधील नृसिंहविषयक संदर्भांची संहिता अाहे. ऋग्वेदातील 'द्वे विरूपे' सूक्त, त्यावरील संस्कृत टीका व मराठी भाषांतर आहे. या सूक्ताचा नीरानृसिंहपूर स्थानाच्या दृष्टीने अर्थ केलेला आहे. श्रीनृसिंह पुराणाची पूर्ण संस्कृत संहिता देखील आहे.
द्वितीय 'उपासना' खंडात सुरुवातीला, या लेखात ज्यातील सुंदर कथा सांगितली आहे, त्या नृसिंहपुराणाचा मराठी अर्थ दिलेला अाहे. त्यानंतर शरभोपनिषद व लिंगपुराणातील नृसिंहदमन हा विलक्षण भाग सविस्तर चर्चिलेला आहे. प्रत्यक्ष उपासना खंडात नृसिंहविषयक ७५ संस्कृत व ४७ मराठी रचनांचा समावेश केलेला आहे. शिवाय प्रदीर्घ अशी नृसिंहार्चनपद्धती देखील दिलेली आहे.
तिस-या 'माहात्म्य' खंडात उपासनाखंडातील उर्वरित स्तोत्रे व नीरानृसिंहपूर क्षेत्राचे संस्कृत माहात्म्य व त्याचा मराठी अर्थ दिलेला आहे. परिशिष्टातील दहा अभ्यासपूर्ण प्रदीर्घ लेख हे तर या खंडाचे वैभवच म्हणायला हवे. या लेखांमधून नृसिंह उपासनेची परंपरा, मूर्तीशास्त्र, भारतातील नृसिंह क्षेत्रे यांवर उत्तम प्रकाश टाकलेला आहे. हे सर्व लेख नुसते माहितीपूर्णच नाहीत तर रंजकही झालेले आहेत. श्रीनृसिंह दैवताची सर्वांगीण ओळख करून देणारा हा कोश वाचकांबरोबरच अभ्यासकांसाठी व नृसिंह उपासकांसाठीही अतिशय महत्त्वाचा ठरतो. हे अपूर्व शब्दब्रह्म कृपया जरूर संग्रही ठेवा व अभ्यासा,  ही माझी कळकळीची प्रार्थना आहे. हा कोश १९९६ सालीच प्रकाशित झालेला असल्याने, आता फार थोड्याच प्रती शिल्लक आहेत. असे प्रचंड महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा पुन्हा होत नसतात, तेव्हा त्वरा करून हे अल्पमूल्यात उपलब्ध झालेले अद्भुत धन प्राप्त करून घ्यावे, ही विनंती. कोश हवा असल्यास श्रीवामनराज प्रकाशन, पुणे यांच्याशी 02024356919 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा ही विनंती.
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

7 May 2017

विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ- श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख सातवा

श्रीभगवंत हे अनंत-गुणनिधी आहेत. त्यांच्या गुणांचा पार लागणे कोणालाही शक्य नाही. त्यांचे सगळेच गुणैश्वर्य नेत्रदीपकच असले, तरीही त्यातील काही सद्गुण आपल्या नैसर्गिक अंगप्रभेने विशेष शोभून दिसतात. माणिक, मोती, पोवळे, पाचू इत्यादी सर्वच रत्ने देखणी असली तरी जसा पाणीदार हिरा तो हिराच, त्याला तुलना नाही; तसे श्रीभगवंतांच्या सर्व गुणांमध्ये सगळ्यात शोभिवंत दिसते ते त्यांचे अपरिमित भक्तवात्सल्यच ! किती ते वात्सल्यप्रेम? त्या प्रेमापुढे अवघे भूमंडळही उणे ठरावे, लहान वाटावे इतके त्यांचे प्रेम व्यापक आहे, अद्भुत व अलौकिक आहे !
वात्सल्य म्हटले की पहिल्यांदा आई हेच नाते समोर येते. लौकिक आईला एकच काळीज असते; पण श्रीभगवंत तर अशा मोजताही येणार नाही इतक्या आयांच्या काळजांचेच बनलेले आहेत. त्यांचे सर्वांगच आईचे काळीज होऊन भक्तांवर परमप्रेमाचा वर्षाव करते, पदोपदी त्यांचा सांभाळ करते.
श्रीभगवंतांच्या भक्तवात्सल्याच्या एका अनोख्या प्रसंगाच्या सप्रेम स्मरणाचा आज विशेष दिवस आहे. आज वैशाख शुद्ध द्वादशी, अर्थात् श्रीभगवंतांची जन्मतिथी. भक्तश्रेष्ठ अंबरीष राजासाठी आजच्याच तिथीला श्रीभगवंत प्रकट झाले व आपल्या या अनन्य भक्ताला मिळालेला शाप स्वत:वर घेऊन त्यांनी, आपल्या पायी अभिमानाने मिरवलेला, *'न मे भक्त: प्रणश्यति ।'* असा भक्तकरुणा-ब्रीदाचा तोडर पुन्हा एकदा सार्थ ठरविला.
त्याचे असे झाले की, एकदा महाक्रोधी म्हणून प्रसिद्ध असलेले शिवावतार दुर्वासमुनी अंबरीषराजाकडे आले. त्या दिवशी नेमकी आजचीच तिथी, वैशाख शुद्ध द्वादशी होती. राजाचा एकादशी व्रताचा नेम होता. दशमीच्या सूर्योदयाला सुरू झालेले हे व्रत द्वादशीच्या सूर्योदयाला संपन्न होत असे. दुर्वासमुनी नदीवर स्नानाला गेले खरे, पण लवकर परत यायची चिन्हेच दिसेनात. इकडे राजाच्या पारण्याची वेळ टळून जाऊ लागली. त्याची द्विधा मनस्थिती झाली. अतिथीला टाळून पारणे करावे तरी दोष लागणार आणि पारणे केले नाही तर व्रत मोडणार. काय करावे? या विवंचनेत असताना त्याने श्रीहरींचे स्मरण करून मध्यममार्ग निवडला. त्याने नुसती आपोष्णी घेऊन व्रताचे पारणे करावे, पण जेवण मात्र न करता दुर्वासांसाठी थांबावे, असे त्याने ठरविले. नेमके त्याने आपोष्णी घ्यायला आणि दुर्वास यायला एकच गाठ पडली. झाले, यांच्या क्रोधाचा पारा चढला. त्यांनी मागचा पुढचा काहीही विचार न करता तणतणत एकदम शापवाणीच उच्चारली, "राजा, तू गृहस्थधर्माला जागलेला नाहीस, अतिथीला सोडून जेवायला बसलास. तुझ्या या अधर्मासाठी तू त्वरित दहा गर्भवासांना जा, तुला दहा जन्म घेऊन पुन्हा असह्य गर्भवास सोसावा लागेल." राजा तर तयारीचा भगवद्भक्तच होता, त्याने शांतचित्ताने मान झुकवून या शापाचा स्वीकार केला. पण त्या अकारणकृपाळू व भक्ताभिमानी श्रीनारायणांना ते काही सहन झाले नाही. आपल्या भक्तावरील हे महान संकट पाहून तेच कळवळले व त्वरित तेथे प्रकट झाले. त्यांचे ते दिव्य-मनोहर रूप पाहून अंबरीषाला अश्रू अनावर झाले, त्यांने देवांच्या चरणीं दंडवत घातला. देवांनी मोठ्या विनयाने दुर्वास महामुनींना प्रणाम केला व म्हणाले, "मुनिवर्य, आमच्या या अनन्यदासाकडून आपला अपराध झाला, त्याची शिक्षा म्हणून आपण याला जो शाप दिलात, तो कृपया मला द्यावा. माझ्या या लाडक्याचे गर्भवास मी सोसतो, पण याला कसलीच काही तोशीस पडू नये, असे मला वाटते !" तोवर दुर्वासांचाही राग शमलेला होता व देवांच्या आविर्भावामुळे सगळी परिस्थितीच बदललेली होती. दुर्वासांनी प्रसन्नचित्ताने म्हटले, "देवा, माझ्या शापाने आपण दहा वेळा सुप्रसिद्ध व्हावे !" महर्षी दुर्वासांच्याच या शापामुळे तुम्हां आम्हां भक्तांवर अमृतकृपेची धारा खळाळून बरसली आणि श्रीभगवंतांचे मत्स्यकूर्मादी दहा अवतार झाले; नव्हे, 'यथा पूर्वमकल्पयत् ।' या नियमाने, प्रत्येक कल्पात, युगानुयुगे हे अवतार होतच आहेत व पुढेही होतच राहतील. 'महात्म्यांचा शापही एकप्रकारे वरप्रसादच असतो', हे संतांचे सांगणे काही खोटे नाही बरे !
आपण गेले सहा दिवस ज्या परमानंदकंद श्रीभगवंतांच्या श्रीनृसिंहरूपाच्या त्रिभुवनपावन लीलाकथा-गंगेत सचैल स्नान करून तिचा सप्रेम अनुभव घेत आहोत, त्या अवताराचे मूळ या अंबरीषांच्या कथेतच दडलेले आहे. आजच्याच तिथीला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावी श्रीभगवंत प्रकटले होते, म्हणून त्या गावाचे नाव द्वादशी=बारस=बार्शी असे पडलेले आहे. तेथे 'अंबरीषवरद श्रीभगवंत' आजही आपले भक्तवात्सल्याचे ब्रीद गाजवत उभे आहेत.
श्रीभगवंतांच्या या संपूर्ण अवतारमालिकेचे मूळच भक्तवात्सल्य आहे, त्यामुळे हे दहाही अवतार प्राधान्याने वात्सल्यप्रेम हाच सद्गुण-शिरोमणी अभिमानाने मिरवताना दिसतात. मग प्रल्हादवरद श्रीनृसिंह भगवंत का म्हणून अपवाद ठरतील बरे?
भगवान श्रीनृसिंहांचा अवतार हा तर केवळ भक्त रक्षणासाठीच झालेला असल्याने भक्ताभिमान व भक्तवात्सल्य हे या अवताराचे मूळ वैशिष्ट्यच आहे. भगवान श्रीराम व श्रीकृष्ण हे दोन प्रमुख पूर्णावतार सोडता, इतर आठ विष्णू अवतारांमध्ये श्रीनृसिंह अवतारच जनमानसात जास्त प्रसिद्धी पावलेला दिसतो. सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त करणारा व अतीव वात्सल्यप्रेमाने ओतप्रोत भरलेला असल्यानेच बहुदा श्रीनृसिंह अवताराची आज हजारो वर्षे उपासना होत राहिलेली आहे. इतर देवतांच्या मानाने श्रीनृसिंह हे कुलदैवत असणा-या घराण्यांचीही संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच संत व पंत कवींनी नृसिंह विषयक प्रचंड वाङ्मय रचलेले आहे. भारतभरात नृसिंह मंदिरांची संख्या देखील भरपूर आहे. तसेच विपुल प्रमाणात स्तोत्रमंत्रादी श्रीनृसिंह उपासना वाङ्मय सुद्धा उपलब्ध आहे. ( अशा सर्व वाङ्मयाचा व इतर प्रचंड माहितीचा एकूण साडेसोळाशे पृष्ठांचा तीन खंडात्मक "श्रीनृसिंह कोश" प्रकाशित झालेला आहे. याविषयी थोडी माहिती पुढच्या लेखात पाहू.)
भक्तश्रेष्ठ प्रल्हादांची कथा तर सर्वश्रुत आहेच, पण अगदी तशीच कथा भगवान आद्य श्रीशंकराचार्यांच्या चरित्रात देखील घडलेली आहे. भगवान श्रीनृसिंहांनी पुन्हा एकदा आपले भक्तरक्षणाचे ब्रीद त्यांच्या बाबतीतही सार्थ ठरविलेले आहे. ही विलक्षण कथा आपलाही भक्तिभाव वाढवणारी आहे.
एकदा श्रीमदाद्य शंकराचार्यांचा श्रीशैल्याला मुक्काम असताना, अनेक अघोरी धंदे जेथे चालत असत, अशा त्या कर्दळीवनातील एक वामाचारी कापालिक त्यांच्याकडे आला. त्याने आचार्यांना पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की, हे सर्व उत्तम लक्षणांनी युक्त आहेत. अशा बत्तीस लक्षणी पुरुषाचा जर आपण आपल्या देवीला बळी दिला तर ती प्रसन्न होऊन इच्छित वर तत्काल देईल. म्हणून तो आचार्यांकडे आला व त्यांना सरळ म्हणाला की, "मला आपला बळी देण्याची इच्छा आहे. तुमचा बळी दिला की माझी इष्टदेवता प्रसन्न होऊन मला सिद्धी प्रदान करेल." देहाविषयी कसलीही ममता न बाळगणा-या श्री आचार्यांनी शांतपणे त्याला होकार दिला व परोपकारार्थ आयुष्य व्यतीत करणारे भगवान श्री शंकराचार्य, त्याने सांगितलेल्या रात्री बळी जाण्यासाठी तयार राहिले.
आचार्यांनी ही गोष्ट आपल्या कोणाही शिष्यांना कळू दिलेली नव्हती. कापालिकाबरोबर ते जायला निघाले. इकडे आचार्यांचे प्रमुख शिष्य श्री पद्मपादाचार्य यांना ध्यानात त्यांच्या इष्टदेवतेने अर्थात् भगवान श्रीनृसिंहांनी सांगितले की, "तुझ्या गुरूंवर मोठे संकट येऊ पाहते आहे. तू केवळ त्यांच्या मागे मागे जा, पुढचे आम्ही पाहून घेतो." देवांच्या आज्ञेनुसार श्रीपद्मपादाचार्य तडक निघाले. लपून छपून ते कापालिकाच्या मागोमाग त्याच्या कर्दळीवनातील अड्ड्यावर गेले. तेथे गेल्यावर त्या कापालिकाने आचार्यांची पूजा करून त्यांना बळी देण्यासाठी देवीसमोर ओणवे बसवले. एवढ्यात अचानकच श्री पद्मपादाचार्यांच्या देहात भगवान श्रीनृसिंहांचा आवेश झाला व त्यांनी भयंकर गर्जना करून त्या दुष्ट कापालिकाच्या हातातली तलवार घेऊन त्याचाच वध केला. कापालिक मेला तरी त्या उग्र रूपाच्या भयंकर गर्जना चालूच होत्या.
ते क्रोधाविष्ट पण भक्तवत्सल 'आवेशरूप' पाहून श्री शंकराचार्यांचे अष्टसात्त्विक भाव जागे झाले; व नृसिंहरूपाचा तो अनावर क्रोध आवरावा म्हणून त्यांनी तत्काळ एक सुंदर स्तवन रचून देवांची स्तुती केली. त्या भावभिजल्या स्तुतीने प्रसन्न होऊन श्री पद्मपादाचार्यांच्या देहात प्रकटलेले श्रीनृसिंह भगवान शांत झाले व आचार्यांना आशीर्वाद देऊन गुप्त झाले. याशिवाय भगवान शंकराचार्यांनीच, 'नृसिंह पंचरत्नम्''लक्ष्मीनृसिंह करावलम्बन स्तोत्र' ही दोन्ही स्तोत्रेही फार सुंदर रचलेली आहेत. नृसिंहपंचरत्न स्तोत्रात श्री आचार्य मनाला भ्रमराची उपमा देऊन त्याला, "या वैराण मरुभूमीसारख्या जगातील नश्वर गोष्टींमागे सुखासाठी वेड्यासारखे फिरण्याऐवजी, ख-या आनंदासाठी भगवान श्रीलक्ष्मीनृसिंहांच्या श्रीचरणकमलातील शाश्वत मकरंद तू सतत सेवन करावास", असे विविध उदाहरणे देऊन पटवून देतात. हे अवघ्या पाच श्लोकांचे स्तोत्र अतिशय लालित्यपूर्ण आणि मधुर आहे, त्यामुळे ते सहज पाठ होऊन सारखे गुणगुणावेसे वाटते.
श्रीनृसिंह भगवंतांनी अशा प्रकारे पुन्हा एकदा आपले भक्तवात्सल्य दाखवीत भक्तरक्षणाचे ब्रीद पूर्ण केलेले आहे. भगवान श्रीनृसिंह ही वरकरणी जरी अत्यंत उग्र देवता असली तरी ती आपल्या भक्तांचा मातेप्रमाणे प्रेमानेच सांभाळ करीत असते. समर्थ श्री रामदासस्वामी आपल्या एका अभंगात भगवंतांच्या याच दोन्ही वैशिष्ट्यांचा एकत्रित उल्लेख करून सांगतात की, "उग्र बहु नृसिंहोपासना । लोभे सांभाळी देव भक्तजना ॥" म्हणूनच, सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त करून, भक्तांना अंतर्बाह्य सांभाळणारे भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीनृसिंह हे निजभक्तांचे लाडके दैवत न झाले तरच नवल !!
श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या करावलम्बन स्तोत्रात,  भक्तकरुणाकर श्रीनृसिंहरूपाचे सुंदर व अगदी चित्रदर्शी वर्णन करून त्यांची करुणा भाकताना म्हणतात,
एकेन चक्रमपरेण करेण शङ्खं
अन्येन सिन्धुतनयामवलम्ब्य तिष्ठन् ।
वामेतरेण वरदाभय-पद्मचिन्हं
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१४॥
आचार्य म्हणतात, "डावीकडील वरच्या एका हातात चक्र व दुस-या हातात शंख धरणा-या तर तिस-या हाताने सिन्धुतनया भगवती लक्ष्मीला आलिंगन दिलेल्या आणि उजवीकडील एका हाताने वर देणा-या, दुस-या हाताने अभयदान देणा-या व तिस-या हातात कमल धारण करणा-या हे नृसिंहप्रभो, आपण मला आपल्या हाताचा आधार द्या, अर्थात् माझा सर्वतोपरि सांभाळ करा !"
मोजके आणि मार्मिक अनुप्रास साधून रचलेले हे संपूर्ण करावलंबन स्तोत्र फार मनोहर आहे. त्यातून भगवान आद्य शंकराचार्यांनी श्रीनृसिंहांची नेमक्या व भावपूर्ण शब्दांमध्ये महती गाऊन करुणा भाकलेली आहे. अनेक नृसिंहभक्तांच्या नित्यपाठात विसावलेली भगवान आद्य श्री शंकराचार्यांची ही दोन्ही स्तोत्रे अप्रतिम तर आहेतच, पण श्रीनृसिंहदेवांना अतीव प्रियही आहेत. म्हणूनच या स्तोत्रांच्या प्रेमाने केलेल्या नित्यपठणाने श्रीभगवंतांचा कृपाप्रसाद लाभतो, असा अनेक भक्तांचा स्वानुभव आहे !
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
( छायाचित्र संदर्भ: डावीकडे भगवान श्रीनृसिंहांची स्तुती करून करुणा भाकणारे श्रीमदाद्य शंकराचार्य व उजवीकडे बार्शीचे अंबरीषवरद श्रीभगवंत, त्यात देवांच्या उजव्या हाताखाली लहानगे भक्तराज अंबरीष.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

6 May 2017

विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख सहावा

श्रीदत्तसंप्रदाय व भगवान श्रीनृसिंह : अलौकिक ऋणानुबंध

भगवान श्रीनृसिंह ही देवता पुराण कालापासूनच खूप प्रसिद्ध आहे. श्रीनृसिंहांची अनेक स्थानेही जुन्या काळापासून भरभराटीला आलेली आहेत. नृसिंह उपासना देखील समाजाच्या सर्व थरांमध्ये पोचलेली पाहायला मिळते.
भगवान श्रीनृसिंह हा अवतार श्रीदत्तसंप्रदायामध्येही खूप मानला व उपासला गेलेला दिसून येतो. श्रीदत्त संप्रदाय व श्रीनृसिंह भगवंतांचा अन्योन्य-संबंध असून तो फारसा आजवर लोकांसमोर आलेला नाही. म्हणून तो महत्त्वाचा विविधांगी संबंध आजच्या आपल्या लेखामधून आपण त्यांच्याच कृपेने अभ्यासणार आहोत.
भगवान श्रीनृसिंहांचा अवतार शनिवारी झाला, म्हणून श्रीनृसिंह उपासनेत शनिवार हा मुख्य वार मानतात. कलियुगातील द्वितीय दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मवार शनिवारच आहे. त्यामुळेच श्रीक्षेत्र नृसिंहवाडीची वारी ही शनिवारचीच मानतात. तसा उल्लेख श्रीगुरुभक्त यांनी "सावळा सद्गुरु तारू मोठा रे..।" या वाडी नित्यक्रमातील सुप्रसिद्ध पदात केलेला आहे की, "द्वादशी शनिवार करिता वारी पाडवा ।" पूर्वी दत्त संप्रदायातही गुरुवारपेक्षा शनिवारलाच अधिक महत्त्व होते, हे यावरून कळते. नंतरच्या काळात ते महत्त्व गुरुवारला प्राप्त झाले असावे.
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंची व भगवान श्रीनृसिंहांची जन्मवेळ ही देखील एकच, सूर्यास्ताचीच आहे. तसेच दोघांचाही जन्म शुक्लपक्षाच्या शेवटीच चतुर्दशी व पौर्णिमेला झालेला आहे.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादजींना भगवान श्रीदत्तप्रभूंनी अवधूतवेषात आत्मस्वरूपाचा उपदेश केल्याचा उल्लेख श्रीमद् भागवत महापुराणाच्या सातव्या स्कंधात येतो. म्हणजे भगवान श्रीदत्तप्रभू हे श्री प्रल्हादांचेही श्रीगुरूच होत.
'श्रीपादश्रीवल्लभ चरितामृत' या ग्रंथातही अनेकवेळा भगवान श्रीनृसिंहांचा तसेच औदुंबर वृक्षाचा उल्लेख येतो. त्यात एकेठिकाणी आजवर इतरत्र कोठेच न आलेला एक वेगळाच संदर्भ सांगितलेला आहे. श्रीनृसिंह भगवंत औदुंबराच्याच लाकडापासून बनवलेल्या खांबातून प्रकटले व त्यानंतर त्या खांबाला पालवी फुटली. त्याच औदुंबर वृक्षाची प्रल्हादजी नियमाने पूजा करीत असत. पुढे त्यांना औदुंबरवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या श्रीदत्तप्रभूंनी आत्मबोध केला होता. त्याच वेळी त्या औदुंबरवृक्षानेही मनुष्यरूपाने प्रकट होऊन भगवान श्रीदत्तप्रभूंना आशीर्वाद मागितल्यावर त्यांनी, "तुझ्याठायी मी सूक्ष्मरूपाने अखंड वास करीन व कलियुगातील अवतारात तुझ्यातून प्रकटलेल्या भगवान नृसिंहांचेच नाव मी धारण करीन !" असा आशीर्वाद दिला. श्रीनृसिंह दैवताचे प्रेम म्हणूनच कलियुगातील या द्वितीय अवतारामध्ये भगवान श्रीदत्तप्रभूंनी स्वत:ला "नरहरि" किंवा "नृसिंह सरस्वती" असेच नाम धारण केलेले दिसून येते.
श्रीनृसिंह अवतार धारण करून भगवंतांनी, "देव आहे व तो सर्वत्र व्यापून राहिलेला आहे !" हेच दाखवून दिलेले आहे. शिवाय देवत्वाचा, धर्माचा विरोध करणा-यांचा समूळ नायनाट केलेला आहे. हेच कार्य श्रीदत्तप्रभू व त्यांच्या सर्व अवतारांनी केलेले आहे. त्यांनी जगात अप्रकट असलेले देवत्वच लोकांना दाखवून दिले. शिवाय नास्तिकांची ती नास्तिकबुद्धी आपल्या कृपेने नष्ट करून लोकांची धार्मिक श्रद्धा बळकट केलेली आहे. एकप्रकारेे नृसिंहरूपाच्याच कार्याचा हा पुढील भाग म्हणता येईल. भगवान श्रीनृसिंहांनी दुष्टांचा नाश केला; तर भगवान श्री माउली म्हणतात तसा, श्रीदत्तप्रभूंच्या या अवतारांनी केवळ दुष्टबुद्धीचा नाश करून समाजात अास्तिकता वाढविली. प्रसंगी भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराज व भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भगवान श्रीनृसिंहांसारखे रौद्ररूप धारण करून दुष्टांचा संहारही केलेला आहे. वल्लभेश द्विजाचा शिरच्छेद करणा-या चोरांना श्री श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या त्रिशूलाने मारलेले आहे व श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी म्लेंच्छांसमोर वेद म्हणणा-या उन्मत्त ब्राह्मणांना शाप देऊन पिशाचयोनीला पाठवलेले आहे.
श्रीदत्त संप्रदायातील वेदतुल्य मानलेल्या श्रीगुरुचरित्रातील चार हकिकतींमध्ये श्रीनृसिंहांचा उल्लेख येतो. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी गोदावरीची तटाकयात्रा करीत असताना, मंजरिका क्षेत्री राहणा-या श्री माधवारण्य नामक संन्यासी भक्तावर कृपा केल्याचा उल्लेख तेराव्या अध्यायात येतो. हे माधवारण्य श्रीनृसिंहभक्त होते व त्यांना स्वामींनी नृसिंहरूपातच दर्शन दिले होते. तसेच, 'मानसपूजेतील नृसिंहमूर्ती प्रत्यक्ष होईल', असा आशीर्वादही दिला होता.
पंधराव्या अध्यायात भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या शिष्यांना पवित्र तीर्थक्षेत्रांची माहिती सांगितलेली आहे. त्यात गाणगापूरच्या भीमा-अमरजा संगमावरील कल्पवृक्ष अश्वत्थासमोर "नृसिंहतीर्थ" असल्याचा उल्लेख आलाय. त्यानंतर कृष्णाकाठावरील कोळे नृसिंहपूरच्या श्रीज्वालानृसिंह भगवंतांचाही श्रीस्वामी महाराज आवर्जून उल्लेख करतात. पुढे पश्चिम महाराष्ट्रातील भ्रमणात ते स्वत: देखील या स्थानी येऊन मग पुढे औदुंबरकडे गेले होते.
एकोणिसाव्या अध्यायात औदुंबर वृक्षाचे माहात्म्य व श्रीदत्तप्रभूंचे त्यावरील विशेष प्रेम कथन करताना पुन्हा भगवान श्रीनृसिंहांचा उल्लेख येतो. हिरण्यकश्यपूच्या विषयुक्त रक्तामुळे नखांचा होणारा दाह,  भगवती लक्ष्मीमातेने आणलेल्या औदुंबराच्या फळांमध्ये नखे रोवल्याने शांत झाला. म्हणून औदुंबर वृक्षाला भगवान श्रीनृसिंहांनी भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. औदुंबराला भगवान श्रीनृसिंहांनीच "सदा फळित तू होसी ।"असा कल्पवृक्ष होण्याचा आशीर्वादही दिलेला आहे. तसेच, "आम्ही लक्ष्मीसह निरंतर तुझ्याखाली वास करू", असाही वर दिलेला आहे. तोच वर त्यांनी श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या रूपाने पूर्ण केलेला दिसून येतो. तेथे एका ओवीत श्रीगुरुचरित्रकार म्हणतात,
अवतार आपण तयाचे ।
स्थान आपुलें असे साचें ।
शांतवन करावया उग्रत्वाचें ।
म्हणोनि वास औदुंबरीं॥१९.२८॥
येथे श्रीगुरुचरित्रकार सरस्वती गंगाधर, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींना स्पष्टपणे नृसिंह-अवतार म्हणतात. या आधीच्या ओवीत गुरुचरित्रकार फार महत्त्वाचा संदर्भ सांगतात की,
याकारणें श्रीगुरुमूर्ती ।
नृसिंहमंत्र उपासना करिती ।
उग्रत्वाची करावया शांति ।
औदुंबरी वास असे ॥१९.२७॥
सरस्वती गंगाधर या ओवीत स्पष्ट सांगतात की, भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज "नृसिंह मंत्र उपासना" करत होते. तसेच नृसिंह अवताराप्रमाणेच उग्रत्वाची शांती करण्यासाठी ते नित्य औदुंबरवृक्षाखाली वास करीत असत.
चोविसाव्या अध्यायात श्रीत्रिविक्रम भारतींचा प्रसंग आहे. हे थोर संन्यासी देखील श्रीनृसिंह भक्तच होते. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी स्वत:हून कुमसी गावी गेले होते. त्यावेळी त्यांनी श्री त्रिविक्रम भारतींना मानसपूजेत नृसिंहरूपातच दर्शन दिल्याचा उल्लेख येतो.
श्रीक्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण मठात आज श्रींच्या निर्गुण पादुका आहेत. तेथेच चोवीस वर्षे स्वामींचे वास्तव्यही होते. त्या पादुकांच्या खाली एक तळघर असून त्या गुंफेत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नित्य ध्यानाला बसत असत. त्या गुंफेत त्यांनी स्वहस्ते श्रीनृसिंहयंत्र स्थापन केले होते, असा उल्लेख पुजारी मंडळींकडील जुन्या नोंदींमध्ये आहे. श्री स्वामींच्या शैल्यगमनानंतरही काही काळ श्री सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र त्या तळघरातील गुंफेत जाऊन नित्यपूजा करीत असत. पुढे देवांच्याच आज्ञेने ती गुंफा कायमची बंद करून टाकण्यात आली.
तृतीय श्रीदत्तावतार, राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामींचेही जन्मनाम ' नृसिंहभान ' असेच होते. प्रसंगी तेही नृसिंहरूपासारखेच अत्यंत उग्र रूप धारण करीत असत. त्यावेळी त्यांच्यासमोर जाण्याची कोणाचीही छाती होत नसे. त्याचबरोबर त्यांचे अलौकिक भक्तवात्सल्यही त्यांच्या सर्व गोष्टींमधून स्पष्ट जाणवते. त्यांच्या अशा अपरंपार भक्तप्रेमाचे वर्णन करणा-या अनेक कथा त्यांच्या बखरीत सापडतात. अत्यंत असह्य उग्रत्व व त्याचवेळी अपरंपार करुणा; या नृसिंहरूपाचेच नेमके वैशिष्ट्य असणा-या दोन्ही गोष्टी, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ठायी विलसणा-या श्रीनृसिंहतत्त्वाचेच स्पष्ट प्रत्यंतर देतात.
"भगवान श्रीनृसिंहांची उपासना करून त्यांची पूर्णकृपा प्राप्त झालेले परम भाग्यवान जीव, देहपातानंतर भगवान श्रीदत्तात्रेयांच्या स्वरूपाशी एकरूप होतात", असा स्वानुभव काही नृसिंहभक्त महात्म्यांनी नोंदवून ठेवलेला आहे. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी सांगितलेला हा आजवर फारसा ज्ञात नसलेला विलक्षण संदर्भ तर श्रीनृसिंह भगवंत व श्रीदत्त भगवंतांचे एकरूपत्वच सांगत नाही का?
श्रीदत्तसंप्रदायामध्ये अशाप्रकारे श्रीनृसिंह भगवंतांचीही उपासना केली जाते. याही संप्रदायात श्रीनृसिंह हे भक्तवत्सल व भक्त-रक्षणकर्ते म्हणूनच पूजिले जातात. श्रीदत्त संप्रदायातील आजवरच्या अनेक थोर सत्पुरुषांचे इष्टदेव भगवान श्रीनृसिंहच असल्याचे त्यांच्या चरित्रांमधून पाहायला मिळते. चतुर्थ दत्तावतार श्रीसंत माणिकप्रभू महाराज; तसेच राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील थोर विभूतिमत्व, प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचेही भगवान श्रीलक्ष्मीनृसिंह हेच कुलदेव होते.
श्रीदत्तसंप्रदायातील अधिकारी विभूती व श्रीनृसिंह भगवंतांचे परमभक्त तसेच श्रीनृसिंह कोशाचे संपादन-प्रमुख, प.पू.श्री.शिरीषदादा कवडे श्रीनृसिंह भगवंतांच्या अवीट गोडीच्या लीलेचे मोठ्या मार्मिक व गूढार्थपूर्ण शब्दांमध्ये वर्णन करताना म्हणतात,
विदारूनी महास्तंभ ।
देव प्रकट स्वयंभ ॥१॥
राखावया भक्तजन ।
स्वये येती नारायण ॥२॥
ऐसा प्रल्हाद बळिया ।
केले देवासी खेळिया ॥३॥
देव अंकित भावाचा ।
लोट नयनी कृपेचा ॥४॥
भक्त घेई अंकावरी ।
प्रेमे चाटितो श्रीहरी ॥५॥
बहू नवलाव जाला ।
दैत्य तोही उद्धरिला ॥६॥
म्हणे अमृता माधवा ।
फेडी स्तंभाते आघवा ॥७॥
भगवान श्रीनृसिंह व भगवान श्रीदत्तप्रभू या दोन्ही रूपांनी अद्भुत व अपूर्व लीला करणा-या भक्तवत्सल भक्ताभिमानी  परिपूर्णब्रह्म श्रीभगवंतांच्या श्रीचरणीं, श्रीनृसिंह नवरात्रातील आजच्या शनिवार व एकादशीच्या पावन योगावर झालेली ही लेखनसेवा तुलसीदल रूपाने समर्पितो व सर्वांच्या वतीने साष्टांग दंडवत घालून कृपायाचना करतो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

5 May 2017

विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख पाचवा

भगवान श्रीनृसिंह हे भगवान श्रीनारायणांचे अत्यंत उग्र व भयंकर रूप मानले जाते. आपल्या लाडक्या भक्तावर अनन्वित अत्याचार करणा-या हिरण्यकश्यपूच्या वधासाठीच हा परम विलक्षण अवतार झालेला असल्यामुळे, साहजिकच श्रीभगवंतांच्या या रूपात, लीलेत क्रोधाचे प्राबल्य होते. पण हा अवतार अतिशय उग्र असला, तरी निर्माण झाला भक्तप्रेमातूनच ना ! म्हणून या अवताराचे दृश्यरूप जरी क्रोधाविष्ट असले तरी त्याचा मूळ आधार हा अद्भुत व अपरंपार भक्तप्रेम हाच आहे. त्यामुळेच भगवान श्रीनरहरीरायांच्या अपार भक्तवात्सल्याचेच सर्व संतांनी व भक्तांनी वर्णन केलेले आढळून येते.
श्रीमद् भागवत महापुराणातील कथाभागानुसार, हिरण्यकश्यपू व त्याचा भाऊ हिरण्याक्ष हे दोघेही मूळचे भगवान श्रीविष्णूंचे द्वारपाल जय-विजय हेच होते. एके दिवशी भगवंतांच्या दर्शनाला आलेल्या सनत्कुमारादी चार भावंडांचा त्यांनी वैकुंठाच्या द्वारातच अपमान केला. त्यावर चिडून त्यांनी जय-विजयाला, "तुम्ही भगवंतांचे द्वारपाल असून तुम्हांला साधे शिष्टाचारही माहीत नाहीत? त्यांचे कोणतेही गुण तुम्ही अंगी बाणवलेले नाहीत, भगवंतांच्या लाडक्या भक्तांशी  अहंकाराने, मग्रूरीने वागता, तेव्हा शिक्षा म्हणून आता पृथ्वीवर तीन जन्म राक्षस होऊन जन्माला जा !" असा शाप दिला. त्यावेळी प्रत्यक्ष भगवान नारायणांनी येऊन आपल्या पार्षदांकडून झालेल्या अपराधांबद्दल सनत्कुमारांची क्षमा मागितली व शिक्षेचा कालावधी लवकर पूर्ण करण्याची त्यांना विनंती केली. त्या शापामुळे जय-विजय पहिल्या जन्मात हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू झाले. हिरण्याक्षाला श्रीवराह भगवंतांनी मारले तर हिरण्यकश्यपूूला श्रीनृसिंहांनी. दुस-या जन्मात तेच रावण व कुंभकर्ण झाले व भगवान श्रीरामांच्या हातून मृत्यू आला. तर तिस-या जन्मात ते शिशुपाल व दंतवक्त्र झाले व त्यांना भगवान श्रीकृष्णांनी मारले. तिन्ही जन्मांत या दोघांना साक्षात् भगवंतांनीच स्वहस्ते मारून मुक्ती दिली. हे दोघेही भगवंतांशी सरूपता झालेले त्यांचे नित्यपार्षदच होते. त्यांना शापामुळे मनुष्यजन्माला यावे लाागले, तरी त्यांची भक्ती काही थांबली नाही. त्यांनी तसा वर भगवंतांना आधीच मागून घेतलेला होता. म्हणूनच त्यांनी या तिन्ही राक्षस जन्मात "विरोधी भक्ती" करून भगवंतांचे अनुसंधान अबाधितच राखलेले होते.
हीच लीला जरा वेगळ्या दृष्टीने पाहिली तर, श्रीभगवंतांनी आपल्या पार्षदांना शापातून मुक्त होऊन पुन्हा मूळ स्थितीला लवकर जाण्यासाठी कृपापूर्वक मदतच केलेली आहे, असे स्पष्ट दिसून येते. हेही त्यांचे अपार भक्तवात्सल्यच नाही का?
भगवान श्रीनरहरीरायांच्या या प्रेमकृपेचाच अनुभव, आजही त्यांना शरण जाऊन, कळवळून प्रेमाने साद घालणा-यांना नेहमीच येत असतो. भगवान श्रीनृसिंह हे भक्तांचे कोणत्याही संकटातून हमखास रक्षण करणारे दैवत आहेत.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवी देशपांडे नेहमी सांगत असत की, भगवान श्रीनृसिंहांचे नामस्मरण वैखरीने कधी घरात करू नये. कारण 'अटव्यां नारसिंहश्च' असा खरा नियम आहे. जंगलात किंवा संकटकाळी उच्चरवाने नृसिंहनाम घ्यावे म्हणजे जंगली श्वापदांपासून, चोराचिलटांपासून व अचानक आलेल्या संकटांपासून आपले पूर्ण संरक्षण होते. पण तेच वैखरी नामस्मरण घरात केले तर मात्र उलटेच परिणाम होतात. त्यांच्या एका नातेवाईकांचाच अनुभव त्या मुद्दाम त्यासाठी सांगत असत. त्यांच्या एका नातेवाईकाला नृसिंहनाम घ्यायची आवड होती. त्याला पू.पार्वतीदेवींनी आधीच बजावले होते की, तू ते नाम चुकूनही तुझ्या घरात अंथरुणावर बसून वगैरे घेऊ नकोस. पण त्याने ते ऐकले नाही. तो रोज झोपायच्या खोलीत गादीवर बसूनच जोरजोरात नृसिंहनामाचा जप करीत असे. एकेदिवशी तो जप करीत असताना अचानक त्याच्या बायकोमध्ये नृसिंहांचा आवेश झाला व तिने शेजारी बसलेल्या याचे नरडेच धरले. कसाबसा तो त्यातून सुटला. उशीरा का होईना, पण तेव्हा त्याला पू.मातु:श्री पार्वतीदेवींच्या सांगण्याचे महत्त्व पूर्णपणे पटले.
अशा या परम विलक्षण श्रीनृसिंह रूपाचा योगार्थही फार सुंदर आहे. श्रीनृसिंह कोशाच्या प्रथम खंडाच्या "देवा तूं अक्षर" या आपल्या प्रस्तावनेत, कोशाचे संपादन-प्रमुख व श्रीनृसिंहकृपांकित थोर सत्पुरुष प.पू.श्री.शिरीषदादा कवडे नृसिंहरूपाचा योगार्थ बहारीने स्पष्ट करताना म्हणतात, "श्रीनृसिंहावतार हे योगाच्या परिभाषेतील एक गूढ रूपक आहे. हिरण्यकश्यपूरूपी दुर्वासनांचे, कुवृत्तींचे निर्दालन करून प्रल्हादरूपी भक्त जीवाला याच शरीरात भगवत्स्वरूप होता येते, हे या अवतारकथेचे मर्म आहे.
सुषुम्ना नाडीरूपी स्तंभातून नृसिंहरूपात भगवत् शक्तीचे प्राकट्य आहे. ही शक्ती अर्धनर व अर्धमृगेंद्र रूपात आहे, म्हणजे सात्त्विकभावाने उत्पन्न झालेला वासनाविरोधी क्रोधच वासना निर्दालनास मदत करीत आहे, मृगेंद्र(सिंह) रूप झाला आहे. या वासनांचे निर्दालनही संधिकालात म्हणजे सुषुम्नेतच झाले आहे व त्या हिरण्यकश्यपू निर्दालनानंतरच भगवान शांत झालेले आहेत. त्यांची अनुग्रहशक्ती आपले ईप्सित कार्य साधून मूळ निरामय स्वरूपाला आलेली आहे.
त्या भगवत् कृपाशक्तीच्या विलक्षण, अद्भुत अशा आविर्भावाचे वर्णन करताना, तिच्या अंकावर जीवस्वरूपात स्थिर झालेले भक्तराज प्रल्हाद म्हणतात, "माझे मन आपल्या अमृतस्वरूप दर्शनाच्या आस्वादनाने तृप्त होत नाही. हे प्रभो, ब्रह्मादी देवतांनाही जे दर्शन अतीव दुर्लभ आहे, असे आपले पावन दर्शन दहा लाख वर्षे मिळाले तरीही माझे मन तृप्त होणार नाही. अशा दर्शनानंतरही दर्शनासाठीच अतृप्त, आसुसलेल्या मज दासाचे चित्त आपल्याच दर्शनाशिवाय आणखी कशाची इच्छा करू शकते ?
" ( श्रीनृसिंहपुराण ४३.७४-७५ ) या श्लोकात वेदव्यासांनी साधकाच्या परम अवस्थेचे मर्मच जणू उलगडून दाखवलेले आहे !"
प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी केलेले हे श्रीनृसिंहरूपाचे सुरेख योगार्थ-विवरण सर्वच भक्तांनी नित्य चिंतनात ठेवावे, इतके महत्त्वपूर्ण आहे.
श्रीभगवंतांचा प्रत्येक अवतार हा अत्यंत विचारपूर्वक झालेला असतो. म्हणूनच त्यांच्या सर्व लीलांमधून एकाचवेळी अनेक मार्मिक संदर्भ प्रकट होत असतात. आपापल्या अधिकारानुसार, बौद्धिक कुवतीनुसार व श्रीभगवंतांच्या कृपाप्रसादानुसार ते संदर्भ यथायोग्य प्रकारे व योग्यवेळी आपोआप समजून येतातच, हेच यातील खरे इंगित आहे !
भगवान श्रीनृसिंहांच्या या अद्भुत प्रकटलीलेचे व भक्तप्रेमाचे सुरेख वर्णन करताना सद्गुरु श्री एकनाथ महाराज म्हणतात,
दुर्जन तो लाथ मारी खांबावरी ।
स्तंभी नरहरी प्रकटला ॥१॥
धांवूनिया हरी आडवा तो घेतला ।
हृदयी विदारला हस्तनखीं ॥२॥
एका जनार्दनीं भक्ताचे रक्षण ।
स्वयें नारायण करीतसे ॥३॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
( छायाचित्र संदर्भ: कोळेनृसिंहपूर येथील सोळा हातांची ज्वालानृसिंह मूर्ती.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

4 May 2017

विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख चौथा

भक्त-भगवंत हे प्रेमनाते बोला-बुद्धीच्या पलीकडचे, अत्यंत विलक्षण असे असते. सर्वच नात्यांमध्ये प्रेम अनुस्यूत असतेच, पण या सगळ्या नात्यांमध्ये भक्त-भगवंत आणि गुरु-शिष्य ही दोन नाती फार वेगळेपण मिरवणारी व अपूर्व प्रेम व्यक्त करणारी अशी असतात. श्रीज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात भगवान श्रीमाउलींनी भगवंतांच्याच मुखाने हा समग्र भक्तियोग अप्रतिम शब्दांत वर्णन करून सांगितलेला आहे. त्यात एकेठिकाणी ते म्हणतात,
ऐसे अनन्ययोगें ।
विकले जिवें मनें आंगें ।
तयांचें कायि एक सांगें ।
जें मी न करीं ॥ज्ञाने.१२.६.८२॥

अरे अर्जुना, कायिक, वाचिक व मानसिक अशा सर्व भावांनी अखंड माझे (भगवंतांचे) अनुसंधान करणा-या, मलाच जीव, मन, शरीर व प्राणांनी पूर्ण विकल्या गेलेल्या माझ्या अनन्य भक्तांची अशी कोणती गोष्ट आहे की जी मी कधी करत नाही?
भगवंतच भक्तांच्या सर्व गोष्टी न सांगता सांभाळत असतात, त्यांची पडेल ती सेवा ते अत्यंत आनंदाने करीत असतात. म्हणून श्रीभगवंतच खरे 'भक्तश्रेष्ठ' म्हटले जातात. आजवरच्या असंख्य संतांच्या चरित्रातले अनंत प्रसंग याला साक्ष आहेत. याविषयी प्रत्यक्ष श्रीभगवंतांचेच हृद्गत सांगताना श्री माउली म्हणतात,
तैसें ते माझे ।
कलत्र हें जाणिजे ।
कायिसेनिही न लाजें ।
तयांचेनि मी ॥ज्ञाने.९.७.८६॥

भगवंत आपल्या भक्तांना लाडक्या पत्नीप्रमाणे जपत असतात. भक्तांच्या तसेच भक्तांसाठी कोणत्याही गोष्टी करताना त्यांना अजिबात लाज वाटत नाही. आपल्या अनन्य भक्तांसाठी अगदी हीन व अवघड गोष्टी देखील देव प्रेमानेच करतात.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादांसाठी झालेला अगदीच आगळा-वेगळा, अभूतपूर्व श्रीनृसिंहावतार हा श्रीभगवंतांच्या याच भक्तवात्सल्य-ब्रीदाचा मनोहर आविष्कार नव्हे काय? दैत्यराज हिरण्यकश्यपूने मागितलेला तो कसला विचित्र वर, त्यावर पूर्ण विचारांती झालेला, अर्धा मानव व अर्धा सिंहरूप अवतार, खांबामधून प्रकटणे, नखांचे अभिनव अस्त्र, तिन्हीसांजेची वेळ, उंब-यासारखे मजेशीर ठिकाण; काय एकेक विलक्षण गोष्टी सांभाळून व दैत्याच्या वरामध्ये काहीही न्यून न येऊ देता केलेली अवतार लीला; सारेच न्यारे, अद्भुत आहे. पण भक्त प्रल्हादांसाठी असल्या विचित्र रूपाने प्रकट होऊन देवांनी आपले ब्रीद राखलेच शेवटी.  माउलींची वरील ओवी जणू श्रीभगवंतांनी नृसिंहरूप घेऊन खरी करून दाखवलेली आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये.
भगवान श्री माउलींनी श्रीज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाच्या शेवटी एका ओवीत, अर्जुनावरील कृष्णकृपेचे महत्त्व सांगताना भगवान श्रीनृसिंहांचा मार्मिक उल्लेख केला आहे. ते म्हणतात,
जो प्रल्हादाचिया बोला ।
विषाही सकट आपणचि जाहाला ।
तो सद्गुरु असे जोडला ।
किरीटीसी ॥ज्ञाने.१०.४२.३३४॥

अर्जुनाच्या सर्व इच्छा तत्काळ पूर्ण होत आहेत, कारण त्याला भगवान श्रीकृष्णांसारखे अलौकिक सद्गुरु लाभलेले आहेत; जे प्रल्हादांच्या सतत चालणा-या सप्रेम नामस्मरणासाठी स्वत:च विषरूपही झाले आणि त्याला सर्व संकटांमधून त्यांनी सुखरूप बाहेर काढले. इथे उपमेच्या माध्यमातून श्री माउली श्रीभगवंतांचे भक्तांवरील परमप्रेमच सांगत आहेत.
बाल प्रल्हादावर हिरण्यकश्यपूने अनंत अत्याचार केले; पण प्रत्येकवेळी त्यातून तो वाचला. कारण हे भगवंतच त्या त्या भयानक रूपात स्वत:च जाऊन प्रल्हादाचे रक्षण करीत होते. लहान बाळाला कडेवर घेऊन आईने निगुतीने सांभाळावे, तसे श्रीभगवंत प्रल्हादाला परोपरीने सांभाळीत होते. त्याचे लळे आनंदाने व अभिमानाने पुरवीत होते. हिरण्यकश्यपूने विष पाजले तर भगवंतच ते विष बनून राहिले. त्यामुळे ते प्यायल्याने मरायच्या ऐवजी प्रल्हादजी अजरामर झाले; इतके की आज अनेक युगे लोटली तरीही प्रल्हाद-श्रीनृसिंहांच्या भक्तिकथा आम्हांला हव्याहव्याशा वाटतात. त्या ऐकल्याने आमचे भक्त-हृदय आजही भगवंतांवरच्या प्रेमाने उचंबळून येते. आम्हां भारतीयांचे बालमन व बालपण आजी-आजोबांच्या तोंडून रसभरित प्रल्हादचरित्र ऐकून आजही निश्चिंततेचा अनुकार देते. आमच्याही मनात बालपणापासूनच त्या परमकनवाळू भगवंतांच्या भक्तवात्सल्याची जाणीव पुरेपूर भरून राहाते. संकटकाळी तेच एकमेव आधार आहेत, याचे यथार्थ भान या कथेमुळे आमच्या चित्तात ठसून राहाते. भक्तवर प्रल्हादांचे हे सर्वजनप्रियत्व, हेच त्यांच्या अनन्य हरि-निष्ठेचे व एकूणच भगवद् भक्तीचे अलौकिकत्व भरभरून सांगत नाही का?
भगवंतांचे भक्तराज प्रल्हादांवर किती प्रेम आहे? अहो, विभूतियोग सांगताना ते स्पष्ट सांगतात की, *'प्रल्हादश्चास्मि दैत्यानां'*, दैत्यांमध्ये मीच प्रल्हाद आहे ! यावर सद्गुरु श्री माउली अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतात की, प्रल्हाद दैत्यकुळात जन्मलेले असूनही, ते साक्षात् श्रीभगवंतांचीच विभूती असल्याने ते कधीच दैत्यभावांनी लिप्त झाले नाहीत. त्यांच्या शुद्ध सात्त्विक चित्तात रजतमादी दैत्यभाव कधीच कणभरही व्यक्त झाले नाहीत. म्हणूनही श्री प्रल्हाद हे परमवंदनीय, प्रात:स्मरणीय असे थोर भक्तश्रेष्ठ होत ! 
भगवंतांच्या या भक्तवात्सल्याचे नेमके वर्णन करताना श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात,
प्रल्हादाकारणे नरसिंह झालासी ।
त्याचिया बोलासी सत्य केले ॥१॥
राम कृष्ण गोविंद नारायण हरी ।
गर्जे राजद्वारी भक्तराज ॥२॥
विठ्ठल माधव मुकुंद केशव ।
तेणे दैत्यराव दचकला ॥३॥
तुका म्हणे त्याकारणे सगुण ।
भक्ताचे वचन सत्य केले ॥४॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

3 May 2017

विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख तिसरा


श्रीभगवंतांना सर्वात जास्त आपले भक्तच आवडतात. त्यांचे आपल्या भक्तांवर, अभिन्न व परमप्रिय अशा लक्ष्मीमातेपेक्षाही जास्त प्रेम असते आणि प्रसंगी ते विलक्षण प्रेम भगवंत मुद्दाम दाखवूनही देतात.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादांसाठी झालेला हा अद्भुत श्रीनृसिंहावतार हे याच विलक्षण भक्त-प्रेमाचे विशेष उदाहरणच म्हणायला हवे.
श्रीमद् भागवत महापुराणाच्या सप्तम स्कंधातील पहिल्या दहा अध्यायांमध्ये ही संपूर्ण नृसिंहावतार कथा भगवान श्री वेदव्यासांनी फार सुंदर शब्दांमध्ये वर्णिलेली आहे. त्यात भक्तिशास्त्रातले अनेक सिद्धांत त्यांनी स्पष्ट करून सांगितलेले आहेत. शिवाय भक्तवर प्रल्हाद व असुर बालकांमधील बोधप्रद संवादाच्या माध्यमातून त्यांनी तुम्हां आम्हां भक्तांनी जन्मभर मनन करावा असा उपदेशही करून ठेवलाय.
श्रीनृसिंह हे भगवंतांचे अत्यंत उग्र रूप होते, इतके की त्यांच्या आविर्भावामुळे संपूर्ण ब्रह्मांडच जळू लागले. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दाखवलेल्या विश्वरूपाचे वर्णन करताना जे म्हटले आहे, ते या उग्र नृसिंहरूपालाही चपखल साजणारेच आहे. माउली म्हणतात,
एथ अग्नीचीही दिठी करपत ।
सूर्य खद्योत तैसा हारपत ।
ऐसें तीव्रपण अद्भुत ।
तेजाचे यया ॥ ज्ञाने.११.३००॥

हे नरसिंहरूप इतके भयंकर होते की त्याच्या तेजाने प्रत्यक्ष अग्नीचीही दृष्टी करपली, महाप्रतापी सूर्य काजव्यासारखा भासू लागला. असे ते तीव्र नृसिंहतेज अवघ्या ब्रह्मांडासाठी असह्य झालेले होते.
पण त्यांचे हिरण्यकश्यपूला मारण्याचे कार्य झाल्यावरही त्यांचा क्रोध काही शांत होईना. हे पाहून सर्व देव-देवता अस्वस्थ झाले. श्रीनृसिंह भगवंतांसमोर जाण्याची कोणाची छातीच होईना. ते वारंवार डरकाळ्या फोडून ब्रह्मांड दणाणून सोडत होते. त्यांच्या त्या गगनभेदी डरकाळ्या नुसत्या ऐकल्यानेही दैत्यस्त्रियांचे गर्भपात होत होते, इतका त्यांचा आवाज भयानक होता. इतर देवतांना प्रश्न पडला की, यांना शांत कसे करावे, नाहीतर त्यांच्या क्रोधाग्नीत सगळे त्रिभुवन जळून खाक व्हायचे. देवतांना काहीच सुचेना काय करावे ते. मग त्यांनी भगवती लक्ष्मीला प्रार्थना केली नृसिंहांना शांत करण्याची. त्या देवांसमोर आल्या ख-या, पण ते उग्र रूप पाहून घाबरल्या व त्याच पावली परत फिरल्या.
शेवटी ब्रह्मदेव लहानग्या प्रल्हादाला म्हणाले, "अरे बाळा, हे उग्ररूप तुझ्यासाठी निर्माण झालेले आहे, आता तूच त्यांना शांत कर. आमची काही हिंमत नाही त्यांच्या समोर जायची !" बाळ प्रल्हादाने शांतपणे ब्रह्मदेवांचे बोलणे ऐकले व तो त्या उग्ररूपाला अजिबात न भिता समोर गेला. त्याने अतीव प्रेमाने व आदराने श्रीभगवंतांना साष्टांग दंडवत घातला.
देवांच्या ज्या भयानक क्रोधामुळे त्रैलोक्याची होळी होत होती, तो क्रोध बाळ प्रल्हादाला पाहताच एका क्षणात शांत झाला. ज्या रक्त ओकणा-या भयंकर नेत्रांमधून काही क्षणांपूर्वी जणू क्रोध-अंगार बरसत होते, तेच नेत्र बाल प्रल्हादाला समोर पाहून अचानक मायेने भरून आले. भगवंतांच्या हृदयात मातृवात्सल्याचा पूर दाटला आणि त्याच स्नेहाने त्यांनी प्रल्हादाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. प्रेमावेगाने प्रल्हादाला जवळ घेऊन आपल्या मांडीवर बसवले; आणि खूप काळाने भेटलेल्या वासराला गाईने प्रेमाने ओथंबून येऊन अंगभर चाटावे, तसे प्रेमाने त्याला चाटायला सुरुवात केली. ते सिंहरूपात प्रकटलेले असल्यामुळे चाटणे हेच त्यांचे प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम होते ना !
इतर देव-देवता तर सोडा, पण लक्ष्मीमाता सुद्धा जेथे जाऊ शकत नव्हती, तेथे भक्तश्रेष्ठ प्रल्हाद नि:संकोचपणे गेले, हेच भक्तीचे श्रेष्ठत्व आहे !!
भगवान वेदव्यासांनी या गोष्टीतून दोन सिद्धांत स्पष्ट केले आहेत की, भक्त व भगवंतांचे प्रेमनाते सगळ्यात वेगळे व अलौकिक असते आणि जे देव-देवतांनाही कधीच प्राप्त होत नाही, ते भगवंतांचे समग्र प्रेम आपल्या अनन्य भक्तीमुळे केवळ भक्तांनाच मिळत असते. म्हणून प्रेमभक्ती ही खरोखरीच बोला-बुद्धीच्या पलीकडची, अपूर्व-मनोहर गोष्ट आहे !!
भगवंतांच्या या अद्भुत भक्तप्रेमाचे चपखल वर्णन करताना सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी म्हणतात,
जय जय नरसिंहा ।
अकळ नकळे तुझा पार ॥ध्रु.॥
भक्तभूषण दीनवत्सल हरी ।
प्रल्हादासी रक्षिलें नानापरी ॥१॥
भावार्थ प्रल्हादभक्तें दाखविला ।
त्याच्या भावार्थे स्तंभी प्रगट झाला ॥२॥
हरिजनाचा द्वेषी सारियेला ।
दास प्रल्हाद देवें रक्षियेला ॥स.गा.११४९.३॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

2 May 2017

विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख दुसरा



भक्ती ही जात, धर्म, कर्म, वंश इत्यादी सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे. श्रीभगवंतांच्या परिपूर्ण प्राप्ती साठी अनन्यभक्ती हा एकच मार्ग आहे; असे भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे प्रतिपादन आहे.
अनन्य भक्तीमुळे भगवंतांशी जी पूर्ण एकरूपता होते, ती ज्ञान, योग, याग, धर्माचरण अशा इतर कोणत्याही मार्गांनी होत नाही, हे सांगताना माउली भक्तश्रेष्ठ श्री प्रल्हादांचेच उदाहरण देतात.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की,
तो प्रल्हाद गा मजसाठीं ।
घेतां बहुतें सदा किरीटी ।
कां जें मियां द्यावें ते गोष्टी ।
तयाचिया जोडे ॥ज्ञाने.९.३२.४५१॥
"अरे अर्जुना, माझ्या अत्यंत लाडक्या भक्त प्रल्हादासाठी मला नृसिंहरूप धारण करावे लागले. तो खरेतर पापयोनी अशा दैत्यकुळात जन्माला आलेला असूनही, प्रत्यक्ष माझ्याशी तुलना केली तर तोच माझ्यापेक्षा कांकणभर सरस ठरेल. कारण मोक्षासारखी दुर्मिळ गोष्ट जी मी खूप परीक्षा पाहून क्वचित एखाद्यालाच प्रदान करतो; तो मोक्ष त्याच्या केवळ कथा जरी प्रेमाने श्रवण केल्या तरी कोणालाही सहज प्राप्त होतो !" म्हणूनच भक्तवर प्रल्हादजी आपल्या भक्तीच्या बळावर श्रीभगवंतांहूनही श्रेष्ठ ठरतात.
माउली श्रीभगवंतांच्या मुखाने सांगतात की, "या अनन्य भक्तांचे चित्त एवढे सामर्थ्यसंपन्न असते की ते त्रिभुवनव्यापक अशा मलाही सहज गवसून घेते. मी एवढा महान विश्वव्यापी, पण त्या भक्तांच्या इवल्याशा चित्तात समग्रपणे सामावतो. म्हणून ते भक्तच माझ्याहूनही मोठे ठरतात !"
भगवान श्रीमाउली भक्तीला गंगेची उपमा देतात. एकदा गंगेला मिळाले की त्या पाण्याचे स्वतंत्र अस्तित्व लोपते. मग पूर्वी तो ओढा असो नाहीतर छोटी नदी असो किंवा गावाचे घाण गटार असो, गंगेला मिळाले की ते गंगारूपच होऊन ठाकते. तसे एकदा या भगवंतांच्या भक्तिचिद्गंगेला मिळाले, की तो भक्त श्रीभगवंतांचेच स्वरूप होऊन जातो.
गंगेला जसा समुद्र हाच अंतिम पाडाव असतो, तसे भक्तीला भगवंत हेच हक्काचे अंतिम गंतव्य स्थान आहेत. म्हणून जो भक्तिमार्गाला लागला तो आज ना उद्या श्रीभगवंतांच्या चरणीच जाणार, त्याला दुसरी गती नाही. हेच भक्तीचे सर्वश्रेष्ठत्व आहे. असे अन्य कोणत्याही मार्गात घडत नाही. फक्त हे 'गंगेला मिळणे' आपल्या हाती नाही, ते श्रीसद्गुरूंनीच कृपापूर्वक घडवावे लागते. ते होईपर्यंत आपण जसे जमेल तसे मनापासून भगवंतांना आळवीत राहायचे असते, वेळ आली की ते बरोबर गुरुरूपाने कृपा करतातच. ही सहज निश्चिंतता देखील केवळ या भक्तीतच लाभते. आज गंगासप्तमी अर्थात् गंगेची उत्पत्ती तिथी आहे, म्हणून मुद्दाम श्रीमाउलींच्या भक्तिचिद्गंगा विवेचनाद्वारे त्या त्रिपथगामिनी भक्तिगंगेला सादर वंदन करूया !
देव अर्जुनाला सांगतात, अनन्यभक्ती समोर जात, वंश इत्यादी सर्व गोष्टी गौणच आहेत. भक्ती हीच धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारी पुरुषार्थांची माता आहे ! "म्हणोनि कुळ जाति वर्ण । हें आघवेंचि गा अकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ज्ञाने.९.३२.४५६॥ 'माझेपण' अर्थात् आपणच सर्वस्वाने श्रीभगवंतांचे होणे; हेच सार्थकतेला कारण ठरते. म्हणून आपण श्रीभगवंतांचे होण्याचाच सतत प्रयत्न केला पाहिजे.
देवांच्या अवतारलीला आणि अवतारी भक्तांच्या, संतांच्या लीला यांच्यामध्ये फलत: भेद नसतो. या कोणत्याही लीलांचे प्रेमाने केलेले वाचन पुण्यप्रद असतेच पण त्यांचे चिंतन-मनन हे त्याहूनही फायदेशीर असते. कारण संत दिसायला तरी आपल्या सारखेच मनुष्यरूप असतात, त्यांनाही आपल्यासारखेच सुख-दु:खादी भोग असतात. म्हणून त्यांच्याविषयी एक वेगळी आपुलकी आपोआपच आपल्या मनात निर्माण होते. या आपुलकीमुळेच, कठीण परिस्थितीत ते कसे वागले? त्यांनी कशाप्रकारे निर्णय घेऊन आपली भक्ती प्रपंचाच्या रामरगाड्यात देखील अबाधित राखली? याबद्दलचे ज्ञान होऊन आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते, साधनेचा आपला हुरूप वाढतो. शिवाय माउली सांगतात की, 'भगवंतांना त्यांच्या भक्तांची स्तुती केली की विशेष आनंद होतो व ते त्या स्तुती करणा-यावर प्रसन्न होऊन कृपा करतात.' हा दुहेरी फायदा असतो संत चरित्रांचा. म्हणून नेहमी संतांची चरित्रे वाचावीत, त्यावर चिंतन करावे.
याही दृष्टीने भक्तश्रेष्ठ श्री प्रल्हादांचे चरित्र आपल्यासाठी फार मोठा आदर्श आहे. सभोवती अत्यंत विरोधी वातावरण असूनही आणि लौकिक दृष्टीने त्या प्रतिकूलतेचे प्रचंड चटके बसत असतानाही, त्यांनी आपल्या अनन्यनिष्ठेने इतकी भक्ती केली, की साक्षात् श्रीभगवंतांना त्यांच्यासाठी असा लोकविलक्षण अवतार धारण करावा लागला. धन्य ते भक्तवर प्रल्हादजी !
आपण नेहमीच तक्रार करतो की, रोजच्या व्यापात आम्हांला भक्तीसाठी, उपासनेसाठी वेळच मिळत नाही, घर, ऑफिस, आजारपणे इत्यादी भानगडीत डोक्याला थोडीही शांतता नसते, कशी करणार आम्ही भक्ती? असे विचार करण्यापूर्वी फक्त एकदा भक्तराज प्रल्हादांच्या चरित्रातले प्रसंग मन:चक्षूंसमोर आणावेत. त्यांचा विचार केल्यास मला नाही वाटत आपल्याला तक्रार करायला काही मुद्दा शिल्लक राहील.
अशा परमवंदनीय प्रल्हादबाळासाठी भगवान श्रीनरहरीराय धावत आले व त्यांनी त्याचे संरक्षण केले. या जगावेगळ्या अवताराचे व त्याच्या विलक्षण लीलेचे फार मोहक वर्णन करून भक्तवत्सल श्रीनृसिंहांचे माहात्म्य सांगताना सद्गुरु श्री ज्ञानराज भगवान म्हणतात,
ऐसा अवतार नरहरी स्तंभामाझारी ।
भक्तां परोपरी धरी रूपें ॥१॥
धरूनिया महीत्व जाला नृसिंहरूप ।
वेदशास्त्रांसी अमूर्त मूर्तीस आला ॥२॥
बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु ।
वर्ण सारङ्गधरू निजरूप ॥३॥
"भक्तांच्या भल्यासाठीच हा नरहरी अवतार स्तंभामधून प्रकट झाला. अत्यंत भव्य-दिव्य अशा श्रीनृसिंह रूपात प्रकटलेले हे श्रीहरितत्त्व दुसरे तिसरे काही नसून, वेदांनाही ज्याचा थांग कधी लागला नाही असे ते साक्षात् परिपूर्ण परब्रह्मच आहे. सकलकलानिधी भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूच आपल्या निजरूपातून पुन्हा श्रीनृसिंह झालेले आहेत. तेच माझे मायबाप, माझे परमहितैषी श्रीसद्गुरु देखील आहेत !"
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


1 May 2017

विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख पहिला

आज वैशाख शुद्ध षष्ठी, भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीनरहरीरायांच्या जयंती नवरात्राचा आज प्रथम दिन. या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये, श्रीभगवंतांचे जास्तीतजास्त स्मरण करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे, त्यासाठीच प्रस्तुत लेखमाला सुरू करीत आहे. आजपासून सुरू होणा-या या भक्तिमहोत्सवाचे सर्वांना सादर निमंत्रण व सर्वांचे प्रेमादरपूर्वक स्वागत देखील !!
भगवान श्रीनृसिंहांची अवतार लीला व भक्तश्रेष्ठ प्रल्हादांची गोष्ट आपण अगदी लहानपणापासूनच ऐकत-वाचत मोठे झालेलो आहोत. श्रीभगवंतांच्या "भक्तवात्सल्य" ब्रीदाचे अलौकिक उदाहरण म्हणून ही गोष्ट प्रसिद्धच आहे. या कथेतून भक्तिशास्त्रातील अनेक सिद्धांत स्पष्ट होतात. पण तेवढा काही विचार आपण कधी केलेलाच नाही या गोष्टीचा. म्हणूनच साधूसंतांच्या वाङ्मयामधून उलगडणारा श्रीनृसिंहकथेतील मार्मिक भक्तिविचार आता पुढील नऊ दिवस आपण त्यांच्याच कृपेने आस्वादणार आहोत. तसेच भगवान श्रीनृसिंहांशी संबंधित पण फारसे ज्ञात नसलेले काही अप्रचलित व अनवट माहितीचे संदर्भही आपण जाणून घेणार आहोत. हीच आपली या श्रीनृसिंह जयंती नवरात्रानिमित्त श्रींची गुणगायन-सेवा !
भगवान श्री माउलींनी ज्ञानेश्वरीत काही महत्त्वपूर्ण ओव्यांमधून श्रीनृसिंह लीलेचा उल्लेख केलेला आहे. एका ठिकाणी भक्तीचे श्रेष्ठत्व व सर्वसमावेशकत्व सांगताना माउली म्हणतात,
ते पापयोनीही होतु कां ।
ते श्रुताधीतही न होतु कां ।
परी मजसी तुकितां तुका ।
तुटी नाही ॥ ज्ञाने.९.३२.४९९॥
ज्या भक्तांनी आपले सर्व भाव केवळ मज एका भगवंतालाच समर्पित करून माझ्याच साठी जे जीवन जगत असतात, ते शरणागत भक्त राक्षसादी पाप योनीत जन्मलेले असले, त्यांनी वेदांचे अध्ययनही केलेले नसले, तरी माझ्याशी म्हणजे साक्षात् भगवंतांशी तुलना केली तर ते तसूभरही कमी ठरणार नाहीत. आधी कसेही असले तरी ते त्या परमभक्तीमुळे पूर्ण भगवत्स्वरूपच झालेले असतात. यासाठी एक चपखल उदाहरण देताना श्रीभगवंत अर्जुनाला सांगतात,
पाहें पां भक्तिचेनि आथिलेपणें ।
दैत्यीं देवां आणिलें उणें ।
माझें नृसिंहत्व लेणें ।
जयाचिये महिमे ॥ ज्ञाने.९.३३.४५० ॥
या थोर भक्तीच्या वैभवामुळे पूर्ण तमोगुणी अशा दैत्यांनी देखील सत्त्वगुणी अशा देवतांना उणेपण आणलेले आहे. एवढेच नाही तर, माझा नृसिंहावतार देखील या दैत्यराज प्रल्हादासाठीच तर झाला.
सद्गुरु श्री माउलींचे येथे स्पष्ट सांगणे आहे की, श्रीभगवंतांची पूर्ण प्राप्ती करून घेण्याचा भक्ती हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. निखळ प्रेमभक्ती ही अशी अलौकिक गोष्ट आहे की तिची भुरळ प्रत्यक्ष निष्काम, निर्मोही परमात्म्यालाही पडते. एरवी निरिच्छ, निस्पृह, निराकार, निर्विकार असणारा परमात्मा, या भक्तिसुखासाठीच सगुण-साकार होतो, अवतार धारण करून अनेक अद्भुत लीला करतो व भक्तांसह त्या परमभक्तीचा आनंद पुरेपूर लुटतो. केवळ विशुद्ध प्रेमाच्याच धाग्याने हा अपार परमात्मा समग्र बांधला जाऊ शकतो. ज्ञान, योग, याग, तप इत्यादी कोणत्याच गोष्टीत ते पूर्ण सामर्थ्य नाही. तेथे केवळ भक्तीच प्रमाण आहे. तसे स्वत: श्रीभगवंत भक्तराज अर्जुनाला सांगतात, "वांचूनि आमुचियालागीं निष्कळ । भक्तितत्त्व ॥ज्ञाने.९.२६.३९६॥"
योगयागादी कष्टप्रद साधनांपेक्षा सहज सोपा व सर्वांना आचरता येईल असा एकमेव भक्तिमार्गच आहे. शिवाय त्यात काही चुकण्याचा प्रश्नच येत नसल्याने तोच सर्वश्रेष्ठही ठरतो. म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीत श्रीभगवंतांची भक्ती सोडता कामा नये ! श्रीभगवंतांचा श्रीनृसिंह अवतार हा या भक्तीचे अलौकिकत्व व सर्वश्रेष्ठत्व प्रतिपादित करण्यासाठीच झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. याच सिद्धांताचे विवरण आपण या नवरात्र महोत्सवात श्रीनरहरीरायांच्या कृपेने करणार आहोत.
भगवान श्रीनृसिंह हे भगवान श्रीमहाविष्णूंचे पूर्णावतार आहेत. ते केवळ हिरण्यकश्यपूला मारण्यासाठीच अवतरले होते, असे मानले जाते. पण खरेतर याही अवतार-लीलेत अनेक भक्तिसिद्धांत अनुस्यूत आहेतच. आज हजारो वर्षे भक्तप्रतिपालक भगवान श्रीनरहरीरायांची उपासना चढत्या वाढत्या प्रमाणात होत आहे, हेच त्यांच्या लोकप्रियतेचे व भक्तवात्सल्याचे निदर्शक नाही का?
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in