2 May 2017

विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख दुसरा



भक्ती ही जात, धर्म, कर्म, वंश इत्यादी सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे. श्रीभगवंतांच्या परिपूर्ण प्राप्ती साठी अनन्यभक्ती हा एकच मार्ग आहे; असे भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे प्रतिपादन आहे.
अनन्य भक्तीमुळे भगवंतांशी जी पूर्ण एकरूपता होते, ती ज्ञान, योग, याग, धर्माचरण अशा इतर कोणत्याही मार्गांनी होत नाही, हे सांगताना माउली भक्तश्रेष्ठ श्री प्रल्हादांचेच उदाहरण देतात.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की,
तो प्रल्हाद गा मजसाठीं ।
घेतां बहुतें सदा किरीटी ।
कां जें मियां द्यावें ते गोष्टी ।
तयाचिया जोडे ॥ज्ञाने.९.३२.४५१॥
"अरे अर्जुना, माझ्या अत्यंत लाडक्या भक्त प्रल्हादासाठी मला नृसिंहरूप धारण करावे लागले. तो खरेतर पापयोनी अशा दैत्यकुळात जन्माला आलेला असूनही, प्रत्यक्ष माझ्याशी तुलना केली तर तोच माझ्यापेक्षा कांकणभर सरस ठरेल. कारण मोक्षासारखी दुर्मिळ गोष्ट जी मी खूप परीक्षा पाहून क्वचित एखाद्यालाच प्रदान करतो; तो मोक्ष त्याच्या केवळ कथा जरी प्रेमाने श्रवण केल्या तरी कोणालाही सहज प्राप्त होतो !" म्हणूनच भक्तवर प्रल्हादजी आपल्या भक्तीच्या बळावर श्रीभगवंतांहूनही श्रेष्ठ ठरतात.
माउली श्रीभगवंतांच्या मुखाने सांगतात की, "या अनन्य भक्तांचे चित्त एवढे सामर्थ्यसंपन्न असते की ते त्रिभुवनव्यापक अशा मलाही सहज गवसून घेते. मी एवढा महान विश्वव्यापी, पण त्या भक्तांच्या इवल्याशा चित्तात समग्रपणे सामावतो. म्हणून ते भक्तच माझ्याहूनही मोठे ठरतात !"
भगवान श्रीमाउली भक्तीला गंगेची उपमा देतात. एकदा गंगेला मिळाले की त्या पाण्याचे स्वतंत्र अस्तित्व लोपते. मग पूर्वी तो ओढा असो नाहीतर छोटी नदी असो किंवा गावाचे घाण गटार असो, गंगेला मिळाले की ते गंगारूपच होऊन ठाकते. तसे एकदा या भगवंतांच्या भक्तिचिद्गंगेला मिळाले, की तो भक्त श्रीभगवंतांचेच स्वरूप होऊन जातो.
गंगेला जसा समुद्र हाच अंतिम पाडाव असतो, तसे भक्तीला भगवंत हेच हक्काचे अंतिम गंतव्य स्थान आहेत. म्हणून जो भक्तिमार्गाला लागला तो आज ना उद्या श्रीभगवंतांच्या चरणीच जाणार, त्याला दुसरी गती नाही. हेच भक्तीचे सर्वश्रेष्ठत्व आहे. असे अन्य कोणत्याही मार्गात घडत नाही. फक्त हे 'गंगेला मिळणे' आपल्या हाती नाही, ते श्रीसद्गुरूंनीच कृपापूर्वक घडवावे लागते. ते होईपर्यंत आपण जसे जमेल तसे मनापासून भगवंतांना आळवीत राहायचे असते, वेळ आली की ते बरोबर गुरुरूपाने कृपा करतातच. ही सहज निश्चिंतता देखील केवळ या भक्तीतच लाभते. आज गंगासप्तमी अर्थात् गंगेची उत्पत्ती तिथी आहे, म्हणून मुद्दाम श्रीमाउलींच्या भक्तिचिद्गंगा विवेचनाद्वारे त्या त्रिपथगामिनी भक्तिगंगेला सादर वंदन करूया !
देव अर्जुनाला सांगतात, अनन्यभक्ती समोर जात, वंश इत्यादी सर्व गोष्टी गौणच आहेत. भक्ती हीच धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारी पुरुषार्थांची माता आहे ! "म्हणोनि कुळ जाति वर्ण । हें आघवेंचि गा अकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ज्ञाने.९.३२.४५६॥ 'माझेपण' अर्थात् आपणच सर्वस्वाने श्रीभगवंतांचे होणे; हेच सार्थकतेला कारण ठरते. म्हणून आपण श्रीभगवंतांचे होण्याचाच सतत प्रयत्न केला पाहिजे.
देवांच्या अवतारलीला आणि अवतारी भक्तांच्या, संतांच्या लीला यांच्यामध्ये फलत: भेद नसतो. या कोणत्याही लीलांचे प्रेमाने केलेले वाचन पुण्यप्रद असतेच पण त्यांचे चिंतन-मनन हे त्याहूनही फायदेशीर असते. कारण संत दिसायला तरी आपल्या सारखेच मनुष्यरूप असतात, त्यांनाही आपल्यासारखेच सुख-दु:खादी भोग असतात. म्हणून त्यांच्याविषयी एक वेगळी आपुलकी आपोआपच आपल्या मनात निर्माण होते. या आपुलकीमुळेच, कठीण परिस्थितीत ते कसे वागले? त्यांनी कशाप्रकारे निर्णय घेऊन आपली भक्ती प्रपंचाच्या रामरगाड्यात देखील अबाधित राखली? याबद्दलचे ज्ञान होऊन आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते, साधनेचा आपला हुरूप वाढतो. शिवाय माउली सांगतात की, 'भगवंतांना त्यांच्या भक्तांची स्तुती केली की विशेष आनंद होतो व ते त्या स्तुती करणा-यावर प्रसन्न होऊन कृपा करतात.' हा दुहेरी फायदा असतो संत चरित्रांचा. म्हणून नेहमी संतांची चरित्रे वाचावीत, त्यावर चिंतन करावे.
याही दृष्टीने भक्तश्रेष्ठ श्री प्रल्हादांचे चरित्र आपल्यासाठी फार मोठा आदर्श आहे. सभोवती अत्यंत विरोधी वातावरण असूनही आणि लौकिक दृष्टीने त्या प्रतिकूलतेचे प्रचंड चटके बसत असतानाही, त्यांनी आपल्या अनन्यनिष्ठेने इतकी भक्ती केली, की साक्षात् श्रीभगवंतांना त्यांच्यासाठी असा लोकविलक्षण अवतार धारण करावा लागला. धन्य ते भक्तवर प्रल्हादजी !
आपण नेहमीच तक्रार करतो की, रोजच्या व्यापात आम्हांला भक्तीसाठी, उपासनेसाठी वेळच मिळत नाही, घर, ऑफिस, आजारपणे इत्यादी भानगडीत डोक्याला थोडीही शांतता नसते, कशी करणार आम्ही भक्ती? असे विचार करण्यापूर्वी फक्त एकदा भक्तराज प्रल्हादांच्या चरित्रातले प्रसंग मन:चक्षूंसमोर आणावेत. त्यांचा विचार केल्यास मला नाही वाटत आपल्याला तक्रार करायला काही मुद्दा शिल्लक राहील.
अशा परमवंदनीय प्रल्हादबाळासाठी भगवान श्रीनरहरीराय धावत आले व त्यांनी त्याचे संरक्षण केले. या जगावेगळ्या अवताराचे व त्याच्या विलक्षण लीलेचे फार मोहक वर्णन करून भक्तवत्सल श्रीनृसिंहांचे माहात्म्य सांगताना सद्गुरु श्री ज्ञानराज भगवान म्हणतात,
ऐसा अवतार नरहरी स्तंभामाझारी ।
भक्तां परोपरी धरी रूपें ॥१॥
धरूनिया महीत्व जाला नृसिंहरूप ।
वेदशास्त्रांसी अमूर्त मूर्तीस आला ॥२॥
बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु ।
वर्ण सारङ्गधरू निजरूप ॥३॥
"भक्तांच्या भल्यासाठीच हा नरहरी अवतार स्तंभामधून प्रकट झाला. अत्यंत भव्य-दिव्य अशा श्रीनृसिंह रूपात प्रकटलेले हे श्रीहरितत्त्व दुसरे तिसरे काही नसून, वेदांनाही ज्याचा थांग कधी लागला नाही असे ते साक्षात् परिपूर्ण परब्रह्मच आहे. सकलकलानिधी भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूच आपल्या निजरूपातून पुन्हा श्रीनृसिंह झालेले आहेत. तेच माझे मायबाप, माझे परमहितैषी श्रीसद्गुरु देखील आहेत !"
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


4 comments:

  1. Rahul Kulkarni4/22/2018 5:33 pm

    खूप छान लेख

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर लेख...
    🙏🙏🙏
    श्री नारसिन्हाय नमः 🙏🙏🙏
    🌹🌹🌹
    ओम नमो भगवती गंगे 🙏🙏🙏
    💐💐💐🌹🌹🌹

    ReplyDelete
  3. सुंदर माहिती

    ReplyDelete
  4. तुमच्या लेखणीतून या कथेचे अनेक अज्ञात पैलू उलगडले जातात आणि एक वेगळीच अनुभूती मिळते

    ReplyDelete