12 Mar 2017

होलिकोत्सव विशेष - लेखांक पहिला

एका जनार्दनी मारिली बोंब

आज हुताशनी पौर्णिमा अर्थात् होळी  !!
अविद्येची, अज्ञानाची, अपूर्णतेची, विकारांची होळी करून ज्ञानाचा, तेजाचा, सद्गुणांचा, सत्त्वाचा स्निग्ध प्रकाश पसरवणारा हा तेजोत्सव  !
भगवान श्रीकृष्ण व भगवती श्रीराधा आणि इतर गोप-गोपींच्या होळी-लीलेचा सुमधुर आस्वाद, भावगर्भ अशा संतसाहित्यातून व जुन्या काव्य-साहित्यातून आपल्याला वाचायला मिळतो.
आजच्याच तिथीला भक्तश्रेष्ठ श्री प्रल्हादांना जीवे मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण जी होलिका तिला पाचारण केले. 'अग्नी कधीही जाळणार नाही', असा तिला आशीर्वाद प्राप्त होता. लहानग्या प्रल्हादांना तिच्या मांडीवर बसवून भोवताली आग लावून देण्यात आली. प्रल्हादजी आपल्या नारायणस्मरणात निमग्न होते. पण आश्चर्यच वर्तले ! कुबुद्धीचे साक्षात् रूप असणारी ती होलिकाच जळून खाक झाली. प्रल्हादांच्या केसालाही धक्का लागला नाही.
ही होळीची कथा फार मार्मिक आहे. भगवंतांच्या भक्तांना कोणत्याही वाईट शक्ती कधीच काहीही करू शकत नाहीत, हाच गर्भित संकेत या कथेतून दिलेला आहे.
आजच्याच तिथीला, १८ फेब्रुवारी १४८६ रोजी बंगाल प्रांतातील नवद्वीप परिसरातील मायापूर येथे, मायेला कायम ठकविणा-या भगवान श्रीकृष्णांच्या परमप्रेमस्वरूपाने, भगवती श्रीराधाजींनी वंदनीया शचीमातेच्या पोटी अवतार धारण केला; श्रीगौरांग - चैतन्य महाप्रभू नावाने ! ते साक्षात् श्रीकृष्णप्रेमाची घनीभूत श्रीमूर्तीच होते. गौडीय द्वैतवादी वैष्णवमताचे प्रधान आचार्य असणा-या श्रीचैतन्य महाप्रभूंचे समग्र चरित्र अक्षरश: अलौकिक आहे. गोरखपूरच्या गीताप्रेसने प्रकाशित केलेले व पू.प्रभुदत्तजी ब्रह्मचारी यांनी लिहिलेले "श्रीश्रीचैतन्य चरितावली" हे भलेमोठे अद्भुत चरित्र सर्वांनी एकदातरी आवर्जून वाचावेच, अशी माझी कळकळीची विनंती आहे.
श्रीमहाप्रभूंचे हरिसंकीर्तन विलक्षण असे. श्रीकृष्णनाम नुसते ऐकले तरी त्याक्षणी ते भावावस्थेमध्ये जात असत. आपल्या महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये महाप्रभूंचे काही काळ वास्तव्य झालेले असून पंढरपूर, जेजुरी या तीर्थस्थानी त्यांनी लीला केल्याच्या नोंदी आहेत. त्या भ्रमंतीमध्ये पंढरपूरहून जेजुरीला जाताना ते प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या फलटण नगरीतूनच गेलेले असणार. याच प्रवासात त्यांनी जेजुरीजवळील वाल्हे खिंडीत वाटमारी करणा-या नौरोजी नावाच्या डाकूवर कृपा करून त्याचा उद्धार केला होता. पुढे जेजुरीतील काही देवदासींनाही भगवद्भक्तीचे मर्म सांगून त्या हीन जगण्यातून बाहेर काढले होते. १४ जून १५३४ रोजी त्यांनी जगन्नाथपुरी येथे श्रीजगन्नाथ भगवंतांच्या श्रीमूर्तीमध्ये आपला दिव्य देह विलीन करून अवतार समाप्ती केली. आज त्यांच्या लीलांचे स्मरण करून व त्यांना अत्यंत प्रिय असणारे भगवन्नाम गाऊन आपण त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त करूया !
आपल्या संतांनी होळीच्या रूपकावर अतीव अर्थगर्भ व सुंदर अभंगरचना केलेल्या आहेत. श्रीसंत एकनाथ महाराज अशाच आपल्या एका रूपक अभंगात म्हणतात,
देहचतुष्टयाची रचोनि होळी ।
ज्ञानाग्नि घालुनी समूळ जाळी ॥१॥
अझुनि का उगलाची ।
बोंब पडों दे नामाची ॥२॥
मांदी मेळवा संतांची ।
तुम्हां साची सोडविण्या ॥३॥
धांवण्या धावती संत अंतरंग ।
संसार शिमगा सांग निरसती ॥४॥
एका जनार्दनीं मारिली बोंब ।
जन वन स्वयंभ एक जालें ॥५॥

स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे चार देह आहेत. या चारी देहांची होळी रचून त्याला श्रीसद्गुरुकृपेने प्रकट होणारा ज्ञानाग्नी लावून ती होळी समूळ जाळून टाकली पाहिजे. अरे मनुजा, अजूनही तू गप्प का आहेस? श्रीसद्गुरूंनी कृपापूर्वक दिलेल्या नामाची त्यांनी शिकविलेल्या युक्तीने मनापासून बोंब मार.
तुझी या संसारचक्रातून सोडवणूक होण्यासाठी संतांच्या मांदियाळीला शरण जा. संतांची मांदियाळी म्हणजेच आपापली श्रीगुरुपरंपरा होय. त्या परंपरेच्या कृपेनेच तुझी यथार्थ सोडवणूक होईल.
होळी भोवती बोंब मारत धावतात. तसे हे संत आपल्याला बाहेर न धावता अंतरंगातच धावायला आणि आपल्या हृदयातच हरिनामरूपी बोंब मारायला शिकवतात व बाहेर बहरणारा संसाररूपी शिमगा त्याद्वारे समूळ निरसतात.
सद्गुरु जनार्दनांनी माझ्या कानात कृपायुक्त नामाची बोंब मारल्यामुळे व त्यांनी शिकवल्याप्रमाणे मी देखील नामाची बोंब मारल्यानेच आता जनी, वनी, सर्वत्र मला ते स्वयंभू परब्रह्मच सतत प्रतीत होत आहे. माझा शिमगा सद्गुरुकृपेने असा साजरा झाला, आता तुम्ही देखील श्रीसद्गुरूंना शरण जावून, माझ्यासारखाच तो प्रयत्नपूर्वक साधून घ्या, असे संत एकनाथ महाराज या अभंगातून आपल्याला उपदेशितात.
श्रीगुरुकृपेने अनुभवलेला आपला विलक्षण अनुभव ते येथे सुंदर शब्दांमध्ये व्यक्त करीत आहेत. यातील सार आपण लक्षात घ्यायला हवे. "अझुनि का उगलाची । बोंब पडों दे नामाची ॥" हेच त्यांचे तळमळीचे सांगणे जर आपण लवकरात लवकर समजून नाही घेतले, तर आपल्यावर वेगळ्या प्रकारची बोंब मारण्याची वेळ नक्कीच येईल आणि तेव्हा कोणी त्यातून बाहेर काढणारेही जवळ नसेल. म्हणून वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
संतांना अभिप्रेत असणारी ही खरी होळी सर्वांना लवकरात लवकर साजरी करायला मिळो, हीच या होलिकोत्सवाच्या निमित्ताने मन:पूर्वक शुभेच्छा !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

8 comments:

  1. तो क्षण मांगल्याचा आहे

    ReplyDelete
  2. होलीकोत्सवाचा अद्वितीय सुंदर आध्यात्मिक बोध .धन्यवाद !

    ReplyDelete
  3. पुन्हा वाचून समाधान झाले, उजळणी झाली धन्यवाद

    ReplyDelete
  4. खूप काही शंकेचे निरसन झाली. . नवीन माहिती मिळाली. . . 🙏🙏🙏

    ReplyDelete
  5. ।। *मानसहोळी* ।। संत जनाबाई यांची!

    कराया साजरा । होलिकेचा सण ।
    मनाचे स्थान । निवडीले ।।

    ऐसे ते स्थान । साधने सरावले ।
    भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।

    त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला।
    त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।।

    रचलीया तेथे। लाकडे वासनांची ।
    इंद्रीयगोवऱ्याची। रास भली ।।

    गुरुकृपा तैल । रामनाम घृत ।
    अर्पिले तयात । ऐसे केले ।।

    रेखिली भोवती । सत्त्कर्म रांगोळी ।
    भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।

    वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले ।
    यज्ञरूप आले । झाली कृपा ।।

    दिधली तयाते। विषय पक्वान्नाहुती ।
    आणिक पुर्णाहूती । षड्रिपु श्रीफळ।।

    झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत ।
    जाणावया तेथ । नूरले काही ।।

    वाळ्या म्हणे जनी ।
    व्हावी ऐसी होळी ।।
    जेणे मुक्तीची दिवाळी।
    अखंडित ।। 🙏🙏🙏
    🙏🙏ही कविता जनाबाईंची नाही.
    माझा मित्र डॉ प्रसाद वाळिंबे यांची आहे.
    शेवटच्या कडव्यात " वाळ्या म्हणे जनी " असे आहे म्हणजे डॉ वाळिंबे लोकांना ' जनांना' उद्देशून वरील काव्य लिहीत आहे असा अर्थ आहे. त्याला मित्र ' वाळ्या' अशी हाक मारतात.
    खूप प्रतिभाशाली आहे. मोठा डोळ्यांचा तज्ञ आहे. अरण्येश्वरला practice करतो. ही कविता जनाबाईंनी लिहिली असे वाटणे हा त्याच्या प्रतिभेचा सन्मान आहे.🙏🙏

    आपण जाणकार आहात . फक्त माहिती साठी पाठवत आहे.
    डॉ सदानंद चावरे पुणे

    ReplyDelete
  6. संदर्भ. सर आपण लिहिलेली पोस्ट वाचली.म्हणून सविस्तर उत्तर लिहिले
    डॉ सदानंद चावरे (9422506104)

    मूळ पोस्ट:-

    *एका जनार्दनी मारिली बोंब*

    आज हुताशनी पौर्णिमा, आपल्या भाषेत होळी !!
    भारतीय सणांमधील एक विशेष सण म्हणजे होळी. दुष्टप्रवृत्तीचा कायम नाशच होतो, हे उच्चरवाने सांगणारा हा महोत्सव भारतीयांच्या विशेष आवडीचा आहे.
    याच संदर्भातला एक महत्त्वाचा भाग सांगायची इच्छा होत आहे. सोशलमिडियावर सध्या प्रचंड ज्ञानी पंडितांचा (?) सुळसुळाट झालेला आहे. ते मनाला येईल ते बरळत असतात. अशा भंपक पोस्ट्सना काहीही अर्थ नसतो. त्यातील कोणतीच माहिती शास्त्रशुद्ध तर नसतेच, शिवाय अनुभवाच्या मोजपट्टीवर घासून पुसून तपासलेलीही नसते. असल्याच एका होळीच्या पोस्टमधील विनोदी मजकूर... "आजच्या होळीच्या पवित्र अग्नीत...." असा सध्या सगळीकडे फिरतोय. तसेच श्रीसंत जनाबाईंचा अभंग म्हणून 'मानसहोळी' नावाची एक रटाळ रचनाही फिरते आहे. ती संत जनाबाईंची रचना नाही, तसेच त्यात मांडलेल्या कल्पनाही निरर्थकच आहेत.
    अहो, होळी आपल्याकडे पवित्र मानत नाहीत. होळाष्टकात, होळीच्या आधीच्या आठ दिवसांत कोणतेही शुभकृत्य केले जात नाही. होळीच्या दुसऱ्या दिवशी, धुळवडीला ग्रहणासारखा करीदिन असतो. आता या ज्ञानी(?) मंडळींना कोणी समजवायचे की होळीचा अग्नी पवित्र नाही ते. म्हणूनच, असल्या बिनबुडाच्या माहितीपेक्षा, संतांनी वर्णिलेले होळीचे यथार्थ रूपक आपण आधी नीट समजून घ्यायला हवे.
    या होलिकोत्सवावर आपल्या ज्ञानी, आत्मानुभवी संतांनी फार सुंदर अशा रूपकात्मक रचना केलेल्या आहेत. असे दोन विशेष अभंग आज व उद्या आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यातील पहिल्या, श्रीसंत एकनाथ महाराजांच्या अभंगाच्या आधारे आपण होलिकोत्सवाचे महत्त्व आजच्या लेखात जाणून घेऊ या.
    आजच्या तिथीला ज्यांची जयंती असते, त्या श्रीकृष्णप्रेमस्वरूप श्री गौरांग-चैतन्य महाप्रभूंच्याही श्रीचरणीं सादर नतमस्तक होऊ या !
    *एका जनार्दनी मारिली बोंब*
    https://rohanupalekar.blogspot.com/2017/03/blog-post_12.html?m=1
    होळीचे रूपक जाणून घेण्यासाठी या लिंकवरील लेख आवर्जून वाचावा आणि आपल्या सुहृदांनाही पाठवावा ही विनंती !!

    ReplyDelete