31 Mar 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - तिसरा



नाम संजीवनी, सप्रेम लाधली ।
तयासी साधली, साम्यकळा ॥१॥
कर्मसाम्यदशे, गुरुकृपावेध ।
सहज प्रबोध, उदेजला ॥२॥
भक्तियोगस्थिती, परंपरासार ।
धन्य तोचि नर, प्राप्तकाम ॥३॥
स्वामीकृपामेघ, अमृते वोळला ।
अखंडचि ठेला, वरुषत ॥४॥
श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।

अर्थ: ज्याला प्रेमयुक्त नाम घेण्याची इच्छा हीच जणू संजीवनी औषधी मिळाली, त्याला कर्मसाम्यदशा सहज प्राप्त होते. ( कर्मसाम्यदशा म्हणजे आपल्या पूर्वकर्मांमुळे जी प्रपंच करण्याविषयीची ओढ असते, ती संपून मनातूनच परमार्थ करण्याची ओढ लागणे.) या कर्मसाम्यदशेने, "श्रीगुरूंची भेट कधी होईल?" अशी तीव्र तळमळ लागते. अशाप्रकारे योग्य वेळ आली असता परंपरेने आलेल्या ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूंची भेट होऊन त्या भाग्यवान जीवाला त्यांचा कृपानुग्रह लाभतो व आत्मज्ञान उदयाला येते. त्यानंतरच परंपरेचे सार असणारी भक्तियोगाची स्थिती प्राप्त होते. त्या स्थितीत 'काही मिळवावे' अशी इच्छाच माणसाला उरत नाही. 'अमृता' म्हणते की, अशी भक्ती मनात स्थिरावली की, श्रीस्वामींचा कृपा-मेघ आपल्यावर प्रसन्न होतो आणि अखंड कृपावर्षाव करीतच राहातो. हा श्रीस्वामींच्या नाम-संजीवनीचाच अद्भुत प्रभाव आहे.
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

30 Mar 2017

श्रीस्वामीसमर्थ नामपाठ - अभंग - दुसरा

जन्मोनी संसारी, तोडी येरझारी ।
वायाचि माघारी, जासी कैंचा ॥१॥
स्वामीनामपाठ, मार्ग पाहे नीट ।
भक्तिप्रेमपीठ, घरा येई ॥२॥
बैसोनी निवांत, जळेल संचित ।
क्रियमाण खंत, नुरे काही ॥३॥
अमृतेचे घरा, स्वामीप्रेम झरा ।
प्रकटला खरा, नामपाठी ॥४॥
श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ  ।

अर्थ  :  हे मानवा, या पुण्यभूमीत तुला ईश्वरीकृपेने सारासार विचार करू शकणारा मानवजन्म मिळाला आहे. तेव्हा आता तू नामजपाच्या साधनेने जन्ममरणाच्या येरझारा चुकविण्याचा प्रयत्न कर. ते न करता परत परत जन्म-मरण चक्रातच कसा काय अडकतोस? स्वामीनामपाठ हा येरझारा चुकविण्याचा नेटका मार्ग आहे, त्या मार्गाने चालावयास लाग. त्यायोगे तुझ्या अंत:करणात विशुद्ध भक्तिप्रेमाचे प्रकटीकरण होईल. एका जागी बसून निश्चिंत मनाने नामजप कर. त्यामुळे तुझी जन्मोजन्मींची पापे जळून जातील. संचित कर्म शिल्लकच उरणार नाही. शिवाय आत्ता जी कर्मे हातून घडत आहेत, त्या क्रियमाण कर्मांचीही खंत तुला बाळगायला नको. नामजपाने अशा प्रकारे कर्मांचे बंधनच समूळ नष्ट होते. आपला नामजपाचा स्वानुभव सांगताना 'अमृता' (प.पू.श्री.शिरीषदादा कवडे) म्हणते की, या नामपाठाच्या अनुसंधानाने माझ्या घरी म्हणजेच अंत:करणात श्रीस्वामीप्रेमाचा अखंड वाहणारा आणि आल्हाददायक असा झुळुझुळू झराच प्रकट झालेला आहे !
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk ] सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे

29 Mar 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ


अनंतकोटीब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात् परब्रह्म आहेत. त्यांच्या लीला अगाध आहेत. त्यांच्या पावन नामाचे माहात्म्य देखील त्यांच्याच स्वरूपासारखे अगाध, अपार आणि अद्भुत आहे. त्यांच्या सप्रेम नामस्मरणाने अघटित घटना देखील सहज घडून येताना दिसतात. म्हणूनच, श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण नेमाने व प्रेमाने करणे ही या संप्रदायाची मुख्य उपासनाच आहे. या नामस्मरणाने श्री स्वामी समर्थ महाराजांची पूर्णकृपा लाभून तो भक्त धन्य होतो, यात शंकाच नाही.
राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा परंपरेतील थोर सत्पुरुष प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांनी श्री स्वामी महाराजांच्याच परमकृपेने, त्यांचे अद्भुत स्वरूप, त्यांच्या अगाध लीला आणि त्यांच्या दिव्य-पावन नामाची शास्त्रोचित उपासना यांविषयी शुद्ध सांप्रदायिक दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण प्रकाश आपल्या "श्रीस्वामी समर्थ नामपाठ" या सत्तावीस अभंग असलेल्या लघुग्रंथाच्या माध्यमातून टाकलेला आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या संप्रदायाची फार मोलाची सूत्रे या प्रासादिक रचनेतून व्यक्त झालेली आहेत. तसेच या रचनेला प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचाच दिव्य आशीर्वादही लाभलेला असल्यामुळे, याचे पठण-चिंतन अतिशय वरदायक ठरणारे आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या जयंतीपासून ते पुण्यतिथी पर्यंत दररोज या अलौकिक नामपाठातील एक एक अभंग व त्याचा अर्थ देण्यात येणार आहे. कोल्हापूर येथील ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक, राष्ट्रीयपंडित श्री.विनायकराव देसाई यांनी हा सुलभ अर्थ लिहिलेला आहे.
श्रीस्वामी समर्थ नामपाठाची अर्थासह पीडीएफ 
https://drive.google.com/file/d/0B-4fTpvl_d6sdGREVVhpY1pmM1E/view?usp=drivesdk नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.
सत्तावीस दिवसांच्या या पावन पर्वामध्ये, या श्रीस्वामीकृपांकित नामपाठाच्या नित्यपठण-चिंतनाने सर्व भक्तांनी श्री स्वामी महाराजांची कृपा संपादन करावी ही प्रेमळ प्रार्थना  !
   अभंग पहिला
ब्रह्मरस चवी, स्वानंद माधवी ।
स्वामीनाम सेवी, तया पावे ॥१॥
स्वामी मुखे म्हणा, स्वामी मुखे म्हणा ।
वटमूल जाणा, प्रकटले ॥२॥
नाम घेता वाचे, बंध वासनेचे ।
दैन्य दुरिताचे, फिटे वेगी ॥३॥
साक्ष बहुतांची, सुकीर्ती नामाची ।
अमृते संतांची, आणभाक ॥४॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
अर्थ :-  जो साधक स्वामीनामाचा जप आवडीने करतो, त्याला ब्रह्मरसाची गोडी अनुभवाला येते. आत्मानंदाचा अनुभवरूप वसंत त्याच्या ठायी बहरतो. म्हणूनच मुखाने सतत स्वामीनाम घ्या, असे मी आग्रहाने म्हणते. वटवृक्षाप्रमाणे महान असे श्रीस्वामी तुमच्यापुढे त्यामुळे प्रकट होतील. स्वामीनाम घेतले असता संसारबंधनात टाकणा-या वासना आणि पापाने निर्माण होणारे दैन्य तत्काळ नष्ट होईल. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही. कित्येक संतांची माझ्या या म्हणण्यास साक्ष आहे. स्वामीनामाची उत्तम कीर्ती आजवर अनेक संतांनी उच्चरवाने वर्णिली आहे. त्यांनी प्रतिज्ञापूर्वक जे सांगितले, तेच मी अमृता तुम्हाला प्रेमाने सांगत आहे. ( प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांची काव्य नाम-मुद्रा "अमृता" अशी आहे. )

अवतार समर्थ झाला असे

राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात् परिपूर्ण परब्रह्मच, बोलाबुद्धीच्या पलीकडले, अलौकिक, अद्भुत आणि विलक्षण !! श्रीभगवंतांचा हा अवतार म्हणजे अक्षरश: चमत्कारालाही चमत्कार वाटावा इतका वैशिष्ट्यपूर्ण आहे. सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवांनाही थांग लागणार नाही, असे हे परिपूर्ण परमात्मरूप श्रीस्वामीब्रह्म मात्र अत्यंत दयाळू, कनवाळू, मायाळू आहे, हेही तितकेच सत्य ! मायेहूनही मवाळ, अत्यंत दयाळ । स्वामीब्रह्म कृपाळ भक्तालागी ॥ म्हणूनच नुसते 'स्वामी महाराज' एवढे जरी कळवळून म्हटले, तरी ही स्वामीमाउली धावत येऊन आपल्याला कडेवर घेते, आपले लाड करते. त्यासाठी फक्त खरे लेकरुपण मात्र आपल्या अंगी असायला हवे.
जगद्गुरु भगवान श्रीदत्तात्रेय प्रभूंनीच जगावर कृपा करण्यासाठी हा करुणावरुणालय स्वामी अवतार धारण केलेला आहे. आजच्याच पावन तिथीला शके १०७१ म्हणजेच इ.स.११४९ साली, हस्तिनापूर जवळील छेली या खेडेगांवी सूर्योदयसमयी श्री स्वामी समर्थ महाराज प्रथम प्रकट झाले. आपल्या लाडक्या भक्तासाठी, लहानग्या विजयसिंग साठी ही आठ वर्षांची बटूमूर्ती धरणी दुभंगून प्रकट झाली व त्याच्याशी गोट्या खेळून पुन्हा अदृश्य झाली.
हेच विजयसिंग पुढच्या जन्मी हरिभाऊ तावडे नावाने जन्माला आले व मुंबई मध्ये व्यवसाय करू लागले. श्री स्वामी महाराजांच्या अमोघ कृपेने तेच पुढे श्री स्वामीसमर्थ महाराजांचे प्रधान लीलासहचर, श्री स्वामीसुत महाराज म्हणून विख्यात झाले. राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांप्रमाणे यांचेही चरित्र विलक्षण आहे. ते सर्वार्थाने श्री स्वामीराजांचे सुत शोभतात !
श्री स्वामीसुत महाराजांनी अत्यंत भावपूर्ण रचना केलेल्या आहेत. ते स्वत: भजनही सुंदर करीत. त्यांच्या भजनात श्री स्वामी महाराज प्रसन्नतेने डोलत असत. आज राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ८६८ व्या जयंती निमित्त आपण श्री स्वामीसुत महाराजांच्या एका बहारदार अभंगाचे चिंतन करून श्रीस्वामीचरणीं ही शब्दरूप भावपुष्पांजली समर्पूया !
राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवताराचे रहस्य, कारण सांगून त्यांच्या चरणीं शरण जाण्याचा अलौकिक लाभ सांगताना श्री स्वामीसुत महाराज म्हणतात,
तुमचा हा स्वार्थ करावा समर्थ ।
अवतार यथार्थ झाला असे ॥१॥
तुम्ही ध्यावे आता तया निरंतर ।
सुखाचे आगर तया पायी ॥२॥
घ्यावयासी जिम्मा कोणी नसे दुजा ।
तयां चरणरजां लीन व्हा हो ॥३॥
नाही तुम्हां भीती तयासी शरण ।
झाल्यावरी दीन काळ होतो ॥४॥
स्वामीसुत म्हणे अवतार स्वामींचा ।
दीन अनाथांचा पालक तो ॥५॥

जनहो, साक्षात् समर्थ असा हा श्रीभगवंतांचा सर्वतंत्रस्वतंत्र अवतार झालेला आहे, तो तुम्ही आपलासा करून घ्या. यातच तुमचा खरा स्वार्थ आहे. या स्वामीसमर्थ रूपाचे तुम्ही सतत ध्यान करा, भक्ती करा. कारण त्यांचे श्रीचरण हेच सर्व सुखांचे आगर आहेत. जगातील यच्चयावत् सर्व सुखे, मग ती लौकिक असोत, पारलौकिक असोत अगर आध्यात्मिक असोत; त्यांचे मूळ स्थान हे माझ्या स्वामीरायाचे श्रीचरणच आहेत. तेथूनच सर्व सुखे उगम पावतात.
या जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव हा कर्मांच्या दोरीने घट्ट बांधलेला असतो. आपणच पूर्वजन्मी केलेल्या त्या कर्मांचा फास आपल्या गळ्याभोवती आवळलेला असतो. त्या कर्मांच्या कचाट्यातून कोणाचीही सुटका होत नाही. स्वप्रयत्नाने जो जो त्यातून सुटायचा प्रयत्न करावा तेवढा तो फास जास्तच आवळला जातो. पण जर का सद्गुरु स्वामी महाराजांना दया आली व त्यांनी एखाद्याचा जिम्मा घेतला, कैवार घेतला, जबाबदारी घेतली, तर मात्र ती भयंकर कर्मे देखील क्षणात नष्ट होऊन जातात. म्हणूनच अशा समर्थ चरणीं तुम्ही लवकरात लवकर लीन व्हावे. एकदा का माझ्या मायबाप स्वामीरायाची तुमच्यावर कृपा झाली की तुमचे काम फत्तेच झाले.
त्यांच्या श्रीचरणीं शरण गेले की कशाचीच भीती उरत नाही. अहो, स्वामीकृपा झाली की दुर्लंघ्य असा काळही त्या भाग्यवान जीवाच्या पायी दीन होऊन लोळण घेतो, बाकीच्यांचे तर नावच सोडा !
श्री स्वामीसुत महाराज सांगतात की, आजच्या पुण्यपावन तिथीला झालेला हा स्वामी अवतार खास तुम्हां आम्हां दीन दुबळ्या लोकांसाठीच झालेला आहे. स्वामीराज माउली ही आम्हां  अनाथांसाठीच अवतरलेली आमची प्रेमळ माय आहे, बाप आहे, आमची कनवाळू पालक आहे. म्हणून ते तळमळीने विनवतात की, या राजाधिराज श्री स्वामीराज भगवंतांच्या श्रीचरणीं तातडीने शरण जाऊन त्यांच्या पंचदशाक्षरी नामाचे स्मरण करा, त्यांच्याच श्रीचरणांचा एकमात्र आधार माना व तेथेच पडून राहा. म्हणजे मग या भवसागरातील कोणत्याच गोष्टीचे तुम्हांला भय उरणार नाही. नि:शंक निर्भय होऊन तुम्ही स्वामीनाम गात आनंदात आयुष्य घालवून सदैव सुखी व्हाल !
आजच्या या पावन दिनी, श्री स्वामीसुत महाराजांचा हा दिव्य उपदेश आपण आपल्या ध्यानीमनी ठसवूया, रोजच्या जीवनात उतरवूया आणि समाधानी होऊया.
श्री स्वामीजयंतीच्या या पर्वकाली, श्रीस्वामीनाम उच्चरवाने गात गात, स्वामीकृपांकित सत्पुरुष प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्या सुंदर शब्दांत, मायबाप श्रीस्वामीचरणीं कळकळीची प्रार्थना करून तेथेच तुलसीदल रूपाने विसावूया !
पूर्णब्रह्म स्वामीराया, वटमूला अप्रमेया ।
प्रवर्तिले संप्रदाया, लीलावेगी ॥
काय वानू शब्दातीत, वारंवार दंडवत ।
राखावे जी सेवारत, जन्मोजन्मी ॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

22 Mar 2017

स्वामीचिया मनोभावा जाणणे हेचि परमसेवा

आज श्रीपादनवमी !!
श्रीदत्तसंप्रदायाचे महान अध्वर्यू सद्गुरु योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांची पुण्यतिथी !
बरोबर सत्तावीस वर्षांपूर्वी आजच्याच तिथीला, पहाटे तीन वाजता एक अतीव तेजस्वी व विलक्षण 'श्रीदत्तब्रह्म', प्रचंड कार्य करून आपल्या मूळ स्वरूपी पुन्हा निमग्न झाले. अर्थात् जाणे-येणे असे त्यांच्यासाठी काहीच नसते. सर्वकाळी, सर्वत्र तेच परमानंदमय श्रीदत्तब्रह्म नित्य-निरंतर संचलेलेच आहे ! "अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव ।" असे त्यासाठीच म्हटलेले आहे.
संतांच्या जन्माने किंवा देहत्यागाने एखादी तिथी अधिक पुण्यपावन ठरत असते. तो त्या सत्पुरुषांचाच त्या तिथीवरचा मोठा कृपा-संस्कारच म्हणायला हवा. अशा पुण्यतिथीला जे त्या संतांचे, त्यांच्या अलौकिक सद्गुणांचे, त्यांच्या लोकविलक्षण कार्याचे, त्यांच्या जगावेगळ्या करुणाकृपेचे आणि महापातक्यांनाही परमपुनीत करण्याचे अद्भुत सामर्थ्य अंगी मिरवणा-या त्यांच्या लीलांचे स्मरण, मनन, कथन व पठण करतात, तेही त्यांच्या त्या कृपालेशाने पावन होतात; असे आजवरच्या सर्व संतांनीच सांगून ठेवलेले आहे. याच प्रेमादराच्या भावनेने श्रीपादनवमीच्या या पुण्यपर्वावर आपण नाथ-दत्त-वारकरी संप्रदायांचे अध्वर्यू असणा-या सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे अल्पसे पण भावपूर्ण स्मरण करून आजच्या तिथीचे नाम यथार्थ करूया; 'श्रीपादनवमी'ला 'श्रीपादचरणीं' ही स्मरण-वंदना सप्रेम समर्पून धन्य धन्य होऊया !
श्रीगुरुसेवा ही अवघ्या सद्भाग्यांचेही दैवत आहे; तेच सर्वश्रेष्ठ भाग्य आहे, असे सद्गुरु श्री माउली कथन करतात. परमार्थतील चरम अनुभूतीच्या वैभवसंपन्न रत्न-दालनाचे दर्शन करविणारी एकमात्र किल्ली म्हणजे परमादरपूर्वक झालेली निष्काम, निष्कपट श्रीगुरुसेवा हीच होय. सर्व कुलुपे उघडणा-या किल्लीला म्हणूनच 'गुरुकिल्ली' म्हणत असावेत ! सद्गुरु श्री माउलींनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात 'आचार्योपासनं' या पदावर भाष्य करताना अगदी बहार केलेली आहे. सद्गुरु श्री माउलींनी कथन केलेली श्रीगुरुसेवा आजवरच्या असंख्य महात्म्यांनी प्रत्यक्ष आचरून दाखवलेली आहे, त्याचे अनेक दाखले आपल्याला त्यांच्या चरित्रात सापडतात.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउली आदर्श गुरुभक्ताचे वर्णन करताना म्हणतात, "जो गुरुसेवाव्यसनें सव्यसन । निरंतर ॥ ज्ञाने.१३.७.४४४ ॥" या गुरुभक्ताला जणू गुरुसेवेचे व्यसनच असते; आणि माउलीच सांगतात की, व्यसनी माणसाला आपल्या व्यसनांचा कधीच कंटाळा येत नसतो. त्या न्यायाने हा गुरुभक्त रात्रंदिवस, अखंड गुरुसेवेच्या आनंदातच रममाण असतो. क्षणोक्षणी नवीन कल्पना वापरून, अभिनव कलांचा अंगीकार करून तो जगावेगळ्या पद्धतीने गुरुसेवा करीत असतो. त्यासाठी आपल्या सर्व सामर्थ्याचा, बुद्धिमत्तेचा व क्षमतांचा तो पुरेपूर आणि नेमका वापरही करीत असतो.
सद्गुरु भगवान श्री माउलींच्या या सांगण्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे होत !
श्रीगुरुसेवा हा पू. मामांचा उपजत स्थायीभावच होता. त्यांच्यासारख्या अवतारी संतांना गुरुसेवा अंगी बाणवण्याची काहीच आवश्यकता नसते. ती त्यांची अंतरंग वृत्तीच असते. त्यांच्या मनात अविरत त्या सेवेचेच वेगवेगळे विचार असतात.
आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा, कल्पकतेचा पुरेपूर वापर असे थोर गुरुभक्त पदोपदी करीत असतात. छोट्या छोट्या कृतींमधूनही त्यांचे ते अलौकिक गुरुप्रेम आणि सेवावृत्ती स्पष्ट जाणवते. पू.मामांच्याच बाबतीतला एक छोटासाच, पण गोड प्रसंग सांगतो. त्यावरून हे सहज ध्यानी येईल.
योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराज आधी २०, नारायण पेठ येथे, गोवईकरांच्या चाळीत राहात असत. त्यावेळी त्याच वाड्यात वै.पू.नाना भालेरावही राहात असत. या भालेराव कुटुंबाने श्रीमहाराजांची मनापासून सेवा केली. पू.ती.नाना हे श्रीमहाराजांचे जीवाभावाचे मदतनीस होते. श्रीमहाराजांचेही त्यांच्यावर अतीव प्रेम होते.
त्या वाड्यात श्रीमहाराजांचे बिऱ्हाड दोन खोल्यांमध्ये होते. पुढे दोन खोल्या सोडून भालेराव राहात असत. श्रीमहाराजांचे लागले-सवरले सगळे भालेरावच पाहात. रोज दोन वेळच्या उदरपूर्तीसाठी श्रीमहाराज त्यांच्याच घरी जात. दिवसभरातही बऱ्याचवेळा काही निरोप सांगायला किंवा काही हवे असल्यास श्री.गुळवणी महाराजांना तेथवर जावे लागे. भालेरावांच्या मुलांपैकी कोणी असेल तर हाक मारल्यावर पटकन् ते महाराजांकडे येऊन असेल ते काम करून जात. नाहीतर श्रीमहाराजांनाच प्रत्येकवेळी त्यांच्या खोलीपर्यंत जाऊन निरोप सांगावा लागे.
प.पू.श्री.मामा त्याकाळात नोकरी निमित्त राजकोटला वास्तव्याला होते. पण त्यांचे वरचेवर पुण्यात येणे होई. त्यावेळी श्रीमहाराजांचे दर्शन व सहवास त्यांना लाभत असे. त्यांच्या चाणाक्ष नजरेने श्रीमहाराजांना नेहमी होणारा हा त्रास नेमका टिपला. पू.मामा जात्याच अत्यंत हुशार व कल्पक होते. त्यांनी लगेच यावर छोटासा पण अचूक उपाय शोधला. बाजारात जाऊन त्यांनी एक बेल विकत आणली व ती बेल भालेरावांच्या घरात बसवली. त्याचे बटन श्रीमहाराजांच्या खोलीत होते. आता तेथे बसल्या बसल्यासुद्धा श्रीमहाराज बेल वाजवून भालेरावांपैकी कोणालाही बोलावून घेऊ शकत होते. श्रीमहाराजांना तेथवर जाऊन निरोप सांगण्याचा त्रास त्यामुळे आपोआप वाचला. पू.मामांच्या या सहजसोप्या आणि नेमक्या युक्तीमुळे श्रीमहाराजांची मोठीच सोय झाली.
गोष्ट म्हटली तर अगदी छोटीशीच आहे. पण तिचा परिणाम? तो केवढा उपयोगी ठरला ! पू.मामा हे सद्गुरु श्री माउलींना अभिप्रेत असणारे सच्चे गुरुभक्त होते, आदर्श गुरुसेवाव्रती होते. म्हणूनच त्यांच्या मनोमानसी, विचारांमध्ये सदैव आपल्या श्रीगुरूंना सुख कसे होईल? त्यांची योग्य सोय कशी होईल? त्यांचे कष्ट कसे कमी करता येतील? याचेच चिंतन चालत असे. त्यामुळेच अशा नवनवीन युक्त्या योजून, आपल्या हृदयी बहरलेले गुरुप्रेम पू.मामा सेवेच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा आस्वादत असत. सद्गुरु माउली म्हणतात तसे, "स्वामीचिया मनोभावा । जाणणे हेचि परमसेवा ॥" हेच त्यांचे जणू परमकर्तव्य होते !
संतांच्या, सद्गुरूंच्या चरित्रातील असे प्रसंग हे आपल्यासाठी केवळ आनंदाचे अनुभव नसतात; तर ते आपल्याला निरंतर मार्गदर्शकही असतात. आपल्या अंतरीचा सद्भाव, सेवाभाव वृद्धिंगत करून, आपल्यालाही सेवापरायण करणारे ते स्निग्ध प्रकाशाने उजळलेले तेजोमय रत्नदीपच असतात ! म्हणूनच अशा लीलांचे वारंवार अनुसंधान आपण आवर्जून करायला हवे.
संत हे केवळ स्मरणानेही कृपा प्रदान करीत असतात. त्यांचे कार्य आईसारखे असते. लहानग्या बाळाने आपल्या आईला नुसती प्रेमाने "आई गं" एवढी हाक मारायचा अवकाश, तिचा प्रेमप्रवाह खळखळून वाहू लागतो. तसेच या मातृहृदयी संतांचेही असते. इथे तर 'मामा' आहेत. मा म्हणजे आई, पू.मामांच्या नावातच त्या आईपणाची द्विरुक्ती आहे. त्यांचे स्वरूपच त्यांच्या नावाप्रमाणे आहे. पू.श्री.शिरीषदादा म्हणतात, "अहो, 'मामा' या शब्दालाच आईचे काळीज लाभलेले आहे !"
आपणही आजच्या श्रीपादनवमीच्या या पावन पर्वणीवर, योगिराज सद्गुरु श्री.मामांच्या चरणीं प्रेमादरपूर्वक दंडवत घालून, लेकुरवाचेने त्यांच्यातील त्या अपरंपार बहरलेल्या मातृत्वाला प्रेमळ साद घालूया व त्यांना करुणाकृपेचे दान मागूया !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया ही पेजेस जरूर लाईक करावीत.
1. https://m.facebook.com/sadgurubodh/


18 Mar 2017

जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत

आज श्रीनाथषष्ठी  !
शांतिब्रह्म सद्गुरु श्रीसंत एकनाथ महाराजांची पुण्यतिथी  !
आजच्या तिथीला नाथ महाराजांच्या चरित्रात खूप महत्त्व आहे. हिला "पंचपर्वा षष्ठी" म्हणतात. संत एकनाथांचे सद्गुरु श्री जनार्दन स्वामींची जन्मतिथी, त्यांना भगवान श्रीदत्तप्रभूंकडून अनुग्रह व त्यांचे महानिर्वाण या तिन्ही गोष्टी याच तिथीला झालेल्या आहेत. शिवाय नाथ महाराजांची व श्री जनार्दन स्वामींची प्रथम भेट व त्यांना कृपानुग्रह याच तिथीला लाभला. म्हणूनच त्यांनी हीच पवित्र तिथी निवडून गोदावरीमध्ये जलसमाधी घेतली. अन्य कोणाही संतांच्या चरित्रात असा दुर्मिळ योग पाहायला मिळत नाही.
नाथ महाराज म्हणजे साक्षात् परमशांतीच ! त्यांना भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचेच कार्यावतार म्हणतात. म्हणून "ज्ञानियाचा  एका, नामयाचा तुका" अशी म्हण संप्रदायात प्रचलित आहे.
"नारायण विधी अत्रिनाथ, दत्त जनार्दन एकनाथ ।" अशी त्यांची श्रीगुरुपरंपरा होय. त्यांना भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी देखील स्वमुखाने 'ज्ञानदेव' हा चतुराक्षरी महामंत्र प्रदान केलेला होता. श्रीदत्त संप्रदाय व वारकरी संप्रदायाचा सुंदर समन्वय त्यांच्याठायी झालेला होता. अर्थात् हे दोन्ही संप्रदाय मुळात एकाच भागवत संप्रदायाचे विभाग आहेत.
श्रीसंत नाथ महाराज म्हणजे अलौकिक गुरुभक्ती ! प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी प्रवचनात सांगितलेले एकच जबरदस्त उदाहरण सांगतो. नाथ महाराज गुरुसेवेत देवगिरी किल्ल्यावर असतानाचा हा हृद्य प्रसंग आहे. एकदा नेहमीचा मेहेतर-सेवेकरी न आल्याने त्यांच्यावर श्री जनार्दन स्वामींचा संडास स्वच्छ करण्याची जबाबदारी आली. त्यांना या नवीन सेवासंधीचा एवढा आनंद झाला की बस. डबडबलेल्या नेत्रांनी, अष्टसात्त्विकाचा आवेश कसाबसा आवरीत, त्यांनी त्या जुन्या काळाच्या टोपलीच्या संडासातील मैला स्वत: डोक्यावरून वाहून नेऊन टाकला.  पुन्हा स्नान करून सोवळे नेसले. सर्व संडास स्वच्छ केला, शेणाने सारवला व तेथे रांगोळ्या काढून उदबत्त्याही लावल्या. संडासाला फुलांचे हार बांधले व बाहेर येऊन दंडवत घातला. आपल्या परब्रह्मस्वरूप सद्गुरूंच्या श्रीचरणांचा स्पर्श या वास्तूला नेहमी होतो, हे पाहून त्यांना त्या संडासाचा हेवाच वाटत होता. म्हणूनच त्यांनी त्या संडासाची अशी जगावेगळी सेवा करून ते भाग्य सप्रेम अनुभवले. नाथांच्या या अपूर्व, अलौकिक गुरुभक्तीचे माहात्म्य काय वर्णन करावे सांगा? तेथे साष्टांग दंडवतच फक्त घालू शकतो आपण.
श्रीसंत नाथ महाराजांचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे श्रीज्ञानेश्वरीची प्रतिशुद्धी हे होय. ज्ञानेश्वरीच्या संहितेत कालौघात घुसलेले व घुसवलेले अपपाठ शोधून काढून त्यांनीच प्रथम प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरीची तयार केली. हे त्यांचे आपल्यावरील फार मोठे ऋण आहे.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या मुख्य मंदिरासमोरील कृष्णामाईचा घाट स्वत: श्रीसंत नाथ महाराजांनीच बांधलेला आहे.
भावार्थ रामायण, एकनाथी भागवत इत्यादी सर्व ग्रंथ मिळून एकूण लाखभर ओव्या व चार हजार पेक्षा जास्त अभंग, भारुडे, आरत्या असे प्रचंड वाङ्मय त्यांनी सहज लीलेने प्रकट केलेले आहे. त्यांचे अवघे चरित्र अत्यंत आदर्श असून नित्य स्मरणीय, चिंतनीय व अनुकरणीय आहे. साक्षात् भगवान पंढरीनाथ त्यांच्या घरी 'श्रीखंड्या' च्या रूपाने सेवा करीत होते, यातच सगळे आले. आजही पाहायला मिळणारी त्यांच्या नित्यपूजेतील श्रीविजय पांडुरंगांची श्रीमूर्ती म्हणजे साक्षात् श्रीभगवंतच होत.
श्री नाथ महाराजांचे हे अद्भुत कार्य जाणून, तुकारामशिष्या श्रीसंत बहेणाबाई त्यांना भागवतधर्म मंदिराचा मुख्य मध्यस्तंभ म्हणतात व ते सर्वार्थाने सत्यच आहे !
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज रात्री होणा-या आपल्या  नित्याच्या हरिपाठामध्ये संत एकनाथांची आरती रोज म्हणत असत.
आज नाथषष्ठी निमित्त श्रीसंत जनार्दनस्वामी व श्रीसंत एकनाथ महाराज या गुरुशिष्यांच्या  श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत.
श्रीसंत तुकाराम महाराज शांतिब्रह्म श्री नाथ महाराजांची स्तुती करताना म्हणतात,
शरण शरण एकनाथा ।
पायीं माथा ठेविला ॥१॥
नका पाहूं गुणदोष ।
झालों दास पायांचा ॥२॥
उपेक्षितां मज ।
तरी लाज कवणासी ॥३॥
तुका म्हणे भागवत ।
केलें श्रुत सकळां ॥४॥

आज पंचपर्वा श्रीनाथषष्ठी निमित्त श्रीसंत जनार्दनस्वामी व श्रीसंत एकनाथ महाराज या गुरुशिष्यांच्या  श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!!
( छायाचित्र संदर्भ : डावीकडे वर श्रीसंत नाथ महाराजांच्या पूजेतील श्रीविजय पांडुरंग व त्याखाली त्यांची सुशोभित समाधी. उजवीकडे महाराजांचे लेखनमग्न कल्पनाचित्र. )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

14 Mar 2017

तुकीं तुकला तुका, विश्व भरोनि उरला लोकां


आज श्रीतुकाराम बीज. जगद्गुरु श्रीसंत तुकोबारायांचा ३६७ वा वैकुंठगमन दिवस होय. इ.स. १६०९ मध्ये माघ शुद्ध पंचमी, वसंतपंचमीला त्यांचा जन्म झाला व इ.स. १६५० साली फाल्गुन कृष्ण द्वितीयेला, वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी ते भगवान श्रीपंढरीरायांच्या साक्षीने सदेह वैकुंठाला गेले. जेथला माल तेथे पुन्हा पोचता झाला !
"आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ॥तु.गा.२६६.१॥"*असे आपल्या जन्माचे रहस्य स्वत: महाराजच सांगतात. प्रत्येक युगात ते हरिभक्तीचा डांगोरा पिटण्यासाठी अवतरत होते. श्रीनृसिंह अवतारात भक्तश्रेष्ठ प्रल्हाद, श्रीरामावतारात वालिपुत्र अंगद, श्रीकृष्णावतारात सखा उद्धव, श्री माउलींच्या अवतारात श्री नामदेव महाराज; असे त्यांचेच पूर्वावतार झालेले आहेत. म्हणूनच ते म्हणतात, "नव्हों आम्ही आजिकाळीचीं ।"
"धन्य म्हणवीन येह लोकीं लोकां ।" अशी आपली प्रतिज्ञा पूर्ण करून प्रत्यक्ष देहाने वैकुंठगमन करणारे, आपल्या विलक्षण अभंगवाणीच्या माध्यमातून जनमानसाला विठ्ठलभक्ती, सदाचरण, परोपकार इत्यादी सद्गुण-मूल्यांचे सुयोग्य मार्गदर्शन करणारे, "भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ।" असा दुर्दम्य आत्मविश्वास असणारे, अत्यंत सडेतोड, परखड; पण त्याचवेळी मनाने अत्यंत सरळ, साधे, प्रेमळ असे श्री तुकोबाराय हे फार विलक्षण अवतारी सत्पुरुष होते. केवळ ४१ वर्षांच्या आपल्या आयुष्यात त्यांनी केलेल्या अद्भुत कार्याने अवघ्या महाराष्ट्रालाच नाही, तर संपूर्ण विश्वाला त्यांनी आज देखील वेडावून ठेवलेले आहे. 'मराठी म्हणजे माउली-तुकोबांची भाषा', असे समीकरणच आता रूढ झालेले आहे. त्यांची अजरामर अभंगवाणी ही त्यांच्याच सारखी अद्भुत गुणवैशिष्ट्ये असणारी, त्यांची साक्षात् वाङ्मयी श्रीमूर्तीच आहे. तिच्या रूपाने प्रत्यक्ष श्री तुकाराम महाराजच सदैव आपल्याला आशीर्वाद देत आहेत, आपले लळे पुरवीत आहेत, आपल्याला ब्रह्मानंदाचे परगुणे आकंठ जेऊ घालीत आहेत.
श्रीपंढरीनाथ भगवंतांचे लाडके लेकरु असणा-या श्रीतुकोबांचा महिमा यथार्थ वर्णन करताना; पूर्वी त्यांचे पक्के विरोधक असणारे पण खरा अधिकार जाणवल्यानंतर मात्र सर्व अहंकार बाजूला सारून, शरण जाऊन आपल्या सद्गुरूंच्या, श्री तुकोबांच्या दास्यातच जीवनाची कृतार्थता मानणारे, वाघोलीचे धर्ममार्तंड श्री रामेश्वर भट्ट प्रेमादरपूर्वक म्हणतात,
तुकाराम तुकाराम ।
नाम घेता कापे यम ॥१॥
धन्य तुकोबा समर्थ ।
जेणे केला हा पुरुषार्थ ॥२॥
जळी दगडासहित वह्या ।
तारीयेल्या जैशा लाह्या ॥३॥
म्हणे रामेश्वरभट द्विजा ।
तुका विष्णू नाही दुजा ॥४॥

आता हे एवढे उघड सत्य समोर असतानाही, ते न पाहता, न अभ्यासता; जेथे प्रत्यक्ष श्रीराम, श्रीकृष्ण हे अवतारच झालेले नाहीत, रामायण व महाभारत हे काल्पनिक कथासंग्रह आहेत, अशीही स्वच्छंद मुक्ताफळे हिरीरीने मांडण्यात धन्यता मानणा-या महान(?) विचारवंतांच्या ( विचारवंत नव्हे, जंतच ते) नजरेतून श्री तुकोबांचे वह्या तरंगणे, सदेह वैकुंठाला जाणे असे चमत्कार तरी कसे बरे सुटतील? त्यामुळे या घटनांवरही अगदी रद्दीछाप वाद घालणा-या; मंबाजी सारख्या ब्राह्मणांनी तुकोबांचा वध केल्याची गरळ ओकणा-या अज्ञानी जीवांकडे; क्षुद्र झुरळाकडे आपण करतो तसेच दुर्लक्ष करावे, हेच उत्तम.
श्री तुकोबाराय स्वमुखाने सांगतात की, शंखचक्रादी आयुधे घेतलेले भगवान पंढरीनाथ व त्यांच्या सर्व सुहृद-संतांच्या उपस्थितीत मी विमानात बसून कुडीसहित "गुप्त" झालो. गुप्त झाले म्हणजेच सूक्ष्म स्तरावरील विमानात बसून गेले. त्याची ती गुप्त होण्याची यौगिक प्रक्रिया स्थूल दृष्टीला दिसणारी, स्थूल बुद्धीला आकलन होणारी नाही. त्यामुळेच लोकांना ते पटवून घेणे जड जाते. श्री तुकोबांच्या निर्याण प्रसंगाचे अभंग त्यांनी स्वत: रचलेले असल्यामुळे त्यावर तरी विश्वास ठेवायला काहीच अडचण नसावी आपल्याला.
कोणाला काय बरळायचंय, वाद घालायचाय, आधुनिक वैज्ञानिक व लोकशाही पद्धतीने मांडणी करायची आहे, त्यांनी ती खुश्शाल मांडीत बसावी, आम्हांला काहीही घेणे-देणे नाही. आमचा सार्थ विश्वास आहे की, तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेलेच !! तशीच आमच्या सर्व संतांची धारणा आहे व स्वानुभव देखील. त्यामुळे आम्ही वाजवून वाजवून सांगणार की, होय, आमचे महाभागवत श्री तुकोबाराय आजच्याच पावन दिवशी सदेह वैकुंठाला गेले !!
आजही या द्वितीयेच्या मध्यान्ही देहूच्या इंद्रायणीगंगेच्या काठावरचा नांदुर्कीचा पुरातन पावन वृक्ष श्रीभगवंतांच्या आगमनाची शकुनलक्षणे जाणून सळसळतो, पक्षिराज गरुडाच्या विशाल पंखांच्या फडात्काराने वाहणा-या वा-याच्या तीव्र वेगाने आसमंत सुगंधित होतो, इंद्रायणीचा पुनीत काठही श्रीभगवंतांच्या दिव्य पदस्पर्शाने शहारतो, देवांना साक्षात् समोर पाहून, विश्व व्यापून उरलेल्या श्री तुकोबारायांचा कंठ आजही तितकाच दाटतो, त्यांचे थरथरणारे हात तेवढ्याच प्रेमावेगाने श्रीभगवंतांच्या चरणांना मिठी मारतात, नेत्रांतून अविरत वाहणारे आनंदबिंदू लक्ष्मीमातेने सेवन केलेले तेच पुण्यपावन श्रीचरण पुन्हा एकदा धुवून काढतात, श्रीभगवंतही आपल्या या लाडक्या सख्याला अत्यंत आनंदाने, अभिमानाने उराशी कवटाळतात; आणि तोच अलौकिक, अपूर्व-मनोहर, अद्वितीय वैकुंठगमन सोहळा पुन्हा एकदा नव्याने साकारतो; सनत्कुमारादी हरिपार्षदांच्या, चोखोबा-नाथ-नामदेवादी वैष्णववीरांच्या व लाखो भक्त-भाविकांच्या साक्षीने ! "तुकाराम तुकाराम " या कळिकाळालाही कापरे भरविणा-या महामंत्राचा प्रचंड गजर, गरुडाच्या फडात्कारात मिसळून जातो आणि आणि आमचे परमवंदनीय श्री तुकोबाराय भगवान श्रीपंढरीनाथांच्या करकमलांचा आधार घेऊन त्या दिव्य विमानी आरूढ होऊन कुडीसहितच वैकुंठाकडे प्रस्थान करतात.
प्रत्यक्ष श्री तुकोबाच निर्याणप्रसंगीच्या एका अभंगात म्हणतात,
तुकीं तुकला तुका ।
विश्व भरोनि उरला लोकां ॥तु.गा.३६०७.४॥

जेव्हा तराजू मध्ये घालून तुलना केली, तेव्हा श्री तुकोबा हे श्रीभगवंतांच्या तुलनेत उतरले, तुक समान झाले. त्यांचे सर्व सद्गुण श्रीभगवंतांसारखेच ठरले; त्यामुळे तेही श्रीभगवंतांप्रमाणे विश्व व्यापून उरले, विश्वरूप झाले. या चरणातून वैकुंठगमनाची यौगिक प्रक्रियाच ते संकेताने सांगत आहेत. जे घडले व जसे घडले अगदी तसेच त्यांनी येथे नोंदवलेले आहे.
तुका म्हणे तुम्हां आम्हां हेचि भेटी ।
उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥तु.गा.३६२४.७॥
मागे राहिल्या त्या पावन कथा व अजरामर अभंग गाथा !
त्रिभुवनालाही परमपुनीत करण्याचे अद्भुत कृपावैभव अंगी मिरवणा-या, भक्त भाविकांना अमृतमय करणा-या श्री तुकोबांच्या चरित्रातील भावपूर्ण भक्तिकथा व श्री तुकोबांचे "अक्षर स्वरूप" असणारी ही गाथा हेच आमचे भांडवल व हेच आमच्या आध्यात्मिक प्रवासाचे अवीट पाथेय देखील ! त्याचाच प्रसन्न आस्वाद घेत, त्यानुसार वर्तन करीत, श्रीगुरुकृपेच्या बळावर आपली जीवननौका इंद्रायणीच्या काठावरील अमृतानुभव देणा-या 'अलंकापुरी'च्या "माउली"रूपी बंदरात कायमची विसावणे, हाच खरा 'बीजोत्सव' आहे आणि हीच सद्गुरु श्री तुकोबांना आम्ही वाहिलेली खरी श्रद्धा-सुमनांजली ठरणार आहे !!
आपला स्वानुभव सांगताना आत्मरूप झालेले, विश्वरूप झालेले जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात,
ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनीं ।
भाग्य तरी ऋणी देव ऐसा ॥२॥
धन्य म्हणवीन येह लोकीं लोकां ।
भाग्य आम्हीं तुका देखियेला ॥तु.गा.३६०९.६॥

तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम ।
लेखक - रोहन विजय उपळेकर*
भ्रमणभाष - 8888904481*

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

13 Mar 2017

होलिकोत्सव विशेष - लेखांक दुसरा


रामीरामदासी होळी केली संसाराची धुळी
फाल्गुन पौर्णिमेला सायंकाळी होळी पेटवतात व कृष्ण प्रतिपदेला धूलिवंदन करतात. होळीच्या राखेने अभ्यंगस्नान करण्याची आपल्याकडे पद्धत आहेे. या बरोबरच रंग खेळण्याचीही परंपरा आहे. विशेषत: उत्तरभारतात आजच रंग खेळला जातो. पण महाराष्ट्रात मात्र रंगपंचमीलाच रंग खेळला जातो. म्हणूनच आपल्या मराठी संतांच्या वाङ्मयात येणारे होळीचे वर्णन हे होळी पेटवण्याचे आहे; तर उत्तरेतील संतांच्या वाङ्मयात येणारी होळी ही रंगांची उधळण आहे. तो भगवान श्रीकृष्णांचा व गोपगोपींचा फाग आहे, रंगोत्सव आहे.
भगवान श्रीकृष्ण व गोप-गोपींच्या फागुन लीला भारतीय संतकवींनी खूप विशेषत्वाने गायलेल्या आहेत. त्या लीलांचा लौकिक अर्थ जरी होळी-रंगोत्सव असा असला तरी त्यांचा गूढार्थ फारच अलौकिक आहे. त्यावर अनेक अधिकारी महात्म्यांनी सुरेख चिंतन मांडलेले आहे. योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या अधिकारी शिष्या, प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांनी श्रीसंत मीराबाईंच्या 'फागुन के दिन चार रे' या अभंगावर अप्रतिम विवरण केलेले आहे. त्यातून त्यांनी संपूर्ण होळीचा मनोहर योगार्थच विशद केलेला आहे. श्रीवामनराज प्रकाशनाचे हे पुस्तक वाचल्यावर फागुनलीलेचा विलक्षण मथितार्थ आपल्या ध्यानी येतो आणि अक्षरश: आपण भारावून जातो !
समर्थ श्री रामदास स्वामी देखील आपल्या होळीवरील भारुडातून होलिकोत्सवाचे स्वानुभूत मार्मिक स्वरूप सांगताना म्हणतात,
अवघेचि बोंबलती ।
होळी भोंवते भोविती ॥१॥
मायाहोळी प्रज्वळली ।
सृष्टि वेढारे लाविली ॥२॥
ज्याकारणे गुंडाळती ।
तेचि वाचे उच्चारती ॥३॥
होळीमध्ये खाजे आहे ।
ते तूं विचारुनि पाहे ॥४॥
खाजे खातां सुख होय ।
परी कठिण हातां नये ॥५॥
खोल दृष्टीने पाहिले ।
खाजे त्याच्या हातां आले ॥६॥
एक झडा घालूं जाती ।
लंडी चकचकून पळती ॥७॥
एक देहाचे पांगिले ।
ते आंगी हुर्पळले ॥८॥
उडी अवघ्यांचीच पडे ।
परि ते हातांसी न चढे ॥९॥
एके थोर धिंवसा केला ।
खाजे घेऊन पळाला ॥१०॥
एक आपणचि खाती ।
एक सकळांसि वांटती ॥११॥
एक घेऊन पळाले ।
परी कवंठी वरपडे जाले ॥१२॥
रामीरामदासी होळी ।
केली संसाराची धुळी ॥१३॥

(समर्थ गाथा -  ओवी १००५.)
समर्थ म्हणतात, भगवंतांच्या मायेने ही सृष्टी रचलेली आहे, तीच जणू त्यांची मायारूप होळी पेटलेली आहे. यच्चयावत् सर्व जड-जीव आपापल्या कर्मांनी बद्ध होऊन या पेटलेल्या मायारूप होळीभोवती बोंबलत फिरत आहेत. त्यांना या रामरगाड्यात ज्या कर्मांनी बांधलेले आहे, त्याच कर्मांविषयी ते सतत बोलत आहेत, त्यातच गुरफटून पडलेले आहेत. त्या बंधनकारक कर्मांशिवाय त्यांना दुसरा चिंतन-विषयच नाही.
ही माया देखील भगवंतांची अचिंत्यशक्तीच आहे. त्या माध्यमातून भगवंतच सृष्टीरूप झालेले असल्याने, त्या सृष्टीचे मूळकारण हे परब्रह्मच आहे. तेच होळीतील खाजे होय. होळीत पुरणपोळी व नारळ घालतात, तो नारळ नंतर प्रसाद म्हणून खातात. तेच त्यातले खाजे वरवर पाहता सापडत नाही. पण ज्या जीवावर श्रीसद्गुरूंची कृपा होते, त्याच्या दृष्टीला फाटा फुटतो व जेव्हा तो त्या दृष्टीने पाहू लागतो तेव्हाच त्याला भासमान मायेच्या आत गढलेले आनंदमय परब्रह्मतत्त्व दिसू लागते. अशी खोल दृष्टी लाभणे म्हणजेच सद्गुरुकृपा होणे, असे श्री समर्थ आवर्जून सांगतात.
पण जे स्वत:च्याच बळावर त्या मायेचा थांग लावू पाहतात, तिचा झाडा घेऊ जातात, ते तिच्या झगमगाटात, विविधरंगी शोभेत वाहावत जाऊन कुठल्या कुठे फापलतात. ती माया त्या लंडी जीवांना भुलवतेच. आपण निघालो कशासाठी व जायचे कुठे? हेच ते पार विसरून जातात. जे जीव आपल्या देहाच्या बंधनात अडकलेले असतात, म्हणजे ज्यांची देहबुद्धी खूप तीव्र असते, ते त्या मायारूप होळीत होरपळून जातात, त्यांचे अस्तित्वच पूर्णपणे संपते. देहजळात मासोळी बनून बुडी दिलेल्या जीवालाच सुख-दु:खरूपी अनुभवात अडकून पडावे लागते, असे माउली देखील सांगतात.
आनंदाचे ते खाजे मिळवण्यासाठी या मायारूप होळीवर सर्वच जण जाणतेपणी वा अजाणतेपणी  आपापल्या परीने उडी घेतात, पण ते खाजे तसे सहजासहजी कोणाच्याही हाती लागतच नाही. त्यातूनही ज्या जीवांवर सद्गुरुकृपा होते व जे सद्गुरुचरणीं शरण जाऊन धैर्याने साधना करतात, त्यांनाच ते परब्रह्मरूप खाजे प्राप्त होते. मात्र असे भाग्यवान जीव ते खाजे घेऊन त्या मायेपासून दूर पळून जातात.
अशा मायेचे रहस्य जाणणा-या महात्म्यांचेही दोन प्रकार असतात, असे समर्थ येथे सांगतात. एक प्रकार म्हणजे मायाहोळीतून मिळालेले खाजे फक्त स्वत: एकटेच खाऊन तृप्त होणारे महात्मे व दुसरा प्रकार म्हणजे तेच खाजे अधिकार जाणून इतरांनाही वाटून खाणारे महात्मे. पहिल्या प्रकारातील महात्मे म्हणजे आत्माराम अवस्थेला पोचून जगाशी काहीही घेणे देणे नसणारे अवलिया संत होत. ते लोकांच्या भानगडीत पडत नाहीत, आपल्याच आनंदात रममाण होऊन राहतात. तर दुस-या प्रकारातील महात्मे हे श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात तसे, "जाणते व दाविते" असे असतात. ते स्वत: तर ब्रह्मस्वरूप होतातच, पण जनांच्या कळवळ्याने तोच ब्रह्मरूप कृपाप्रसाद सुयोग्य व्यक्ती पाहून प्रदान करतात व त्यांचाही उद्धार करतात.
याव्यतिरिक्त अजून तिसरा प्रकारही श्री समर्थ मार्मिकपणे सांगतात की, असे काही जीव असतात, जे ते खाजे समजून फक्त नारळाची करवंटीच घेऊन पळून जातात, पण शेवटी त्यांची फसगत होते. त्यांच्यावर सद्गुरुकृपा नसल्याने सुरुवातीला परमार्थच होतोय असे दिसते पण शेवटी ते त्या मायेच्या कचाट्यात पूर्ण अडकतात व आत्मलाभ न होता त्याचा केवळ आभासच त्यांना प्राप्त होतो. असे जीव भगवंतांच्याच संकल्पाने महात्मे म्हणून जगात मिरवतात खरे, पण त्यांच्यापाशी परमार्थाची कसलीही खरी अनुभूतीच नसते. यांनाच शास्त्रांनी 'असद्गुरु' असे नामाभिधान दिलेले आहे. म्हणूनच श्री समर्थ त्यांना नारळ सोडून करवंटीच लाभली, असे खेदाने म्हणतात.
समर्थ रामदास स्वामींना मात्र सद्गुरुकृपेने मायारूप होळीचे रहस्य पुरेपूर समजले व त्यांनी श्रीसद्गुरूंनी सांगितलेल्या युक्तीनुसार, रामदास्य करून मायेची होळी पेटवली व तिचेच भस्म सर्वांगाला लावून धुळवडही साजरी केली. त्यांनी श्रीसद्गुरुप्रदत्त साधन करून मायारूप भ्रामक संसाराचीच धुळवड केली. त्यांचा कर्मबंधरूप संसार धुळीला मिळाला व अखंड आनंदरूप परमार्थ त्यांचे सर्वस्व व्यापून भरून उरला !
समर्थ श्री रामदास स्वामींचा होळीचा हा गूढ अभिप्राय समजून घेणे खरेतर अत्यंत अवघड आहे, पण सद्गुरुकृपेने त्याचा थोडा विचार होऊ शकला. समर्थांच्या या प्रसन्न  रूपकाचे सार म्हणजे, "श्रीसद्गुरूंनी दिलेली साधना निष्ठेने व प्रेमाने तसेच त्यांनी सांगितलेल्या युक्तीने मनापासून करणे, हेच आहे. असे जो करतो, त्याचीच होळी खरी साजरी होते व तोच अखंड, अद्वय आनंदाचा धनी होतो. त्याच्या भावभक्तीने वश झालेले भगवान श्रीहरी मग प्रत्यक्षच त्याच्याशी होळी खेळतात व त्याला आपल्या अलौकिक प्रेमरंगाने भरलेल्या पिचकारीने सचैल माखून टाकतात. आपल्या भूमानंदाचे खाजे ते स्वत:च्या मंगलहस्तानेच त्याला भरवतात. भगवान श्रीरंगांच्या त्या अपूर्व-मनोहर रंगांमध्ये मग तो कायमचा रंगून जातो, अंतर्बाह्य मोहरून जातो आणि "अवघा रंग एक जाला ।" अशी चिन्मय अनुभूती निरंतर लाभून, तोही श्रीरंगांचेच अभिन्न-स्वरूप होऊन ठाकतो. हाच संतांना अभिप्रेत असणारा अविरत साजरा होणारा खरा फाल्गुनी रंगोत्सव आहे !!"
असाच सप्रेम रंगोत्सव तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्यात श्रीगुरुकृपेने साजरा होवो, हीच या होलिकोत्सवाच्या प्रसंगी श्रीगुरुचरणीं सादर प्रार्थना  !!!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

12 Mar 2017

होलिकोत्सव विशेष - लेखांक पहिला

एका जनार्दनी मारिली बोंब

आज हुताशनी पौर्णिमा अर्थात् होळी  !!
अविद्येची, अज्ञानाची, अपूर्णतेची, विकारांची होळी करून ज्ञानाचा, तेजाचा, सद्गुणांचा, सत्त्वाचा स्निग्ध प्रकाश पसरवणारा हा तेजोत्सव  !
भगवान श्रीकृष्ण व भगवती श्रीराधा आणि इतर गोप-गोपींच्या होळी-लीलेचा सुमधुर आस्वाद, भावगर्भ अशा संतसाहित्यातून व जुन्या काव्य-साहित्यातून आपल्याला वाचायला मिळतो.
आजच्याच तिथीला भक्तश्रेष्ठ श्री प्रल्हादांना जीवे मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण जी होलिका तिला पाचारण केले. 'अग्नी कधीही जाळणार नाही', असा तिला आशीर्वाद प्राप्त होता. लहानग्या प्रल्हादांना तिच्या मांडीवर बसवून भोवताली आग लावून देण्यात आली. प्रल्हादजी आपल्या नारायणस्मरणात निमग्न होते. पण आश्चर्यच वर्तले ! कुबुद्धीचे साक्षात् रूप असणारी ती होलिकाच जळून खाक झाली. प्रल्हादांच्या केसालाही धक्का लागला नाही.
ही होळीची कथा फार मार्मिक आहे. भगवंतांच्या भक्तांना कोणत्याही वाईट शक्ती कधीच काहीही करू शकत नाहीत, हाच गर्भित संकेत या कथेतून दिलेला आहे.
आजच्याच तिथीला, १८ फेब्रुवारी १४८६ रोजी बंगाल प्रांतातील नवद्वीप परिसरातील मायापूर येथे, मायेला कायम ठकविणा-या भगवान श्रीकृष्णांच्या परमप्रेमस्वरूपाने, भगवती श्रीराधाजींनी वंदनीया शचीमातेच्या पोटी अवतार धारण केला; श्रीगौरांग - चैतन्य महाप्रभू नावाने ! ते साक्षात् श्रीकृष्णप्रेमाची घनीभूत श्रीमूर्तीच होते. गौडीय द्वैतवादी वैष्णवमताचे प्रधान आचार्य असणा-या श्रीचैतन्य महाप्रभूंचे समग्र चरित्र अक्षरश: अलौकिक आहे. गोरखपूरच्या गीताप्रेसने प्रकाशित केलेले व पू.प्रभुदत्तजी ब्रह्मचारी यांनी लिहिलेले "श्रीश्रीचैतन्य चरितावली" हे भलेमोठे अद्भुत चरित्र सर्वांनी एकदातरी आवर्जून वाचावेच, अशी माझी कळकळीची विनंती आहे.
श्रीमहाप्रभूंचे हरिसंकीर्तन विलक्षण असे. श्रीकृष्णनाम नुसते ऐकले तरी त्याक्षणी ते भावावस्थेमध्ये जात असत. आपल्या महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये महाप्रभूंचे काही काळ वास्तव्य झालेले असून पंढरपूर, जेजुरी या तीर्थस्थानी त्यांनी लीला केल्याच्या नोंदी आहेत. त्या भ्रमंतीमध्ये पंढरपूरहून जेजुरीला जाताना ते प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या फलटण नगरीतूनच गेलेले असणार. याच प्रवासात त्यांनी जेजुरीजवळील वाल्हे खिंडीत वाटमारी करणा-या नौरोजी नावाच्या डाकूवर कृपा करून त्याचा उद्धार केला होता. पुढे जेजुरीतील काही देवदासींनाही भगवद्भक्तीचे मर्म सांगून त्या हीन जगण्यातून बाहेर काढले होते. १४ जून १५३४ रोजी त्यांनी जगन्नाथपुरी येथे श्रीजगन्नाथ भगवंतांच्या श्रीमूर्तीमध्ये आपला दिव्य देह विलीन करून अवतार समाप्ती केली. आज त्यांच्या लीलांचे स्मरण करून व त्यांना अत्यंत प्रिय असणारे भगवन्नाम गाऊन आपण त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त करूया !
आपल्या संतांनी होळीच्या रूपकावर अतीव अर्थगर्भ व सुंदर अभंगरचना केलेल्या आहेत. श्रीसंत एकनाथ महाराज अशाच आपल्या एका रूपक अभंगात म्हणतात,
देहचतुष्टयाची रचोनि होळी ।
ज्ञानाग्नि घालुनी समूळ जाळी ॥१॥
अझुनि का उगलाची ।
बोंब पडों दे नामाची ॥२॥
मांदी मेळवा संतांची ।
तुम्हां साची सोडविण्या ॥३॥
धांवण्या धावती संत अंतरंग ।
संसार शिमगा सांग निरसती ॥४॥
एका जनार्दनीं मारिली बोंब ।
जन वन स्वयंभ एक जालें ॥५॥

स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे चार देह आहेत. या चारी देहांची होळी रचून त्याला श्रीसद्गुरुकृपेने प्रकट होणारा ज्ञानाग्नी लावून ती होळी समूळ जाळून टाकली पाहिजे. अरे मनुजा, अजूनही तू गप्प का आहेस? श्रीसद्गुरूंनी कृपापूर्वक दिलेल्या नामाची त्यांनी शिकविलेल्या युक्तीने मनापासून बोंब मार.
तुझी या संसारचक्रातून सोडवणूक होण्यासाठी संतांच्या मांदियाळीला शरण जा. संतांची मांदियाळी म्हणजेच आपापली श्रीगुरुपरंपरा होय. त्या परंपरेच्या कृपेनेच तुझी यथार्थ सोडवणूक होईल.
होळी भोवती बोंब मारत धावतात. तसे हे संत आपल्याला बाहेर न धावता अंतरंगातच धावायला आणि आपल्या हृदयातच हरिनामरूपी बोंब मारायला शिकवतात व बाहेर बहरणारा संसाररूपी शिमगा त्याद्वारे समूळ निरसतात.
सद्गुरु जनार्दनांनी माझ्या कानात कृपायुक्त नामाची बोंब मारल्यामुळे व त्यांनी शिकवल्याप्रमाणे मी देखील नामाची बोंब मारल्यानेच आता जनी, वनी, सर्वत्र मला ते स्वयंभू परब्रह्मच सतत प्रतीत होत आहे. माझा शिमगा सद्गुरुकृपेने असा साजरा झाला, आता तुम्ही देखील श्रीसद्गुरूंना शरण जावून, माझ्यासारखाच तो प्रयत्नपूर्वक साधून घ्या, असे संत एकनाथ महाराज या अभंगातून आपल्याला उपदेशितात.
श्रीगुरुकृपेने अनुभवलेला आपला विलक्षण अनुभव ते येथे सुंदर शब्दांमध्ये व्यक्त करीत आहेत. यातील सार आपण लक्षात घ्यायला हवे. "अझुनि का उगलाची । बोंब पडों दे नामाची ॥" हेच त्यांचे तळमळीचे सांगणे जर आपण लवकरात लवकर समजून नाही घेतले, तर आपल्यावर वेगळ्या प्रकारची बोंब मारण्याची वेळ नक्कीच येईल आणि तेव्हा कोणी त्यातून बाहेर काढणारेही जवळ नसेल. म्हणून वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
संतांना अभिप्रेत असणारी ही खरी होळी सर्वांना लवकरात लवकर साजरी करायला मिळो, हीच या होलिकोत्सवाच्या निमित्ताने मन:पूर्वक शुभेच्छा !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

8 Mar 2017

प्रीतिनंद मागतसे प्रीती सेवादान

काही विभूती आपल्या अल्पशा पण अत्यंत महत्त्वपूर्ण सेवेमुळे अजरामरच होऊन जातात. तेवढ्या गोष्टीसाठी अवघे जग त्यांचे ऋणाईत होऊन राहते. उदाहरण सांगायचे तर; दौलताबादच्या श्रीसंत जनार्दन स्वामींचे शिष्य श्रीसंत रामाजनार्दन महाराजांचेच देता येईल. त्यांचे नाव गाव, ठावठिकाणा, चरित्र विचारले तर कोणीही सांगू शकणार नाही, पण त्यांच्या अवघ्या एकाच दिव्य रचनेमुळे, अक्षरश: हजारो लोकांच्या मुखी त्यांचे नाव आजही रोज येते. त्यांची ती सुप्रसिद्ध रचना म्हणजेच सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांची, "आरती ज्ञानराजा ।" ही आरती होय.
अगदी अशाच प्रकारचे दुसरे विभूतिमत्व म्हणजे, राजाधिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांची बखर लिहिणारे, स्वामीशिष्य प्रीतिनंद स्वामीकुमार तथा श्रीसंत गोपाळबुवा केळकर हे होत. त्यांनी लिहिलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बखरीमुळेच आजमितीस आपल्याला परमअद्भुत अशा असंख्य स्वामीलीलांचा सप्रेम आस्वाद घेता येतो आहे. खरेतर हे श्री.गोपाळबुवांचे आपल्यावरील कधीही न फिटणारे महान ऋणच आहे !
चिपळूण शहरातील मार्कंडी भागातला 'स्वामी समर्थ मठ' ही भक्तश्रेष्ठ श्री.गोपाळबुवा केळकरांची कर्मभूमी. मूळचा कोकणातला, इंग्रजी तिसरी शिकलेला व नागपूर येथे रेल्वे स्टेशन मास्तर म्हणून नोकरी करणारा, गोपाळ नावाचा हा नास्तिक माणूस, पोटाच्या व्याधीने खूप गांजून गेला होता. काहीच उपयोगी पडत नाही म्हणून शेवटी त्याने देवाधर्माचाही आधार घेऊन पाहिला. "या जगात ईश्वर म्हणून कोणी जर असेल तर त्याने माझी पोटशूळाची व्याधी बरी करावी, मी आजन्म त्याच्या सेवेत घालवीन !" असा निश्चय गोपाळाने केला आणि त्यातच दैव अनुकूल झाल्यामुळे खरोखरीच व्याधीला आराम पडला. आता त्या ईश्वराला शोधणार कुठे? त्यांनी ऐकलेले होते की, देव साधूसंतांच्या जवळ असतो. म्हणून गोपाळ केळकरांनी साधूंच्या दर्शनास जाण्याचे ठरविले.
त्याकाळी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रसिद्धी होती, म्हणून ते त्यांच्या दर्शनाला गेले. गोपाळ केळकरांवर श्री स्वामी महाराजांची कृपादृष्टी झाली व त्यांना आपल्या जीवनाचे कर्तव्यही समजून आले. ते स्वामीसेवेत गढून गेले. घरातून न सांगताच ते अक्कलकोटला आले होते. पुढे त्यांच्या पत्नीला त्यांचा ठावठिकाणा लागला, त्याही अक्कलकोटी आल्या व श्री स्वामींचे दर्शन लाभून धन्य झाल्या.
गोपाळराव अक्कलकोटी तीन साडेतीन वर्षे स्वामीसेवेत होते. त्यांनी डोळसपणे सर्व स्वामीलीला जाणून घेतल्या, आपल्या मनेमानसी जपून ठेवल्या. नंतरच्या काळात त्यांनी आपल्या सवडीने हे स्वामीलीलांचे अलौकिक वैभव शब्दबद्ध करून, मोडीमध्ये लिहून काढले. त्यांच्या हातची मोडीत लिहिलेली व २६४ लीलाकथा असणारी बखर आजही चिपळूणच्या मठात जपून ठेवलेली आहे.
श्री.गोपाळबुवांच्या अक्कलकोट वास्तव्यात त्यांनी स्वत: श्री स्वामीमहाराजांच्या अनेक लीला समोर घडलेल्या पाहिलेल्या होत्या. श्री स्वामी महाराजांचे काही दिव्य अनुभव त्यांनी स्वत: देखील घेतले. त्यामुळे त्यांची पक्की खात्री झालेली होती की, साक्षात् परब्रह्मच श्री स्वामी समर्थ रूपाने अक्कलकोटी प्रकटलेले आहे. ते अनन्यभावाने त्या पावन श्रीचरणीं शरण जाऊन, त्यांच्याच स्मरणात अखंड सेवारत होऊन राहिले. श्री स्वामी महाराजांनाही आपल्या या दासाची एकेदिनी दया आली व श्री.गोपाळबुवांवर स्वामीकृपामेघ असा अनवरत बरसला, की बुवांचे अस्तित्वच पार मावळून गेले. बुवांच्या शुद्ध झालेल्या चित्तात श्री स्वामी महाराजांचा कृपामयूर बेभान नृत्य करू लागला. त्याच्या त्या प्रीतिनर्तनाने आनंदाची जणू कारंजीच फुटली बुवांच्या सर्वांगाला; बुवा त्या कृपावर्षावाने सहज समाधी अनुभवते झाले. त्यांचा जणू नवीन जन्मच झाला; आणि प्रत्यक्ष मायबाप श्री स्वामीपरब्रह्माने त्यांचे नामकरणही केले; गोपाळबुवांचे 'प्रीतिनंद स्वामीकुमार' होऊन ठाकले !!
श्री.गोपाळबुवांवर राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांनी हचनाळ या गावी पहाटे तीन वाजता, कृपादृष्टीने न्याहाळून शक्तिपात केला. त्याक्षणी बुवांचे भानच हरपले, ते तासभर त्याच समाधिस्थितीत होते. नंतर काही दिवसांनी श्रीगुरु स्वामी महाराजांनी गोपाळबुवांना व त्यांच्या पत्नीला बोलावून आज्ञा केली, "चिपळूण ग्रामाबाहेर मार्कंडी स्थानी जाऊन राहावे व आमची सेवाचाकरी करावी. गुरुवारी भिक्षा मागून सेवावसा चालवावा, आमच्या कृपेने काहीही कमी पडणार नाही, जाव !" श्री स्वामीगुरूंनी नुसतीच आज्ञा केली नाही, तर आपला लाकडी दंड व चांदीच्या पादुकाही कृपाप्रसादपूर्वक बुवांच्या ओटीत घातल्या. आजमितीस हा देवदुर्लभ ठेवा मार्कंडी मठात सुखरूप ठेवलेला आहे.( लेखासोबतच्या छायाचित्रात डावीकडे श्रींचा तोच दंड व समोर छोट्या चांदीच्या पादुका ठेवलेल्या पाहायला मिळतात.) श्री स्वामी महाराजांनी निघताना बुवांना दोन नारळ व एक खारीक प्रसाद म्हणून दिली. या संकेतानुसार पुढे बुवांना दोन पुत्र व एक कन्या झाली. बुवांचे सर्व कुटुंब प्रेमाने स्वामीसेवा करण्यात निमग्न असे.
चिपळूण येथे मार्कंडी भागातील एका डुंगावर श्री.ब्रह्मचारीबुवा नावाच्या श्रीस्वामीशिष्यांकरवी श्री स्वामीसुत महाराजांनी इ.स.१८७३ मध्येच संगमरवरी श्रीस्वामीपादुकांची स्थापना करवून घेतलेली होती. श्री.ब्रह्मचारीबुवा त्या पादुकांची जबाबदारी एका शिक्षकावर सोपवून यात्रेला निघून गेले होते. तत्पूर्वी त्यांनी सांगून ठेवले होते की, "काही दिवसांतच आमचा माणूस येऊन सगळी जबाबदारी पाहील, तोवर तू सेवा कर." राजाधिराज श्री स्वामी महाराजांच्या प्रेरणेने, श्री स्वामीसुत महाराज व श्री ब्रह्मचारीबुवा या दोघांना मार्कंडी मठाचे भविष्य स्पष्ट माहीत होते. श्री स्वामींनी देखील याच स्थानाचा निर्देश करून बुवांना चिपळूणकडे रवाना केले होते.
काही काळ गोपाळबुवा पत्नीसह मुंबईला श्री स्वामीसुतांच्या सान्निध्यात राहिले व इ.स.१८७४ साली श्री स्वामी महाराजांनी दिलेल्या पादुकाप्रसादासह मार्कंडीला येऊन स्थिरावले.
श्री.गोपाळबुवांचा दिनक्रम रेखीव होता. त्यांना पहाटे तीनला स्वामीकृपा लाभली, म्हणून ते पहाटे तीननंतर कधीच झोपले नाहीत. एवढेच नाही तर, त्यांनी देह देखील पहाटे तीन वाजताच ठेवला. नित्यनियमाने दोन्ही श्रीपादुकांची पूजा अर्चा, नैवेद्य, भजनादी नित्यक्रम व फावल्या वेळात श्रीज्ञानेश्वरी, भागवत, गाथा आदी सद्ग्रंथांचा ते अभ्यास करीत. त्यांवर सुरेख प्रवचनसेवाही करीत. श्री स्वामीआज्ञेने रंजल्या गांजल्या जीवांना योग्य मार्ग सांगून चिंतामुक्त करीत, त्यांना स्वामीभक्तीचा उपदेश करीत. श्रींच्या अगाध कृपेने बुवांच्या माध्यमातून असंख्य लोकांचे भले झाले, अजूनही होत आहे. श्री.गोपाळबुवांची चौथी पिढी त्यांनी सांगितल्यानुसार आजही मार्कंडी मठात सेवारत आहे. या स्थानावर श्री स्वामी महाराजांच्या कृपेची प्रचिती सर्वांना निरंतर येत आहे. श्री.गोपाळबुवा फक्त गुरुवारी भिक्षा मागून आणत व त्यात मिळालेल्या जिनसांवर संपूर्ण आठवडा काढीत. त्यांच्या धर्मपत्नीनेही त्यांना व त्यांच्या खडतर स्वामीसेवेला सर्व बाजूंनी साथ दिली.
इ.स.१८७८ साली चैत्र कृष्ण त्रयोदशीला राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांनी लौकिक देहत्यागाची लीला केली. ती वार्ता ऐकून श्री.गोपाळबुवांना गुरुविरहाचे दारुण दु:ख झाले व त्यांनीही देहत्याग करायचा ठरवून प्रायोपवेशन आरंभिले. तिस-या दिवशी साक्षात् श्री स्वामीमूर्ती समोर उभी ठाकली व बुवांचे सांत्वन करीत म्हणाली, "अरे, आम्ही कुठेच गेलेलो नाही. चैतन्यरूपाने आम्ही सर्वत्र व्यापूनच आहोत. भक्तांसाठी तर आम्ही सदैव प्रकटच आहोत, कोठेही गेलेलो नाही. तेव्हा खंत करू नये, निश्चिंत मनाने सेवा चालवावी. आम्ही सतत तुझ्या पाठीशी आहोतच !" श्री स्वामीराजांच्या या आश्वासनाने श्री.गोपाळबुवा पुनश्च नव्या जोमाने स्वामीसेवेस लागले. श्री स्वामी महाराजांच्या या प्रत्यक्ष दर्शनाने त्यांच्या 'प्रकट असण्याची' खात्री पटल्यामुळे, बुवांनी श्री स्वामी महाराजांची पुण्यतिथी कधीच साजरी केली नाही. ते कायम जयंती उत्सवच मोठ्या प्रमाणावर साजरा करीत असत. आजही हा उत्सव मार्कंडी मठात दिमाखात साजरा होतो. शिवाय श्री स्वामीसुत महाराजांची पुण्यतिथी, श्रीगुरुपौर्णिमा, श्रीदत्तजयंती, श्रीगुरुद्वादशी असेही उत्सव साजरे होतात.
सद्गुरु श्री स्वामी महाराजांच्याच प्रसादाने श्री.गोपाळबुवांना सरस्वतीचे वरदान लाभले होते. त्यांच्या मुखातून स्वामी महाराजांनीच अनेक रचनांची निर्मिती करवली. त्यांचे कवित्व अपार झाले. पण त्यातून आपलीच कीर्ती होईल, लोक स्वामी महाराजांच्या ऐवजी आपल्या भजनी लागतील, हे जाणून बुवांनी ते सर्व लिखित ग्रंथ एकेदिवशी 'अग्नये स्वाहा' करून टाकले व 'इदं न मम' म्हणून ते मोकळे झाले. तरीही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने, 'साधनविवेकसारामृत' व  'श्रीकरुणास्तोत्र' या दोनच पद्यरचना व बखर तेवढी आपल्या भाग्याने वाचली. गेल्याच वर्षी, चार प्रकरणांच्या व एकूण ११८ ओवीसंख्येच्या  'साधनविवेकसारामृत' या सुंदर ग्रंथाच्या निर्मितीला शंभर वर्षे पूर्ण झाली. या सारामृतात पू.बुवांनी स्वामीसंप्रदायाचे साधन अनेकांगांनी विस्तारून सांगितलेले आहे. 'श्रीकरुणास्तोत्र' ही दोन अध्यायांची व एकूण २१० ओव्यांची श्री स्वामी महाराजांची करुणाकृपा भाकणारी भावपूर्ण रचना आहे. याच्या नित्यपठणाने भाविकांचे क्लेश, आपत्ती नष्ट होवोत, असे वरदान शेवटी बुवांनी मागून ठेवलेले आहे.
श्री.गोपाळबुवांच्या माध्यमातून प्रकटलेल्या याच स्वामीकृपा-वैभवाचे अपरंपार ऋण आजही सर्व स्वामीभक्त प्रेमादराने मस्तकी वागवत आहेत. बखरीमुळे श्रीसंत प्रीतिनंद स्वामीकुमार तथा श्री.गोपाळबुवा अजरामर झालेले आहेत, अगणित स्वामीभक्तांच्या नित्यपाठात विसावलेले आहेत. 'श्री स्वामी समर्थांची बखर' वाचलेली नाही, असा एकही स्वामीभक्त शोधून सापडणार नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्रिभुवनपावन व अत्यंत अलौकिक लीलाकथांचे, प्रामाणिक व सर्वथा सत्य संकलन असणारी ही बखर, स्वामीभक्तांच्या गळ्यातला कंठमणीच आहे यात शंका नाही. ब्रह्मांडनायक श्री स्वामीराजांचे प्रेम हृदयी रुजवणारी, फुलवणारी ही बखर, एकप्रकारे श्री.गोपाळबुवांचे व त्याच्या अनन्य स्वामीभक्तीचे अविनाशी, चिरंतन स्मारकच आहे !
थोडी थोडकी नाही, तर तब्बल शेहेचाळीस वर्षे श्री स्वामीसमर्थ महाराजांची निरलस, निरपेक्ष सेवाचाकरी करून, आजच्याच पावन दिनी, फाल्गुन शद्ध एकादशी दिनांक १ मार्च १९२० रोजी श्री.प्रीतिनंद स्वामीकुमार तथा श्री.गोपाळबुवांनी स्वामीचरणीं आपली काया कायमची वाहिली. मार्कंडी मठाच्या समोरच त्यांच्या अस्थीकलशावर त्यांची समाधी बांधण्यात आलेली आहे. यावच्चंद्रदिवाकरौ अनन्य स्वामीभक्त श्री.गोपाळबुवा, आपल्या परमाराध्य श्री स्वामीराजांचे नित्यश्रीर्नित्यमंगल असे वैभव पाहात, त्यांचे सप्रेम स्मरण करीत श्रीपादुकांसमोर सदैव सेवारत आहेत; आणि त्यांच्याच कृपेने आपणही त्यांच्या लीलांच्या माध्यमातून संपन्न अशा स्वामीचरित्राचे अनुसंधान करीत आहोत, आपले हे भाग्यही किती थोर !
'श्रीस्वामी समर्थ बखरी'च्या रूपाने अमर झालेल्या, श्रीसंत गोपाळबुवा केळकर महाराजांच्या ९७ व्या समाधिदिनी, त्यांच्या श्रीचरणीं सादर दंडवत  !!
( छायाचित्र संदर्भ : डावीकडे श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वहस्ते दिलेला दंड व चांदीच्या पादुका, त्यामागे पू.बुवांच्या ग्रंथरचना. उजवीकडे वर पू.बुवांचा फोटो व त्याखाली पू.बुवांची समाधी)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )